नैसर्गिक विषमुक्त शेती @ आंबोली - एक प्रवास

नमस्कार मैत्रिणींनो, मी साधना. सध्या आंबोली ह्या पश्चिम घाटातील पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशिल म्हणजे हॉटस्पॉट असलेल्या खेड्यात राहते व शेती करते. मला निसर्गाची ओढ पहिल्यापासुन होती व कुंडीत रोपे लावता लावता कधीतरी शेती करायची ईच्छा मनात आली आणि लॉकडाऊनमध्ये तिला मुर्तस्वरुप आले. थण्ड हवा व अतीवृष्टी यामुळे आंबोलीला शेती करणे खुप कठिण आहे. इथे लोक जितकी होते तितकी शेती करुन त्यात समाधान मानतात. मलाही हेच करावे लागतेय/लागणार. तरी त्यातल्या त्यात इथे काय काय होऊ शकते याचा अभ्यास करुन प्रयोग करत राहायचे असे ठरवले आहे.

माझा शेतीचा प्रवास इथे मांडला आहे. थोडा विस्कळीत आहे, थोडा पाल्हाळिक आहे. कित्येक गोष्टी मलाही नव्या असल्यामुळे त्या इतरांना डिटेलमध्ये सांगावाश्या वाटतात. जसा वेळ मिळेल तसे लेख लिहित जाईन.

तुम्हाला वाचायला आवडताहेत याचा आनंद आहे. लिहिताना मला पुनःप्रत्ययाचा आनंद तर मिळतोयच पण तेव्हा लक्षात न आलेल्या गोष्टी लिहिताना लक्षात येताहेत.

मैत्रिणींनो, तुमच्या भरभरुन प्रतिसादांचे आभार कसे मानू? बस तुमचे प्रेम असेच राहो.

डिस्क्लेमर :

१. ही लेखमाला माझ्या वैयक्तिक अनुभवांवर आधारित आहे. माझे शेतीविषयक ज्ञान अतिशय मर्यादीत आहे. मला जे पटतेय, परवडतेय व करता येतेय ते मी करत आहे. मी करतेय तेच बरोबर हा माझा आग्रह नाही.

२. मी कुठल्याही एका नैसर्गिक शेती पद्धतीचा प्रचार करतेय असा समज करुन घेऊ नये. जी पद्धत बरोबर आहे असे मला वाटते ती पद्धत मी अनुसरतेय, इतर अनेक पद्धती पाहतेय, माझ्या वातावरणात काय योग्य आहे त्याचा विचार करुन वेळोवेळी शेतीत बदल करतेय, नव्या गोष्टी स्विकारतेय. मी अजुनही शिकण्याच्या मोडमध्ये आहे. अधिकारवाणीने दुसर्‍याला सल्ला द्यायच्या मोडमध्ये मी अजुन नाहीय.

३. लिखाण थोडे विस्कळीत वाटण्याचा संभव आहे कारण बर्‍याच गोष्टी आहेत व त्यामुळे एकत्रित नीट मांडणी जमत नाहीय. तरी सांभाळून घ्या.

*&*&*&*&*&*&*&*&*&*&*&*&*&*&*&*&*&*&*&*&*&*&*&*&*&*&*&*&*&*&

नैसर्गिक विषमुक्त शेती @ आंबोली - एक प्रवास : भाग १

जुन २०२० ला मी आंबोलीला सहकुटूंब राहायला आले तरी प्रत्यक्ष शेती सुरू करायला डिसेंबर २०२० उजाडले. मला शेतीचे ज्ञान शुन्य! शेतीत रस निर्माण होऊन सुभाष पाळेकर नैसर्गिक शेतीची ओळख झाल्यावर काही शेतांना भेट दिली होती. शेतीनिगडीत वाचन सुरू होते. पाळेकर गुरूजींची तिन, दोन दिवसीय शिबीरे करुन झाली होती, त्यांच्यासोबत एक शिवारफेरी झाली होती. त्यांचे व इतरांचे शेतीविषयक यु ट्युब चॅनेल्स पाहात होते. तरीही गच्चीत केलेल्या कुंडीतल्या शेतीचा अनुभव सोडता प्रत्यक्ष अनुभव मात्र शुन्य होता. अनुभव मिळणार तरी कसा? हाती जमिन नाही तर शेती करणार कशी?? त्यामुळे जेव्हा जमिन हाती लागली तेव्हा आता शेंडी तुटो वा पारंबी, शेती करायचीच हे ठरवुन शेतीत ऊतरले.

पर्यावरणाला हानीकारक कृत्रिम रसायने न वापरता नैसर्गिकरित्याच शेती करायची हे डोक्यात पक्के होते, पण प्रॅक्टिकल्स शुन्य! शेती करण्यामध्ये वातावरण हा एक खुप मोठा भाग आहे. तोवर जी शेती मी पाहिलेली तिथले वातावरण शेती साठी योग्य होते. पण आंबोलीतली परिस्थिती वेगळी आहे. अतिवृष्टी हा आंबोलीत मोठा त्रास आहे. पावसाळ्याचे चार-पाच महिने सुर्यदर्शन होत नाही हे लहानपणापासुन ऐकले होते. जुन २०२० पासुन आंबोलीत राहायला लागल्यानंतर ते खरेच आहे याचा प्रत्यय घेतला होता. या वातावरणात शेती कशी करतात याचे कुठलेही मार्गदर्शन कुठल्याही यु ट्युब चॅनेलवर नव्हते.

आंबोलीत शेती म्हणजे पावसाळ्यात नाचणी व भात. ऊन्हाळ्यात वायंगणी भातशेती व ऊस. ज्यांच्याकडे घराच्या आजुबाजुला १-२ गुंठे जागा आहे ते पाऊस गेल्यावर म्हणजे नोव्हेंबरानंतर लाल भाजी, मका, घरापुरते कांदे, सांडगी मिरची करण्यापुरत्या मिरच्या इत्यादी करतात. बाजारात जाऊन भाजी विकण्याइतपत भाजी कोणी करत नाही.

बारा वाड्यांचे आंबोली तसे मोठे गाव आहे, १० ते १५ किमी रुंद व १०-१२ किमी लांब. कर्नाटकातल्या घटप्रभा नदीची उपनदी हिरण्यकेशी नदी आंबोलीत उगम पावते आणि आजरा-चंदगड मार्गे कर्नाटकात पोचते. ह्या नदीला बारा महिने पाणी आहे, आटत नाही. पावसाळ्यात नदीत पाणी खुप वाढते आणि ऊगमापासुन चार पाच किमी खालपर्यंत तिच्या नेहमीच्या मार्गाच्या दोन्ही बाजुने फुटून ती वाहते. ह्या जागी लोकांच्या शेतजमिनी आहेत ज्या पावसाळ्यात पाण्याखाली जातात. नोव्हेंबरांत पाणी ओसरायला लागते तसे लोक आपापल्या जमिनीच्या चारी बाजुला फुटभर ऊंच बांध (मेर) घालुन पाणी शेतात धरुन ठेवतात व डिसेंबरात तिथे भात लागवड करतात. ह्याला वायंगणे म्हणतात व त्यात करतात ती वायंगणशेती.

सावंतवाडीहुन घाट चढुन वर आल्यावर पहिली लागते ती बाजारवाडी. पुढे जकातवाडी, गावठाणवाडी, कामतवाडी वगैरे १२ वाड्या येतात. कामतवाडीपर्यंत सह्याद्री घाटमाथ्याचा अतीवृष्टीचा प्रदेश विस्तारलेला आहे. इथे पावसाळ्यात कायम दाट धुके असते, पावसाची संततधार सुरू असते, हवेत प्रचंड आर्द्रता असते. अर्थात माझ्या बालपणी जितका होता तितका पाऊस आता उरलेला नाहीय पण आंबोलीतील इतर वाड्यांच्या तुलनेत ह्या तिनचार वाड्यांवर खुप पाऊस पडतो, हवा कायम कुंद असते. इथे पावसाळ्यात फक्त स्थानिक झाडे झुडपे कशीबशी तग धरतात; विकतची शोभेची रोपे, गुलाबाची कलमे, झाडे इत्यादी सगळे कुजुन जाते. स्वानुभव आहे.

या वातावरणात कोणी शेती करत नाहीत. इथे मैलोनमैल एकर शेती कोणाचीही नाही. १०-१५ गुंठ्यांचे तुकडे असतात, दहा जागी विखुरलेले. या तुकड्यांना इथे वाफल्या म्हणतात. या वाफल्यांवर फक्त भातशेती होते - पावसाळी किंवा वायंगणी. बाकी काही करता येत नाही कारण पावसाळा सोडून इतर वेळी पाणी नसते. वर लिहिलेय तसे शेतात पाणी धरुन ठेवले तर त्यात फक्त भातशेती करता येते, भाज्या करता येत नाहीत.

गावठाणवाडी वगैरे ऊगमापासुन जवळ असल्याने पावसाळ्यात भातशेती होत नाही. कामतवाडीपर्यंत लोक फक्त वायंगणशेती करतात. पावसामुळे ऊस व पावसाळी भात करत नाहीत.

कामतवाडीच्या पुढे वातावरण जरा बरे आहे. त्यामुळे तिथुन पार गडदुवाडीपर्यंत भात व नाचणी व्यतिरिक्त नदीच्या दोन्ही तिरी ऊस करतात. ऊसशेती हे तुलनेत सोपे काम आहे असे लोक म्हणतात. ऊस लावायचा, एक दोनदा भरपुर रासायनिक खत द्यायचे, भरती करायची म्हणजे ऊसाच्या बाळरोपाला दोन्ही बाजुने माती चढवायची. ऊस मनाजोगा वाढत नसेल तर टॅानिक द्यायचे, एक दोनदा तणनाशक फवारायचे आणि निंदणी करुन तणाचा सफाचाट करायचा. दोनचारदा गवे येऊन ऊस चरुन जातात पण तरी तो बिचारा वाढतो. गव्यांना हाकलायला रात्रीचे भर थंडीत शेतात जागत बसावे लागते. डिसेंबरात ऊस लावला की मे पर्यंत हे काम अधुनमधुन करायचे. पाऊस सुरू झाला की मग काहीही बघायची गरज नाही. सगळी ऊसशेती नदीकिनारी असल्याने पावसाळ्यात कित्येकदा शेतात पाणी भरते पण ऊस उभा राहतो. डिसेंबरांत ऊस तोडणीच्या वेळी शेतात परतायचे. ऊस तोडुन कारखान्यात पाठवला की महिनाभरात पैसे खात्यात येतात. म्हणजे शेतमाल कुठे विकावा, किंमत काय मिळणार ह्याचेही टेंशन नाही. त्यामुळे आंबोलीत प्रत्येकजण ऊस लावायला ऊत्सुक असतो.

मी शेती करायचा निर्णय घेतला तेव्हा काय पिक घेऊ हा प्रश्न ऊभा राहिला. करायचे भरपुर काही होते पण शेतात काय होणार हे माहित नव्हते. त्यात सल्ले देणाऱ्यांनी वात आणला. आंबोलीत सर्व काही होते यावर सगळेजण ठाम होते पण प्रत्यक्ष केल्याचा अनुभव सांगणारे कोणीही नव्हते.

मी ठरवलेल्या नैसर्गिक शेतीचे बीजामृत, जीवामृत, आच्छादन आणि वाफसा हे चार स्तंभ आहेत. बीजामृताचा संस्कार करुन बीज लावायचे, जमीन आच्छादित ठेवायची आणि जीवामृत देत राहायचे. आच्छादन कुजत राहते, त्याचा ह्युमस बनत राहतो त्यामुळे वाफसा टिकुन राहतो. सर्व प्रकारच्या नैसर्गिक व सेंद्रिय शेतीचे हेच तंत्र आहे. फरक तुम्ही जीवामृत वापरता, गोकृपा वापरता, गांडुळखत वापरता की अजुन काही अठरापगड जातीची सैंद्रिय खते वापरता यातच. बाकी आच्छादन हवेच, ह्युमस वाढायला हवाच व वाफसा टिकवायला हवाच. अर्थात हे किती सोपे किंवा अवघड आहे हे कळायला शेतकर्‍याच्या वंशालाच जावे लागते.

माझे शेत साधारण चार एकराचे असले तरी एका बाजुची दिडेक एकर जमिन म्हणजे निव्वळ खडक. याला इकडे तळाप म्हणतात. कधीकाळी तिथे खोल खड्डा मारुन त्यातुन चिरे काढले होते. तो खड्डा तसाच सोडलाय जो आता विहीर म्हणुन मी फेब्रुवारी पर्यंत वापरते. असेच अजुन अर्धवट मारलेले चारपाच खड्डे शेतात होते. खड्ड्यातुन बाहेर काढलेली दगड माती तशीच कडेवर मोठे ढिग बनुन पडलेली होती. त्याच्या आजुबाजूस झाडेझुडपे वाढलेली. त्यामुळे लागवडीखालील क्षेत्र अजूनच आकुंचले होते. शेती करणार हा २०१९ मध्ये निर्णय झाल्यावर जेसीबी घालुन सगळी माती मी खड्ड्यांत परत लोटली, सोबत झुडपांनाही लोटले. तेवढीच थोडी जमिन मोकळी झाली. असे करुन साधारण तिनेक एकर जमिन मी लागवडीसाठी तयार केली.

