आपल्याला काय आवडतं, खूप आवडतं हे उशीराने लक्षात आलं तर वाईट वाटतंच, मलाही वाटलं पण उशीराने का होईना, लक्षात तरी आलं आणि ते झेपतंय हा अजून एक प्लस पॉइंट.
सहज मजा म्हणून एका मिटींगला गेलो, त्यात ओढले गेलो आणि अनपेक्षितपणे ट्रेकींग आवडतं हे कळलं.
स्टोक कांगरी हे शिखर लेह मध्ये आहे. ६,१५३ मिटर्स किंवा २०,१०० फूट ऊंचीवर.
आम्ही हे एक्स्पिडीशन केलं आणि त्याला थोडं अजून कठीण करावं म्हणून ठाण्याहून लेहला आणि परत असे कारने गेलो.
ह्यात कसे पडलो, काय तयारी केली आणि बाकी ह्याची ही कथा.
डिस्क्लेमर : भरपुर ईंग्लिश शब्द वापरले आहेत.
४/५ वर्षांपूर्वी मला जर कोणी सागीतलं असतं की मी असं काही करणारं आहे, तर मी लिटरली वेड्यात काढलं असत,.असो.
गेल्या वर्षी जुन महीन्यात आम्ही वीणा वर्ल्ड बरोबर लेह ची ट्रिप केली. त्याच वेळी, एकदा तरी इकडे कार घेऊन यायचचं, असं नवर्यानी ठरवलं ( तो ड्रायव्हींग क्रेझी आहे !). आम्ही परत आलो आणि आमच्या जे एन एम अॅयडव्हेंचर्स ( मी जे एन एम रनर्स ची मेंबर आहे ) ची एक टिम स्टोक कांगरी ला जाउन आली. मी फक्त फेसबुक वर फोटो लाईक करणे एवढच केलं. स्टोक काय आहे हे माहित करुन घेण्याचा प्रयत्नही केला नाही. (स्टोक कांगरी हे भारतातलं सगळ्यात ऊंच ट्रेकेबल समीट आहे. ऊंची २०५०० फिट.) आल्यावर त्यांनी एक प्रेझेंटेशन ठेवलं ( जे झाल्यावर मला कळलं ). त्यांच्या पुढच्या ट्रेक ची तयारी सुरु झाली होती. चंदीगढ पर्यंत फ्लाईट, तिथुन पुढे बाईक, मग ट्रेक आणि लेह हून फ्लाईट नी परत.. असा प्लॅन होता. मी सहज नवर्याला सांगीतलं तर तो जाम खूष झाला. 'आपण पण जाऊ, पण कार घेऊन..', त्याला रोड ट्रिप करायाची होती, ट्रेक बाय प्रॉडक्ट. आणि आम्ही ग्रुप मध्ये सामील झालो. पुढच्याच मिटींग मध्ये, तारखा, ट्रेक ची रुपरेखा, बाईकर्स च्या मोघम जोड्या, येऊ शकणारे साधारण प्रॉब्लेम्स, फिटनेस वगैरे चर्चा झाली.. हेवी वेट वाल्यांना वजन कमी करण्याची समज दिली गेली आणि आम्ही तयारीला लागलो.. म्हणजे डे ड्रिमींग ला.
एकीकडे रोड ट्रीप चा प्लॅन फायनल करत होतो. लेह ला जनरली व्हाया कारगील श्रीनगर जातात कारण अॅील्टीट्युड हळू हळू वाढते. व्हाया मनाली झटकन उंची गाठली जाते सो तो रस्ता एवढा पॉप्युलर नाहीये. महेशनी पूर्ण प्लॅन बनवला. आमच्या रनिंग ग्रुप मधल्या योगीनीचा नवर उमेश ह्याच्या कडून एच व्ही कुमार ह्यांच्या बद्दल कळलं. ते रोड ट्रिप प्लॅन करुन देतात. ऑन रोड असिस्टंन्स, बुकींग्ज वगैरे. त्यांच्या कडे रजिस्टर केलं.
आमचा रुट आणि प्लॅन असा होता :
४ जुन : ठाणे - चितोड्गढ ( पुढे आम्ही ३ ला दुपारी निघुन नाशिकला बहिणीकडे मुक्काम केला. ४ ला पहाटे लवकर निघालो. त्यामुळे पुढे जास्त अंतर कापता आले.) -
४ जुन- नाशिक- जयपुर अंतर १०१४ किमी
५ जुन - जयपुर -चंदिगढ अंतर ५४७ किमी
६ जुन- आराम ( माझा वाढदिवस होता ) आणि ग्रुप ला भेटणे
७ जुन - चंदिगढ - मनाली अंतर ३१५ किमी
८ जुन- मनाली - जिस्पा अंतर १४० किमी ( इथुन पासेस सुरु होतात )
९ जुन- जिस्पा - सरचु अंतर ८५ किमी ( बर्या पैकी अॅरल्टीट्युन गेन )
१० जुन - सरचु - लेह अंतर २५० किमी.
११ जुन - आराम
१२ जुन ते १७ जुन ट्रेक
१८ जुन आराम, काही लोक परत
१९ ला बाकी लोक परत आणि आमचा परतीचा प्रवास.
ईकडे नवर्याने रोड ट्रिप दरम्यान येऊ शकणार्या अडचणींबद्दल वाचन सुरु केलं. मुख्य प्रॉब्लेम मनाली ते लेह रस्त्यावर येऊ शकला असता., कारण तिथे मदत मिळण कठीण झालं असतं. गरज पडू शकणार्या वस्तूंच्या याद्या करायला सुरुवात केली, आणि फिटनेस वाढवायला पण. मी नियमीत रनिंग, व्यायाम करत होतेच, पण माझ्यापेक्षा नियमीत व्यायाम महेश करतो. त्यामुळे आम्ही फिटनेस फ्रंट वर निर्धास्त होतो. टिकु जी नी वाडीच्या ( ठाण्यातल वॉटर पार्क ) मागे असणार्या नॅशनल पार्क च्या टेकडीवर शनिवारी जायला सुरुवात केली.
नोव्हेंबर मध्ये जिवधन चा ट्रेक केला. ट्रेक सोपा होता, पण एका ठिकाणी १०/१२ फुट उंच सरळ कड्यासारखा भाग चढुन जायचा होता, तिथे चढतांना आणि उतरतांना मी घाबरुन हात पाय गाळले आणि 'भिती' ह्या फ्रंट वर काम करायला हवं हे जाणवलं ( मी तशी धीट आहे :heehee:... खरचं.. मी एकदा एका गाडीवर दगड पण फेकून मारलाय... पण पाय जमिनीवर टेकलेले नाहीत ह्या अवस्थेची मला फार फार भिती वाटते )..
(चेक चा शर्ट घालून वर चढायचा अयशस्वी प्रयत्न करणारी मी आहे !!!)
ह्या ट्रेक नंतर पहिली खरेदी झाली.. ट्रेकिंग चे शुज.... हे घालून दगड धोंड्यांवरुन चालणं हाच एक व्यायाम आहे., आणि शु लेसेस बांधणं हे दिव्य ! सुरुवातीला चालतांना , आपण रोबो आहोत असच वाटायचं, सरळ उचलून पाय टाकायचा. मग सवयीने जमलं.
आता डेकेथलॉन च्या फेर्या सुरु झाल्या. ट्रेक ला आम्हाला डाऊन जॅकेट ( बाहेरुन विंडचीटर, आतुन थोडं उबदार ), फ्लीज जॅकेट ( स्वेटर सारखं, पण जास्त ऊबदार), थर्मल वेअर ( माझ्या कडे एक थर्मल टॉप आणि लेगींग होतेच, एक अजुन घेतले ), ड्रायफीट शर्ट्स, ट्रेकींग पँट्स, थर्मल आणि लोकरी ग्लोव्ज , कान झाकणार्या टोप्या, थर्मल सॉक्स ( आम्ही सॉक्स च्या ५,५ पेअर्स घेतल्या ), २/२ पोलस्टीक्स ( २ आम्हाला मित्रांकडून मिळाल्या ), ट्रेकींग बॅग्ज (ह्या पण मित्रांकडे मिळाल्या ), स्लीपींग बॅग्ज, चालतांना लागणारे सामान ठेवायला छोट्या सॅक्स ( ह्या जे एन एम नी दिल्या ), ट्रेक दरम्यान स्नॅक्स, पाण्याच्या बाटल्या ( आम्ही ३ लीटर चे वॉटर ब्लॅडर (!!!) घेतले.) हे पातळ असतात. त्यांना नळी असते. पाण्याने भरुन ब्लॅडर बॅग मध्ये ठेवायची, ती ट्युब बाहेर काढायची म्हणजे चालतांना न थांबता पाणी पिता येते. ) अॅतन्टी ग्लेअर गॉगल्स, हेड लँप्स, बॅटर्या एवढे सामान लागणार होते.
आम्ही स्लीपींग बॅग्ज, ट्रेकींग पॅंट्स, उन्हाच्या कॅप्स, वॉटर ब्लॅडर आधी घेतले.
डिसेंबर मध्ये घनचक्कर, पाबळगड केला. घनचक्कर महाराष्ट्रातल तिसर्या क्रमांकाच शिखर आहे. हा सोपा होता करायला. पण पाबळगड.... आम्ही सगळे हातीपायी धड परत आलो एवढच सांगीन.
(सगळ्यात पुढे आहे श्रीरंग., त्याच्या मागे महेश.)
पुढे मार्च मध्ये हरीश्चंद्र गड केला पण लेकाच्या परिक्षेमुळे मी गेले नाही. दरम्यान टिकु जी चा प्रॅक्टीस ट्रेक, रनिंग व्यवस्थित सुरु होतं
जानेवारी मध्ये मुंबई मॅरेथॉन झाली, आणि मला मोठ्ठा झटका बसला. उजव्या पायात शीन जवळ अचानक दुखायला लागलं. मी १/२ आठवडे दुर्लक्ष केलं मग ऑर्थो गाठला. ब्ल्ड टेस्ट मध्ये व्हिटॅ बी आणि डी एकदम खाली गेल्याचं कळलं. डॉ ने एक महीनाभर व्यायाम, रनिंग सगळं बंद ठेवायला सांगीतलं :confused: मी वैतागले अर्थात. बी आणि डी वाढवायला गोळ्या सुरु झाल्या. महीना झाला तरी दुखणं कमी होईना. अध्ये मध्ये पायावर सुज येऊ लागली, मग एम आर आय केलं आणि पर्फोरेटेड व्हेन्स असं भारदास्त नाव असलेलं काहीतरी निघालं. ह्यावर स्टॉकींग्ज घालणे हा एवढा एकच उपाय आहे..मग त्याची खरेदी. आणि मी हे स्टॉकींग्ज जास्तीत जास्त ५ वेळा घातले.. सुज आपोआप थांबली.. आता ते तसेच पडून आहेत. डाव्या पायाचा तर पॅक बंद्च आहे. मार्च मध्ये कधीतरी एकदा पूर्वी घेतलेल्या कुपन वर जवळच्याच एका पंचकर्म केंद्रात बॉडी मसाज घेतला. २ केरळी मुली होत्या करायला. त्यांना 'माझा पाय अमुक अमुक ठिकाणी दुखतोय, तर जरा जपून' अस मोठ्या मुश्कीलीनी समजावलं.. आणि त्या मुलीनी काय केल देवाला माहीत पण त्या दिवसानंतर माझा पाय जादू केल्या सारखा दुखायचा कमी झाला. औषधं, आराम का हा मसाज की सगळच... पण मी दुखण्यातून मुक्त झाले ... :ty:
एव्हाना एप्रिल संपत आला होता. मध्ये एकदा येऊर हिलच्या मागे 'मामा भांजे' हा ५ तासांचा ट्रेक केला.
एप्रिल च्या शेवटी लेकाला भोसला ला घ्यायला जातांना एकटीच गाडी घेऊन नाशिकला गेले.. ड्रायव्हिंग प्रॅक्टीस.
आता फक्त मे... खरेदी, पॅकींग, प्रॅक्टीस......
टिकु जी ट्रेक ला वर टायगर हील ला जाण्यासाठी अजुन एक रस्ता होता, 'डिफीकल्ट रुट' असा त्याचा तिथे नियमीत जाणारे उल्लेख करायचे. हा रस्ता लांबचा आणि सरळ उभ्या चढाचा एक पॅच असलेला आहे. तिथे आता प्रॅक्टीस सुरु केली. शनिवार्/रविवार एकदा बॅक टु बॅक ३ राऊंड्स मारायचो. १० किमी आणि १४५ मजले एवढं चढणं व्हायचं. बर्याच वेळा पाठीवर पाण्याच्या बाटल्या आणि इतर गोष्टी घेऊन वजन घेऊन चढायची सवय केली. तिसर्या राऊंडच्या अखेरीस अशी अवस्था व्हायची..
