कथामालिका.. त्यानंतरचे दिवस ..
बेल वाजली. उशिरा झोपल्यानंतरच्या सकाळच्या वेळी असणार्या पूर्ण झोपेत असणार्या मला कूसही बदलायची नव्हती. बेल पुन्हा वाजली. मा व शी. ज्या दिवशी ऑफिस लौकर तेव्हा या उशिरा येतात आणि जेंव्हा आज नाही आल्या तर बरं असं वाटतं तेंव्हा वेळेआधी हजर.
उठून स्लिपर्स घालेपर्यंत अजून एकदा बेल. तरी बरं यांना संगितलंय की दोनदा बेल वाजवून थांबत जा. मी बाथरूममधे असू शकते. एक किंवा दोन नंबरला. पण नै. दर वेळी आतून फोन करावा लागतो. बसा ५ मिनिटं आलेच. आणि घरात असले की सदासर्वकाळ ही मावशीना अटेंड करायची जबाबदारी माझीच. कारण शिबानी सकाळी जिमला गेलेली असते.
आ ले आ ले असं ओरडत मी दाराकडं निघाले. जाताजाता नेट ऑन केलं. सावन सुरू केलं. टॉप हिटस लावले. तोवर दाराजवळ पोचून दार उघडून परत आत बेडरूममधे येऊन धाडकन बेडवर आडवी झाले. हे करत असताना मावशी केर बाहेर ठेवा आणि दोन ऑम्लेट्स बनवा आणि ती झाली की ब्रेड टोस्ट करा. हे सांगितलं. आणि मग जरा डोळे उघडून ते व्हॉटसअॅपला लावले . कालच्या दिवसाला घाबरून बंद केलेलं. मेसेज पाहिला हेच नको. कटकटच नको. तेच बोर मेसेजेस आणि ते पाठवणारे तेच बोर लोक. ओके ओके, लोक तेच नसतील, पण व्हॉटसॅपवर मक्काय आज काय स्पेशल प्लॅन्स? वगैरे त्याच चौकशा. काय उत्तरं देणार? हे लोक असा माग का काढतात? नुस्तं गॉसिप. त्यातनं ज्याना इंटरेस्ट आहे खरंच ते यावर, " तुझ्या घरासमोर काय रांगा असतील ना? म्हणून मग हिम्मतच होत नाही. " म्हणे. हॉ? "हिम्मत होत नाही तर विषय कट डुड. बावळट्ट माणसाचं काही होऊ शकत नाही या मैदानात. " असं तर नाही म्हणता येत तोंडावर. खरं तर काहीच नै म्हणता येत. या असल्या अंदाज घेणार्या लोकांचा जाम वैताग अस्तो. आइ बघते तस्ल्या हाय सॅच्युरेशन रंगाच्या सिनेमा मधे अस्तात तस्ले हे बावळट हिरो. ते अंगावरच शिवलेले ड्रेस घालून सायकली चालवणार्या, आणि तरी या मेहनतीला कधीच इण्चेस लॉस मधे कन्वर्ट न करू शकणार्या हिरोइन्सच फक्त या असल्या वाक्याना प्रपोज समजून उत्तरं देत असतील. इट्स अ बिग टर्नऑफ. ईईईई..
पण मेसेजेस वाचायच्या आधीच मावशी रूममधे आल्या आणि म्हणल्या , " रसिका, तुजी याक्टिवा तू आज बिल्डिंग समोर लावलीय ना. "
हो म्हटलं. जागाच नव्हती आत.
" काळपट याक्टिवा आणि मागं लाल सिंह वाली तुजीचे ना गाडी. "
"मावशी हो. माझीच आहे. तुम्हाला माहीतीय ना माझी गाडी. किती वेळा बसलायेत. आणि सिंह काय? ड्रॅगन आहे तो. काय झालं ?"
" मंग चल जरा खाली जाऊ."
शिट. काय झालं? एव्हाना मी उठून चपला पायात सरकावल्या होत्या.
" काय झालं सांगा की मावशी."
" एक पोरगं फुलं लावालंय तुज्या गाडीवर . "
वॉट! आर यु सिरियस!!
"मावशी त्याला विचरायचं ना ."
" कसं इचारणार? तुला माहीत असेल असं वाटलं मला. "
मी मावशींबरोबर खाली गेले. आणि वाटलं होतं तसंच झालेलं. कुणीच नव्हतं तिथं तोपर्यंत. पण अॅक्टिवाला मस्त फुलं लावलेली सगळीकडं. लाल, पिवळी, गुलाबी. धन्य आहे जो कोण असेल त्याची. ही अशी लग्न झालेली बाईक घेऊन मी ऑफिसला जाणारे का? च्यायला वैताग.
मावशी हसत उभ्या होत्या.
" मावशी चला ही फुलं काढायला मदत करा " मी चिडले.
" हां. तू जा वर. मी आन अशोक मिळून काढतो. अशोक म्हणजे गापुजी. ( गाडी पुसणारा जीव. हे माझं आणि चिन्याचं वर्जन.)
" लौकर निघतील का पण ? मला नऊला ऑफिस आहे. "
" हां धा पंदरा मिंटात हुतंय. जा. चा ठेव. " मावशी.
मग मी लिफ्टपाशी नखं खात , विचार करत उभी होते की कोण असेल हा आचरट! मग म्हटलं याने कुठं तरी निरोप ठेवलाच असेल. बाईक वर तर काही नोट, टॅग काही नव्हतं.
कदाचित काल मेसेज केला असेल. म्हणून व्हॉटसॅप उघडलं. तिथं काही सुगावा लागेना. तोपर्यंत फ्लॅटजवळ पोचले होते. दार उघडायला गेले तर तिथं एक नोट लावलेली.
" पता था फूल निकाल दोगी| लेकीन याद तो रहेगा| है ना? इन फुलोंका काम बस उतनाही था|
और सोचोगी इस पागलने ये आज क्यु किया? वॅलेंटाईन तो कल था| तो फिर वही जवाब है| बडा दिन मिस किया | पर याद तो यही दिन रहेगा | है ना? चाहे तुम्हारा जवाब हां हो या ना, तुम भुलोगी तो नही ये बात| मुझे डर है, डर क्या यकीन है, तुम ना ही कहोगी| कहां तुम और कहां मै| इसलिये पहले बेसिक स्टेप्स किये| स्पेशल एंट्री और फिर काँटेक्स्ट सेट| दरसल नाम यहीं लिख देता पर सवाल जवाब तो सामनेही होना अच्छा है|" बस्स एवढंच. मी नोट उलटीसुलटी केली. काहीच नाही.
" लेटर पलटना छोडो, खुद पलटो " शिट! केवढी दचकले मी. आणि क्षणार्धात वळले. मान व्यवस्थित वर करून बघावं लागावं इतकी हाईट , फेयरली डार्क स्किन, चिझल्ड बॉडी , शार्प जॉलाईन आणि लांब केसांची पोनीटेल. मी ओळखत होते याला.
" ठीक है| मैं जाता हूं| जो बताना था वो बोल दिया| जवाबकी उम्मीद है लेकीन जल्दी नही| तुम्हे बहोत अनएक्स्पेक्टेड होगा ना| कल शामको मिलते है|"
असं म्हणून लिफ्टकडं न जाता पायर्या उतरायला गेला.
मी काही काळ फ्रोझन आणि मग दार उघडायला लागले तेवढ्यात लिफ्टमधून मावशी आल्या हसत हसत. माझा पारा जरा चढलेला होता.
" मावशी बास की आता."
" कोन होतं गं रसिका ते पोरगं?"
" मावशी माझं नाव रसिका नाहिय किनै? नीट हाक मारत जा बरं मला "
"अगं रसा हे काय नाव असतंय होय एवढंसं? आन रसातै म्हटलं तर तुला आवडेना. "
मी गुमान चहा करायला लागले.
" आज काय तरी है ना रसिका? त्ये काय म्हण्तेत? "
" काय ?"
" त्येच की सांगायचं. मुझे तुमसे प्यार ता, आजबी हय और कलबी रहेगा |" आणि जोराजोरात हसायला लागल्या. कुठ्ठं न्याय्ची सोय नई यांना.
" काल होतं ते मावशी. रसा, मी पण पिणारे चहा. " बाहेरून शिबानीचा आवाज आला.
" मक्काय मावशी, कुणी इजहार केला प्रेमाचा तुम्हाला? काय फुलं, गिफ्ट, चॉक्लेट, टेडी मिळालं का नै?" शिबानी किचनमधे येऊन मावशींच्या खांद्यावर हात ठेवून उभी राहिली होती.
" ट्येडी? मन्जी त्ये मौमौ आस्वल? त्ये कशाला देतेत? माज्या भैनीच्या नातीला बड्डेला माज्या पोरींनी त्येच दिलं. ह्येच आवडतंय मने ल्हान पोरांना"
" लहान पोरांना का मोठ्या सुंदर पोरींना पण आवडतं " शिबानीचा फालतूपणा चालू झाला. मला पण हसू येत होतं.
तेवढ्यात मावशी " आप्ल्या रसाला निस्ती गाडीभर फुलं मिळाली की. रसा, ट्येडी नै दिला बै त्या फुलंवाल्यानी आन चाकलेट बी नै."
" आं?आं? वॉट वॉट? कस्ली फुलं? कोण गाडीवाला?"
" आगं मी येत हुते ना सकाळी हिकडं कामाला, तर बर्का रसिकाच्या लाल शिंव लावलेल्या याक्टिवाला .."
झालं, मावशी तैना रसभरित वर्णन सांगायला बसल्या.
मी ऑफिसात पोचल्यावर विचार करत होते. हा अंकित, माझ्या डान्स क्लासमधे होता. अंकित अतिशय मस्त डान्स करणारा, क्लासचा स्टार स्टुडंट , गेली ६ वर्षं डान्स करत होता आणि अनेक डान्स फॉर्म्स यायचे त्याला. आणि नाचताना पण इतका लवचिक असून मस्क्युलिन दिसायचा एकदम. आमची इन्स्ट्रक्टर बर्याचदा स्टेप्स दाखवायला त्याला बरोबर घ्यायची. आणि सगळ्या पोरी फक्त त्याच्याकडं बघत असायच्या.
मी आत्ताच सुरू केलेला क्लास. दोन महिने झाले होते. माझ्याबरोबर ऑफिसातले माझ्या गृपमधले ऑलमोस्ट सगळे होते. आमचा सात जणांचा ग्रूप. त्यामुळं फार बाकी ओळखी नव्हत्या. फक्त कधीकधी पार्ट्नर वाल्या स्टेप्सना तो माझ्या बरोबर आला होता.
तर त्याचं अंकित हे नाव आणि त्याचा नाच एवढीच मला त्याच्याबद्दल माहिती. खरं तर फिलींग गुड सोडलं तर यापुढं माझा विचारच थांबलेला. कारण काही माहितीच नव्हती. फक्त एक आय कँडी मुलगा आपल्यात इंटरेस्टेड आहे इतकंच.
खरं तर तो माझ्यापेक्षा थोडा लहानच असेल. आणि हिंदीच्या अॅक्सेंटवरून नॉर्थमधला वाटतो. तेही मोठ्या शहरातला नाही. दिल्ली वगैरे तर नाहीच. ती नोट आणि नंतरचं बोलणं यावरून थोडा फिल्मी आणि थोडा सेंटि पण. आणि काय बरं? हां. इथल्याच एका पण नॉन-आयटी कंपनीत आहे बहुतेक. बहुतेक मेकॅनिकल. एकदा येताजाता ऐकलेलं.
काम चालू होतं. अधूनमधून ते आठवत होतं तरी ते सगळं बालिश वाटत होतं मला. आणि त्या पुढं काही घडलंही नव्हतं. विचार करून उत्तर वगैरे द्यायचा काही प्रश्न नव्हता कारण प्रश्न काय हेच माहिती नव्हतं. त्याची अपेक्षा एक्स्प्रेस करणे एवढीच दिसत होती. आणि तसंही काय कोण कुठला मुलगा? अजून चार पोरींना हेच विचारलं असेल तर? कदाचित वी-डे फ्लॉप झाला असेल म्हणून आज हा उद्योग. कायतरी करून वि-डे ला काहितरी हॅपनिंग घडलं पाहिजे टाईप. जाऊ दे. मी हे सोडून द्यायचं ठरवलं.
तरी अधूनमधून आठवत होतं. आणी मोर दॅन एनिथिंग, "चिठ्ठी छोडो, खुद पलटो" हे आणि तेंव्हा तो किती जवळ उभा होता हे.
संध्याकाळी ऑफ कोर्स , शिबानीला सांगितलं नीट.
शिबानी अर्थात " धिस इज नॉट वॉट यु वाँट ना ? मेनि डेट्स , मिनिंगफुल कन्वर्सेशन्स, स्लोली अंडरस्टंडिंग इच आदर, मॅच्युअर चॉइसेस. हे सगळं संगितलं होतंस तू मला. "
" हो यार. आय नो. हा किडिश, इमोशनल आणि फ्रिवोलस वाटतोच आहे. हा काय फालतूपणा आहे. "
" खूप विचार नको करू. लीव इट. म्हणजे मला चिडवायला जागा ठेव तशी"
दुसर्या दिवशी क्लासला काही फार घडलं नाही. फक्त एका स्टेपला तो माझा पार्टनर होता तेंव्हा त्यानं मला " क्लासनंतर कॉफी प्यायला येतेस? थोडाच वेळ जाऊ या. मी तुला इथंच सोडतो परत. " हे विचारलं. मी नको म्हणाले.
