इथे एवढ्यात बर्याच मैत्रिणींनी युरोप-स्विस भटकंतीबद्दल प्रश्न विचारलेले दिसले, मग प्रत्येक वेळी ब्लॉगची लिंक देण्यापेक्षा इथेच मैत्रिणींसोबत लेख शेअर करूयात असा विचार केला. ही लेखमालिका लिहून आता ४ वर्ष होतील, पण सगळ्या सहलींमध्ये ही सगळ्यात जास्त आठवणीत राहिलेली. म्हणून हिने श्रीगणेशा :)
इथे एवढ्यात बर्याच मैत्रिणींनी युरोप-स्विस भटकंतीबद्दल प्रश्न विचारलेले दिसले, मग प्रत्येक वेळी ब्लॉगची लिंक देण्यापेक्षा इथेच मैत्रिणींसोबत लेख शेअर करूयात असा विचार केला. ही लेखमालिका लिहून आता ४ वर्ष होतील, पण सगळ्या सहलींमध्ये ही सगळ्यात जास्त आठवणीत राहिलेली. म्हणून हिने श्रीगणेशा :)
जर्मनीत आल्यापासून जवळपास सगळे मित्र मैत्रिणी, नातेवाईक आणि अजून कुणी ओळखीचे यांच्याकडून एक ठरलेला प्रश्न असायचा, "स्वित्झर्लंडला जाउन आलात का?" "नाही गेलो अजून" असे म्हटल्यावर पुढचा प्रश्न, "का नाही गेलात अजून" किंवा "कधी जाणार मग" किंवा "किती वेळ लागतो तुमच्या इथून" इत्यादी इत्यादी. "झुरीच ट्रेनने तीन साडेतीन तास, सगळं तसं पाच सहा तासांच्या आत" हे उत्तर ऐकल्यावर तर समोरच्याचे हावभाव जणू काही आम्ही 'स्विसला गेलो नाही म्हणजे घोर पाप केले' असे असायचे. मग इकडे जा, तिकडे जा असे कधी प्रेमळ सल्ले तर कधी खवचट उपदेश मिळायचे आणि आम्ही माना डोलवायचो. स्वित्झर्लंड सुंदर आहे यात वाद नाहीच. जायचे नव्हते असेही नाही. पण इथे राहतोय म्हणजे लगेच दुसऱ्या दिवशी 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' च्या रेल्वे स्टेशन ला भेट दिलीच पाहिजे असेही नाही ना? शिवाय इतरही अनेक कारणं होती की ज्यामुळे आम्ही हे सो कॉल्ड घोर पाप करत होतो. दोन वर्षात जी जी भटकंती झाली. त्या प्रत्येक वेळी एक गोष्ट जाणवली, ती म्हणजे युरोपातली काही प्रसिद्ध पण अतिरंजित ठिकाणं ही अगदीच आवडली नाहीत, तर याउलट बऱ्याच अनभिज्ञ जागा ज्या तेवढ्या प्रसिद्ध नाहीत, त्या मात्र केवळ आवडल्याच असे नाही, तर परत जायला हवे अशा यादीत आल्या. इतर वेळी जसे सहज शनिवार-रविवारी किंवा चार दिवस सुट्टी आहे म्हणून फिरायला जायचो त्यापेक्षा जास्त दिवसांची ही सहल करावी असे डोक्यात होते. म्हणजे या सहलीला योग्य नियोजन हवे. शिवाय तिथली सार्वजनिक वाहतूक अगदी उत्तम असली तरीही गाडीने गेलो तर अजून मनाप्रमाणे भटकता येईल म्हणून पहिले काही दिवस त्यात गेले. त्यात मग ऐन गर्दीत तर अजिबात जायचे नाही, कारण नुसता चिवचिवाट असतो, त्यातही चीनी-जपानी वगैरे वगैरे तर इतके, की आपण कुठे आहोत असा प्रश्न पडावा. (हे लोक आणि यांच्या अदा हा एका वेगळ्या लेखाचा विषय होईल) शिवाय हवामान योग्य पाहिजे. ऐन थंडीत नको कारण आल्प्स मधीलच एक हिवाळी सहल आधीच झाली होती. सुट्टी पण मिळायला हवी. एक ना अनेक. एका सहलीसाठी कित्ती कित्ती त्या अटी असे वाटत असेल तर थांबा. अजून संपल्या नाहीत. स्विस म्हणजे अजून एक अति महत्वाचा मुद्दा, महागाई. स्वित्झर्लंडचे चलन आहे स्विस फ्रँक (CHF). त्याचे पुन्हा इतके युरो वगैरे हा हिशोब अशक्य, करायचाच नाही. पण पूर्वीच्या एका छोट्याशा सहलीत नुसती सीमा पार केली तर लागली दुपटीने किमती बदललेल्या पाहिल्या होत्या. आम्ही स्विस ला जायचा विचार करत आहोत असे सांगितले की ऑफिस मधल्या प्रत्येकाची पहिली प्रतिक्रिया यायची, खूप महाग आहे. दुसरं कुणी काही बोलायचेच नाही. आणि हा एक मुद्दा बाकीच्या सगळ्या मुद्द्यांशी निगडीत. जेव्हा जास्त पर्यटक तेव्हा महागाई अजूनच वाढणार. आणि या सगळ्या अटींच्या वरताण अशी नियोजन करणारी दोन डोकी (कोण म्हणून काय विचारताय), जी कधी युती करतील आणि कधी विरोधी पक्षात जातील हे राजकीय घडामोडींप्रमाणेच अनिश्चित. सहलीला जायचे या मुख्य मुद्द्यावर अर्थात एकमत होते. तिथून पुढे मग उर्वरित घडामोडी सुरु झाल्या.
मग वरच्या काही अटी बघता सप्टेंबर चा शेवट ही वेळ नक्की झाली. ३ ऑक्टोबरला पूर्व पश्चिम जर्मनीच्या एकत्रीकरणाची सुट्टी आणि त्याआधीच्या जोडून इतर सुट्ट्या निश्चित झाल्या आणि कामं सुरु झाली. आता नवऱ्याच्या डोक्यात याच सहलीसाठी अजून काही गोष्टी बसल्या होत्या. इटली मधील प्रसिद्ध असा स्टेलव्हिओ पास (http://en.wikipedia.org/wiki/Stelvio_Pass) जिथे त्याला जायचेच होते. आणि असेच काही अजून स्विस-इटालियन आल्प्स मधील घाट. स्विसमध्येच बघण्यासारखे इतके काही आहे की आठ दिवस पुरेनात आणि तरीही स्टेलव्हिओ मार्गे जायचे यावर तो ठाम होता. मग याची जरा अजून माहिती काढली आणि "तू नीट गाडी चालवशील ना या अशा भयानक घाटातून" हे अनेकदा वदवून घेतले आणि होकार दिला. हुश्श. आता पुढे कुठे आणि काय काय बघायचे यासाठी आंतरजालावर शोध सुरु झाला. स्विस टुरिझमची अनेक संस्थळे, अनेक ब्लॉग्स वाचून काढले. काही पुस्तके वाचून झाली. आणि गोंधळ अजूनच वाढत गेला. कारण आठ ते नऊ दिवस हातात होते आणि सगळ्याच ठिकाणी जावेसे वाटत होते. चर्चा, वाद विवाद करत करत हेही हवे आणि तेही हवे असे सगळेच कसे होईल हे कळून चुकले. मग शेवटी एक आठवडा एकाच कुठल्यातरी मध्यवर्ती ठिकाणी राहून त्या भागात फिरायचे असे ठरले. इंटरलाकेनला तूर्तास मध्यवर्ती धरून तिथल्या हॉटेल्स शोधमोहीम सुरु झाली. शाकाहारींसाठी खाण्याचे पर्याय बघता आणि बाहेर सततच्या खाण्याचा खर्च बघता छोटे स्वयंपाकघर असेल अशी अपार्ट्मेंट बघायचे ठरले, इतर ब्लॉग्सवरील माहितीनुसार देखील हाच पर्याय सोयीस्कर वाटला. या भागातल्या अनेक गावात गाडी नेता येत नाही, पर्यावरणासाठी हानिकारक म्हणून. त्यामुळे ती गावं बाद झाली. शोधाशोधीत एक मनाजोगते ठिकाण सापडले, विल्डर्सविल (http://en.wikipedia.org/wiki/Wilderswil) या टुमदार खेड्यात. मेल लिहून विचारपूस केली आणि दुसऱ्याच दिवशी उत्तर मिळाले. या कालावधीत उपलब्ध आहे. झाले एकदाचे एक महत्वाचे काम. आता अजून या स्टेलव्हिओ मार्गासाठी दोन रात्रीची हॉटेल्स बुक झाली आणि पुढची तयारी सुरु झाली.
स्वित्झर्लंड म्हणजे अत्यंत स्वच्छ, शिस्तप्रिय लोकांचा देश. जगप्रसिद्ध स्विस घड्याळे आणि त्या घड्याळांच्या अचूकतेप्रमाणेच चालणारे लोक. जर्मनी, फ्रान्स, ऑस्ट्रीया आणि इटली हे शेजारी देश. सगळ्यांचीच काही सांस्कृतिक साधर्म्य तर काही भिन्नता. अधिक पुढच्या लेखांमध्ये येईलच. सगळ्यात महत्वाचे म्हणजे उत्तम पर्यटन विकास. प्रत्येक स्थळाची योग्य माहिती इंग्रजीतून देखील उपलब्ध आहे. त्या ठिकाणाहून जवळ काय बघता येईल, कसे जाता येईल, गाडी नेता येते की नाही इ. त्यामुळे या सात दिवसात कुठे जायचे अशा ठिकाणांची यादी तयार झाली, सगळी माहिती एकत्रित केली आणि म्हणता म्हणता एक आठवडा उरला. सप्टेंबर तसा उन्हाळ्याचा शेवट आणि शरद ऋतूची, पर्यायाने हिवाळ्याची सुरुवात. पण जर्मनीत आधीच थंडीने रंग दाखवायला सुरुवात केली आणि हवामान नेहमीप्रमाणे दगा देणार की काय ही शंका आली. या गोष्टीवर आपला इलाज नाही, हवामान भगवान भरोसे म्हणून तो विचार सोडून दिला. गाडीला हिवाळी टायर्स लावणे अत्यावश्यक होते. ते झाले. स्विस मध्ये जर्मनीतील गाड्यांना वेगळा कर भरावा लागतो. त्यासाठी लागणाऱ्या vignette ची खरेदी अनायासे पूर्वीच झाली होती. तिथे जाऊन निदान रात्रीचे खायला करता यावे म्हणून रेडी टू इट, मॅगी आणि इतर सामानाची खरेदी झाली. सामान भरताना वाटले की आपण खायला जातो आहोत की फिरायला. पण पोटोबाची सोय महत्वाची. :) थंडीचा अंदाज येत नव्हता. त्यामुळे हेही बूट, तेही बूट, हे जॅकेट, ते स्वेटर असे एकेक सामान वाढत गेले. दोन लोक आणि बॅगा किती. गाडीत सगळे भरले गेले आम्हीच थक्क झालो. मुख्य ठिकाणचे अंतर बरेच लांबचे असल्याने केवळ काही पल्ला पार करण्यासाठी एक दिवस आधी निघायचे ठरले होते. संध्याकाळ झाली होतीच. गणपती बाप्पा मोरया अशी आरोळी ठोकली, जीपीएसला पत्ता दिला आणि प्रवास सुरु झाला.
पण सगळं सुरळीत झालं तर कसं होईल. निघण्यापूर्वी हवा तपासायला गेलो आणि पहिला धक्का बसला. एका चाकातून किंचित हवा लीक होतेय असे लक्षात आले. आता जर पंक्चर असेल तर काय. नुकतेच हिवाळी टायर्स लावले होते त्यामुळे तेव्हाचा कदाचित काहीतरी प्रॉब्लेम असावा असे वाटले. दुकान बंद व्हायला अजून केवळ २० मिनिटे होती. पटापट गाडी वळवून परत गॅरे़ज मध्ये नेली. एक व्हॉल्व्ह खराब झाला होता तो त्याने लागली बदलून दिला आणि शेवटी एकदाचे निघालो. नशीब पंक्चर नव्हते. ठरलेल्या हॉटेलला पोहोचलो. सुरुवात थोडीशी चिंताजनक झाली तरी उर्वरीत सहल सगळे पूर्वनियोजन सार्थकी लावणारी झाली. प्रत्येक दिवस आणि अनुभव वेगळा ठरला. हवामानाने साथ दिली. नुकताच शरद ऋतू सुरु झाल्याने झाडांचे रंग बदलत होते. स्थापत्य कौशल्याचे काही खास नमुने म्हणून ओळखले जाणारे आल्प्स मधील घाट, लांबच लांब बोगदे, हिमनग, उंचचउंच पर्वतरांगा, बाजूने जाणारी रेल्वे, कधी शेती, त्यात चरणाऱ्या गायी, सतत सोबतीला असणाऱ्या नद्या, तलाव, धबधबे आणि झरे, स्विस-इटालियन खेडी, फुलांनी लगडलेल्या घरांच्या खिडक्या आणि अजून बरेच काही. फोटोतून किंवा शब्दात वर्णन न करता येण्यासारखे, तरीही जसे जमेल तसे म्हणून हा प्रयत्न…निघूयात आल्प्सच्या वळणांवर…
क्रमशः
दुसरा दिवस उजाडला. तसा पहिलाच. कारण मुख्य प्रवासाला सुरुवात होत होती. संध्याकाळपर्यंत नियोजित हॉटेलला पोचायचं एवढंच या दिवसाचं ध्येय होतं. त्यामुळे निवांत आवरून निघालो. सूर्यदेवाने सकाळीच एकदा दर्शन दिलेले दिसले आणि एक ओझे उतरले. जर्मनीतून बाहेर पडण्यापुर्वी पेट्रोल भरणे आवश्यक होते म्हणून ते काम केले. जीपीएसला हॉटेलचा पत्ता दिला आणि त्याच्या इशाऱ्याप्रमाणे रस्ता धरला.
