जेहत्ते कालाचे ठायी
हर दुसरा मनुष्य जाई
हिमालयावरी पायी
ट्रेक लागी ।।
आले तियेच्याही मना..
तीव्र झाली कामना
सिद्ध झाली ललना
ट्रेकला जाण्या ।।
वाचा तियेची तयारी
कैसी झाली सवारी
फजिती ही न्यारी
झालीच ना ।।
ट्रेक पूर्ण जाहला
जीव थंडावला
तुम्हालागी आणला
वानोळा हा ।।
आपण स्वप्न पाहतो… आपण स्वप्ने पाहतो… त्यातील एखाद दुसरेच प्रत्यक्षात यावे म्हणून धडपडतो आणि बाकीची स्वप्ने कधीतरी नवलाईने आंजारायला गोंजारायला असावीत म्हणून त्यांना स्वप्न म्हणूनच राहू देतो.
हाय अल्टिट्युड ट्रेक हे माझे एक असेच स्वप्न होते, नेहमी भुरळ पाडणारे आणि तरीही प्रत्यक्षात आले तर इतक्या उंचीवर चालताना काहीशी धास्तीच वाटावी असे. त्यामुळे वर्षानुवर्ष ते स्वप्न प्रत्यक्षात न येता स्वप्नच राहिले होते.
नोव्हेंबरमध्ये माझी मैत्रीण धनश्री जगताप इंडियाहाईक्सबरोबर देवरिया ताल चंद्रशिला हा ट्रेक करून आली. तिच्याशी गप्पा मारताना या ट्रेकची सविस्तर माहिती मिळाली. मार्च एप्रिलमध्ये या संपूर्ण रस्त्यावर ऱ्होडोडेंड्रॉनची फुले फुललेली असतात असेही कळले… आणि मनातल्या स्वप्नाला पुन्हा एकदा जाग आली.
असे म्हणतात की देवरिया ताल म्हणजे जिथे यक्षाने युधिष्ठिराला प्रश्न विचारले ते तळे. वाटेत लागणारे तुंगनाथ हे तर जगातले सर्वात उंचावर असणारे शंकराचे मंदिर, पंच केदारापैकी एक. हे पांडवांनी बांधले आहे असे सांगितले जाते. ट्रेकचा समिट पॉईंट म्हणजे चंद्रशिला. जिथे चंद्राने तपश्चर्या केली ती जागा. असेही म्हणतात की राम रावण युद्धानंतर रामाने इथे तपश्चर्या केली होती. शिवाय ऱ्होडोडेंड्रॉन किंवा बुरांश या फुलांनी फुललेली जंगले हे देखील मोहात पाडायला पुरेसे होते. पाय मागे खेचणारी एकच गोष्ट होती ती म्हणजे या ठिकाणांची उंची!!! बारा हजार फूटांच्यापेक्षाही जास्त उंचीवर, हवा विरळ असताना, आपल्याला नीट श्वास घेता येईल का नाही याची भीती मनात होती. पण ह्या ट्रेकला गेले तर सोबत स्नेहा, केदार, राजश्री असणार होते. मग हिंमत गोळा करून रजिस्ट्रेशन केले आणि सुरू झाली ट्रेकची तयारी.
रजिस्ट्रेशन केल्या गेल्या टीएमटी टेस्ट करून घेतली. 58 वर्षांवरच्या प्रत्येकासाठी इंडिया हाईक्सने ट्रेडमिलटेस्ट अनिवार्य केली आहे. ती नॉर्मल आल्यावर मग ट्रेक च्या फिटनेसच्या तयारीला सुरुवात केली. इंडिया हाइक्स फिटनेस विषयी खूपच जागरूक असते आणि फिटनेस सर्टिफिकेट मिळाल्याखेरीज तुम्हाला ट्रेकला जाता येत नाही. त्यामुळे मग वेगाने चालणे, भरपूर चालणे, त्याचे रेकॉर्ड् ठेवणे, जिने चढणे उतरणे, जवळपासच्या ठिकाणी हाईकना जाणे हे सुरू केले.
पण म्हणतात तसे सगळेच सुरळीत पार पडत असले तर मग आयुष्यात थ्रिल ते काय !! टाच दुखायची थांबली होती, तिच्या लक्षात आले की आपले महत्व कमी होते आहे. तिने परत आपले स्वतंत्र अस्तित्व आणि इच्छा जाणवून द्यायला सुरुवात केली. मी टाच टेकायची म्हटली रे म्हटली की अशी काही चवताळून उठायची टाच, की मी आपली म्हणणार, “बरं बाई, तुझ्या मनासारखे ..नाही टेकत..मग तर झाले?!!! “ पण चालायला गेल्यावर मात्र मी तिचे काहीच ऐकत नाहीये असे तिच्या लक्षात आले. मग आपोआप सुतासारखी सरळ आली. अर्थात त्यासाठी माझ्या योगशिक्षिका ऋचा ताईंना विचारून पायाचे व्यायाम करायला सुरुवात केली होती. शिवाय एक छान गोल बाटली पावलाखाली धरून ती जोरात दाबून मागेपुढे गोल गोल फिरवायची असेही केले. त्या सगळ्याचा परिणाम म्हणून टाच एकदम शान्त ..म्हणजे बरी झाली.
टाचेचे प्रकरण निभतंय की नाही तो अचानक डोळाच लाल झाला. एक दिवस वाट पाहून गेले डॉक्टरांकडे. कारण हाय अल्टीट्युड ला आणखी काही व्हायला नको. डॉक्टरांनी ड्रॉप्स घालायला दिले. पण दोन दिवसांनी तर डोळा इतका लालभडक झाला की मी आरामातच असले तरी माझ्याकडे पाहणाऱ्यांना माझा डोळा पाहवेना! परत माझी डॉक्टरांकडे फेरी. डॉक्टर म्हणाल्या की ही डोळा बरे होण्यातील एक स्टेज आहे आणि मी सुटकेचा नि:श्वास टाकला. तसेही आत्तापर्यंत माझा 'टाच दुखो की डोळा लाल होवो, आपण ट्रेकला जायचे म्हणजे जायचेच' असा दृढ का काय तो निश्चय झालाच होता!!
मनाची आणि शरीराची अशी तयारी झाल्यानंतर सुरू झाली सामानाची जमवाजमव. आमच्या आधी ह्याच ट्रेकला जाऊन आलेला आमचा मित्र स्वप्नील लाखे म्हणाला होता की आपण ट्रेक साठी दहा हजार रुपये भरतो आणि ट्रेक साठीची खरेदीच 25 हजारांची करतो!! ते लक्षात होते. त्यामुळे कमीत कमी गोष्टी विकत घ्यायच्या असे ठरवले होते.
ट्रेकसाठीचे विशेष बूट मात्र आधीच विकत घेतले आणि ते घालून चालायची प्रॅक्टिस केली. बूट आणि पावले ह्यांना एकमेकांची संगत सुसह्य व्हायची तर असे करणे आवश्यकच होते. ट्रेकिंग पोल्स आणि हेड लॅम्प्स हे इंडिया हाईक्सकडून भाड्याने घेतले. बाकी सामानापैकी घरात काही होते. भाचेसून आणि भाचा ट्रेक्सना जात असतात. त्यांचे काही सामान घेतले. बहिणीकडे थंडीत घालायची हलकी जॅकेट्स होती. ती घेतली आणि म्हणतात तसे सोंग सजले!!
फिटनेस सर्टिफिकेट मिळाले आणि मग खऱ्या उत्साहाने ट्रेकची बॅग भरायला सुरुवात केली. कमीत कमी सामान न्यायचे, ड्रायफिट आणि हलके कपडे न्यायचे हे ठरवले होते. तयारीसाठी इंडिया हाईक्सच्या अनेक व्हिडिओज उपलब्ध आहेत, त्याचा खूप फायदा झाला.
जरी हा एप्रिलमधला आणि स्प्रिंग हाईक होता, तरी कपड्यांचे तीन ते चार थर आवश्यक असणार होते. कारण तापमान बहुतेक दिवशी एक अंकीच असणार होते. शेवटच्या टप्प्यात बर्फही लागणार होता. त्या विचारानेच हुडहुडी भरत होती. कारण गेली अनेक वर्षे तापमान किमान विशीत खरे तर तिशीतच असायची सवय झाली होती. थंडीसाठी आवश्यक ते सगळे सामान भरले आणि डेहराडूनला जाणाऱ्या विमानात बसले. डेहराडून हुन आम्ही ऋषिकेशला टॅक्सीने जाणार होतो आणि तिथून ट्रेकमधील सर्वजण सोबतच सारीला म्हणजे बेसकॅम्पला जाणार होतो.
