अगदी लहानपणी जेव्हा मला पुस्तकांचा भस्म्या रोग झाला होता तेव्हा हातात विजय देवधरांचे अनुवादित "स्फिंक्स" हे पुस्तक पडले होते. पुढे त्याचे ओरिजिनल रॉबिन कुक चे पण वाचले. पण त्या पुस्तकाच्या मुखपृष्टावरचा तो तुतनखामेनचा मुखवटा विसरले नाही. त्यापुस्तकाने आणि त्यातल्या इजिप्तच्या वर्णणाने मी पूर्ण भारावून गेले होते. कुठेतरी तेव्हाच हे सगळे एकदा तरी बघायचे आहे अशी बहुतेक खूणगाठ बांधली होती. कारण जेव्हा जेव्हा कुठे फिरायला जायचा विचार यायचा तेव्हा इजिप्त एकदा तरी उल्लेखले जायचेच. एकदा २००० मधे, एकदा २००६ मधे इजिप्तने हुलकावणी दिली होती. पण अखेर २०१८ मधे का होईना योग जुळून आलाच.