जातानाचा थोडा प्रवास ऑस्ट्रीया मधून होता. ऑस्ट्रीयातही गाडीसाठी टोल आहे. त्यासाठी परत Vignette घेतले आणि पुढचा प्रवास सुरु झाला. थोड्याच वेळात समोर पाटी दिसली "लिंडरहॉफ श्लॉस" म्हणजेच "लिंडरहॉफ पॅलेस". इथे जायचे काही डोक्यात नव्हते पण जर जवळच आहे तर थांबुयात का असा विचार मनात येताच पुढच्याच पार्किंगला गाडी थांबवली. जीपीएसला किती वेळ लागेल असा प्रश्न विचारला. उत्तर आले अर्धा तास. घड्याळात बघता अजून बराच वेळ होता आणि जायचे ठरले. पुन्हा गाडी वळवली आणि लिंडरहॉफच्या दिशेने निघाली. आता घाट सुरु झाला आणि एका बाजूला छोटासा तलाव दिसला. मस्त दिसतोय तलाव म्हणून थांबायचा विचार केला.
आणि पुढे निघालो तसतसे लक्षात आले की हा जो तलाव मघाशी छोटासा वाटला तो मुळात बराच मोठा आहे आणि आता बराच वेळ आपला रस्ता शेजारून जाणार आहे. वाह. मग काय, जागा दिसेल तिथे थांबायचे, फोटो काढायचे आणि पुढे जायचे असे सुरु झाले. अगदी क्वचितच एखादी गाडी दिसायची. बाकी नीरव शांतता. नितळ आणि शांत पाणी आणि त्यात दिसणारे पर्वतांचे आणि झाडांचे प्रतिबिंब.
झाडांचे रंग बदलायला नुकतीच सुरुवात झाली होती.
हा होता प्लानझे (Plan See) म्हणजेच प्लान लेक. इथेच बसून राहावे असे वाटत होते. पण घड्याळ पुढे सरकत होते. त्यामुळे पुढे जाणे भाग होते.
लिंडरहॉफला पोहोचलो. बव्हेरिया या राज्याचा राजा लुडविग दुसरा याने बांधलेला हा राजवाडा.
खरं तर मुख्य इमारत ही राजवाडा म्हणावा एवढीही मोठी नाही, मोठ्या बंगल्या एवढा म्हणता येईल. पण बाहेरील बाग मात्र भव्य आहे आणि आजूबाजूचा परिसर पण सुंदर आहे.
थोडीफार खादाडी करून तिकीट काढून आत गेलो. बाहेरचे गार्डन बघत असतानाच इंग्रजी टूर सुरु होत आहे असे एक मुलगी आम्हाला सांगत होती. मग पळतच आत गेलो. खास बव्हेरियन वेशात असलेल्या मुलीने माहिती द्यायला सुरुवात केली. आत फोटोग्राफीला परवानगी नव्हती.
या राजाने एकूण तीन राजवाडे बांधले ज्यातला हा सगळ्यात लहान आणि एकमेव जो त्याच्यासमोर पूर्णत्वास गेला. पॅरिस मधील व्हर्साय पॅलेसवरून प्रेरणा घेऊन हा बांधला गेला. व्हर्साय पॅलेस बांधणारा लुइस राजा हा त्याचे प्रेरणास्थान होता. लुडविग त्याच्या वडिलांसोबत शिकारीसाठी पूर्वी इथे यायचा. सत्ता त्याच्या हातात आली त्यानंतर त्याने इथे हा राजवाडा बांधायचे ठरवले. त्याकाळी म्युनिकहून इथे येण्यासाठी ८ तास लागत आणि त्याला अशीच दूरवरची जागा हवी होती. आजूबाजूला संपूर्ण झाडी आहेत. आत असे काही असेल असे कुणाला बाहेरून वाटणार नाही एवढा आत हा बांधला आहे. राज्यकारभारात त्याला विशेष रस नव्हता. अत्यंत कलासक्त असा हा राजा होता. राजवाड्यातल्या प्रत्येक खोलीत याचा प्रत्यय येत होता. त्याचसोबत त्याची ख्याती दानशूर अशी होती आणि तो सगळ्यांना चांगला पगार द्यायचा. आतली कलाकुसर आणि शोभिवंत वस्तू बघून राजेशाही थाट म्हणजे काय याची प्रचिती येत होती. किती ती प्रत्येक वस्तूवर केलेली डिझाईन्स, सुंदर घड्याळे, वैविध्यपूर्ण मेणबत्ती स्टँड, भित्तीचित्रे, राजाच्या बसण्याची, झोपण्याची, खाण्याची सगळे व्यवस्था त्याच्या मनाप्रमाणे, आता तो राजा म्हणजे मर्जी त्याचीच. ड्रेस्डेन मधील प्रसिद्ध अशा माईस्टन पोर्सीलेन पासून बनविलेल्या अनेक कलात्मक वस्तू होत्या. मुख्य खोल्यांमधील भिंतीवर केलेल्या कामासाठी ५ किलो सोने वापरले आहे. एकएक दालन बघत जेव्हा शेवटच्या दालनात गेलो, तिथे होते आरसेच आरसे. लुडविग निशाचर होता. त्यामुळे जेव्हा रात्री तो जागा असायचा, तेव्हा मेणबत्त्यांच्या प्रकाशाने हे आरसे अधिकच उठून दिसायचे आणि शिवाय त्याला यातून व्हर्साय पॅलेसशी अधिक साधर्म्य वाटायचे. याच दालनात एक खास भारतातून आयात केलेल्या हस्तिदंताचा मेणबत्ती स्टँड आहे ज्याची ओळख संपूर्ण राजवाड्यातील मौल्यवान वस्तू अशी आहे. हा स्टँड तयार करण्यासाठी ४ वर्ष लागली. भारतातील वस्तूंचे महत्व इथे बरेचदा फिरताना दिसते. इतरही अनेक वस्तू आणि बांधणीचे सामान परदेशातून आयात केले होते जे सगळे आजही मूळ स्वरुपात आहे. त्याच्या डायनिंग रूममध्ये त्याला एकट्यालाच जेवायला आवडायचे. त्यामुळे अशी यंत्रणा केली होती की त्याचा टेबल त्या यंत्रणेमार्फत खाली जाइल आणि अन्नपदार्थ वाढून वर पाठवले जाईल. राजवाड्यात सेन्ट्रल हीटिंग सिस्टीम होती जेणेकरून आतल्या लाकडी सामानाला आगीचा धोका होणार नाही. नॉयश्वानस्टाइन हा जगप्रसिद्ध कॅसल देखील यानेच बांधला, तिथेसुद्धा राजाच्या स्थापत्य, संगीत आणि सुशोभीकरण या विषयातील रस जाणवतो. पण तो पूर्ण होण्यापूर्वीच राजाचा दुर्दैवी आणि गूढ मृत्यू झाला. हे सगळे बघून असे वाटले की जर यापेक्षा प्रचंड मोठा असा नॉयश्वानस्टाइन त्याच्या हयातीत पूर्ण झाला असता तर अजूनच किती सजवला गेला असता.
तंत्रज्ञान आणि कलात्मकता यांचा उत्तम संगम असलेला हा राजवाडा बघून पुन्हा बाहेर आलो.
राजवाड्याच्या मागच्या बाजूने काढलेले काही फोटो.
या रस्त्याने चालत पुढे एक गुहा बांधली आहे. या राजाचा जवळचा मित्र आणि प्रसिद्ध ओपेरा संगीतकार रिचर्ड वागनर याच्या एका खास ओपेराची थीम म्हणून ही गुहा तयार केली गेली. यात आतमध्ये एक तलाव आहे. त्यात राजहंस असायचे आणि राजाला तिथे बसून ओपेरा ऐकायला आवडायचे. त्यातील पाण्याचे तापमान नियंत्रित राहावे म्हणून खास सोय केली आहे. त्यासोबतच तिथे अठराव्या शतकात त्याने रंग बदलणाऱ्या दिव्यांची सोय केली होती. फक्त संगीत ऐकण्यासाठी एक मानवनिर्मित गुहा. तीही अत्याधुनिक तंत्रांची जोड देऊन.
गुहेकडे जाणारा रस्ता
गुहेच्या आत
आम्ही बाहेर पडलो त्यानंतर थोड्याच वेळात एक बव्हेरियन संगीताचा कार्यक्रम सुरु होणार होता. त्याची चाललेली तयारी. या सगळ्यांचा पोशाख हा खास बव्हेरियन पोशाख आहे. म्युनिक मधील ऑक्टोबर फेस्ट साठी साधारण अशाच पद्धतीचा पेहराव केला जातो.
वेळेअभावी थांबणे शक्य नव्हते त्यामुळे इथून निघालो. पुढचा भाग हा ऑस्ट्रीया, इटली आणि स्वित्झर्लंड या तीनही देशांच्या सीमेवरचा होता. फ़ेर्न पास आणि रेशन पास (Fern pass & Reschen Pass) हे दोन्ही ओलांडून पुढे जायचे होते. पर्वतरांगा अजूनच जवळ दिसू लागल्या. मधूनच काही बर्फाच्छादित शिखरे दिसत होती. जाताना काढलेले अजून काही फोटो.
रेशन पास संपत असतानाच पुन्हा एका बाजूला रेशन लेकने (Reschen Lake) लक्ष वेधून घेतले.
इटालियन लेक्स बद्दल बरेच ऐकले आहे. कोमो लेक आणि मॅगीओरे लेक हे अनेक दिवसांपासून यादीत आहेत. निदान हा एक दिसला आणि थोडे समाधान मिळाले. शिवाय इथले लेक एवढे प्रसिद्ध का याची एक झलक दिसली. गर्दी अजिबातच नव्हती त्यामुळे निवांत फोटो काढता आले. घड्याळाचे काटे सरकत होतेच. त्यामुळे निघण्याशिवाय इलाज नव्हता. या तीन देशांच्या सीमेजवळ असलेल्या काही छोट्या खेड्यांमधून, चिंचोळ्या गल्ल्यांमधून रस्ता जात होता. भिन्न संस्कृतींचे मिश्रण असल्याने घरांच्या पद्धती थोड्या बदलत होत्या.
आता मात्र कधी एकदा हॉटेल ला पोहोचतो असे झाले होते. अर्ध्या तासात पोहोचू असे जीपीएस म्हणत होते. आणि पुढचा घाट सुरु झाला. उम्ब्रेल पास. वरवर चढू लागलो. खिडकीतून शक्य तेवढे वर पाहिले तर फक्त एकच घर दिसत होतं. बाकी कुठलीच वस्ती नव्हती. बहुधा तेच आपले हॉटेल असा अंदाज होताच आणि तो खरा ठरला. पण ते दिसायला एवढंसं अंतर या अशा रस्त्यांवरून कितीतरी वेळखाऊ होतं."
हॉटेल म्हणजे तसे घरगुती स्वरुपाचेच होते, पण अगदी कलात्मकतेने सजवलेले.
सामान टाकलं. भूकही लागली होती आणि ८ नंतर किचन बंद होईल असे हॉटेल मालकिणीने सांगितले होते. त्यामुळे जेवायला गेलो. ऑक्टोबरची सुरुवात होत असल्याने लाल भोपळा सगळीकडे दिसू लागला होता. भोपळ्याचे गरमागरम सूप आणि हा एक चीजचा पदार्थ असे मागवले. याचे नाव विसरले पण खास आजीची खासियत म्हणून दिले होते. इथून पुढे जे चीज सुरु झाले ते शेवटपर्यंत. स्विस मध्ये आहोत याची वेळोवेळी जाणीव होत होती आणि सोबतच वाढणाऱ्या क्यालरीजची.
पोटोबा शांत झाले आणि दिवसभराच्या प्रवासाने निद्रादेवीच्या अधीन झालो. दुसऱ्या दिवशी उठून पुढे जायचे होते, स्टेलव्हिओ पास आणि निसर्गाच्या साथीने विल्डर्सविलला…
हा दिवस सगळ्यात लांबच्या प्रवासाचा होता. सकाळी लवकरच हॉटेल मध्येच नाश्ता करून बाहेर पडलो. आम्ही गाडीत सामान ठेवत असतानाच एक आजोबा या घाटातून सायकलने वर जात होते. युरोपात सायकल तशी काही नवीन नाही. रोज ऑफिसला २०-२२ किमी सायकलने येणारे अनेक लोक आहेत. पण या इतक्या उंच चढावरून सत्तरीच्या आसपासचे आजोबा सायकलने जात होते. कमाल. हॅट्स ऑफ एवढे दोनच शब्द आले मनात. त्यांना हसून हात दाखवला आणि गाडीत बसलो.
आधल्या दिवशीच्याच उम्ब्रेल पास या घाटातून पुढे अजून वर जायचे होते. थोडी धडकी भरली होतीच. गणपती बाप्पाला, गजानन महाराजांना नि अजून आठवतील त्या सगळ्यांना साद घातली आणि निघालो. अफाट पर्वत आणि दऱ्या, मधेच एखादा छोटासा तलाव, १८० च्या कोनात वळणारी आणि चढत जाणारी वळणे आणि सोबतीला गाणी. हा तेवढा प्रसिद्ध पास नसल्याने तशी गर्दी कमी होती पण सायकलस्वार, बाईकर्स आणि काही गाड्या अधूनमधून दिसत होत्या. या भागात झाडी फारशी नव्हती. काही ठिकाणी इथे धबधबे असावेत असा अंदाज येत होता पण उन्हाळ्याचा शेवट असल्याने कदाचित पाणी फारसे नव्हते.
इथे स्विस आणि इटली या देशांची इथे सीमा आहे. इथून इटलीत प्रवेश!
हा पास संपत असतानाच दूरवर ही शिखरे दिसू लागली.
