अगदी लहानपणी जेव्हा मला पुस्तकांचा भस्म्या रोग झाला होता तेव्हा हातात विजय देवधरांचे अनुवादित "स्फिंक्स" हे पुस्तक पडले होते. पुढे त्याचे ओरिजिनल रॉबिन कुक चे पण वाचले. पण त्या पुस्तकाच्या मुखपृष्टावरचा तो तुतनखामेनचा मुखवटा विसरले नाही. त्यापुस्तकाने आणि त्यातल्या इजिप्तच्या वर्णणाने मी पूर्ण भारावून गेले होते. कुठेतरी तेव्हाच हे सगळे एकदा तरी बघायचे आहे अशी बहुतेक खूणगाठ बांधली होती. कारण जेव्हा जेव्हा कुठे फिरायला जायचा विचार यायचा तेव्हा इजिप्त एकदा तरी उल्लेखले जायचेच. एकदा २००० मधे, एकदा २००६ मधे इजिप्तने हुलकावणी दिली होती. पण अखेर २०१८ मधे का होईना योग जुळून आलाच.
अगदी लहानपणी जेव्हा मला पुस्तकांचा भस्म्या रोग झाला होता तेव्हा हातात विजय देवधरांचे अनुवादित "स्फिंक्स" हे पुस्तक पडले होते. पुढे त्याचे ओरिजिनल रॉबिन कुक चे पण वाचले. पण त्या पुस्तकाच्या मुखपृष्टावरचा तो तुतनखामेनचा मुखवटा विसरले नाही. त्यापुस्तकाने आणि त्यातल्या इजिप्तच्या वर्णणाने मी पूर्ण भारावून गेले होते. कुठेतरी तेव्हाच हे सगळे एकदा तरी बघायचे आहे अशी बहुतेक खूणगाठ बांधली होती. कारण जेव्हा जेव्हा कुठे फिरायला जायचा विचार यायचा तेव्हा इजिप्त एकदा तरी उल्लेखले जायचेच. एकदा २००० मधे, एकदा २००६ मधे इजिप्तने हुलकावणी दिली होती. पण अखेर २०१८ मधे का होईना योग जुळून आलाच.
कोणार्क, सुवर्ण मंदिर, स्पेन, जॉर्डन, हिमाचल प्रदेश, केनिया अशी वाट्टेल ती स्टेशने घेत आमची सुट्टीच्या प्लॅनची गाडी नेहेमीच्या इजिप्त स्टेशनात अडकली. नवर्याने स्वस्त आणि कन्व्हिनियंट तिकिटे दिसताच बुक करू का विचारले आणि मी पण डोळे झाकून हो म्हणले. त्यानंतर तिथली राजकिय परिस्थिती, भारत आणि जपान्ची ट्रॅव्हल अॅडव्हायजरी वाचली आणि हरकत नाही जायला असे म्हणून शिक्का मोर्तब केले. आमच्याकडे फिरण्याच्या कामांची वाटणी झाली आहे. नवरा विमानांची तिकिटे, व्हिसा अशा मॅक्रो गोष्टी हाताळतो तर मी काय बघायचे, डेली प्लॅन, त्या देशातला अंतर्गत प्रवास या मायक्रो गोष्टी बघते. एकदा तिकिटे बुक झाल्यावर मग मी कामाला लागले.
काय काय ठिकाणे बघायची आहेत याचा थोडा प्लॅन तयार होता. मग आधी नकाशा बघून अंतरांचा अंदाज घेतला. नेटवरच्या काही तयार आयटनरीज बघून माझा प्लॅन अती महत्त्वाकांक्षी तर नाही ना हे पण पाहिले. मग बरेच वाचन. आधी लोनली प्लॅनेट वाचले. मग ट्रीपअॅडव्हायजर, इजिप्त फोरम वगैरे बघत होते.