इतक्या क्षेत्रावर आच्छादन घालायचे म्हणजे टनावारी पालापाचोळा लागेल. तो आणायचा कुठून ?? ऊस पाणी भरपुर पितो आणि जमिनीचा कस कमी करतो असे भरपुर वाचले असल्यामुळे ऊस लावायचा नाही असे मी ठरवले होते. मी घातलेल्या लोखंडी कुंपणावर व तिथल्या मांगरावर सहा-सात लाख खर्च झाले होते. जंगली प्राणी वावरण्याचे प्रमाण आंबोलीत भरपुर आहे त्यामुळे कुंपण गरजेचे. तर हा खर्च भरुन काढण्यासाठी ऊस लावायचा आणि पैसे वसुल करायचे हा सल्ला प्रत्येकजण देत होता. माझ्या शेताला भक्कम कु़ंपण असल्यामुळे प्राण्यांचा त्रास न होता ऊसशेती सहज करता येईल असे लोकमत होते. पण मला ऊसशेतीत रस नव्हता.

माझ्यासाठी व माझ्या सगळ्या कुटूंबियांसाठी लागेल इतका तांदुळ, गहु, भाज्या, कडधान्ये कुठलीही हानीकारक खते, किटकनाशके, तणनाशके न वापरता पिकवायची हे माझ्या डोक्यात होते. मला नैसर्गिक शेती करायची होती आणि ती आंबोलीत अजिबात होणार नाही असे लोकांचे मत होते. आणि हे फारसे खोटे नव्हते. आज रसायनांचा अपरिमित वापर आंबोलीत होतोय, युरिया टाकला नाही तर साधी लाल भाजीही ऊगवुन येत नाही ही स्थिती आहे. गावात कॅंसर पेशंटची संख्या लक्षणीय आहे. पण रासायनीक निविष्ठा वापरल्यामुळे होणार्‍या दुष्परिणामांकडे लोकांनी डोळेझाक केलेली आहे. भरपुर खते देऊन ऊस करायचा आणि पैसे कमवायचे हेच ध्येय आहे. खतांमुळे व एकसुरी पिकांमुळे जमिनीवर होणारे परिणाम, तणनाशकांमुळे पाण्याचे होणारे प्रदुषण इत्यादी बाबी त्यांच्या गावीही नाहीत.

अर्थात याला कारणेही तशीच आहेत.

ईथे गंमत अशी आहे की ईथल्या बहुतांश शेतजमिनमालकांना शेतीत रस नाही आणि जे शेती करतात ते त्या शेतीचे जमिनमालक नाहीत. नोकरी मिळण्याची शैक्षणिक पात्रता नसलेला मोठा तरुण वर्ग इथे आहे जो शेतीकडे पैसे कमावण्यासाठीचा एक जोडधंदा म्हणुन पाहतो. जगण्यासाठी अनेक खटपटी इथले लोक करतात, त्यात ऊसशेती अग्रभागी येते कारण ऊसाचे एकरकमी पैसे हातात येतात. जमिन भाड्याने म्हणजे खंडाने घेऊन ऊस लावायचा. ऊस पाच वर्षे टिकतो, जमिनही पाच वर्षांसाठी मिळते. मग या पाच वर्षात पैसे कमवायचे की प्रयोग करायचे? त्यामुळे न करताच आंबोलीत नैसर्गिक किंवा युरीयामुक्त शेती होणार नाही हा ठप्पा मारला गेलेला आहे. स्वतः शेती करणारे जमिनमालक हाताच्या बोटावर मोजले जातील इतकेच आणि त्यात प्रयोगशील कुणीच नाही. प्रयोग करायला जावे तर निसर्गाची साथ नाही. पावसाळा जवळजवळ सहा महिने रेंगाळतो. इतर प्रदेशाच्या तुलनेत आंबोलीत पिकवाढीचा वेग कमी आहे, ज्या पिकाला गवश्यात किंवा आजर्‍यात तिन महिने लागतात त्याला आंबोलीत सहज साडेचार महिने तरी लागतात. त्यामुळे मार्केटसाठी झटपट भाजीपाला शेतीही फारशी करता येत नाही.

सर्व साधक बाधक विचार करुन मी शेवटी ऊस लावायचा बेत पक्का केला. माझ्यासाठी यामुळे दोन गोष्टी होणार होत्या. एक म्हणजे ऊसाच्या पाल्याचे आच्छादन मिळणार होते व वर्ष अखेरीस थोडे पैसेही मिळाले असते. पुर्ण तिन एकर भाजी वगैरे लावली तर ती विकण्याचा प्रश्न ऊभा राहिला असता. तीन एकरभर भाजी लावायचे ज्ञान व अनुभव तेव्हा नव्हता आणि आजही तितकासा नाही.

ऊसाव्यतिरीक्त अजुन काहीतरी करायची खुमखुमी होती त्यासाठी अर्धा एकर जमिन ठेवायची व ऊरलेल्या अडिज एकरात ऊस लावायचा असे ठरवले. नेहमीसारखा यालाही थोडा विरोध झाला. पण मी दुर्लक्ष केले. पाळेकर गुरूजी एक किस्सा सर्व शिबिरात सांगतात. त्यांना भेटणारे काही शेतकरी त्यांचा किती एकर ऊस आहे हे अभिमानाने सांगतात. घरचे तांदुळ, डाळ, ज्वारी, शेंगदाणा कुठुन आणता विचारले तर बाजारातुन आणतो हे ऊत्तर मिळते. गुरूजी म्हणतात काय हे कर्मदारिद्र्य!! जो आपण खात नाही तो ऊस लावायचा आणि जे आपण खातो ते पैसे देऊन विकत आणायचे, तेही विषयुक्त. मला अर्थात हे करायचे नव्हते. आपल्याला लागणारे धान्य जमेल तितके आपण पिकवायचे हे मी ठरवले होते. त्यासाठी सद्ध्या अर्धा एकर जमिन पुरेशी होती.

क्रमशः

( चार वर्षांचा लेखाजोखा इथे मांडण्याचा प्रयत्न आहे, थोडे लिहिलेय, बरेचसे लिहायचे आहे, त्यामुळे पुढचा भाग काढण्यास वेळ लागु शकतो.)

Attachmentमाप
Image icon after.png635.01 KB
Image icon shet1.jpg25.89 KB

नैसर्गिक विषमुक्त शेती @ आंबोली - एक प्रवास : भाग २

ऊस लावायच्या आधी जमिनीची मशागत करुन घेणे गरजेचे होते. जमिन दोन वर्षे पड होती, त्यामुळे सर्वत्र गवत व छोटी झुडपे माजली होती. शेतात फिरताना पायाला जमिन दगडासारखी घट्ट लागत होती. ऊसाच्या ऊभ्या सऱ्या पायाला लागत होत्या म्हणजे इतक्या भयंकर पावसातदेखील माती विरघळली नव्हती, दगडासारखी घट्ट झाली होती. वर्षानुवर्षे रासायनिक शेती केली कि जमीन अशीच दगड होते.

आम्ही जुनमधे आंबोलीत आलो तेव्हा शेताला कुंपण घालायचे काम पुर्ण झाले होते. एका शेजाऱ्याकडे जास्तीची भात व नाचणीची रोपे होती ती त्याने माझी परवानगी घेऊन शेतात लावली होती. तो तेवढा भाग सोडला तर बाकी शेत तणाने भरले होते. भात व नाचणी मध्येच उभी असल्यामुळे मला त्याची काढणी होईपर्यंत वाट बघत बसावे लागले. भात पिकून कापणी झाली तरी नाचणीची बोंडे पिकतच होती. ती कधीतरी नोव्हेम्बराच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत काढली गेली आणि त्यानंतर मी नांगरटीच्या मागे लागले. माजलेल्या घन गवतामुळे कोणी नांगरटीला तयार होईना. आधी गवत काढुन घ्या मग नांगरुया असेच सगळ्यांचे मत पडले. तीन एकर शेतातले गवत काढायचा खर्च जबरी झाला असता म्हणुन गवत जाळण्याचा ऊपाय सुचवला गेला ज्याला शेत जाळणे म्हणतात. मला हा ऊपाय नको होता पण नाईलाजाने हो म्हणावे लागले.

शेतात आग घालताना शक्यतो भल्या सकाळी किंवा संध्याकाळी उशिरा घालतात कारण या वेळेस वारा कमी असतो व गवत थंड असते. दुपारी उन्हात गवत गरम होते व कापरासारखे जळते. आग घालताना हिरव्या पानांच्या झुपकेदार डहाळ्या हातात तयार ठेवायच्या म्हणजे नको तिथे जाणारी आग डहाळ्यानी विझवून मर्यादेत ठेवता येते. डिसेंबरात सगळीकडेच गवत बऱ्यापैकी वाळलेले असते त्यामुळे अतिशय काळजी घेऊन शेतात आग घालावी लागते. नाहीतर शेजारच्या शेतात आग पसरण्याचा धोका असतो. ( हा ही अनुभव घेऊन झालाय, पुढे येईलच.)

आग घालायची तर ती कंट्रोल करायला लोक हवेत, त्यासाठी शेजारच्या बायका बोलावल्या आणि एका संध्याकाळी हिरव्या डहाळ्या हातात घेतलेल्या बायकांची फौज घेऊन मी शेतात ऊतरले. १०-१२ गुंठे गवत जळले पण वरवर जरी वाळल्यासारखे दिसले तरी आत गवत ओले होते. ते जळेना. आग घालून काहीही फायदा झाला नाही, गवताचा प्रश्न होता तिथेच राहिला. त्यात शेतात मला बैलाची नांगरट हवी होती, शेतात ट्रॅक्टर नको कारण त्याच्या वजनाने जमिन दबली जाते आणि तिची पाणी जिरवायची क्षमता कमी होते हा संस्कार माझ्या डोक्यावर झालेला होता. या गवताने भरलेल्या आणि दगडासारख्या घट्ट जमिनीत बैलाने नांगरट झालीच नसती. आता काय करायचे??? ट्रॅक्टरला पर्याय नव्हता. शेवटी गावातला एक ट्रॅक्टरवाला बोलावला पण त्याने शेत बघून नांगरट नीट होणार नाही म्हणायला सुरवात केली.

आंबोलीत मी राहते बाजारवाडीत आणि माझे शेत आहे नांगरतास वाडीत. म्हणजे माझ्या घरापासून बरोब्बर आठ किमी दूर. रोज जा ये करून करून तिथले बरेच लोक माझ्या ओळखीचे झालेत. शेत जरी आमच्या मालकीचे असले तरी माझ्या गावच्या घराच्या मंडळीनी कधीच शेतात व शेतीत रस घेतला नव्हता. जमीन आहे म्हणून शेती कशीबशी रेटत होते. त्यामुळे शहरातून येऊन मी शेतात इतका रस घेतेय याचे गावच्या मंडळींना थोडे कौतुक, थोडे आश्चर्य, थोडी असूया असे काहीसे वाटे. शक्य ती मदत मात्र हे लोक आनंदाने करत होते आणि आजही करतात.

त्यापैकी काहींनी बाजूच्या गावातल्या चांगले काम करणारा म्हणुन लौकिक असलेल्या एका ट्रॅक्टरवाल्याचा रेफरन्स दिला. मी त्याच्या घरीच जाऊन धडकले. हो ना करता तो तयार झाला एकदाचा. हा खरेच चांगला माणुस मिळाला. त्याची पुढे खुप मदत झाली.

शेत नांगरण्याची सोय केल्यावर पाणी शेतापर्यंत कसे आणायचे हा प्रश्न उपस्थित झाला. महाराष्ट्र वीजमंडळाचा मीटर व पाण्याची मोटर काकाची म्हणजे आता माझी असली तरी हिरण्यकेशी नदीतील पाणी व माझे शेत यांच्यामध्ये अजुन एक शेत होते. त्या शेताखाली पाईपलाईन घालुन शेजारच्या शेताच्या कडेपर्यंत पाणी आणले होते पण तिथुन माझ्या शेतापर्यंत आजपावेतो जमिनीवरच्या उथळ पाटातुन पाणी धावत येत होते. ऊसाला पाणी सोडले की पहिल्या दिवशी ते २०० मीटर अंतर पार करून माझ्या शेतात पोचायला त्याला तासभर तरी लागायचा असे मावशीकडून ऐकले होते. पहिल्या दिवशी पाटात भरपूर पाणी मुरले की दुसऱ्या दिवशी तितका वेळ लागायचा नाही. यात भरमसाठ पाणी वाया जात होते. पाणी देणाऱ्याचा वेळही फुकट जात होता. आंबोलीत पाणी भरपुर, त्यामुळे लक्षात कोण घेतो? दोन वर्षे वापरात नसल्यामुळे तो गवतात अदृश्य झाला होता. शेवटी मोजमापे घेऊन शेजाऱ्याचे शेत ते माझे शेत यात किती पाईप लागतील ते काढले, पाईप व इतर सामग्री आणुन एक जेसीबी मागवला, लांब चर खोदला आणि त्यातुन पाईपलाईन घालुन पाणी शेताच्या दारात पोचवले.