उम्ब्रेल पास - शेवट आणि स्टेलव्हिओ पास - सुरु
इथे एखाद्या फाट्यावर असतात तशी काही दुकाने होती, सुवेनिअर विकायला अनेक लोक होते, काही टपरीवजा हॉटेल्स, गाडीवरचे खाद्यपदार्थ विक्रेते, काही मोठी रेस्टॉरंट्स आणि तऱ्हेतऱ्हेच्या गाड्या. काही लोक त्यांच्या गाड्या इथे पार्क करून सायकलने पुढे जाण्याच्या किंवा ट्रेकिंगच्या तयारीत होते.
एकूण २२ किलोमीटरचा हा रस्ता २७५८ मीटर उंचीपर्यंत पोहोचवतो. १८२० ते १८२५ या पाच वर्षात हा बांधला गेला. कार्लो दोनेगानी असे या रस्त्याच्या कामातल्या मुख्य अभियंत्याचे नाव होते. या पासचे मुख्य वैशिष्ट्य असे की यात एकूण ४८ हेअरपिन टर्न्स आहेत जे जगभरातील ड्रायव्हर्स, सायकलस्वार, बाइकर्स यांच्यासाठी आव्हानात्मक पण अविस्मरणीय म्हणून ओळखले जातात. अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा, रोड शोज इत्यादीसाठी हा प्रसिद्ध आहे. जगातील काही खास रस्त्यांमध्ये आवर्जून नाव घेतला जाणारा असा हा स्टेलव्हिओ पास.
आम्ही चालत चालत पुढे जिथून खालचा हा पास दिसतो त्या ठिकाणी गेलो.
धडकी भरवणारा रस्ता. जेवढे फोटोत दिसताहेत त्यात फक्त सुरुवातीचे काहीच आहेत. पुढे असेच २-३ मोठे डोंगर उतरत ४८ पूर्ण होतात. या प्रवासादरम्यान व्हिडीओ घेण्याचे केविलवाणे प्रयत्न निष्फळ ठरले.
कॉफी घेऊन मग गाडीने निघालो. गाडीने उतरतोय म्हणून जरी आम्ही टेंभा मिरवित असतानाच आम्हाला लाजवणारे अनेक अफाट लोक इथे होते जे सायकलने किंवा काही पायी चढत येत होते. चालत येणार्यांकडे पायात स्केटसदृश काहीतरी आणि हातात स्टिक्स होत्या ज्याच्या आधारे ते चढत होते.
तरुण, वयस्कर, बाइक्स वाले, अगदी जुन्या जुन्या खास जपलेल्या गाड्या ते फरारी, पोर्शे, लाम्बोर्गीनी सारख्या अत्याधुनिक स्पोर्ट्स कार पर्यंत सगळ्यांनाच या पास ने भुरळ घातलेली दिसत होती. अजून एक विशेष आवडले ते हे, की या सगळ्यात महिलांची उपस्थिती सुद्धा तेवढीच होती. अगदी षोडशवर्षीय तरुणींपासून तर साठीच्या आज्यांपर्यंत अनेक जणी दिसल्या. :)
चार तीन दोन एक करत उतरलो एकदाचे खाली. डोकं अजूनही गरगरतय असं वाटत होतं. शेवटच्या ठिकाणी दिसलेली काही घरं आणि हॉटेल्स आणि गाड्या.
कितीतरी वेळाने हा असा सरळसोट रस्ता बघून हायसे वाटले अगदी.
पुन्हा इटलीतून स्विस मध्ये प्रवेश झाला. आजूबाजूच्या शेतात गायी चरताना दिसल्या, त्यांच्या गळ्यातील घंटांचे आवाज दूरवर येत होते. स्विसमध्ये आलोय याची खऱ्या अर्थाने जाणीव झाली.
ऑफेन पास आणि फ्ल्युएला पास हे दोन पुढचे पासेस परत असेच पर्वत रांगांमधून जात होते. प्रत्येक ठिकाणी पर्वतांवरील खडक, माती, रंग यातला बदल दिसत होता. फ्ल्युएला पास मध्ये एका ठिकाणी बरीच गर्दी दिसली आणि चार पाच छोटी तळी होती. भूक लागली होती. इथेच थांबून सोबत आणलेला डबा काढला. दगडांच्या टेबल खुर्चीवर बसून खाल्ला आणि पुढे मार्गस्थ झालो.
स्विस लोकांचे झेंड्याचे प्रेम ठिकठीकाणी दिसून येते. अगदी सायकलपासून तर अशा एकाकी जागी ते सगळीकडे झेंडे रोवतात.
हा रस्ता दावोस (Davos) या प्रसिद्ध गावातून जात होता. इथे थांबण्या इतका वेळ नसल्याने फक्त गाडीतूनच काही देखावे टिपले.
झुरीच लेक, लुत्सेर्न लेक असे काही मोठे तर अनेक छोटे तलाव आणि त्यातील निळे पाणी सतत लक्ष वेधून घेत होते. बराच वेळ एक नदी एका बाजूने वाहात होती. बोगदे तर संपता संपत नव्हते. एक झाला की दुसरा सुरु. काही अगदी अर्धा किलोमीटरचे तर काही अक्खा पर्वत वरपासून तर खालपर्यंत उतरणारे. अप्रतिम निसर्ग सौंदर्याने नटलेला हा रस्ता असला तरीही आता प्रवासाचा कंटाळा येऊ लागला होता. अर्थात मध्ये काही ठिकाणी थांबायचा मोह आवरत नव्हता.
अखेरीस ६:३० च्या आसपास विल्डर्सविलला पोहोचलो. गावातून दुरून युंगफ्राऊ, आयगर आणि म्योंख ही तीन शिखरे दिसत होती. गल्ल्या इतक्या छोट्या होत्या की फक्त एक गाडी जाऊ शकेल. थोड्या शोधाशोधीनंतर हे घर सापडलं आणि बघूनच प्रवासाचा थकवा निदान थोडा वेळ तरी दूर गेला.
या गावात फेरफटका मारताना दिसलेल्या काही गोष्टींविषयी, तेथील काही अनुभवांवर नंतरच्या भागात लिहीनच. एका आजीने दार उघडले. तिच्या मुलीचे हे घर होते पण त्यांचे कुटुंब बाहेरगावी गेल्याने ती थांबली होती. तिने खोली दाखवली. सामान टाकले. फ्रेश झालो आणि खाण्यापिण्याची बॅग उघडून फक्कड चहा केला. सुखद पण खूप थकवणारा प्रवास होता. त्यामुळे झोपेची नितांत गरज होती. हवामानाचा अंदाज बघता दुसऱ्या दिवशी आमच्या ठरलेल्या ठिकाणी जाण्यास हरकत नव्हती, पिट्झ ग्लोरिया आणि परिसर लवकरच…
क्रमशः
सततच्या प्रवासानंतर आता पुढचे सहा दिवस एकाच ठिकाणी मुक्काम होता त्यामुळे रोजची सामान आवराआवरी हा प्रकार नव्हता. हवामानाचा अंदाज बघायचा आणि त्याप्रमाणे त्या दिवसाचा बेत करायचा असे ठरले होते. पर्वतशिखरे बघण्यासाठी सूर्यप्रकाश नसेल आणि नुसतेच ढग असतील तर काहीच मजा नाही. सकाळी उठून पुन्हा बघितले तेव्हा ठरल्याप्रमाणे शिल्थोर्नला हिरवा झेंडा मिळाला.
शिल्थोर्न (Shilthorn) हे आल्प्समधील २९७० मीटर उंचीवरील शिखर आहे. इथवर जाण्यासाठी रज्जुमार्ग आहे जो चार वेगवेगळ्या टप्प्यात तुम्हाला वरपर्यंत पोहोचवतो. श्टेशेलबेर्ग हे पायथ्याचे गाव आहे जिथून हा रज्जुमार्ग सुरु होतो. श्टेशेलबेर्ग-->गिमेलवाल्ड-->म्युरेन-->बिर्ग--->शिल्थोर्न असा हा प्रवास आहे. (Stechelberg-->Gimmelwald-->Mürren-->Birg-->Shilthorn). एकूण ३०-३२ मिनिटांचा हा प्रवास आहे, ज्यापैकी पहिले दोन टप्पे तसे कमी वेळाचे पण उर्वरीत दोन टप्पे बरेच लांबलचक आहेत. म्युरेन आणि गिमेलवाल्ड ही दोन टुमदार खेडी आहेत. श्टेशेलबेर्ग पासून या दोन गावांपर्यंत पायी चढत येणे सुद्धा सहज शक्य आहे, इथून पुढे शिल्थोर्न पर्यंत देखील प्रशिक्षित गिर्यारोहक गिर्यारोहणाचा आनंद घेतात. बिर्ग आणि शिल्थोर्न या दोन्ही शिखरावरून पलीकडच्या बाजूस असलेली आयगर (Eiger), युंगफ्राऊ (Jungfrau) आणि म्योंश (Mönch) ) ही तीन शिखरे दिसतात आणि अर्थात आजूबाजूचा निसर्ग. शिल्थोर्नवर असलेले पिझ ग्लोरिया (Piz Gloria) हे एक फिरते रेस्टॉरंट आणि काही बाँडपटांचे येथे झालेले चित्रीकरण ही अजून काही आकर्षणे.
श्टेशेलबेर्गला अर्ध्या तासात पोहोचलो. तिकीट काढले आणि पहिला प्रवास सुरु झाला. खालची खेडी, मधूनच वाहणारे झरे, आजूबाजूची हिरवळ सगळेच सुंदर दिसत होते. रज्जुमार्गातील सूचना इंग्रजी आणि जर्मन सोबतच चीनी भाषेतूनही होत्या. बापरे. केवढी सोय सगळ्या पर्यटकांची. पहिल्या दोन ठिकाणी न थांबता सरळ बिर्ग पर्यंत पोहोचलो. किंचित थंडी होती पण सूर्यही मधूनच डोकावत होता. मुख्य म्हणजे आकाश निरभ्र होते. बाहेर आलो तोच या तीन शिखरांचे दर्शन झाले. बर्फ बराच वितळला होता पण म्हणून या पर्वतांचे सौंदर्य काही कमी होत नाही.
डावीकडून - आयगर, म्योंश आणि युंगफ्राऊ
इथे एक स्कायवॉक प्लॅट्फॉर्म बांधला आहे, जो या खालच्या चित्रात डावीकडे दिसतो. खाली जाळी असल्याने पाया खाली पाहिले तर अनेकांना भीतीदायक वाटते. सुरुवातीला जरासे घाबरत आणि मग थोडे निश्चिंतपणे उतरले.
फोटो बिटो काढून झाल्यावर जवळच बांधलेल्या पायऱ्यांवर निवांत बसलो. सकाळी लवकर आल्याने अजून मुख्य पर्यटकांची गर्दी सुरु झाली नव्हती. समोरची तीन शिखरे सूर्यकिरण पडल्यानंतर अजूनच सुंदर दिसत होती. वारा अजिबातच नसल्याने थोडेफार लोक आणि कधीतरी येणारा विमाने किंवा हेलिकॉप्टर यांचाच काय तो आवाज. अनेक लोक पॅराग्लायडींग करण्यात मग्न होते. उन्हाळ्याचे शेवटचे काही दिवस असल्याने अशा प्रकारांसाठी गर्दी होती.
एकीकडे प्लॅट्फॉर्मवर उतरताना अनेक पर्यटक लक्ष वेधून घ्यायचे. एखादे आजोबा अगदी प्रेमाने आपल्या बायकोला "अगं काही होत नाही म्हणत हात धरून घेऊन जायचे". काही लहान मुलांचे बागेत आल्याप्रमाणे इथे जोरजोरात उड्या मारायच्या एवढेच उद्योग करायचे. काहींना आई बाबा किंवा आजी आजोबा "हे बघ, हे आयगर, हे युंगफ्राऊ, ते तिकडून पाचवे ते हे" असे समजावून सांगत होते. त्यांना रस असो अथवा नसो. मधेच एक जपानी ललना तिच्या अतीव नाजूक टाचांच्या बुटांना सावरत सावरत आली आणि दुरूनच हा ओरडू लागली, "ओह माय गॉड, आय कान्त डु धिस..सो स्केअरी..ओ नो...ओ नो..." देश विदेशातल्या लोकांचे अनेक चमत्कारिक नमुने दिसत होते. या सगळ्यांमध्ये खास करमणूक करतात ते म्हणजे चीनी-जपानी लोक. नेमके कोणत्या देशाचे कोण हे कळत नाही पण जास्त चीनी असतात असे एक चीनी सहकर्मचारीच म्हणाला. केवळ इथेच नाही, तर आजवरच्या अनेक सहलींमध्ये यांची काही खास वैशिष्ट्ये दिसतातच. एक असे की यांच्याकडे निकॉन किंवा कॅननचा किमान डीएसएलआर कॅमेरा असतोच असतो. त्याच्या शिवाय मग कितीही अत्याधुनिक आयुधे असू शकतात. यांची झुंबड आली की आपण कुठलेही फोटो काढणे शक्य होत नाही. यांना कुठल्याही ठिकाणी गेल्यानंतर कधी एकदा मी फोटो काढतोय अशी सदैव घाई असते. ही घाई रोपवेत चढताना, प्रसाधनगृहात, ट्रेनमध्ये चढताना, उतरताना सदासर्वकाळ. बरं मग जाउन तिथे काय आहे वगैरे बघणे हे फार महत्वाचे वाटत नाही बहुधा. मी इथे आलो होतो म्हणत आल्या आल्या दोन चार फोटोंचा क्लिकक्लिकाट, आधी कॅमेर्याने, मग नंतर आयपॅड किंवा टॅबने, मग मोबाईलने, आधी एकट्याचा, मग ग्रुपचा वगैरे वगैरे फोटो सत्र आल्यापासून सुरु होते. आजकाल गेल्या काही दिवसांपासून सेल्फी स्टिक हे उपकरण यात आले आहे. त्यामुळे काही सेल्फीज होतात. पण मग फोटो झाले की लगेच हे सगळे पुढच्या ठिकाणी जायला निघतात. त्यामुळे वेळ जो काय घेतात तो फोटोंचाच. असो. एक श्वान आपल्या मालकासोबत आला, तसे अगदी पिल्लूच. प्लॅट्फॉर्मच्या फक्त एका कोपर्यात लाकडी फळ्या होत्या ज्यावरून साहजिकच खालचे एकदम दिसत नव्हते. त्या फळीवरून जाळीवर एक पाय ठेवायला जायचा, खालचं दिसलं की भीतीने पुन्हा मागे यायचा. गोल चक्कर मारून परत दुसरीकडून प्रयत्न करायचा आणि पठ्ठ्या परत मागे. आम्ही जवळचे सगळेच तल्लीन होऊन त्याच्याकडे बघत होतो. :) अशा अनेक करमणुकी बघत, मधेच गर्दी नसेल तेव्हा फोटो काढत आणि शांतपणे या पर्वतांचे, शिखरांचे रूप अनुभवत बराच वेळ गेल्यानंतर भूक लागली होती, आता वर शिल्थोर्नला जाऊन जेवूयात असा विचार करून उठलो.
