अगदी लहानपणी जेव्हा मला पुस्तकांचा भस्म्या रोग झाला होता तेव्हा हातात विजय देवधरांचे अनुवादित "स्फिंक्स" हे पुस्तक पडले होते. पुढे त्याचे ओरिजिनल रॉबिन कुक चे पण वाचले. पण त्या पुस्तकाच्या मुखपृष्टावरचा तो तुतनखामेनचा मुखवटा विसरले नाही. त्यापुस्तकाने आणि त्यातल्या इजिप्तच्या वर्णणाने मी पूर्ण भारावून गेले होते. कुठेतरी तेव्हाच हे सगळे एकदा तरी बघायचे आहे अशी बहुतेक खूणगाठ बांधली होती. कारण जेव्हा जेव्हा कुठे फिरायला जायचा विचार यायचा तेव्हा इजिप्त एकदा तरी उल्लेखले जायचेच. एकदा २००० मधे, एकदा २००६ मधे इजिप्तने हुलकावणी दिली होती. पण अखेर २०१८ मधे का होईना योग जुळून आलाच.
कोणार्क, सुवर्ण मंदिर, स्पेन, जॉर्डन, हिमाचल प्रदेश, केनिया अशी वाट्टेल ती स्टेशने घेत आमची सुट्टीच्या प्लॅनची गाडी नेहेमीच्या इजिप्त स्टेशनात अडकली. नवर्याने स्वस्त आणि कन्व्हिनियंट तिकिटे दिसताच बुक करू का विचारले आणि मी पण डोळे झाकून हो म्हणले. त्यानंतर तिथली राजकिय परिस्थिती, भारत आणि जपान्ची ट्रॅव्हल अॅडव्हायजरी वाचली आणि हरकत नाही जायला असे म्हणून शिक्का मोर्तब केले. आमच्याकडे फिरण्याच्या कामांची वाटणी झाली आहे. नवरा विमानांची तिकिटे, व्हिसा अशा मॅक्रो गोष्टी हाताळतो तर मी काय बघायचे, डेली प्लॅन, त्या देशातला अंतर्गत प्रवास या मायक्रो गोष्टी बघते. एकदा तिकिटे बुक झाल्यावर मग मी कामाला लागले.
काय काय ठिकाणे बघायची आहेत याचा थोडा प्लॅन तयार होता. मग आधी नकाशा बघून अंतरांचा अंदाज घेतला. नेटवरच्या काही तयार आयटनरीज बघून माझा प्लॅन अती महत्त्वाकांक्षी तर नाही ना हे पण पाहिले. मग बरेच वाचन. आधी लोनली प्लॅनेट वाचले. मग ट्रीपअॅडव्हायजर, इजिप्त फोरम वगैरे बघत होते.
नुकतीच मिसळपाव वर इजिप्तची सोलो ट्रीप केलेल्या एकांनी एक लेखमाला लिहिली होती ती पण वाचली.
https://www.misalpav.com/node/42736
अश्विन बहुलकर ची साईट वाचली.
https://ashwinbahulkar.wordpress.com/my-travels-2/egypt/
खेरीज या साईटचा पण भरपूर उपयोग झाला.
http://www.alternativeegypt.com/
या सगळ्या अभ्यासातून एक लक्षात आले की हा बराच बेभरवशाचा देश दिसत आहे. एकट्याने बॅकपॅकर सारखे फिरायचे असेल तर हरकत नाही, पण हातात फक्त ८च दिवस आणि बरोबर मुलगा असताना हे असे बेभरवशी प्रकरण शक्य नाही. काही इकडे तिकडे झाले तर सगळ्या टीपचा विचका होणार. मग अजिबात न आवडणारी गोष्ट म्हणजे टूर बुकिंग.त्याचा विचार सुरू केला. व्हाएटर आणि इजिप्तमधल्या लोकल मेम्फीस टूर्स यांच्याशी बोलणी सुरू केली. दोघांचेही चटकन रिप्लाय आले. पण मला हवा होता तो प्लॅन ते काही देईनात. हातशी दिवस कमी, वर्षाखेरीमुळे ऑफिसात प्रचंड काम यामुळे आता चिडचिड वाढायला लागली होती. सरळ मिळेल ते घ्यावे असे विचार मनात यायला लागले होते. नवरा पण बिझी होता. कर तू काय करायचे ते असे म्हणून त्याने सगळी सूत्रे माझ्या कडे दिली होती.