एकीकडे ट्रेकींग ग्रुप मध्ये लोक अॅाड डिलीट होत होते.. करता करता १७ जण झाले. मागच्या वर्षीच्या ग्रुप मधले पण ट्रेक पूर्ण न करु शकलेले उर्वशी, अमीत पण जॉईन झाले. पण ह्या १७ पैकी महेश, मी आणि श्रीरंग हेच नियमीत पणे ट्रेक ची प्रॅक्टीस करत होते. बाकी सुनील, संतोष, नचिकेत, ईश्वर, मीनल, उर्वशी, राम अधुन मधुन... बाकीचे तर कधीच नाही... अर्थात सगळे आपापल्या परीने व्यायाम करत होतेच....
(मी, महेश आणि श्रीरंग)
दरम्यान आमच्या घरा जवळच्या ट्रेक मेट मधुन मला डाऊन जॅकेट, ग्लोव्ज, कॅप वॉकींग स्टीक घेतल्या.
गाडी साठी पंक्चर कीट, जंप स्टार्ट केबल, टोईंग रोप, व्हॅक्युम क्लीनर, एअर पंप घेतले. निघायच्या आधीच्या रविवारी महेश नी संपूर्ण रविवार नवनित मोटर्स च्या सर्व्हिस स्टेशन मध्ये घालवून गाडीत कुलंट टॉप अप, ब्रेक ऑईल, एअर फिल्टर घेऊन ठेवलं.. गाडीची संपूर्ण सर्व्हिसिंग तिथे ऊभं राहून करुन घेतली.
रोड सेफ्टी साठी मी पेपर स्प्रे मागवला. शिवाय घरातला मीट नाईफ ठेवला.
आता मुख्य गोष्ट.. खाण्याचे पदार्थ. ५ दिवसांचा वॉक आणि एक दिवस समीटचा असं ६ दिवसांसाठी पॅकेट्स करुन घ्यायची असं ठरवलं ( म्हणजे मीच ठरवलं... ) तर रोज अंदाजे ४ तासाच्या वॉक ला २ आणि समीटच्या दिवशी रादर रात्री साठी १० अशी प्रत्येकी २० पॅकेट्स. प्रत्येक पॅकेट मध्ये - १) बदाम अक्रोड ची एक छोटी पिशवी २) खजुर, जर्दाळू,अंजीर ह्यांची एक ३) बेसन लाडू (मी करणार होते) ४) कणीक लाडू (ऑर्डर देऊन) ५) गुळपापडीच्या वड्या (साबा) ६) चॉकलेट्स (मित्राची बायको) ७) एक चीज क्यूब ८) एक एनर्जी बार ९) आणि ड्राईड फ्रुट्स १०) स्नीकर बार हे असणार होतं
ह्या सगळ्यासाठी अजुन एक लिस्ट केली.
मे च्या दुसर्या आठवड्यात मित्राबरोबर क्रॉफर्ड मार्केट ला गेले. ड्राय फ्रुट्स, ड्राईड फ्रुट्स ( ह्यात अननस, स्ट्रॉबेरी, चेरी, संत्र, पीच असे तुकडे वाळवलेले आणि पाकवलेले असतात.. संत्र तर यम्मी लागतं), वेट टिश्यु पेपर्स ( टॉयलेट्स असणार होती पण पाणी नाही... ), सन्स्क्रीन आणि मॉईश्चराईजर चे बाटले अस बरच सामान घेतलं.
ड्रायफ्रुट्स वगैरे पॅकींग लेकानी केलं आणि उरलेलं मी.. मला अजुन आठवतय, निघायच्या आदल्या दिवशी रात्री मी शेवटचं पॅकींग करत होते. एक एक खजुर, गुळपापडीची वडी, लाडू फॉईल मध्ये रॅप केलं.. ते तयार पॅकेट्स बघुन मलाच इतकं छान वाटलं
शेवटचा आठवडा.... बर्याच फ्रंट वर काम करायच होतं.. आम्ही नसतांना साबा साबु रहायला येणार होते लेका बरोबर. माझ्याकडे संध्याकाळच्या स्वयंपाकाला मावशी आहेत, सो तो प्रॉब्लेम नव्ह्ता. सकाळी भांडी घासायला येणार्या ताई काही ठिकाणी पोळ्यांचे काम करतात , त्यांना पोळ्यांचे सांगीतले. महीनाभर पुरुन उरेल एवढा किराणा भरुन ठेवलासंध्याकाळी खायला चिवडा, शेव असे प्रकार आणुन ठेवले. आम्ही नसतांना कोणाला काही प्रॉब्लेम नको..
लेकाची शाळा जुनच्या मध्यावर सुरु होणार होती. त्याचं दप्तर, युनिफॉर्म, शुज, वह्या, इतर सामान, शाळेची फी... आठवुन आठवुन आणलं. आम्ही नसतांना Sanskrit ची ट्युशन सुरु होणार होती. त्याला रिमाईंड करायला मैत्रीणीला सांगीतलं. त्याच्या डब्याच मोघम शॅड्युल पण साबांना सांगून ठेवलं
मोबाईल, क्रेडीट कार्ड्स, लाईट, गॅस, सगळी बिल्स आधीच अंदाजे भरुन टाकली... २/३ चेक्स सह्या करुन साबुंना देऊन ठेवले. अजुन एक काम केलं ( जे महेश च्या मते वाढीव काम होते ). दोघांचे शुज, वॉकींग पोल्स (स्टीक्स), वॉटर ब्लॅडर, गॉगल्स, हॅड लॅम्प्स ह्या सगळ्यांवर नावांची इनिशिअल्स घातली.
आता बॅग पॅकींग. ह्यात आमची बरेच वेळा संयत चर्चा झाली.... अनेक पर्म्युटेशन्स, कॉम्बीनेशन्स... बेसीकली आम्ही ठरवल की एकूण ६ बॅग्ज असतील. प्रत्येकी २ ट्रेकींग च्या, ज्या पोर्टर कडे जातील, २ स्वतः कॅरी करायच्या, एक प्रवासी कपडे आणि सामान (रोड ट्रीप साठी )आणि एक प्रवासात लागणारा खाऊ ची सॅक.
आता ट्रेकींग च्या २ बॅग्ज दोघांच्या स्वतंत्र ठेवायच्या की एकात स्लीपींग बॅग्ज आणि खाऊ ठेऊन दुसर्यात कपडे अस बरच ट्रायल घेऊन माझी बॅग आणि तुझी बॅग वेगळीच ठेऊया असं ठरलं.
आम्हाला समीटच्या दिवशी कपड्यांच लेयरींग करायचं होतं. सगळ्यात आत थर्मल., वर ड्राय फीट, वर साधा टी शर्ट, त्यावर फ्लीज, सगळ्यात वर डाऊन.. आणि गरज पडली तर पॉंचो (रेनकोट)... शिवाय २ टोप्या, २ हॅड ग्लोव्ज, ३ सॉक्स एवढा ऐवज चढवुन चालायला लागणार होतं. ईतर दिवशी गरजे प्रमाणे. सो हे सगळे प्रकार नीट पिशव्यांमध्ये सेग्रीगेट करुन ठेवले. खाऊ पण दोघांचा वेगवेगळा ठेवला.
आता महत्त्वाचं.. औषधे. त्याचेही २ पॅक केले.. सॅरीडॉन, पॅरासिटेमॉल, क्रोसीन, पुदीन हरा, बी क्वीनॉल, ईज्गॅपॅरीन, कापूर आणि अती महत्तवाची डायमॉक्स.... कानात घालायला कापूस पण प्रत्येकी २० तुकडे असा नीट कापून घेतला.
कॉमन पॅक मध्ये वोलीनी, सेप्टीलीन, मेडीकेटेड टेप, खोकल्यावरच औषध, कात्री, विरळ हवेत घ्यायच्या होमिओपॅथीक गोळ्य आणि थकव्यावरचं एक होमीओपॅथी च औषध.. हे घेतलं.
माझ्या पुढे १ मोठा प्रश्न होता.. पिरीएड्स.. नेमका ट्रेक सुरु करायच्या दिवशीची तारीख होती. १२ जुन. मी ९ पर्यंत वाट पहायचं ठरवलं. मग गोळ्या.. शिवाय नेट वरुन पी बडीज मागवलं.. ते ही अजुन तसचं पडून आहे. वापरायची गरज पडली नाही.
आणि आमचं पॅकींग झालं.... रेडी टु गो नाऊ.
ह्या ट्रेक मध्ये माझ्या दॄष्टीने एकच काळजीची बाब होती, ए एम एस ( अॅ ल्टीट्युड माउंटर सिकनेस)... त्याच्या बद्दल आणि आमचे ट्रेकींग बडीज, प्रवास ह्यांबद्दल पुढच्या भागात....
दुसरा भाग लिहायला वेळ घेतला खूप.. आणि भरपूर मोठा झालाय. काय ठेवावं आणि काय काढावं ह्याचा गोंधळ होऊ लागला मग आहे तसचं ठेवलं
तर आता प्रवास. ठाणे ते लेह. आम्ही बाय रोड जाणार होतो म्हणून २ दिवस आधी निघालो. आता आमच्या ग्रुप मध्ये प्रवासाची बरीच कॉम्बीनेशन्स होती. आम्ही पूर्ण बाय रोड. एक मोठा ग्रुप बाय एअर चंडीगढ , तिथुन पुढे बाईक्स. मात्र परततांना लेह हूनच बाय एअर. ह्या ग्रुपमधल्या दोघी जणी लेह ला पोहोचल्यावर पँगाँग लेक बघुन परत जाणार होत्या. आणि ५ जण डायरेक्ट लेह्ला येणार होते. थोडक्यात परत येतांना सगळे फ्लाईटनी पण आम्ही अर्थात बाय रोड.
लेह पर्यंत चा प्रवास ६ दिवसांचा होता. ( जो आम्ही येतांना ४ दिवसातच केला ).
ट्रेक आधीच्या मिटींग्ज मध्ये आमच्या असं लक्षात आलं की लोक आमच्या गाडीवर अवलंबून आहेत. बाईकर्स साठी सपोर्ट व्हेईकल असणारच होती पण , ' बाईक पर नही जमा तो तुम्हारी गाडी मे आ जाएंगे' असं ऐकायला येऊ लागलं. शेवटी, 'कोणाला मेडीकली काही त्रास झाला तरच गाडीत घेणार, बाईकची सीट, सीटला टोचतीये अशी कारणं असतील तर सॉरी', असं नवर्यानी स्पष्टच सांगीतलं ( जे अर्थात कोणालाच आवडलं नाही)., शिवाय, 'मेरा बॅग/ जॅकेट तुम्हारी गाडी मे रखेंगे' ह्याला सुद्धा आम्ही 'नाही जमणार' हे क्लीअर केलं. कारण गाडीची डिकी आमच्याच सामानाने भरणार होती. काही वेळा वाईटपणा आला तरी आपल्या निर्णयांवर ठाम रहायला लागतच.
अश्या मोठ्या प्रवासात आम्ही काही गोष्टी कटाक्षानी पाळतो. केदार, त्याचा अभ्यास, करीयर ऑप्शन्स, मनी मॅटर्स, इन्व्हेस्ट्मेंट, आणि सगळ्यात मुख्य, नातेवाईक.... हे विषय पूर्णपणे वर्ज्य.. पहाटे शक्य तितक्या लवकर निघायच आणि सूर्यास्ताच्या आधी अर्धा तास प्रवास थांबवायचा. चहा, जेवण हे ब्रेक्स लांबवायचे नाहीत. जो ड्रायव्हींग करत असेल, त्याच्या आवडीची गाणी.. ( आणि मी करत नसेन तर माझ्या.....). :ड ड्रायव्हींग करणार्यानी फोनवर बोलायचं नाही, ब्ल्यू टुथ असलं तरी. मोबाईल्स सतत चार्ज्ड ठेवायचे. टॉयलेट दिसलं की जाऊन यायचच. आणि सगळ्यात मुख्य, भूक लागायला लागली की वाट न बघता जे बर्यापैकी स्वच्छ हॉटेल दिसेल तिथे जेऊन घ्यायचं.. नवरा २०० आणि मी १५० अश्या टप्प्यांनी ड्राईव्ह करायच अस ठरलं होतं जे अजिबात फॉलो केलं गेलं नाही. सलग ४००/४०० किमी पण ड्राईव्ह केलं आणि हायवे वर १२०-१४० च्या स्पीडनी.