शिल्थोर्नला आधी पोटोबा मग फोटोबा असे म्हणत जेवण केले. शाकाहारींसाठी एवढे पर्याय बघून डोळे पाणावले. जेवून बाहेर आलो आणि इथून दिसणारया पर्वतरांगा कॅमेर्यात साठवल्या.
आयगरची उत्तरेकडची भिंत/कडा. याविषयी पुढच्या भागात अधिक माहिती येईलच.
खाली उतरताना परत एकदा बिर्गला थांबलो. सूर्य डोक्यावर आल्याने थंडी पळाली होती आणि गर्दीही कमी झाली होती. पुन्हा एकदा सगळे नजरेत साठवले. येताना मात्र म्युरेन पर्यंत येउन पुढचे म्युरेन ते गिमेलवाल्ड हे अंतर पायी जायचे असे ठरवले. विशेष करून म्युरेन बद्दल बरेच ऐकले होते. पायी फिरताना अजून काही नवीन गोष्टी दिसतात आणि दीड ते दोन तासात उतरणे सहज शक्य होते. या दोन्ही गावांमध्ये गाड्या आणण्यास परवानगी नाही. डोंगरावर वसलेली ही खेडी. एका सपाट पृष्ठभागावर असे काहीच नाही. सगळी लाकडी घरे, प्रत्येक घर म्हणजे जणू फुलांचे दुकान होते इतकी सगळीकडे फुले, "इथे रूम भाड्याने मिळेल" अशा पाट्या, लाकडी ओंडक्यापासून केलेले बाक, रेस्टॉरंट्स सगळंच डोळ्याला सुखावणारं. दिशादर्शक पाट्या सगळीकडे असल्याने त्याप्रमाणे खाली उतरायला सुरुवात केली. शिवाय हे असे दिशादर्शक सुद्धा होतेच.
किती फोटो काढू, किती डोळ्यात साठवून घेऊ असे होत होते.
ही अशी चाकं बऱ्याच घरांवर दिसली.
सजवलेली बाग
या फोटोत डावीकडे भाज्या लावलेल्या दिसत आहेत. असे जवळपास प्रत्येक घरात दिसले. भरपूर फुलझाडी, शिवाय खिडक्यांमधून ओसंडून वाहणारी फुले आणि अंगणात लावलेल्या भाज्या. काही घरांमध्ये फक्त लाकूड साठवले आहे असे वाटत होते, जसे की हे किंवा वरचे चाकांच्या फोटोतले.
डोंगरावर वस्ती असल्याने बराचसा रस्ता हा वरच्या दोन फोटोत आहेत तशा पायर्यांवरून होता. गावातल्या लोकांसाठी गाड्या आणण्यास परवानगी आहे पण एकुणात स्विस लोकांचा कल हा अशा ठिकाणी गाड्या आणू नयेत असा आहे. त्यामुळे ते लोकही फार कमी वापर करतात. गावातून बाहेर आल्यावर हा असा रस्ता लागला.
मध्येच गायी, मेंढ्या चरण्यात गुंग होत्या.
पर्यटकांची बहुधा सवय असावी त्यामुळे मस्त पोझ देत मॉडेलिंग.
हे जे लाकडी बांधकाम आहे ती बर्फ कोसळून धोका होऊ नये म्हणून केलेली उपाययोजना आहे.
निसर्गावर, झाडांवर, फुलांवर असलेले स्विस लोकांचे प्रेम याचा उत्तम नमुना म्हणजे अशी जपलेली घरे, बागा आणि खेडी. अत्याधुनिक सुविधा आणि तरीही जुनेपण टिकवून ठेवत जपलेली घरं. प्रेमात पडावीत अशी. हा रस्ता उतरून गिमेलवाल्डहून परत रज्जुमार्गाने पायथ्याशी आलो. दुसऱ्या दिवशी उठून या पर्वतांच्या पलीकडील बाजूवर जायचे होते. त्यामुळे परतीच्या प्रवासाला निघालो. जवळून दिसणारी आयगर ची भिंत आणि असेच डोंगर उतरत केलेला प्रवास, पुढील भागात...
क्रमशः
हवामानाचे अंदाज बघत दुसऱ्या दिवशी कुठे जावे यावर विचार सुरु होता. डोक्यात होते युंगफ्राउ (Jungfrau) या शिखरावर जायचे. इथवर जाण्यासाठी डोंगरातून रेल्वे मार्ग तयार केलेला आहे जो आयगर (Eiger), म्योंश (Moensch) अशा शिखरांखालुन युंगफ्राउ पर्यंत जातो. इथून दिसणारा निसर्ग, इथे असलेले बॉलीवूड रेस्टॉरंट आणि वर बर्फ असल्याने त्यात खेळण्याची मजा हे वर जाऊन करावयाचे उद्योग. याच भागातले काही ट्रेक्स आधीच बघून ठेवले होते आणि तेही करायची इच्छा होती. एकाच दिवसात सगळे होणे कठीण वाटले. मग काय करावे असा विचार सुरु झाला. आधल्या दिवशी जे काही दुरून दिसत होते त्याप्रमाणे बर्फ बराच वितळला होता. बॉलीवूड रेस्टॉरंटमध्ये फार काही रस नव्हता. अशा पद्धतीच्या ट्रेनचा अनुभव जर्मनीतील Zugspitze या शिखरावर जाताना घेतला होता, तोही डिसेंबरच्या थंडीत. मग या काही मुद्द्यांचा विचार करता अखेरीस युंगफ्राउला फाटा देऊन साधारण ४-५ तासांचा आयगरच्या जवळून जाणारा ट्रेक करायचा असे ठरले. घसा दुखणे, सर्दी अशा बारीक कुरबुरीही होत्या त्यामुळे आरामात निघालो.
हे ट्रेक म्हणजे खरं तर तसे सोपे होते. कठीण डोंगर पार करायचे वगैरे असे काही नाही. सगळ्या डोंगरावरून काढलेल्या पायवाटा. प्रत्येक ठिकाणी दिशादर्शक, पुढे जायला किती वेळ लागेल याची माहिती दिलेली. स्विस टुरीझमच्या संस्थळावर अशा सगळ्या ट्रेल्सची माहिती दिलेली आहे. किती वेळ लागेल, चढायचे आहे की उतरायचे, कितपत कठीण आहे वगैरे हे सगळे वाचून आपण आपल्याला झेपतील तसे मार्ग घेऊ शकतो. तिथपर्यंत ट्रेन किंवा रोपवेने कसे पोहोचता येईल हेही दिलेले असते.
मागच्या भागातील बिर्ग किंवा शिल्थोर्न म्हणजे लाउटरब्रुनेन (Lauterbrunnen) या व्हॅलीची एक बाजू आणि हे युंगफ्राउ, म्योंश आणि आयगर, ही दुसरी बाजू. आयगरचा शब्दशः अर्थ Ogre, म्योंश म्हणजे monk अथवा साधू/भिक्खू आणि युंगफ्राउ म्हणजे तरुणी. Ogre पासून तरुणीला वाचविणारा असा भिक्खू या दोन्हीमध्ये उभा आहे अशी याविषयीची दंतकथा आहे. या बाजूला असलेल्या वेंगेन (Wengen), मेनलिशेन (Maennlichen) अशा गावांमधून बरेच सोपे ट्रेक सुरु होतात. क्लाइनं शाईडेग (Kleine Scheidegg) हे लोकवस्तीच्या दृष्टीने सगळ्यात उंचावर वसलेलं गाव. इथपासून पुढे मग युंगफ्राउला जाणारा रेल्वे मार्ग सुरु होतो. पुढचा बहुतांशी प्रवास बोगद्यातून. त्यामुळे मेनलिशेन ते क्लाइन शाईडेग आणि नंतर क्लाइनं शाईडेग ते वेंगेन असा मार्ग ठरला.
पहिले लाउटरब्रुनेन या स्थानकाहून ट्रेनने वेंगेनला आलो. येताना ट्रेन मध्ये एक भारतीय जोडपे तिकीट काढले नाही म्हणून आकर्षण ठरले. एकूण संवादावरून 'केवळ जमले तर जमून जाईल' असा विचार दिसत होता. तरीच म्हटलं अजून कसे कुणी नग कसे भेटले नाहीत. चालायचेच. एवढा सुंदर निसर्ग असताना कुठे लक्ष द्यायचे.
वेंगेन रेल्वे स्थानक
इथून पुढे एका रोपवेने मेनलिशेन या गावात जायचे होते. मेनलिशेनला पोहोचलो आणि पाट्या बघून चालायला सुरुवात केली. लोकांचे लक्ष वेधून घेतील अशा अनेक कलाकृती जागोजागी तयार करणे यात या लोकांचा हातखंडा आहे हे सतत सांगण्याची गरज नाही.
अतीव शांतता, सोबतीला थोडेफार लोक, यातही वयस्कर मंडळी आणि बच्चे कंपनी सगळ्यात जास्त. यांच्याकडे बघूनच आपल्याला छान वाटतं इतका उत्साह असतो. अफाट पर्वत, बर्फाच्छादित शिखरे, दुरून दिसणारी आयगरची भिंत, मधूनच दिसणारी तळी, त्यातले निळे पाणी, झाडांचे बदलते रंग सगळं अनुभवत प्रवास सुरु होता.
जागोजागी पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था केलेली होती. स्वित्झर्लंडच्या संपूर्ण वास्तव्यात सगळीकडेच लाकूड वापरलेले दिसले. जसे की हे रस्तातले पाण्याचे साठे, बसण्यासाठी बाक, बस स्थानक, घरं, सगळं काही लाकडी. तेवढ्याच प्रमाणात वृक्षांची लागवड देखील केली जात असणार हेही अर्थात सहज लक्षात येण्याजोगे. हे युरोपातही अनेकदा दिसते पण स्वित्झर्लंड मध्ये प्रमाण जास्त आढळले. मागे एका ठिकाणी अशाच लाकडी बाकावर लिहिले होते की यासाठी जेवढे लाकूड लागले त्याच्या कितीतरी पट वृक्ष लागवड दर वर्षी या परिसरात करण्यात येते. नेमका आकडा आता लक्षात नाही. नैसर्गिक साधन संपत्तीचा योग्य उपयोग आणि संवर्धन हे सगळेच कौतुकास्पद आहे.
जळी स्थळी फडकलेले झेंडे
या भागात हेलीकॉप्टरने दर्शन घडविणाऱ्या अनेक सफरी आहेत. त्यामुळे अधून मधून त्या आवाजाने आकाशाकडे लक्ष जायचे. जमलेच तर काही टिपण्याचा प्रयत्न केला जायचा.
हळूहळू आयगर अधिकाधिक जवळ दिसू लागला
३९७० मीटर उंचीवर असलेलं हे आल्प्स मधील शिखर. विशेष आकर्षण ठरण्याचे मुख्य कारण म्हणजे ही १८०० मीटरची नॉर्डवांड (नॉर्ड - नॉर्थ/उत्तर दिशा, वांड - भिंत) किंवा उत्तरेकडची भिंत. बघूनच धडकी भरते अशी. अनेक गिर्यारोहकांसाठी आव्हानात्मक आणि सर करायला अतिशय कठीण ठरलेली. सर करण्यासाठी कठीण यात एक मुद्दा हा की उत्तरेकडे तोंड करून असल्याने बहुतांशी काळ ही भिंत सावलीत असते. आणि दुसरा म्हणजे संपूर्ण आल्प्स पर्वत रांगांमधील लहरी निसर्ग आणि हवामान. १९३५ पासून आजपर्यंत एकूण ६४ लोकांचा इथे चढण्याच्या प्रयत्नात आपला जीव गमावला आहे. त्यामुळे याला बोलीभाषेत 'मॉर्ड्वांड' म्हणजेच 'मर्डर वॉल' असेही म्हटले जाते. गेल्या काही वर्षांपासून बर्याच प्रमाणात मोठे खडक कोसळून देखील नुकसान झाले आहे. त्यामुळे सद्यस्थितीत गिर्यारोहणापेक्षाही या अशा नैसर्गिक आपत्ती हे संकट जास्त मोठे ठरते आहे. यामुळे बहुतांशी मोहिमा हिवाळ्यात होतात जेणेकरून त्यावर साचलेल्या बर्फाची चढण्यास मदत होते. परंतु avalanche कोसळणे, खडतर हवामान इत्यादी बाबींशी सामना करावा लागतो.