तेव्हढ्यात एकदा फेसबूक बघताना मला माझ्या एका जुन्या कलिगची पोस्ट दिसली. ते बरेच सिनियर आहेत मला आणि सध्या आमच्या कैरो ऑफिसचे प्रमुख आहेत. अरे हे आधी कसे लक्षात आले नाही असे म्हणत त्यांना मेल टाकली. त्यांचा लगेच रिप्लाय आला आणि प्रेमाचे बरेच सल्ले पण. शिवाय त्यांनी एक अगदी खात्रीशीर असे म्हणून एका लोकल ट्रॅव्हल एजन्सीचा संपर्क पण दिला. तिथून पुढे मात्र पटपट चक्रे हलली. मला हवा तसा प्लॅन त्या एजन्सी ने अगदी लगेच बनवून दिला. उपलब्ध दिवसांत, हवी असलेली सगळी ठिकाणे, मला हव्या त्या पेसने, शिवाय नाईल क्रूज वगैरे सगळे असणारी आणि तरीही प्रायव्हेट अशी टूर तिने आखून दिली. पैसे पण अगदी वाजवी. व्हाएटर पेक्षा थोडेच पैसे जास्त जात होते, पण या एजन्सीवर विश्वास ठ्वून यांच्याकडून सगळी बुकिंग्ज केली. (अत्यंत योग्य निर्णय ठरला हा. अतिशय उत्तम व्यवस्था केली होती त्यांनी).
ख्रिसमस आणि न्यू इयर व्हेकेशन म्हणजे इजिप्तचा हाय सिजन असतो. प्रचंड प्रमाणात टूरिस्ट्स येतात. त्यातून गेल्या काही वर्षातली अस्थिरता पहिल्यांदाच कमी झाल्याने या वर्षी तर अफाट टूरिस्ट्स होते. त्याचा परिणाम हॉटेल्स, डोमेस्टिक फ्लाईटस हे सगळे फुल्ल आणि सगळीकडे गर्दी आणि रांगा. पण तिथे पोचल्यावर बरे पण वाटत होते एवढी लोक बघून. डिसेंबर शेवटी आणि जानेवारीच्या सुरूवातीला थंडी पण खूप असते इजिप्त मधे. कैरो तर अगदी थंडगार होते. जॅकेट-टोपी शिवाय अशक्य होते. त्यातून पिरॅमिडस खुल्यावर असल्याने भन्नाट वारा होता. तुलनेने दक्षिणेकडचे आस्वान कमी थंड होते. अर्थात आम्ही पूर्ण तयारीने गेलो होतो त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आला. पण कदाचित आस्वान मधे तरी वापरता येईल या हेतूने नेलेल्या शॉर्टस आणि हाफ स्लीव्ह टीशर्ट्स घालता आले नाहीत. पण थंडी जीवघेणी नव्हती. छान फिरता येत होते. उलट उन्हाळ्यात (जो दुसरा पीक सिजन आहे) ४०-४५ डिग्री मधे इथे फिरणे ही शिक्षा असेल असे वाटले.
तर प्लॅन. मला काहिही झाले तरी अबु सिंबेल बघायचे होते. खूप प्रयत्न करून पण शेवट पर्यंत आस्वान-अबु सिंबेलची फ्लाईट्स पूर्ण बुक्ड असल्याने मिळाली नाहित. मग कार ने ६ तास प्रवास करून एक पूर्ण दिवस त्यात घालवावा लागला. पण ते केले. त्यामुळे अत्यंत मनात असूनही अलेक्झांड्रियाला जाता आले नाही. हुरघाडा ला जायचे होते पण थंडीचे अंगभर कपडे घालून कुठे बीच रिसॉर्ट ला जायचे असा विचार करून ते पण यादीतून अगळले.
मग कैरो २ दिवस: गिझा चे पिरॅमिडस, मूळ पिरॅमिडस ज्यावरून बांधले ते दाश्शुर आणि सक्काराचे पिरॅमिडस, कैरो म्युझियम आणि इस्लामिक कैरो (खान एल खलिली बाजार आणि २ मॉस्क्स)
आस्वान-अबु सिंबेल मधे १ दिवस
लुक्सॉर २ दिवसः व्हॅली ऑफ किंग्ज, व्हॅली ऑफ क्वीन्स, हाटशेपसूटचे मंदिर, लक्सॉर टेम्पल आणि कार्नाक टेम्पल
आणि २ दिवस ३ रात्रींची नाइल क्रूज : यामधे कोम ओम्बो टेम्पल, एडफु टेम्पल आणि फिलाए टेम्पल
असा भरगच्च प्लॅन आखला.
आमची वर्षाखेरची २ आठवड्याची सुट्टी आम्ही भारतात येणार होतो. त्यामुळे तिकिटे मुंबई-कैरो-मुंबई अशीच काढली. ते आम्हाला सुटसुटीत वाटले. बरीच भवती न भवती होऊन वेळ वाचवणे या शुद्ध हेतूने इजिप्त एअर (कारण फक्त त्यांचीच डायरेक्ट फ्लाईट आहे) ने गेलो. कारण बाकी सगळ्या एअरलाईन्स मधे १२-१४ तास जात होते. इजिप्त एअरलाईन ने देखिल लौकिकाला साजेशीच म्हणजे अत्यंत अॅव्हरेज सर्व्हिस देऊन आपले रेप्युटेशन राखले.
आज वेळ होता म्हणून एवढे लिहिले. बाकी डिटेल्स नंतर पुढच्या भागात लिहिते.