मग पुढच्या प्रत्येक क्लासला तो एकदा माझ्यासमोर यायचा आणि हेच विचारायचा.
एक दिवस मी म्हटलं , ठिके, जाउन तर बघू या.
तो एकदम प्लेझंटली सरप्राईज्ड. मी अॅन्क्झायटीमधे भरपूर स्टेप्स चुकवल्या. त्याने एक्साईटमेंटमधे जास्त चांगला नाच केला.
मग क्लास झाल्यावर मी आमच्या गृपला बाय केलं आणि वर काहीतरी राहिलंय ते घेऊन येते आणि जाते असं सांगून वर आले आणि थोड्या वेळाने परत खाली पार्किंगमधे गेले. सगळी जनता गेली होती. आणि तो माझी वाट बघत त्याच्या कातिल रॉयल ब्लु कलरच्या बजाज पल्सरवर थांबलेला.
ड्रायवर पहिल्या मजल्यावर आणि मागची सीट दुसर्या मजल्यावर. मला विक्रम वेताळाचा जोक आठवला. पण एनिहाऊ, मी त्याच्यापाशी गेले. आता या पिलियन सीटवर बर्यापैकी ग्रेसफुली दिसत चढाई कशी करावी या विचारात असताना तो म्हणाला, "एक मिनिट, ये साईडसे आओ| " मी पाथवेवर गेले. त्यानं बाईक हलकी टिल्ट केली. दॅट वॉज मच इझीयर दॅन आय थॉट. मी त्याला न चिकटता बसायचा एक प्लॅन तिथल्या तिथं चॉक आऊट केला. आणि बाईक सुरू झाली.
मानेवर रुळणारे केस, तो जवळ असल्याची जाणीव, अगदी हलका व्हाईट मस्कचा वास.
त्यात आम्ही आत्ताच डान्स करून आलो होतो. मी वर खाली पळापळी करताना मधेच बॅगेतला डिओ एकदोनदा फुस्कारून घेतला होता. मला अंकित बद्दल आकर्षण वाटत होतं म्हणून नव्हतं ते. कुणालाही डान्स नंतर भेटावं लागणार असेल तर हेच केलं अस्तं मी. आणि त्यानंही केलं असेल. नाहीतर तो व्हाईट मस्क जाणवला अस्ता का मला?
अंकित बाई़क अगदी काळजीपूर्वक चालवत होता. नो धक्के, नो स्पीड अप डाऊन्स. मुलं पोरगी मागं बसली असेल तर जी काही टॅक्टिक्स वापरतात त्यातलं काही नाही. मी अगदी कंफर्टेबली मागं बसले होते.
" मैं हमेशा इतना स्लो नही चलाता| आज तुम बैठी हो पीछे इसलिये| तुम्हे स्पीड पसन्द है? " मान डाव्या बाजूला वळवून हेल्मेटमधून पण ऐकू येईल अशा आवाजात अंकित म्हणाला.
" हां. बहोत | जैसे सारी लडकियोंको होता है|" मी म्हणाले.
" ठीक है| तुम्हे कंफर्टेबली बैठनेका कुछ अरेंजमेंट हो जायेगा तब लाँग फास्ट राईड करेंगे| " तो म्हणाला.
मी इतक्या लौकर थोडीसुद्धा ड्रॉन आणि इम्प्रेस होईन असं वाटलं नव्हतं मला. किंवा मग एकूण माहौल आणि परिस्थितीच अशी होती की जरा विरघळायचं ठरवलंच होतं मनानी.
मी एकटी होते गेली दोन वर्षं. अक्की गेल्यापासून. अक्की म्हणजे अक्षय. आम्ही एकाच कॉलेजातून पास आउट झालो होतो. आणि एकाच कंपनीत प्लेसमेंट. म्हणजे इथं. खूप धमाल केली होती फ्रेशर्स बॅचला. मोठा ग्रूप होता. खूप आऊऊटींग्ज, ट्रेक्स, इवनिंग अड्डे , लेट नाईट राईड्स आणि इवन ऑफिस टी टाईम्स . खूप मज्जा करायचो पण अक्की मास्टर्स करायला गेला. आणि ग्रूपचा ग्लो थोडा कमी झाला. माझा तर खूपच. आम्ही सगळं बोलायचो, भांडायचो, एकमेकांना नको ते सल्ले द्यायचो. तो असताना मला बॉयफ्रेंडची गरज कधी वाटलीच नाही. ते तरल काहीतरी सोडलं तर आमच्यात बाकी सगळं पोटेन्शल होतं कपल व्हायचं.
" पण ते नाही झालं तेच बरं." अक्षय म्हणायचा. " नाहीतर हे आजूबाजूला जे पूर्वी छान मित्र असलेले आणि आता एकाच गृपमधे बसून एकमेकांशी अगदी कामपुरतं बोलणारे ब्रेके दिसतायत तसं झालं अस्तं आपलं. " खरंच होतं ते. असली अनेक एक्स कपल्स आमच्या आजूबाजूला होती. आणि खरंच अक्षय बद्दल मला तसं कधीच वाटलं नाही. म्हणजे अगदी एकदाही " काश ऐसा होता " टाईप विचार कधीही आला नाही.
आत्ता पण आम्ही गप्पा मारतो, स्काईप करतो, बोललो की सग्गळं एकमेकांना सांगतो. पण आता अक्की इतका बिझी झालाय. असाईनमेन्ट्स , क्लास वर्क , सारख्या परिक्षा आणि दॅट बिच. म्हणजे त्याची ती नटवी गर्लफ्रेंड.
अंहं , अॅम नॉट जेलस हां. पण इतकी मंद आहे ती. हुषार आहे असं अक्की म्हणतो आणि मार्क्स चांगले पडतात म्हणून म्हणायचं. पण बोलायला लागली की माशी हालत नाही चेहर्यावरून. आणि वेट , अजिबात सुंदर पण नाहीय. रहाते पण इतकी बोर. युनिवर्सीटीचं नाव असलेले ग्रे, ब्लॅक आणि पांढरे टीज घालते कायम. आम्ही बोलतो कधी कधी स्काईपवर. एकतर ती जॅप अमेरिकन आहे. कैतरी वेगळ्याच अॅक्सेंटमधे बोलते. आणि पाच मिनिटं बोललो की आता पुढं काय असं होतं आम्हाला दोघींना पण.
एनीवे, सो आता इथं मस्त मित्र आहेत , शिबानी पण आहेच. पण अक्की गेल्यापासून माझ्यातला एक मोठा कोपरा पार एकटा झालाय.
मी हा विचार करत असताना आम्ही पोचलो पण. छान आहे की जागा. कूल डेकोर, आणि खूप झाडं पण. क्राऊड पण खूप नाहीय पण जे आहे ते कूल वाटतंय. मला वाटलं होतं कुठल्यातरी टिपिकल सिसिडी किंवा स्टारबक्स मधे जाऊ आम्ही.
" अच्छी है ना ये जगह| दोस्तसे पूछा था, यार थोडा स्पेशल मिटींग हो तो कहां जा सकते है| " हेल्मेट काढून टेबलावर ठेवत अंकित म्हणाला.
" थोडा| स्पेशल| " मी एकेक शब्द थांबून हसत म्हणाले. अंकित माझ्याकडं बघत राहिला १० सेकंद.
" नही है?" त्याने तसंच पहात मला विचारलं. गॉड!
ऑर्डर देऊन आम्ही थोडे सेटल झालो.
" रसा, ऐसा तो नही की तुम जानती नही| ऐसा तो नही की मैं यहां इजहार करने आया हू| तुम्हे तो उसी दिन पता चल गया था की मुझे क्या फीलींग्ज है| फिर भी तुम मेरे साथ आयी हो आज| मतलब.. " डान्स करत नसला की खूप स्टाईलिश नाहीय हा मुलगा. आणि खूप तयार पण नाही वाटत. साधं पण जेन्युईन वाटतंय जे बोलतोय ते.
" थांब थांब. लगेच मतलब नको काढूस यातून. " मी म्हणाले. " आय अग्री की तू तो फनी चाइल्डिश प्रकार करून पण मी आज तुझ्याबरोबर आले. पण याचा अर्थ ते जे काय केलंस त्यानं मी इम्प्रेस झाले नव्हते हां अजिबात. इन फॅक्ट मला अजिबात आवडलं नव्हतं ते."
"यार सॉरी. मुझे लगाही था तुम्हे पसन्द नही आयेगा| पर सोचा था तुम्हे बहोत सी रिक्वेस्ट्स आयेंगी तो मै बस अलगसे याद रहना चाहता था| मैने दोस्तको बोला भी था, यार ये उसे अच्छा नही लगता तो सब गडबड हो जायेगा |"
" हे पण मित्राला विचारून केलंस?" मी मनातल्या मनात कपाळावर हात मारला.
" नही नही| आयडिया मेरा था यार| उसने बोला था, देख ऐसा कुछ करना जिस्से उसे तुम याद रहो| बुके , टेडी, चॉकोलेट्स पता नही उसे कितने आयेंगे| "
आता याला काय सांगू आजच्या मुलींच्या व्यथा! अनेक पोरं असणार तुझ्यामागं असं समजून बरेच वीर रिस्कच घेत नाहीत. कष्ट आणी रिस्क घ्यायलाच नको आजच्या पोरांना. क्या बताये, क्या बताये!
बिंगो! मी स्वतःशीच बोलत असताना मला सापडलं होतं उत्तर. मी याच्या बावळट किडिश अॅक्ट नंतर पण याला का कन्सिडर केलं त्याचं.
ही डेअर्ड! ही टुक द रिस्क! अॅन्ड आय सीम टु लाईक दॅट.
हुश्श! म्हणजे डेस्परेशन हा फॅक्टर नव्हता तर! म्हणजे असला तरी तो मेन फॅक्टर नव्हता :प
आणि म्हणूनच पलिकडच्या बे मधून स्टेअर करणारा तो कूल ,गीकी, उंच मुलगा, दुसर्या युनिटमधला तो फक्त लीडर्स लेसन्सना भेटणारा आणि नेहमी माझ्या मागच्या रोमधे बसून अधून मधून माझ्याशी बोलायचा प्रयत्न करणारा मसलगाय वगैरे मला इंटरेस्टिंग वाटले नाहीत कधी.
मी आनंदाने जवळजवळ ऐकू जाईल इतका मोठा सुस्कारा सोडला. माझ्या खिजगणतीत नसले तरी असे लोक आहेत की. आणि मल आवडत नसले तरी त्यांच्या फॅन्स पण आहेत. म्हणजे अगदी काही होणारच नाहीय माझं , माझ्यातच काहीतरी लोचा आहे वगैरे पीएमएस स्पेशल विचारांनी माझ्या डेटींग कॉन्फिडन्सची जी वाट लावलेली , तो जरा गोंजारला गेला.
" क्या हुआ? क्या सोच रही हो?"
" काही नाही. " मी हसले. तो पण हसला. काहीच महत्वाचं बोलणं नसताना.
" तुम यहींकी हो ना?" म्हणजे? मी लॉस्ट दिसतेय की काय?
" हो आता तुझ्या सारख्या कूल डूडबरोबर आलेय म्हणजे इथंच असणार की " उग्गच किडे करायची सवय.
तो खूप जोरात हसला. खळाळतं , हळूहळू विरत जाणारं हास्य. ट्रेलिंग लाफ्टर.
मी जराशी एंबरॅस झाले. पण त्यानं माझ्या डोळ्यात पाहिलं आणि बस्स!
जराशानं तो म्हणाला,
" तसं नाही, तू मूळ महाराष्ट्राचीच ना? " मी मान हलवली. मग परत शांतता. आमच्या बोलण्यात असे खूप पॉजेस होते. आणि
ते ऑकवर्ड नव्हते. मी बर्यापैकी बडबड करते नाहीतर.
अक्की मला स्पॅरो म्हणतो. म्हणजे त्याला एक रेफरन्स आहे. आमचं फ्रेशर्स ट्रेनिंग संपल्यावर आम्ही सगळी बॅच एका वीकेंडला वाईला गेलेलो. तिथल्या रिसॉर्टवर एक सुंदर, रंगीत चिमणी होती पिंजर्यात. सगळे तिच्याशी खेळत होते. फार गोड होती ती. आणि तिची चिवचिव तर खूपच मधुर. पण थोड्या वेळाने लक्षात आलं की ताई फारच बोलतात, थांबतच नाहीत. अर्थात तरी सगळे तिच्या जवळ जाऊन तिच्याशी बोलत होते.
मग परत आल्यावर एकदा आम्ही खूप कल्ला करत होतो आणि मी काहीतरी कॉन्स्तंट बोलत होते, तेंव्हापासून.
पण आज अंकित आणि मी अधून मधून बोलत होतो. मधले पॉजेस रेलिश करत, पुढचा पॉज येईपर्यंत त्यांची चव तशीच रेंगाळत ठेवत, आणि अधल्या मधल्या बोलण्यात ती ब्लेंड करत.
" आणि तू ? तू नॉर्थचा आहेस ना?" मी विचारलं.
" हो. पण नॉर्थ खूप मोठा आहे की. मी दिल्लीचा नाहीय हां . "
" हो मला माहितीय."
" तुला माहीतीय? कसं काय?"
अं? अरे हो. मी काढलेला निष्कर्ष होता हा फक्त.
" माहीतिय म्हणजे कळतं की ते. दिल्लीची मुलं जरा वेगळी असतात ना."
" ओह अच्छा, तुम बडा जानती हो इतना सब| " तो म्हणाला. नो स्माईल .
मी एकदम गप्प झाले.
" दिल्लीचे लोक आवडत नाहीत ना इकडच्या लोकांना" तो एकदम म्हणाला.