आम्ही प्रवासात नवर्याची एस क्रॉस नेणार होतो. माझी ब्रिओ लहान असली तरी चालली असती कारण तिचे सस्पेंशन्स स्टीफ आहेत., लेहला खड्ड्यांच्या रस्तात त्याचा फायदा झाला असता पण ब्रिओ सामान ठेवण्याच्या द्रुष्टीने लहान शिवाय पेट्रोल. ( एस क्रॉस डिझेल ) असा विचार केला. हे आमचं १० दिवसातल घर .....
पहीला टप्पा नाशिकला बहीणीकडे. प्रवासाला सुरुवात केली आणि कसारा गाठत नाही तोच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. ४.३० ला अंधारुन आलं आणि २०० मीटर वरचं वाहनही दिसेना.. ईगतपुरीला पोहोचलो आणि पाऊस गायब झाला.संध्याकाळी आम्हाला सरप्राईज म्हणून भेटायला आई बाबा आले. आमच्यासाठी बहिणीने नेहमीप्रमाणे जेवणाचा जंगी बेत केला होता. दुसर्या दिवशी पहाटे ४ ला निघायचं ठरवलं होतं. त्याप्रमाणे ३ ला ऊठलो., आणि आटोपून बरोबर ४ ला निघालो. बरोबर मोठ्ठा थर्मास भरुन चहा, पराठे, कचोर्या असा नाश्ता मिळाला होता.
धुळ्याला रस्त्याच्या कडेला थांबून पराठे, चहा असा नाश्ता केला. आणि पुढचा टप्पा एकदम चितोडगढला जेवायला. मध्ये फक्त एकदा बायो ब्रेक. ११.३० पासूनच हॉटेल शोधायला सुरुवात केली, पण आम्ही हायवे वरुन गावांच्या बाहेरुन जात असल्याने शिवाय राजस्थानात पोहोचल्याने आजुबाजुला फक्त ओसाड मैदाने होती, दुकानं दिसली तरी ती रिपेअर्स वाल्यांची. शेवटी चितोडगड क्रॉस केल्यावर एक चांगल्यापैकी वाटणारं हॉटेल दिसलं आणि हुश्श झालं. तिथे अप्रतीम चुरमा लाडू आणि दाल बाटी खाल्ली. पुढचा टप्पा जयपूर. आमच्या ओरीजनल प्लॅन प्रमाणे आम्ही चितोडगढला मुक्काम करणार होतो पण तिथे आम्ही १ च्या दरम्यान पोहोचणार हे लक्षात आल्यावर अजुन पुढे जयपुर गाठायचे ठरले. त्याप्रमाणे एच व्ही के ला बुकींग करायला सांगीतलं. दुसर्या दिवशी जयपुर ते चंदीगढ आणि मग तिथे एक दिवस आराम. चंदीगढ पर्यंतचा रस्ता ( एन एच ७१, ८ आणि १ ) खूपच छान आहे. ६ लेन्स चा. फक्त काही भागात लोडेड ट्रक्स मुळे तो विचित्र खचलेला आहे. हे ट्रक्स सरळ पहील्या लेन मधुन रांगत रांगत जातात. ह्याच रस्त्यांवर आम्हाला आमच्याशी रेस लावणारे तीन चार जण वेगवेगळ्या भागात भेटले. आणि जर मी गाडी चालवत असेन तर लोकांना चांगलाच चेव चढायचा. उघड उघड रेसींग चालू आहे हे कळायचं मग आम्हीच स्लो होऊन अंतर पडू द्यायचो. प्रवासात अश्या काही एक्सेप्शन गोष्टी ही पहायला मिळाल्या.
ट्रेकच्या २ महीने आधीपासून ड्रिंक्स पूर्ण बंद करायला सांगीतली होती. ही सुचना काही लोकांनी ( जे न पिणारे होते ) मनापासून पाळली. मी माझ्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी ही बंदी धुडकाऊन घसा ओला करुन घेतला. :P
चंदीगढला आमचा ग्रुप भेटला आणि ७ ला आमचा पुढचा प्रवास सुरु झाला ते पावसातच. गाडीत जी पी एस आहे, शिवाय फोनवरच गुगल मॅप्स होतचं पण दोन्हीनी आम्हाला संपूर्ण प्रवासात ४ वेळा गंडवलं. :nottalking: सुरुवात मनालीच्या रस्त्यावरच झाली. मनालीला जातांना आम्ही चक्क 'ठाण्याहून' गेलो.
दुसर्या दिवशी जिस्पा. ह्या रस्त्यावर आम्हाला रोहतांग क्रॉस करायचा होता, त्याच्या आधी गुलाबा चेकपोस्ट, तेव्हा गाडी असेल तर पहाटे ४ लाच निघा असं हॉटेल मालकानी सांगीतलं कारण टुरीस्ट गाड्या येऊ लागल्या की मोठी रांग लागते. पण बाकी सगळे ९ ला निघणार आणि आम्ही पुढे जाऊन करणार काय, ह्या विचारानी आम्ही ८ ला निघालो आणि ४.५ तास लाईन मध्ये अडकलो आणि मी ट्रॅफीक जॅमचा असा उपयोग करुन घेतला.
रोहतांग सतत जाणार्या प्रवाशांमुळे अगदी अस्व्च्छ झालाय. बर्फ तर मळकट काळ्या रंगाचं आणि लोक अक्षरशः वाट्टेल तश्या गाड्या लावतात रस्त्यावर.. आमचा ग्रुप बाईक्स वर असल्याने पुढे निघुन गेला होता., आणि २ वाजायला आले होते, जिस्पा गाठायचं होतं म्हणून आम्ही रोहतांगला थांबलो नाही. पास क्रॉस केला आणि उताराचा रस्ता पाहून चक्रावलो. घाटाच्या त्या बाजुचा रस्ता जेवढा गुळगुळीत होता तेवढा ईकडे रस्ताच नव्हता.. फक्त अवशेष. कसेबसे उतरलो, प्रचंड भुक लागली होती आणि अचानक नचिकेत दिसला आणि मग सगळेजण. एका रोडसाईड हॉटेलमध्ये जेवलो. मी ऑम्लेट ब्रेड खाल्लं आणि एकदम लक्षात आलं, आज वटपोर्णिमा !! उपासाचा तर प्रश्नच नव्हता पण ऑम्लेट... पण हा गिल्ट थोडावेळच टिकला कारण पोटात काहीतरी विचित्र जाणवायला लागलं पण फार विचार न करता पुढे निघालो. पुढचा जिस्पा पर्यंतचा रस्ता अप्रतिम सुंदर आहे. लोक मनालीला गर्दीत जातात पण पुढे केलाँग जिस्पा त्याही पेक्षा सुंदर भाग आहे. पण मी ते एंजॉय नाही करु शकले कारण मी ड्राईव्ह करत होते आणि माझं लक्ष पोटात काय चाललय ईकडे होतं. ह्याच रस्त्यात तंडीला ईंडीयन ऑईलचा पेट्रोल पंप आहे. ह्या पंप नंतर लेह पर्यंत ३५० किमी दुसरा पंप नाही. हा एक मस्ट स्टॉप आहे.
जिस्पाला पोहोचलो. चहा घेतला आणि मी खोलीत जाऊन पडले. नवरा खाली रस्त्यावरच थांबला बाकी सगळे येइपर्यंत. हळू हळू मला पोटात ढवळतयं, थंडी वाजतीये अस वाटायला लागलं. आम्ही हॉट वॉटर बॅग्ज नेल्या होत्या, त्यात गरम पाणी भरुन शेकत, मी पडून राहीले, जेवायला गेलेच नाही. रात्री पण अस्वस्थ वाटत होतं, शेवटी पहाटे उलटी झाल्यावर जरा डुलकी लागली, पुन्हा एकदा तो एपिसोड पार पडला आणि मग पुढचे २ तास झोप लागली. सकाळी परत अस्वस्थ वाटायला लागलं आणि अॅ सीडीटी झाली आहे हे लक्षात आलं. आम्हाला आजपर्यंत कधीही अॅ.सीडीटीचा त्रास झालेला नाही म्हणून अॅॅन्टासीड्स नेल्या नव्ह्त्या, त्या सत्या कडून घेतल्या. ब्रेकफास्ट करावा असही वाटेना, ते वासही नको वाटू लागले म्हणून मी डायनिंग हॉलच्या एका कोपर्यात बसून राहीले. गोळ्या घ्यायच्या म्हणून एक टोस्ट कसाबसा खाल्ला.
आता पुढचा टप्पा सरचु. १४००० फुट ऊंचावर. ( लेह ११००० फुट आहे ). 'ईथे तुम्हाला त्रास होण्याची शक्यता आहे' 'ईथे तरलात तर पुढे सोपं जाईल' असा ईशारा आधीच मिळाला असल्याने मनात धाकधुक होती.
आज मी ड्राईव्ह करुच शकणार नाही हे उघड होतं. मी गाडीत बसुन जे डोळे मिटुन घेतले ते 'बार ला चा '( १६,००० फुट ) ला पोहोचल्यावर , ' अग, जरा बघ बर्फाच्या भिंती' असं म्हणत नवर्यानी हलवल्यावर उघडले. बाहेर तापमान शुन्य डिग्री होतं. सगळीकडे फक्त आणि फक्त आणि फक्त बर्फ. :surprise:
मध्यभागी असलेल्या पॅनेल वर ऊजवीकडे झिरो डिग्रीज दिसतयं
त्या भागात आम्ही आणि आमच्या पुढे मागे असणार्या २ बाईक्सवरचे तिघे ( आमचे नव्हे ) आणि एक १० सीटर बस एवढेच होतो. काच खाली केली. बर्फ भुरभुर पडत होता. बाजुनी असलेल्या बर्फाच्या भिंतीवरुन हात मनसोक्त बधीर होईपर्यंत फिरवुन घेतला. पुढे एका वळणावर एक बाईकर उभा होता आणि दुसर्या बाईक वरचे दोघे त्याची विचारपुस करत होते. आम्ही थांबलो. तर एकटा असणारा बाईकस्वार मुलगी होती. त्या बस नी तिला कट मारला आणि तिचा तोल गेला., म्हणून ती घाबरली होती. त्यांना मदत हवी का विचारलं आणि सगळं ओके आहे हे पाहून निघालो. मी पुन्हा डोळे मिटुन घेतले. ह्या पूर्ण प्रवासात, बार ला चा सोडल्यास, नवर्याला पाणी हवं असेल तेव्हा ते देण्यापुरतेच डोळे उघडले. पोटात काहीतरी वेगळच चाललयं हे जाणवत होतं. १.३० च्या दरम्यान सरचु गाठलं. आमचा ग्रुप जिस्पा सोडल्यानंतर दिसलाच नव्हता. रोहतांग नंतर फोनला रेंजच नव्हती. बी एस एन एल च कार्ड घेतलं होतं पण त्यालाही रेंज नव्हती. सरचु ला मुक्काम टेंट मध्ये होता. आम्हाला आमच्या कँपच नाव माहीत होतं, 'अॅ डव्हेंचर कॅम्प'. त्या नावाचा कॅम्प दिसल्यावर गाडी वळवली, तर तिथे अजुन सगळे टेंट उभे राहीले नव्हते ( जे मला दुसर्या दिवशी कळलं). 'ईथे असं काही बुकींग नाहीये, पुढे अजुन एक अॅ डव्हेंचर कॅंप आहे तिथे विचारा ' पुढचा अॅलडव्हेंचर कँप म्हणजे फक्त पाटी होती. 'पुढे आर्मीचं पोस्ट आहे, त्यांच्याकडे सॅटेलाईट फोन असतो, तिकडून फोन कडून नक्की कुठे आहे ते विचारा' असं सांगीतलं, आम्ही पुढे निघालो. आता मला बसवेना. अचानक 'आपण आधीच्याच कँप मध्ये जाऊ. आणि तिथेच राहू. एकाच रात्रीचा प्रश्न आहे.' असं म्हणून नवर्यानी गाडी उलट वळवली. आधीच्या कँप मध्ये गेलो आणि त्याच्याशी बोलून एक टेंट मिळवला. , आणि आत जाऊन मी जी आडवी झाले, ते ग्लानीत गेल्यासारखी झोपून गेले.. मधुन मधुन जाग यायची तेव्हा महेश आत बाहेर करत असतांना दिसायचा. शेवटी त्यानी कार रस्त्याच्या कडेला पार्क केली आणि ती बघुनच बाकीच्यांना कळलं की आम्ही ईथे आहोत.