मी शेती करायला पाळेकर गुरुजी पद्धती वापरतेय, त्यात शेतात देशी गाय असणे अनिवार्य आहे. कोणे एके काळी घरात गायी म्हशी होत्या, आता सगळे इतिहासजमा झाले. त्यामुळे गावी गेल्यावर मी देशी गायीच्या शोधात होते. गाय मिळेपर्यंत काय तरी व्यवस्था करणे भाग होते. गावाच्या ओगले कुटुंबाशी आमच्या पूर्ण कुटुंबाचे पूर्वापार संबंध. ह्यांचा शेतीचा व दुधाचा धंदा आहे आणि एक देशी गाय ते बाळगून आहेत. जून ते डिसेंबर 2020 मी अधून मधून त्यांच्याकडून शेण आणत होते पण त्यांच्याकडे गोमूत्र पकडायची सोय नव्हती. त्यामुळे मला कुठेतरी माझी सोय करायलाच हवी होती. मी गावात कोणाकडे देशी गाय मिळते का शोधत होते. आणि गावात लोकांना देशी गाय म्हणजे काय ते कळत नव्हते. ते देशीला गावठी गाय म्हणतात. गावात देशी गायी दिसणे आता दुरापास्त झालेय. सगळ्यांकडे संकरित गायी. शेवटी एकाकडे देशी गाय आहे असे कळल्यावर मी बघायला गेले. माझ्या मते तीही संकरित होती पण बाकीच्यांच्या मते ती देशी होती. शेवटी मी म्हटले जाऊ दे, मला हवी तशी गाय मिळेपर्यंत चालवून घेऊ. गाय किंवा कुठलेही प्राणी पाळणे किती कटकटीने असते हे मला माहित नसल्यामुळे मुर्खासारखे मी स्वतः गाय पाळायचे ठरवले होते. आजवर गोठे केवळ बाहेरुन पाहिल्याचा परिणाम, अजुन काय… Happy

हि जी गाय मिळालेली तिचे शेण मला सहा महिने मिळाले. पावसाळ्यात त्याने गाय दुसरीकडे पाठवून दिल्यावर माझ्यासमोर परत प्रश्नाचिन्ह उभे राहिले. मी परत ओगल्यांना शरण गेले. त्यांच्याकडे रोज जाऊ लागले तसे गोठ्यातले कष्ट मला दिसायला लागले. त्यांच्याकडे जरी गोठ्यात काम करायला कायमचा माणूस असला तरी इतर सर्वत्र आहेत तसे ह्याचेही नखरे असायचे. न सांगता अचानक गायब व्हायचे, पगार मिळाला कि चार दिवस गडप. पगार देतानाच समजून जायचे कि आता हा पुढचे चार दिवस येणार नाही, त्याला बाटलीशिवाय काम झेपायचे नाही. तो स्वतःच बाटलीची व्यवस्था करायला गेला तर अजून दोन तास लेट येणार, त्यापेक्षा आपणच बाटली आणून ठेवायची.... इत्यादी इत्यादी... तो नसला कि घरमालकिणीला गोठ्यात उतरावे लागायचे. बहुतेक वेळा ओगले बाई मला गोठ्यातच भेटायच्या. हे बघून गाय सांभाळणे आपल्या कुवतीबाहेरचे आहे हे माझ्या लक्षात आले. आजवर गाय न मिळाल्याबद्दल मी देवाचे शतशः आभार मानले आणि विन विन सोलुशन शोधले. ओगल्याना सांगितले कि तुम्ही गोमूत्र पकडायची कायतरी सोय करा आणि मला रोज शेण व गोमूत्र द्या. मी गाय पाळली तर मला खर्च आहेच. तो मी तुम्हाला देते. त्यांचे त्याचवेळी गोठ्याचे रिनोवेशन सुरु होते. त्यांनी गोमुत्राची व्यवस्था केली आणि माझा एक प्रश्न मिटला.

नांगरट होईपर्यंत मी आजुबाजुला होणाऱ्या नव्या ऊस लावणीचे निरिक्षण करत होते. आधी जमिनीची मशागत करतात म्हणजे ऊभी आडवी नांगरट करुन जमिन सपाट करुन सऱ्या पाडतात आणि सऱ्यात पाणी सोडुन देतात. लावणी करणारी एक टीम असते. त्यात बाया जास्त आणि बाबे कमी. एकरी आठ -नऊ हजार ऊसलावणीची रक्कम ठरते. लावणीसाठी साधारण १०-११ महिने वय असलेला ऊस विकत घेऊन मालकाने शेतावर आणुन द्यायचा, सरी बिरी पाडून शेत तयार ठेवायचे. बाया उसावरचे पाचट सोलून काढतात. बाप्ये मंडळी सरीत पाणी सोडतात. उसाचे धडाधड तुकडे करुन पाणी भरलेल्या सरीत एकेक तुकडा ठेऊन वर दणादण पाय ठेऊन त्याला खाली दाबत बाया पुढे जात राहतात. यात अजून एक गम्मत असते. बाया ऊस धडाधड लावत जात असतात आणि वानरांची टोळी दूर झाडांवर बसून हे पाहात असते. लावणी करणारे लोक थोडे पुढे गेले कि वानरे खाली उतरून पुरलेल्या उसाच्या कांड्या काढून घेतात आणि लहान बाळाला छातीशी धरावे तश्या त्या कांड्या छातीशी धरुन
वर झाडावर जाऊन बसून मस्त सोलुन ऊस खातात. शेतमालक लावणीच्या वेळी फटाके घेऊन फिरत असतो, वानरे खाली उतरली कि तो फटाके फोडतो. सुरवातीला फटाक्यांच्या आवाजाने वानरे पळायची. आता नाही घाबरत. (अनियंत्रित वाढलेली व जंगले सोडुन गावात व शहरात घुसलेली वानरे व माकडे ही कोकणातली मोठी डोकेदुखी आहे.)

ही अशास्त्रीय पद्धत पाहुन मी हादरले. एकतर बीयाणे म्हणुन निवडलेला ऊस निरोगी, दर्जेदार असतोच असे नाही. दुसरे म्हणजे ऊस तोडताना बाया हातात ऊस घेऊन धडाधड घाव घालतात. शास्त्रियदृष्ट्या डोळ्याच्या वर एक तृतियांश व डोळ्याच्या खाली दोन तृतियांश असा एकेक तुकडा पडायला हवा. पण असे धडाधड घाव घालताना हे पथ्य सांभाळले जात नाही. तिसरे म्हणजे सरीत पाण्याखाली ऊस ठेऊन तो खाली जाण्यासाठी पाय दिल्यावर ऊसाच्या डोळ्याचे काय झाले हे अजिबात कळत नाही. डोळ्याची प्लेसमेंट व्यवस्थित नसेल, डोळा जमिनीत खालच्या दिशेने गेला असेल तर तो रुजुन येणार नाही. पण ऊस लावणी करणारी टिम घाईत असते. अल्पावधीत भरपुर लावणी करुन पैसे कमवायचे असल्यामुळे एका शेतात ऊस सोलुन, तोडुन, धडाधड लावणी करुन लवकरात लवकर त्याना दुसऱ्या शेतात पळायचे असते. ही टिम लावणी करुन जाते त्यानंतर ऊस ऊगवुन यायला एकविस दिवस लागतात. तो जरा वर आला की गॅप्स दिसायला लागतात. जिथे डोळा खालच्या दिशेला गेला किंवा जिथे नेमका डोळ्यावर घाव बसला तिथे रोप उगवून येत नाही. शेतकरी अशा मोकळ्या जागी ऊस रोपे विकत आणुन लावतो. ती रोपे एक - दिड महिना वयाची असतात. त्यामुळे फारसा फरक दिसून येत नाही.

ह्या पद्धतीने मला ऊस लावायचा नव्हता. म्हणुन चर्चा करुन ऊसरोपे लावायचे ठरवले. कुठली जात निवडायची हा प्रश्न होताच. आंबोलीत सगळे काळुबाळू लावतात. नेटवर खुप शोधुनही ही जात मला सापडली नाही. गावातले शेतकरी जिथुन रोपे आणतात तिथे विचारले तेव्हा ही ८६०३१ असल्याचे कळले. बराच विचार करुन मी शेवटी ८६०३२ जातीची रोपे घ्यायचे ठरवले. ही सध्याची सर्वात चांगली जात आहे. हा ऊस कमकुवत असल्याने वाढला की पडतो व जास्त गोड असल्याने प्राणीहल्ले जास्त होतात असे म्हणत आंबोलकर याच्या वाटेला जात नाहीत . (प्राणीहल्ले तर तसेही होतातच पण हा ऊस लोळत नाही हा माझा तिन वर्षाचा अनुभव आहे. )

नांगरट झाल्यावर मी सऱ्या पाडुन घेतल्या. सऱ्या किती अंतरावर व कशा हव्यात हे मी आधी ठरवले होते पण पाडताना मी ते विसरले आणि चुकीच्या पद्धतीने सऱ्या पाडल्या गेल्या. मला उसाच्या दोन ओळीत ६ फूट अंतर हवे होते. एवढे अंतर ठेवायला कोणीही तयार होत नाही. जिथे एकरी १०० टन ऊस उत्पादन घेतात त्या कोल्हापूर, सांगली, सातारा भागातही इतके अंतर ठेवायला लोक कचरतात तर आंबोलीत कोण कसे तयार होणार? म्हणून मी सेफ साईड साडेचार फूट अंतर ठेवायचे ठरवले. हे अंतर ठेवायचे तर अडीच अडीच फूट अंतरावर सऱ्या पाडायच्या आणि दोन ओळीतली एक सर मोकळी ठेवायची असे करायला हवे होते. पण तसे न करता मी थेट साडेचार फूट अंतरावर सर पाडायला लावली. तसे करणे फारसे चूक नाही. ट्रॅक्टरवाल्याने त्याच्या शेतात साडेचार फूट सरीच पाडल्या होत्या पण या मोठ्या सरींमुळे माझे पुढचे गणित चुकले. कसे ते पूढे येईल. चुक झाली हे खुप ऊशिरा लक्षात आले त्यामुळे चुक सुधारता आली नाही आणि तीन वर्षे ती सहन करावी लागली.

तर मी शेत पुर्ण नांगरुन पुर्व पश्चिम सऱ्या पाडुन घेतल्या. आडव्या सऱ्यांमधे पाणी फिरवायला ऊभे पाट मारुन घेतले. मग दोन पाटांतील चार चार सऱ्यांचा गृप करुन घेतला, ह्या गृपला मडया म्हणतात. शेतात पाणी खेळवण्यासाठी या सगळ्यांची गरज आहे. बागेला हातात पाईप धरुन पाणी देतात तसे शेताला देता येत नाही. सऱ्या ट्रॅक्टरने, पाट बैलांनी व मडया माणसांनी मारल्या. प्रत्येकाचा खर्च वेगळा.

शेतात मेजर काम करायला गावातल्या बायका सहकार्य करत होत्या पण शेतात सतत पडणारे काम करायला एखादा गडी हवा होता. आमच्या घरी घरकाम करायला गावातली रजनी येत होती, तिचा नवरा घरीच बसून होता. माझ्या मावशीचे (तीच माझी काकीसुद्धा, माझ्या सगळ्यात धाकट्या काकाची बायको. माझी काकी व्हायच्या आधी ती माझी मावशी होती त्यामुळे काकी झाल्यावरही मी तिला मावशीच म्हणते. Happy मी शेत करायला घ्यायच्या आधी काका शेत करत होता, काका गेल्यावर शेत पडिक राहिले. मी करायला लागल्यावर मावशी माझ्या सोबत शेतात येत असे.) असे म्हणणे पडले कि त्याला जड काम फारसे जमत नाही त्यामुळे त्याला कोणी कामाला बोलावत नाही. तुझ्या शेतात तसे फारसे जड काम नाही त्यामुळे त्याला गडी म्हणून ठेव, तो छोटी मोठी कामे करेल. आता या गड्याला एकट्याला काहीही काम सुचत नसे, त्याला हाताखाली बायको रजनी लागत असे. त्यामुळे तीही शेतावर काम करायला यायला लागली आणि आमचे घरकाम तिने सोडले. थोडे दिवस दोन्ही करून पाहिले पण जमेना. या दोघाना महिन्यावर पगार नको होता, दिवसावर हवा होता. आंबोलीत तेव्हा गड्याला ३५०-४०० व बाईला २०० दरदिवशी असा दर होता. मी दोघाना मिळून ५०० रु सांगितले कारण दर दिवशीच्या कामाची गॅरंटी होती. अशा तर्‍हेने गड्याची पण सोय झाली.

मी शेताचे मोजमाप घेतले, किती सर्‍या आहेत ते लिहून काढले, किती अंतरावर रोपे लावणार तेही लिहिले व हिशोब केला. साधारण १२,००० रोपे लागतील असा हिशोब निघाला, जो थोडासा चुकला. लावणीनंतर साधारण १००० रोपे शिल्लक राहिली. २रु ला एक रोप मिळते. आंबोलकर जिथून रोपे मागवायचे मी तिथून रोपे मागवली. नंतर लक्षात आले कि अजून थोडा अभ्यास करायला हवा होता, अजून चांगली रोपे मिळाली असती. हि रोपे मोठी झाल्यावर लक्षात आले कि रोपे मिक्स होती. दुसर्या जातीची २-३ टक्का रोपे यात होती. पण असो. सुरवातीला अशा चुका व्हायच्या.

ऊस रोपे आल्यावर शेताची पुजा करून १५ जानेवारी २०२१ ला रोप लावणीचा कार्यक्रम सुरू केला. त्यासाठी गावातल्या बायका बोलावल्या. शेताची पुजा करायला गावातल्या गावकर्‍याला बोलावले, हा त्यांचा मान असतो. त्या दिवशी ग्रामपंचायतीची कसलीशी निवडणुक होती तरी वेळात वेळ काढुन तो सकाळी ९ ला हजर झाला व त्याने शेताची पुजा करुन आमचा शेती करण्याचा मार्ग मोकळा करुन दिला.

खाली माझे शेत. खालचा फोटो फेब २०२४ मधला आहे, माझ्या शेतात उसतोडणी झाली होती आणि मी पुढच्या कामासाठी शेत तयार करुन ठेवले होते. बाजुच्या शेतांमध्ये तोडणी सुरू होती/झाली होती. शेताच्या दोन्ही बाजुने नदी दिसतेय. डावीकडे वर्तुळ काढलेय तिथे माझी पाण्याची मोटर आहे. तिथुन मधल्या शेताखालुन पाइपलाईन घालुन पाणी शेतात आणलेय.

after.png

Attachmentमाप
Image icon shet1.jpg25.89 KB

नैसर्गिक विषमुक्त शेती @ आंबोली - एक प्रवास : भाग ३

शेताची पुजा करून १५ जानेवारी २०२१ ला रोप लावणीचा कार्यक्रम सुरू केला. गावठाण वाडीतल्या म्हणजे आमच्याच वाडीतल्या बायका सगळ्या मावशीच्या मैत्रिणी. केवळ मावशीमुळे त्या माझ्या शेतावर कामाला यायला तयार झाल्या. या बायका नियमीत मजुरीवर जाणार्‍या नव्हत्या. गावी वनखात्याची नर्सरी आहे, त्यात अधुन मधुन कामाला जाणार्‍या या बायका. त्यांना शेतातल्या कामाचा तितकासा अनुभव नव्हता. पण तरीही त्या प्रेमाने यायच्या. अर्थात मी मजुरी देत होते.