क्लाइनं शाईडेग पासून बहुतांशी भिंत चढायला सुरुवात केली जाते. उली स्टेक (Ueli Steck) या गिर्यारोहकाने ( Spiderman म्हणावे की काय असे वाटते) प्रस्तर रोहणाचे अगदीच प्राथमिक साहित्य वापरून ही भिंत सर केली आहे आणि तीही केवळ २ तास ४७ मिनिटे इतक्या कमी वेळात. उली स्टेक ने केलेल्या एका मोहिमेबद्दल इथे बघता येईल. आम्ही कितीतरी दुरून बघत होतो. अजून जवळून कसे वाटत असेल याविषयी कदाचित त्या चित्रफितीतून थोडासा अंदाज येईल.
क्लाइनं शाईडेग पर्यंत आलो तेव्हा पोटात कावळे कोकलत होते त्यामुळे इथेच एका रेस्टॉरंटमध्ये बसून खाल्ले.
इथे असताना "से चीज" म्हणण्याशिवाय गत्यंतर नाही.
क्लाइनं शाईडेग स्थानक
युंगफ्राउकडे निघालेली ट्रेन. सुर्य ढगाआड गेला होता आणि ढग खाली पर्वतांवर उतरले होते .
आयगरची भिंत, युंगफ़्राउ, म्योंश आणि हा सगळा निसर्ग शक्य तेवढा डोळ्यात साठवून वेंगेनकडे जाणारा रस्ता धरला. परतीचा रस्ता हा अनेक सगळे डोंगर उतरत येणारा होता. या रस्त्यावर फारसे कुणीच दिसत नव्हते. क्वचित कुणी दिसले तर हाय, हेल्लो करून हात दाखवून पुढे जायचे. एका बाजूने रेल्वेचे रूळ होते. मधूनच एखादी ट्रेन दिसली की आम्ही लहान मुलांप्रमाणे त्यांना टाटा करायचो आणि पुढे जाण्याचा उत्साह आणायचो. रस्ता अगदीच सोपा असला तरीही सतत उतार होता. मग कधीतरी गाडी जाम ढेपाळायची. दोन मिनिट कुठल्यातरी बाकावर बसायचं आणि पुढे चालायचं असं सुरु होतं. नेमके अशा वेळी जर काही सुंदर असे नजरेला दिसले तर पुन्हा थकवा पळायचा.
असेच अगदी शेवटच्या अर्ध्या तासाच्या रस्त्यात एका ट्रेनमध्ये सगळे कुठल्यातरी प्रवासी कंपनीचे भारतीय लोक दिसले आणि त्यांच्यातील काहीनी आनंदाने हात दाखवला. आम्हीही सुखावलो. थकत भागात शेवटी एकदाचे वेंगेनला आलो आणि ट्रेनने लाउटरब्रुनेनला. थकवणारा पण खूप समाधान देणारा हा दिवस होता. सर्दी, घसा दुखणे अशा कुरबुरी दिवसभरात अजूनच वाढल्या होत्या आणि आरामाची गरज जाणवत होती. 'पुढचे दोन दिवस पाऊस पडणार' असा हवामान खात्याचा अंदाज होता. त्याप्रमाणे डोक्यात काही पर्यटनस्थळे होती आणि सुदैवाने पावसाने एकच दिवस हजेरी लावली. :) इंटरलाकेन, ट्रमेलबाख फॉल्स, राइशेनबाख फॉल्स आणि जवळची काही इतर पर्यटन स्थळे याविषयी पुढील भागात...
क्रमशः
सकाळी उठून बाहेर पाहिले तर वरुणराजा कोसळत होते. घरातून बागही दिसत नव्हती एवढे दाट धुके होते. थोडा वेळ वाट बघुयात नाहीतर पडू बाहेर, असा विचार करून आवरले. यापूर्वीचा आमचा अनुभव बघता संपूर्ण सहलीत जर पाउस आलाच नसता तर खरं तर आश्चर्य वाटले असते. तर अशीच त्या दिवशी पावसाला विश्रांती घ्यायची अजिबातच इच्छा नाही असे दिसले. त्यामुळे छत्र्या, जॅकेट सोबत घेऊन शेवटी बाहेर पडलो. आमच्या मालकांच्या कृपेने आम्हाला एक कार्ड मिळाले होते ज्यात इंटरलाकेनच्या जवळचा काही प्रवास फुकट होता. :) म्हणून मग चालतच विल्डर्सविल स्थानकावर आलो जिथून इंटरलाकेन साठी ट्रेन घ्यायची होती.
इंटरलाकेन (Interlaken) हे दोन मोठ्या लेक्सच्या जवळचे आणि या भागातले सगळ्यात मोठे शहर. युंगफ़्राउ आणि एकूणच बेर्नर आल्प्स बघण्यासाठी इथूनच ट्रेन्स सुटतात. याशिवाय इतर अनेक मोठ्या शहरांशी ट्रेन आणि इतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेने हे जोडले गेले आहे त्यामुळे पर्यटकांची बरीच गर्दी असते. एका बाजूला थुन लेक (Thun Lake) तर एका बाजूला ब्रीएन्झ लेक (Brienz Lake) आणि मधून वाहणारी आरं नदी (Aare) असे अनोखे निसर्ग सौंदर्य असलेले हे शहर. ब्रीएन्झ लेक हा १४ किमी लांब तर थुन लेक हा १७ किमी लांबवर पसरला आहे. ग्रिंडेलवाल्ड आणि लाउटरबृनेन व्हॅली मधून वाहत येणारे अनेक झरे आणि आर आणि ल्युटशिनं या नद्यांपासून वाहत येणारे पाणी हा ब्रीएन्झच्या पाण्याचा मुख्य स्त्रोत. याचीच एक बाजू पुढे थुन लेकला जोडली जाते. दोन्ही तळ्यांच्या काठावर अनेक छोटी छोटी गावं वसली आहेत.
५ ते ७ मिनिटात इंटरलाकेनच्या स्थानकावर पोहोचलो. कुठेही गेलो तरी पावसामुळे फार काही बघायला मिळेल याची खात्री नव्हतीच. मग फार विचार न करता बसने इझेल्टवाल्ड (Iseltwald) या ब्रीएन्झ लेकच्या काठावर असलेल्या गावात जाऊयात म्हणून बस स्थानकाकडे निघालो. नाही म्हणायला दोन चार लोक बस मध्ये होते, तेही सगळे स्थानिक. अगदी २००-३०० घरांची लोकवस्ती असेल या गावात. सुट्टीचा दिवस नव्हता तरीही सगळीकडे शुकशुकाट. तलावातील निळे पाणी, त्यात पडणारा पाऊस, आजूबाजूची हिरवळ आणि खाली उतरलेले ढग ही शेवटी या पावसाळी हवामानाचीच देणगी. फक्त त्यामुळे फारसे फोटो काढण्यासारखे वातावरण नव्हते. तरीही मोह आवरेना.
परतीची बस पुन्हा एक तासाने होती. आता अशा वेळी काय करायचे या प्रश्नाचे उत्तर हमखास ठरलेले असते - कॉफी. एकच हॉटेल दिसलं जवळ, पण बाहेरून पाहिले तर कुणीच दिसत नव्हते. बंद आहे की काय अशी शंका घेत जरा बिचकतच आत डोकावलो तर चार डोकी दिसली आणि बरे वाटले. तळ्यात पडण्याऱ्या पावसाची गंमत पाहात गरमागरम कॉफीचा आस्वाद घेणे म्हणजे निव्वळ सुख.
पावसाने हिरमुसलेले मन परत ताजेतवाने झाले आणि इंटरलाकेनला परत आलो. इथे पूर्व आणि पश्चिम अशी दोन स्थानके आहेत. या दोन्ही स्थानकांच्या मध्ये असलेल्या रस्त्यावर हरतऱ्हेची दुकानं आहेत. स्विस घड्याळे, नाइफ़, चॉकलेट्स, स्की आणि इतर हिवाळी खेळांचे साहित्य नि अजून काय काय. इथून फेरफटका मारत विंडो शॉपिंग करत भटकलो. आधीच महागाई साठी प्रसिद्ध असलेल्या देशातल्या अशा रस्त्यांवरची ही दुकाने फक्त बघायला फार छान वाटतं. घेण्यासारखे अर्थात फारसे काही नसते.
रिमझिम पाउस अजूनही सुरूच होता. त्यामुळे अजून आता कुठे जाणार हा प्रश्न अनुत्तरीत होता. शेवटी गप गुमान घरी परत आलो.
संध्याकाळनंतर थोडे हवामान बदलले म्हणून मग जिथे राहात होतो तिथे म्हणजेच विल्डर्सविलमध्ये चक्कर मारायला बाहेर पडलो. सात दिवसात इथे अनेक वेळा फेरफटका मारला त्यावेळी जाणवलेल्या काही गोष्टी आणि एकूणच या गावाविषयी थोडे लिहावेसे वाटले म्हणून दुसऱ्या दिवशीच्या भटकंतीला पुढील भागात ढकलायचे ठरवले.
साधारण २५०० लोकसंख्येचं हे एक टुमदार गाव म्हणजे स्वित्झर्लंडच्या संस्कृतीचे प्रातिनिधिक स्वरूप म्हणता येईल. तशी प्रत्येक गावात, प्रदेशात विविधता आहेच पण काही बाबी सगळीकडे आढळतात. केवळ विल्डर्सविल बद्दल बोलायचे झाले या गावातील एकूण जागेपैकी १९.७ टक्के भाग हा शेतीसाठी वापरला जातो तर ५७.४ टक्के भागात जंगल आहे. उर्वरीत जागेपैकी १० टक्के जागेवर घरं किंवा रस्ते आहेत तर इतरत्र काही भागात नद्या, झरे, तलाव आणि काही भाग हा अनुत्पादित आहे. हे सर्व बघता झाडांची लागवड, शेती या गोष्टींकडे दिसणारा स्विस लोकांचा ओढा दिसून येतो. हे गावही म्युरेन किंवा गिमेलवाल्ड प्रमाणेच सजावट स्पर्धेत हिरीरीने सहभागी होतं. सगळ्याच घरांमध्ये बाग, फुलं, स्विस घंटा आणि झेंडे या गोष्टी होत्याच. गावात जागोजागी पाण्याचे हौद दिसले आणि त्यावरही फुलं होतीच. रोज सकाळी उठून हा गायींचा आवाज, दुरून दिसणारी आयगर, युंगफ़्राउ ही शिखरे, पक्षांचे आवाज, आजूबाजूची कौलारू घरे, फळांनी लगडलेली झाडं, संध्याकाळी मावळतीची सूर्यकिरणे आणि रात्री दुरून दिसणारा शीतल चंद्र हे बघणं आणि अनुभवणं हे शब्दात पकडणं कठीण आहे. इथे भटकताना काढलेले काही फोटो.
बुकिंग करताना एक नेहमीपेक्षा वेगळी गोष्ट जाणवली की कुणीही पैसे मागितले नाहीत. पत्ता, पासपोर्ट अशी विशेष काही माहिती देखील नाही. हे एका घरातलंच हॉटेल होतं म्हणूनही असेल कदाचित. पण उम्ब्रेल पास वर जिथे राहिलो तिथेही केवळ फोनवर बुकिंग पक्कं झालं. यापूर्वी कुठेच असे पाहिले नव्हते. आम्ही जेव्हा पोहोचलो, तेव्हाही कुणी पासपोर्ट किंवा इतर कुठलेही ओळखपत्र दाखवा असे काहीच विचारले नाही. त्या आजीला पैसे देण्याविषयी विचारले, तर तिने "ते सगळं नंतर बघू" म्हणून काही किरकोळ रक्कम सुद्धा घेतली नाही. पुन्हा दुसऱ्या दिवशी विचारले तर म्हणाली, "तुम्ही जायच्या आधी ते काम करू, त्यात काय एवढे". स्विस लोकांबद्दल जे काही ऐकले होते त्यावरून हे आश्चर्यच वाटत होते.
आम्ही राहिलो त्या घराची बाग तर फारच सुंदर होती. अनेक प्रकारची झाडं तर होतीच, पण बागेत अनेक प्रकारचे सजावटीचे साहित्य ठेवले होते, काही मातीच्या वस्तू होत्या, काही लाकडी तर काही गवतापासून केलेल्या. दर दोन झाडांमध्ये काही ना काही होतेच. बरं हे सगळं असंच बागेत मोकळं. घराला कुंपण वगैरे काही नाही. बागेत दहा बारा टेबल, काहींवर फळांच्या टोपल्या तर काहींवर कुंड्या, जवळच कचरापेटी. शिवाय एकंदरीत असे वाटले की जुन्या वस्तू फेकून देण्याऐवजी त्यातूनच काहीतरी नवीन करायचे असा कल आहे.खालच्या फोटोत एका ठिकाणी जुन्या बुटातून दोन उंदीर डोकावताहेत तर जुनी सायकल फुलांच्या सजावटीला वापरली आहे. या सगळ्याची साफसफाई ठेवणे हे केवढे मोठे काम असेल याचा तर विचार करूनच मला थकायला झाले. आणि हे सगळे आत्ता उन्हाळ्यात एवढे आहे तर नाताळ साठी काय काय केले जाईल याचा विचारच नको. या घराची एक झलक.
इथे जवळच फिरताना एक खुले संग्रहालय दिसले. घरच खरं तर. तिथे आत जाउन पाहिले तर काही खास जुन्या वस्तू दिसल्या आणि त्या गावाबद्दल थोडीफार माहिती देणारे फलक होते. पूर्वीचे गाव कसे होते, काळानुरूप काही गोष्टी कशा बदलल्या, शेती आणि दुध दुभते हा लोकांचा मुख्य व्यवसाय होता, त्यात तंत्रज्ञानाने कशी भर पडली हे दर्शविणारी काही चित्रे होती. आपला जसा बैलपोळा तसा हा गायींचा सण साजरा होतो याचा एक देखावा केला होता.
जुन्या काळी वापरण्यात येणारी भांडी ठेवली होती. ही आजही पारंपारिक भांडी म्हणून खास सणांच्या वेळी वापरली जातात असे एका दुकानातल्या आजीकडून कळले.