" मला नाहीत आवडत ." मी म्हणाले.
" का ? काय खास अनुभव?" परत शांतपणे आणि गंभीरपणे.
" अनुभव म्हणजे कॉलेजात होती की बरीच . एकूण उथळ आणि मजा करायच्या फारच क्लिशेड कल्पना असतात त्यांच्या. आणि मुलींबद्दलचे विचार तर विचारायलाच नको. "
"हं. पण असं जनरलाइझ करू नये"
" ह्म्म्म. ओके" पॉज.
" मी पण त्या भागातलाच आहे. " तो हसत म्हणाला. " बघ विचार कर. " मी परत गप्प. पहिल्या डेटला इतका लगेच आयुष्याचा विचार करणार आहे का मी? तू छान आहेस, मला तुझ्याबरोबर यावं वाटलं, यावं असा विश्वास दिलास एवढं बास की सध्या. तरी गप्प बसणं थोडं धोक्याचं होतं. त्याचा अर्थ मी आता खरंच विचार करायला बसलेय असा होऊ शकतो.
" कहांके हो तुम?"
" मैं कुमाऊनी हूं| कुमाउं जानती हो?"
" हो. नैनिताल वगैरे ना?"
" हां. नैनिताल के पासही है मेरा गांव| हरे पहाडोंके बीच | " डोळ्यात लगेच हिरवा हिमालय.
" नॉर्थ का नही हूं बस| पहाडी लडका हूं मैं|"
"अच्छा. कैसा है तुम्हारा घर? आय मीन मी कधीच नाही गेलीय त्या भागात. कसं आहे तिथलं कल्चर?"
" मेरा घर तो.. बघ माझ्या घरात माई , बाबा आणि भय्या रहातात. मी सगळ्यात लहान. दोन मोठ्या बहिणींची लग्नं झालीयेत. त्या जवळच्याच गावांमधे आहेत. म्हणजे मी तिकडं गेलो की भय्याची बाई़क घेऊन दोघींच्या सासरी जाऊन येतो.
एकीला दोन मुलं आहेत. दुसरीला एक. " मग पुन्हा एक पॉज.
" बोलो ना. काय नावं आहेत तुझ्या भाच्यांची?" तो मला एकदम वळणावळणांच्या रस्त्यांवरून बाईक वरून जाताना दिसला. ऑलमोस्ट गाणं पण म्हणत होता तो.
आप्ल्या कल्पनाशकक्तीला आणि स्वप्नांना मुविजनि केवढा आधार दिलाय.
" बाबा और भय्या घर फिरसे बना रहे है| रिनोवेशन| मुझे अच्छा नही लग रहा| "
" का?"
" जिस घर मे मेरा बचपन गया वो गुम हो रहा है धीरेधीरे| बदल रहा है| "
काय बोलावं ते न सुचुन मी त्याच्याकडं पाहिलं.
" देखो, तुम भी तो बचपन के नही रहे ना| सोच लो जैसे तुम वैसे तुम्हारा घर भी तुम्हारे साथ बदलने लगा, बडा हुआ| "
तो एकदम गोड हसला. लहानपणचं.
" तुम जानती हो रसा, तुमसे पहले कभी बात किये बिना मै यहां तक कैसे आया?" " आय मीन तुम डरो मत, यहां तक मतलब जहां भी अभी हम है| "
" कैसे?"
" तू खूप सेन्सिबल वाटतेस. शहाणी मुलगी वाटतेस तू. म्हणजे इनोसंट आणि सेन्सिबल दोन्ही. "
मी एकदम शांत. त्याक्षणी आणि त्याच्या पुढचा तो काही क्षणांचा पॉज मला काय वाटलं ते मला कधीच सांगता येणार नाही. आणि मी ते कधीच विसरणार नाही.
मग तो एकदम म्हणाला,
" मैं सॉर्टेड हूं रसा| आम्ही साधे मिडल क्लास लोक आहोत. पण मी हुषार आहे हे पाहिल्यावर बाबांनी मला लांबच्या पण चांगल्या शाळेत घातलं. चांगल्या कॉलेजला पाठवलं. दिदी, भय्या सब तो हमारे गांवमेंही पढे है| माझ्यासाठी विचारपूर्वक प्लॅनिंग केलं माई बाबानी."
मला हे ऐकायला खूप आवडत होतं.
पण पहिल्या आणि दुसर्या गोष्टीची लिंक लागेना. कदाचित भावनेच्या भरात बोलत असेल. मी फक्त ऐकत राहिले.
" तो मुद्दा ये है, कि, मी असा मुलगी आवडली म्हणून तिला आता फिरवावं असा इतका उथळ विचार करू शकत नाही. ज्या माझ्या आयुष्यासाठी कुणीतरी दुसर्याने इतका विचार केला असेल, तर माझी स्वतःची जबाबदारी वाढते कि नाही."
"हो." ऐकणं कन्टिन्युड!
" तू? तुझं कसं आहे घर?"
पहिल्या डेटलाच आणि सुरुवातीलाच एकदम फॅमिली वगैरे बद्दल बोलणं जरा फनी आहे ना!
मी त्याला तसं म्हणाले तर तो म्हणाला,
" तो क्या बात करे? फ्रँकली आफ्टर कॉलेज मैं फर्स्टटाईम ऐसे किसी लडकीके साथ बाहर आया हू| तुम्हे एक्स्पिरियन्स लगता है, तुम बताओ क्या बात करे?"
शिट! मी हर्ट केलं का याला?
" नाही नाही. ऐक ना! मला खूप आवडलं इन फॅक्ट तू बोलत होतास ते. मी असंच म्हणाले रे."
मी एकदम हळू आवाजात म्हणाले.
" इट्स ओके. काही खायचंय तुला? पेस्ट्री? ब्राउनी?" त्यानं वेटरला बोलावलं
"एक ब्राउनी विथ आईसक्रीम."
" माझ्या घरात आई बाबा आणि मी. पण मी लाडावलेली नाहीय हां. आई बाबांनी लाडात आणि धाकात वाढवलंय मला. "
तो हसला. " ते पाहिजेच की थोडं. मी तर खूप मार खाल्लाय लहानपणी. पण लाड पण खूप. सगळ्यात लहान ना. मी गेलो की
सगळं माझ्या मनासारखं होतं. तुला घरी काय म्हणतात?"
" रसाच." मी खोटं बोलले. म्हणजे तसं बाहेरच्यांसमोर रसाच म्हणतात. पण आमच्या तिघात असताना आई रस्किन म्हणते आणि बाबा रसुल्याससुल्या म्हणतात हे मी पहिल्या डेटला...
" मला टिक्कु म्हणतात." त्यानं स्माइल केलं.
अय्यो! टिकोजीराव म्हणणार मी याला.
तेवढ्यात ब्राऊनी विथ आइसक्रीम आलं. मला खूप आवडतं हे मी न सांगितल्यामुळं एक बावळटपणा कमी झाला.
त्याने हात लावला नाही. दुसरा चमचा असून.
" खा ना" मी वाट न बघता एक स्पून लपकला. मग बोलतबोलत दुसरा. तिसरा. मग लक्षात येऊन त्याला म्हणाले की तू पण टेस्ट कर ना.
" उं हुं चॉकोलेट आणि आईस्क्रीम दोन्ही फार आवडत नाहीत मला. आणि मी थोडं वेट वॉचिंग पण करतोय" माझ्या तोंडाचा आ झाला. अगदी कळेइतपत.
" कशासाठी? तुला काय गरज आहे?" नकळत मी म्हणाले.
" डान्स साठी एनर्जी बरीच लागते. कार्डिओच आहे तो. आणि फिट असलेलं आवडतं मला."
मला छान वाटलं हे ऐकून. फिट्नेस फ्रीक्स कधीही फिटनेस बद्दल बोलताना स्वतःच्याही नकळत थोडे प्रवचनकार टाईप बोलायला लागतात. मी म्हणजे.. असं करावं टाईप. तसं केलं की समोरचा जर त्या कॅटेगरीतला नसेल तर थोडा कानकोंडा होतो आणि हां हां बरं बरं. मस्तच की वगैरे हसून साजरं करतो.
अंकितने एकूणच चिंता करतो विश्वाची टाइप सुरू न होता त्याने फक्त स्वतःला हे उद्योग का करू वाटतात ते सांगितलं.
" मी नाही बाबा असलं काही करत. उद्या समजा माझं चवीचं सेन्सेशन गेलं किंवा मीच ऑफ झाले तर राहूनच जाईल कीनाइ हे सगळं" तो हसला. तो हसला की त्याच्या डाव्या जॉ लाईन जवळ एक हलकी रेषा दिसते आणि त्यामुळं सगळाच प्रकार अजूनच कातिल होऊन बसतो हे माझ्या लक्षात आलं.
" तुला काही गरज नाहीय. छान आहेस अशीच. मुली एकदम त्या झिरो साइझ मॅडनेस मागे लागतात. खरं तर तब्येत, एनर्जी आणि नाही म्हटलं तरी लुक्स सगळ्यावर ते अफेक्ट करतं. मुली फार प्रेशर घेतात वजनाचं. " श्या! आता त्याच्या बोलण्याकडचं माझं लक्ष धूसर होतंय. उठून त्याची उब जाणवेल इतकं जवळ बसावं, त्याच्या केसातून हात फिरवावा असले आचरट विचार डोक्यात यायला लागले. शिट! बास! अस लं काहीतरी न रहावून पहिल्याच डेटला करण्यापेक्षा इथनं निघालेलं बरं. मला हसू यायला लागलं.
"उशीर झालाय तुला रसा?" त्याने विचारलं. मी थोडी शॉक मधे गेले.
" तू जरा लॉस्ट दिस्तीयेस म्हणून विचारलं" तो म्हणाला. खरं सांगितलं असतं तर हे भाऊच लॉस्ट झाले असते. म्हणून मग मी म्हणाले.
" हो. अॅक्च्युअली शिबानीला सांगितलं नाहीय मी. ती वाट बघत असेल."
जाताना जास्त कसोटी होती. आधीच माझ्या मनात पाप! त्यात हा डस्की मदन माझ्याजवळ बाईकवर बसणार. माझ्या हातून चुकून काही घडलं तर ? अय्यो देवा! त्या ब्राऊनी किंवा आईसक्रीमात काही मिसळलेलं तर नव्हतं ना! हा तर कूल दिसतोय. मीच अशी का? जाऊ दे. गबसावं घरी पोचेपर्यंत.
पुन्हा एकदा ते मला फूटपाथवर उभं रहायला सांगून बाईक टिल्ट करण्याचा मोह पाडणारा , नव्हे, मोह होताच. तो वाढवणारा प्रकार
केला त्याने. मी मनावर ताबा ठेवत बसले मागं. आता त्याची ऊब मला जाणवत होती जास्तच. मनात तो विचार आला म्हणून की आता रात्र थोडी चिलि झाली होती, रस्ते येतानापेक्षा जास्त रिकामे झाले होते म्हणून. कोण जाणे!
आता त्याला मागून मिठी न मारता सावरत बसणं हा जाच वाटायला लागला. सोपं होतं ते त्याला हातांचा विळखा घालून बसणं. त्याच्या मानेचा स्पर्श माझ्या हनुवटीला आणि माझ्या श्वासांचा त्याच्या कानांना स्पर्श होणं हे सगळ्यात सहज होतं. असं न होऊ देणं हे प्रयासाचं आणि कृत्रिम होतं. पण संस्कार म्हणजे नैसर्गिक नसणं. त्याला मानवी विचारांचा मुलामा देणं. असले विचार आत्तापर्यंत एखाद्या स्पेसिफिक मुलाबद्दल न येणं याला कारण नकळत ते संस्कार असावेत. आणि आता येणं ही या आकर्षणाची संस्कारांवर मात असावी. माझ्या हृदयाची धडधड त्याला ऐकू जाऊ नये यासाठी मी देवाची प्रार्थना करत होते. लक्ष वळवण्याकरता त्याचं मगासचं बोलणं आठवत होते. " तू शहाणी आणि समजूतदार वाटतेस " हे आठवून मी हळूहळू शांत झाले. पाण्यवरचे तरंग विरत जावेत तशी. तरीही आधी हसू, मग आवेग आणि मग त्याचं ओसरणं हे सगळं फार ओवरवेल्मिंग होतं. नवीन होतं. हे परत होणार नाही याची कसलीच खात्री नव्हती. कधी परत ते फीलींग्ज उफाळून येतील याचीही नव्हती. एखाद्या स्ट्राँग इन्फेक्शन सारखी.
क्लासची बिल्डिंग आली. तो पार्कींग मधे माझ्या अॅक्टिवा जवळ थांबला. काही न बोलता मी माझी बाईक चालू केली.
तो माझ्याबरोबर घराच्या पार्किंगपर्यंत आला. गाडी पार्क करून मी त्याच्या जवळ आले. त्याने त्याची बाईक पार्क केली होती.
" मी येतो वर. डोंट वरी लिफ्ट बाहेर नाही येणार. "
लिफ्टमधे शिरताच तो म्हणाला,
"थँक्स रसा. तू इतका विश्वास टाकून माझ्याबरोबर आलीस हे खूप आहे माझ्यासाठी. आणि उगच म्हणायचं म्हणून नाही म्हणत आहे मी, पण तू जशी असावीस असं मी प्रे करत होतो त्यापेक्षा छान आहेस तू. खूप गोड. आय विल नेवर हर्ट यु."
लिफ्ट थांबली. मी त्याच्याकडं पाहीलं. तो कोपर्यात थोडा झुकून उभा होता. तिथूनच त्यानं एक अमेझिंग स्माईल केलं.