वयाच्या साठीमध्ये आयुष्यातला पहिल्या हाय अल्टीट्युड ट्रेकसाठी निघताना मनात अपार उत्सुकता दाटून आली होती. सुरुवातीला वाटणारी भीती बरीचशी कमी झाली होती. डेहराडूनचा विमानतळ लहानसा,आटोपशीर, स्वच्छ आणि सुंदर आहे. बाहेरच्या सर्व खांबांवर गायत्री मंत्र कोरलेला आहे. आम्ही पोहोचलो तेव्हा सूर्याचे मावळते किरण त्या खांबांवर पडलेले होते.
डेहराडून पासून ऋषिकेश टॅक्सीने साधारण अर्ध्या तासावर आहे. दुसऱ्या दिवशी ऋषिकेश मध्ये थोडेफार हिंडलो, काही खरेदी बाकी होती ती केली. तिसऱ्या दिवशी सकाळी इंडियाहाइक्स सांगितलेल्या ठिकाणी एकत्र जमलो आणि टीम मधले सर्वजण सोबतच सारी येथील बेस कॅम्पला गेलो.
अशी तीन वाहने होती. सकाळी साडेसात आठ ला ऋषिकेशहुन निघालेलो आम्ही, सारीला पोचायला दोन अडीच वाजले होते.
त्यापुढे मग जे सामान भाड्याने घेण्यासाठी नोंदवले आहे ते ताब्यात घेणे, एकमेकांची ओळख, ट्रेक लीडर, ट्रेक गाईड्सची ओळख सत्रे झाली. प्रत्येकाचे फॉर्म्स चेक करून ट्रेक लीडर साहिल प्रत्येकाशी वैयक्तिकरित्या बोलला. नंतर ट्रेक मध्ये घ्यायची काळजी, नियम हे सगळे आम्हाला ट्रेक लीडर आणि ट्रेक गाईड्सनी समजावून सांगितले.
सारी कॅम्प मधून चंद्रशिला दिसते, ते बघताना, आपण चार दिवसांत तिथे, इतक्या उंचीवर असणार आहोत हे खरेच वाटत नव्हते.
टेन्ट मधील बंकबेड्स, पाणी असलेली टॉयलेट्स, बसायला बाके आणि समोर टेबल असलेले जेवण घर ही ट्रेक मधली शेवटची चैन बेसकॅम्पमध्ये अनुभवली!! तसेही अंघोळ नामक प्रकार तर ट्रेक संपल्यावर परत ऋषिकेश मुक्कामी गेल्यावरच करता येणार होता!! रोज आंघोळ करणे ही अंधश्रद्धा आहे असेच सर्व ट्रेकर्सचे मत असावे!!
ह्या लेखमालिके मध्ये अनेक फोटोज आहेत. इतके इथे अपलोड करणे शक्य नाही. माझ्या ब्लॉगवर ते आहेत. (कृपया माझ्या ब्लॉगची जाहिरात करते आहे असे समजू नका!! )त्याची लिंक सोबत देते. ज्याना उत्सुकता असेल त्यांना फोटोज पाहता येतील.
दुसऱ्या दिवशी सकाळी ट्रेकला सुरुवात झाली तीच एका तीव्र चढणीने!! चढताना एका क्षणी मागे वळून आम्ही सारी बेस कॅम्पचा निरोप घेतला. परत येउ तेव्हा ट्रेक यशस्वीरित्या पूर्ण केला असेल की नाही, ते माहिती नव्हते. पण अनुभवसमृद्ध मात्र नक्की होऊन परत येऊ ह्याची ग्वाही मनातच दिली.
रस्ता ओबडधोबड दगडांनी तयार केलेला होता. पण भुसभुशीत मातीत पाय घसरण्यापेक्षा दगड परवडले असे मनाला सांगत चढण चढत होते.
ह्या फोटोवरून चढ किती होता त्याचा तर अंदाज येईल पण आम्ही सगळे कसे चढत होतो ते कळायचे असेल तर व्हिडिओ आहे ना!
https://youtube.com/shorts/CJuWDSml8XU?feature=share
रस्त्याचा सुरुवातीचा काही भाग लोकवस्तीतून जाणारा. पण तेथील घरेही अगदी तुरळक आणि तशी लांब लांब. हिरवीगार शेते मात्र दिसत होती. डोंगर उतारावर पायऱ्यांसारखे बांध घालत केलेली ही शेती संपूर्ण उतार जिवंत करत होती.
तासभर तीव्र चढणीचा रस्ता पार केल्यानंतर थोडया वेळाने तुलनेने जरा सपाट भाग आला तेव्हा हृदयाने थँक्यू म्हणायला सुरूवात केली!! तिथून चंद्रशिला शिखराचे दर्शन देखील झाले.
साधारण तासा दीड तासाने आम्हाला थोडी विश्रांती मिळाली ती देखील जरा सपाट जागेवर!इथून पुन्हा एकदा थोड्या वेळासाठी सारी गाव दिसू लागले. चढणीने श्वासाचा वेग वाढलेला असला तरी इतक्या दिवसांच्या तयारी आणि वाट पाहण्यानंतर खरा ट्रेक सुरु झाल्याचा आनंद अवर्णनीय होता. वाटेत एखाद दुसरे बुरांशचे झाड फुललेले दिसले की पावलांचा वेग कमी होत होता. काहीजण फोटो काढत होते. तेव्हा ट्रेक गाईड सांगत होते की आपल्या कॅम्प जवळ भरपूर झाडे आहेत फुललेली.
रस्ता आता जंगलातून जात होता. आसपास मानवी वस्तीच्या खुणा नाहीत. झाडांतून गाळून येणारे ऊन, सतत एका बाजूने साथीला असणारा डोंगरकडा आणि आमची टीम.
काही वेळानंतर एक मोठे असे गवताळ पठार लागले. पठाराला उत्तराखंडमध्ये बुग्याल म्हणतात आणि प्रत्येक पठाराला शिवाय स्वतःचे नाव देखील असते. ह्याचे नाव होते रोपीनी बुग्याल. तिथे आम्हाला विश्रांतीसाठी थोडा वेळ मिळाला होता.
इथेच आम्हांला चौखंबा शिखरे देखील दिसली पण त्यांचा सतत लपंडाव चालू होता. क्षणार्धात दिसायची तर क्षणार्धात ढगांआड दडायची.
ढग येत जात असले तरी ऊन देखील होते. चालण्याच्या श्रमाने सगळेच घामेघूम झालो होतो. खडबडीत दगडी रस्ते, डोंगर वाटा ह्यातून काही तास चालल्यावर जंगलातला रस्ता आला. कितीतरी ऱ्होडोडेंड्रॉन्स फुलले होते. मन अगदी प्रसन्न झाले.
फोटोंसाठी रेंगाळणाऱ्या काहीजणांना आमचे ट्रेक गाईड "चलो चलो कीप मुविंग " म्हणत पुढे नेत होते. त्यांचेही बरोबर होते. कारण अजून एक अवघड चढण बाकी होती. माध्यान्हीचे ऊन तळपत होते.
असे पाहताना चढण चढणे अवघड वाटले तरी खरी कसोटी लागते ती उतारावर!! इतका मोठा देह उतारावरून सरळ गडगडत खाली जाऊ नये म्हणून पाय जास्त रोवून टाकायला लागतात!!!
ह्या चढानंतरचा उतार उतरत असतानाच तळ्याची चाहूल लागू लागली. नितळ जलाशय दिसले की एक वेगळीच अनुभूती येते. देवरिया ताल दिसले आणि इतका वेळ चालण्याचे सगळे श्रम निमाले. फार सुंदर दृश्य होते ते.
हवा तेवढी स्वच्छ नव्हती म्हणून पर्वत शिखरांची प्रतिबिंबे मात्र पाण्यात पाहता आली नाहीत. एरवी हवा स्वच्छ असताना इथे चौखंबा शिखरे प्रत्यक्ष आणि त्यांची प्रतिबिंबे पाण्यात असे अप्रतिम दृश्य दिसते. पण जे पाहायला मिळाले तेही काही कमी सुंदर नव्हते.
