मानेवर रुळणारे केस, तो जवळ असल्याची जाणीव, अगदी हलका व्हाईट मस्कचा वास.
त्यात आम्ही आत्ताच डान्स करून आलो होतो. मी वर खाली पळापळी करताना मधेच बॅगेतला डिओ एकदोनदा फुस्कारून घेतला होता. मला अंकित बद्दल आकर्षण वाटत होतं म्हणून नव्हतं ते. कुणालाही डान्स नंतर भेटावं लागणार असेल तर हेच केलं अस्तं मी. आणि त्यानंही केलं असेल. नाहीतर तो व्हाईट मस्क जाणवला अस्ता का मला?
अंकित बाई़क अगदी काळजीपूर्वक चालवत होता. नो धक्के, नो स्पीड अप डाऊन्स. मुलं पोरगी मागं बसली असेल तर जी काही टॅक्टिक्स वापरतात त्यातलं काही नाही. मी अगदी कंफर्टेबली मागं बसले होते.
" मैं हमेशा इतना स्लो नही चलाता| आज तुम बैठी हो पीछे इसलिये| तुम्हे स्पीड पसन्द है? " मान डाव्या बाजूला वळवून हेल्मेटमधून पण ऐकू येईल अशा आवाजात अंकित म्हणाला.
" हां. बहोत | जैसे सारी लडकियोंको होता है|" मी म्हणाले.
" ठीक है| तुम्हे कंफर्टेबली बैठनेका कुछ अरेंजमेंट हो जायेगा तब लाँग फास्ट राईड करेंगे| " तो म्हणाला.
मी इतक्या लौकर थोडीसुद्धा ड्रॉन आणि इम्प्रेस होईन असं वाटलं नव्हतं मला. किंवा मग एकूण माहौल आणि परिस्थितीच अशी होती की जरा विरघळायचं ठरवलंच होतं मनानी.
मी एकटी होते गेली दोन वर्षं. अक्की गेल्यापासून. अक्की म्हणजे अक्षय. आम्ही एकाच कॉलेजातून पास आउट झालो होतो. आणि एकाच कंपनीत प्लेसमेंट. म्हणजे इथं. खूप धमाल केली होती फ्रेशर्स बॅचला. मोठा ग्रूप होता. खूप आऊऊटींग्ज, ट्रेक्स, इवनिंग अड्डे , लेट नाईट राईड्स आणि इवन ऑफिस टी टाईम्स . खूप मज्जा करायचो पण अक्की मास्टर्स करायला गेला. आणि ग्रूपचा ग्लो थोडा कमी झाला. माझा तर खूपच. आम्ही सगळं बोलायचो, भांडायचो, एकमेकांना नको ते सल्ले द्यायचो. तो असताना मला बॉयफ्रेंडची गरज कधी वाटलीच नाही. ते तरल काहीतरी सोडलं तर आमच्यात बाकी सगळं पोटेन्शल होतं कपल व्हायचं.
" पण ते नाही झालं तेच बरं." अक्षय म्हणायचा. " नाहीतर हे आजूबाजूला जे पूर्वी छान मित्र असलेले आणि आता एकाच गृपमधे बसून एकमेकांशी अगदी कामपुरतं बोलणारे ब्रेके दिसतायत तसं झालं अस्तं आपलं. " खरंच होतं ते. असली अनेक एक्स कपल्स आमच्या आजूबाजूला होती. आणि खरंच अक्षय बद्दल मला तसं कधीच वाटलं नाही. म्हणजे अगदी एकदाही " काश ऐसा होता " टाईप विचार कधीही आला नाही.
आत्ता पण आम्ही गप्पा मारतो, स्काईप करतो, बोललो की सग्गळं एकमेकांना सांगतो. पण आता अक्की इतका बिझी झालाय. असाईनमेन्ट्स , क्लास वर्क , सारख्या परिक्षा आणि दॅट बिच. म्हणजे त्याची ती नटवी गर्लफ्रेंड.
अंहं , अॅम नॉट जेलस हां. पण इतकी मंद आहे ती. हुषार आहे असं अक्की म्हणतो आणि मार्क्स चांगले पडतात म्हणून म्हणायचं. पण बोलायला लागली की माशी हालत नाही चेहर्यावरून. आणि वेट , अजिबात सुंदर पण नाहीय. रहाते पण इतकी बोर. युनिवर्सीटीचं नाव असलेले ग्रे, ब्लॅक आणि पांढरे टीज घालते कायम. आम्ही बोलतो कधी कधी स्काईपवर. एकतर ती जॅप अमेरिकन आहे. कैतरी वेगळ्याच अॅक्सेंटमधे बोलते. आणि पाच मिनिटं बोललो की आता पुढं काय असं होतं आम्हाला दोघींना पण.