" बाय. "
" बाय. मी बाहेर आले आणि लिफ्ट बंद झाली.
उफ्फ! गुलाबी भूल संपली असली तरी असर कायम था|
ते जे काही तिथं झालं शेवटचे काही क्षण ते काय होतं? इतकं स्ट्राँग, इतकं इंटेन्स? हे असं होतं? असा विचारांवरचा ताबा बघता बघता सुटू शकतो? आपण एखाद्या प्रकारे वागू शकणारच नाही हा कॉन्फिडन्स सध्या तरी संपला होता. एखादा माणूस आपल्या स्वभावाहून फार वेगळंच काहीतरी वागायला लावू शकतो या विचाराची मला भिती वाटायला लागली.
लॅच उघडून मी आत शिरले. शिबानी वाट बघत होती.
" कुठं होतीस गं हिरॉइन? मला जाम भूक लागलेली. मी जेवले. " ती म्हणाली.
" इट्स ओके. मी खाऊन आलेय. भूक नाहीय. आणि खूप डान्समुळं मी दमलेय" मी म्हणाले आणि माझ्या खोलीत गेले.
शिबानीला सगळं सांगायचं हा नियम पण आत्तापुरता तरी मोडला होता.
खोलीचं दार बंद करताच माझं एकटीचं विश्व माझ्याभोवती विजिबल झालं.
आणि एक गोष्ट अचानक चमकली माझ्या मनात, याच्यामुळं मनात जे इंटेन्स फीलींग्ज आले ते निवले पण त्याच्याचमुळं. त्याचंच आश्वासक बोलणं आठवून.
या सावळ्या मुलात काहीतरी होतं शुभ्र, स्तब्ध आणि शाश्वत!
बेडवर आडवी झाले आणि जाणवलं की फार उशीर झाला नव्हता खरं तर. इतक्या लौकर आम्ही झोपत नाही. मी आणि शिबानी बरेचदा गप्पा मारतो बाल्कनीत बसून किंवा एकमेकींच्या रूममधे किंवा हॉलमधे आपापल्या लॅपटॉपस वर काम करत बसतो किंवा एखादी सिरिज एखादा मुवी मोबाईलवर बघत लोळतो निवांत.
पण आज माझं मला एकटं रहायचं होतं. असर उतरेपर्यंत कुणाशीही काहीही बोलताना उगंच टेम्पररी इंटेन्सिटीने डीटेल्स दिले जातील असं पण वाटत होतं. अंकितबरोबर अनुभवलेलं पण शिबानी बरोबर नुस्तं बोलून शेयर न करण्या सारखं काहीतरी होतं हे. असं कसं होतं?
खरं तर हे कुणाशीच, अगदी अंकितशी पण मी हे बोलून शेयर करू शकले नसते. पण अनुभवलं होतंच. आणि मग हळू हळू जाणवलं की त्यालाही थोडं फार कळलं असणार होतं. नुसतं थोडं फार नव्हे तर बरंच.
नाहीतर परतीची राईड, क्लासचं पार्कींग इथवर तो , मी , ते एक छोटंसं विश्व आणि त्यातलं अदृष्य पण फक्त आम्हा दोघांनाच जाणवणारं वातावरण हे सगळं फील करत काही न बोलता सगळं उमजल्यासारखं आलो नसतो. माय गॉड!
माझ्याच मनात चाललं होतं त्यामुळं मला कळत होतं. पण त्यानेही काय झालं, गप्प का आहेस असलं काही विचारलं नव्हतं किंवा इतर काही बोलायचा प्रयत्न पण केला नव्हता. याचे दोनच अर्थ होते. त्याच्या मनात पण काहीतरी चालू होतं किंवा माझ्या मनात काय चाललंय ते त्याला कळत होतं.
शिट! मी उठून बसले.
इतका का स्ट्रेस घेतेय मी या गोष्टीचा? त्याच्या मनात माझ्याबद्दल काहीतरी डेवलप झालं तेंव्हा मला या गोष्टीची कल्पना पण नव्हती. ही इज अहेड ऑफ मी इन धिस. मग उगंच त्याला ओवर्टेक करून फिनिश लाईन पर्यंत आधी पोचायचा अट्टाहास कशाला? येस. ओके. रसा, काम डाऊन.
ही फेज एंजॉय करायची आहे. अजून कशात काही नाही. पहिल्यांदा गेली आहेस तू त्याच्याबरोबर एका कॅज्युअल डेटला. ही इज हॉट अँड हँडसम. आणि त्याला तू आवडतेस. तुला माहीति होण्याच्या आधीपासून. तुला तो छान वाटलाय त्यामुळं तू ते विसरतेयस.
मला जरा छान वाटलं आता. मी पुन्हा आडवी झाले. त्याला आठवत.
त्याचं जवळ असणं, स्वतःबद्दल बोलताना अजिबात स्टाईल न मारणं, आणि तरी पण बोलत नसताना माझ्याकडं पाहिलं की नकळत केसावरून हात फिरवून नजर वळवणं. ते तर फार फनिली क्यूट होतं. वेट वॉचिंग आणि डान्समुळं हातावर असणारे, शर्टमधून जाणवणारे कट्स. उफ्फ!
आता लक्षात येतंय ते बरंय. मगाशी त्याच्याबरोबर हे आठवलं असतं तर त्या टर्न ऑन होऊन शुद्ध हरपणार्या पूर्वीच्या राजकन्यांन्सरखी परिस्थिती झाली अस्ती. पुन्हा हसू यायला लागलं मला. हे मला शिबानीशी शेयर करायचं पण आहे आणि नाही पण.
इतक्यात दार नॉक झालं.
" लेडी, ओपन द डोर, इफ यु आर डिसेण्ट ऑर नॉट फँटसायझिंग अबाऊट समवन. " हा आमचा रात्री दार वाजवण्या आधीचा डायलॉग ऐकून मला जाम हसू आलं.
मी दार उघडलं.
" अॅक्च्युअली आय वॉज.. " मी डोळे फिरवत म्हटलं.
" ठीके की . मी काय रहायला आलेय का? गेले की कंटिन्यु कर. जॉन , खाल सब अपनेही है " ती म्हणाली.
" लोल. बोल बोल. मी बेडवर परत लोळत म्हणाले.
" बरीयेस ना? आलीस आणि फार बोलली नाहीस म्हणून आले इन्स्पेक्शन ला."
" हो गं. आज झोप येतेय खूप. "
तरी तिनं कायतरी ऑफिसची जंक बडबड केली पंधरा मिनिटं. आणि मग " बरं आज झोप तू. उद्या बोलू " म्हणत गेली.
मी पुन्हा स्वप्ननगरीत प्रवेश करणार इतक्यात फोनवर बीप आला. अक्कीसाठी ठेवलेला वॉट्सॅप मेसेज टोन. मी मेसेज न उघडता फक्त नोटी फिकेशन विंडो स्क्रोल डाऊन केली.
" जागी आहेस का? कॉल करू का ?"
मी उत्तर न देता फोन लॉक केला आणि परत विचारात.
अरे याने घरी पोचल्यावर मेसेज करायला हवा होता ना. आपण करतो की जनरली असं. कुणाला ड्रॉप केलं की.
हं.. आम्ही नंबर एक्सचेंज केलेच नव्हते अजून. वाव! आता दोन दिवसांनी क्लास होता.
क्लासमधे तो एकदा माझ्यासमोर आला फक्त. " कशी आहेस?" वगैरे बेसिक बोलणं झालं.
क्लास संपेपर्यंत काही घडलं नाही. मी तंद्रीत पार्कींग पर्यंत आले तरी नाही. गुड! थोडं जमिनीवर यायला हवंच होतं सगळं.
कदाचित, त्याला मी फार आवडले नसेन त्या दिवशी. म्हणून तो गप्प होता येताना. आणि मी काय काय विचार करत होते!
साधा फोन नंबर पण मागितला नाही त्याने. पुन्हा भेटण्याबद्दल काही बोलणं पण नाही. सो बी ईट! एवढंच होतं हे. इट्स ओवर.
इट वॉज ब्युटिफुल अँड इट्स ओवर. नो, इट वॉज हँडसम बट इट्स ओवर नाउ.
मागून हाक ऐकू आली. मी वळले. तर माझ्या ऑफिस ग्रूपमधला मुलगा.
"आहेस कुठं? दोनदा तुझ्यासमोर आलो क्लासमधे पण तू कुठंतरी हरवलेली. ओके ना सगळं? "
" हो रे. जस्ट थोडं टायरींग झालंय आज ."
" अगं आज सगळे मिळून कॅफेत जाऊ असं ठरत होतं. येतीयेस ना तू? "
" अरे हो मला रुची म्हणालेली. मी विसरले."
" हं. थांब ना. सगळे खालीच येतायत."
मी अजून निर्णय न घेतलेल्या अवस्थेत. इच्छा नवती. घरी जावं आणि शिबानीसाठी तिची आवडती कॉफी बनवावी आणि निवांत बाल्कनीत बसावं फार काही न बोलता असं वाटत होतं.
इतक्यात बाकी पब्लिक पण आलं.
"चल ना रसा , खूप दिवस झाले आपण गेलो नाहीय कॅफेत. " सोहेल म्हणाला.
" मैने तुझे क्लास से पह्ले ही बोला था " रुची.
"बरं चला ." एकतर नाही म्हणायला फार कारण नव्हतं. कॅफे जवळ होता आणि आमचा नेहमीचा अड्डा होता. आम्ही अधूनमधून तिथं जायचो संध्याकाळी.
जाऊन थोडा वेळ टिपी करून आम्ही परत निघालो. पार्किंग मधे बाईक लावली आणि एकदम समोर कुणीतरी आहे हे पाहून इतकी जोरात दचकले. अंकित!
" क्या कर रहे हो तुम यहां ?"
" तुम्हारा इंतजार! " तो फिल्मी स्टाईल मधे म्हणाला.
" कुठं होतीस? तिथं क्लासपाशी तुला ऑकवर्ड झालं असतं म्हणून मी इथं येऊन थांबलो तर तू येईचनास. "
" व्हॉट! तू दीड तास इथंच होतास? "
" मग काय करू? खरं तर इथं माझा एक मित्र रहातो शेजारच्या विंगमधे. पण मी गेलो आणि तू आलीस तर? म्हणून नाही गेलो. "
आत्ता काय वाटत होतं मला? माहिती नाही. रजिस्टरच झालं नव्हतं अजून.
" कशी आहेस?" तो म्हणाला.
" सांगितलं की क्लासमधे." मी स्माईल केलं.
" रसा , फ्रँकली मला तुझ्याबरोबर थोडा टाईम स्पेंड करावासा वाटत होता. आता उशीर झालाय नाहीतर तुला आत्ता येतेस का विचारलं असतं. "
"हं. उशीर झालाय खरा" मी म्हणाले.
" उद्या भेटू या?"
उं. परवा तर भेटलो होतो. लगेच उद्या? माझं मन आतून हो म्हणत होतं पण आत स्ट्रगल चालू होताच.
" उद्या मी आणि शिबानी मुवीला जातोय."
" परवा?"
" परवा आमचा एक कॉल आहे कस्टमर बरोबर. ऑफिसात उशीर होईल."
मी खोटं का बोलतेय?
म्हणजे मुवीला मी जाऊ शकत होते उद्या. पण तसं आत्तापर्यंत ठरलेलं नव्हतं.
आणि कस्टमर कॉल मधे मी अगदीच ऑप्शनल होते. जनरली तो कॉल बॉसेस च जॉईन करतात. आम्हाला एन्करेज करतात जॉईन करायला. म्हणजे चर्चा ऐका आणि शिका म्हणून. पण बोलायचं नसतं काही आम्हाला. शिवाय दुसर्या दिवशी टीम मीटींगमधे सगळं सांगतातच.
" ओके रसा, टेल मी समथींग, तू मला टाळतेयस? तसं असेल तर सांग सरळ की मला नाही यायचंय परत तुझ्याबरोबर. "
" असं नाहीय. " मी मान खाली घालून पुटपुटले.
" नक्की?" तो म्हणाला. मी वर पाहिलं आणि माझी नजर थेट समोर फक्त माझ्यासाठीच उघड्या असलेल्या त्याच्या डोळ्यांच्या दारातून सरळ आत पोचली. स्पाईन मधून एक स्मॉल साईझ वीज सळसळली.
" हो. म्हणजे.. नेक्स्ट वीक जाऊ या? "
" चालेल. " तो म्हणाला.
" जातो मी. सी यु नेक्स्ट वीक. "
अरे!
" अंकित! "
" बोल ना. " तो वळला.
नेक्स्ट वीक कधी? असं विचारायचं होतं पण कसं? आणि फोन नंबर मी कसा मागणार?
" नथिंग. भेटू या. " मी म्हणाले.
" ओह येस. स्टे वेल! " तो गेला.
श्या! असा कसा हा?
पुढच्या क्लासला काहीच घडलं नाही. समोर आल्यावर फक्त बेसिक बोलणं झालं. आणि हो, " गोड दिसते आहेस आज" इतकं बोलला तो. पण मग पार्किंग मधे घराजवळ कुठेच मागमूस नाही.
त्याच्या पुढच्या क्लासला मीच त्याला विचारलं, " उद्या भेटायचं?"
" कल मैं बिझी हुं| परसों ? "
" चालेल. "
डिड आय साऊंड डेस्परेट? हा सीसॉ का चाललाय? हे असायला हवं तितकं स्मूद का नाहीये? एनिवे, वॉट आर यु गोइंग टू वेयर
मिस रसा?