झाडीने वेढलेला जलाशय, अधून मधून पांढरी फुले फुललेली, जलाशया भोवतीचा रस्ता, शेजारून चढत जाणारी वाट सगळेच सुंदर होते.
आमच्या चार दिवसांच्या ट्रेकचा मार्ग असा होता. पहिला आणि सहावा दिवस सारी ते ऋषिकेश प्रवासासाठी होता.
पण अर्थातच देवरियाताल च्या जवळ एखादा गाडीने येण्याजोगा रस्ता असणार. सारी ते देवरियाताल ह्या जंगलातून डोंगरातून येणाऱ्या संपूर्ण रस्त्यात आम्हाला फक्त दोन स्थानिक महिला, त्याही फांद्या आणि लाकडे जमा करण्यासाठी आलेल्या दिसल्या.
पण देवरियातालच्या भोवती मात्र अनेक पर्यटक होते. फोटोज, सेल्फीज, रील्स साठी चित्रविचित्र गोष्टी करत होते. जवळच वनविभागाची केबिन होती. वनाधिकाऱ्यांनी पाण्यात जायला, पाण्यात काही टाकायला मनाई केलेली असताना देखील लोक पाण्यात उतरू पाहत होते. मग त्यांना अडवायसाठी वनाधिकाऱ्यांच्या शिट्ट्या वाजत होत्या. खरे तर ही वर्दळ आणि आवाज आपल्या शहरांशी तुलना करता, ०. ००१ % देखील नसेल. पण काही तास जंगलातील शांतता अनुभवल्यावर इतका आवाजदेखील नकोसा वाटत होता. येणाऱ्या पर्यटकांनी टाकलेला थोडाफार कचरा आजूबाजूला दिसत होता. ते सगळे पाहून आपण बेजवाबदार पर्यटक नसून जबाबदार ट्रेकर आहोत ह्याचे हायसे वाटले.
आमचा त्या दिवशीचा कॅम्प देवरियाताल येथेच होता. पण वनविभागाची तलावाजवळ कॅम्पिंग करायला परवानगी नसल्याने तिथून साधारण ५०० मीटर अंतरावर, त्याच वाटेने चढत जाऊन मग कॅम्प येणार होता.
आज सारीपासून देवरियाताल पर्यंत येताना आम्ही ६५६० फुटांपासून ते ७८१० फुटांपर्यंत मजल मारली होती.
कॅम्पवर पोचल्यावर जेवण झाले. कितीही दमला असाल तरी झोपू नका असे आम्हाला ट्रेकलीडर साहिल ने सांगितले होते. त्यामुळे जेवण झाल्यावर अजून उंचावर एक व्ह्यू पॉइंट होता तिथे जाऊन निवांत बसलो. 360 अंशातून दिसणाऱ्या पर्वतरांगा, थोडे धुके, थोडे ढग, बूरांश ची फुललेली झाडे, झाडांच्या आडून डोकावणारे देवरिया ताल ..ते दृश्य आता आठवणीत कायम राहणार आहे.
थोड्या वेळाने आम्ही सगळेजण पुन्हा देवरियाताल जवळ गेलो. तिथेच आमचे दुपारचे खाणे आणि चहा असणार होता. आता जवळपास सगळे पर्यटक परत गेले होते. आम्हां २५ जणांखेरीज अगदीच एखाददुसरे कोणी त्या परिसरांत असेल.
संध्याकाळच्या तिरप्या सूर्यकिरणांनी तळ्याचे रूप तर बदलले होतेच. आमच्या सगळ्यांचा मूड देखील बदलला होता.
थंडी आता चांगलीच जाणवू लागली होती. सगळ्यांनी स्वतःला जॅकेट्स आणि कॅप्स मध्ये लपेटून घेतले होते. आमचे ट्रेक गाईड अमितजी ह्यांनी तिथे आम्हांला यक्षप्रश्न ची कथा इतकी रंगवून सांगितली की ऐकण्यात आम्ही मग्न होऊन गेलो होतो.
यक्षाच्या प्रश्नांना युधिष्ठिराने उत्तरे दिली. कथा संपली. आता स्वतःच्या मनातील विचारांना निरखत, सूर्यास्त अनुभवत त्या निरव वातावरणात आम्ही शांतपणे बसलो होतो.
सूर्यास्त झाला. आता कॅम्पवर परत जायची वेळ झाली. पण इतक्या सुंदर ठिकाणी एक ग्रुप फोटो तर व्हायलाच हवा ना?!!
काल सकाळी अनोळखी असलेलो,पहिल्यांदा भेटलेलो आम्ही २२ जण आणि आमचे ट्रेक लीडर, ट्रेक गाईड असे तीन जण , आज संध्याकाळपर्यंत मैत्रीच्या धाग्याने जोडलो गेलो होतो.
ह्या लेखमालिके मध्ये अनेक फोटोज आहेत. इतके इथे अपलोड करणे शक्य नाही. माझ्या ब्लॉगवर ते आहेत. (कृपया माझ्या ब्लॉगची जाहिरात करते आहे असे समजू नका!! )त्याची लिंक सोबत देते. ज्याना उत्सुकता असेल त्यांना फोटोज पाहता येतील.
https://silvervegantravels.blogspot.com/2024/04/2.html
ट्रेकचा तिसरा दिवस. कालचा सारी- देवरियाताल प्रवास तर खूपच छान झाला होता. पायही दुखले नव्हते की थकल्यासारखे देखील वाटले नव्हते. त्यामुळे उत्साहाने आजच्या दिवसाला सुरुवात केली. आजचा दिवस तसा अवघड असेल अशी, इंडियाहाईक्सच्या वेब साईटवरचे वर्णन वाचून कल्पना आली होती. आज अंतर नऊ किलोमीटरपेक्षा जास्त होते. पण वाटेत अनेक शिखरे दिसणार होती. घनदाट जंगलातून जाणार होतो त्यामुळे अनेक पक्षीही दिसणार होते. त्याचीही उत्सुकता होती.
सगळेजण देवरियाताल कॅम्पसाईट मधून बाहेर पडलो. अवघे एक दिवस वास्तव्य केलेले असले तरी मन थोडेतरी गुंतलेले असतेच.
देवरियातालच्या रस्त्याच्या डाव्या बाजूने एक जंगलवाटेचा फाटा होता. त्या वाटेने आम्ही निघालो. थोडा वेळ चालल्यावर आम्हाला पुन्हा एकदा चंद्रशिला शिखर दिसणार होते. अधून मधून दिसणारे हे शिखर आपल्याला कुठे पोचायचे आहे त्याची जाणीव करून द्यायचे, त्यानेही एक नवे बळ मिळायचे. पण आज आकाश इतके ढगाळ होते की शिखर दिसलेच नाही.उजवीकडे पुन्हा एकदा सारी गाव मात्र दिसले.
इतका चढ दिसत असला तरी हा दिवसातील सर्वात सोपा भाग होता किंवा आम्ही नुकतीच चालायला सुरुवात केली होती म्हणूनही तसे वाटत असेल. डोंगरकडयांवरून आम्ही चालत असल्याने दोन्हीकडची विस्तीर्ण भूप्रदेश दिसत होता.
जंगलातील पायवाट अधूनमधून दगडांनी सुनिश्चित केलेली होती. त्यातच मध्येच झाडांची मूळे येत होती. ऱ्होडोडेंड्रॉनची अनेक झाडे फुललेली होती. आमच्या टीम खेरीज दुसरे कोणीही दिसत नव्हते. इतकी चिंचोळी वाट होती. पण त्या दिवशी चालताना तसे विशेष जाणवले नव्हते. फक्त आम्हाला सूचना दिलेली होती की इतकी अरुंद जागा असेल तेव्हा वॉकिंग पोल टेकतांना डोंगराच्या बाजूला टेकायचा, दरीच्या नाही. कारण तिथे पानांखाली पोकळ जागा असेल तर दिसणार नाही आणि काठी घसरेल.
खरे तर कॅम्पमधून निघून पाऊणतासच झाला होता. पण इतके चढ उतार पार केल्याने बॅगसकटच दोन मिनिटे थांबलो होतो. हा एवढा चढ चढून गेलो की मग झंडी टॉप आलेच असते. तिथे असणार होता आमचा विश्रांतीचा टप्पा.
लवकरच झंडी टॉप आले. हवा स्वच्छ असती तर इथून हिमाच्छादित शिखरे दिसली असती. पण आज खूप ढग होते.