जर्मन ही प्रमुख भाषा आहे परंतु सुपर मार्केट्स किंवा इतरत्र कुठेही, अगदी लहान गाव असूनही लोक सहजपणे इंग्रजी बोलत होते. सगळी माहिती इंग्रजी मध्ये उपलब्ध होती. शिवाय इटालियन भाषेचा आणि फ्रान्सच्या सीमेजवळ फ्रेंचचा प्रभावही आहे असे दिसले. स्वच्छतेच्या बाबतीत उर्वरित पश्चिम युरोपीयनांपेक्षादेखील स्विस लोक हे अधिक काटेकोर आहेत असे वाचले होते आणि ते सगळीकडे जाणवले.
इथेच सुपर मार्केट मध्ये गेलो असता एक मलेशियन माणूस भेटला. तो मॅरेथॉनसाठीआला होता आणि सोबत त्याची आई होती. तुम्ही कुठले, इथे कुठे राहता, काय करता अशा जुजबी गप्पा त्याने सुरु केल्या. कुणीतरी आपल्या अगदी जवळचे भेटल्या प्रमाणे ते दोघेही आमच्याशी पुढे कितीतरी वेळ गप्पा मारत होते. परतीचा मार्ग एकच होता म्हणून सोबतच निघालो. त्यांचे हॉटेल आले तेव्हा तुम्हाला भेटून खूप आनंद झाला असे म्हणत त्या दोघांनीही अगदी प्रेमाने आमचे हात हातात घेतले आणि आम्हाला बाय केले. त्यांची माया ओसंडून वाहात होती आणि आम्ही भारावून गेलो होतो. पावसाने दिवसाच्या सुरुवातीला थोडाफार त्रागा झाला असूनही दिवस छान गेला होता.
आरं नदी आणि जवळपासचे काही धबधबे यांची सफर पुढील भागात...
क्रमशः
इंटरलाकेनला भटकल्या नंतर पावसाने तशी पुढच्या दिवशी विश्रांती घेतली. पण हवामान ढगाळच होते. त्यामुळे त्या दिवशी फारसे काही पाहिले नाही. जे काही पाहिले तो अनुभव वेगळाच होता, एकूण दिवस मस्त गेला होता पण तो भाग अगदीच लहान होत असल्याने शेवटच्या भागात त्याबद्दल लिहुयात असा विचार करून आरं नदी आणि जवळपासचे धबधबे यांना पुन्हा एकदा उचलून पुढच्या भागात ढकलले आहे.
जेव्हा संपूर्ण सहलच मनासारखी होत असते, हे बघू की ते बघू असं होत असतं, किती फोटो काढावे हा प्रश्न पडतो, निसर्गाचे गुणगान करायला शब्द कमी पडतात तेव्हा खरं तर अशा सहलीतला सर्वोत्तम दिवस, सर्वोत्तम स्थळ हे निवडणे म्हणजे महाकठीण (कुणी विचारतंय का हा प्रश्न, पण तरीही मलाच आपलं सांगायचंय त्यामुळे वाचाच आता ) तर सगळ्याच अर्थाने अविस्मरणीय आणि संपूर्ण सहलीचा कळस ठरावा असा हा दिवस होता. का हा प्रश्न पडला असेलच. हे न वाचता पहिले फोटो बघितले असतील तर कदाचित याचा अर्थ लागला असेल, नसेल तरीही मी थोडी भर घालण्याचा प्रयत्न करते.
आधीचे दोन ते तीन दिवस थोडी आजारपण आणि जवळचीच पर्यटन स्थळे, पाऊस यामुळे तसे संथ गतीने गेले होते. सूर्य पुन्हा हजेरी लावणार अशी चिन्हे दिसली आणि नियोजनात प्रमुख असलेला एक बेत प्रत्यक्षात उतरला. मुख्य ध्येय होते आलेच या हिमनदीला भेट आणि फुरका पास आणि सस्टेन पास या दोन प्रसिद्ध पासेस मधून प्रवास. यापेक्षा बरंच काही अधिक अनुभवता आले आणि त्यामुळे सहलीला चार चांद लागल्यासारखे वाटत होते. बराच लांबचा प्रवास असल्याने सकाळी लवकर उठून आवरून निघालो. जीपीएसला पत्ता दिला पण त्याची गाडी काही रुळावर नव्हती. 'मी तुम्हाला रस्ता सांगणार नाही' हे त्याने पक्केच ठरवले होते. मोबाइल स्विसमध्ये चालत नसल्याने तो पर्याय बाद होता. मग 'अरे बाबा दाखव ना रस्ता' म्हणून प्रेमाने जीपीएसला आर्जवून झाले. तरीही ऐकत नाहीये म्हणल्यावर 'इथे ऐन वेळी काय त्रास द्यायलाच हवा का' वगैरे वगैरे म्हणत शिव्या घालून झाल्या. पण त्याला काही हेका सोडायचा नव्हता. मग काय, आधी नियोजन करताना जी काही माहिती वाचली होती, त्याप्रमाणे चर्चा करून रस्ता धरला. थोड्याच वेळात घाट सुरु झाला आणि पुन्हा वेगळ्या प्रदेशातले पर्वत, खडक लक्ष वेधून घेऊ लागले. सस्टेन पास (Sustain Pass) या निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेल्या एका पास मधून हा प्रवास होता. उंचच उंच पर्वत, हेअरपिन टर्न्स आणि न संपणारा वळणदार रस्ता आणि बोगदे, मधेच काही मानवनिर्मित तर काही नैसर्गिक पाण्याचे साठे, जलाशये असा प्रवास सुरु होता. हा पास संपल्यावर पुन्हा इतरत्र मधून मधून दिसणारी टुमदार खेडी सोबतीला होतीच. कितीही वेळा पाहिली तरीही प्रत्येक वेळी वेगळा आनंद देणारी. तीच ती फुलं, एका बाजूने जाणारे रूळ, त्यावरून धावणारी ग्लेशियर एक्स्प्रेस, हिरवळ, प्रत्येक गावातले चर्च वगैरे वगैरे न संपणारी यादी. जेवढे जमेल तेवढे गाडीतून टिपायचा प्रयत्न सुरूच होता. सायकलस्वार आणि बाईक वाले उन्हाळ्याचे शेवटचे दिवस म्हणत आनंद घेत होते.
सुदैवाने कुठेही न चुकता आणि वाहतुकीचा काहीही त्रास न होता अगदी वेळेत योग्य ठिकाणी पोहोचलो - फ़िएच ला (Fietsch). आलेच (Aletsch Glacier) हिमनदी बघण्यासाठी ज्या ठिकाणाहून रोप वे आहे ते हे पायथ्याचे गाव. ऐन दुपारची वेळ होती आणि रस्त्यावर शुकशुकाट होता. पर्वतावर जायच्या आधी काही खायला काही मिळतंय का म्हणून शोधत होतो तर काहीच दिसेना. सगळी दुकानं बंद. अरेच्चा. हे तर जर्मनीहून अवघड दिसतंय, (का पुण्याहून?) सापडलं एक हॉटेल शेवटी. खायला काय असं विचारूच नका. चीज चीज आणि चीज. फोटो घ्यायचा पण कंटाळा आला होता आताशी. चीजमय होऊन रज्जुमार्गाच्या स्थानकावर आलो. तिकीट काढले आणि वर पोहोचलो. आत्तापर्यंत सगळीकडे रोप वे खच्चून लोक भरलेले असायचे. इथे म्हणजे होल वावर इज अवर असा प्रकार होता. फारतर दहा डोकी असतील. पहिला दिलासा इथेच मिळाला.
आल्प्स पर्वतरांगांमधील सगळ्यात मोठी अशी ही आलेच हिमनदी. तीन छोट्या हिमनद्या एकत्र येउन तयार झालेली ही हिमनदी २३ किमी लांब तर एकूण १२० स्क्वेअर किमी परिसरात पसरलेली आहे. या हिमनदीचा उगम युंगफ़्राउ पर्वत रांगांमधून होतो. आलेचफ़िर्न, आलेचहॉर्न आणि द्रायएकहॉर्न (Aletschfirn, Aletschhorn, Dreieckhorn) या तीन हिमनद्या कोनकोर्डीयाप्लात्झला (Konkordiaplatz) एकत्र येतात जिथून पुढे मुख्य आलेचचा प्रवाह सुरु होतो. इथे अंदाजे १ किमी उंचीचा असलेला बर्फाचा थर पुढे दक्षिणेकडे उतरत वितळत जाऊन नंतर १५० मीटर पर्यंत कमी होत पुढे यातूनच मासा या नदीचा उगम होतो.
वर पोचलो तर तिथल्या रेस्टॉरंटमध्येही शुकशुकाट. 'नशीब आपण खालीच खाउन घेतले ते' असे म्हणत बाहेर आलो. थोडे चालत पुढे गेलो आणि समोरच्या निसर्गाने भान हरपून गेले.
परंतु या सगळ्याला एक काळीकिनार आहे. फार पूर्वीपासूनच हवामानातील बदल आणि ग्लोबल वॉर्मिंग च्या तडाख्यात ही हिमनदी दिवसेंदिवस आटते आहे. आणि कदाचित येत्या काही वर्षात इथे हिमनदी म्हणण्यासारखे काहीच राहणार नाही अशी भीती पर्यावरण रक्षकांनी व्यक्त केलेली आहे. आम्ही तिथे असताना एका पर्यटकाशी बोलत होतो. तो झुरीचचा रहिवासी होता आणि अनेक वेळा या भागात आला होता. 'मी प्रत्येक वेळी येतो तेव्हा सहज जाणवेल एवढ्या प्रमाणात बर्फ घटलेला दिसतो' असे तो म्हणाला. ही माहिती देणारे अनेक फलक देखील लावले होते. ज्या देशात वृक्ष संवर्धन आणि एकूणच पर्यावरण मित्रत्वाची भूमिका आहे तिथे सुद्धा ही अशी परिस्थिती आहे तर मग इतर ठिकाणांबद्दल काय बोलायचे.
भूक लागली म्हणून वर एकच छोटेसे टपरीवजा हॉटेल होते. तिथे खास आल्प्स मधील गायीचे दुध आणि मध, अॅपल पाय असे काही प्रकार मिळाले.
परत जायचे म्हणजे उठणे तर आलेच. सगळे काही दोन-अडीचशे फोटोंमध्ये आणि अर्थात डोळ्यात, मनात साठवत खाली आलो आणि परतीच्या रस्त्याला लागलो.
परत येतानाचा रस्ता थोडा सस्टेन पास पार करत मग नंतर फुरका पास (Furka Pass) ने वर चढत जाऊन परत खाली उतरायचे असा ठरवला होता. फुरका हा देखील असाच एक विलोभनीय पास. या भागात धबधब्यांचे प्रमाण बरेच जास्त दिसले. प्रत्येक ठिकाणी थांबणे शक्य नव्हते. तरीही जिथे शक्य आहे तिथे कधी थांबून तर कधी गाडीतून हे साठवणे सुरु होते.
फुरका पास चढत असतानाच दुरून ऱ्होन ग्लेशियर (Rhone Glacier) दिसू लागले. तसाही ब्रेक आवश्यक होता आणि तसा अंधाराच्या आत परतायला देखील वेळ हातात होता म्हणून इथे थांबलो. ऱ्होन ग्लेशियर हे ७. किमी लांब पसरलेले आहे आणि बर्फाच्या थराची कमाल उंची ३५० मीटर पर्यंत आहे. इथून वितळणारे पाणी पुढे ऱ्होन नदीला जन्म देते. आलेच प्रमाणेच ग्लोबल वॉर्मिंग चे परिणाम इथेही दिसताहेत. आलेचच्या तुलनेत तशी लहान असलेली ही हिमनदी लवकरच नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
आत एक सुवेनिअर शॉप होते. बाकी काहीच दिसेना. पुढे जाण्यासाठी ७ फ्रँक तिकीट आहे हेही अगदी एका साध्या कागदावर लिहिले होते. जिथे शक्य आहे तिथे हे लोक पैसे काढतात म्हणत आत गेलो. 'काहीच दिसत नाहीये तिकडे तर काय करायचेय आता अजून तिकडे जाऊन' म्हणून मी पहिले नकारच दिला. खरं तर दिवस इतका छान गेला होता आणि इतकं तृप्त वाटत होतं की आता माझ्यात अजून काही बघण्याची, अनुभवण्याची, साठवण्याची कसलीच तयारी नाही असं काहीसं माझं झालं होतं. पण 'उगाच घेतील का पैसे एवढे, काहीतरी असेलच. आपण जातोय आत' असा जबरदस्त आशावाद बाळगत नवरा मात्र तिकिटे काढून तयार होता. मग काय, निघाले मीही. रस्ता असा काहीच दिसत नव्हता आणि हिमनदीवर कापड घातलेले दिसत होते. कशासाठी केले असेल याचा अंदाज येत नव्हता. इथेही ग्लोबल वॉर्मिंग मुळे होणारे परिणाम दर्शविणारे फलक होते आणि इतर ठिकाणांप्रमाणेच स्विस झेंडा फडकत होता.