नुकतीच मिसळपाव वर इजिप्तची सोलो ट्रीप केलेल्या एकांनी एक लेखमाला लिहिली होती ती पण वाचली.
https://www.misalpav.com/node/42736
अश्विन बहुलकर ची साईट वाचली.
https://ashwinbahulkar.wordpress.com/my-travels-2/egypt/
खेरीज या साईटचा पण भरपूर उपयोग झाला.
http://www.alternativeegypt.com/
या सगळ्या अभ्यासातून एक लक्षात आले की हा बराच बेभरवशाचा देश दिसत आहे. एकट्याने बॅकपॅकर सारखे फिरायचे असेल तर हरकत नाही, पण हातात फक्त ८च दिवस आणि बरोबर मुलगा असताना हे असे बेभरवशी प्रकरण शक्य नाही. काही इकडे तिकडे झाले तर सगळ्या टीपचा विचका होणार. मग अजिबात न आवडणारी गोष्ट म्हणजे टूर बुकिंग.त्याचा विचार सुरू केला. व्हाएटर आणि इजिप्तमधल्या लोकल मेम्फीस टूर्स यांच्याशी बोलणी सुरू केली. दोघांचेही चटकन रिप्लाय आले. पण मला हवा होता तो प्लॅन ते काही देईनात. हातशी दिवस कमी, वर्षाखेरीमुळे ऑफिसात प्रचंड काम यामुळे आता चिडचिड वाढायला लागली होती. सरळ मिळेल ते घ्यावे असे विचार मनात यायला लागले होते. नवरा पण बिझी होता. कर तू काय करायचे ते असे म्हणून त्याने सगळी सूत्रे माझ्या कडे दिली होती.
तेव्हढ्यात एकदा फेसबूक बघताना मला माझ्या एका जुन्या कलिगची पोस्ट दिसली. ते बरेच सिनियर आहेत मला आणि सध्या आमच्या कैरो ऑफिसचे प्रमुख आहेत. अरे हे आधी कसे लक्षात आले नाही असे म्हणत त्यांना मेल टाकली. त्यांचा लगेच रिप्लाय आला आणि प्रेमाचे बरेच सल्ले पण. शिवाय त्यांनी एक अगदी खात्रीशीर असे म्हणून एका लोकल ट्रॅव्हल एजन्सीचा संपर्क पण दिला. तिथून पुढे मात्र पटपट चक्रे हलली. मला हवा तसा प्लॅन त्या एजन्सी ने अगदी लगेच बनवून दिला. उपलब्ध दिवसांत, हवी असलेली सगळी ठिकाणे, मला हव्या त्या पेसने, शिवाय नाईल क्रूज वगैरे सगळे असणारी आणि तरीही प्रायव्हेट अशी टूर तिने आखून दिली. पैसे पण अगदी वाजवी. व्हाएटर पेक्षा थोडेच पैसे जास्त जात होते, पण या एजन्सीवर विश्वास ठ्वून यांच्याकडून सगळी बुकिंग्ज केली. (अत्यंत योग्य निर्णय ठरला हा. अतिशय उत्तम व्यवस्था केली होती त्यांनी).
ख्रिसमस आणि न्यू इयर व्हेकेशन म्हणजे इजिप्तचा हाय सिजन असतो. प्रचंड प्रमाणात टूरिस्ट्स येतात. त्यातून गेल्या काही वर्षातली अस्थिरता पहिल्यांदाच कमी झाल्याने या वर्षी तर अफाट टूरिस्ट्स होते. त्याचा परिणाम हॉटेल्स, डोमेस्टिक फ्लाईटस हे सगळे फुल्ल आणि सगळीकडे गर्दी आणि रांगा. पण तिथे पोचल्यावर बरे पण वाटत होते एवढी लोक बघून. डिसेंबर शेवटी आणि जानेवारीच्या सुरूवातीला थंडी पण खूप असते इजिप्त मधे. कैरो तर अगदी थंडगार होते. जॅकेट-टोपी शिवाय अशक्य होते. त्यातून पिरॅमिडस खुल्यावर असल्याने भन्नाट वारा होता. तुलनेने दक्षिणेकडचे आस्वान कमी थंड होते. अर्थात आम्ही पूर्ण तयारीने गेलो होतो त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आला. पण कदाचित आस्वान मधे तरी वापरता येईल या हेतूने नेलेल्या शॉर्टस आणि हाफ स्लीव्ह टीशर्ट्स घालता आले नाहीत. पण थंडी जीवघेणी नव्हती. छान फिरता येत होते. उलट उन्हाळ्यात (जो दुसरा पीक सिजन आहे) ४०-४५ डिग्री मधे इथे फिरणे ही शिक्षा असेल असे वाटले.