आम्हाला वाटेत खाण्यासाठी खाऊ म्हणून रोज एक सफरचंद आणि चणे, फुटाणे, खारका दयायचे!!संधी मिळाली की आधी सफरचंद खाण्याचे कारण म्हणजे तेवढीच बॅग हलकी होते आणि पाठीवर कमी ओझे वाहायला लागते!!आम्ही जिथे थांबलो होतो त्या ठिकाणालाच झंडी टॉप म्हणतात. नंतर कळले की त्या भागात टेकडीवरच्या सर्वात उंच ठिकाणाला झंडी टॉप किंवा झंडी धार म्हणतात. म्हणजे कदाचित असे अनेक झंडी टॉप प्रत्येक ट्रेकवर असतील!!
झंडी टॉपहुन निघाल्यावर रस्ता अधिक सुंदर झाला. जंगल अधिक घनदाट झाले. माथ्यावर झाडे झुलत होती. त्यांच्या पानांचे रंग विलोभनीय होते. ही बहुतेक भारतीय मेपलची झाडे असावीत. रस्त्यावर माती दिसतच नव्हती. झाडावरून गळून पडलेल्या वाळलेल्या पानांच्या पायघड्या होत्या. त्यात मध्येच कुठे गवतफुले फुललेली होती. कुठे कुठे ऱ्होडोडेंड्रॉनच्या पाकळ्या दिसत होत्या. निघाल्या पासून आता जवळपास तीन तास झाले होते. सतत चढ उतार करून दगदग तर नक्कीच होत होती. पण समोर दिसणारे दृश्य असे असेल तर थकवा का जाणवेल?
आता पुन्हा एकदा सगळीकडे ऱ्होडोडेंड्रॉन्स फुललेले दिसू लागले. त्यांचा आनंद घेणार इतक्यात पावसाला सुरुवात झाली. सगळ्यांची रेनकोट घालणे आणि बॅग कव्हर करणे ह्याची धावपळ झाली. पावसाने हात देखील गारठून गेले होते. त्यात रस्ता सतत चढ उताराचा.
असा चढाचा रस्ता पावसात पार केल्यावर आला पुन्हा उतार!! आज इतक्या तासात सपाट रस्ता फारच क्वचित मिळाला.
चोहीकडे फुललेली लाल गुलाबी जांभळट फुले, त्यांच्या पाकळ्या गळून वाटेत पडलेल्या... ह्या सौंदर्यापुढे चढण उतरण ओलांडणे,पाऊस, दमणे सगळे क्षुल्लक होते! 'फूल खिलते रहेंगे दुनियामे ..रोज निकलेगी बात फुलोंकी' ह्याच ओळी सतत आठवत राहिल्या.
पाऊस कमी झाला. तुलनेने थोडा सपाट भूभाग आला आणि मग आमची दुपारच्या जेवणाची जागा ठरली. आता कॅम्पमधून निघून पाच तास झाले होते. जेवणात आमच्या सोबतीला म्हणा किंवा राखणीला म्हणा दोन कुत्रे हजर होते.
जेवणांनंतर परत चालायला सुरुवात केली. अजून बरीच मजल बाकी होती. पुन्हा उताराचा आणि चढाचा सिलसिला चालू राहिला. बऱ्याच वेळानंतर मग एक पठार आले.. सुप्रसिद्ध रोहिणी बुग्याल.
आता हा आमचा फोटो बघताना डिस्कव्हरी चॅनल बघतो आहोत असे वाटते. इतक्या विस्तीर्ण पठारावर आम्ही चालतो आहोत ते फक्त ठिपक्यांसारखे दिसतो आहोत. निसर्गापुढे मानव किती क्षुद्र आहे ह्याची अगणित वेळा झालेली जाणीव पुन्हा एकदा नव्याने होते आहे.
फार वेळ बसून चालणार नव्हतेच. अजून स्यालमी कॅम्पसाईट लांब होती. पुन्हा एक तीव्र चढ पार केला आणि मग आला अतिशय तीव्र उतार. आडवे आडवे पाऊल टाकत उतरले तरी तोल सावरताना पाय थरथरू लागले होते असा उतार. पावले ठाम होती पण त्यांच्यावरचे पाय मात्र थरथरत होते. म्हटले मी त्यांना ," असं करून कसं चालेल? पावले नेतील तिकडे जायलाच लागेल नं? मग थरथरायचे कशाला?" पण माझ्या counselling skills ची पायांनी पार ऐशी की तैशी केली आणि उतार संपेपर्यंत थरथरणे काही त्यांनी थांबवले नाही. एकच गोष्ट चांगली होती की थरथरत का होईना त्यांनी आपला वेग फारसा कमी केला नव्हता. त्यामुळे मी सर्वांच्या सोबतच राहू शकले. मागे पडले नाही.
अर्थात उतरताना किंवा चढताना कधी हात द्यायला लागलाच तर केदार होता, ट्रेक लीडर साहिल होता, आमचे ट्रेक गाईड्स अमितजी आणि प्रमोदजी होते.
एक महत्वाचा धडा त्या दिवशी मिळाला की इतके तीव्र चढ उतार असतील त्या वेळी नी कॅप्स घालायला हव्या. मग दुसऱ्या दिवशीपासून नीकॅप्स घालायला सुरुवात केली आणि चढणे उतरणे खूपच सोपे झाले.
तसेच तुम्ही फोटोमध्ये आमच्या हातात वॉकिंग पोल्स पाहत असाल. त्याचा पण खूप फायदा होतो. स्यालमी कॅम्पसाईट वरून दिसू लागली आणि उरलेला उतार पटापट संपला.. किंवा निदान तसे वाटले तरी!!!
आज आम्ही साधारण सात साडेसात तास चाललो होतो. खरे तर अंतर तसे ९. १ किलोमीटरच होते. पण सतत चढ आणि उतार आणि त्यात जंगलातल्या डोंगरवाटा त्यामुळे इतका वेळ लागला. अनेकदा उंचावर जात आणि नंतर उतरत अखेर आम्ही कालच्या कॅम्पपेक्षा दोनशे फूट खालीच आलो होतो.
त्या दिवसाविषयी आठवताना मी विचार करते की त्या दिवसाने मला काय दिले?
संपूर्ण रस्ता कष्टप्रद होता हे तर खरेच. एरवी जे डोंगराचे चढ आणि उतार चित्रात, फोटोत किंवा लांबून बघताना मोहक वाटतात ते प्रत्यक्ष चालताना आपली फजिती करतात हे अनुभवले.
शिखरे दिसणार होती ती ढगाळ हवामानामुळे दिसली नाहीत. पक्षी दिसणार होते तेही पावसामुळे विशेष दिसले नाहीत. एक सुतार पक्षी दिसला तेवढाच. इतर ऋतुत ह्याच ट्रेकला आले असते तर कदाचित ते सगळे दिसले असते. पण आत्ता मला फुले दिसली त्याचे काय? ती कशी इतर वेळी दिसली असती? तेव्हा जे मिळाले नाही त्या विषयी खंत करत न बसता, जे मिळाले आहे त्याचे मोल जाणण्याचा धडा पुन्हा एकवार मिळाला.
'चरैवेती चरैवेती येही तो मंत्र है अपना' हे वारंवार स्वतःला सांगता आले.
एका दिवसांत खूप काही शिकता आले. आमच्या टीममध्ये मी सर्वात मोठी. त्यामुळे दोन दिवस माझा उत्साह, निश्चय आणि फिटनेस चे भरपूर कौतुक झाले होते. पण थरथरलेल्या पायांनी मला माझी खरी जागा दाखवली!! आणि त्या कौतुकाला खरेच पात्र व्हायचे असेल तर भरपूर व्यायाम सातत्याने करायला हवा हे ही शिकवले.
इतकेच काय कॅम्पवर आल्यावर मी स्नेहाला म्हटले सुद्धा ," मी इथेच थांबवू की काय ट्रेक?" अर्थात पुढे जायचे थांबवले असते तरी त्या कॅम्पवर कोणतेही वाहन येणे शक्यच नव्हते. आम्ही अगदीच दुर्गम ठिकाणी होतो. त्यामुळे तिथून कुठेतरी भरपूर चालत जाऊन मगच परत बेसकॅम्पवर जाता आले असते. पण स्नेहा म्हणाली,
"उद्याचा दिवस चाल .. मग बघू या!!!"
उद्याचा दिवस खूप छान असणार होता. संपूर्ण वाट घनदाट जंगलातूनच जाणार होती. शिवाय एक नदी लागणार होती.