परसों उजाडला. आज क्लास नव्हता. मी ऑफिसातून घरी येऊन तयार होऊन अंकितने सांगितलेल्या वेळी खाली गेले. तो आलेला होताच.
" जस्ट आलास?"
" नाही. पंधरा मिनिटं झाली. "
" अॅम सो सॉरी. तू लौकर पोचणार हे सांगितलं असतंस तर मी लौकर आले असते. पण तू कसा सांगणार? तुझ्याकडे माझा नंबर नाहीय ना."
" माझ्याकडे आहे तुझा नंबर. आणि मी ठरवून लौकर आलो. "
" वेट वेट. तुझ्याकडे माझा नंबर आहे? पण माझ्याकडे नाहीय तुझा नंबर."
" तुला हवा तेंव्हा सांग ना. मी देतो. "
" वाव! नंबर होता तर मेसेज का नाही केलास कधी?"
" कधी करायला हवा होता?" स्माईल करत तो म्हणाला.
" अरे जेंव्हा आपण पहिल्यांदा बाहेर गेलो त्यानंतर. म्हणजे तुला वाटलं नाही मेसेज करावा असं?"
" वाटलं ना. पण मी तुझा नंबर तुझ्याकडून नव्हता घेतला ना. आपण नंबर एक्सचेंज नव्हते केले. म्हणून. "
" हं"
"बसतेस? पोचलो की देतो माझा नंबर तुला"
मी मागे बसत असताना तो हळू आवाजात म्हणाला ,
" आय डिडंट वाँट टु फ्रीक यु आऊट बाय पॅनिक टेक्स्टींंग. मला घाई पण नाहीय रसा. हे शॉर्टलिव्ड नाहीय माझ्यासाठी. ये एक ऐसे मिलनेका दौर. इसे एंजॉय करते है|"
"हम्म्म. लौकर का आलास?"
"इट इजंट राईट टु मेक अ लेडी वेट. "
कूल. नाहीतर आमचे टीममेटस आणि मित्रमैत्रीणी. बहुतेकदा मीच वेळेवर पोचते. आणि अर्थातच एकटीच पोचलेली असते.
हे असं कुणीतरी पिक करणं , वाट पहायला न लावणं रादर कुणीतरी वाट पहात असणं हे मस्त होतं. अक्की पण यायचा मला घेऊन जायला. पण ते फार कॅज्युअल होतं. तो पण उशीर करायचा नाहीच पण हे असं ठरवून लौकर पोचणं नाही. आम्हाला दोघांना वेळेबद्दल ओसीडी होता. त्यामुळेच.
बाकी गृपमधल्या दोन तीन जणानी काही वेळा असं पिक अप ड्रॉप केलं होतं पण त्यानंतर अगदी सटल बदल जाणवायचे त्यांच्यात की मी कायम टाळलं अक्की सोडून कुणाबरोबर जाणं.
आम्ही एका स्टारबक्स पाशी पोचलो.
" स्टारबक्स?" मी न रहावून म्हणाले.
" हो सॉरी आज इथेच बसू या. म्हणजे बोलता येईल. प्लीज "
" हो रे. चालेल. " मी हसून म्हणाले.
आज आम्ही जास्त बोललो. हेच करियर ऑप्शन्स का निवडले, पुढं काय करायचंय वगैरे.
पुन्हा त्या आकर्षणाच्या लाटा आल्या आणि गेल्या. किती ड्रीमी आहे हे सगळं. चांगलं काहीतरी घडत असेल तर किती पटकन घडायला लागतं.
बाळाच्या पहिल्या पावलासारखे क्षण टेक्नॉलॉजीने कायम कैद करून ठेवावेत वगैरे आयडियल इच्छाना पिल्लं कशी सुरुंग लावतात तसे हे रोज गोल्ड क्षण. स्लो मोशन फक्त मुविज मधे. प्रत्यक्षात घडताना आपण आनंदाने फ्रीझ झालेले असतो बहुतेक किंवा कुठल्या तरी तिसर्याच अत्यंत नॉन इस्श्यु मधे बुडलेले असतो. तेंव्हा काही समजतं, काही त्यावेळी रजिस्टर न होता पास होत रहातं. मग सगळं झाल्यावर मेंदूला नॉर्मल क्वांटीटि मधे ऑक्सिजन पोचण्याइतके आपण नॉर्मल झालो की जाणवतं सगळं. त्यातला ऑसमनेस, युनिकनेस, खूप खास असणं.
तर महत्वाच्या मॅच्युअर गप्पांमधे आयुष्यातली महत्वाची माणसं आली आणि गेली, अचीवमेंटस हाय करून गेल्या, काही न आवडलेले
विसरावेसे वाटणारे प्रसंग येऊन "येतोच परत थोड्या दिवसांनी" असं न मागितलेलं आश्वासन देऊन गेले.
पुढची डेट तर क्लासच्या पार्किंगमधेच झाली. आपाप्ल्या रथांवर बसून गप्पा मारत राहिलो आम्ही. गप्पा तरी किती विस्कळित!
किती रँडम सीक्वेन्स मधे. ऑलमोस्ट अॅज अॅबसर्ड अॅज लाईफ.
ऊंचे पेडोकी कतारे, आंब्याची फळं लगडून जमिनीला नाक लावणारी , बुटकी वाटणारी झाडं, नानीके आंगन मे रखी खटीयापे गुजरी गरमीयोकी राते, आजोबांची बैठक, चाचा के पेहलवानीका अखाडा, सुंदर हस्ताक्षरासाठी मिळालेलं आयुष्यातलं पहिलं पेन, सेवन्थ में जब पहली बार क्लास में फर्स्ट आया तब बुआने दिया हुआ पह्ला वॉच, माझं मुलांशी खूप कंफर्टेबल नसणं, लाईफ में फर्स्ट टाईम पसंद आयी हुई स्कूलकी लडकी असं खूप काय काय!
आम्हालाच फक्त त्यातला कॉमन थ्रेड माहीती होता.
मग त्यानंतर एकदा उशीर झालेला तर आमच्या सोसायटीच्या गार्डनमधल्या बेंचवर बसून गप्पा.
दिवस भराभर उडून जात होते. आणि माझा गिल्ट वाढत होता. ही इतकी महत्वाची गोष्ट माझ्या आयुष्यात चाललेली आणि शिबानी आणि अक्कीला अजून मी काही सांगितलंच नव्हतं. का? डोंट नो. माझी मलाच खात्री नव्हती का अजून ? अशी तर मी किती अट्रॅक्ट झाले होते त्याच्याकडे. आधी कुणाला सांगू? मला यांचे अप्रुवल्स हवेत का? मी इतकी वीक आहे का? वॉट अॅम आय इवन थिंकिंग?
इतक्यात माझा वाढदिवस आला. आता मॅनेज करणं मुश्किल आहे. मित्रमैत्रीणी काहीतरी प्लॅन करणार आणि अंकित पण.
आदल्या दिवशी मी शिबानीला म्हटलं, " मला तुला काहीतरी सांगायचंय."
"प्रेमात पडलीस की काय?"
" हाऊ डु यू नो शिबानी?" मी सॉलिड दचकले. गम्मत म्हणजे ती पण दचकली.
" सगळ्यात अनलाईकली पॉसिबिलिटी म्हणन खरं तर चिडवत होते तुला. तर खरंच निघालं. नाव सांग पटकन आणि सगळंच सांग खरं तर "
" आता सगळ्यात अनलाइकली माणसाचं नाव गेस कर बरं मग."
" तुझा बॉस. "
" ई ई ई. काहीही "
" अक्की"
" माय फुट"
" खरं सांगू? सगळ्यात लाईकली पॉसिबिलिटी? " ताई फुल मुडमधे होत्या.
" सांगा"
" तो येडपट गाडीला फुलं लावणारा, पोनिटेल डुड. " ती हसायला लागली.
मी स्तब्ध.
" थर्ड गेस हॅज टु बी राईट." तिला सगळी मज्जाच वाटत होती बहुतेक.
" यु आर राईट शिबानी . कसं कळलं तुला ? " मी एकेक शब्द सावकाशिने उच्चारत म्हणाले.
आता ती स्टन्ड.
" आर यु सिरियस रसा? का आता तूच लेग पुल करतेयस माझे?"
" नाही ग. खरंच. म्हणजे ओके. नॉट एक्झॅक्टली लव लव अॅज सच. पण आम्ही खूप आवडतो एकमेकांना. "
" रसा, काय आवडतंय तुला नक्की? म्हणजे तो मुल्गा चांगला असेल नो डाऊट. पण मी इमॅजिनच नाही करू शकत आहे की तो तुझ्या टाईप आहे."
" टाईप काय अगं. आम्ही फार पटकन बाँड झालोय. वादळ यावं आणि एखाद्या रोपट्याला मुळापासून उखडून न्यावं तसं आणि तरी त्या रोपट्यानं भिरभिरत त्या वादळामागेच फिरावं तसं झालंय माझं. "
" ओके लुक. धिस इज साऊंडींग क्वाईट चिजी. इतकं सोपं आहे असं भिरभिरणं तुझ्या सारख्या सॉर्टेड मुलीने?"
मी शिबानीकडून ही अपेक्षाच केली नव्हती. म्हणजे ती इतक्या परखडपणे इतकं निगेटिव मत मांडेल असं वाटलंच नव्हतं मला.
" सोहराब किती इंटरेस्टेड होता तुझ्यात . तू कन्सिडर पण नाही केलंस त्याला. " सोहराब तिचा टीममेट. आम्ही एका पेंटिंग वर्क्शॉपला भेटलो होतो. छान होता तो मुलगा . पण दिलमे कुछ हुआ ही नही तर काय करू मी?
" आणि अनुज तर प्रपोज करणार होता तुला." अनुज हिचा स्कूलफ्रेंड. पुण्याला आला होता तेंव्हा आम्ही हँग आऊट केलं होतं एकत्र. कूल होता. पण क्लिक नाही झालं खरंच.
" बरं माझे मित्र सोड. तुझे स्वत:चे मित्र पण आहेत की चांगले चांगले. जरा पॉझिटिव साईन दिलं असतंस की लगेच बात बन जाती| "
"नोप बेब. जर तर ला काय अर्थ आहे. बात बन रही है| बस बात बनानेवाला कोई और है| "
" हम्म्म. ओके. पण तो जो काय प्रकार केला त्याने तो मला जाम सिली आणि बर्यापैकी क्रीपी वाटलाय. नक्की हे फक्त आकर्षण नाहीय ना रसा? एकदा अक्कीशी बोल ना" शिबानी जरा लो वाटत होती. मला वाटलं होतं ती मला चिडवेल, आमची गोष्ट विचारेल. तर ताई सेकंड ओपिनियन घ्यायला सांगत होत्या.
" हो त्याला पण सांगणार आहे आजच . "
" हम्म.. " असं म्हणत शिबानी उठली आणि रूमकडे निघाली.
" आणि तरी परत एकदा, कितीही अनलाइकली असो, व्हाय नॉट अक्की ऑन अर्थ?" परत वळत म्हणाली.
" बीकॉज ही इजंट द वन. "
" मग हा आहे?"
" नाही महिती मला. पण हा होऊ शकतो."
" ओके " परत खाली बसत शिबानी म्हणाली , " एक गोष्ट सांग अशी त्याच्याबद्दल जी या आधी कुठल्याच मुलात नव्हती. "
हा फारच बालिशपणा होत होता. पण असं म्हणाले असते तर माझ्याकडे उत्तर नाही असं झालं असतं.
" ओके. खूप आहेत. पण एक सांगते जी मला खूप आवडते. तो कमंडींग आहे ग. मला थोडं अथोरितेतिव असलेलं आवडतं मुलांनी. ज्या कॉन्फिडन्स ने वागलाय ना तो आत्तापर्यंत ते खूप मस्क्युलिन वाटतंय मला. आम्ही परवा भेटलो ना, तेंव्हा मी जरा लो नेक टॉप घातलेला. त्याने मला खूप शांतपणे समजावलं की हे नाही छान वाटत आहे. तू साधीच गोड दिसतेस. लो नेक टॉपने मी फक्त चुकीच्या मुलांचं लक्ष वेधून घेतेय. आणि मला आवडलं हे. आय मीन दुसर्या कुणीही हे सांगितलेलं मी इमॅजिन नाही करु शकत. पण ही अथॉरिटी आवडली मला त्याची."
" ही अथॉरीटी आहे? पझेसिवनेस आहे हा. रसा, प्लिज थिंक अ लॉट. कसलेही निर्णय घ्यायची घाई करू नकोस. "
"हो गं बाई. मी काय लगेच लग्न नाही करत आहे. "
" करू पण नको निदान तीन महिने तरी. मी नसताना कशी करशील?"
" वॉट?"
" मी साईटवर चाललेय दहा दिवसांनी तीन महिन्यांसाठी. आणि मला तुझी काळजी वाटतेय." शिबानी म्हणाली.
" ओह शिबानी मी मिस करेन तुला खूप. "
" हम्म. नीट रहा काय? आणि डोंट गेट प्रेग्नन्ट. शरीराने पण नको आणि मनाने पण ." डोळा मारत ती म्हणाली. तरी पण तिची काळजी मला दिसत होती स्पष्ट.
अक्कीला पण सांगायचं होतंच. आता शिबानीची रीअॅक्शन बघून जरा भीती वाटत होती. पण उशीर करून अजून वाट लागली असती.
म्हणजे चिडला नसता तो. सम हाऊ मलाच फार विचित्र वाटलं असतं ते. त्याच्या गर्लफ्रेंड बद्दल सगळ्यात आधी त्याने मला सांगितलं होतं.