४.३० च्या दरम्यान सगळे पोहोचले. थोड्या फार फरकाने सगळ्यांची अवस्था माझ्यासारखीच होती, त्यात ते सगळे बाईक वरुन बर्फात प्रवास करुन आलेले. आम्ही निदान गाडीत बंदीस्त जागेत हीटर लाऊन प्रवास केला होता. संध्याकाळी जरा जाग आली तेव्हा कळलं की श्रीरंग आणि इश्वर दोघे बाईक वरुन पडले. श्रीरंगचा हात चांगलाच दुखावला होता आणि स्वयंघोषीत डॉक्टर राम नी क्रेप बँडेज बांधुन दिलय. श्रीरंगची अवस्था वाईट होती. महेशनी निर्णय घेतला की दुसर्या दिवशी तो आमच्या बरोबर गाडीतुन लेह ला येइल., आणि आम्ही डायरेक्ट लेहच्या सरकारी हॉस्पीटल मध्ये त्याला घेऊन जाऊ.
मी काल रोहतांग ला जो ऑम्लेट ब्रेड खाल्ला होता त्यानंतर सकाळचा टोस्ट सोडल्यास दिड दिवसात काहीही खाल्लं नव्हतं. खावसं वाटतचं नव्हतं. मला प्रचंड झोप येत होती आणि उठुन बसलं की पोटात ओढल्यासारखं व्हायचं. ही अॅहसीडीटी नक्कीच नव्हती. I was hit by AMS.... महेशच्या अती आग्रहामुळे मी श्रीरंग नी आणलेला पौष्टीक लाडू खाल्ला आणि पुन्हा झोपेच्या विहीरीत गुडुप झाले.
मध्येच कधीतरी कँप मध्ये काम करणारा एक जण ब्लँकेट्स घेऊन आला. माझी अवस्था बघुन ब्लँकेट घालूनही दिलं. जाग आली. पहाटेचे ४.३० वाजले होते. मला मस्त फ्रेश वाटत होतं. हळू हळू उठुन बसले. चक्क बरं वाटत होतं. सगळीकडे काळोख होता., कारण टेंट मध्ये लाईट नव्हता. मोबाईलच्या उजेडात वॉशरुम (!!!!) ला जाऊन आले.वॉशरुम म्हणजे एक डुगडुगणारा कमोड आणि वॉश बेसीन. झोप येइना. मग बसून राहीले.कालचं पोटात ओढल्यासारख फिलींग गेलेलं होतं.मध्येच आतल्या आत अंधारात फेर्या मारल्या. महेश उठला., आणि त्याचा मोबाईल सापडेना. माझ्या मोबाईलच्या उजेडात गादी खाली, उशी खाली, ब्लँकेट्स उचलून सगळी कडे शोध शोध शोधलं पण नाही. शेवटी रात्री बाहेर कुठेतरी पडला ह्या निष्कर्षा पर्यंत आलो.,मोबाईल गेला. ६ वाजले. अचानक कुठुनतरी अलार्म चा आवाज येऊ लागला. शोधाशोध केल्यावर मोबाईल महाराज कॉटखाली असलेल्या ताडपत्रीखाली सापडले.
७ वाजता निघायचं होतं. फ्रेश होऊन ब्रेकफास्टला गेलो. आज मी नॉर्मल होते. सो आय वॉज हॅपी.. पण बाकीच्या बर्याच जणांची अवस्था अजुनही ठिक दिसत नव्हती. आज आमच्या बरोबर ईश्वर पण येणार होता कारण त्याला बाईक चालवण कठीण वाटतं होतं.
निघायच्या आधी महेशनी मला गाडी सुरु करुन ठेवायला सांगीतली., तर सुरुच होईना. सगळे प्रकार केले. शेवटी सपोर्ट व्हेइकल च्या मदतीनी जंप स्टार्ट चा प्रयत्न केला तर ते ही होईना. मॅन्युअल मध्ये पण काहीही दिलं नव्हतं, आम्ही काळजीत पडलो. माझं डॅशबोर्डवर लक्ष गेलं, तर मीटर पॅनेल वर 'आईस पॉसीबल' असे शब्द दिसले. बाईक्सचा मॅकेनीक अंकुश म्हणाला, कुलंट मे पानी है क्या? तर हो. प्रॉब्लेम लक्षात आला. कुलंट मध्ये उकळतं पाणी ओतलं आणि दुसर्या मिनीटाला मॅडम स्टार्ट झाल्या.. आपल्या कडे कुलंट मध्ये ७०:३० मध्ये कुलंट आणि पाणि असतं, थंड हवेच्या प्रदेशात पाणी अजीबात टाकत नाहीत.. हे नविन ज्ञान मिळालं.
आजचा प्रवास मोठा होता., कारण आज रस्त्यात ४ पासेस होते, ज्यात 'टांग लांग ला" हा जगातला दुसर्या क्रमांकाचा मोटरेबल पास होता. ( पहीला खारदुंगला पण भारतातच आहे ). आणि गाटा लुप्स. एका मागे एक २१ हेअरपीन टर्न्स. शिवाय गाडीत २.५ पेशंटस, ज्यात एकाचा हात दुखावला होता. त्याला त्रास होणार नाही ह्या बेतानी आज हळू हळू ड्राईव्ह करायच होतं. प्रवास सुरु केला आणि ५ व्या मिनीटाला जो खड्डेयुक्त रस्ता लागला तो पुढे पँग पर्यंत ६० किमी तसाच होता. आत्ता पर्यंत च्या प्रवासातला सगळ्यात खराब रस्ता. आणि औषधालाही माणुस नाही. अध्ये मध्ये ईंडीयन ऑईल चे टँकर तेवढे दिसायचे आणि जरा बरं वाटायचं ह्या ६० किमी ला आम्हाला तब्बल तीन तास लागले.
हे गाटा लुप्स. ( फोटोंचे पिक्सेल कमी केलेत म्हणुन ते छोटे दिसताहेत).
तांगलांगला
आणि हा तिथला बर्फ.
पँग ला भारतीय आर्मीचा ट्रान्झीट कँप आहे, जो जगातला सगळ्यात ऊंचीवरचा ( १५००० फुट ) ट्रान्झीट कँप आहे. ईथे राहणार्या जवानांना फुल्ल रिस्पेक्ट.
पुढे नकी ला, ला चुंग ला, गाटा लुप्स आणि टांग लांग ला आले. ईथेही तापमान शुन्य वर पोहोचलं. एका ठिकाणी रस्त्यावर बर्फ जमा झालं होतं, तिथे आर्मीचे जवान आणि ट्रक्स जोरदार कामं करत होते.
सगळ्यात कौतुकास्पद कामगीरी आहे, बी आर ओ ( बोर्डर रोड ऑर्गनायझेशन ) ची. ह्या ऊंचीवर, ऑक्सीजन कमी असतांना अश्या हवेत रस्ते बांधणे, ते दुरुस्त ठेवणे, बर्फ वगैरे साफ करुन वाहतुक अडणार नाही ह्याची काळजी घेणे हे किती जिकरीचे आहे. हॅट्स ऑफ टु देम.
ऊंचावर गेल्यावर जसं आपल्याला श्वसनाचा त्रास होतो, तसाच गाडीला ही होतो. हवेतला ऑक्सीजन कमी कमी झाल्यावर गाडीची पॉवर जाणवण्याइतकी कमी होते. अश्या वेळी गाडी खालच्या गिअर वरच चालवायची. कितीही मोह झाला तरी शक्यतो वरचे गिअर्स टाकायचे नाहीत. रोहतांग सोडल्यापासून आमच्या पैकी ड्रायव्हींग करणार्याला गाडीच्या पिक अप मध्ये जरा जरी फरक जाणवला तरी लगेच शेअर करत होतो.
ह्या भागात गाडी बंद पडू नये अशीच ईच्छा होती कारण दुर दुर पर्यंत एकही वाहन मदती साठी दिसत नाही. आणि एका चढावर गाडी बंद पडली. सुरु होत होती पण सगळे उपाय करुनही ती पुढे जाईना. ( चढ आणि पिक अप कमी ). शेवटी महेश सोडून आम्ही तिघे खाली उतरलो आणि धक्का दिला, अगदी श्रीरंगनी एका हातानी दिला. आमच्या जस्ट मागे इं. ऑ चे ४ ट्रक्स होते. ते शांतपणे थांबले. आणि आम्ही पुढे जायची वाट बघत बसले. त्यांच्या असण्यानी आधार होता कारण गाडी अगदीच सुरु झाली नसती तर त्यांच्या मदतीने खेचुन पुढे घेता आली असती. पण थँक गॉड, गेली एकदाची पुढे. पुढचा प्रवास व्यवस्थीत पार पडला. जेवायला जिथे थांबलो होतो, तिथे एक चिनी मकाऊ मुलगी आली. एकटीच होती. तिच्याशी गप्पा मारल्या. ती तैवान हून आली होती. गेले ६ महीने षीकेश ला रहात होती आणि आता तिथुन एकटीच लेह ला जात होती. कोणी बरोबर नाही, कुठेही बुकींग केलेले नाही. आणि बाईक साधी बजाज डिस्कव्हरर १२५.. महेशच्या अचानक लक्षात आलं, काल बार ला चा ला बस नी कट मारल्याने धडपडलेली मुलगी ती हिच.. तिला ऑल द बेस्ट देऊन निघालो. आणि दुपारी ४ ला लेहच्या सरकारी दवाखान्यात पोहोचलो. दरम्यान मला पूर्ण बरं वाटायला लागलं होतं आणि काहीतरी हवचं म्हणून नाक गळायला सुरुवात झाली.
दवाखान्यात अगदी आश्चर्यचकीत करणारा अनुभव आला. सरकारी दवाखाना असूनही ५ मिनीटात केस पेपर, पुढच्या १५ मिनीटात डॉक्टर भेटल्या, अजुन १० मिनीटात एक्सरे काढुन, कुठेही फ्रॅक्चर नाही हे क्न्फर्म करुन आम्ही बाहेर. फक्त त्याच्या हाताला बांधलेले, रादर चिकटवलेले बँडेज काढुन सपोर्ट देणारे बॅंडेज बांधुन घ्या अस डॉ नी सांगीतलं. ते बँडेज काढणं हा बिचार्या श्रीरंगसाठी महा वेदनादायी ( कारण ते त्याच्या हात, पोट, पाठ सगळीकडे पसरलं होतं) आणि आमच्यासाठी प्रचंड विनोदी प्रकार होता. आय सी यु च्या डॉ आणि नर्सेस ते काढत होत्या आणि तो, ' राम, साले, मै तुझे छोडुंगा नही' असं ओरडत होता.. विदाऊट वॅक्स वॅक्सींगचा अनुभत घेतला त्यानी.
शेवटी जी पी एस कडून गंडवुन घेऊन हॉटेलला पोहोचलो. सकाळी आलेल्या उर्वशी, संतोष, सुनील, वरुण ला जेमतेम 'हाय' केलं आणि खोलीत जाऊन पडलो. उद्या आराम. बहुतेक सगळ्यांना लोकल मार्केट मध्ये बारीक सारीक खरेदी करायची होती.
ह्यावर्षी जुन आला तरी मागच्या वर्षीपेक्षा चांगलीच थंडी होती. यंदा हिवाळा लांबलाय, वर पहाडात अजुन बर्फ पडतोय हे ऐकून आम्ही उद्या अजुन एक फ्लीज जॅकेट घ्यायचं ठरवलं, शिवाय वॉर्मीज घ्यायचे होते. हे छोटे छोटे सॅशे असतात. जोरात हलवून जिथे हवं तिथे ( पोट, छाती, पाठ ) पण कपड्यांवर ठेवायचे, आपोआप गरम होतात आणि ७/८ तास गरम राहतात. नुसत्या त्वचेवर ठेवले तर भाजू शकतं.
एव्हाना माझं नाक प्रचंड वेगानी वहायला लागलं होतं. आणि डायमॉक्सचा परिणाम असावा, पण पोट बिघडलय असं वाटु लागलं होतं. ह्या दिवसा पासून ट्रेकच्या शेवटच्या दिवसा पर्यंत मी रोज सकाळी, एक सर्दीची, एक डायमॉक्स, एक पिरीएडस साठी, आणि एक पोटासाठी अश्या ४ गोळ्या घेतल्या...जे मला अजिबात आवडत नव्हतं पण काहीही इलाज नव्हता. दुसर्या दिवशी सकाळी, स्टोक ला खूप बर्फ असल्याने फक्त चांग मा पर्यंतच जाऊ देत आहेत, अशी बातमी ऐकली. त्यामुळे आम्ही सोडून सगळ्यांनी खरेदी संध्याकाळ पर्यंत पोस्टपोन केली. दुपारी आमचा मुख्य गाईड दॉरजे आला आणि जायला हरकत नाही हे कळलं. त्यानी काही सुचना दिल्या आणि झेपत नसेल, त्रास होत असेल तर सरळ सांगा, गप्प राहू नका अशी तंबी दिली.