तर प्लॅन. मला काहिही झाले तरी अबु सिंबेल बघायचे होते. खूप प्रयत्न करून पण शेवट पर्यंत आस्वान-अबु सिंबेलची फ्लाईट्स पूर्ण बुक्ड असल्याने मिळाली नाहित. मग कार ने ६ तास प्रवास करून एक पूर्ण दिवस त्यात घालवावा लागला. पण ते केले. त्यामुळे अत्यंत मनात असूनही अलेक्झांड्रियाला जाता आले नाही. हुरघाडा ला जायचे होते पण थंडीचे अंगभर कपडे घालून कुठे बीच रिसॉर्ट ला जायचे असा विचार करून ते पण यादीतून अगळले.
मग कैरो २ दिवस: गिझा चे पिरॅमिडस, मूळ पिरॅमिडस ज्यावरून बांधले ते दाश्शुर आणि सक्काराचे पिरॅमिडस, कैरो म्युझियम आणि इस्लामिक कैरो (खान एल खलिली बाजार आणि २ मॉस्क्स)
आस्वान-अबु सिंबेल मधे १ दिवस
लुक्सॉर २ दिवसः व्हॅली ऑफ किंग्ज, व्हॅली ऑफ क्वीन्स, हाटशेपसूटचे मंदिर, लक्सॉर टेम्पल आणि कार्नाक टेम्पल
आणि २ दिवस ३ रात्रींची नाइल क्रूज : यामधे कोम ओम्बो टेम्पल, एडफु टेम्पल आणि फिलाए टेम्पल
असा भरगच्च प्लॅन आखला.
आमची वर्षाखेरची २ आठवड्याची सुट्टी आम्ही भारतात येणार होतो. त्यामुळे तिकिटे मुंबई-कैरो-मुंबई अशीच काढली. ते आम्हाला सुटसुटीत वाटले. बरीच भवती न भवती होऊन वेळ वाचवणे या शुद्ध हेतूने इजिप्त एअर (कारण फक्त त्यांचीच डायरेक्ट फ्लाईट आहे) ने गेलो. कारण बाकी सगळ्या एअरलाईन्स मधे १२-१४ तास जात होते. इजिप्त एअरलाईन ने देखिल लौकिकाला साजेशीच म्हणजे अत्यंत अॅव्हरेज सर्व्हिस देऊन आपले रेप्युटेशन राखले.
आज वेळ होता म्हणून एवढे लिहिले. बाकी डिटेल्स नंतर पुढच्या भागात लिहिते.
अशाप्रकारे फायनली आम्ही इजिप्त ना निघालो होतो. फ्लाईट रात्रीची (रादर पहाटेची) होती. इजिप्त एअरच्या सर्व्हिस बद्दल फार काही चांगले ऐकले नसल्याने आम्ही लवकर एअरपोर्ट ला पोचून चेकइन करून टाकले आणि मस्त लाऊंज मधेच जेवण उरकून घेतले. फ्लाईट ला गर्दी होती बरीच त्यामुळे अपग्रेड मिळाला आणि आम्ही मस्त झोपून टाकले. सकाळी ६ वाजता कैरोला पोचलो. फ्लाईट मधून उतरलो तर लगेचच आमच्या ट्रॅव्हल एजन्सीचा माणूस आमच्या नावाचा बोर्ड घेऊन उभा दिसला. नॉर्मली बाहेर पडल्यावर हे लोक भेटतात, पण इथे काहीतरी वेगळाच प्रकार होता. त्याने आम्हाला अगदी इमिग्रेशनच्या रांगेत पण मदत केली(ज्याची काही गरज नव्हती, पण त्या इमिग्रेशन ऑफिसरबरोबर अरबी मधे बोलून आमचे इमिगेशन त्याने २ मिनिटात संपवले.)आमच्या कडे दिवस कमी असल्याने आम्ही एकदम पॅक्ड प्लॅन आखला होता, त्याचा परिणाम म्हणून, आम्ही एअरपोर्टहून हॉटेलला न जाता थेट पिरॅमिड बघायला जाणार होतो.