'एका चौथऱ्या वरून हे बघण्यासाठी दिले का आपण पैसे?' त्यातल्या त्यात मुद्दा पटवण्याचा माझा प्रयत्न. तेवढ्यात खालून दोन लोक आम्हाला वर येताना दिसले. याचा अर्थ तिथे जाता येतं. त्या दगडांवरून वाट काढत खाली आलो. आणि आत जाऊन बघतो तर काय, त्या हिमनदीच्या आत गुहा तयार करून त्यात फिरता यावे म्हणून रस्ता होता आणि दिवे लावले होते. हे असे मानवनिर्मित प्रकार आहेत असे ऐकले आहे. पण इथे प्रत्यक्ष हिमनदीच्या आत जायचे होते. एकही माणूस दिसेना. पहिला विचार डोक्यात हाच आला की बाकी ठिकाणी पर्यावरण रक्षक असणारे हे लोक इथे कसे बरे हे चालवून घेतात. हा प्रश्न अजूनही आहेच की यात निसर्गावर उगाच आक्रमण केले जातेय तरीही हे कसे चालते? यात धोका नाही का? असो. जरी योग्य व्यवस्था असेल तरीही फार आत जायला नको, म्हणून अगदी थोड्या भागात जाऊन एक चक्कर मारली. असे काही असेल याची कल्पना नसल्याने आम्ही जॅकेट्स वगैरे न घालता आलो होतो. त्यामुळे थंडी पण वाजत होती. दुरून वेगळेच भासणारे हे बर्फाचे थर प्रत्यक्षात किती प्रचंड आहेत हे कळले.
'आलो ते चांगलेच झाले, वेगळाच अनुभव मिळाला' असे म्हणत बाहेर आलो. पुढे 'माझ्यामुळे बघायला मिळाले' हे मी किती वेळा ऐकले याची कल्पना करण्यास आपण सुज्ञ आहात.
इथून निघालो त्यानंतर ढग अगदी खालपर्यंत उतरलेले दिसत होते. अंधार असा नव्हता पण नेहमीपेक्षा लवकरच उजेड कमी झाला होता.
थोड्याच वेळात या ढगांनी आम्हाला चहुबाजूनी गुंडाळले होते. ढग इतके जवळ आले की अगदी ४-५ मीटर पलीकडचे काही दिसेना. ढगातून वाट काढत गाडी पुढे जात होती. आधीच सगळा दिवस इतका विशेष ठरला होता आणि त्यात हा शेवटचा अर्धातासाचा प्रवास कहर होता. या वेळात जे काही वाटले ते शब्दांच्या पलीकडले आहे. चारही बाजूनी ढग होतेच आणि आणि यावर कळस म्हणून या ढगांना एक छिद्र पडावं तसा सूर्य क्षणभर दर्शन द्यायला आला आणि हे काय होतंय अद्भुत असे विचार सुरु असतानाच म्हणता म्हणता सूर्य परत ढगाआड गेला देखील. विधात्याने सगळे काही खास आपल्यासाठीच घडवले की काय असे वाटत होते. निव्वळ सुरेख, सुरेख आणि सुरेख. (इथली संपूर्ण चित्रफीत हे सगळं प्रत्यक्ष बघण्याच्या नादात बरीच गंडली. शिवाय घाटाचा रस्ता आणि समोरचे काहीच दिसत नसल्याने अति सावधगिरी बाळगावी लागत होती, चित्रफितीतून एक दोन फोटो जमवण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे क्वालिटी यथातथाच आहे. फक्त जे बघितले ते थोडक्यात दिसावे इतपत जमवले आहे)
हळूहळू जसजसे खाली उतरलो तसे ढग विरळ होत गेले. घाट संपून नेहमीचा रस्ता लागला.
आपण जे काही अनुभवले ते खरे होते का म्हणून स्वतःलाच चिमटा काढावा वाटत होता. त्याच धुंदीत पुढचा अर्धा तासाचा प्रवास संपवून परत आलो. 'क्षण हा क्षण तो क्षणात गेला सखी हातचा सुटोनी' अशी अवस्था झाली होती. हॉटेलवर पोचता पोचता बराच उशीर झाला होता. विल्डर्सविल झोपायच्या तयारीत होते. अंधाऱ्या रात्री चांदोबा झाडांमागे लपंडाव खेळत होता आणि चिरकालीन स्मरणात राहतील अशा या आठवणीतच झोपेने ताबा घेतला होता. सहलीचा अंतिम टप्पा जवळ आलाय हा विचारही नकळत मनात येतच होता आणि पुढचे वेध लागले होते, ग्रींडेलवाल्ड आणि त्यानंतर परतीचे. त्याविषयी आता अंतिम भागात…
क्रमशः
इंटरलाकेन नंतरचा दिवस ना पाउस ना उन असा होता. त्यामुळे फार लांबवरचा प्रवास नको असा विचार करून पहिल्या स्थानाकडे निघालो. हे होते, ट्रुमेलबाख फॉल्स (Trummelbach Falls). लाउटरब्रुनेन व्हॅली ही एकूण ७२ धबधब्यांची व्हॅली म्हणून ओळखली जाते. याच भागातील आल्प्स मधील आयगर, युंगफ़्राउ आणि म्योंश या शिखरांमधून वाहत येणारे पाणी वेगवेगळ्या टप्प्यात, मोठमोठ्या खडकांवर आदळत आपला मार्ग काढत पुढे नदीच्या पात्रात बदलते, साधारण २०००० लिटर पाणी दर सेकंदाला खाली कोसळते त्याचे कोसळण्याचे १० टप्पे म्हणजे हे १० धबधबे. आणि हे सगळे जवळून बघता यावे म्हणून काही बोगदे, पायऱ्या, रस्ते याद्वारे १९१३ सालापासून केलेली सोय ही स्विस पर्यटनाची कृपा. हिमनदीतून तयार झालेले हे जगातील एकमेव धबधबेआहेत जे पर्यटकांसाठी खुले आहेत. आम्ही राहत असलेल्या गावातून इथे यायला केवळ अर्धा तास लागला. फार गर्दीची अशी वेळ नसल्याने मोजकेच पर्यटक दिसत होते.
काही अंतरापर्यंत जाण्यासाठी एक लिफ्ट आहे अन्यथा पायर्यांनी किंवा पादचारी रस्त्याने वर चढत जाता येतं. जाताना लिफ्टने जाऊन मग पायी खाली उतरू असे ठरवून आम्ही लिफ्ट साठी थांबलो. पाच मिनिटातच लिफ्टने पाचव्या धबधब्याजवळ उतरवले आणि पाण्याच्या कोसळण्याचा महाप्रचंड आवाज येऊ लागला. पुढे पायर्यांनी आणि अंधार्या पायवाटांवरुन चालत आधी दहाव्या टप्प्यावर गेलो आणि मग प्रत्येक ठिकाणी थांबत फोटो काढत उतरायला सुरुवात केली. पाण्याचा आवाज छोट्याच्या अरुंद जागेतून पडताना अजूनच घुमत होता आणि वर पहिले तर कपारीतून आकाश दिसत होते. रंगीबेरंगी दिव्यांच्या माध्यमातून सोडलेले प्रकाशझोत या सौंदर्यात अजूनच भर घालत होते.
तासभर इथे थांबून पुढे निघालो ते आरेनश्लुष्ट (Aareschlucht) या एका घळीच्या (गॉर्ज) भेटीला. आरं ही उपनदी एकूण २९५ किमीचा प्रवास करते. या उपनदीचा सगळा प्रवास हा स्वित्झर्लंड मधूनच होतो. पुढे ही हाय ऱ्हाईन (High Rhein) म्हणजेच ऱ्हाईन नदी आणि लेक कॉन्स्टान्सच्या परिसरात जाउन ऱ्हाईन नदीत एकरूप होते. या प्रवासात पर्वतातील मोठ्या खडकांमधून वाहत असताना १.४ किमी लांब आणि २०० मीटर रुंद अशी एक घळ तयार झालेली आहे. इथे जाण्यासाठी सुद्धा बोगदे आणि पादचारी मार्ग बांधला आहे जेथून सहजपणे ही गॉर्ज बघता येते. दुपार होऊन गेली होती त्यामुळे पहिले जेवण केले. आणि मग या गुहा, बोगदे यातल्या रस्त्याने पुढे निघालो.
एक वेगळाच अनुभव घेऊन मग जवळच असलेले राइशेनबाख फॉल्स (Reischenbach falls) कडे प्रयाण केले. शेरलॉक होम्स ने अजरामर केलेले हे ठिकाण. इथेही एक ट्रेन होती ज्याने वर जायचे होते.
विशेष अगदी खास जाऊन बघण्यासारखे असे काही हे ठिकाण वाटले नाही. तेवढे चालायचेच. दिवसभराचे कार्यक्रम संपले होते त्यामुळे हॉटेलवर परतलो.
पुढचा दिवस आलेच आणि परिसरात अविस्मरणीय ठरला आणि फिरतीचा शेवटचा दिवस उजाडला.
दुसऱ्या दिवशी परत जायचे होते. त्यामुळे एकीकडे सहल संपली अशा तर एकीकडे घरी परतायची ओढ अशा मिश्र भावना होत्या. या दिवसाचा भरगच्च असा कार्यक्रम नव्हता. त्यामुळे आरामात आवरून निघालो. पहिले स्थान होते ग्रिंडेलवाल्ड (Grindelwald). या भागातले असेच एक प्रसिद्ध गाव. निघताना पार्किंगच्या अनेक जागा बघून ठेवल्या होत्या. पण एकाही ठिकाणी जागा मिळाली नाही इतकी गर्दी होती. तीन चार वेळा प्रयत्न करूनही शेवटी ग्रुंड (Grund) हे खालच्या डोंगरावर असलेले हे गाव गाठले आणि तिथे गाडी लावली. इथून पुढे मग ट्रेनने ग्रिंडेलवाल्डला आलो. या गावात फिरताना असे दिसले की इतर ठिकाणांच्या तुलनेत खूप जास्त व्यापारीकरण झाले आहे. सगळीकडे हॉटेल्स आणि सुवेनिअर शॉप्स.
आमच्या डोक्यात असलेले ठिकाण होते बोर्ट (Bort) ज्यासाठी ग्रिंडेलवाल्डहून गोंडोला (Gondola) ने वर जायचे होते. इथूनच अजून वर गेलो असतो तर बचाल्पझे (Bachalpsee) एक पर्वतातला तलाव आहे जो खूप प्रसिद्ध आहे. मात्र त्यासाठी अजून वर जाउन नंतर दीड ते दोन तासांचा ट्रेक करावा लागतो. शिवाय उन्हाळ्याचा शेवट असल्याने तिथे पाणी कितपत असेल याचाही अंदाज नव्हता. आणि हातातला वेळ आणि आलेचच्या भेटीनंतर प्रवासाने आलेला थकवा यामुळे हा बेत आम्ही रद्द केला.
तिकीट काढून वर बोर्ट ला पोहोचलो आणि कडकडून भूक लागली होती म्हणून जवळच असलेल्या रेस्टॉरंटमध्ये जाउन पहिले एक टेबल धरले. मागच्या आठ दिवसातले सगळ्यात चविष्ट आणि उत्तम जेवण इथे मिळाले. सूर्य डोक्यावर तळपत होता. आजूबाजूची हिरवळ, गायी, घरे, फुले हे सगळे आता शेवटचा दिवस असल्याने मनभरून बघत या स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद घेतला आणि तृप्त होऊन बाहेर पडलो.
खाली उतरताना इथे खास मिळणाऱ्या स्कूटर बाइक (Trottibike) भाड्याने घेऊन उतरायचे असे आमचे ठरले होते. त्याप्रमाणे सायकली आणि हेल्मेट घेऊन निघालो.
साधारण ४० मिनिटे लागतात असे सांगितले होते पण वेळ असल्याने दिसणाऱ्या प्रत्येक दृश्याला साठवत आम्ही दीड दोन तासात खाली उतरलो. या बाइक्सवर उभे राहायचे आणि ब्रेकच्या मदतीने उतरायचा वेग नियंत्रित करायचा. हे करताना खूप मजा येत होती. परत लहान होऊन केलेला हा बाईक प्रवास तसाच आनंद देणारा होता. दूरवर दिसणारी पर्वतशिखरे, उंचच उंच झाडी, आजूबाजूची हिरवळ, त्यावर चरणाऱ्या गायी, त्यांच्या घंटांचे आवाज, टुमदार कौलारू घरं, त्यांच्या खिडक्यातून आणि अंगणात डोलणारी फुलं हे बघत बघत, प्रत्येक ठिकाणी थांबून फोटो काढत खाली उतरलो.
खाली येउन सायकल परत दिली आणि घरी परतलो. सामान भरायला सुरुवात केली. संध्याकाळी पैसे घ्यायला आजी येणार होती. त्याप्रमाणे ती आली. थोड्या गप्पा झाल्या. तुम्ही परत या, तुम्हाला आवडले का आमचे हॉटेल, आमचा देश वगैरे बोलणे झाले. पैसे दिले. आम्ही उद्या सकाळी लवकरच निघू तर किली परत घ्यायला तुम्ही याल का असे विचारले असता ती म्हणाली, "नाही मी येणार नाही. तुम्ही किल्ल्या आत ठेवा आणि दार ओढून घ्या, बास." सगळे सामान व्यवस्थित आहे ना वगैरे बघायला ती येईल असे वाटले होते. पण हा आश्चर्याचा धक्का होता. निर्भयपणे असे घर दार ठेवण्याइतकी सुरक्षितता म्हणजेच या देशातील प्रामाणिक लोक आणि देशाच्या उत्तम कायदा आणि सुव्यवस्थेची साक्ष आहे असे म्हणता येईल का?
अनेक वेळा दोन्ही बाजूनी धन्यवाद देऊन झाले आणि आजी परत गेली. आम्ही या गावाचे एक शेवटचे दर्शन घ्यायला म्हणून बाहेर पडणार तर आजी परत आली. हातात एक मोट्ठे चॉकलेट होते आणि "थांबा थांबा, मी हे आणलेय" तुमच्यासाठी म्हणत तिने ते आमच्या हातात दिले आणि प्रेमाने मिठी मारली. "मला तुम्ही खूप आवडलात म्हणून हे माझ्याकडून. मला माझ्या मुलीच्या घरात सगळे शोधल्यावर हेच मिळाले, प्रवासात खा आणि आमची आठवण ठेवा. परत याल तेव्हा आमच्याकडेच या" हे सगळे बोलताना तिला अगदी भरून आलं होतं. एखाद्या अविस्मरणीय सहलीचा शेवट इतक्या हृद्य घटनेने होतो तेव्हा अजुन् वेगळे असे काय हवे. :) भारावलेल्या अवस्थेतच सगळे गाव परत एकदा नजरेत साठवले आणि झोपी गेलो.