हे त्याने मला स्पेसिफिकली सांगितलं नसलं तरी मला माहिती होतं ते.
"अक्की. " मी आनंदाने म्हणाले. बरेच दिवस झाले होते व्हिडिओ call करून.
" कशीयेस स्पॅरो? "
"मी मस्त आहे. तुला एक गोष्ट सांगायची आहे. पण त्याआधी तू पटकन तू कसा आहेस ते सांगून घे. कारण मला वेळ लागणार आहे. "
"कूल. मी मजेत आहे. नथिंग स्पेशल. आता पटकन सांग. काहीतरी भारी दिसतंय. प्रेमात पडलीयेस?" फुस्स! हे दोघं सेम आहेत. म्हणूनच मला जवळचे आहेत बहुतेक.
"हो"
"पटापट सांग सगळं"
मग मी त्याला बऱ्यापैकी रामायण सांगितलं. शिबानीला सांगितलं त्याहून डिटेल मधे.
"ह्म्म्म" मोठा पॉज.
" हम्म्म काय फक्त ? बोल ना. "
" काय बोलू? विचार करतोय"
"अरे म्हणजे काय वाटतंय तुला?"
" रसा, तुला हा मुलगा पूर्ण आवडलाय? "
" पूर्ण ? म्हणजे? एखाद्या माणसात जरासं आवडण्यासारखं काय असतं? "
" असतं की. बर्याच गोष्टी असतात जराशा आवडणार्या. म्हणून प्रत्येक वेळी तो माणूस पूर्णच आवडेल असं नसतं. "
" ओके." यावर काय बोलावं मला सुचेना.
" मी असं का म्हणालो माहीतिय का ? कारण तू मला काय वाटतंय याचा विचार करतेयस. असला विचार मनात येणं म्हणजे बहुतेक आपल्यालाच आपल्या निर्णयाबद्दल शंका आहे असं असतं. "
" अरे ! कसला निर्णय ? अजून काहीही निर्णय घेतला नाहीय आम्ही. फक्त आम्ही एकमेकांना आवडतो इतकंच. आणि जवळच्या मित्रांना ते सांगावं वाटणं , त्यांनी पण आप्ल्यासाठी खूष असणं यात कसली शंका ? मी तुला हे खूप दिवसांनी सांगितलं असतं तर चाललं असतं ?" मी चिडून म्हणाले.
शिबानी आणि अक्की दोघं मला सेम फील देतायत.
" ओके ओके. चिल. मी तिथं असतो तर बरं झालं असतं आत्ता. तू उशिरा सांगितलेलं अर्थातच चाललं नसतं. पण इट डजंट मीन कि मला वाटतंय ते मी बोलू नये. सो देर आय अॅम. "
" ..."
"बरं ते सगळं सोड तू खुश आहेस ना?"
" हो" मी म्हणाले.
" खुश आहेस का फक्त अट्रॅक्टेड आहेस?"
" अक्षय! "
"अरे! मी तिथं नाहीय ना. जे मला तुला न विचारता स्वतः ऑब्झर्व करून कळलं असतं ते आता तुला विचारावं लागणार आहे. "
" हं"
" हं काय? सांग ना. इज इट हॅपिनेस ऑर अट्रॅक्शन? "
" दोन्ही!"
मग इमोशन्स वर अजून थोडी बडबड, काही ऑड प्रश्न यानंतर..
" काही गोष्टी जरा odd वाटतायत. पण आम्ही मुलं काहीही madness करू शकतो प्रेमात पडलो की. सो त्याला थोडा डिस्काउंट देऊ शकतो. " फायनली अक्की म्हणाला.
" उपकार झाले फार." मी म्हणाले.
" मिस यु स्पॅरो."
" मिस यु अक्स! "
झालं.
अक्की जवळ नव्हता, शिबानी चालली होती. मला हुरहूर आणि का कोण जाणे पण थोडासा रिलिफ दोन्ही वाटत होतं.
मी विचार करत बेडवर पडले होते, इतक्यात मेसेज टोन वाजला.
चक्क अंकितचा मेसेज, " बिझी?"
" नॉट फॉर यु. " कुठं शिकले मी हे ?
" कुठं आहेस ?"
" घरीच"
" रसा..."
" ह्म्म्म"
" यु नो हाऊ बॅडली आय वाँट टु किस यु राईट नाऊ ?"
माय गॉड! मी उठून बसले ताडकन. परत दोनदा वाचला तोच मेसेज. रोमांच, धडधड, कानात एक वेगळीच वॉर्म्थ, स्पाईन मधे विजा सगळं एकाच वेळी.
परत मेसेज टोन, " चिडलीस?"
शक्स! मी अजून त्याच्याच मेसेज बॉक्स मधे. येताक्षणी मेसेज ला दोन ब्लु टिक्स.
" बोल ना !" पुन्हा ब्लु टिक्स.
काय बोलणार होते मी? त्याचे सावळे , लहान मुलासारखे प्लम्प, कोरीव ओठ आठवले होते आणि वाट लागली होती.
आणि या कसरतीसाठी त्याला खूप वाकावं लागलं असतं आणि मला टाचा उंच कराव्या लागल्या असत्या. या विचाराने जरा आवेग कमी झाला.
माझ्या चेहर्यावर हसू उमटलं. इतक्यात धाडकन दार उघडत शिबानी आत आली.
" अक्कीशी बोल हां काय आज." मॅडमनी ऑर्डर सोडली. मी घाईने मोबाईल बंद केला.
" हे काय आत्ता त्याच्याशी बोलूनच बसले होते"
" काय म्हणाला?"
खरं तर तो साधारण ती म्हणाली तसलंच म्हणाला होता . पण तरी दोघीनी बेडवर पडून , पाय खाली सोडून सिलिंग न्याहाळत साग्रसंगीत गप्पा मारल्या.
" कूल आहे यार हा किती! तू एक मूर्ख आहेस . वीर नसता ना मेरी लाईफमे , तर मी नक्की पटवलं असतं याला. " उसासा टाकत ती म्हणाली.
" ह्म्म्म्म"
" मी इथं नसले तरी मला सगळे अपडेट्स मिळत राहायला हवेत, कळलं ना? " परत ऑर्डर!
"होय शरलॉक. " मी म्हणाले.
" आणि प्लिज अक्कीशी पण बोलत रहा काय ! तू त्याला कमी कॉल करतेस हल्ली. "
" काही पण! तोच बिझी अस्तो. असाईनमेंटस, मित्र आणी ती बया. "
" ह्म्म.. लकी बया. " पुन्हा उसासा.
" शिबानी, ती मुलगी चांगली आहे तशी. अॅकेडेमिक आहे, सिन्सियर आहे. बोर आहे पण तेच बरं आहे. आता मी विचार करते की एखादी बिची , बायकर चिक टाईप असती तर किती बोर झालं असतं ते "
" वा वा, प्रेमाने मॅच्युअर केलंय तुला. चक्क अक्कीच्या गर्लफ्रेंडची स्तुती . "
" ह्म्म्म"
मग एक मोठा सायलन्स दोन मिनिटांचा.
" आर यु येट टु किस ईच आदर? " अचानक उठून बसत शिबानीने विचारलं.
Oh fish! तो मगासचा मेसेज. आणि मी उत्तरच नवतं दिलं अजून. मी पण उठून बसले.
" उं हुं " मी कशीबशी म्हणाले.
" अगं हो की नाही?"
" ना ही . आणि प्लॅनिंग चाललं होतं तितक्यात तू आलिस ना डिस्टर्ब करायला. " मी हसत म्हणाले.
" गुड. काही घाई नाहीय. कळलं ना. निवांत रहा. लेट द वाईन लिंगर ऑन द टंग. गो स्लो. " इतर वेळी मी हसले अस्ते पण आत्ता ट्रिकी होतं सगळं.
काही न बोलता पण माझं काय झालं ते तिला कळलं. डोक्यावर टपली मारून ती गेली.
मी घाईने मेसेज बॉक्स उघडला.
"इट्स ओके इफ यु आर नॉट रेडी रसा. आय कॅन वेट. फॉरेवर! " तो ऑनलाईन नव्हता.
शिबानी येण्याआधी मी नुसतं " ह्म्म" असा मेसेज करणार होते. पण आता बातोने अलग मोड ले लिया था | आता नवीन उत्तर द्यायचं होतं.
पुन्हा त्याचा विचार. किस फक्त ओठांचा थोडाच असतो?
त्याचे हात माझ्या पाठीवर, माझे त्याच्या मानेवर. म्हणजे आधी मिठी की आधी किस? की किसमधे विरघळत जाणारी मिठी? आणि त्याचवेळी त्याच्यात विरघळत दिसेनाशी होणारी मी? आणि बंद डोळ्यांआड दिसेनासा होणारा तो.
उफ्फ!
" आय डोंट थिंक आय कॅन वेट फॉरेवर ! " मी उत्तर लिहीलं. एका क्षणात तो ऑनलाईन आला. ब्लू टीक्स आल्या. आणि नो आन्सर. फोन तसाच हातात असताना मला झोप लागली.
आधी च्या भागांची कथामालिका इथं आहे .
https://www.maitrin.com/node/3510
ते झालं की किंवा आठवत असेल तर पुढं वाचा...
जाग आली. कोणता दिवस की मध्यरात्र हेच कळेना. बाहेर अंधार होता. हृदय धडधडत होतं. तोंड कोरडं पडलेलं. स्वप्न पाहिलं होतं कदाचित. ते आठवायचा प्रयत्न करून सोडून दिला. पाणी प्यायले. बाहेर गेले तर शिबानी हॉलमधेच लॅपटॉप समोर झोपली होती. कुठली तरी सिरिज बघत झोप लागली असणार. आधी ती आणि मग तिचा लॅपटॉप दोन्ही हायबर्नेशन मधे गेले होते. मला तिच्या रिअॅक्शनची वाट बघत बसलेला आणि मग कंटाळून झोपी गेलेला लॅपटॉप आणि वीर यामधे साम्य इमॅजिन करून हसू आलं. वीर म्हणजे तिचा बॉयफ्रेंड ( आठवलं ना ?) आणि त्याच क्षणी कसल्यातरी प्रहाराने सणक जाते तशी तीव्रतेने अंकितची आठवण आली.
आणि सगळे डॉटस कनेक्ट झाले.
पटकन रूममधे आले. मोबाईल धुंडाळला आणि मेसेजेस चेक केले. नोप, नादा, एम्प्टी, निल. म्हणजे बरेच मेसेजेस इथं तिथ होतेच. पण आत्ता सगळ्यात प्रेशस असलेला मेसेज बॉक्स तसाच माझ्या मेसेजवर आणि दोन ब्लु टिक्सना मिरवत थांबला होता. शिट! का नसेल त्याने रिप्लाय केला?
जरा ओवर झालं का मी लिहिलेलं? मुलीनी अय्या इश्श करावं आणि मौन हीच संमती वगैरे विचार अस्तील काय त्यांच्याकडे अजून? नको होतं का लिहायला? एकदम हायपर वेंटिलेशन मोडवरच गेले मी. हे असं असेल तर इट वोंट वर्क आऊट रसा. मी स्वतःला सांगितलं. पण ती कल्पनाही सहन होईना.
असंच इकडं तिकडं करत होते तेवढ्यात शिबानीचा अलार्म झाला. मी उठून हॉलमधे गेले. खरं तर लगेच तिच्याशी बोलायचं होतं पण ती इतकी दाट आळसात होती की म्हटलं , जरा सिस्टिम पूर्ण बूट होऊ दे.
ती माझ्याकडे पहात राहिली. काय करते आहेस तू आज इतक्या लौकर ?
गेट रेडी , मग सांगते.
ती येईपर्यंत मी चहा केला होता.
" वा , आज ब्लॅक कॉफी ऐवजी चहा पिऊन जिमला जाऊ? ठिके. पण रोज हे लाड होणारेत का? वेट, व्हॉटस हॅपन्ड?" सिस्टिम बूट झाली होती आणि जॉब्स पण रन व्हायला लागले होते. माझी चिंता मनातून उतू जाऊन तिच्यापर्यंत पोचली होती.
तिला मेसेजेस दाखवले. मला काय वाटतं ते सांगितलं.
"वाव. बरा वाटतो की मुलगा." मेसेजेस पुन्हा वाचत शिबानी म्हणाली.
मी फोन काढून घेतला. " स्टॉप एंजॉयिन्ग. सांग ना यार काय करू? इतकी डिस्टर्बिंग झोप झालीय माझी. काल त्या मेसेज मुळं मी इतकी.. " मला शब्द सुचेना.
" आगीत फुएल पडलं ना? " ती चिडवत म्हणाली.
" शट अप. पण खरं तर हो. आधीच मी अट्रॅक्टेड होते त्यात त्या मेसेज ने वाट लागली माझी. आणि हा बाबा आता काही बोलेनाच " मी नखं खात म्हणाले.
" तू जितकी चिंता करतेयस तितकं नसणारे काही. असेल काहीतरी अडचण. मेसेज वाचताच योगायोगने बॅटरी डाउन झा ली असेल फोनची आणि मग त्याची. किंवा हँग झाला असेल फोन किंवा पाण्यात पडला असेल किंवा गॅलरीतून खाली " शिबानी एकदम क्रिएटिव व्हायला लागली.
" गप ना यार" मी तिच्या तोंडावर हात ठेवत म्हणाले.
" ऑर ऑर ऑर.. " हातांच्या पिंजर्यातून स्वतःच्या अधराची सुटका करून घेत ती पुढं बोलली,
"मित्रांबरोबर पार्टी करताना मेसेज केला असेल आणि तुझा मेसेज वाचताच पास आऊट झाला असेल."
