पहाट झाली तशी आईच्या हाका सुरू झाल्या. " चला उठा सगळे, आता उजाडेल " मग हळुहळु सगळे उठले. बाबा, मोठेबाबा, सगळी मोठी मुलं लांबच्या जंगलात जायला निघाली. पाठोपाठ आई, गीताची आई, गीता, मी आणि सगळ्या बायका, मुली बाहेर पडल्या. मोठी आई, आणि छोटी आई मात्र गुहेच थांबल्या. आज छोट्या आईचे पोट खूपच दुखत होते. मधून मधून ती ओरडत, रडतही होती. मी विचारलं "तिला काय झालय?" पण आई हसून म्हणाली "कळेलच लवकर "
आमची गुहा तशी फार उंचावर नव्हती.
अगदी थोडं खाली उतरलं की लगेच मोठं रान होतं. मोठं गवत तिथे असे. आधी हिरवं गार अन आता पिवळं धमक.
आज ते कापायला जायचं असं आई म्हणत होती. आता त्यातून धान्याचे दाणे मिळणार होते. खूप लहान पणापासून आई बरोबर इथे येत होते, त्यामुळे आज मला काही वेगळं वाटलं नाही. या रानात लाल बेरीची काही झाडंही होती. आम्ही मुली त्या बेरी गोळा करत असू. आजही आईला सांगून आम्ही मुली बेरीच्या झाडाजवळ आलो.
एकमेकींना मदत करत आम्ही झाडावर चढलो. मस्त लालचुटूक्क बेरी लगडल्या होत्या. मग आम्ही थोड्या तोंडात टाकत, थोड्या खांद्यावरच्या झोळीत टाकत होतो. झाडावरून खाली बघितलं तर, सगळ्या आया खाली गवत कापत होत्या. कसा सरसर हात चालवत होत्या. त्याच्या हातातले दगडी विणे सपासप गवतावर चालत होते.
मध्येच मला हुक्की आली, आपणही कापुयात का गवत? मग मी झाडावरून खाली आले. आई जवळ गेले आणि म्हटलं, " आई मला पण शिकव ना, गवत कापायला. " आई हसली, म्हणाली " अगं थोडी मोठी हो, मग शिकवेन हं " मी नाराज झाले. तिला म्हटलं, " बघ मोठी झालेय की, तुझ्या खांद्या पर्यंत आलेय की " आई हसली, " तशी नाही वेडाबाई, कळेल तुला काही दिवसातच. जा आता सगळ्यांना गोळा कर. गुहेत परतायचय. "
मला काही कळलं नाही, मी अगदीच हिरमुसले आणि परत बेरीच्या झाडापाशी आले. " चला ग सगळ्या परत जायचय. " मी जारा घुश्यातच म्हटलं. मग आमची सगळी वरात परत आली. परत आलो तर दारातच मोठी आई हातात छोटसं गाठोडं घेऊन उभी होती. आई लगबगीने पुढे झाली. " अगबाई आला का नवीन पाहुणा? की पाहुणी? " आजी हसत म्हणाली " पाहुणी आहे हो, छोटीशी "
अरे हां, आई थोड्या दिवसांपूर्वी म्हणालेली, छोट्या आईला बाळ होणारे ! मग काय सगळे ओरडायला लागले, " नवीन बाळ, नवीन बाळ " मग मोठी आई रागावली, " हळु की जरा, बाळ घाबरेल." मग सगळ्यांनी हळूच बाळाला लांबूनच पाहिलं. छोटी आई आत झोपली होती. खूप दमलेली दिसली ती. "आई, छोटी आई तर आली नव्ह्ती आपल्या बरोबर गवत काढायला. मग ती इतकी का दमली ? " मी विचारलं. तशी हसून आई म्हणाली, " कळेल, मोठी झालीस न की कळेल आपोआप ! "
मी पुन्हा विचार करू लागले, कधी मोठी होणार मी? मग बाबा मंडळीही आली. सगळ्यांनी बाळाला बघितलं. सगळेच आनंदात होते.