उसरोपाच्या दोन ओळीतले अंतर सरीमुळे फिक्स होते पण दोन रोपांत मला २ फुट अंतर हवे होते. गावच्या बायकांना रोपे जवळजवळ लावायची सवय. त्यांना सांगुनही अंतर ठेवणे जमेना. शेवटी दोन फुटांच्या काठ्या करुन दिल्या आणि काठी जमीनीवर ठेऊनच रोप लावा ही तंबी दिली. तेव्हा कुठे रोपलावणी मला हवी तशी सुरू झाली.

एवढ्या मोठ्या शेतावर मी कुठे व किती लक्ष देणार? त्यात मलाही फारशी माहिती नाही. आमची लावणी बघायला एक शेजारी आले. ते म्हणाले , हे काय? सर्‍यांच्या सुरवातीला का नाही रोप लावत? एका रोपाची जागा फुकट घालवताय तुम्ही..... आम्ही मग तसे केले. परिणाम हा झाला की नंतर पाणी लावताना ह्या बिचार्‍या टोकाच्या रोपाला जोरात पाणी मिळून त्याची माती वाहुन जायची, मुळे उघडी पडायची..

सर्‍या पाडणार्‍याने पुर्व पश्चिम सर्‍या पाडल्या होत्या आणि उत्तर -दक्षिणेला एक लांबचलांब पाट ठेवला होता. बायकांनी या पाटातही रोपे लावली. नंतर भरती करायला त्याच ट्रॅक्टरवाल्याला बोलावले. तो पाटातली रोपे बघुन म्हणाला, हे काय? ह्याच्यात का रोपे लावली? मी ही जागा मुद्दाम खाली ठेवली होती, भरती करताना ट्रॅक्टर फिरवायला जागा राहावी म्हणुन... मी गप्प.

रासायनिक शेती करणारे लोक रोपे लावल्यावर लगेच एक आळवणी घेतात. म्हणजे रोप मरु नये, वाढु लागावे म्हणुन एक टॉनिक + खत असे काहीतरी केमिकल पाण्यात मिसळून एकेक पेला प्रत्येक रोपाच्या बाजुला गोल टाकायचे. माझ्या जमिनीत तेव्हा काहीही खत नव्हते, त्यामुळे मला जरी रासायनिक शेती करायची नव्हती तरी आळवणी केली. रोपे मरुन गेली तर काय करणार? त्यानंतर एका महिन्याने रासायनिक खतांचा एक डोस दिला. आजवर मी वापरलेली रासायनिक खते एवढीच. यानंतर मी कुठलेही रासायनिक खत वापरले नाही.

खत म्हणुन मी जीवामृत देणे सुरू केले. साधारण दर दहा पंधरा दिवसांनी मी उसाला पाणी देत होते. पाण्याचा उपसा जिथे होता तिथे मी जीवामृताचा बॅरेल ठेऊन पाईपने पाण्याबरोबर जीवामृत सोडून देत होते. साधारण एका एकराला २०० लिटर जीवामृत पुरेसे होते. म्हणजे मला २ बॅरेल जिवामृत पुरायला हवे होते. पुर्ण शेतात पुर्व पश्चिम सर्‍या पाडल्यावर त्यावर पाणी देण्यासाठी उत्तर दक्षिण पाट काढले होते. हे पाट शेताचे आयताकृती भाग करतात. या प्रत्येक भागालाही सरी असे म्हणतात. म्हणजे पश्चिमेच्या कोपर्‍यातुन सुरवात करुन सरी १, सरी २ अशी नावे आम्ही ठेवली होती. अशी नावे ठेवणे आवश्यक असते कारण गड्याला काम सांगताना अमुक सरीत अमुक करायचे आहे असे सांगणे सोपे जाते. माझ्या शेतात अशा ११ सर्‍या होत्या.

माझ्या गड्याचा काम करण्याचा स्पिड अगदीच कमी असल्यामुळे त्याची एका दिवसात साधारण १ सरी पाणी देऊन व्हायचे आणि त्या दिवसभरात एक बॅरेल जीवामृत संपायचे. मी वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या सर्‍यांत जीवामृत द्यायचा प्रयत्न करायचे. पण पुर्ण शेताला जीवामृत मिळतेय असे मला वाटायचे नाही. कारण दोन बॅरेल जीवामृत ३-४ सर्‍यात संपायचे. माझ्याकडे बॅरेले दोनच होती आणि डिसेंबरातल्या थंडीत जीवामृत तयार व्हायला ५-६ दिवस लागायचे. तेच उन्हाळ्यात ३-४ दिवसात जीवामृत तयार व्हायचे. शेताची खतांची पुर्ण गरज मी भागवू शकत नव्हते. याचा अर्थातच उत्पादना वर परिणाम झाला.

पुर्णपणे रासायनिक शेतजमिनीवर मी पहिल्याच वर्षी उसाचा प्रयोग करायला नको होता. त्या जमिनीवर आधी द्विदल पिक घेऊन जमिनीतला नत्र वाढवायला हवा होता आणि मग उसाचा प्रयोग करायला हवा होता. यासाठी ऑक्टोबरात शेत नांगरुन घेऊन लगेच पुर्ण शेतात चवळी, मुग किंवा हिरवळीचे खत (ताग, धैंचा वगैरे) लावून त्याची जानेवारी शेवटपर्यन्त काढणी करुन मग फेब्रुवारीच्या पहिल्या दुसर्‍या आठवड्यात ऊस लावायला हवा होता.

मी पाळेकर पद्धतीने शेती करणार्‍या शेतकर्‍यांच्या संपर्कात होते, त्यांनी साधारण अशाच स्वरुपाचा सल्ला दिला होता पण सगळेच सल्ले अंमलात आणता येत नाहीत. आजुबाजुला सगळेच जण अमुक एका प्रकारची शेती करत असताना तुम्ही काही वेगळे करायला लागलात तर तुम्ही कसे चुक आहात हे सांगणार्‍यांची गर्दी जमते. आणि त्यात शहरातुन पुस्तकी ज्ञान गोळा करुन आलेली एक बाई हे करतेय म्हटल्यावर ती मुर्ख आहे हा शिक्का मारणे अगदीच सोपे जाते. मला कुठल्याही शिक्क्याने काहीही फरक पडत नव्हता पण माझ्या सोबत मावशी होती, लोक तिच्यावर प्रेशर घालायचे, तिला फरक पडत होता. इतके पैसे खर्च केलेत तर जरा चांगली शेती करा, नैसर्गिक शेतीची फॅडे आंंबोलीत चालणार नाहीत, उगीच वेळ वाया घालवू नका वगैरे वगैरे भरपुर कानावर यायचे. मी डोक्यावर बर्फाची लादी ठेऊन दिलेली होती. मी सगळे ऐकायचे आणि काहीच उत्तर द्यायचे नाही. तसेही मी एक वर्ष शेती केल्यावर शेती सोडून पळणार याबद्दल बहुतेकांची खात्री होती.

ऑक्टोबरात शेत तयार असणे अशक्यच होते त्यामुळे द्विदल वगैरे विचार सोडुन द्यावा लागला आणि लोकांचे प्रेशरही होते व माझी गरजही होती म्हणुन मी ऊस लावला. ऊस लावल्यानंतर 'तुमचे जीवामृत वगैरे द्या पण थोडा युरियाही द्या, नाहीतर काहीही वाढणार नाही' हा सततचा सल्ला मात्र मी सरळ धुडकाऊन लावला. मी सरळ सांगायला सुरवात केली की शेतात काहीही आले नाही तरी चालेल पण युरीया वगैरेचा सल्ला मला अजिबात देऊ नका. पहिले पुर्ण वर्ष मला ह्या सल्ल्याविरुध्द लढाई करावी लागली. मला लोकांचे वाईट वाटायचे कारण मी त्यांचे अजिबात ऐकणार नाही हे मला माहित होते पण सल्ला देणार्‍यांना आशा होती की सततच्या हॅमरींगमुळे मी शहाणी होईन. आता मला कोणीही खतविषयक सल्ला देत नाहीत , इतर सल्ले मात्र देतात. ही बया खताच्या बाबतीत अजिबात ऐकत नाही हे त्यांनी आता स्विकारलेय. पण माझे पुस्तकी ज्ञान चुकीचे आहे हे मला अधुन मधुन ते ऐकवतात.

बर्‍याच जणांना वाटते की शेतीत काय शिकायचे? आपले वाडवडिल शेती कुठुन शिकुन आले का? तरी ते करत होतेच ना? मग आपल्याला का शिकायचे? शेती शिकायची गोष्ट नाही, ती आपोआपच येते यावर त्यांचा ठाम विश्वास आहे. त्यांना हे कळत नाही की वाडवडिल शेती करत होते तेव्हाची हवा, पाणी, पर्यावरण आता राहिलेले नाही. आजोबापर्यंत शेतात जे पिकत होते ते त्यातला माणसांनी खायचा भाग माणसे खात होती व बाकीचा गुरे. तेच परत शेण बनुन शेतात येत होते. एक सुंदर निसर्ग चक्र शेतात होते ज्यात शेतातली प्रत्येक गोष्ट वापरात होती, परत शेतात येऊन पडत होती. वडलांच्या काळात हरित क्रांती झाली, गुरे नाहीशी झाली, त्यांच्या जागी पेट्रोल्/डिझेलवर चालणारे ट्रॅक्टर आले. शेतात शेण पडायचे बंद झाले. त्याजागी युरिया आला.

२०२३ च्या जागतिक मृदा दिनानिमित्त आमच्या ग्रामपंचायतीत कार्यक्रम होता. (हे कार्यक्रम कसे साजरे होतात त्याची जम्माडी गंमत मी नंतर लिहिन ) मी गेले होते. सरकारी कृषी अधिकारी आले होते. कार्यक्रमात उत्तम भाषणे झाली. जगभर आणि भारतात शेतजमिन कशी नापिक झालेली आहे आणि ती परत सुपिक करण्यासाठी जगभर व भारतात काय काय प्रयत्न होताहेत याचा आलेख अधिकार्‍यांनी उत्तमरित्या मांडला. एका अधिकार्‍याने सांगितले की भारतिय शेतकरी युरिया वापरायला लागले आणि त्यानी शेण वापरणे बंद केले म्हणुन अधःपात झाला. १ किलो युरियाबरोबर १० किलो शेण असे केले असते तर आजची परिस्थिती आली नसती. मी ऐकुन थक्क झाले. म्हटले हे शेणाचे आजवर कधी ऐकले नाही. कुठल्या पिकाला कुठले खत कधी द्यावे याचे कृषी विद्यापिठाचे कोष्टक असते. त्यात एक वाक्य सुरवातीला असते, अमुक एक टन शेणखत द्या. नंतर कुठेही शेणखताचा उल्लेख नसतो. अमुक दिवसांनी अमुक खत इतके किलो हे अगदी डिटेलवार लिहिलेले असते. ही सगळी खते सर्वत्र उपलब्ध असतात, त्यावर सबसिडीही आहे. पण शेणखत कुठेही उपलब्ध नाही. लोकांनी गुरे बाळगणे बंद केल्यावर शेण बंद झाले. उत्तमोत्तम खते गावागावात उपलब्ध आहेत पण शेणखत नाही. शेतकर्‍यांना शेणखत वापरायचे हे माहितच नाही. शेणखत वापरल्यामुळे शेतात हुमणी उर्फ रोटा म्हणजे व्हाईट ग्रब ही अळी होते हे आमच्या शेतकर्‍यांचे मत आहे त्यामुळे ते शेणखत टाळतात. विकतचे खत घेणे परवडत नसेल तर नाईलाजाने शेणखत घालतात. आणि इथे हा अधिकारी शेतकर्‍यांना दोष देत होता की शेतकरी चुकले म्हणुन जमिनीचे नुकसान झाले. मी म्हटले धन्य रे बाबा हे सरकारी अधिकारी!!! शेतात युरिया घाला हे यांनीच शिकवले, सोबत शेणखतही घाला हे यानी सांगितलेच नाही आणि आता म्हणताहेत हे शेतकरीच गाढव.... नशिबाने या कार्यक्रमाला आंबोलीतील शेतकरी उपस्थित नव्हते त्यामुळे सरकार त्यांच्यावर असला ठपका ठेवतंय हे त्यांना कळले नाही.. असो.

तर लावणी होत आली, मी आळवणी घेतेय, मोकळ्या जागेत काय भाजी लावायचीय वगैरे नियोजन करतेय तेवढ्यात मुंबईला जाऊया असे टुमणे आईने लावले. माझे सर्व भाऊ मुंबईत, जुनपासुन कोणाचीही भेट नाही, करोनामुळे कोणी गावी आलेही नाही त्यामुळे आईला अस्वस्थ वाटू लागले होते. त्यात भावाच्या लग्नाच्या पंचविसाव्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन करायचे ठरल्याचा निरोप मुंबईतुन आला आणि आता चलाच म्हणुन आईने हट्ट धरला.