सामान लगेच आले मग एअरपोर्ट वर थोडे फ्रेश होऊन, व्होडाफोनचे लोकल सिम विकत घेणे, थोडे डॉलर्स कन्व्हर्ट करणे वगैरे केले आणि बाहेर पडलो. बाहेर पडता क्षणी थंडी जाणवली. लगेचच जॅकेट्स चढवावी लागली. एक मोठी ८-९ सीटर व्हॅन (ती पण एकदम नवीन आणि स्वछ. हे सांगायचे कारण म्हणजे पुढे एकूणच इजिप्त मधल्या वेगवेगळ्या टूर ऑपरेटर्सच्या गाड्या बघितल्यावर त्याच्या पुढे आमची गाडी म्हणजे एकदम भारी आहे असे वाटले होते. अली नावाचा एक तरूण आणि छान हसतमूख ड्रायव्हर ने सामान आत टाकले आणि आम्ही ८ वाजता गिझाच्या दिशेने निघालो.
कैरो एअरपोर्टचा परिसर एकदम स्वच्छ आहे. त्या परिसरातून बाहेर पडलो आणि दोन्ही बाजूला वाळवंटी प्रदेशाची झलक दिसायला लागली. सगळीकडे एक पिवळसर धुळीचा थर दिसत होता. गाड्या, रस्ते सगळीकडे ही पिवळी धूळ नंतर दिसत राहिली. कैरोचे प्रथम दर्शन फार काही हवेहवेसे नव्हते. मुंबईसारखे प्रचंड ट्रॅफिक, पोल्युशन आणि प्रचंड गर्दी. वाटेत नाईल क्रॉस केली आणि गिझा मधे पोचलो.गिझा तर सगळे अलिकडच्या काळात वाढलेले शहर आहे. बेसुमार लोकवस्ती आणि अपुर्या सुविधा अगदी डोळ्यात भरत होत्या. रस्ते खराब, कचरा, बेशिस्त ट्रॅफिक आणि गर्दी. अर्धवट गिलावा देखिल न केलेल्या ईमारतींमधून वाळत घातलेले रंगिबेरंगी कपडे, बाल्कनी मधे उभे राहून धुम्रपान करणारे पुरुष, हिजाब मधल्या बायका आणि रस्त्यातून पळणारी मुले. एकदम वेगळेच दृश्य होते. आणि तेवढ्या त्या पिरॅमिडसची पहिली झलक दिसली. वाढत्या लोकसंख्येमुळे ते बिचारे पिरॅमिडस अगदीच गिझा गावठाणात आले आहेत. ड्रायव्हरने आता आपण अगदी पिरॅमिडस च्या जवळ आलो असे सांगितले आणि मला आग्र्याची आठवण झाली.तिथे पण त्या ताजमहाल जवळ पोचेपर्यंत एवढा बकाल पणा दिसतो की जीव नकोनकोसा होतो. इथे आम्हाला आमची गाईड रीम भेटली.