मला हसू आलंच.
पण तिला ढकलत मी म्हटलं "जा आता जिमला. नुस्ता ब्रेन चा व्यायाम होतोय तुझ्या"
"तू पण रेडी हो आणि चल खाली. जॉगला जा. इथं बसून नखं खात विचार करण्याने काय होणारे?" ती मला उठवत म्हणाली.
खरंच. फ्रेश एयर वुड डु मी गुड. मी हल्ली जायला लागले होतेच स्लो रनला. मी तयार झाले आणि आम्ही खाली उतरलो.
ती गाडी काढून जिमला गेली. मी कानात हेडफोन्स घातले पण काही सुरु करायची इच्छा होईना.
वसंतातली सुरेख सकाळ, अगदी हविशी हवा, मंद झुळका, लहरणारी, फुलांचे बहर मिरवणारी झाडं, झोपलेली कुत्री आणि आरोग्योत्साही लोक सोडल्यास रिकामे रस्ते. फार फार सुंदर माहोल होता तो. ती एक चिंता नसती तर बाकी माझ्यासारख्या प्रेमविव्हल तरुणीला अगदी सूट होईल असं सगळं चाललं होतं.
पण ती मोठी चिंता भल्या मोठ्या हत्तीसारखी माझ्याबरोबर होतीच.
दोन राऊंडस झाल्या. पण आज लौकर आल्यामुळे इतक्या लौकर परत जाऊन तरी मी काय करणार होते? आत्ता तर कुठं मी नेहमी सुरु करायचे ती वेळ झाली होती.
मी तिसरी राऊंड सुरू केली, ती संपताना मी सोसायटीच्या गेटजवळ आले आणि माय हार्ट स्किप्ड अ बीट. तो तिथंच उभा होता बाईकवर. अति विचाराने मला भास झाला की काय असं वाटेपर्यंत मी तिथं पोचले होते.
" अंकित" तो वळला.
" ओह, मुझे देर हुई. डन विथ द रन?" तो म्हणाला.
" तू इथं काय करतोयस? " मी अजून शॉक मधे होते. चिंतेच्या लाटा परतून हुरहुरीचे क्षण सुरु झाले होते.
" क्या कर सकता हू? तुम्हारा इंतजार कर रहा था. इतनी जल्दी जाती हो रन करने? सच कहू तो आज जाओगी ये भी शुअर नही था बट चांस लिया "
काय सांगणार होते त्याला? कधितरी त्याला टायमिंग सांगितलं होतं ते लक्षात असेल. पण आजचं विशेष कसं पोचवू त्याच्या पर्यंत?
या जागृतीचं, या अड्रेनलिनचं, या आसपास फुललेल्या अकेशिया आणि गुलमोहोराच्या जखमी सौंदर्याचं पण कारण तूच आहेस हे कसं सांगू?
" हां हो गया" मी खरं तर अजून एक राऊंड करणार होते आज.
" सच बताओ. मै रुक सकता हू. फिनिश करके आना" तो सिन्सियरली म्हणाला. आणि मी घायाळ झाले.
" नही. हो गया सच में. आज लौकर आले होते जरा" पण पुढचा प्लॅन काय होता?
" तो चलो बैठो " तो म्हणाला. अर्थातच बाईक टिल्ट करून .
अशी? ड्राय फिट कपड्यात? मी जरा कचरले.
" अभी ?" मी म्हणाले .
" बहोत अच्छी लग रही हो, चलो." बिटवीन द लाईन्स पण कळायला लाग्लं याला.
मी बसले.
"कहां जा रहे है हम?"
"ब्रेकफास्ट करने. एक सही जगह है " मोकळ्या रस्त्यावरुन गाडी सुसाट निघाली.
भणाण वार्याशी सामना झाल्यावर लक्षात आलं शहर संपत आलंय आणि हायवे सुरू झालाय.
" कहां जा रहे है हम ?" मी विचारलं पण हेल्मेट आणि वारा दोन्हींनी माझा प्रश्न खाऊन टाकला होता.
बाईक थांबली आणि माझी नजर समोर गेली. एक क्यूट गार्डन रेस्टॉरंट होतं समोर. लाल विटांच्या भिंतीनी आणि उंच झाडांनी डीमार्क केलेले एरियाज आणि त्यातली डोक्यावर छत्र्या मिरवणारी टेबल्स. छोटे त्रिकोणी विटांचे तुकडे लावलेल्या बांधीव पायवाटा.
त्या पलिकडे केळी , चिकु ची झाडं असलेली शेती. इथून तिथं जाणारी वाट.
आम्ही आत शिरताच एक सेमाय हिप्पि मुलगी बाहेर आली. वेलकम म्हणत.
आणि जागेची माहीती दिली. ईकोफ्रेंडली रेस्टोरंट. ऑर्गॅनिक फ्रेश प्रॉडक्टस पासून बनवलेले मील्स वगैरे.
तुम्ही ऑर्डर देऊन फिरून येऊ शकता. या बागेपलिकडे पण छान जागा आहे.
तिथं पण सीटींग सुरू करणार आहोत लौकरच वगैरे सांगितलं तिनं.
आम्ही फ्रेश ज्यूसेस आणि ओट्स पोहा अशी ऑर्डर देऊन पायवाटेने निघालो. फार आल्हाददायक होतं सगळंच.
मला स्पर्श ही न करता अंकित माझ्या खूप जवळून चालत होता. त्याच्या अंगाची ऊब मला जाणवत होती.
"रसा.. " तो म्हणाला.
मी ते माहितिच असल्यासारखं हं म्हणाले.
" मै हाथ पकडके चल सकता हूं तुम्हारा?" मी पुन्हा हुंकार दिला.
अलगद त्याचा हात माझ्या हातात गुंफला गेला. आगीचा लोळ शेजारून सळसळत जावा तसं झालं मला. न बोलता आम्ही चालत राहिलो.
बाग सम्पली तशी समोर एक छोटा झरा दिसला. सुखद धक्का होता तो. दियाने ( ति मगाची हिप्पी मुलगी) हे सांगितलं च नव्हतं.
तिथं मोठे दगड होते अगदी योग्य जागी. पाण्यात पाय सोडून बसता येतील असे.
मी पटकन पुढं गेले , शूज काढून आणि पाय पाण्यात बुडवले. आय वॉज ऑन अ हाय. थोडासा का होईना निसर्ग आणि निसर्गाचे सगळ्यात सुंदर एक्सप्रेशन दोन्ही एकदम वाट्याला येत होतं. फार अर्बन झाले होते मी नाहीतर.
नकळत खाली बसले. अंकित माझ्याशेजारी बसला.
" कितना सुकून है यहां" मी म्हणाले आणि त्याच्याकडे वळले. तो माझ्याकडेच पहात होता. हे लक्षात आल्यावर मी एकदम नजर समोर फिरवली .
" रसा.. " तो म्हणाला. " सुनो ना"
कालपासून माझ्या पोटात ठेवलेल्या एका मोठ्या गोळ्याचं या माणसाच्या हॉटनेसमुळे आता पाणी पाणी होत होतं.
मला ऑप्शन च नव्हता. मी त्याच्या दिशेने चेहरा फिरवला.
माझ्या डोळ्यात डोळे घालून तो म्हणाला " कल क्या बोल रही थी तुम?"
फिश! माझे गाल लालभडक झालेले मला न बघताही जाणवले. नजर आपोआप खाली गेली.
" रसा.. "
"हं.. "
" रसा.. "
नाइलाज. नजरेला नजर. छळ, विजा, आगीचे लोळ.
" बताओ ना"
" काही नाही" मी म्हणाले.
" नाही? खरंच.. बरं मग मी काय म्हणत होतो ते तरी सांग "
मी गप्प.
" ठीक है. मैने कल बोला था ना वो सच है, मै रुक सकता हूं" आणि त्याच पुढं,
" माझ्या घराजवळ असे अंतरा अंतरावर झरे आहेत. आम्ही शाळेत जाताना प्रत्येकात पाय बुडवत जायचो. तुला आवडलं ना हे ठिकाण? परत येऊ आपण इकडं. तुला उशीर होईल. जाऊ या? "
" अंकित.."
" हां"
"अम्म्म्" भयंकर अवघड आहे हा प्रकार. याला जरा पण कळू नये का? मी काय तोंडाने सांगणार आहे का?
" बोलो ना. चले? " तो उठायला लागला.
" ऐक ना, तू म्हणाला होतास.. "
तो परत खाली बसला.
" पण मी पण म्हणाले होते की काहीतरी."
" हो मला त्या चॅट मधले सग्ळे शब्द बाय हार्ट झालेत रसा. "
" तो शेवटचा मेसेज.. त्याला तू रिप्लाय का नाही केलास?" कुठून तरी हिम्मत आली.
" उसपे रिप्लाय क्या करना था? उसपे तो अमल करना था ना. प्लॅनिंग करनी थी. " तो माझ्याकडे बघतोय हे मला कळत होतं.
माझ्या ह्रुदया च्या रोपट्याचा उंच वृक्ष होत होता या वाक्याने.
" तो? आगे? " मी म्हणाले.
त्याने माझे दोन्ही हात हातात घेतले. मला त्याच्याकडे वळवलं.
" ह्म्म?" त्याने खूप हळू आवाजात विचारलं. मी फक्त मान झुकवली. त्याने एक हात सोडवून ती वर उचलली. आणि दुसरा हात सोडवून अलगद माझ्या मानेवर ठेवला. माझं मन पूर्ण रितं झालं होतं. आणि माझ्या मिटल्या डोळ्यांआड फक्त शुभ्र अंधार पसरला होता.
पुन्हा एकदा हायवेचा वार्याचा काहीही न विचारता होणारा झंझावाती स्पर्श अनुभवताच माझं डोकं जागेवर आलं. तोवर एका धुंदीतच सगळं चाललं होतं.
झर्याजवळून उठून पुन्हा पायवाटेने चालत आम्ही कधी डायनिंग एरियात आलो, बसलो , खाल्लं, दियाशी बोललो आणि निघालो हे सग्ळं नंतर आठवलं. ब्रेकफास्ट मस्त होता.
पण त्या झर्याजवळून उठताना जग माझ्यासाठी बदललं होतं. त्यानंतर मी आणि अंकित एकमेकांशी फार कमी बोललो.
जास्त बोलण्याची गरज त्या वेळी तरी नव्हती. एक तरल , अलवार अदृष्य तलम मलमल तरंगत आम्हाला लपेटून येत होती. आत्ता या क्षणी जगात कसलेच प्रॉब्लेम्स नाहीत असं वाटत होतं.
अंकित जवळ असूनही अजून जवळ हवासा वाटत होता. आवडलेल्या माणसाला आपणही हवेसे असणं हे इतकं परिपूर्ण फीलींग आहे की मग काहीही लागत नाही इतर. ड्रेसेस, अॅक्सेसरीज, कॉस्मेटिक्स, पार्टीज, अवॉर्ड्स, एफबी इन्स्टा चे लाईक्स .. कुठलीही दुसरी गोष्ट त्या फीलींग इतका सॅटिस्फाईड हाय देऊ शकत नाही.
माझ्या बिल्डिंगखाली पोचल्यावर मी उतरले आणि काय बोलायचं हे न कळून तशीच उभी राहिले. अंकित फक्त हसला, " मेसेज करतो नंतर. नाहीतर आज दोघाना ऑफिसला उशीर होईल."
मी वर आले तेंव्हा शिवानी रेडी झाली होती अल्मोस्ट.
" काय मॅडम कुठं पत्ता ? "
आणि मला वरपासून खालपर्यंत न्याहाळत म्हणते , " भ र पू र एक्सरसाईझ झालेला दिसतोय आज. एका दिवसात महिन्याचा कोटा संपवला कि काय. एकदम ग्लो करतोय चेहरा "
शक्स! " हो जरा लौकर गेले ना. मग अंकित भेटला. आणि आम्हि ब्रेकफास्टला गेलो. " मी एका दमात सांगून टाकलं. उगच लपाछपी नको.
" हं ... ते कळलं. दिसलं मला गॅलरीतून. ठिके मी जाउ की थांबू? १५ मिनिटात रेडी होणार असलीस तर थांबते. पण गॉसिप मात्र संध्याकाळीच. " ती डोळा मारत म्हणाली.
संध्याकाळी पाय पसरून बसलो होतो तेंव्हा शिवानी ला सगळा किस्सा सांगितला.
" वाव. सॉलिड रोमँटिक आहे की पोरगा. मला वियर्ड वाटलेला जरा आधी. पण नीट विचार करून चालू आहे सगळं. आता मला जास्त काळजी वाटेना तुझी. तरीही हाच असं नाही, कोणत्याही मुला बरोबर रिलेशन मधे असताना स्वताला जपून असावं प्रत्येक मुलीने.
आपल्याला साबोताज करायची पॉवर कुणाला कधीच द्यायची नाही. " ती शून्यात बघत फिलसोफी झाडत म्हणाली.
" सिस्टर शिवानी, मी काळजी घेईन, आपण नि:शंक रहा" मी नाटकी पणाने म्हणाले.
" तुझं नाही मला माझं पडलंय. तुम्ही पॅशनेट व्हाल मग भांडाल, रडारड कराल तेंव्हा खांदा माझा ओला होणार आहे. तो कमीत कमी व्हावा यासाठी सांगतेय. त्यातून मी साईटला गेले की रात्री अपरात्री ग्रीफ कॉल्स नको आहेत मला. अर्थात अपडेट्स सगळे हवेत. आणि चांगलेच हवेत."