तिला एकटीला पाठवणे शक्य नव्हते. त्यामुळे शेतातले काम अर्धवट सोडुन जाणे माझ्या जीवावर आले तरी आम्ही मुंबईला जायचे ठरवले. तोवर ऊस लागवड होत आलेली पण राखुन ठेवलेल्या अर्ध्या एकरात कडधान्ये लावायची होती. घाईघाईने मी दोन सर्‍यांत झुडपी चवळी लाऊन घेतली. रोजच्यासाठी थोडी भाजी, कडधान्यात मुग व भुईमुग आणि काही ऊसरोपे जर मरुन गेली तर त्यांचा जागी ऊरलेली ऊसाची रोपे लावणी इत्यादी कामे मावशीच्या गळ्यात टाकुन मी मुंबईला गेले. मुंबईला आल्यावर साठलेली एकेक कामे काढली गेली, ती करण्यात पंधरा दिवस गेले आणि त्यानंतर आम्ही आंबोलीत परतलो. आई मुलांकडे थोडे दिवस राहते म्हणत मुंबईत राहिली आणि भावाची मुलगी शाल्मली चेंज हवा म्हणत आमच्यासोबत आली. तिचेही वर्क फ्रॅाम होम होते.

क्रमशः

नैसर्गिक विषमुक्त शेती @ आंबोली - एक प्रवास : भाग ४

गावी आल्यावर मी लगेच शेतात धाव घेतली. आधी उस पाहिला. काही ठिकाणी ऊसरोपे मरुन गेली होती पण त्या गॅप पडलेल्या जागी नविन ऊसरोपे लावली गेली नव्हती. जवळपास हजारभर उसरोपे तरी ऊरलेली जी मी जाताना सावलीत ठेवली होती. त्यांना १५ दिवस पाणी मारले नव्हते त्यामुळे ती सगळी रोपे सुकून गेली होती. आता ती लावता येणे शक्य नव्हते.

भाजी फारशी ऊगवुन आली नव्हती. चवळी मात्र मस्त उगवली होती. चवळी अगदी लगेच उगवते, नमस्ते करत हात जोडल्यासारखी लांबसडक पाने लगेच चार दिवसात दिसायला लागतात. एका सरीत दाट ओळीत पेरल्यासारखे काहीतरी ऊगवुन आले होते, ते काय असावे हे मला ओळखता येईना. शेवटी मावशीला विचारले, ती म्हणाली मुग. मला धक्काच बसला. मी म्हटले, अगं असे मुठीने कसे पेरलेस? चवळी पेरली तसे दोन दोन दाणे पेरायचे होते. ती म्हणाली, रजनीने पेरले. रजनीला विचारले तर ती म्हणाली, मावशीने पेरले. मला गप्प बसण्याशिवाय गत्यंतर ऊरले नाही. Happy हे असले 'नजर हटी दुर्घटना घटी’ अनुभव कितीतरी घेतलेत. कितीही समजाऊन सांगितले, करुन दाखवले तरी मालक नसताना शेतात चुका केल्या जातात. त्यात मी करत असलेल्या चुका वेगळ्या. एकुण चुकाच चुका.. चुकांची भाजी ऊगवली असती तर खाऊन खाऊन बेजार झालो असतो ईतक्या चुका मी व कामगारांनी मिळुन केलेल्या आहेत. असो.

हळुहळू केलेल्या मेहनतीचे फळ दिसायला लागले. झुडपी चवळी सुंदर वाढली, फुलायला लागली, शेंगा डोलायला लागल्या. शेंगदाणा आधीच विकत घेऊन ठेवलेला, तो पेरुन घेतला. फेब्रुवारीत शेंगदाणा पेरुन उपयोग शुन्य, पण विकत घेतलेला म्हणुन पेरला. हाती शेंगदाणे लागले नाहीत तरी जमिनीला नत्र मिळेल हा विचार करुन मनाचे समाधान केले. भूईमुग वाढला, फुले आली, आऱ्या फुटल्या. मी कधीच आऱ्या बघितल्या नव्हत्या. शेंगदाणे जमिनीखाली लागतात असे आपण सर्रास म्हणतो पण ते मुळांना लागत नाहीत. फुले यायला लागली की त्यांना खालच्या बाजुने दोरे सुटतात. या दोऱ्यांची टोके फुगीर असतात. ही टोके जमिनीत घुसुन त्यांचे शेंगदाणे होतात. हे मला माहित नव्हते. बेलापुरला कुंडीत दाणा पडुन रोप आलेले, त्याची पाने व फुले टाकळ्यासारखी असल्याने जरा दुर्लक्ष केले गेले. ते सुकल्यावर ऊपटले तर खाली भुईमूग लगडलेले. ते मुळांनाच लागले असणार असा तेव्हा समज झाला होता. तर शेतात हे आऱ्या प्रकरण पहिल्यांदा पाहिले. आऱ्या फुटल्यावर जमिनीखाली लोटल्या तर ऊत्पन्न वाढते हे युट्यूबने ज्ञान दिले पण सरी वरंबा अशा रचनेत ते करणे कठीण म्हणुन सोडुन दिले. फक्त दोन्ही बाजुने माती चढवुन घेतली. भाजीमध्ये वांगी, टोमॅटो चांगली लागली. घरी समोर थोडी जागा आहे तिथेसुद्धा वांगी, टोमॅटो, कांदे लावले होते. लाल माठ तर इथे असतोच. तोही मस्त झाला, पांढरे मुळे व मोहरीही खुप लागली. बहुतेक सगळी वांगी गावात विकली. लाल भाजी अशीच देऊन टाकली व घरात खाल्ली. मिरची पण भरपुर झालेली. सांडगी मिरची करायला लोकांनी विकत घेतली. टोमॅटो माकडांनी खाल्ले. Happy बाकी भाजीत गवार, भेंडी, नवलकोल लावलेले. यातले सगळे ऊगवुन आले पण सगळे खुरटलेले राहिले.

चवळीच्या पिकलेल्या शेंगांची खुडणी काही दिवसांत सुरू केली. जवळपास १०-१५ किलो चवळी मिळाली. मी पाव किलो चवळी पेरली होती. शेंगदाणा पिकेपर्यंत पाऊस पडायला लागला. शेंगातुन लगेच नवे कोंब फुटायला लागले. मी बाजारात ओल्या शेंगा विकायचा प्रयत्न केला, पण त्यासाठी शेंगा व्यवस्थित सॉर्ट करुन देणे आवश्यक होते, तितका वेळ नव्हता त्यामुळे ओल्या शेंगा गावातल्या माझ्याकडे कामावर येणार्‍या बायांना व घरात वाटुन संपवल्या. जवळपास पन्नास किलो शेंगा झालेल्या. भुईमुग लावायचा अनुभव मात्र पुढे कामाला आला. अर्ध्यापेक्षा शेंगा मातीत असतानाच किड्यांनी खाऊन टाकलेल्या, त्यांना तिकडे तातड म्हणतात. परत भुईमुग लावायचा तर ह्या प्रश्नावर उत्तर शोधायला हवे हे कळले.

अगदी दाट लावला तरी मुगांनी थोड्या शेंगा दिल्या. मी एक पाहिलेय. प्रतिकुल परिस्थिती असली तरी निसर्ग कधीच थांबत नाही. त्याचा जीवनक्रम तो पार पाडतोच. अनुकुल परिस्थितीत जे रोप एक किलो शेंगा देईल तेच प्रतिकुल परिस्थितीत चारच शेंगा देईल पण परिस्थिती नाही म्हणुन रडत बसत नाही. रुजणे, वाढणे, फुल येणे, फळ धरणे व नंतर परत निसर्गात विलीन होणे हा घटनाक्रम कुठलेही रोप अजिबात चुकवत नाही.

कडधान्य व भाज्यांमध्ये जीवामृत सोडुन बाकी काही मी वापरले नाही. मी दर पाण्याच्या पाळीला जीवामृत देत होते. शेणखत देणे आवश्यक होते पण आणणार कुठुन? गावात धनगरवाडे २-३ आहेत. तिथे विचारुन त्यांच्याकडुन शेणखत घेतले, त्यावर जीवामृत शिंपडुन त्याचे घनजीवामृतात रुपांतर करण्याचा प्रयत्न केला.

गावात मिळणार्‍या शेणखताची प्रत अगदीच बेकार होती. वरचे शेणखत उन्हात वाळुन त्यांचा दगड झालेला, फक्त खालचे शेणखत कुजुन भुसभुशीत झाले होते. शेणखत विकत घ्यायचा खर्चही खुप. शेणखत धनगरवाड्यावर असते, तिथुन ते आपल्या शेतात आणायला एकतर डंपर तरी हवा नाहीतर ट्रॅक्टरच्या ट्रॉल्या. मालकीची गुरे असलेला धनगर घरासमोर मोठ्ठा खड्डा खणुन त्यात रोजचे शेण टाकत राहतो, घरातला नको असलेला सर्व प्रकारचा सुका व ओला कचराही यात ढकलला जातो. वर्षभर हा खड्डा भरत राहतात आणि वर्षाच्या शेवटी आमच्या सारखा कोणी विकत घेणारा मिळाला की विकुन टाकतात. धनगराला खताचे पैसे पर ट्रॉली द्यावे लागतात, खत खड्ड्यातुन काढुन ट्रॉलीमध्ये भरायचे पैसे वेगळे आणि ट्रॉली ट्रॅक्टरला जोडुन शेतात नेणार्‍याचे पैसे वेगळे, आणलेले शेणखत शेतात पसरवायचा खर्च वेगळा. कृषी विद्यापिठ अमुक एक टन शेणखत शेतात पसरुन टाका असे सांगतात. पण शेणखत किती टन आहे हे कसे मोजायचे हे कोण सांगणार? गावात गाडी सकट मालाचे वजन करायची सोय नसते. त्यामुळे शेणखत वापरताना अंदाजपंचे वापरावे लागते. गावात ज्यांच्याकडे गुरे आहेत तेच शेतात शेणखत घालतात. विकतच्या शेणखताच्या भानगडीत सहसा कोणी पडत नाहीत. कृषी विद्यापिठाचा बारिक अक्षरात लिहिलेला 'अमुक एक टन शेणखत घाला' हा सल्ला कोणाला परवडत नाही. त्यापेक्षा युरिया घालणे सोपे आणि स्वस्त. युरियासोबत शेणखत पण हवेच हे ज्ञान अर्थातच मिळालेले नाहीय.

मी पहिल्यांदा खत घेतले तेव्हा धनगर ओळखीचाच होता, तसे गावात सगळे ओळखीचेच असतात म्हणा... तर त्याने माझ्यावर दया करुन पर ट्रॉली ३०० रुपये कमी केले. म्हणजे १३०० रु ट्रॉलीचे मला १००० रु लावले. खत भरायला त्याच्याकडे माणसे नव्हती. म्हणुन मावशीला गावातले दोन धट्टेकट्टे तरुण पकडुन आणायला सांगितले. एका ट्रॅक्टरवाल्याला बोलावले. गावात कोणाला बोलवायचे म्हणजे खुप मोठे काम होऊन बसते. आंबोलीत काही वाड्यांमध्ये अजिबात मोबाईल रेंज नाहीय. तिथल्या माणसाला बोलवायचे म्हणजे त्याचे घरच गाठावे लागते. आणि घरी गेल्यावर तो घरी सापडेलच याचा काही भरोसा नसतो. दोन चार फेर्‍या मारल्याशिवाय काम होत नाही. असे करुन लोक गोळा केले एकदाचे. प्रत्यक्ष शेण भरताना ते धट्टेकट्टे तरुण सकाळचा अर्धा दिवस काम करुन जे गुल झाले ते नंतर आलेच नाहीत. ते थेट दारुच्या दुकानात जाऊन पोचले होते म्हणे. मग आम्हीच कसेबसे शेण भरले आणि एकदाचे शेतात आणले. हे शेण शेतात पसरण्यासाठी शेजारच्या वाडीतल्या बायका बोलावल्या आणि शेण शेतात टाकुन घेतले. गावी दिवसाच्या मजुरीने लोक बोलावले की अगदी हळुहळू कामे होतात तेच एकरकमी पैसे देऊन बोलावले की भराभर कामे संपतात. Happy

ऊस अतिशय हळु वाढत होता. मी जीवामृताचा मारा सुरू ठेवलेला. तणनाशक वापरत नसल्यामुळे तण भराभरा वाढत होते. शेतात आपले पिक कायम हळुहळू वाढते आणि नको असलेले तण भसाभसा वाढते. आदल्या आठवड्यात दोन चार पाने फुटलेले गवत जर मध्ये एक आठवडा आपण गेलो नाही तर पुढच्या भेटीत अचानक अर्धा फुट वाढल्यासारखे वाटायला लागते, त्याच वेळी आपले पिक मात्र आहे तिथेच असते.

माझ्याकडे गडी जोडपे होते पण कुठलेही काम काढले की दोघेही 'ताई, माणसे बोलाव कामाला म्हणजे भराभर होईल' असे टुमणे लावायचे. माझी मावशी शेतात काकाबरोबर असायची पण कामावर आलेल्या मजुर बायांना चहा पाणी करणे एवढेच मर्यादित क्षेत्र तिचे असल्यामुळे तिलाही शेतात बाया घेतल्याशिवाय कामे होणार नाही असे वाटायचे. त्यामुळे माझ्याकडे कायम बाया काम करत असायच्या. आमदनी आठाणेही नाही तरी खर्चा मात्र दस रुपया अशी माझी अवस्था होती. त्यातही गंमत यायची. पहिल्या वर्षी आलेल्या बहुतेक बाया आमच्याच वाडीतल्या होत्या त्यामुळे गप्पांना अगदी ऊत यायचा. हात काम करताहेत सोबत तोंडेही चालताहेत असे असायचे. त्यात मला कामाची भारी हौस. मी जसा वेळ मिळेल तसे खुरपे घेऊन त्यांच्यासोबत तण काढायला लागे. हळूहळू शेतातली बरीचशी कामे मला यायला लागली. पण ऑफिसही चालु असल्याने माझी धावपळ व्हायची. शेतात नेट अजिबात नसे, त्यामुळे मिटींग असली की मला रेंजमध्ये परतावे लागे. थोडे दिवस एअरटेलचे वायफाय शेतात घेतले पण त्याची वायर झाडाझाडांवरुन टाकुन आणलेली, ती दर दोन दिवसांनी तुटायची. ती परत जोडेपर्यंत दोन दिवस जायचे. कंटाळुन शेवटी ते बंदच करुन टाकले. ऑफिसचे दिवसभराचे काम मी रात्री उशिरापर्यंत बसुन करत असे. आई घर सांभाळत असल्याने मला हे शक्य होत होते.