तेव्हढ्यात बाळ रडायला लागले. इतकुसा आवाज त्याचा. मग मोठ्या आईने त्याला छोट्या आईकडे सोपवले. अन त्या दोघी आत गेल्या.
रात्री सगळ्यांनी बाळाचं नाव काय ठेवायचं यावर खल केला. मी म्हटलं , " बाळ, पिटुकल्या लाल लाल बेरी सारखं आहे, त्याला बेरीच म्ह्णूयात? " सगळेच हसायला लागले. मग छोटी आई म्हणाली, " पिटुकली लाल म्हणुन लीला म्हणुयात तिला. " आणि मग सगळ्यांनाच ते नाव आवडलं.
रात्री मला सारखी गवत कापायची आणि छोट्या बाळांची स्वप्न पडत होती. एकदा तर गवत कापतना हातातला विळा चुकून पोटाला लागला असा भासही झाला. पोटात एकदम खूप दुखलं ही... अगदी दचकून जाग आली. शेजारी आईच्या जवळ जाऊन तिच्या कुशीत झोपले, तेव्हा जरा बरं वाटलं.
सकाळी आईने उठवलं. तर पुन्हा पोटात खूप दुखलं. माझा कळवळलेला चेहरा पाहून आईने काळजीने विचारले, " काय ग, काय झालं ? काही दुखतय का? "
" आई पोटात खूप दुखतय.." मी रडतच म्हटलं. "बरं मग तू पडून रहा आता. मी येते थोड्या वेळाने" आई म्हणाली. आणि भरभर चालत मोठ्या आईपाशी गेली. त्या दोघींचे काही तरी खुसूर-फुसूर झाले. तशी मोठी आई माझ्या जवळ आली. माझ्या जवळ बसून माझी तपासणी सुरू केली. नंतर माझ्या पोटावर हात ठेऊन अंदाज घेत बसून राहिली.
मग पुन्हा उठली आणि आईला काही तरी सांगितलं. मग आईने बाकीच्या सगळ्यांना नेहमीच्या कामांसाठी पाठवलं.
" आई मलाही जायचय बेरी काढायला " मी उठायचा प्रयत्न करत म्हटलं. तशी मोठी आई चटकन माझ्या जवळ आली. म्हणाली, " थांब इतक्यात नको उठूस. " मला काही कळेच ना? मोठी आई एरवी मला लवकर उठ, लवकर उठ म्हणायची. आज उलटं का म्हणतेय?
सगळे बाहेर, जंगलात, रानात गेले. तशी आई माझ्या जवळ आली. मोठी आई आता काही महत्वाचे सांगणार याची जाणीव झाली मला. मी थोडी घाबरलेली. काय झालय मला? आता पोटात अजूनच कसं तरी होत होतं. उलटी होईल असंही वाटत होतं. अंगात अगदी ताकदच नाही असं वाटत होतं. आणी पोटात काहीतरी तुटत होतं, काही तरी सुटत होतं...
"सीता, मला वाटतं तू आता मोठी होतेयस." आई.
" म्हणजे आता मी गवत कापू शकेन ? " - मी
मोठी आई हसत म्हणाली. " अग हो , हो, किती घाई तुला? तशी तर मोठी होशीलच. पण त्याहून एक खूप छान मोठेपण येणारे तुला. "
" घाबरू नको बाळा. हे असं सगळ्या मुलींना होतं " - आई
" म्हणजे, असं पोटात दुखण? " - मी
" हो ग, प्रत्येक मुलीला मोठं झाल की दर महिन्याला पोट थोडं दुखतं. आणि पोटात साचलेली बाळासाठीची गादी साफही होते"
" म्हणजे? मला बाळ होणारे? मला नाही, मला नको बाळ... " मी जोरात रडत म्हतलं.
" अगं , इतक्यात नाही ग होणार तुला बाळ, नको घाबरू. आता फक्त बाळासाठी पोटात मऊ मऊ रक्ताची गादी तयार होते दर महिन्यात. आणि इतक्यात बाळ होणार नाही म्हणुन मग ती पोटातून बाहेर टाकली जाते. तेव्हा थोडं दुखतं सुरुवातीला. पण मग एकदा सवय झाली की नाही दुखत काही. " - मोठी आई.