दुसर्या दिवशी निघायचं. मी ऊत्साहाच्या मायनस झोन मध्ये होते कारण वाहणारं नाक. निघायच्या आधी झालेल्या फोटो सेशन मध्ये माझा एकच फोटो आहे. ( सुनील हौशी फोटोग्राफर आहे, त्यानी ट्रायपॉड सकट कॅमेरा आणला होता) :waiting:
फोटो झाले आणि आम्ही निघालो. आमची कार हॉटेलमध्येच राहणार होती. जातांना गाडीत चाललेल्या बडबडीकडे माझ अजिबात लक्ष नव्हतं. मी सर्दी नी बेजार झाले होते. स्टोक व्हिलेज ला पोहोचलो. सामान नेणारे घोडे, खेचरं आधीच आले होते. सगळे गाड्यांमधुन उतरलो आणि पावसाला सुरुवात झाली...
पुढच्या भागात ट्रेक आणि जमल्यास परतीचा प्रवास...
( दुसरा भाग लिहीला आणि लॅपटॉप बंद पडला, मग आज उद्या करत तो दुरुस्तीला टाकणे, दुरुस्त होणे आणि परत आणणे ह्यात उशीर उशीर होत जवळजवळ महीना गेला..)
तर आम्ही स्टोक गावात पोहोचलो आणि पाऊस सुरु झाला. आमचं सामान वाहून नेणारे घोडे, खेचरं आणि बाकी मदतनीस आधीच आलेले होते.
मी नाक गळतीने आधीच त्रासले होते आणि आता ह्याच व्हॅन ने परत जावं अस वाटायला लागलं. बाहेर पडल्या पडल्या सगळ्यांची पाँचो शोधण्याची धावपळ सुरु झाली. नशिबाने आमचे आमच्या सॅक मध्येच होते. पण बर्याच जणांचे मोठ्या बॅग्ज मध्येच होते, ते आधी सगळ्या बॅगांच्या पसार्यात आपली शोधुन, त्यात गुप्त जागी ठेवलेले बाहेर काढणे आणि घालणे हा प्रोजेक्ट सुरु झाला. पुढची १५/२० मिनीटे हा धुमाकूळ.
' अरे मेरा मिल नही रहा है', ' ये पिछेसे खिचो कोई जरा', ' कुठे अडकलाय?', ' यार, गरम होतय', ' आता तहान लागली तर बॉटल कशी काढायची?' ' सगळा गोंधळ सुरु झाला. ह्यात मी थोडा वेळ माझा त्रास ही विसरले.
त्यात आम्हाला पॅक लंचचे बॉक्स दिले. पहील्या मुक्कामाला पोहोचे पर्यंत दुपार होणार होती म्हणून मध्येच लंच ब्रेक घ्यायचा होता. आता हे बॉक्सेस कसे बसवायचे सॅक मध्ये !!!! :thinking: कसेबसे बसवले. एव्हाना माझ्या नाकाचं अस्तीत्व लक्षात आलं होतं आणि मी पुन्हा निर्विचार मोड मध्ये गेले.
हा गोंधळ हाताबाहेर जाणार एवढ्यात 'मच्छी बाजार है क्या, चलो, चलना चालू करो' असा निर्वाणीचा इशारा कानावर पडला. आमच्या जे एन एम चे सर्वेसर्वा डॉ सुदर्शन आमच्या बरोबर येण्यासाठी आदल्या दिवशीची 'जे एन एम क्वालीफायर हाफ मॅरेथॉन' ( जे एन एम अरेंज करते ती एस सी एम एम साठीची क्वालीफायर )चा व्याप आटोपून आज सकाळीच लेहला पोहोचले होते. आधी च्या प्लॅन प्रमाणे अॅक्लमटायझेशन साठी एक दिवस राहून दुसर्या दिवशी आम्हाला मनकोरमा कँप वर भेटणार होते. पण त्यांनी आजच आमच्याच बरोबर निघायचा निर्णय घेतला. आधीच्याच वर्षी त्यांनी स्टोक पिक सर केले होते.
आमच्या बरोबर ३ गाईड्स होते. दॉरजे हा मुख्य आणि मिंगमा, गेंझी हे त्याचे साथीदार. गेंझी एवढा हसरा होता !! अर्थात हे सगळे एकएकटे आणि एकत्र एव्हरेस्ट पण करतात. दॉरजे आणि आमचा मुख्य कुक वर्षातले ६ महीने लेह मध्ये गाईड आणि कुक म्हणून आणि उरलेले ६ महीने गोव्याला एका ईटालियन कॅफे मध्ये कुक चे काम करतात. गाईडस किंवा मदतनीस हे सगळे ६ महीने ईकडे आणि उरलेले ६ महीने दुसर्या एखाद्या ठिकाणी ( बहुतेक करुन गोवाच ) असे असतात. जनरली एक किंवा दोन गाईड्स प्रत्येक ग्रुप बरोबर असतात पण आमचा तब्बल १७ जणांचा ग्रुप असल्याने तीन होते शिवाय आम्हाला हाकायला डॉ सुदर्शन होताच.
तर चालायला सुरुवात केली. सुरुवातीलाच दॉरजे म्हणाला की, आजच्या दिवशीच्या शेवटा पर्यंत आमच्या लक्षात येतं की कोणाचा स्पीड कसा आहे आणि कोण शेवटपर्यंत टिकेल आणि सहसा आमचा अंदाज चुकत नाहीच.
सुरुवातीलाच सगळ्या ग्रुप चे २ भाग पडले. अती उत्साही असे पहील्या गटात दॉरजे बरोबर आणि उरलेले काही दुसर्या गटात. महेश आणि मी मागच्या गटाच्या थोडे पुढे आणि पुढच्या गटाच्या खूप मागे असे होतो. ' आपल्याला कोणतीही रेस जिंकायची नाहीये, अगदी आरामात अंदाज घेत जाऊया, घाई करुन दमण्यापेक्षा आरामात जाऊया ' असा आमचा प्लॅन होता ( आणि तोच पुढे मस्त वर्क आउट झाला ).
सुरुवात करायच्या आधीच पाऊस थांबला !!!! आणि आमचे असंख्य लेयर्स आणि वर तो पाँचो ह्या सगळ्याच्या आत पाठीवरुन चक्क घामाचे ओघळ वाहात आहेत हे जाणवत होतं :uhoh: मला प्रत्येक पावला वर मागे वळून पळून जावसं वाटत होतं.
अर्ध्या पाऊण तासा नंतर एक वॉटर ब्रेक झाला. आणी सगळ्यांनी अक्षरशः ते पाँचो काढून फेकले. ( सॅक मध्ये ). आणि मग नियम असल्यासारखे फोटो काढणे सुरु झाले. मला एक कळत नाही, जिथे जातात तिथे लोक फोटो काय काढत सुटतात. सेल्फी काय, ग्रुप काय... सटासट सुरु. जरा शांतपणे आजुबाजूला बघणं नाही..
दॉरजे म्हणाला, ' ये आप लोगोका मॅरेथॉन नही है जो किसी टाईम मै खतम करना है. आप ११००० फिट से भी उपर जा रहे हो.. आगे तक जाना है तो स्पीड कम रखीये'... हे वाक्य जस काही पडत्या फळाची आज्ञा असं मानून पुढे जाणार्या ग्रुप चे ही आता २ भाग पडले.
अगदी पुढे नीरव, वरुण, ईश्वर आणि कल्पेश. त्यांच्या बर्या पैकी मागे महेश, मी, बालाजी, नचिकेत, राम, श्रीरंग, सुनील आणि संतोष. आमच्या अजून मागे उर्वशी, मीनल, अमीत, विनय आणि त्यांना पुश करायला डॉ.
हे सगळे ग्रुप्स, समीटचा दिवस सोडल्यास अगदी शेवटच्या दिवसापर्यंत कायम राहीले. फक्त मधल्या ग्रुप मध्ये महेश आणि मी आणि बाकीचे सगळे असे सब ग्रुप्स पडले , कधी आम्ही पुढे, कधी ते पुढे... पण सोबत राहीलो..
मी निर्विचार मोड मध्ये गेले होतेच.. आता फक्त चालत रहायचं. आज अंदाजे ५ तासांचा रस्ता होता. मनात थोडी धास्तीही होती , आता खरी परीक्षा. ज्यासाठी गेले ५/६ महीने कष्ट घेतले ते आता उपयोगाला येणार होते.
रस्ता कधी सरळ, कधी थोडा चढ, मध्येच हलका उतार असा होता. एका बाजुला डोंगर, मध्ये नदीचं पात्र वाटावं असा भाग आणि पलीकडे परत ऊंच सुळके. सगळा उजाड प्रदेश पण हा उजाडपणा आपल्या कडे उन्हाळ्यात डोंगर कसे भकास दिसतात तसा नव्हता. तपकीरी रंगाच्या किती छटा होत्या ! मध्येच बर्फ दिसत होतं.
थांबत, बसत-उठत, आम्ही पुढे पुढे जात होतो. पुढचा ग्रुप कधीच नजरे आड गेला होता, मागचा नजरेच्या टप्प्यात होता. मी मुद्दाम घड्याळ घातलं नव्हत आणि कोणाला, किती वाजले हे पण विचारत नव्हते. मुक्कामाची जागा दिसेपर्यंत चालत राहण्याशिवाय पर्याय नव्हताच ना ! मध्येच थांबून आठवणीने पाणी पित होतो. हवेतल्या कमी झालेल्या ऑक्सीजन लेव्हल चा शरीराला त्रास न होऊ देण्यास 'पाणी पिणे' हा हुकुमी उपाय आहे. त्यामुळे तहान लागो ना लागो ( लागत नाहीच कारण थंड हवा ) पाणी पित रहायचं. ऊन वाढत चाललं होतं पण जरा थांबलं की थंडी चांगलीच जाणवायची.
चालता चालता मध्येच एक ऊंच सुळका आला. एरवीच्या प्रॅक्टीस मध्ये सहज चढून गेले असते पण आज कठीण कठीण वाटलं.. कसा बसा चढून वर गेले तर वर फोटो सेशन सुरु झालेलं.
हा वरुन काढलेला फोटो. मागच्या ग्रुपमधले दोघे हुशार खालून वळसा घेऊन आले. :waiting:
मघा गायब झालेल्या पावसाने २ वेळा हजेरी लावलीच. मग पुन्हा थांबा- पाँचो बॅगमधुन काढा-घाला-चालायला लागा-परत थांबा-पाँचो अंगावरुन काढा-बॅग मध्ये ठेवा हा सोहळा करावा लागला.
थोडा वेळ थांबून पुन्हा चालायला सुरुवात केली. पाठीवरच्या सॅक मध्ये खायचे एवढे पदार्थ होते पण एक कण खावासा वाटत नव्हता.
बर्याच वेळाने एका ठिकाणी पुढे गेलेले मेंबर्स बसलेले दिसले. लंच ब्रेक. एका कोपर्यातली जागा पकडून मी बॉक्स बाहेर काढला. उघडला आणि आम्हाला आमच्या मदतनीस लोकांकडून मिळालेल्या अनेक सरप्राईजेस पैकी आश्चर्याचा पहीला धक्का बसला. एखाद्या न्यूट्रीशनीस्ट ला लाजवेल असा तो मेन्यू होता. एक उकडलेला बटाटा ( साल न काढलेला), एक उकडलेलं अंड ( अर्थात न सोललेलं), ह्या दोन्ही साठी तिखट, मसाला असलेली पुडी, एक केळं, ज्यूसचा एक टेट्रा पॅक, एक अतीशय चवीष्ट सँडवीच (मल्टिग्रेन ब्रेडच ) आणि हे सगळं अतीशय व्यवस्थीत पॅक केलेलं ! शिवाय टिश्यू पेपर्स.
मी कसाबसा बटाटा फक्त खाल्ला. ज्यूस चा पॅक काढून घेऊन उरलेला बॉक्स वाटुन टाकला. एव्हाना नाक गळती फुल स्पीड नी सुरु झाली होती. सगळे गप्पा, जोक्स करत होते आणि मी एखाद्या पुतळ्यासारखी एका कडेला बसून होते..
खर तर ती जागा खूप छान होती. आमच्या पाठीमागे एक सुळका, मध्ये हा रस्ता आणि बाजुला एक छोटासा ओहोळ.. पलीकडे अजुन एक सुळका !! अगदी पर्फेक्ट पिकनीक स्पॉट. बरी असते तर मी सॅक मधल पुस्तक काढून, आडवी पडून वाचायला सुरुवात केली असती ! ( अरे हो, पण सॅक मध्ये पुस्तक ठेवायला परवानगी नाकारली गेली होती... पण फोन मध्ये आहेत ना डाऊनलोड केलेली पुस्तकं... आणि फोन आहे सॅक मध्ये ) पण... पण मी आत्ता, ह्या क्षणी मला गरम वाफाळता कॉफीचा मग मिळाला तर ह्या स्वप्नात स्वतःला गुंतवून घेतलं...