ज्या भागात उस लावलेला ती जमिन चांगली होती त्यात तिच्यावर भर पडली ऊसाच्या वाळलेल्या पानांची. ही पाने मी जमिनीतच जिरवत होते. ऊसाखाली जमिन हळुहळु आच्छादली जात होती. त्या मानाने भाज्या लावलेली जमिन आच्छादली गेली नाही आणि भाजीसाठी म्हणुन मी जो तुकडा ठेवला होता त्यात तळापही होते. माझ्याआधी तिथेही उसच लावायचे पण तो नीट व्हायचा नाही. मी लावलेली भाजी न उगवण्यामागेही हेच कारण होते. मधल्या दोन चार सर्‍या चांगल्या होत्या जिथे चवळी, मुग, भुईमुग इत्यादी नांदत होते.

फेब्रुवारी संपुन मार्च उजाडला तसे आजुबाजुच्या शेतात भरतीचा कार्यक्रम सुरू झाला. पहिल्या वर्षी ऊस सरीत लावतात. तो वाढला की त्याला आधार देण्यासाठी बाजुच्या वरंब्यावरुन नांगराचा फाळ नेला की तिथली माती सरीत पडते आणि उसरोपाला दोन्ही बाजुने मातीचा आधार मिळतो. दुसर्‍या वर्षी खोडवा वाढतो तोवर माती थोडी आजुबाजुला गेलेली असते. बाजुच्या सरीतुन नांगर नेला की परत मातीचा आधार मिळतो. आंबोलीत बहुतेक सगळेजण बैल वापरुन भरती करतात. दोन उसाच्या ओळींमध्ये अडिज ते तिन फुट अंतर ठेवतात त्यामुळे दोन बैल दोन बाजुला चालत व्यवस्थित भरती होते. माझ्या दोन ओळीत साडेचार फुट अंतर असल्यामुळे बैलाने भरती करणे औतवाल्यांना कठिण वाटायला लागले. सगळ्या औतवाल्यांनी नकार दिला. एक दोघे ट्रॅक्टर वापरुन भरती करणारेही होते पण ते भरती खुप लवकर करायचे. मी त्यांना विचारले तोवर त्यांच्यामते माझ्या ऊसाची उंची वाढलेली होती आणि अशा ऊसात छोटा ट्रेक्टर घातला तर ऊस मोडायचा धोका होता. अशा प्रकारे दोन ओळीत अंतर ठेवण्याची माझी पद्धत चुकल्यामुळे मी संकटात पडले. भरती हवीच कशाला, नाही केली तर काय होणार असे प्रश्न मी इतर शेतकर्‍यांना विचारले तर ते म्हणाले भरती केली नाही तर पावसाळ्यात ऊस आडवा होणार, वाहुन जाणार. शेतात पाणी भरत असलेले मी आदल्या वर्षी पाहिले होते त्यामुळे उगीच रिस्क घ्यायला भिती वाटत होती.

शेवटी परत शेजारच्या गावातल्या ट्रेक्टरमालकाला फोन केला. त्यानेच मला सर्‍या पाडुन दिल्या होत्या. त्याने मार्च मध्ये येऊन ऊस पाहिला आणि ऊस अजुन वाढुदे, मी भरती करुन देईन म्हणाला. त्याची पुढची फेरी एप्रिलमध्ये झाली, तेव्हा त्याने ऊस पाहुन हा आता जास्त वाढला, मी ट्रेक्टर घातला तर मोडुन जाईल. माझा चुलत भाऊ पॉवर टिलरने भरती करुन देईल, त्याला सांगतो म्हणाला. माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. त्या भावाला फोन करुन बोलावले. तोवर एप्रिलचा मध्य उगवला होता. तो म्हणाला मी येतो दहा दिवसात. ते दहा दिवस गेले तरी त्याचा काही पत्ता लागेना ना त्याचा फोन लागेना. तोवर ऊसात भरपुर तण वाढले होते. मावशीला माझी भरती कशी होणार याचा काहीही अंदाज नसल्यामुळे जुन्या अनुभवावरुन ती भरती करताना तण मातीत गाडले जाणार असे मला सांगत होती. त्यामुळे मी तणाकडे दुर्लक्ष केले. एप्रिल अखेर तण इतके वाढले की काही ठिकाणी ते उसाच्या वर गेले. दोन चार दिवसांनी पावसाची एक सर असा पाऊसही सुरू झालेला. पावसाळ्यात माझा ऊस टिकणार नाही याबद्दल एव्हाना पुर्ण गावाची खात्री झाली होती. Happy शेवटी भरती करणारा एकदाचा अवतरला. तण पाहुन त्याने आधी तण काढा तरच भरती होईल म्हणुन सांगितले. आता मी काय करणार?? पावसाळा तोंडावर आलेला, भरती झालेली नाही आणि त्यात इतके तण.... काढायचे कसे?? ग्रासकटर बाळगणार्‍या शेजार्‍याला विचारले तर तो म्हणाला मला अजिबात वेळ नाही. मग दोन वेगवेगळ्या वाड्यातल्या प्रत्येकी दहा बारा बायका अशा विस-पंचविस बायका गोळा करुन मी त्यांना तण काढायच्या कामावर लावले. हा अनुभव मला भरपुर ताप देणारा व त्याच वेळी प्रचंड विनोदी असा होता.

मुळात आमच्या वाडीतल्या बायांचे नेहमीसारखेच एकमेकांशी पटत नव्हते. माझ्याकडे भाजीतले गवत काढायला यायच्या तेव्हा गवत काढता काढता एकमेकांची उणीदुणीही त्या काढायच्या. त्यात आता दुसर्‍या वाडीतल्या बायांची भर पडली. त्या दुसर्‍या वाडीतल्या बाया कायम ऊसात काम करणार्‍या. त्या ह्या ऊसाचा अनुभव नसलेल्या बायांना तुच्छ लेखुन त्यांची उणीदुणी काढायला लागल्या. माझ्या वाडीतली एखाद दुसरी हळूच येऊन मला कोण काम करत नाहीये त्याचा रिपोर्ट देई. मी त्या रिपोर्ट बरहुकुम अ‍ॅक्शन घेतली नाही तर तिला माझा राग यायचा. तुझ्या भल्यासाठी सांगतेय आणि तुला काही करायलाच नको... मग मी थोड्या थोड्या वेळाने इन जनरल सगळ्याच बायांना 'हात जरा जोरात चालवा गं बायांनो, पाऊस पडेल थोड्या वेळात' वगैरे असेच काही बाही बोलायचे. उगीच जास्त काही बोलले आणि कामाला यायच्या बंद झाल्या तर मीच परत संकटात.... ह्या विळ्या भोपळ्याच्या मोटीने कसेबसे एकदाचे काम संपवले. तण खुपच वाढले होते आणि झुडपांची खोडे जाड झालेली. त्यामुळे बायांचे खुप हाल झाले तण काढताना. तरीही ते कठिण काम संपवुन त्यांनी माझ्यावर खुप मोठे उपकारच केले. त्यानंतर मी परत असा प्रसंग माझ्यावर येऊ दिला नाही. तणाकडे दुर्लक्ष करुन अजिबात चालत नाही, ते वेळच्या वेळी उपटावे लागतेच.

तण काढुन झाले तरी भरती करणार्‍याचा पत्ता नव्हता. पंधरा मे पासुन नियमित पाऊस पडणार असे प्रत्येक वेदर साईट दाखवत होती त्यामुळे माझा जीव टांगणीला लागला होता. अखेरीस तो अवतरला. त्याच्या बहिणीच्या पुर्ण कुटूंबाला करोना झाला होता आणि त्या भानगडीत त्याचे पंधरा दिवस गेले होते म्हणे. त्याने पॉवर टिलरने भरती करायला घेतली खरी पण त्याला मागे खोरे नसल्यामुळे माती उसाच्या दोन्ही बाजुला लागत नव्हती. परत एकदा सगळ्यांनी मी कसे मुर्खासारखे दोन ओळीत नको तितके अंतर ठेवले याबद्दल दुषणे दिली. पण आता काय करणार?? शेवटी परत बायांना बोलावले आणि त्यांनी हाताने माती उसाच्या दोन्ही बाजुला चढवली. तोवर पाऊस थोडाफार सुरू झालेला. त्यामुळे हे काम खुपच किचकट झाले होते. पण तरी बायांनी सहकार्य केले आणि भरती एकदाची पार पडली.

भरती झाली आणि तोक्ते वादळ आले. मी वादळ येण्याच्या बातम्या रोज ऐकत होते पण माझ्यावर वादळाचा काय परिणाम होणार हे माझ्या लक्षात आले नाही. एके दिवशी तुफानी पाऊस पडला आणि नदी किनारी असलेल्या सगळ्या पाण्याच्या मोटारी पाण्याखाली गेल्या. पावसाळ्याच्या सुरवातीला आंबोलीत सगळे मोटारी काढुन ठेवतात, मला हे माहित नव्हते आणि तोवर मोटार काढायची वेळही झाली नव्हती. तरी माझी फक्त मोटारच पाण्याखाली गेली. कित्येकांचा ऊस पाण्याखाली गेला आणि झोपला, वाहुन गेला. माझ्या ऊस नशिबाने वाचला. वादळ नंतर शमले तरी पाऊस रिमझिम सुरूच राहिला.

पावसाळ्यात भात लावायची मला खुप इच्छा होती पण मावशी म्हणाली आपल्याला जमणार नाही म्हणुन मी गप्प बसले. निदान नाचणी तरी लाऊया म्हटल्यावर ती हो म्हणाली आणि आम्ही थोडी जमिन तयार करुन नाचणी पेरली. मेच्या शेवटी मला दातांच्या ट्रिटमेंटसाठी परत मुंबईला जावे लागले.

क्रमशः

नैसर्गिक विषमुक्त शेती @ आंबोली - एक प्रवास : भाग ५

मी परत आले तोवर नियमीत पाऊस सुरू झाला होता. नाचणी रुजुन आली होती पण शेतात कोणी गेले नसल्याने तण नियंत्रण राहिले नाही, परिणामी गवत कुठले व नाचणी कुठली हे कळणे मुश्किल झाले. नाचणीला जास्त ओल राहणारी जमिन चालत नाही, चिखलणी करुन नाचणी लावली जात नाही. चिखलात नाचणी रोपे कुजणार. मी जो तुकडा शिल्लक ठेवला होता त्यावरचे पिक म्हणजे चवळी वगैरे मी काढुन घेतली होती. पाऊस पडल्यावर तिथले तण भराभरा वाढले होते. ते आता हाताने काढणे खर्चीक झाले असते. त्यामुळे नाचणी लावायचा बेत रहित केला. उगवुन आलेली नाचणी गरजुंना देऊन टाकली. ज्यांना पावसाळ्यात भात/नाचणी लावायचीय ते आपापली नर्सरी बनवतात पण खुपदा अंदाज चुकल्यामुळे एकतर रोपे उरतात तरी किंवा कमी तरी पडतात. मग ज्यांची उरतात ते ज्यांची कमी पडतात त्यांना रोपे देऊन टाकतात. याचे पैसे वगैरे कोणी मागत अथवा देत नाहीत.

थोडी नाचणी मी घरासमोरील जागेत लावली. पण हा प्लॉट खुपच लहान होता. लोकांनी नेऊनही शिल्लक राहिली ती लावली इतकेच.

पावसाळ्यातही मी जीवामृत बनवायचे काम सुरू ठेवले. दर महिन्यात एकदा जीवामृत शेतात नेऊन ओतत होते, गड्याने यात चांगले सहकार्य केले. गणपतीच्या थोडे आधी ऊसात परत तण वाढलेले दिसायला लागले. आधीचा अनुभव लक्षात घेऊन तण काढायला बाया घेतल्या. आजुबाजुच्या शेतातुन पाणी वाहात येऊन माझ्या शेतातुन ते नदीला मिळत होते. त्यातले बरेच पाणी शेतात साठत होते. पाऊस इतका पडत असायचा की शेतात आत जाऊन ऊस पाहणे अशक्य. ऊसाची वाढ थांबल्यातच होती कारण सुर्यदर्शन होतच नव्हते.