कैरो एअरपोर्ट
पाचच मिनिटात आमची गाडी पिरॅमिड्च्या परिसरामधे पोचली.फक्त ९च वाजले होते तरी प्रचंड टूरिस्टस बसेस ची गर्दी झाली होती. अगदी संथ गतीने वहाने पुढे सरकत होती. १५ मिनिटाने आम्हाला जागा मिळाली, रीमने तोवर तिकिटे काढून आणलीच होती.वाळूतून चालत चालत ग्रेट पिरॅमिड्च्या दिशेने निघालो. आजपर्यंत फक्त फोटोंमधून पाहिलेले पिरॅमिडस समोर दिसत होते. एवढे अजस्त्र की डोळ्यात मावत नव्हते.एका राजाची कबर ही एवढी मोठी का असावी? रीम एकीकडे एक पिरॅमिड बांधायला किती वेळ लागला, त्यांचा साईझ किती, बांधायला दगड किती लागले, किती वेळ लागला, दगड कसे आस्वानच्या खाणीतून काढून नाईलमधून इथे पर्यंत आणले, खूफू म्हणजे ज्या राजाचा हा कबर आहे तो कोण होता वगैरे माहिती देत होती. कान ऐकायचे काम करत होते पण डोळे समोर खिळून होते. मणामणाचे एकेक दगड कसे ४५०० वर्षांपूर्वी इथे आणले असतील हे कोडे इतकी वर्षे सुटले नाहिये तर मी ५ मिनिटात काय सोडवणार? भरपूर थंडी असली तरी छान सकाळचे कोवळे ऊन होते. त्यामधे वाळवंटाच्या निळ्याभोर आकाशाच्या पार्श्वभूमीवर ते जगातले आश्चर्य अधिकच खुलून दिसत होते. कितीही पाहिले, कितीही फोटो काढले तरी मन भरत नव्हते कॅमेर्याच्या छोट्याश्या लेन्स मधे तर तो सगळा नजारा,पसारा बसतच नव्हता. मग एका क्षणी फोटो काढणे सोडून देऊन परत वेड्यासरखे वेगवेगळ्या कोनांतून त्याला डोळ्यात साठवून घेत होतो.
तेवढ्यात रिमीने तुम्हाला आत जायचे आहे तर आता रांगेत उभे रहावे लागेल असे सांगितल्याने पिरॅमिडला आत जायच्या रांगेत उभे राहिलो. पिरॅमिडच्याच दगडांच्या ३-४ पायर्या वर चढून आत एक छोटेसे दार लागले, तिथून लोकांची रांग सुरू होती. आत बराच अंधार होता. अगदी ल्हान पिवळ्या बल्बजच्या मिणमिणत्या उजेडात आत एक निमूळती वाट दिसत होती. म्हणजे गर्दी एवढी होती की नुसती त्या वाटेवर माणसेच दिसत होती. आतमधे एक विचित्र गरम हवा होती. वाट तर एवढी चिंचोळी की एकाला चालणे मुष्कील व्हावे पण तो दुहेरी रस्ता होता. वर जाणारे आणि खाली येणारे एकाच वाटेने वाटचाल करत होते. आतमधे छताची उंची अगदी कमी आहे. माझी उंची अगदी कमी असली तरी मला देखिल थोडेसे वाकूनच चालावे लागत होते. उंचे पुरे लोक तर अगदीच ओणवून चालत होते. रस्त्याला त्यातून प्रचंड चढ. सतत ४५ अंशात ओणवून चालायचे, त्यातून आतमधे खूप गरम होते आणि प्रचंड गर्दी यांमुळे थोडे क्लस्ट्रोफोबिक वाटायला लागले होते. एका ठिकाणी एका शिडीवरून वर चढावे लागले आणि मला एकदम वर जाऊ नये असे वाटायला लागले, तुम्ही जाऊन या मी इथूनच परत जाते वगैरे बोलायला लागल्यावर, मुलाने आणि आजूबाजूच्या एक दोघानी जरा धीर दिला, हात दिला, माझे जॅकेट, माझी बॅग घेतली. थोडा श्वास घेऊन मग परत नेटाने सुरू केली चढाई. खरे तर फार काही नव्हतेच पण थोडा वेळ जरा विचित्र अवस्था झाली खरी. सुमारे १५ मिनिटांनी आम्ही वर पोचलो. वर एक १० गुणिले १२ च्या रूम मधे एका कोपर्यात फक्त सार्कोफॅगस ठेवायची दगडी जागा आणि बाकी काही नाही. एकदम शांत.आत मधे आपण कुठे आहोत याचा काहीही अंदाज लागत नाही. ५ मिनिटे तिथे थांबून बॅटरीच्या प्रकाशात ते दगडी सार्कोफॅगस बघून, परतीच्या वाटेला लागलो. परतताना काहीच प्रॉब्लेम आला नाही.
ही ती पिरॅमिडच्या आतली अरूंद चिंचोळी वाट.येणार्या लोकांसाठी परत जाणारे थांबले आहेत.