" मऊ रक्ताची गादी? पण माझं पोट तर इतकुसं आहे, त्यात गादी कशी मावणार? आणि गादी तर मऊ गवताची असते, रक्ताची कशी?" - मी
" अग, पोटाच्या आत गवत कसं रहाणार? तुलाच टोचेल नं? म्हणुन आपल्या रक्ताचीच गादी असते पोटात. अगदी छोटीशी. बाळ पोटात आलं तर ती गादी मोठी होते अन मग बाळही त्यात मोठं होतं. आणि बाळ पोटात नाही आलं तर दर महिन्याला पोटातली रक्ताची गादी हळुहळु चार दिवसात बाहेर पडते. शू बाहेर पडते न तशी. पण शू कशी दिवसातून ७-८ वेळा बाहेर पडते तसं नाही होत."- आई
" ती गादी चार दिवस थोडी थोडी सारखी बाहेर येते.म्हणुन मग आपण कमरेला वेगळी पिशवी लावतो. आणि मग ती सकाळी पलीकडच्या छोट्या ओहळात धूवून टाकून पुन्हा वापरतो. घाबरू नको. मी आणि आई मदत करतो तुला सवय होई पर्यंत." - मोठी आई
" पण मग बाळ कधी येणार पोटात? मला नको इतक्यात बाळ बिळ. ते सारखं रडतं. " मी अगदीच बावचळले होते.
आई हसून म्हनाली. " नाही हं इतक्यात नाही येणार बाळ. तुला हवं तेव्हाच होईल हं. आणि त्यासाठी तुला आधी मित्र शोधावा लागेल. तो तुला आवडावा लागेल. मग बाळबीळ. हं "
मनात काही तरी हुळहुळलं, काय कळलं नाही .. मग म्हटलं, " हा मग ठिक. बरं आता मी जाऊ बेरी गोळा करायला? "
" नाही बाळा, आता हे चार दिवस थोडे सांभाळायचे. आपली ताकद थोडी कमी होते, पोट, पाय दुखू शकतात. म्हणुन हे चार दिवस गुहेतलीच कामं करायची, फारतर खाली फिरून यायचं. पण ही आपली हक्काची विश्रांती बरं " आई डोळे मिचकावत बोलली .
" आणि गवत कापणं? माझ्या विळा? " - मी
" हो ग बाई, आता तुला गवत कापणंही शिकवायचं. तुझ्यासाठी वेगळा विळा तयार करायचा. इतकच नाही तर गुहेतली चित्र कशी काढायची हेही शिकवेल मोठी आई. होना आई ? "-आई
" वॉव, मी मोठी झाले? गवत कापणार आता मी! आणि ती रंगीत मस्त चित्रही काढणार ! आई मला न छान नाच करावासा वाटतोय ! " - मी
" हो , हो, तू मोठी झालीस आता. सगळं शिकायचं आता. पण हळूहळू. गडबड नको हा. आधी आपण नवीन पिशवी कशी बांधायची शिकायचय, हो ना? " - मोठी आई
" हो, हो. चला आता आपण पलिकडच्या ओहळा कडे जाऊ. " - आई.
आम्ही बाहेर पडलो. मला आता खूप छान वाटत होतं. मी मोठी झाले होते. मला गवत कापता येणार, चित्रं काढता येणार, आणि नंतर मित्रही शोधायचाय अन बाळही... आईला मी नाही म्हटलं पण आत मनाच्या एका कोपर्यात मित्र, बाळ म्हटल्यावर लक्कन काहीतरी हललं होतं.
हो, मी मोठी झाले होते !
___
( ते बेरीचे झाड सोडता बाकीची चित्र मीच काढली आहेत फोटोशॉपमध्ये. बेरीचे झाड मीच काढलेल्या फोटोला बेर्या चिकटवल्यात अन जरा फोशॉ इफेक्ट दिलेत )