ह्या प्रतिकुल परिस्थितीत ऊस कसा वाढवता येईल ह्याचाच विचार मी दिवसरात्र करत होते. ऊस लागवडीसंदर्भात लोकांचे अनुभव वाचत होते. उस हे गवतवर्गीय पिक आहे. वर पाने येत जातात, खालची सुकुन उलटी पडतात आणि उसाला चिकटुन बसतात. असे लक्षात आले की कोल्हापुर वगैरे भागात लोक ही सुकलेली पाने काढुन टाकतात ज्यामुळे ऊस उघडा राहतो, त्याच्यावर ऊन पडते आणि प्रकाशसंश्लेषण फक्त पानात न होता पुर्ण उसात होते. यामुळे उसाचे एकुणच आरोग्य सुधारते. मला जर ऊस सोलता आला, म्हणजे ही पाने काढुन टाकता आली, तर ऊस वाढण्यात थोडी मदत होईल असे वाटले. अर्थात आंबोलीत कोणीही हे करत नसल्यामुळे गडी कुरकुरायला लागला. गवत काढणार्‍या बायांना गवत काढताना ऊस सोलायला सांगितले आणि मीही गडी जोडप्यासोबत ऊस सोलायला लागले. चिखलात उतरुन हे काम करताना माझी पाण्यात असलेल्या किड्यामकोड्यांबद्दलची, खेकड्यांबद्दलची, सापांबद्दलची भिती पुर्णपणे गेली. आदल्या वर्षी पावसाळ्यात शेतात वाढलेल्या गवतातुन चालायला मला खुप भिती वाटायची. पायाखाली कोण येईल का ही धास्ती वाटायची. पुढच्या वर्षी कसलीही भिती उरली नाही. अर्थात शेतात फिरताना पायाखाली बघुनच फिरावे लागते. ते आपले घर नाही तर वन्य जीवांचे घर आहे हे कायम डोक्यात ठेवावे लागते. कोणावर पाय पडला तर तो जीव उलटुन हल्ला करणारच. त्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे. मी शेतात कायम मोबाईलवर गाणी सुरू ठेवते. आवाजाने वन्य जीव दुर पळतात.

माझे ऊसाचे पहिलेच वर्ष. ऊस सोलायच्या निमित्ताने पावसात ऊस फिरुन पाहिला गेला. उसाच्या प्रत्येक बेटातील एक दोन ऊस तरी कु़जून गेलेले आढळले. मी एकेक रोप लावले होते. त्या प्रत्येक रोपातुन पंधरा,विस, पंचविस असे ऊस फुटवे आले होते. आणि पावसाळ्यात त्यातले कित्येक कुजून गेले होते. हळहळण्याखेरिज इतर काहीही करण्यासारखे हाती नव्हते. पहिल्या वर्षी खुप ऊस कुजले. पुढची दोन वर्षे तितके कुजले नाहीत. नंतर चौकशी केली तेव्हा कळाले की पहिल्या वर्षी आंबोलीत ऊस असे कुजतातच. ऊस गवतवर्गीय असल्याने मुळातुन सतत नविन फुटवे येत राहतात. मुळाशी पाणी साचले की उशीरा फुटलेले कोवळे फुटवे कुजतात. माझे दोन तिन फुट वाढलेले फुटवे कुजलेले पाहुन वाईट वाटले.

ऊस सोडुन इतर काहीच शेतात नसल्याने पुर्ण लक्ष उसावर केंद्रित केले. पावसाळा संपत आला तसे परत एकदा तण काढुन घेतले, जसा वेळ मिळेल तसा येताजाता ऊस सोलत होतेच. ऊस उघडा राहिल तेवढा वाढेल ही आशा Happy पावसाळा संपल्यावर मात्र ऊस जरा जोमाने वाढला. येणारेजाणारे कौतुक करायला लागले. ऊसाने पावसाळा काढला हेच त्यांच्यासाठी आश्चर्य होते. Happy अर्थात माझा ऊस आणि इतरांचा ऊस यात जमिन आसमानाचा फरक होता. त्यांनी खताचे बेसल डोस, भरती डोस, टॉनिक असे सगळे दिले होते. मी केवळ जीवामृत एके जीवामृत करत होते. इतर काही द्यायचे मला माहित नव्हते.

होता होता दिवा़ळी सरली, तुलसीविवाह झाला आणि ऊस तोडणीच्या कामाला सुरवात झाली. इकडे तिकडे विचारुन आमच्या गावात उघडलेल्या कारखान्याच्या टेम्पररी ऑफिसात मी माझी कागदपत्रे दिली होती पण ऊस तोडणी कधी होणार माहित नव्हते. मी आपली देव पाण्यात ठेऊन बसले होते. आजुबाजुला सगळ्यांना सांगुन ठेवले होते की मला ऊस तोडणीसाठी माणुस सुचवा म्हणुन.

सर्वत्र अशी पद्धत आहे की कारखान्याला आपली ऊस शेती संलग्न असते आणि तोडणी कारखानाच करुन घेऊन जातो. आंबोलीतही आधी अशीच पद्धत होती. कारखान्याचे लोक येऊन उस तयार झाला म्हणजे त्यात साखरेचे योग्य प्रमाण तयार झाले का हे मीटर वापरुन चेक करत आणि मगच तोडणीला संमती देत. नियम असा होता की अमुक भागातला ऊस त्या भागातल्या कारखान्यातच जाणार. कित्येक ठिकाणी ऊस पिक कुठल्या जातीचे लावायचे, खताचे डोस किती व केव्हा द्यायचे याचे नियोजनही कारखान्याने सांगितल्या प्रमाणेच करावे लागायचे. आता यातले किती होते माहित नाही. आता कुठल्याही भागातला ऊस कुठल्याही कारखान्यात देता येतो. जो ऊस कारखान्यात जातो तो स्विकारला जातो. निदान आंबोलीत तरी.

आंबोलीत सगळेजण जरी ऊस लावत असले तरी एकुण टनेज कारखान्यांना जितके पाहिजे तितके नसल्यामुळे कारखान्याच्या टोळ्या आंबोलीत येत नाहीत. आंबोलीतले लोक स्वतःच्या टोळ्या करुन ऊस तोडतात. गावातल्या लोकांना दोन चार महिने काम मिळते. टोळीच्या मुकादमाला कारखान्यातुन कमिशन मिळते आणि उसतोडीचे पर टन पैसे मिळतात. ते पैसे तो ऊसमालकाला देतो. कारखाना बंद व्हायच्या वेळी हा हिशोब होतो. त्यामुळे ऊसमालकाला ऊसाचे पैसे लगेच म्हणजे महिनाभरात मिळतात आणि तोडीचे मे मध्ये. ऊसाचे बिलींग दर पंधरा दिवसांनी होते. म्हणजे मी डिसेंबराच्या दुसर्‍या पंधरवड्यात ऊस तोडला तर मला जानेवारीच्या दुसर्‍या पंधरवड्यात पैसे मिळतात. शेतकरी हा असा विक्रेता आहे ज्याला फक्त उत्पादन काढायचा हक्क आहे. त्यापुढच्या सगळ्या बाबी दुसर्‍यांच्या हाती. शेतकर्‍याने फक्त वाट पाहात बसायचे.

पण आंबोलीत निदान उसाचे पुर्ण पैसे लगेच मिळतात. काही ठिकाणी ६०-२०-२० किंवा ८०-२० टक्के असे पैसे मिळतात. त्या उरलेल्या टक्क्यांसाठी खुप वाट पाहावी लागते. शेतकर्‍यांची थकबाकी अजुन दिली गेली नाही ही बातमी दरवर्षी पेपरात येतेच.

शेतकरी नेते या बाबतीत का मुग गिळुन बसलेले असतात देव जाणे. ते भांडतात एम आर पी किंवा एफ आर पी साठी. पण ही किंमत लागु होते जर सरकारने माल खरेदी केला तरच. जर सरकारने माल उचललाच नाही तर काय कामाची ही एम आर पी किंवा एफ आर पी? ऊस थेट सरकार खरेदी करत नाही तर ऊस कारखाने करतात. ऊसाची सरकारने ठरवलेली किंमत गेल्या चार पाच वर्षांत २८५० - ३४०० पर टन ह्या रेंजमध्ये आहे. पण प्रत्यक्षात शेतकर्‍याला काय मिळते? मला नगर जिल्ह्यातला एक शेतकरी दोन महिन्यापुर्वी भेटलेला. त्याचा कारखाना २४०० रु पर टन देतो. त्याच भागातला अजुन एक कारखाना २७०० देतो कारण त्याच्याकडे कोण उस घालत नाही, त्यामुळे शेतकर्‍यांना आकर्षीत करण्यासाठी तो ही किंमत द्यायला तयार आहे.

आंबोलीत काही वाड्यांतील शेतांना हिवाळ्यात धरणाचे पाणी मिळते पण ते मिळते १५ डिसेंबरनंतर. आंबोलीतल्या ऊसटोळ्या बहुतांश ऊसशेतकरी मंडळींनीच बनवलेल्या आहेत. ते स्वतःचा ऊस तोडतात आणि इतरांचाही. कारखान्याच्या टोळ्यांनी ऊस तोडण्यापेक्षा ह्या लोकल टोळ्यांनी ऊस तोडलेला लोकांना परवडतो कारण हे लोक ऊस तोडणी व्यवस्थित करतात. कारखान्याच्या टोळ्यांना टनेजवर पैसे मि़ळतात त्यामुळे प्रत्येक दिवसात जास्त टनेज मिळवणे हे त्यांचे लक्ष्य असते. ते भराभर ऊस तोडतात, त्या भानगडीत ऊस अगदी जमिनीलगत तोडला जात नाही, वरुनही जास्तीचा तोडला जातो. हे आंबोलीच्या शेतमालकांचे म्हणणे आहे, मला अनुभव नाही. तेच लोकल टोळ्या दिवसाच्या मजुरीवर काम करत असल्यामुळे व्यवस्थित तोडतात. ऊस अगदी मुळापासुन तोडावा लागतो. तसे केले तरच त्याला परत जमिनीतुन नवे फुटवे येतात ज्याला खोडवा म्हणतात. जमिनीवर तोडला तर तुटलेल्या भागाला जोडुन नवा फुटवा येतो, त्याची वाढ नीट होत नाही.

ऊस तोडताना त्याचा शेंडा तोडुन शेतात टाकुन देतात त्याला वाढे म्हणतात. ऊस तोडताना गुरे पाळणारे लोक शेतात फिरुन वाढे गोळा करुन गुरांसाठी नेतात. ऊरलेले वाढे तसेच शेतात पडुन राहतात आणि दोन चार दिवसात सुकतात. ते सुकले की एका सकाळी किंवा संध्याकाळी उशीरा शेतात आग घालतात. त्यानंतर ऊसाला पाणी सोडुन दिले की नवा खोडवा लगेच फुटतो. आंबोलीत धरणाचे पाणी डिसेंबराच्या १५ तारखेच्या आसपास सोडतात. तर त्या भागात शेती असलेले टोळीकर त्या आधी आमच्या सारख्या शेतकर्‍यांची जे टोळीत सामिल होत नाहीत त्यांची ऊसतोड करतात आणि १५ नंतर आपल्या शेतात ऊसतोड सुरू करतात.

मी सगळ्यांना सांगुन ठेवले होते त्यामुळे एक मुकादम मला मिळाला ज्याला १५ पर्यंत त्याचे शेत तोडायचे नव्हते. माझ्या आजुबाजुची दोन चार शेते तोडल्यावर माझे शेत तोडायला तो तयार झाला. त्या वर्षी धरणाचे पाणी सोडायला थोडा ऊशीर होणार होता. माझे शेत तोडायला १५ डिसेंबर तारिख ठरली.

ऊस तोडणी करणार्‍या टिमला दिवसाची ठरलेली मजुरी तर द्यायचीच पण पुजेला कोयत्यावर ५००-१००० रु ची दक्षिणा ठेवावी लागते. ऊसतोड करणारे आजुबाजुच्या वाड्यांतुन येतात, त्यांची आणायची न्यायची सोय टेंपोमधुन करावी लागते. दोन वेळचा चहा, एका चहासोबत बिस्किटे, चिवडा किंवा अन्य काहीही सुका नाश्ता, रोज दुपारचे शाकाहारी जेवण, त्यात एक दिवस नॉन वे़ज, त्यात मासे, चिकन किंवा मटण तुमच्या श्रद्धेप्रमाणे, टिमचा मुड लागला तर वडापाव, थंडा किंवा आईसक्रिम इत्यादी सोय करावी लागते. जेवण बनवायचे काम शेतकर्‍याने केले तरी चालते, शेतकर्‍याकडे मनुष्यबळ नसेल तर ऊसतोडणीसाठी आलेल्या बायातल्या दोन बाया चहा, जेवण इत्यादी बघतात आणि दुपारनंतर ऊस तोडतात. ऊस पुरूष लोक तोडतात आणि बाया तो बांधतात. ऊस उचलुन ट्रक मध्ये भरण्यासाठी ऊसाची मोळी बांधणे आवश्यक असते. बाया हे काम करतात. ऊसाचे वाढे वापरुन ऊस बांधतात. ऊस ट्रक मध्ये भरताना काही पुरूष ट्रकवर चढतात आणि उरलेले स्त्री/पुरुष त्यांना खालुन मोळी सप्लाय करत राहतात. दोन तिन इंच जाड दोर ट्रकामध्ये टाकलेला असतो, ज्यावर ऊस टाकतात आणि पुरेसा ऊस टाकला गेला की दोराने तो व्यवस्थित बांधतात. कारखान्यात ह्या दोरासकट क्रेनने उचलुन ऊस रसासाठी यंत्रात टाकतात. कधीकधी एका शेतकर्‍याचा शेवटच्या दिवशी अर्धा ट्रक ऊस भरेल इतकाच उरतो. तेव्हा एक दोर, ज्याला रोप म्हणतात, बांधुन त्याचे अकाऊंट क्लोज करतात आणि पुढच्या शेतात जाऊन तिथला ऊस उरलेल्या ट्रकात भरतात. तिथे दुसरा रोप वापरतात. कारखान्यात ऊस मोजताना दोन्ही रोप वेगवेगळे मोजतात.

ऊसतोडणी मजुर हे एक वेगळे प्रकरण आहे, महाराष्ट्रात कित्येक ठिकाणी ऊसतोडणी मजुर म्हणुन नवराबायको जोडपी मुकादमाबरोबर फिरतात. ऊसतोडणी ६ महिने चालते. सहा महिन्यांच्या फिरस्तीमुळे या मजुरांची मुले शाळेत जाऊ शकत नाहीत, स्त्रियांचे असह्य शारिरीक हाल होतात इत्यादी खुप वाचलेय. आंबोलीत लोकल टोळ्या असल्याने हे घडत नाही.