सगळ्यांच खाऊन झालं, ब्रेक संपला आणि पुन्हा चालायला सुरुवात केली. ऊन चांगलच डोक्यावर येऊन तापलं होतं. किती वेळ गेला कोणास ठाऊक पण अचानक ऊन कमी कमी व्हायला लागलं, गारवा हळूहळू वाढायला लागला आणि एका चढाच्या वर टोकाशी एखाद्या पडक्या घराचे वाटावेत असे अवशेष दिसले. पोहोचलो.. :ty: :ty: :ty: . मी आनंदाने चढुन गेले तर
, कँपची जागा अजुन ३००/४०० मीटर पुढे होती. आता एवढ चालल्यावर हे अंतर पण प्रचंड मोठ वाटू लागलं.
ही मी वैतागुन बसले मध्येच.. मागे फोटोच्या टोकाशी एक पत्र्याचा चौकोन दिसतोय ते कॅम्पच टॉयलेट !!!
हा आमचा पहीला कॅम्प. चांगमा. अनुभवी ट्रेकर्स ईथे मुक्काम करत नाहीत., ते स्टोक हुन डायरेक्ट दुसरा कॅम्प, मनकोरमा गाठतात. आम्हीही करु शकलो असतो पण त्यासाठी सकाळी लवकर सुरुवात करायला हवी. पोहोचल्यावर एक दगड पकडला, सॅक मांडीवर ठेऊन, त्यावर डोकं टेकवुन बसून राहीले. थंडी वाढली होती. महेशनी काढून ठेवलेलं जॅकेट पायावर पसरलं तरी हुडहुडी भरल्यासारखं वाटायला लागलं. एव्हाना मागचा ग्रुप पण येऊन पोहोचला. अमीत सिंग ची तब्येत बरी दिसत नव्हती.
सहज मागे वळून पाहीलं तर एक टेन्ट तयार झालेला दिसला. मी सरळ आत जाऊन एका कोपर्यात बसले. आत बरच बर वाटत होतं. माझ्या मागे मागे उर्वशी, मिनल आणि कल्पेश आत आले आणि आडवे झाले. हा आमचा डायनिंग टेन्ट होता. काही वेळाने बाकी टेन्ट लागल्याच कळलं. टेन्ट मध्ये एक स्लीपींग बॅग ऑलरेडी ठेवलेली होती. त्यात आपली बॅग घालून वरची चेन बंद केली की काय बिशाद थंडी वाजायची !!
मी आमचा टेन्ट गाठला आणि सर्दीची गोळी घेऊन जी आडवी झाले ती फक्त रात्री जेवायला १५ मिनीटे उठले, जेवणातली दाल अप्रतीम होती. बाकी काय होतं ते कळलं नाही कारण दाल राईस मी टेन्ट मध्येच खाल्ला.. त्यानंतर थेट दुसर्या दिवशी पहाटे ४.३० ला जाग आली. आज बरच बरं वाटत होतं. बाहेर फटफटीत उजाडलं होतं. थंडी होतीच पण सह्ज सहन करता येण्याएवढी. मी टॉयलेट कडे मोर्चा वळवला.
टॉयलेट कसलं, एक पत्र्याचा तीन भिंती असलेला चौकोन. चौथ्या बाजुला पोत्यांचं बनलेलं दार , जे पूर्ण फाटून गेलं होतं. आत एक खड्डा.. झालं टॉयलेट. पुढल्या दोन्ही मुक्कामी अशीच टॉयलेट्स होती. फक्त हे पत्र्याचं, बाकी दोन्ही ठिकाणी दगडी.. बाकी सगळं सारखच. ही टॉयलेट्स दिसणं म्हणजे आपला मुक्काम जवळ आल्याची खूण !
हे टॉयलेट.
आज ब्रेकफास्टला बटाट्याचे पराठे होते, शिवाय टोस्ट वगैरे. ह्या संपूर्ण प्रवासात आम्ही किती वेळा आणि किती प्रकारचे बटाट्याचे पराठे खाल्लेत !! शिवाय अमीत नी घरुन कोणतेतरी लाडू आणले होते., ते बघुनच मला खायची ईच्छा झाली नाही. :winking:
दॉरजे आजच्या प्रवासाचं ब्रिफींग करायला आला. आजचा प्रवास २/२.३० तासांचा ( त्यांच्या भाषेत. आपल्या भाषेत + २ तास !! ). आज कालपेक्षा सोपा रस्ता आहे ( म्हणजे काल सारखाच कठिण ). आता १५ मि त टेन्ट रिकामा करा आणि निघायला तयार व्हा.. आता टेन्ट आवरणे म्हणजे फक्त आपले सामान आवरणे नव्हे तर 'मिळालेली स्लीपिंग बॅग गुंढाळून टेन्ट साफ करुन ठेवणे' हे लोकांना सांगावं लागतं. हे मदतनीस मुक्कामी पोहोचल्यावर, निघतांना जराही विश्रांती न घेता काम करत असतात, त्यांना लहानसहान गोष्टींसाठी बसल्या जागी हुकूम न सोडता आपण स्वतःची कामं केली तर व्यायामही होतो आणि आपल्यापरीने मदतही होऊ शकते. आम्ही प्रत्येक वेळी त्यांनी दिलेल्या स्लीपींग बॅग्ज घडी करुन ठेवत होतो, त्यामुळे खूश होऊन शेवटच्या मुक्कामी आम्हाला त्यातल्या त्यात मोठा (!) टेन्ट मिळाला आणि तो ही डायनिंग टेन्ट च्या आडोश्याला ऊभा केलेला !!! त्यामुळे जरासा का होईना वार्यापासून आडोसा मिळाला.
आज अगदी जोरदार पाऊस्/बर्फ पडला तरच पाँचो घालायचा अस आम्ही ( आम्ही दोघांनी ) ठरवलं होतं.
आजच्या चालण्याची सुरुवात 'त्या समोरच्या टेकडी पासून' करायची आहे हे सकाळपासून ऐकत होते पण ते तेवढ सिरीयसली घेतलं नाही., पण ते खरचं होतं. एक सरळ उतार उतरुन पुन्हा एक ऊभा सरळ कडा चढायचा. एक-दोन-तीन-चार असं मनात मोजत तो पार केला. ( आणि म्हणे आजचा रस्ता सोप्पा !!).
पण पुढचा रस्ता खरोखर सोप्पा होता ( कालपेक्षा अर्थात). सरळ सरळ सरळ चालत रहायचं. एकूण ३ वेळा बर्फ आणि एकदा पाऊस पडला पण आम्ही पाँचो प्रकरण बॅगेतच ठेवलं आणि ईट वर्क्ड !! कारण मोजून ५ मि. त बर्फ/ पाऊस थांबला. बाकी सगळे पाँचो ड्रिल करतच होते. पाँचो चा एवढा वैताग आला सगळ्यांना की परत गेल्यावर ' तो फेकून देइन, कापून टाकीन' अश्या सगळ्यांनी प्रतीज्ञा केली.. ( मी मात्र अजुन वापरते. आमचे पाँचो मस्त पायघोळ आहेत, शिवाय हातांच्या बाजुने सलग आहेत. जराही भिजायला होत नाही. स्कुटर वर वापरायला एकदम मस्त).
कँप मनकोरमाला पोहोचलो. आज मी खूपच बरी होते.
मात्र आज अमीतची तब्येत खूपच बिघडली. नाकातून रक्त येऊ लागलं. खर तर तो मागच्या वर्षी पण आला होता, तरीही ह्या वेळी त्याला त्रास होऊ लागला.
मनकोरमाला एक रेस्टॉरंट टाईप टेंट होता. तिथे चहा पिऊन आप-आपले टेन्ट गाठले. आमच्या पाठोपाठ १५-१७ वयाची ३०/४० मुलं मुली येऊन पोहोचली. त्यांची एज्युकेशनल ट्रिप होती. १४००० फुट ऊंचावर एज्युकेशनल ट्रिप !!!!!!
आज कोणीच दमलं नव्हत आणि भरपुर वेळ हातात होता, दुपारी डायनिंग टेन्ट मध्ये पत्त्यांचा डाव रंगला.
मेंढीकोट.. आम्ही सगळे आजही हळहळतो की ह्या पत्त्यांच्या खेळाचं शुटींग का करुन ठेवलं नाही !! प्रचंड धमाल, आरडाओरडा, लुटुपूटीची भांडणं, मराठी-ईंग्लीश मिश्रीत हिंदी नियम समजावणे... काय मजा केली पुढचे २/३ दिवस.. ' आमचा भिडू नवीन आहे, त्याला माहीत नाहीये, चुकून टाकलं पान, बदाम हुकूम होता ????? , मागच्या राऊंडला एक चान्स दिला ना तुम्हाला, मग आता ?, तुम्ही एकमेकांना खूण करत होतात, ए, तू आमचा पार्टनर आहेस'... पत्त्यांच्या टिपीकल डावात जी काय धमाल चालते, ती सगळी केली.
मग जेवतांना कोणाचं लग्न कसं/ कधी ठरलं, झालं हा राऊंड झाला. अध्ये मध्ये गाणी होतीच. जेवणाची गंमत होती. एवढ्याश्या जागेत आम्ही १७ जण आणि जेवणाचे पदार्थ कसे मावत होते कोणास ठाऊक !! पण जेवण मात्र चारीठाव असे.
उद्याचा मुक्काम बेस कँप !!
आज सकाळीच अमीत आणि विनय एका मदतनीसाबरोबर परत गेले. ते लेह मध्ये आम्ही परत येइपर्य़ंत राहणार होते.
बेसकँपपर्यंतचा प्रवास पहील्या दिवसासारखाच होता. अधुनमधुन बर्फ पडतच होता. आमची पाँचो पॉलीसी वर्क आउट झाल्याने आमचा आजचा स्पीड चांगला होता त्यामुळे पहीला ग्रुप सतत आमच्या नजरेच्या टप्प्यात होता. एका टप्प्यावर बर्फाचा जोर वाढला आणि पुढे पांढरा पट्टा पसरला असल्याने आम्ही शेवटी पाँचो घातले. आता मात्र माझी पंचाईत झाली. हातात इतक्यावेळ लोकरी ग्लोव्ज घातले होते, त्यावर आता वॉटर प्रुफ ग्लोव्ज घालावे लागले, त्यामुळे हातातला रुमाल पडून गेल्याचं कळलच नाही. मोठ्या मुश्कीलीने बॅग मधुन दुसरा रुमाल काढुन तो जॅकेटच्या खिश्यात ठेवला. आता जर मला नाक पुसायचं असेल तर पाँचो वर करा ( त्याला खिसे नाहीत ), रुमाल काढा, नाक पुसा, रुमाल आत ठेवा हे ड्रिल करायला लागलं.
एव्हाना बर्फाचा जोर चांगलाच वाढला होता. एका क्षणी तर एका फुटावरच ही काही दिसेना. ना पुढचा ग्रुप कुठून गेला ते कळत होतं, ना मागचे लोक कुठे आहेत ते लक्षात येत होतं, त्या बर्फाळ टेकडीवर आम्ही दोघचं. अशीच ५ मिनीटे गेली आणि बर्फात लांबवर हालचाल जाणवली. कोणीतरी झपझप चालत येत होतं., हा नक्कीच आमचा मेंबर नाही हे बोलेपर्यंत आमचा कुक आमच्या पर्यंत येऊन पोहोचला. ' आप ऐसेही सिधे जाईये. लेफ्ट साईड मत छोडीये. मेरे पिछे मत आईये, मै शॉर्ट्कट से जा रहा हू लेकीन आप वहा से नही आ पाओगे, आपका स्पीड अच्छा है, आप और २ घंटे मै पोहोच जाओगे' असं भराभरा बोलून तो बर्फात गायब झाला. और दो घंटे ??????????? ह्या बर्फात ?? आत्ताच पाऊल बर्फात जाऊ लागलं होतं. अजुन २ तासात शुज ओले झाले तर? बर्फ नाहीच थांबला तर ? पुढे अजून बर्फ असेल तर ??? आम्ही एक एक पाऊल मोजत चालायला सुरुवात केली. थोड्याच वेळात मागून गोंगाट ऐकू आला. एवढा आवाज म्हणजे हे आपलेच लोक !!
त्यांच्या मागोमाग आमचं सामान नेणारे घोडे आणि खेचरं आली. आम्ही बिचारे अंग चोरुन घेऊन त्यांना जायला जागा करुन दिली. मीनल मॅडम एका घोड्यावर बसून आल्या होत्या.