एनीवे, सो आता इथं मस्त मित्र आहेत , शिबानी पण आहेच. पण अक्की गेल्यापासून माझ्यातला एक मोठा कोपरा पार एकटा झालाय.
मी हा विचार करत असताना आम्ही पोचलो पण. छान आहे की जागा. कूल डेकोर, आणि खूप झाडं पण. क्राऊड पण खूप नाहीय पण जे आहे ते कूल वाटतंय. मला वाटलं होतं कुठल्यातरी टिपिकल सिसिडी किंवा स्टारबक्स मधे जाऊ आम्ही.
" अच्छी है ना ये जगह| दोस्तसे पूछा था, यार थोडा स्पेशल मिटींग हो तो कहां जा सकते है| " हेल्मेट काढून टेबलावर ठेवत अंकित म्हणाला.
" थोडा| स्पेशल| " मी एकेक शब्द थांबून हसत म्हणाले. अंकित माझ्याकडं बघत राहिला १० सेकंद.
" नही है?" त्याने तसंच पहात मला विचारलं. गॉड!
ऑर्डर देऊन आम्ही थोडे सेटल झालो.
" रसा, ऐसा तो नही की तुम जानती नही| ऐसा तो नही की मैं यहां इजहार करने आया हू| तुम्हे तो उसी दिन पता चल गया था की मुझे क्या फीलींग्ज है| फिर भी तुम मेरे साथ आयी हो आज| मतलब.. " डान्स करत नसला की खूप स्टाईलिश नाहीय हा मुलगा. आणि खूप तयार पण नाही वाटत. साधं पण जेन्युईन वाटतंय जे बोलतोय ते.
" थांब थांब. लगेच मतलब नको काढूस यातून. " मी म्हणाले. " आय अग्री की तू तो फनी चाइल्डिश प्रकार करून पण मी आज तुझ्याबरोबर आले. पण याचा अर्थ ते जे काय केलंस त्यानं मी इम्प्रेस झाले नव्हते हां अजिबात. इन फॅक्ट मला अजिबात आवडलं नव्हतं ते."
"यार सॉरी. मुझे लगाही था तुम्हे पसन्द नही आयेगा| पर सोचा था तुम्हे बहोत सी रिक्वेस्ट्स आयेंगी तो मै बस अलगसे याद रहना चाहता था| मैने दोस्तको बोला भी था, यार ये उसे अच्छा नही लगता तो सब गडबड हो जायेगा |"
" हे पण मित्राला विचारून केलंस?" मी मनातल्या मनात कपाळावर हात मारला.
" नही नही| आयडिया मेरा था यार| उसने बोला था, देख ऐसा कुछ करना जिस्से उसे तुम याद रहो| बुके , टेडी, चॉकोलेट्स पता नही उसे कितने आयेंगे| "
आता याला काय सांगू आजच्या मुलींच्या व्यथा! अनेक पोरं असणार तुझ्यामागं असं समजून बरेच वीर रिस्कच घेत नाहीत. कष्ट आणी रिस्क घ्यायलाच नको आजच्या पोरांना. क्या बताये, क्या बताये!
बिंगो! मी स्वतःशीच बोलत असताना मला सापडलं होतं उत्तर. मी याच्या बावळट किडिश अॅक्ट नंतर पण याला का कन्सिडर केलं त्याचं.
ही डेअर्ड! ही टुक द रिस्क! अॅन्ड आय सीम टु लाईक दॅट.
हुश्श! म्हणजे डेस्परेशन हा फॅक्टर नव्हता तर! म्हणजे असला तरी तो मेन फॅक्टर नव्हता :प
आणि म्हणूनच पलिकडच्या बे मधून स्टेअर करणारा तो कूल ,गीकी, उंच मुलगा, दुसर्या युनिटमधला तो फक्त लीडर्स लेसन्सना भेटणारा आणि नेहमी माझ्या मागच्या रोमधे बसून अधून मधून माझ्याशी बोलायचा प्रयत्न करणारा मसलगाय वगैरे मला इंटरेस्टिंग वाटले नाहीत कधी.
मी आनंदाने जवळजवळ ऐकू जाईल इतका मोठा सुस्कारा सोडला. माझ्या खिजगणतीत नसले तरी असे लोक आहेत की. आणि मल आवडत नसले तरी त्यांच्या फॅन्स पण आहेत. म्हणजे अगदी काही होणारच नाहीय माझं , माझ्यातच काहीतरी लोचा आहे वगैरे पीएमएस स्पेशल विचारांनी माझ्या डेटींग कॉन्फिडन्सची जी वाट लावलेली , तो जरा गोंजारला गेला.