तर माझा ऊस तोडायचे ठरल्यावर मुलीच्या लग्नात सामान विकत घ्यावे तसे जेवणाचे सामान विकत आणले, सामान घेताना प्रत्येकजण विचारत होता, उद्या ऊसतोड का म्हणुन??? Happy माझ्याकडे त्या वर्षी आई व मावशी दोघीही होत्या, त्यांनी मध्ये मध्ये मस्त लुडबुड केली, सैपाकाला दोन बाया गावातुन बोलावल्या.

चार दिवसात माझा ऊस तोडुन झाला. तोडणार्‍यांच्या मते ऊस चांगला झालेला, अजुन थोडा उंच व्हायला पाहिजे होता आणि थोडा जवळ जवळ लावला असता तर खुपच चांगले झाले असते. मी सगळे ऐकुन घेतले.

जगभर झालेल्या संशोधनातुन असे निष्पन्न झाले आहे की कितीही प्रयत्न केले तरी उसाच्या शेतात तोडणीच्या वेळेस एकरी ४५-५०,००० उसकांड्याच शिल्लक राहतात. म्हणजे उगवुन आलेले फुटवे जरी दोन तिन लाख असले तरी उगवल्यापासुन सहा महिन्याच्या कालावधीत भरपुर फुटवे मरुन जातात व शेवटी ४५-५०,००० फुटवेच वाढलेल्या ऊसात परावर्तित होतात.. वाढीच्या वेगवेगळ्या स्थितीत मरणारे हे फुटवे पाणी, खत वगैरे सगळे खाऊन मग मरतात. म्हणजेच यांच्यावर खर्च झालेले पाणी, खत सगळे फुकट जाते. एकरी १०० टनापेक्षा जास्त उत्पन्न काढणारे शेतकरी हा सगळा अभ्यास करुन सुरवातीपासुन फुटव्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवतात, चांगल्या जाडजुड ऊसात परिवर्तीत व्हायची शक्यता असलेल्या ऊसकांड्या बेटात ठेऊन बाकीचे नको असलेले फुटवे काढुन टाकतात. आणि जे ४५-५० हजार फुटवे शिल्लक राहणार आहेत त्यांचे वजन कसे वाढेल याकडे लक्ष देतात. तयार उसकांडीचे वजन दोन किलोच्या पुढे गेले की आपोआप एकरी शंभर टनाच्या आसपास पल्ला गाठता येतो.. (माझ्या ऊसकांडीचे सरासरी वजन अर्धा ते पाऊण किलो आहे, यावरुन मला किती मोठा पल्ला गाठायचा आहे हे लक्षात येते.

आंबोलीत याच्या बरोबर उलट विचार केला जातो. उसाच्या कांड्या जितक्या जास्त तितका एकत्रीत ऊस वजनाला जास्त भरणार असे त्यांना वाटते. अजुन एक हास्यास्पद समीकरण मला सुरवातीला ऐकायला मिळाले ते म्हणजे "ट्रक तर भरला पाहिजे, म्हणुन ऊस जवळ जवळ लावुन भरपुर ऊसकांड्या मिळवायच्या." एकरी ४५-५०,००० कांड्यांचे जगन्मान्य गणित त्यांना माहित नाही. समजा आपण कोणाला शहाणे करायचे मनावर घेतलेच तर उर्वरीत जगाचे नियम आंबोलीत चालत नाहीत हे ऐकवतात. Happy उस जवळजवळ लावला तर भरपुर कांड्या येणार ह्या हिशेबाने अडिज ते तिन फुटावर सरी पाडुन आंबोलीत उस लागवड केली जाते. या अरुंद सरीत उसाचा जीव गुदमरतो, वाढीच्या वयात नेमका पावसाळा येतो आणि उसाचा प्राणवायु जो सुर्य तोच गडप होतो आणि सगळी वाढ ठप्प होते. परिणामी वजन वाढ होत नाही. सरासरी अर्धा ते एक किलोची उसकांडी होते आणि पाच वर्षांची एकरी सरासरी पंचविसच्या पुढे जात नाही. पहिल्या व चौथ्या वर्षीपेक्षा दुसर्‍या व तिसर्‍या वर्षी जरा जास्त उत्पन्न येते. चौथ्या वर्षाचा पर्फॉर्मन्स पाहून पाचवे वर्ष ठेवावे का काढावे याचा विचार केला जातो. आंबोलीत चार एकर जमिनीत १००-१५० टन ऊस येतो. कोल्हापुरचे लोक हे वाचतील तर हसुन मरतील Happy पण आम्ही आंबोलकर एवढा आला की प्रचंड खुश होतो. यापेक्षा जास्त येण्याजोगे वातावरण इथे नाही.

ऊसाची ९०% वाढ सुर्यप्रकाशावर होते आणि उरलेली १०% वाढ जमिन व इतर घटक यांमुळे होते. भारतातल्या बहुसंख्य ऊस उत्पादकांना हे माहित नसावे, कोणी माहित करुन देत नाही. साखर उत्पादनात जागतिक स्तरावर पहिल्या नंबरावर असलेल्या ब्राझिलमध्ये भारतासारखेच बाराही महिने ऊन मिळते पण जिथे ऊस प्रामुख्याने केला जातो त्या भागात रिमझिम पाऊसही सतत पडत राहतो जो ऊसाची पाण्याची गरज भागवतो. आपल्याकडे ऊस पाण्यावर वाढतो यावर ठाम विश्वास असल्यामुळे व ऊस हे महत्वाचे नगदी पिक असल्यामुळे धरणाचे जास्तीत जास्त पाणी ऊसाला दिले जाते आणि बाकीचे पिके रडतात. सामान्य शेतकरी सकाळी ऊसाला पाणी लाऊन फटफटीने तालुक्याला जातो, दुपारी आल्यावर ऊसात दगड मारुन बघतो. डब्ब आवाज आला की ऊस पाणी प्याला असे समजुन जायचे. ऊसाला खुप ठिकाणी असेच पाणी दिले जाते. पाण्याचा सत्यानाश, जमिनीचा सत्यानाश आणि विजेचाही सत्यानाश. त्यात महाराष्ट्रात शेतासाठीची विज खास करुन रात्रीच सोडली जाते. कित्येक ठिकाणी घरात दिवसरात्र विज असते पण शेतातली मात्र रात्रीच येते. मग रात्रीबेरात्री सापाविंचवाच्या भयात पाणी लावण्याऐवजी असेच शेतात सोडून दिले जाते. नैसर्गिक साधनसंपत्तीचा असा खेळखंडोबा चालतो पण यात आपलेच नुकसान हे कोणाच्याही ध्यानी येत नाही. सरकारी यंत्रणेला काहीही पडलेले नाही आणि शेतकरी तर जन्मअडाणीच.... असो.

ऊस नैसर्गिक की रासायनिक खतांवर वाढवलेला यामुळे कारखान्याच्या ऊस किंमतीत फरक पडत नाही. त्यामुळे एवढी मेहनत करुन नैसर्गिक ऊस करतेयस तर गुळ करुन विक असा सल्ला बर्‍याच जणांनी दिला पण तितकी माझी तयारी नव्हती. माझ्या शेतापासुन ३०-३५ किमी वर एक गुर्‍हाळ मला मिळाले. त्याच्या काहिलीत एका वेळेस दोन टनाचा रस बसत असल्यामुळे तितक्या ऊसाचा गुळ करुन द्यायला तो तयार होता पण त्या सगळ्याला येणारा खर्च पाहता मी फारसे मनावर घेतले नाही.

आपण बाजारात ऊसाचा रस पितो, तो ऊस बाहेरुन व्यवस्थित साफ केलेला असतो, त्याच्यावरची काजळी काढुन टाकलेली असते. तरीही त्या रसात आपल्याला थोडाफार कचरा तरंगताना दिसतो. गुळ बनवताना ऊस जसा शेतात असतो तसाच तो क्रशरमध्ये घालुन रस काढला जातो. हा रस सतत उकळवत ठेवला की तो खुप जाड होतो. हा जाड रस खुप घोटतात मग त्याचा गुळ बनतो. ऊसावर भरपुर कचरा असल्यामुळे रस उकळताना हा कचरा काढत बसावे लागते. ही मळी एकत्र यावी व रस साफ व्हावा यासाठी ऊसात भेंडीचे झाड चेचुन त्याचे पाणी घालतात. अर्थात गुर्‍हाळवाल्याकडे भेंडीची झाडे नसल्यामुळे तो विकतची भेंडी पावडर घालतो. ही विकतची भेंडी पावडर हवा तो रिझल्ट देत नाही म्हणुन ऊसात फॉस्फरिक अ‍ॅसिड घालतात. मला भेटलेल्या गुर्‍हाळवाल्याने ह्या अ‍ॅसिडचे ट्रेसेस अजिबात राहात नाहीत म्हणुन मला सांगितले पण मला ह्या असल्या भानगडित पडायचेच नव्हते. मला ऑर्गनिक गुळ करायचाय असे म्हटल्यावर गुर्‍हाळवाला म्हणाला तुम्ही फॉस्फरिक अ‍ॅसिड वापरु नका, मळी तशीच ठेवा. गुळाचा रंग काळा म्हणजे तो ओर्गॅनिक/नैसर्गिक असे लोक समजतात. हे ऐकुन मी कपाळाला हात लावला.

गुऴ बनवताना काहिलीत रस चिकटु नये म्हणुन आधी तेल टाकावे लागते. नंतर फॉस्फरिक अ‍ॅसिड वापरुन उकळणारा रस साफ केला जातो. हे दोन्ही पदार्थ कुठल्या प्रतीचे वापरतात यावर काहीही नियंत्रण नाही. मी कोल्हापुरच्या एका गुर्‍हाळात गेले तिथे २ टन ऊसाच्या रसात २ टन साखर टाकत होते. म्हणजे गुळात अर्धी साखर... मारवाडी व्यापार्‍यांना असाच गुळ लागतो म्हणे. असा गुळ बाजारात भराभर विकला जातो म्हणुन सगळी गुर्‍हाळे हे करतात असे तिथेच ऐकले. साखर ३० रू किलो आणि गुळ ७०-८० रु किलो. आणि ह्या गुळातही भेसळ Happy आंबोलीत तर गुळ ४५ ते ५० रु पर्यंत मिळतो. हा गुळ म्हणजे साक्षात दगड असतो. तुम्ही खरा दगड त्यावर मारलात तरी गुळ फुटणार नाही. हा गुळ कसा करतात देव जाणे. गुळाचा रंग स्वच्छ पिवळाजर्द किंवा पांढरेपणाकडे झुकणारा हवा म्हणुन त्यात निरमा पावडर घालतात असेही ऐकलेय. गुळ घोटल्यावर तो एक किलो/अर्धा किलोच्या भांड्यात भरतात, घट्ट झाल्यावर नीट निघावा म्हणुन या भांड्यांत फडकी घातलेली असतात. ती कधी धुतात देव जाणे. मी गुर्‍हाळात गेले तेव्हा गुळ भरायचे काम सुरू होते. राजस्थानी दिसणारी विशीतली मुले गुळ भरत होती, पायात स्लिपर घालुनच ती त्या गुळ घोटायच्या जागेत उतरली होती. ती जागा सोडून बाकी सगळी जमिन चिकट काळी झालेली होती. हे सगळे बघुन तिथे गुळ घ्यायची ईच्छाच मेली. नजरेआड अजुन काय काय असेल देव जाणे.

नैसर्गिकरित्या केलेल्या गुळात, जो मी करताना पाहिलाय, त्यात काहिलीत तुप किंवा शेंगदाणा तेल घालतात. पाऊण किलो तुप/तेल एक ते दोन टन रसाला पुरते. भेंडीचे मोठे रोप स्वच्छ धुवून, त्याला चेचुन पाण्यात रात्रभर ठेवतात, हे पाणी उकळत्या रसात घालतात. रस हवा तितका जाड होत आला की त्यात चुना घालतात. आणि मोठ्या परातीत हा गुळ ओतुन त्याला घोटतात व एक किलो/अर्धा किलोच्या भांड्यांमध्ये भरुन घट्ट करतात. हा घट्ट केलेला गुळ भांड्यातुन काढल्यानंतर उन्हात वाळवतात. असे केल्याने त्याचे शेल्फ लाईफ थोडे वाढते.

ऊस वर्षभर सांभाळायचा खर्च आणि तो तोडुन कारखान्यात पाठवायचा खर्च मला डोईजड वाटला. माझे टनेज कमी असल्यामुळे तो डोईजडच होता. बाकी लोकांना चार एकरात शंभर सवाशे टन ऊस मिळतो ज्याचे तिन-साडे तिन लाख रुपये मिळतात. खर्च दिड ते दोन लाखांपर्यंत जातो. त्यातले जास्तीचे खते व पाण्यावर खर्च होतात, तोडणीवर बर्‍यापैकी ऊडतात. तरी हातात लाख-सवा लाख शिल्लक राहतात. एवढे निघाले तरी आंबोलीत बरे मिळाले समजतात.

पहिल्या वर्षानंतर काहीजणांना वाटले मी गाशा गुंडाळणार, काहींनी तसे बोलूनही दाखवले. पण मी शेतीत उतरले होते ते पळण्यासाठी नव्हतेच. त्यामुळे नव्या दमाने नव्या सिझनची तयारी सुरू केली.

मला एकुणच ऊस शेती निरर्थक वाटू लागली पण दुसरे काही करण्याइतकी अक्कल, अनुभव व वेळ नसल्याने आहे तेच चालु ठेवायचे ठरवले.

क्रमशः