हळू हळू सगळ्यांचा आवाज बंद झाला. सगळे ट्रान्समध्ये गेल्यासारखे चालत होते. जोरात पडणारा बर्फ, पाऊल घोट्यापर्यंत बर्फात जात होते.. अशात लांबवर टॉयलेट सारखं काहीतरी दिसलं... आला... कँप आला... पण मी सावध होते.. हा फसवा हॉल्ट असू शकेल. पण नाही, तोच कँप होता. वर सगळीकडे बर्फ पसरलेला. बसायला दगडाचा तुकडाही नाही. माझं डोकं बारीक दुखायला लागलं होतं.. हा ए एम एस चा त्रास की थंडी मुळे की नाकगळतीचा परीणाम ?? एक गोळी घेतली आणि विसरुन गेले. जरावेळानी डोकेदुखी थांबल्याचे कळलंही नाही.
डायनिंग टेंट लागेपर्यंत सगळे पुतळ्यासारखे उभे राहीलो. आजही पॅक्ड लंच होते. टेंट लागताच सगळे पुतळे आत जाऊन बसले. आज आम्ही १६५०० फुटांवर होतो. बर्फाचा, ऊंचीचा परीणाम सगळ्यांवर झाला होता. एकदम पिनड्रॉप सायलेंस होता. अशात मिनल अचानक रडायला लागली. अगदी ' मम्मी, मुझे वापस जाना है' असा सूर लाऊन. सगळे अवाक झाले. संतोष तिला समजावू लागल्यावर बालाजी फट्कन म्हणाला, ' छोडो ऊस नौटंकी को, वो अपने आप चुप हो जायेगी'. पुढे शांततेत जेवणं आटोपली आणि दॉरजे आला.
आज आणि उद्द्या पूर्ण दिवस आराम. उद्या सकाळी क्रँम्पॉन्स घालून ( बर्फात चालतांना घालायचे शुज, जे आपल्या शुज वर घालायचे म्हणजे बर्फात चालतांना ग्रिप येते ) बर्फात चालायचा सराव , जवळच्या एका टेकडीवर ( जिथुन आमचा अॅक्च्युअल ट्रेक सुरु होणार होता ) अॅक्लमटायजेशन वॉक, आणि कोण ट्रेक ला येणार ह्याचा निर्णय घेणे हा अजेंडा होता. कोण येणार कोण नाही हे दॉरजे आणि बाकीचे दोघे ठरवणार होते. आणि कोणताही ईगो न ठेवता आम्ही ते ऐकायचं होतं.
निळा आहे तो आमचा 'त्यातला त्यात मोठा' टेंट.. बाजुला डायनिंग टेंट.. ऊन पडल्यावर.
आणि बेस कँपच हे रॉयल टॉयलेट
जेवणं होईपर्यंत बर्फही पडायचा थांबला आणि चक्क ऊनही पडलं. सूर्याच्या प्रकाशात किती शक्ती असते मुड सुधारायची. सगळ्यांची मरगळ अचानक गेली आणि पुन्हा गोंगाट सुरु झाला. एक झोप काढुन पुन्हा पत्त्यांचा डाव रंगला. एकाक्षणी आवाज एवढे वाढले की, आता हळू नाहीतर एव्हेलाँच होईल, असं मी म्हणताच बटन दाबून म्युट करावं असे आवाज बंद झाले.
आज कल्पेश परत गेला. तसा तो बरा होता पण 'एवढच पुरे' असं त्याचं मत पडल आणि परत जाणार्या एका ग्रुप बरोबर तो लेहला परत गेला. १७ मधले ३ परत गेले. १४ उरलो.
पुढल्या दिवशी सकाळी क्रॅम्पॉन्स सिलेक्शन उत्साहात सुरु झाले. आपापल्या मापाची जोडी निवडून, घालून जवळ साचलेल्या बर्फावर चालून बघीतलं. श्रीरंगचा हात तसा ठिक असला तरी त्याने ट्रेक करु नये अस दॉरजेच मत होतं कारण बर्फात पाय घसरला तर आधाराला आईस अॅक्स असली तरी एक हात जायबंदी असल्याने त्याला तोल सावरता येणार नाही असं त्याचं मत होतं पण श्रीरंगला ट्रेक करायचाच होता आणि 'आम्ही त्याची जवाबदारी घेऊ' असं बालाजी/राम्/नचीकेत च म्हणणं होतं.
आमचा अॅक्लमटायजेशन वॉक सुरु झाला. एका ओळीत सगळे १३ जण चढत होतो . पहील्या १० मिनीटात संतोष गळपटली आणि परत गेली. मीनल येणार नव्हतीच. सो आता १७ पैकी १२ जण उरलो. हा चढ जीवघेणा होता. आणि ही सुरुवात आहे ट्रेकची... पुढे काय असेल ह्याचा विचार करणं बंद केलं.
वर जाऊन ग्रुप फोटो काढले.
दॉरजेनी सगळ्यांना २ गटात विभागलं. एकात मी, महेश, सुनील, ईश्वर, वरुण आणि निरव आणि उरलेले दुसर्यात. आमच्या गटात मी, महेश आणि सुनील स्लो वॉकर्स होतो, आम्ही ह्या तिघांबरोबर कसे चालणार ??? त्यात माझा नंबर पहीला लावला गेला. आणि आमचा ग्रुप पहीला होता म्हणजे दॉरजेच्या मागोमाग मी... माझ्या स्पीडवर बाकीच्या ग्रुपचा स्पीड ठरणार.. :waiting:
मी विरोध करण्याचा प्रयत्न केला. मला दुसर्या गटात जायचं होतं कारण त्यांच्या स्पीडशी माझा स्पीड जुळत होता आणि उरलेली एकुलती एक फिमेल मेंबर उर्वशी तिकडे होती. मला तिची सोबत झाली असती, शिवाय ती मागच्या वर्षी ईकडे आली असल्याने मानसीक आधार होता. पण दॉरजे ढिम्म हलला नाही. आप इसी ग्रुप मै रहोगे... शेवटी जे होईल ते बघू अस म्हणून आम्ही परत आलो.
जेवणाच्या वेळी 'आता उरलेला दिवस नीट आराम करा. आपण रात्री शार्प ११ ला निघू. तुम्हाला पॅक्ड स्नॅक्स देऊ, त्या प्रमाणे बॅग्ज भरा. नीट लेयरींग करा' वगैरे वगैरे सल्ले देऊन दॉरजे बाजुला झाला आणि आमचा मुख्य कुक हातात मोठ्ठा केक घेऊन आत आला. केक!!! १६५०० फुटांवर केक !!! वॉव.. मस्त केक खाऊन आम्ही टेंट गाठला. मला आणि महेशला आज जाऊ नये असं वाटतं होतं. इथपर्यंत आलो, आता पुरे , इथवर येणं हीच एक अॅचीव्हमेंट आहे वगैर बोलत आम्ही यांत्रीकपणे सॅक्स पॅक करत होतो. अचानक निघतांना आईनी दिलेला अनिरुद्ध बापूंचा फोटो दिसला., त्यात दत्ताची प्रतीमा पण होती. एवढ्या दिवसात हा फोटो आजच अचानक का हातात यावा ? आणि आज गुरुवार.. एरवी आम्हा दोघांचा अश्या योगायोगांवर फार विश्वास नाहीये., पण आज विश्वास ठेवावा असं मनापासून वाटलं. आमची तब्येत ऊत्तम होती., ए एम एस चा काहीही त्रास होत नव्हता, माझी सर्दीही बर्यापैकी आटोक्यात आली होती. मग प्रयत्न न करणं वुड बी अ क्राईम... सो नाऊ नो लुकींग बॅक !!
आज रात्रीच जेवण ६ वाजताच झालं. जेऊन तडक टेंट गाठला आणि झोपून गेलो. ९ च्या दरम्यान 'उठा उठा' अश्या हाका ऐकू येऊ लागल्या. उठलो आणि सगळा ऐवज अंगावर चढवला. होते ते सगळे गरम कपडे चढवले. पायात सॉक्सचे ३ लेयर्स. हातात लोकरी आणि वर वॉटर प्रुफ ग्लोव्ज.. ( आता नाक पुसायची पुरती पंचाईत ). मला लहान मुलांसारख जॅकेटला रुमाल पिनेनी लाऊन ठेवावा अस वाटायला लागलं. शिवाय औषधं, बाकीचा खाऊ, वॉर्मीज, आमचे दोस्त पाँचो ह्या गोष्टी होत्याच. माझ्या सॅक मध्ये दोघांचे क्रॅम्पॉन्स ठेवले आणि महेशच्या सॅकमध्ये जास्तीचं पाणी. शिवाय आम्हाला पॅक्ड सॅन्क्स मिळणार होते. बॅग्ज चांगल्यापैकी जड झाल्या होत्या.
हेड लँप्स चा अपुरा उजेड, त्यात सगळ्यांची लगबग, दॉरजे आणि डॉ च घाई करणं... तो एक दिड तास गोंधळ, उत्सुकता, घाई, टेन्शन अश्या सगळ्या ईमोशन्स नी भरलेला होता. हो, आम्ही टेंटच्या बाहेर आलो तर सुनील महाशय कॅमेरा गळ्यात अडकवून फिरत होते. हा अजुन तयार कसा नाही झाला ? सुनीलला गेले २ दिवस बर्याच वेळा डोकेदुखीचा त्रास सुरु होता शिवाय त्याची झोप होत नव्हती म्हणुन त्याने ऐनवेळी न येण्याचं ठरवलं. एक मेंबर डाऊन .आता ११ जण.
त्यात संध्याकाळी वरुण आणि नीरवला आम्ही दॉरजेशी चर्चा करतांना बघीतल होतं., आमच्या असण्याने त्यांच्या स्पीडवर नक्कीच परीणाम होणार. पण दॉरजेनीच ग्रुप्स बनवले होते आणि आम्ही आनंदाने दुसर्या गटात जायला तयार होतो. त्यामुळे तिकडे फार लक्ष दिलं नाही. नाराज असावेत अस वाटलं कारण ते दोघे आणि ईश्वर सोडल्यास आम्ही दोघे आणि सुनील हळू गटातले होतो.
शेवटी भराभरा अॅस्थीलीन चा राऊंड पार पडला ( अॅस्थीलीन एक औषध आहे, एक कॅप्सुल., ती फुप्फुसांची हवा आत घ्यायची क्षमता वाढवते).. 'चला चला' चा घोष सुरु झाला.. मी नुसती उभीच होते, सगळे माझ्याकडे बघायला लागले. अरे हो, माझाच पहीला नंबर की.. भराभरा चालायला सुरुवात केली.
पहील्या २० पावलातच सकाळी अॅक्लमटायजेशन वॉक केलेली टेकडी आली. मी भराभरा चालत होते. माझ्यामुळे मागच्यांचा स्पीड कमी होऊ नये हे दडपण होतं. थोडेच पुढे गेलो आणि उर्वशी थांबली.. ती पुढे जाईचना. ती सकाळपासुनच गप्प होती. तिला मळमळत होतं. सगळ्यांनी ५/१० मिनीटं तिला समजवायचा प्रयत्न केला, वेळ जात होता.. शेवटी ती परत गेली. अजुन एक मेंबर डाऊन.. उरले शेवटचे १० आणि आता मी एकटीच मुलगी... :P
काही वेळातच टेकडीच्या माथ्यावर पोहोचलो... अरे आपण सकाळी फोटो काढले ती हीच जागा ??? दिवसभरात बर्फाचा चांगलाच जाड थर पसरला होता. दॉरजे आणि मिंगमा बाजुला जाऊन कुजबुज करु लागले. त्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्तच बर्फ होता.
निळ्या जॅकेटमधले आमचे डॉ. सुदर्शन. त्यांच्याबरोबर मिंगमा आणि बाजुला गेंझी.
आता पुढचे टप्पे होते - अॅडव्हान्स बेस कॅम्प, ग्लेशियर, हाय बेस कॅम्प, शोल्डर, रीज आणि समीट..
पुढे चालायला सुरुवात केली. दॉरजे बर्फात पावलं तयार करत जाणार होता. आम्ही त्या पावलांमध्ये पाय टाकत जायचं होतं. ८ पर्यंत शोल्डर पाशी पोहोचलो तर समीट करायची शक्यता आहे असं त्यांच म्हणणं होतं. हेड लँपच्या उजेडात एकाद्या फुटावरचचं दिसत होतं. आजुबाजुला काळाकुट्ट अंधार.. आणि ते बरचं कारण त्याच कारण आम्हाला परत येतांना कळलं.