बाहेर पडून पुन्हा एकदा पिरॅमिडचे दर्शन घेत त्याला डावी घालून निघालो. चायनीज टुरिस्टांचे जथ्थे आले होते एका बस मधून. त्यांचे चित्र विचित्र पणे फोटोसेशन चालू होते ते बघून छान करमणूक होत होती. पण जरा वेळाने त्यांनी पिरॅमिडवर वर वर चढून जाऊन त्यांचे लाल शेले फडकवायला सुरूवात केल्यावर मात्र चहूकडून गार्डसनी शिट्ट्या वाजवायला सुरूवात करून त्यांना खाली उतरवले. रिमने पण मग चायनीज टूरिस्टस बद्दल अतिशय नाराजीच्या बर्याच कहाण्या सांगितल्या. पुढे चालता चालता अचानकच मागचा खेफ्रेचा पिरॅमिड पण नजरेला पडला. हा खुफूच्या मुलाचा पिरॅमिड. जागा निवडताना त्याने थोड्या टेकाडावरची जागा निवडल्याने ग्रेट पिरॅमिडपेक्षा तो उंच वाटतो पण नाहिये.अर्थात सगळे सौंदर्य त्या ग्रेट पिरॅमिड मधे एकवटले आहे असे वाटले. दोन्ही पिरॅमिडसचे एकत्र काही फोटो काढून मागेच असलेले सन बोट म्युझियम बघायला गेलो.
इजिप्शियन लोकांचा लाइफ आफ्टर डेथ वर फार विश्वास. राजाच्या मृत्युनंतरच्या प्रवासात लागणारी सगळी साधने त्याच्याबरोबर पुरली जायची. अशीच एक बोट खुफुच्या पिरॅमिड शेजारी सापडली. सुमारे १२२२ छोटे अवशेष एका आर्किओलॉजिस्टला उत्खननात सापडले आणि १९६८ साली ते सगळे सगळे तुकडे एकत्र करून बनवलेली अवाढव्य बोट आज त्या म्युझियम मधे उभी आहे. त्याकाळचे नौकानयन शास्त्र किती प्रगत होते याचा ढळडळीत पुरावा आहे ती बोट. दोनमजली म्युझियम मधे त्या बोटीखेरीज, ती कशी सापडली, कशी जोडली गेली, त्याबरोबर सापडलेले काही इतर सामान म्हणजे दोरखंड वगैरे नीट जतन करून ठेवले आहेत. बोट अतिशय डौलदार आणि सुरेख आहे. लाकडी अंग, वल्ही, राजाची केबिन सगळे नीट दिसते. खरंच हे तुकड्यातुकड्यां मधे सापडलेले रत्न किती कष्टाने परत जोडून आपल्यासाठी आज परत उभे केले आहे हे वाटून थक्क व्हायला झाले.
सन बोट
त्यानंतर पॅनोरमा पॉइंटला जाऊन तिन्ही पिरॅमिड एकत्र दिसतात ते पाहिले. प्रचंड गर्दी असल्याने तिथे फार वेळ न घाल्वता, स्फिंक्स पाहिला आणि परतीच्या वाटेला लागलो. स्फिंक्स मला अजून नीट पहायचा होता पण आज वेळ नव्हता. आज अम्हाला माझ्या त्या कलिगबरोबर लंच ला जायचे असल्याने आम्ही गिझाचे साईट सीइंग आवरते घेऊन कैरोला परत निघालो. इथे परत एकदा साऊंड आणि लाईट शो साठी फेरी होणार होती त्यामुळे परत एकदा पिरॅमिडसचे दर्शन होणार होते. परताना आम्ही सगळ्यांनीच परत मस्त गाडीत झोप काढली. कैरो मधे पोचताच प्रचंड ट्रॅफिकचे दर्शन झाले. गाईडच्या म्हणण्यानुसार हे विशेष काही नाही, हे रोजच असे असते. वाटेत प्रसिध तेहरीर चौक पाहिला. २०११ मधे सतत बीबीसीच्या बातम्यांमधे हा चौक दिसायचा. तो आणि त्यातला तो इजिप्तचा झेंडा.