ह्या लेखमालिके मध्ये अनेक फोटोज आहेत. इतके इथे अपलोड करणे शक्य नाही. माझ्या ब्लॉगवर ते आहेत. (कृपया माझ्या ब्लॉगची जाहिरात करते आहे असे समजू नका!! )त्याची लिंक सोबत देते. ज्याना उत्सुकता असेल त्यांना फोटोज पाहता येतील.
https://silvervegantravels.blogspot.com/2024/05/3.html
आदल्या संध्याकाळी भुरभुरत असलेल्या पावसाने हवेतला गारवा अजूनच वाढवला होता. इतक्या लहान तंबूमध्ये झोपण्याची पहिलीच वेळ होती. पण सुरुवातीचे दोन तास सोडले तर नंतरचे पाच तास चांगली झोप झाली. अगदी प्रसन्न जाग आली.काल एकदाच क्षणभर का होईना, मनात तरळून गेलेला,"आपण ट्रेक इथेच थांबवावा का?"ह्या विचाराचा आज कुठे मागमूसही उरला नव्हता. मनात होते,
"इरादे अगर पक्के हो, तो डगमगाए कदम क्यु?
हौसले बुलंद हो तो सहमा सा हो मन क्यु?
मंज़िल अब दूर नहीं.. बस संभल के चलना,
कभी न रुकना, हार ना मानना, बस्स .. चलते रहना।"
- वृंदा टिळक
आमच्या सगळ्याच कॅम्पसाईट्स भन्नाट जागांवर होत्या. आजची स्यालमीची कॅम्प साईट देखील त्याला अपवाद नव्हती. नजर पोचेल तिथपर्यंत फक्त पर्वत रांगा आणि जंगल. मानवी वस्तीची जवळपास काहीच चाहूल नाही.
सगळ्यांचे आवरून वॉर्म अप करून आम्ही निघालो. आजचा सगळा रस्ता सुंदर असणार होता. काल इतके चढ उतार चढून उतरून आता सगळ्यांची चांगली तयारी झाली होती. शिवाय आज मी नीकॅप्स देखील घातल्या होत्या!! त्यामुळे समजा जरी आज रस्ता अवघड असला असता तरी काळजीचे काही कारण नव्हते. हरहर महादेव!!
एका संस्मरणीय ट्रेक मध्ये असावे ते सगळे आज होते. चढ उतार होते, घनदाट जंगल होते, पक्ष्यांचे वेगवेगळे आवाज होते, वन्य श्वापदे येऊन गेल्याच्या खुणा होत्या, ऱ्होडोडेंड्रॉन तर होतेच शिवाय इतरही रानफुले होती, झरे, धबधबे, नदी सगळे सगळे होते. आजच्या दिवसाचे निसर्गवैभव काही खासच होते.
हा उतार देखील खूप तीव्र होता. पण कालच्या प्रॅक्टिस नंतर आज तो तितकासा त्रासदायक वाटला नाही.
अधूनमधून असे पाण्याचे प्रवाह दिसत होते.
आज जंगलातला रस्ता, फुलझाडे आणि जवळ असलेले पाण्याचे साठे ह्यामुळे बऱ्याच पक्ष्यांची चाहूल लागत होती. मध्येच किलबिलाट ऐकू येत होता. गेल्या तीन दिवसांत दिसली होती त्यापेक्षा वेगळी फुले दिसत होती.
ह्या फुलांचे नाव Himalayan Peony. हिमालयात रानटी फुल म्हणून वाढते. ह्याचे अनेक औषधी उपयोग असल्याने त्याला हिमालयन पॅरासिटामॉल पण म्हणतात.
इतक्या दिवसांत कुठे न दिसलेले बांबू देखील दिसले. हिरवे आणि पिवळे असे दोन प्रकारचे होते.
आजूबाजूच्या झाडांविषयी, फुलांविषयी, तिथे आढळणाऱ्या प्राण्यांविषयी लोकल गाईडकडून माहिती मिळत होती. अर्थात जेव्हा सर्वजण दोन मिनिटे थांबू शकतील असे ठिकाण असेल तेव्हाच बोलणे शक्य होते.
आज जलप्रवाहांची साथ होती. अधूनमधून असे झरे दिसत होते.
पाणी प्यायला पाणवठ्याशी येणाऱ्या प्राण्यांना लपायला घनदाट जंगल होते. त्यामुळे आम्हाला केवळ त्यांच्या झाडांच्या बुंध्यावर दिसलेल्या खुणांवर समाधान मानायला लागले. आणि समजा खरेच वन्य प्राणी समोर आले असते तर पळता भुई थोडी झाली असती..अक्षरश: !!! कारण तिथे जागाच कुठे होती पळायला!!!
तुंगनाथ चंद्रशिला मध्ये जिचा उगम आहे ती आकाश कामिनी नदी आम्हांला दिसली. दिसायच्या आधीपासूनच ऐकू येऊ लागली होती. जंगल, फुले, पक्ष्यांचे आवाज आणि ऐकू येणारा नदीचा खळखळाट .. सगळेच कसे मन शांत करणारे.
एका वळणावर ती सामोरी आली. अजून अगदी बालरुपात होती. अजून उन्हाळा वाढला की बर्फ वितळेल आणि मग आकाशकामिनीचे पाणीही वाढेल, रुप बदलेल.
पाण्यात एक झाडाचा बुंधा आडवा टाकून त्याला टेकून ओळीने ठेवलेले मोठाले दगड असा तो पूल होता. पाण्याच्या वेगाने आणि आम्ही पाय दिल्याने दगड हलत होते. पूल ओलांडण्याचा थरार वाढवत होते. इथे आम्हाला थोडा वेळ शांतपणे बसता आले.
पुढची वाट खुणावत होती. साधारण तासभर जंगलातून चालल्यावर अशी वाट आली की बाकी कसलाच आवाज येत नव्हता. आम्हीही सगळे अगदी शांतपणे चालत होतो. आवाज असेलच तर तो वाहणाऱ्या वाऱ्याचा, पानांच्या सळसळण्याचा, पायांखाली येणाऱ्या वाळलेल्या पानांचा आणि दूर कुठेतरी पाण्याचाही.
आम्ही सगळे वेगवेगळ्या ठिकाणी झाडांजवळ बसलो होतो. केवळ झाडांची संगत अनुभवत होतो. श्वासातून येणारी जंगलातील ताजी हवा, डोळ्यांना दिसणारी जंगलातील हिरवाई, कानांना तृप्त करणारी जंगलातील शांतता अनुभवत होतो. जंगलातले वेगवेगळ्या वनस्पतींचे वास अनुभवत होतो. बसल्यावर होणारा मातीचा, पानांचा, दगडांचा स्पर्श अनुभवत होतो. शांत होतो. आसपासचे सगळे वातावरण स्वतःत मुरवून घेत होतो. मन संपूर्णपणे तिथेच होते. जागरूकपणे प्रत्येक क्षण अनुभवत होते. जपानी शिनरीन योकू - फॉरेस्ट बाथ सारखाच हा अनुभव होता.
तिथून निघालो तेव्हाही सगळेजण शांत होते. एक अनामिक भारावलेपण जाणवत होते. वाटेने दिसणारी वेगवेगळी रानफुले आपल्या सौंदर्याने मोहवत होती.
अनेक फुले, झरे लागलेली ती जंगलवाट अजून तासभर चालल्यावर एक मोठे पठार आले. ह्याचे नाव होते 'शामखुदी बुग्याल'. ऊन होतेच. तशी अगदी डोक्यावर सावली नव्हती. पण आजूबाजूच्या झाडांमुळे उन्हाचा तडाखा तितकासा जाणवत नव्हता.
तिथे जवळच गुराख्यांच्या दगडी झोपड्या होत्या. आत्ता त्या रिकाम्याच होत्या. पण उन्हाळ्यात आसपासचे गुराखी तिथे गुरे घेऊन येतात आणि राहतात असे कळले.
तिथून निघाल्यावर पुन्हा वाटेत अनेक लहान जलप्रवाह लागले. त्यांना ओलांडून पुढे जात होतो. आता पुन्हा अनेक फुललेली ऱ्होडोडेंड्रॉनची झाडे दिसत होती.