चालायला सुरुवात केली सुरुवातीलाच पाऊल बर्फात गायब होईल एवढा बर्फ होता. मी मनातल्या मनात एक ते १०० आकडे, ए ते झेड अक्षरे उलट सुलट ( मला अक्षर काही जमली नाहीत), येणारे सगळे श्लोक, स्तोत्र, मराठी, हिंदी, ईंग्लीश कविता, देव, माला, वन, अस्मद, युष्मद, भानु, मधु, धेनु, ईदम्,माता, पिता हे संस्कृत शब्द, मी शाळेत असतांना पाठ केलेली आणि आत्ता आठवणारी शिवाय लेकाला असलेली सुभाषितं, हिंदी, मराठी, ईंग्लीश गाणी, नावं, शहरं, देश, पदार्थ, गाणी, शब्दांच्या भेंड्या अस जे आठवेल ते मनात बोलत राहीले. तरीही अधुन मधुन , अजुन किती वेळ , हा दॉरजे ब्रेक कधी घेणार, आपण कुठे आहोत, किती वाजले असतील, आपण बरोबर चालतोय ना असे विचार येतच होते. हळूहळू पाय पोटरीपर्यंत बर्फात जायला लागला
काही वेळाने की बर्याच वेळाने ? आम्ही बर्फात उठुन दिसणार्या एका ओबडधोबड आकारापाशी जाऊन पोहोचलो. हा अॅडव्हान्स बेस कँप.. मी सरळ त्या दगडांवर स्वतःला झोकून दिलं.. अती अती दमले होते. आणि आधी नाक पुसलं.. :uhoh: बापरे.. जरा थांबलो की हुडहुडी भरत होती. दुसरा ग्रुप अजुन दिसत नव्हता.. जास्त वेळ न देता दॉरजे चालायला लागला.. आता मी आकडे मोजायला सुरुवात केली. ५० झाले की ५ सेकंद अंदाजाने थांबायचं. मध्येच वरुण कुरकुर करायला लागला.. मध्ये मध्ये मी थांबणं त्याला आवडत नव्हतं. मी सरळ दुर्लक्ष केलं.. अजुन काय करु शकत होते !
मध्येच भुरभुर बर्फ पडत होता. आता अजुन दम लागायला लागला.. आम्ही सरळ उभा चढ चढत होतो बहुदा. आता चालतांनाही थंडी वाजायला लागली. पाय अजुन आत बर्फात जाऊ लागले. इतरांच्या मानाने मी लकी होते कारण मला दॉरजेची तयार पावलं मिळत होती. मागे मागे असणार्यांना मात्र अंदाजे चालावं लागत होतं. तरी खूप वेळा धडपडले. उजव्या बाजुला दिसणारा अंधार म्हणजे खोल दरी वगैरे असावी.
जेव्हा आपण एका बाजुला डोंगर आणि दुसरी कडे दरी अश्या रस्त्यावर चालत असतो, तेव्हा हातातली काठी डोंगराच्या बाजुला धरावी. कारण तोल गेला तर ज्या हातात आधार आहे, त्या बाजुला झुकण्याची शरीराची उपजत सवय असते आणि काठी वगैरे जर दरीच्या बाजुच्या हातात असली तर..... त्यामुळे आईस अॅक्स डाव्या हातात धरली होती.
अध्येमध्ये पाय गुडघ्यापर्यंत बर्फात जाऊ लागले होते. आत गेलेला पाय बाहेर काढून पुढच पाऊल टाकेपर्यंत दुसरा पाय आत गेलेला असे. आधीच बर्फात एवढा वेळ चालून शक्ती संपल्यासारखी वाटत होती आणि आता हे नविन चॅलेंज. तरी चालत होतो. शेवटी तो क्षण आलाच. बर्फाचा जोर वाढला.. एवढा की आता पाँचो देवतेला ( हे नचिकेतनी ठेवलेलं नाव. पाँचो देवता.. ) शरण जाण्याशिवाय पर्याय नव्हता. एका ठिकाणी थांबुन कसेबसे ते चढवले. चांगलीच दमछाक होत होती आणि थंडी आता हाडांपर्यंत जाऊन पोहोचली होती. दम लागला होता.. पाय तर केव्हाच बर्फात गाडले गेले होते. कुठे आहोत हे विचारल्यावर दॉरजे म्हणाला, वो देखो हाय बेस कँप... म्हणजे आपण ग्लेशीयर पार केला ??? हाय बेस कँप म्हणजे ३ टप्पे ऑलमोस्ट झाले की.. पण हे ३ टप्पे म्हणजे किस झाड की पत्ती असे पुढचे ३ होते.
नीरव आणि वरुण दॉरजे ला विचारू लागले की ह्या हवेत आणि बर्फात समीट करण्याची कितपत शक्यता आहे .
तर मि दॉरजे म्हणायला लागले, आपको जाना है तो लेके जाऊंगा, वो मेरा काम है... पण भावा, आम्हाला जमेल का ते सांग ना... शेवटी, ईथेच एवढा बर्फ आहे तर शेवटपर्यंत जाणे खूप कठीण आहे असं त्याच मत होतं. जनरली ह्या ट्रेक ला बर्फ ह्याच पॉईंट पासून सुरु होतो. आणि तो ही तुरळक. शोल्डर, रीज, समीटला असतो पण तो ही सहज मॅनेजेबल ( मागच्या वर्षी गेलेल्या टिमचा हाच अनुभव होता आणि यु ट्युब वर आम्ही जे व्हिडीओज पाहीले होते त्यातही एवढे बर्फ दिसत नव्हते )..
मग आम्ही ५ जणांनी क्वीक मिटींग घेतली. एका मिनीटातच परत जायचं ठरलं आणि आम्ही परत निघालोही..दॉरजेनी थांबवायचा जराही प्रयत्न केला नाही तेव्हाच आमचा निर्णय योग्य आहे हे कळलं. आमच्या मागे १० मिनीटांवर दुसरा ग्रुप येत होता. आम्हाला उतरतांना पाहून ते अवाक झाले. डॉ सुदर्शन मला आणि महेशला परत फिरण्यासाठी फोर्स करु लागले. पण आम्ही पक्क ठरवल होतं... फक्त किती वाजलेत हे विचारलं. ४.४०... म्हणजे तब्बल ६ तास चालतोय तब्बल ६ तास आणि ते ही ह्या बर्फात, थंडीत... पण त्या वेळी हे मनात रजिस्टरच झालं नाही. फक्त परत जाणं हेच एक ध्येय असल्या सारखं आम्ही चालायला लागलो.
वरुण आणि नीरव दॉरजेबरोबर भराभर पुढे निघून गेले. आम्हा तिघाबरोबर मदतनीसांपैकी एक जण आला. समीट न करता परत जातांना वाईट वाटेल असं आधी वाटायचं पण गंमत म्हणजे आत्ता शांत, निवांत वाटत होतं. आता टेंट गाठणे हेच एक ध्येय .. पण हा प्रवास जास्त दमवणारा होता. कारण उतरतांना सारखा पाय घसरत होता, तोल जात होता. उजाडू लागलं होत त्यामुळे आपण कोणत्या रस्त्यानी आलो हे कळत होतं आणि धडकी भरत होती. आम्ही आलो तो रस्ता येतांना आम्ही अंधारातच पार केला नसता तर कोणीच एवढा टप्पा गाठू शकलो नसतो. अर्थात असे ट्रेक रात्रीच्या अंधारात सुरु करण्याचे हे पण कारण असावं. ह्या ऊंचीवर आकाश एवढ जवळ आल्यासारखं वाटतं होतं की एक ऊडी मारली असती तरी हात टेकले असते. पण ऊडी मारायची शक्ती होती कोणात !!
आता खांद्यावरची सॅक जास्तच जड झाली होती., शेवटी थर्मास मधल पाणी ओतून दिलं ( हे खरतर चुकीच होतं कारण काही कारणाने बर्फात अडकलो असतो तर पाणी बरोबर असण गरजेचं होतं). शेवटी बरोबर असणार्या मदतनीसानी माझी सॅक घेतली.. बिचारा.. स्वतःची सॅक आणि आता माझी पण..
पडत धडपडत शेवटी आम्ही त्या टेकडीच्या टोकावर पोहोचलो जिथे आम्ही काल सकाळी फोटो काढले होते. टेकडीच्या माथ्यावर आलो आणि हुश्श हुश्श झालं.. तिथे जरा थांबुन बरोबर आणलेलं ज्युस वगैरे प्यायलो . खाली आमचे टेंट दिसत होते.
उरलेला रस्ता जीवाच्या करारानी पार केला. सुनील, संतोश आणि मीनल आमच्या स्वागतासाठी उभे होते . नीरव आणि वरुण केव्हाच पोहोचले होते. ते काल दॉरजेशी जे बोलत होते ते 'आपण जाऊ शकू का' ह्या बाबत होतं. त्या दोघांनाही महेश आणि माझ्यासारखचं 'जायच का नाही' असा विचार पडला होता... गरम गरम चहा घेतला आणि आमचे अनुभव शेअर करुन आम्ही पण टेंट गाठला. ८ वाजता परत आलो.
आत जाऊन झोपायची तयारी करत होतो तेवढ्यात बाहेरुन ' वो बालाजी है क्या' असं ऐकायला आलं. बाहेर आले.. तर टेकडीच्या टोकाशी हालचाल दिसत होती. अर्ध्या तासात ग्रुप नं २ पण परत आला होता. आम्ही जिथुन परत फिरलो त्याच्या पुढे काही अंतर त्यांनी गाठलं , तिथे बर्फाची खोली अजुनच वाढली. सगळे जाम हवालदिल झाले. बर्फ बघुन मिंगमानी परत फिरायचा निर्णय घेतला आणि हा ग्रुप ही परत आला.
त्यांच्याशी गप्पा मारल्या.. आपण परत आलो हे फार बरं झालं सगळ्यांच मत पडलं.. आता जबर थकवा जाणवायला लागला होता. सगळे आपापल्या गुहेत शिरले आणि थोड्याच वेळात सगळीकडे शांतता झाली. १० दिवस न झोपल्यासारखी झोप लागली. बर्फानी आमची सगळी शक्ती शोषुन घेतली होती.
आम्ही परत फिरलो तेव्हा आम्ही १८५०० फुटांवर होतो म्हणजे खारदुंगलाच्या ऊंचीवर. एवढ्या बर्फात चालून ईथे पोहोचणे हे पण एक टास्क होते आणि आम्ही ते पूर्ण केलं. बेस कँप पर्यंत येतांना आम्हाला परत जाणारे जे ग्रुप्स दिसले होते त्यात फक्त एक ट्रेकर समीट करु शकला होता. बाकीच्यांना अर्ध्यावरच परत यावं लागलं. हे सगळे ग्रुप्स परदेशी लोकांचे होते. एकही भारतीय ट्रेकर दिसला नाही. समीटच्या रात्री आमच्या बरोबरच एका कॅनेडीयन ट्रेकर नी चढायला सुरुवात केली. तो एकटाच होता. प्रचंड अनुभवी होता. गाईड वगैरे कोणी नाही. तो ही जेमतेम शोल्डर पर्यंत जाऊन परत आला. अॅनॅलिसीस करतांना अस लक्षात आलं की ह्यावर्षीची प्रचंड थंडी, लांबलेला हिवाळा, पर्यायाने वर डोंगरात सतत पडणारा बर्फ ह्या मुळे त्या दरम्यान कोणालाच समीट करता आलं नाही. पण दॉरजेचे शब्द कायम लक्षात ठेवले आहेत... पर्बत उधरही रहेगा, आपकी जिंदगी एकही है.. उसको सम्हालो., वापस कभीभी आ सकते हो.
एकूणच हा सगळा अनुभव एकदम मंतरलेला आहे. शुन्याच्या खाली ( खालीच असणार ) तापमान असतांना, गुडघ्यापर्यंत बर्फात पाय जात आहेत, नाक गळतय आणि खसखसुन पुसता येत नाहीये, पिरीएड्स कधीही सुरु होऊ शकतात अश्या अवस्थेत मी ९ तासांपेक्षा जास्त वेळ चालले आणि सगळे मिळून ब्रेक्स घेतले असतील अंदाजे २० मि. आपल्यात एवढा स्टॅमिना आहे ह्याची अजुन एकदा जाणीव मला झाली.
हे लिहीलेलं वाचलं आणि ती रात्र पुन्हा जगत आहोत असं वाटलं.. तरी तेव्हा जे जे वाटलं होतं ते सगळं लिहीता येणं शक्य नाहीये.
पुढच्या ( आणि शेवटच्या भागात ) परतीचा प्रवास आणि ह्या ट्रेक मधुन मी काय शिकले !!
(काही फोटो आम्ही काढलेले आणि काही ग्रुप मेंबर्स कडून घेतलेले)