पॅनोरमा पॉइंट
स्फिंक्स
कसेबसे २० मिनिटे लेट हॉटेलवर पोचलो. ते आमची वाटच पहात होते. पटकन चेक इन केले आणि त्यांना सामान खोलीत न्यायला सांगून खोलीत न जाताच तसेच लंचला गेलो.लंच एका इजिप्शियन रेस्तराँ मधे होते. फ्रेश लवाश ब्रेड, ताहिनी, बाबा घनूष, मुआम्मरा, मोरोहेइयाचे सूप, मिक्स्ड ग्रिल, भेंडी आणि बीफचा ताजिन मधला स्ट्यू. भूक लागली असल्याने छान जेवलो. नंतर उम्म अली नावाचे डिझर्ट खाल्ले. मागे मायबोलीवर याच्या रेसिपीवरून झालेले युद्ध मला आठवत असल्याने मला खायचेच होते. पण अगदीच निराशा झाली. शिळ्या पोळ्या तुपावर कुरकुरीत भाजून मग उगाच अर्ध्वट आटवलेल्या दुधात साखर घालून टाकल्यासारखे लागत होते. शोभेला २-४ काजू बेदाणे होते. उतारा म्हणून मस्त स्ट्राँग टर्की कॉफी प्यायली आणि हॉटेलवर परतलो.
हॉटेल जुने पण चांगले होते. रूम प्रशस्त आणि स्वच्छ होती. आंघोळी करून ताबडतोब मस्त डुलकी काढली. संध्याकाळी जवळच्या झामलेक परिसरात, नाईलच्या काठी थोडे फिरलो, जवळच्या एका लेबनीज मधे थोडे जेवलो आणि परत होटेलवर येऊन पडी टाकली. उद्या पहाटे ४च्या फ्लाईटने आस्वान ला जायचे होते. त्यामुळे परत २ वाजता पिकप साठी गाडी येणार होती. आज नीट विश्रांती होणे गरजेचे होते.
आज भल्या पहाटे निघायचे होते. रात्री कैरोचा फेरफटका त्यामुळे लवकर आटोपता घेऊन थोडी झोप पूर्ण करावी या हेतूने लवकर झोपलो होतो. पहाटे ३ ला खोलीतले सगळे फोन तारस्वरात ओरडायला लागल्याने, काही समजायच्या आत आम्ही तिघेही जागे होऊन आवरायला लागलो. पटकन आवरून हॉटेलच्या लॉबी मधे येऊन चेक-आउट केले. भल्या पहाटे तिथेल्या माणसाने ३ मोठे बॉक्स माझ्या हातात यूअर ब्रेकफास्ट म्हणून कोंबले. त्याला काही म्हणणार इतक्यात बाहेर गाडी आली असे सांगत कालचाच गाईड आला. मग तसेच सामान गडीत टाकून कैरो एअरपोर्टच्या दिशेने निघालो. पहाट असल्याने अजिबात वर्दळ नव्हती. नंतर असे शांत कैरो कधीच दिसले नाही.
आज अगदी २० मिनिटातच एअरपोर्टला पोचलो. आमचे सामान अधिक ते ब्रेकफास्टचे बॉक्सेस असा एकदम गावाकडून आलेले लटांबर वाटत होते. गाईड ला ब्रेकफास्ट नको म्हणले तर त्याला बहुतेक आमचा प्रॉब्लेम कळला. तो म्हणला डोंट वरी सगळे असेच असतील आत.आत प्रचंड गर्दी होती. चेक-इन साठी भली मोठी रांग होती. पण गंमत म्हणजे खरंच सगळ्यांच्या हातात ते ब्रेकफास्ट बॉक्सेस होते. मग वेळ घालवायला मी आणि मुलाने कोण कुठल्या हॉटेल मधे आहे असा खेळ सुरू केला. नवरा मग वैतागून ४ पावले अंतर राखून लांब उभा राहिला. सिक्युरिटी ला भली मोठी रांग होती. पण कसे माहिती नाही आमच्या गाईड ने एकदम आम्हाला बरेच पुढे नेले. पाच-दहा मिनिटात बॅग्ज चेक इन करून झाल्या. गाईड तुम्हाला पुढचा माणून आस्वान मधे भेटेल असे म्हणून गेला. मग आमचे ते बॉक्सेस घेतलेले लटांबर एकदाचे फ्लाईट मधे बसले.