त्यानंतर दहा पंधरा मिनिटांत आम्ही चक्क एक सडक ओलांडली. तीन दिवसांनी असा रस्ता पाहून काहीतरी वेगळेच वाटले. आता सडकेवरून चालायला कंटाळा येईल असेही मनात आले. पण सुदैवाने मिनिटभरातच पुन्हा जंगलवाट आली. आता आमचा कॅम्प जवळ आला होता. पण तिथे पोचण्याचा रस्ताही सोपा नव्हताच!!
आज समिट करून आलेला ग्रुप तिथे जेवणासाठी आणि सामान घेण्यासाठी आला होता. ते सगळे पुन्हा सारीला जायला निघाले होते. आम्हां २५ जणांखेरीज इतर कोणीदेखील आम्हाला तीन दिवसानंतर दिसले होते. समिट करून आलेला ग्रुप पाहून आनंद झाला. ह्यांना जमले तसे आपल्यालाही समिट जमेलच असेही वाटू लागले.
आज आम्ही सहा सात तास चाललो होतो. अल्टीट्युड गेन साधारण हजार फुटांचा होता. पण आज थकवा अजिबात जाणवत नव्हता.
आधीच्या सर्व कॅम्पसाईट प्रमाणेच बनियाकुंड कॅम्पसाईट देखील फार सुंदर ठिकाणी होती.
आम्ही पोचलो तेव्हा थेम्ब थेम्ब पडणाऱ्या पावसाचा वेग वाढला होता. पाहता पाहता एका कोपऱ्यातील पर्वतशिखरे ढगांनी झाकून टाकली.
पावसाने पलीकडचे दृश्य झाकून टाकले. उरली ती ओलेती झाडे आणि पावसात भिजत असलेले आमचे चिमुकले टेन्ट्स.
उद्याच्या दिवसाची खूपच उत्सुकता होती. उद्याचा दिवस स्वप्नपूर्तीचा होता असे मी म्हणणार नाही. कारण ट्रेकचा प्रत्येक दिवस आणि क्षण स्वप्नवतच होता. पण तरीही तुंगनाथ आणि चंद्रशिला पाहण्याची अतीव उत्सुकता आणि आतुरता होती हे देखील खरेच.
ह्या लेखमालिके मध्ये अनेक फोटोज आहेत. इतके इथे अपलोड करणे शक्य नाही. माझ्या ब्लॉगवर ते आहेत. (कृपया माझ्या ब्लॉगची जाहिरात करते आहे असे समजू नका!! )त्याची लिंक सोबत देते. ज्याना उत्सुकता असेल त्यांना फोटोज पाहता येतील.
१५ एप्रिल, त्या दिवशी शुक्ल पक्षातील सप्तमी किंवा अष्टमी असावी. कारण १७ एप्रिलला रामनवमी होती. सुंदर काळ्याभोर रात्रीचा सघन अंधार.. पौर्णिमा अजून साताठ दिवसांवर असली तरीही आत्तापासूनच तेजाळलेला चंद्र.. चमचमणारे, मध्येच ढगांच्या आड लपणारे चांदणे, आमच्या मनातील समिटविषयीची उत्सुकता..फार अनोखी रात्र होती ती.
उद्या पहाटे दोन वाजताचा वेकप कॉल असणार होता. आम्हाला आवरून, ब्रेकफास्ट करून तीन वाजता निघायचे होते. न विसरता घेण्याच्या गोष्टी तशा तर डे पॅक मध्ये भरूनच ठेवल्या होत्या. हेडलॅम्पच्या उजेडात सामान देखील आवरून ठेवले होते. पहाटे निघताना बाकी सामान मेन टेन्ट मध्ये नेऊन ठेवायचे होते.
इतक्या उंचीवर जायचे होते. काही तासांत आम्ही ४००० फुटांचा अल्टीट्युड गेन करणार होतो. झोपण्यासाठी डोळे मिटले खरे, पण मिटल्या डोळ्यांपुढेही बर्फाच्छादित शिखरांचीच दृश्ये तरळत होती. कधीतरी झोप लागली. सतत अधूनमधून जाग येऊन घड्याळात बघत होते. सगळे दोन वाजता उठणार, त्या आधी आपण आपले आवरून घेऊ या असा विचार डोक्यात होता तो बहुधा सतत जाग आणत असावा!!
पहाटे पावणेदोनलाच उठले. टेन्टमेंटला त्रास होऊ नये म्हणून अगदी आवाज न करता टेन्ट उघडला. स्नेहाच्या टेन्टशी जाऊन तिला हाक मारली. ती पण जागी झालेलीच होती. मग आम्ही दोघी निघालो बायो टॉयलेट्स च्या दिशेने. कॅम्पसाईट्स वर सगळीकडे बायोटॉयलेट्सच होती आणि ती कधीच आमच्या टेन्ट्सच्या जवळ नसायची. थोडे चालून गेल्यावर, एखादा चढ चढल्या अथवा उतरल्यावर टॉयलेट्सचे टेन्ट असायचे. बनियाकुंड कॅम्पसाईट देखील त्याला अपवाद नव्हती. त्यात काल झालेल्या पावसाने झालेला थोडा चिखल, पहाटे पावणे दोनचा गडद अंधार, थंडी, आमच्या हेडलॅम्प्सचाच पडेल तितकाच उजेड अशा सगळ्या वातावरणात आम्ही टॉयलेट्स टेन्ट्सला जाऊन आलो. स्नेहाला झाडांमध्ये काहीतरी चमकल्यासारखे वाटले. पण पुन्हा पाहिले तर काही दिसले नाही. तसेही इतक्या अंधारात आणि आजूबाजूला असलेल्या दाट जंगलझाडीत काही असते तरी लक्षात येणार नव्हतेच.
दोन वाजता वेकप कॉल झाला. सगळेजण जण उठून आवरू लागले. ब्रेकफास्ट झाला. आता निघायच्या आधी टॉयलेटला पुन्हा जाऊन यावे म्हणून गेलेल्या दोन मैत्रिणी मेन डायनिंग टेन्ट मध्ये आम्ही सगळे होतो तिथे पळतच आल्या. इतके अंतर पळत आल्याने त्यांना धाप लागली होती. त्यांना चमकणारे डोळे आणि काही प्राणी दिसले होते. ट्रेक लीडर सांगत होता, प्राणी काही करणार नाहीत. आपण त्रास दिला नाही तर तेही काही करत नाहीत. मग मोठा घोळका आणि ट्रेक लीडरची मिरवणूक टॉयलेट्स च्या दिशेने निघाली. जवळच्या झाडीत, खरेच होते दोन/तीन प्राणी. पण काय आहे ते मात्र आमच्या हेड टॉर्च च्या अपुऱ्या उजेडात दिसले नाही. अशा तऱ्हेने वन्य प्राणी बघण्याची हौस देखील भागली!!
सगळ्यांचे आवरून तीन/ सव्वा तीन वाजता आम्ही निघालो. आमच्या हेडलॅम्पचा उजेड पायापुरता पडत होता. असे स्वयंतेजाने उजळलेले आम्ही अंधारात चालत होतो. इतके पंचवीस जण सोबत होतो, ओळीने चालत होतो म्हणूनच धीर वाटत होता. नाहीतर रस्ता दिसत नव्हता, डोंगरातला चढ, कडे, ओबडधोबड दगड, मध्येच डावीकडे आलेली दरी, एकट्यादुकट्याची अजिबात हिंमत झाली नसती.
आज आम्हाला वेळेची मर्यादा घातलेली होती. हिमालयात आणि इतक्या उंचीवर तर मोसम कधी बदलेल सांगता येत नाही. खूप पाऊस आला, वादळ झाले किंवा बर्फ पडायला लागला तर आम्हाला चालायला जास्त वेळ लागला असता. आम्हाला सांगितलेले होते की साडेनऊपर्यंत आम्ही चंद्रशिलाला पोचलेलो नसलो तरी जिथे असू तिथून परतीचा प्रवास सुरु करायचा. त्यामुळे आज कोणीच रेंगाळत नव्हते. मी अगदी दुसऱ्या नंबरला चालणार होते. म्हणजे ट्रेक गाईड पहिला आणि त्याच्या मागे मी. त्यामुळे मला तर भराभर चालण्याची विशेष ओढ वाटत होती. जितके लवकर पोचू तितका समिटवर जास्त वेळ मिळणार होता.
भरपूर चढ चढल्यावर, तासाभराने आम्हाला दोन मिनिटे बसता येईल, विश्रांती घेता येईल अशी जागा आली. कधीचा एक कुत्रा आमच्या सोबत चालत होता. तो देखील थांबला. आता पहाटेचे सव्वाचार वाजले होते.