सकाळी लवकरच सगळे आवरून सामान गाडीत भरले आणि निघालो. येताना परतीच्या रस्त्यावरच होते म्हणून एका गावात थांबून थुन लेक वर चक्कर मारली.
इथे अधिकृत पणे स्विस सहल संपली होती. 'बिस बाल्ड' म्हणजेच 'पुन्हा लवकरच भेटूया' असा संदेश देणाऱ्या पाट्या वाचताना त्याला अनुमोदन देत परतीच्या रस्त्याला लागलो. गाडी पुन्हा जर्मनीत प्रवेश करून घराच्या रस्त्याला लागली. सहलीचा प्रत्येक क्षण परत परत आठवत घरी पोहोचलो तेव्हा अतीव समाधान होते. दीड महिन्याचे नियोजन सर्थाकी लागले होते. ऑस्ट्रीया आणि इटलीतुन सुरु होत पुढे स्वित्झर्लंड मधील सात दिवस आल्प्स सतत सोबतीला होता. आठ-नऊ दिवस हे आल्प्समधील डोंगर, नद्या, झरे, फुलं, घाट, तलाव, चीज या सगळ्यानी व्यापून टाकले होते. अजून कितीतरी ठिकाणं बघायची राहिली होती. पण जे पाहिले तो अनुभव अद्वितीय होता. काही ठिकाणांचे नेहमीप्रमांचे थोडे अंदाज चुकले तर काही अजूनही परत जाऊयात म्हणून नवीन यादीत टाकले.
युरोपातील हा देश पर्यटनासाठी इतरांच्या तुलनेत एवढा प्रसिद्ध कसा, जर्मनीच्या शेजारीच असलेल्या या देशात नेमके वेगळे काय असेल, स्विसमध्ये एकदा जायलाच हवे असे वाटण्यासारखे इथे नेमके काय आहे, असे अनेक प्रश्न जाताना मनात होते. या आठ दिवसात काय दिसले? या देशाला अप्रतिम निसर्ग सौंदर्य लाभले आहेच. पण ते जगासमोर आणण्यासाठी त्यानी पर्यटनावर घेतलेली मेहनत ही तेवढीच महत्वाची आहे. आणि या सगळ्याला उत्तम आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड. प्रत्येक गावात असलेले पर्यटक मदत केंद्र, डोंगरातून वाट काढत वर शिखरापर्यंत जाणाऱ्या ट्रेन्स, हिरवळ, उभारलेले रोप वे, इंग्रजीतून उपलब्ध असलेली मदत, हिवाळी खेळांच्या दृष्टीने पोषक वातावरण, हे सगळेच कौतुकास्पद आहे. महायुद्धाच्या काळात आसपासच्या इतर देशांपासून हा देश नेहमीच अलिप्त राहिला हा देखील यांना मिळालेला एक प्रमुख फायदा आहे. उपलब्ध साधन संपत्तेचा केलेला उत्तम उपयोग ठिकठीकाणी दिसून येतो. निसर्गाच्या सान्निध्यात रमणारे हे लोक त्यांच्या देशावर असलेले प्रेम तप्रत्येक ठिकाणी रोवलेल्या झेंड्यानी दाखवून देतातच पण त्यांच्या वागणुकीतून त्याची जाणीव जास्त दिसून येते. आम्ही जाण्यापूर्वी आमचा एक सहकर्मचारी म्हणाला होता, "They hate foreigners, but they love tourists". स्विस लोकांकडून जेवढे चांगले अनुभव देखील ऐकले होते तसेच काही रेसिझमचेही ऐकले होते. पण आमचा अनुभव मात्र खूपच चांगला होता. ज्यांच्या घरी राहिलो त्या आजीच्या बाबतीत तर नाहीच, पण इतर ठिकाणीही लोक हसून, आनंदाने मदत करताना दिसले. एकूण स्वित्झर्लंडमधील वास्तव्य प्रचंड आनंददायी होते. पुन्हा पुन्हा जावेसे वाटेल असा हा देश आहे. जगातील अनेक चित्रपटांमध्ये चित्रीकरणासाठी अव्वल, अनेक पुस्तकातून आलेले वर्णन, अगदी पूर्वीपासून अनेक जगप्रसिद्ध लोकांच्या वास्तव्याने मिळालेली प्रसिद्धी ते आताही कितीतरी सेलिब्रेटी लोकांनी राहण्यासाठी निवडलेले ठिकाण, अनेक लोकांचे पैसे जिथे जगापासून लपवून ठेवले गेले आहेत, स्वच्छतेसाठी असलेली वेगळी ओळख, चीज आणि आल्प्स मधील पर्वतशिखरे, हिरवळ आणि तळी, नद्या आणि झरे, घाट, रस्ते आणि बोगदे अशाच कित्येक रुपातला हा देश आणि या देशाच्या सौंदर्याचे बलस्थान असलेला आल्प्स हा प्रत्येक पर्यटकाला भुरळ घालतो आणि परत परत यावेसे वाटेल असा अनुभव देऊन जातो. :)
अनेक फोटोंमधुन आणि आता या लेखमालेमधून परत परत हे सगळे क्षण काही प्रमाणात अनुभवता यावेत म्हणून केलेला हा एक प्रयत्न होता. आल्प्सच्या वळणांवरची ही लेखमाला तुम्हाला कशी वाटली हे अवश्य सांगा.
समाप्त.
तळटीप:
१. तुम्ही सर्वांनी प्रत्येक भागावर प्रतिसाद देऊन प्रोत्साहित केले त्याबद्दल सगळ्यांचे मनःपूर्वक आभार. माझ्या लिखाणात आणि छायाचित्रणात नक्कीच त्रुटी आहेत याची जाणीव आहे. तुमच्या सूचनांचे स्वागत आहे.
२. संपूर्ण लेखमालेतील काही फोटो मी तर काही नवऱ्याने काढलेत. त्यामुळे फोटो सौजन्य - नवरा आणि अस्मादिक :)
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
प्राजक्ती आणि अजूनही मैत्रिणींना युरोप, स्विस ट्रिप साठी काही प्रश्न होते त्या अनुषंगाने अजून काही माहिती इथे देते आहे - स्विस किंवा इटली, स्विस, ऑस्ट्रिया या मध्य युरोपातल्या ट्रिप्स बद्दल लिहायचं झालं तर आम्ही जर्मनीत राहात असल्याने सगळं तसं जवळ म्हणजे ४-६ तासांच्या अंतरावर आणि शिवाय त्यामुळेच प्रत्येक ट्रिप मध्ये निवांत एका जागी राहून कधी पायी, कधी कारने बर्याच आडवाटेच्या जागा शोधत असं फिरलो/तो.
पण युरोपात, त्यातही स्विस मध्ये पब्लिक ट्रान्स्पोर्ट उत्तम आहे. सगळी माहिती इंग्रजीमधून उपलब्ध आहे. इंटरलाकेन सारख्या मोठ्या रेल्वे स्टेशनवर तर ठिकठिकाणी त्यांचे मदतनीस उभे असतात. स्विस पास किंवा असाच कुठला पास असेल तर हवामानाचे अंदाज घेऊन रोज ठरवता येतं. शिवाय मध्ये कुठेही वाटलं तर थांबून पुढच्या ट्रेनने यायचं हे पर्यायही असतात. पण याबाबतीत माझी माहिती फर्स्ट हँड अनुभव नाही. खाली मुख्य काही वेबसाईट्सही देते आहे. त्यावर रेल्वेचे पासेस, ट्रेनची माहिती हे सगळं मिळेल. आता तर मोबाइलवर बरीच अॅप्सही आहेत त्यामुळे अगदी नवख्या माणसालाही बहुधा काही अडचण येत नाही.
दुरून येणार असाल तर बहुतेक वेळा मुख्य ठिकाणं बघण्यावर भर असतो, आणि ते स्वाभाविकही आहे. शिवाय प्रत्येकाची आवड, हातात असणारा वेळ, बजेट, आधी काय पाहिलंय, गाडी की पब्लिक ट्रान्सपोर्ट यावरही बर्याच गोष्टी अवलंबून आहेत.
युरोपात वेदर कधीही दगा देऊ शकतं. त्यामुळे रोज ते बघून ठरवणे हे जेव्हा शक्य आहे तेव्हा आम्ही करतो. पण त्यातही अगदी उत्तम हवामानाचे आणि एखादा दिवस काहीही नीट बघू शकलो नाही असे सगळे अनुभव आहेत. आणि बर्याच गोष्टी सापेक्ष असू शकतात. याविषयीचा एक किस्सा - आम्ही Chamonix ला गेलो होतो तेव्हाच आमचा एक मित्र आणि त्याचे आई बाबा केसरी सोबत युरोप ट्रिपला आले होते आणि आम्ही थोडा वेळ भेटलो. मित्र अमेरिकेत असतो आणि त्यानेही भरपूर स्नो बघितला होता, आम्हीही बघतोच इथे हिवाळ्यात. आणि तरीही ऐन मे महिन्यात तिथे स्नो पडत होता. आम्ही चौघं कुठे पुन्हा बर्फात जायचं म्हणून आत थांबलो होतो, आणि त्यांच्यासोबत आलेले बाकीचे सगळे जण त्या बर्फात जाऊन आनंदाने नाचत होते, त्यांच्याकडे बघूनच खूप छान वाटत होतं. :ड
खाण्यापिण्याबाबत रोज बाहेरचे खाणे आम्हाला त्रासदायक होते आणि ते बरंच महागही होतं, म्हणून जास्त दिवसांची ट्रिप असेल तर आम्ही सोबत नेतो. जवळच्या सुपरमार्केट काहीतरी आणुन मग सकाळी भरपेट नाश्ता करून बाहेर पडायचं, लंच बाहेर आणि डिनर घरी असं सहसा करतो.
ही लेखमालिका मुख्य स्विस बद्दल आहे म्हणून यात बाकी काही लिहीलं नाही. मी फक्तच स्विसबद्दल बोलते असं नका वाटून घेऊ, मला इतरही अनेक ठिकाणं खूप आवडली आहेत :winking:
माधुरीने itinerary विचारली होती. त्याबद्दलही इथे लिहून ठेवते म्हणजे एकाच ठिकाणी राहील.
या लेखमालिकेत बहुतेक ठिकाणी गावांची नावं इंग्रजीतून पण दिली आहेत. तर या आणि अजून एका ट्रिपची itinerary थोडक्यात लिहिते -
Interlaken, Lauterbrunnen, Berner Alps हे महत्वाचे रिजन्स. यात
सुरुवातीला आम्ही जरा वळसा घालून इटलीतून स्विस ला गेलो, ते पहिल्या भागात लिहिलंय त्याप्रमाणे खास स्टेलव्हीओ पास साठी. पुढचे दिवस इंटरलाकेन बेस धरून रोज हवामान बघून ठरवलं.
स्वित्झर्लंड ला पोचल्यावर पुढे -
दिवस १ - Birg, shilthorn ही शिखरं, ही jungfrau ची समोरची बाजू, जाताना रोप वे आणि येताना Gimmelwald, Mürren गावातून खाली पायी आलो, निवांत ते गाव बघता आलं
दिवस 4 - Kleine Scheidegg म्हणजेच Jungfrau च्या ट्रेन जिथून सुटतात, तिथून आम्ही ट्रेल केला, आम्ही Jungfrau ला गेलो नाही कारण त्या पद्धतीच्या ट्रेन मध्ये आधी जर्मनीत गेलो होतो, त्याऐवजी पुन्हा रोप वे ने जाऊन पायी खाली उतरलो. इथे महत्वाचं म्हणजे, Jungfrau या शिखरापर्यंत एक ट्रेन जाते, ही इतकी उंचावरची बोगद्यातून थेट शिखरापर्यंत चढत जाणारी म्हणून फेमस आहे. आणि मग वर गेल्यावर बर्फात खेळणे वगैरे आहेच.
दिवस 5 - फुरका पास आणि आलेच ग्लेशियर, हे एक फार माहीत नसलेलं पण अतिशय सुंदर ठिकाण आहे. Fietsch, Aletsch Glacier, Furka Pass, Sustain Pass
दिवस 6 - Interlaken आणि brienz lake
दिवस 7 - Trummelbach falls, aare gorge Aarenschlucht आणि Grindelwald.
दुसर्या एका सहलीबद्दल -
राहिलो होतो Chamonix ला, हे फ्रान्स मध्ये आहे पण स्विस च्या जवळ. यात आवडलेली स्थळं -
Gruyere cheese factory
Yvoire - हे फ्रान्स मधलं एक अति गोड गाव आहे. Geneva lake च्या काठावर.
Vevey - हेही Geneva lake वर वसलेलं. इथे चार्ली चाप्लीन राहिलाय बरीच वर्षं. आणि एवढ्यातच त्याबद्दल बरंच मोठं म्युझियम चालू झालंय असं ऐकलं, पण ते पाहिलेलं नाही. हा सगळा भाग swiss-riviera म्हणून ओळखला जातो.
https://www.afar.com/travel-tips/swiss-riviera
याशिवायही बरंच काही आहे. Zurich, Geneva, Mt. Titlis, Zermatt, Matterhorn वगैरे आम्ही बघितले नसल्याने माहिती नाही.
काही उपयुक्त साईट्स -
https://www.swissrailways.com/
https://www.sbb.ch/en/home.html
https://www.myswitzerland.com/en/home.html
https://www.jungfrau.ch/en-gb/jungfraujoch-top-of-europe/ - इथे कसं पोचायचं याची माहिती सविस्तर आहे म्हणून हे एक उदा. अशीच इतर ठिकाणांच्या स्वतंत्र वेब्साईट्सवर पण मिळेल.
एन्जॉय युरोप. :)