कैरो-आस्वान-अबू सिंबेल अशी ती इजिप्त एअरची फ्लाईट होती. मी खूप प्रयत्न करूनही मला आस्वान-अबू सिंबेल बुकिंग मिळाले नव्हते. त्यामुळे आम्हाला आस्वान ला उतरून तिथून गाडीचा प्रवास करणे भाग होते.फ्लाईट एकदम लहान होती. वेळेत सुटले आणि वेळेत पोचली. उतल्यावर लगेच आधीप्रमाणे इथे पण अगदी फ्लाईटच्या दारात आमचा गाईड हातात पाटी धरून उभा होता. फ्रेश होऊन, सामान कलेक्ट करून बाहेर पडलो. आज पण छान नवी कोरी मिनी व्हॅन होती. ड्रायव्हर आणि आमचा गाईड नासीर! नासिरने ताबा घेतल्या घेतल्या आमचे नामकरण महाराणी आणि महाराजा असे केले. नंतर मग काही झाले की त्याने सो मिस महाराणी डिड यू लाईक धिस? असे विचारून अगदी उच्छाद आणला. तेवढा एक बारीक प्रॉब्लेम सोडला तर बाकी तो चांगला होता. माहिती वगैरे छान देत होता.
अस्वान ही ईजिप्तच्या दक्षिणेकडची जुनी आणि मोठी सिटी आहे. इथून पुढेच सुदानची हद्द सुरू होते. आस्वान धरण आणि अबु सिंबेल यामुळे पर्यटकांचा ओघ पण इथे असतोच. नाईलच्या काठावर आहे आणि इथे नाईल आहे पण खूप रुंद आणि छान. आम्हाला आस्वान शहर बघणे शक्य नव्हते. डॅम आणि अनफिनिश्ड ओबेलिस्क बघून लगेच अबु-सिंबेल कडे निघावे लागणार होते.
लहानपणी भूगोलात नाईल आणि आस्वान धरणाबद्दल वाचले होते. एके काळी जगातले सगळ्यात मोठे असणारे हे धरण बघायची उत्सुकता होती. एअरपोर्ट पासून हाय डॅम फक्त ३० मिनिटावर आहे. १९६० पासून ७० पर्यंत या भल्या मोठ्या धरणाचे काम चालू होते. ऐन वेळेला अमेरिका आणि इतर युरोपियन देशांनी मदत नाकारल्यवर इजिप्तचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष नासिर यांनी रशियाच्या मदतीने हा अवाढव्य प्रोजेक्ट तडीस नेला. इथे जवळच इजिप्त-रशियाचे मैत्री स्मारक म्हणून लोटस मॉन्युमेंट पण आहे. बहुतेक सर्व धरणांप्रमाणेच या धरणाच्या आवश्यकतेबद्दल मतांतरे होती. गावेच्या गावे यामुळे विस्थापित झाली. एक अक्ख्ही जमात या धरणाच्या पाण्याखाली गेली. विस्थापितांचे नीट पुनर्वसन झाले नाही. गाळ भरून काही वर्षांनी हे धाण पण निरोपय्प्गी होण्याचा धोका आहेच. अशा अनेक कारणांमुळे या धरणाला बर्याच जणांचा प्रखर विरोध होता.तरी देखील नासिर यांनी हे काम पूर्ण केले. अर्थात डॅम मुळे औद्योगिक आणि इतर बरीच प्रगती झाली हे सत्यच आहे. जाताना आणि परत येताना गाडीत आमच्या गाईड नासिर बरोबर या वर छान चर्चा झाली.
बाकी डॅमच्या फॅक्ट्स वगैरे इंटरनेट वर उपलब्ध असल्याने इथे परत लिहित नाही.
हे डॅमचे फोटो
नाईल बेसिन. याने नक्की कशी नाईल वहाते आणि कुठे डॅम आहे याची कल्पना येते.
अथांग पसरलेला लेक नासर
बाकी नंतर लिहिते.