" क्या हुआ? क्या सोच रही हो?"
" काही नाही. " मी हसले. तो पण हसला. काहीच महत्वाचं बोलणं नसताना.
" तुम यहींकी हो ना?" म्हणजे? मी लॉस्ट दिसतेय की काय?
" हो आता तुझ्या सारख्या कूल डूडबरोबर आलेय म्हणजे इथंच असणार की " उग्गच किडे करायची सवय.
तो खूप जोरात हसला. खळाळतं , हळूहळू विरत जाणारं हास्य. ट्रेलिंग लाफ्टर.
मी जराशी एंबरॅस झाले. पण त्यानं माझ्या डोळ्यात पाहिलं आणि बस्स!
जराशानं तो म्हणाला,
" तसं नाही, तू मूळ महाराष्ट्राचीच ना? " मी मान हलवली. मग परत शांतता. आमच्या बोलण्यात असे खूप पॉजेस होते. आणि
ते ऑकवर्ड नव्हते. मी बर्यापैकी बडबड करते नाहीतर.
अक्की मला स्पॅरो म्हणतो. म्हणजे त्याला एक रेफरन्स आहे. आमचं फ्रेशर्स ट्रेनिंग संपल्यावर आम्ही सगळी बॅच एका वीकेंडला वाईला गेलेलो. तिथल्या रिसॉर्टवर एक सुंदर, रंगीत चिमणी होती पिंजर्यात. सगळे तिच्याशी खेळत होते. फार गोड होती ती. आणि तिची चिवचिव तर खूपच मधुर. पण थोड्या वेळाने लक्षात आलं की ताई फारच बोलतात, थांबतच नाहीत. अर्थात तरी सगळे तिच्या जवळ जाऊन तिच्याशी बोलत होते.
मग परत आल्यावर एकदा आम्ही खूप कल्ला करत होतो आणि मी काहीतरी कॉन्स्तंट बोलत होते, तेंव्हापासून.
पण आज अंकित आणि मी अधून मधून बोलत होतो. मधले पॉजेस रेलिश करत, पुढचा पॉज येईपर्यंत त्यांची चव तशीच रेंगाळत ठेवत, आणि अधल्या मधल्या बोलण्यात ती ब्लेंड करत.
" आणि तू ? तू नॉर्थचा आहेस ना?" मी विचारलं.
" हो. पण नॉर्थ खूप मोठा आहे की. मी दिल्लीचा नाहीय हां . "
" हो मला माहितीय."
" तुला माहीतीय? कसं काय?"
अं? अरे हो. मी काढलेला निष्कर्ष होता हा फक्त.
" माहीतिय म्हणजे कळतं की ते. दिल्लीची मुलं जरा वेगळी असतात ना."
" ओह अच्छा, तुम बडा जानती हो इतना सब| " तो म्हणाला. नो स्माईल .
मी एकदम गप्प झाले.
" दिल्लीचे लोक आवडत नाहीत ना इकडच्या लोकांना" तो एकदम म्हणाला.
" मला नाहीत आवडत ." मी म्हणाले.
" का ? काय खास अनुभव?" परत शांतपणे आणि गंभीरपणे.
" अनुभव म्हणजे कॉलेजात होती की बरीच . एकूण उथळ आणि मजा करायच्या फारच क्लिशेड कल्पना असतात त्यांच्या. आणि मुलींबद्दलचे विचार तर विचारायलाच नको. "
"हं. पण असं जनरलाइझ करू नये"
" ह्म्म्म. ओके" पॉज.
" मी पण त्या भागातलाच आहे. " तो हसत म्हणाला. " बघ विचार कर. " मी परत गप्प. पहिल्या डेटला इतका लगेच आयुष्याचा विचार करणार आहे का मी? तू छान आहेस, मला तुझ्याबरोबर यावं वाटलं, यावं असा विश्वास दिलास एवढं बास की सध्या. तरी गप्प बसणं थोडं धोक्याचं होतं. त्याचा अर्थ मी आता खरंच विचार करायला बसलेय असा होऊ शकतो.
" कहांके हो तुम?"
" मैं कुमाऊनी हूं| कुमाउं जानती हो?"
" हो. नैनिताल वगैरे ना?"
" हां. नैनिताल के पासही है मेरा गांव| हरे पहाडोंके बीच | " डोळ्यात लगेच हिरवा हिमालय.
" नॉर्थ का नही हूं बस| पहाडी लडका हूं मैं|"