इतक्यावेळ आम्हाला आजूबाजूचे काहीही दिसत नव्हते. कारण आम्ही डोंगरातूनच चालत होतो. पण आता इथून चोपटा शहराचे लाईट्स दिसले.
मिनी स्वित्झर्लंड म्हणून प्रसिद्ध असलेले चोपटा पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. चोपटा इथे जाण्यासाठी रुद्रप्रयाग हून गाडीचा रस्ता आहे. त्यामुळे तिथे सगळेजण जाऊ शकतात. अनेक रिसॉर्ट्स, हॉटेल्स आहेत. अनुपम सृष्टीसौंदर्य आहे.
थोड्या वेळात आम्ही चोपटा क्रॉस केले. घरे, हॉटेल्स लागली आणि भरपूर कचरा देखील दिसला. तीन चार दिवस जंगलात चालत होतो तेव्हा कचरा बघायची सवय मोडली होती. माणूस जिथे जाईल तिथे घाण करतो हे पुन्हा एकदा लक्षात आले.
चोपटाच्या पुढील तुंगनाथ पर्यंतचा रस्ता दगडांनी बांधलेला होता. त्यामुळे जरी चढ असला तरीही रानवाटांपेक्षा तुलनेने सोपा वाटला.
आता साडेपाच होत आले. दिशा उजळल्या होत्या. पर्वतशिखरांचे, झाडांचे आकार दिसू लागले.
एरवी इतके लक्षात येत नाही. पण आता अक्षरशः मिनिटामिनिटाने प्रकाश वाढत होता. आजूबाजूचे दृश्य त्या प्रकाशात एखाद्या जादुई विश्वासारखे दिसत होते.
आता सहा वाजत आले. आता पर्वतांची शिखरे प्रकाशाने उजळू लागली होती. अजून आम्हाला सूर्यदर्शन झालेच नव्हते.
आता आम्हाला पाच मिनिटे विश्रांतीसाठी मिळाली. आजूबाजूचे अद्भुत दृश्य डोळे भरून पाहता आले. धुके आणि ढग दोन्हीही सतत येत जात होते. संपूर्ण रस्ता सतत चढाचाच होता. फक्त तो तीव्र चढ नव्हता इतकेच.
आता अधूनमधून थोडा बर्फ दिसू लागला. आम्हाला हिमालयन मोनाल पक्ष्यांची जोडी देखील दिसली. सुंदर रंगांची उधळण असलेला नर आणि तपकिरी एकरंगी मादी असे मोनाल पक्षी असतात. मी तरी ते पक्षी पहिल्यांदाच पाहिले.
मोरपिसाऱ्याची आठवण करून देणारे त्याचे अंग, मानेला आणि शेपटीला अजूनच वेगळे रंग, सगळीच झळाळती रंगसंगती नजर वेधून घेणारी होती. फोटो तितकासा स्पष्ट नाही. कारण एकतर तो पक्षी खूप दूर होता आणि खूप वेगात जात होता.
आता तुंगनाथ मंदिर आणि चंद्रशिला दिसू लागले.
अजूनही हा आमच्यासोबत होता. प्रत्येक दिवशी किती फेऱ्या करत असेल कोण जाणे!! तुंगनाथच्या रस्त्यावर आता इतर लोकदेखील दिसू लागले होते. कचरा देखील होताच. अन्नपदार्थांची रिकामी पॅकेट्स, टिश्यू पेपर्स, प्लॅस्टिकच्या बाटल्या आणखी कितीतरी गोष्टी आजूबाजूला फेकलेल्या होत्या. तरी अजून तुंगनाथ मंदिर बंद होते. बहुतेक सगळी दुकाने बंद होती. येणारे लोक म्हणजे पर्यटक आणि ट्रेकर्स इतकेच. तरी एवढा कचरा दिसत होता. जेव्हा म्हणजे मे मध्ये मंदिर उघडेल, तेव्हा दुकानेही उघडतील. लोकांची गर्दी वाढेल. तेव्हा किती कचरा असेल?
तुम्ही फोटोत आमच्या सगळ्यांच्या कमरेला पिवळ्या बॅग्स लावलेल्या पाहत असाल. त्या होत्या इंडियाहाईक्सने दिलेल्या इको बॅग्स. वाटेत कचरा दिसला की त्यात गोळा करायचा आणि कॅम्पसाईटवर वेगवेगळी पिंपे ठेवलेली असायची. त्यात तो वर्गवारी करून टाकायचा. इंडियाहाईक्सने आत्तापर्यंत असा कित्येक टन कचरा गोळा केला आहे. हिमालयाच्या डोंगर दऱ्यात, कचरा नेण्यासाठी, तिथे काही नगरपालिकांची व्यवस्था नाही! तिथून मग साधारण महिनाभराने एक संस्था तो गोळा करून घेऊन जाते. इंडियाहाईक्सच्या जागरूकतेची आणि पर्यावरण स्नेही धोरणांची ही झलक होती. आम्ही जो वैयक्तिक कचरा तयार करू तो मात्र आपापल्या बॅगमधून आपापल्या शहरात घेऊन जायला सांगितले होते.
आता पावणेसात वाजले होते. खूप चढ चढून झाला होता. आम्हाला स्नॅक्स साठी वेळ दिला होता.
आता आजूबाजूला दिसणारा बर्फ वाढला होता.
उंच चढाचे, वळणाचे रस्ते, विरळ होत जाणारी हवा ह्यामुळे आमच्या टीममधल्या काही जणांना हाय अल्टीट्युड सिकनेसची सौम्य लक्षणे दिसू लागली होती. त्यांचे डोके दुखू लागले. एकाला पोटदुखी आणि मळमळण्यामुळे आजच्या दिवसाच्या सुरुवातीलाच परत जावे लागले. त्या आमच्या टीममेटची आठवण आम्हाला सगळ्यांनाच सतत येत होतीच. इतके दिवस ट्रेक केल्यावर आजच्या समिटच्या दिवशी त्याला येता आले नाही ह्याचे वाईट वाटत होते. पण करेल तो ही पुन्हा कधीतरी हा ट्रेक पूर्ण, असे म्हणून आम्ही मनाचे समाधान करून घेत होतो.
अजून चढ चढणे चालूच होते. दगडांनी बांधलेला रस्ता चढायला सोपा की डोंगरवाटांनी नेणारा चढ सोपा ह्यावर मनात चर्चासत्र चालू होते. त्यात असे ठरले की डोंगरवाटा चढायला अवघड असल्या तरी जास्त इंटरेस्टिंग असतात. तर दगडी वाटा चालायला सोप्या पण कंटाळवाण्या वाटतात. अर्थात भवताल इतका सुरम्य होता की कंटाळा यायला वावच नव्हता. आमच्या नजरेच्या पातळीच्याही खाली बर्फाच्छादित शिखरे दिसत होती. इतका विस्तीर्ण, भव्य प्रदेश दृष्टीच्या टप्प्यात येत होता. इतक्यात सूर्यदर्शन झाले.
ह्या सुंदर फोटोत आता सूर्य, तुंगनाथ मंदिर आणि चंद्रशिला शिखर तिन्ही एका ओळीत दिसते आहे. हवा क्षणाक्षणाला बदलत होती. कधी धुके, कधी ढग, त्यामुळे फोटो तितकेसे स्पष्ट येत नव्हते. पण निदान पाऊस किंवा बर्फ पडत नव्हता, वादळ नव्हते हे चांगले होते. आम्हाला शिखरावर थोडा जास्त वेळ थांबता येण्याची आशा वाटत होती. आधीच्या एका टीमला विपरीत हवामानामुळे केवळ मिनिटभर शिखरावर थांबता आल्याच्या कथा आम्ही ऐकल्या होत्या.
आता साडेसात वाजले होते. आम्ही चालायला सुरुवात करून चार तास होऊन गेले होते. पण आता तुंगनाथ मंदिर अगदी जवळ दिसू लागले होते. त्यामुळे उत्साह टिकून होता.
आमचे ट्रेक गाईड प्रमोदजी ह्यांचा देखील आमचा उत्साह टिकवून ठेवण्यात मोठा वाटा होता. ते सतत " चलते रहो, चलते रहो, खुद को पुश करो, अभी थोडाही बाकी हैं " असे सांगत प्रेरणा देत होते. प्रमोदजी, ट्रेक लीडर साहिल आणि दुसरे ट्रेक गाईड अमितजी ह्या तिघांनी आमच्या टीमला वेळोवेळी जे मार्गदर्शन आणि मदत केली त्याला तोड नाही. आमचा ट्रेक निर्विघ्न पार पडावा म्हणून त्यांनी अत्यंत तळमळीने आणि मनापासून प्रयत्न केले.
आता सगळ्यांचेच श्वासांचे मस्त आवाज येऊ लागले होते. कारण चढ खूप तीव्र होऊ लागला होता.
जाताना आम्ही मंदिरात न थांबता सरळ चंद्रशिला ला जाणार होतो. हवेचा मूड बदलायच्या आत तिथे पोचणार होतो. आत्तापर्यंतचा प्रवास अगदी वेळेत झाला होता. आता पुढचाही नक्की चांगला होईल असे वाटू लागले. दगडी रस्ता संपून आता डोंगरवाट आली. पण ती वाट तशी दिसत नव्हती. कारण सगळीकडे बर्फ होता!
तुम्ही फारच हळू चालता, मी कधीच पुढे आलो आहे. आता थोड्या वेळ सृष्टीसौंदर्य न्याहाळतो. असे तर म्हणत नसेल ना हा? हा तोच पायथ्यापासून आमच्यासोबत येणारा की हा वेगळा? कसे कळणार? सगळ्यांचेच काळे कोट सारखे!!
सगळीकडे दिसणारी बर्फाच्छादित शिखरे, आभाळाचे आणि धरतीचे अथांगपण, विस्तीर्ण अवकाश, स्वतःचे खुजेपण सगळे सगळे जाणवणारी दृश्ये आता दिसत होती. चंद्रशिला वरून दिसणारे दृश्य नक्कीच अप्रतिम आहे. पण तिथे जाणारी वाट देखील अशा दृश्यांनी विलक्षण सुंदर झाली आहे.
पण काही क्षणातच आमची दृष्टी फक्त पायांखाली राहू लागली. कारण आता बर्फ़ातूनच चालायचे होते. जिथे पावलांच्या खुणा दिसतील त्यात सावधपणे पाय ठेवत जायचे होते.
लांबून बघताना रम्य वाटणारा बर्फ त्यावरून चालताना मात्र परीक्षा घेतो. माझ्यासारख्या उष्ण आणि दमट प्रदेशात राहणाऱ्या व्यक्तीला बर्फावर चालण्याचा अनुभव क्वचितच घेता येतो त्यामुळे मजाही येतेच. मात्र बर्फावर चालताना आपोआप चालण्याची गती थोडी कमी झाली. आता ९ वाजत आले. आता चढ खूपच जास्त झाला होता. पण काही मिनिटांतच आम्ही शिखरावर पोचलो.
https://youtube.com/shorts/wKBO6gIAjrE?feature=share
तिथून दिसणाऱ्या दृश्याचे केवळ अद्भुत असेच वर्णन करू शकतो. जिथून ३६० अंशातून आपण हिमालय पाहू शकतो अशा अगदी मोजक्या जागांपैकी एक असे हे शिखर. इथून गढवाल आणि कुमाऊ च्या पर्वतरांगा दिसतात. अनेक सुप्रसिद्ध शिखरे दिसतात. नंदादेवी, चौखंबा, द्रोणागिरी, नीलकण्ठ, त्रिशूल, केदारकंठा, गंगोत्री रेंजेस आणि आणखी कितीतरी.
तिथे पोचल्याचा प्रचंड आनंद होईल असे वाटले होते. पण प्रत्यक्षात तिथे पोचल्यावर दिसणाऱ्या दृश्याने अवाक व्हायला झाले होते आणि मनही अतिशय आनंद, जिंकल्याची भावना ह्या सगळ्याच्या पार गेले होते. कपालभाती करुन झाल्यावर सेकंदभर श्वासविरहित अवस्था अनुभवता येते तसे काहीसे झाले होते मनाचे. थोडे भानावर आल्यावर मग ह्या दृश्याचा अनुभव घेता आला ह्याबद्दल मनात अपार कृतज्ञता होती.
आता अर्थातच होता फोटो टाइम. दिनांक १७ ला रामनवमी होती म्हणून आठवणीने नेलेला श्रीराम आणि रामजन्मभूमी प्रतिमा असलेला टी शर्ट घालून चंद्रशिलाला जिथे रामाने तपश्चर्या केली होती असे म्हणतात, तिथे फोटो काढता आला.
आम्ही सुदैवी होतो. आम्हाला चंद्रशिला शिखरावर जवळपास सव्वा तास मिळाला. पण आता निघायची वेळ झाली होती. एकेक करून उतरायला सुरुवात केली. चढताना माझा पहिला नंबर होता त्यामुळे अर्थातच उतरले देखील मीच आधी. उतरल्यावर 'माता ने ' ( जपानी वाक्प्रचार - अर्थ - पुन्हा भेटेपर्यंत, पुन्हा भेटू या !) म्हणत मागे वळून एक फोटो काढून ठेवला.
खाली उतरून चालायला सुरुवात झाली.
थोड्या वेळाने रस्ता असा होता. ती बारीक रेघ म्हणजे रस्ता आहे आणि त्यावरचे ठिपके म्हणजे आम्ही आहोत!!
तुंगनाथ मंदिरात गेलो. पंचकेदारांपैकी तृतीय केदार असलेले हे मंदिर हजार वर्षांपूर्वीचे आहे. मूळ मंदिर पांडवांनी बांधले होते असे म्हणतात. जगातील सर्वात जास्त उंचीवर असलेले मंदिर आहे हे.
आम्ही गेलो तेव्हा मंदिर बंद होते. केदारनाथ प्रमाणेच हिवाळ्यात हे मंदिरदेखील बंद असते. सर्वत्र बर्फच असतो. त्यावेळी तुंगनाथमधील विग्रह मक्कुमठ इथे हलवलेला असतो. ह्यावर्षी मंदिराची कपाटे १० मे ला उघडली जातील.
तिथून खाली उतरायला सुरुवात केली. ऊन चांगलेच तापले होते. पण आता दगडी रस्त्याने उतरायचे होते, त्यामुळे तसे अवघड वाटत नव्हते.
वाटेत भेटणाऱ्या लोकांना," बस, अभी थोडा ही बाकी है।" सांगताना मस्त वाटत होते.
सकाळी चढताना हा रस्ता आम्ही मिट्ट काळोखात चढलो होतो. तेव्हा नुसते झाडांचे बाह्याकार दिसत होते. ती सर्व झाडे बुरांशच्या फुलांनी बहरलेली होती. किती सुंदर रंगछटांची फुले होती!! एखाददुसरे झाड नव्हे तर अशी शेकडो झाडे बहरलेली. रस्त्यावर, दरीत, डोंगरउतारावर..सगळीकडे फुललेली झाडे. डोळ्यांचे पारणे फिटावे असेच दृश्य होते ते.
आता परतीच्या प्रवासात नेहमीच वाटते तशी हुरहूर लागलेली होती. संध्याकाळी सारी बेसकॅम्प ला आलो आणि दुसऱ्या दिवशी तेथून निघालो, ऋषिकेश किंवा परतीच्या आपापल्या प्लॅननुसार त्या त्या गावाला.
निघण्याआधी टीशर्ट्स विकत घेऊन फोटो तर काढायलाच हवा होता ना!!
आम्ही सगळे पाच दिवसांपूर्वी एकमेकांना ओळखत नव्हतो असे सांगितले तर आश्चर्य वाटावे इतकी छान मैत्री झाली होती. खूप मस्त, तरुण, उत्साही टीम होती आमची.
आता पुन्हा चंद्रशिलाला कधी जाणे होईल माहिती नाही. पण ट्रेक करत राहण्याची प्रेरणा मात्र आदल्या रात्री बक्षीस मिळालेल्या बॅजमूळे मिळाली. टीममधील 'ट्रेकर फॉर लाईफ' चा बॅज मला दिला गेला. तो बॅज मला सतत आठवण करून देत राहील..हिमालयाची आणि ट्रेकिंगची.
ह्या लेखमालिके मध्ये अनेक फोटोज आहेत. इतके इथे अपलोड करणे शक्य नाही. माझ्या ब्लॉगवर ते आहेत. कृपया माझ्या ब्लॉगची जाहिरात करते आहे असे समजू नका!! त्याची लिंक सोबत देते. ज्याना उत्सुकता असेल त्यांना फोटोज पाहता येतील.