" यु हॅव साईन्ड अप फॉर दॅट लाँग बॅक स्वीट्स " मी म्हणाले पण ही नसणार तेंव्हा माझी मला खरंच काळजी होती.
आणि तिचं जाणं एक आठवड्यावर आलं होतं.
अंकितबरोबर वेळ घालवू वाटत होता पण खूप फास्ट नको होतं सगळं. एका पेसने झालं तर बरंय. दोघांना हळूहळू समजाऊन घ्यायला वेळ मिळेल. आत्ताच्या इंटेन्सिटीवरून तर भीतीच वाटत होती.
हा एकटेपणा उत्सुकता आणि शंका दोन्ही वाढवणारा होणार होता. आणि इच्छांचे तुफान येणार होते.
शिवानी जायचा दिवस आला. आम्ही बर्यापैकी सॅड मूड मधे एकमेकीना बाय केलं. रोज कॉल्स होणार होतेच. अपडेट्स दिले घेतले जाणार होते.
मी अंकितला मी अजून सांगितलंच नव्हतं शिवानीच्या ऑनसाईटचं. चॅट आणि प्रत्यक्ष भेटीतल्या गप्पांमधे तो विषयच येऊ नये याची मी खबरदारी घेत होते. माझ्याच मनात एक चोर बसला होता ना!
तरीही आम्ही बराच वेळ एकमेकांशी कनेक्टेड असायचो त्यामुळे अवघड होत चाललं होतं ते प्रकरण.
पुढच्याच आठवड्यात अंकितने मला विचारलं की त्याच्या एका मित्राचा बर्थ डे आहे आणि मला जायला आवडेल का?
"कुठे जायचंय? मी विचार करून सांगते. "
असं मी त्याला म्हटलं खरं पण मनात हुरहुर सुरू झालीच होती. आत्तापर्यंतच्या आमच्या भेटी फक्त दोघांच्या होत्या. आता मात्र त्याच्या मित्रांची आणि माझी ओळख होणार होती. ही एक थोडी ट्रिकी स्टेप होती.
मित्रांची आणि मैत्रिणींची मतं आपल्याला किती इम्पॅक्ट करतात याचा अनुभव मी शिवानी आणि अक्कीकडून व्यवस्थित घेतला होता. शिवाय मी स्ट्रॉंग आहे. पण अंकित आहे का हे पण महत्त्वाचं होतं.
त्यातून शिवानी गेलेली मी अजून त्याला सांगितलं नव्हतं त्याचा पण थोडा गिल्ट होता. पण एक्साईटमेंट होतीच.
असं म्हणतात ना की तुमचे मित्र कसे आहेत त्याच्यावरून तुमची पण ओळख होते. अंकितला ओळखायचा हा अजून एक चांगला मार्ग होता.
मग ठरल्याप्रमाणे शुक्रवारी आम्ही अलयच्या बर्थडे पार्टीला गेलो. हा अंकितचा आधीच्या डान्सिंग ग्रुप मधला मित्र. तोच ग्रूप होता. बरीच मुलंमुली होती. बरीच म्हणजे दहा-बारा तरी. डान्स करणारीच मुलं असल्यामुळे डान्सफ्लोर असलेली जागा निवडली होती. मी डान्समध्ये त्या सगळ्यांमध्ये एकदम ज्युनियर होते.
त्यातून क्लासमध्ये आम्ही अधून मधून एकत्र डान्स करायचो पण तिथं आमचं सिक्रेट खरंच सिक्रेट होतं. इथे मात्र अलयला तर माहिती होतंच की . आणि बाकीही काही लोकांना नक्कि माहीत असणार होतं. कदाचित सगळ्यांनाच. आता हे काही मी अंकितला विचारलं नाही. जरा बावळटच वाटलं असतं ते. जो होगा देखा जायेगा.
ऑफिसातून वेळेवर येऊन तयार झाले.
एकदम सिंपल लाइट ग्रीन रंगाचा लेसी टॉप आणि डेनिम , सिंगल पिंक पर्ल चे ड्रॉप. गळ्यात पण एक तसाच मोठा सिंगल पर्ल. हातात दोन पर्ल्स असलेलं ब्रेसलेट आणि अगदी लाईट मेकप. सोनेरी गुलाबी रंगाची छोटिशी स्लिंग आणि त्याच रंगाचे हील्स. हे हील्स मी वीकेंडला ऑफिस मैत्रीणीबरोबर मॉलमधे जाऊन आणले होते.
अंकित मला न्यायला आला होता. मी लिफ्ट मधून बाहेर आले आणि त्याला बघून जे काय झालं ते झालं.
पांढरा लिनन शर्ट, फोल्ड केलेल्या बाह्या, डार्क खाकी ट्राउजर्स. जेल्ड हेयर, हातावर टाकलेलं ब्राऊन स्लीवलेस जॅकेट आणि पोनी नाही.. मॅन बन. नोप. उफ्फ! हा अख्खी संध्याकाळ असा दिसणार होता? मी नाही जात याच्याबरोबर.
आणि वर तो मी लिफ्ट मधून बाहेर आल्याबरोबर तो मी त्याच्यापर्यंत पोचेपर्यंत माझ्याकडे एकटक पहात होता.
मी जवळ पोचले आणि तो म्हणाला, " धिस इजंट फेयर. यु नो? इतना इनोसंट, इतना प्यारा दिखना मना है अभीसे. "
आधीच माझी हालत वाईट त्यात हे ऐकल्यावर मी आपोआप खाली पाहिलं.
"एक बात बताऊं?"
" हम्"
"हमारे यहांके लडके सच कहते है, तुम मराठी लडकिया सचमे बहोत क्लासी दिखती हो. "
ऑलमोस्ट इश्श म्हणणार होते. श्या! मॉडर्न लाईफ ने हा शब्द उगच गायब केलाय. गालांनी ते काम केलं असावं.
मी मागं बसत असताना अंकित हळु आवाजात म्हणाला , " आज बहोत मुश्किल होनेवाली है"
आम्ही तिथे पोहोचल्या पोहोचल्या सगळ्यांनी आम्हाला ग्रीट केलं. मुलांनी अंकितकडं मिनिंगफुल नजरा टाकल्या. मुलींनी मला वरपासून खालपर्यंत न्याहाळून घेतलं.
पण थोड्या वेळात सगळं सेट झालं. मी कम्फर्टेबल झाले. कारण अभ्यास आणि काम या दोन्ही गोष्टींचा कॉमन थ्रेड नव्हताच गप्पात. अतिशय विविध रँडम विषयांवर आम्ही गप्पा मारल्या.
अंकितचं लक्ष मी बोर होते का, मी कम्फर्टेबल आहे का याकडे होतं. विचारत पण होता मला अधून मधून. नंतर नंतर त्याने माझ्याकडे मान वळवली की पब्लिक, " हां हां, ठीक है वो, हम नही सता रहे उसे " म्हणायचं.
त्यावर तो हसायचा. कत्ल के बहोत से तरीके थे और जनाब उनमेसे सब जानते थे..
बर्थडे बॉय अलय एकदम हँडसम होता अर्थात आत्ता या क्षणाला अंकित इतका कुठलाच मुलगा मला छान वाटत नव्हता. अलय अंकितचा जवळचा मित्र. वॅलेंटाईन ला कुछ अलग करने की आयडिया याचीच.
काही वेळानं सगळे डान्स करायला उठले. आणि त्यांनी फ्लोरला ऑलमोस्ट आग लावली. विजा सळसळाव्यात असा डान्स करत होते सगळे. मला तर एकदम याला बघू का तिला बघू असं झालं. सगळा ग्रुप एकत्रच डान्स करत होता . मध्येच दोन ग्रुप व्हायचे आणि परत एकत्र व्हायचे.
मध्येच बर्थडे बॉय अलय आणि अजून एक मित्र अंकितला म्हणाले की एक कपल डान्स व्हायलाच हवा.
आता मात्र परीक्षा होती. मी म्हटलं होतं ना क्लासमध्ये जरी डान्स झाला असला तरी तिथं आम्ही फक्त क्लासमधले दोन स्टुडंट्स होतो.
इथं म्हणजे त्याचे मित्र आम्हाला प्रोस्पेक्टिव्ह कपल म्हणूनच बघत होते.
मी इतकी टेन्स झाले. पण अंकितने माझा हात पकडला. आणि त्याच्या डोळ्यात पाहताच एकदम रिलॅक्स झाले मी. फक्त पापण्यांची एक हालचाल 'मी आहे ना" म्हणणारी. आणि सगळा भोवताल विसरून त्याच्या तालात मर्ज झाले मी.
या लोकांनी ठरवून बॉलीवूड नाईटसाठी प्लॅन केला होता. गाणं वाजायची वाट आम्ही सोडून सगळे बघत होते पण अख्खं मिनिट पूर्ण शांतता होती. मी पण गाणं का वाजत नाहीय याचा विचार करत होते. ड्रेस कोड असावा असं बहुतेकांनी केलेलं ब्लॅक नेव्हीब्लू किंवा डार्क ब्राऊन ड्रेसिंग. त्यात मी एकटीच लाईट ग्रीन कलरचा टॉप घातलेली होते.
त्यांच्या ग्रुप मधले सगळे पट्टीचे डान्सर्स आमच्या भोवती उभे होते. अगदी तयारीत .
आम्ही दोघेही डीजे कडे बघायला लागलो. तर अलय तिथेच उभा होता. त्या शांततेच त्याचा हळू पण स्पष्ट आवाज आला. "द स्टेज इज यूअर्स गाईज. " आणि हळूहळू काहीतरी गुंगी चढावी तसं गाणं वाजू लागलं, कहते हे खुदा ने इस जहां मे सभी के लिये..
त्या बीट्सवर अंकितने मला हळुवार लीड करायला सुरू केलं. बचाता आमच्या क्लासमध्ये आत्ताच थोडं बेसिक सुरू झालं होतं. पण बाकी सगळे प्रो होते. अंकित मला सोपं जाईल अशा स्टेप्स घेत होता.
त्याच्या पॉईज कडे बघू की माझ्या स्टेप्स नीट होत आहेत याकडे लक्ष देऊ? असं सुरुवातीला झालं खरं. पण मी नंतर एकदम फ्लोई झाले.
हळुवार पण अतिशय उत्तम मीटर मधलं ते गाणं चढत गेलं, शब्द भिनत गेले.
"तू हम सफर है फिर क्या फिकर है "
म्हणत असताना अंकितने एका क्षणात हातावर मला अलगद तोललं आणि दुसऱ्या क्षणात त्याच्यापासून दूर केलं.
थोडंसं दूर पण समोरासमोर त्या अर्धक्षणात .. त्याचवेळी त्याचे अर्जवी डोळे पुढच्या ओळीबरोबर लिप सिंक करून म्हणत होते
"जीने की वजह ही यही मरना इसीके लिये.. "
हळुवारपणे एकावर एक मजले बांधत पत्त्यांचा बंगला उभा राहावा तसा शेवटच्या गिरकीने डान्स संपला. आमच्या आसपास फेर धरणारे त्याचे मित्र टाळ्या वाजवत जवळ आले. "यु गाईज रॉकड इट टुडे.. वॉट केमिस्ट्री! "
आणि मग हळूच थोडे पांगले आसपास.
काही क्षण त्या आसमंतात फक्त मी, अंकित आणि रात्रीच्या आकाशात गावाबाहेरच्या डोंगरावरून तार्यांचा, नक्षत्रांचा, तारकामंडलांचा खच दिसावा तसं त्या नाचातल्या असंख्य क्षणार्धांचं एकमेकांशी जोडलं गेलेलं चमकतं जाळं इतकेच होतो.
काही वेळाने अलय माझ्याशी बोलायला आला. "कशी आहेस रसा? खरंच बोर नाही ना झालीस? अपार्ट फ्रॉम द डान्स.. " त्याने अंकित कडे पाहिलं.
मी नाही म्हटलं. आणि पुढे म्हटलं "नाव खूप छान आहे तुझं."
"खरंच? सांग बरं काय अर्थ आहे माझ्या नावाचा?" तो म्हणाला.
बाजूची मैत्रीण , " अरे ये सबको पूछता है लेकीन किसिको नही आता" म्हणाली.
अलय हसला.
मी म्हटलं, जो संपत नाही तो. चिरंतन.
तो आश्चर्यचकित होत हसला. "Really? Someone I met, knows this for the first time. Wow.. "
"अंकित, लकी यु " अलय त्याच्या पाठीवर थाप मारत म्हणाला.
अंकितचा चेहरा एकदम आक्रसला. एकच क्षण. मग पुन्हा हसरा झाला.
" चला मी तुमचा फार वेळ घेत नाही. एंजॉय गाईज. " म्हणत अलय थोडासा बाजूला सरकला.
मग यथावकाश जेवणं झाली. हे अकरा नंतर कधीतरी जेवणं मला मनापासून आवडत नाही. पण काय करणार? जास्त भूक पण नव्हती.
अजूनही आम्ही त्या डेझमधेच होतो. निरोपाची बोलणी चालू होती.
इतक्यात माझा फोन वाजला. शिवानीचा फोन. तिला महिती होतं आज मी पार्टीला जाणार आहे. मी पोचले असेन अशा अंदाजाने तिने फोन केला होता.
मी स्व तःला एक्स्क्युज करत बाहेर आले. शिवानीला पटकन सांगितलं की अजून निघतोय इथून. घरी गेले की फोन करते.
इतक्यात अंकित आलाच. किती आनंदी दिसत होता तो!
" ऑफिसका फोन था? "
" नाही. शिवानीचा. सांगितलं तिला थोड्या वेळात पोचते म्हणून." योग्य वेळी सावरून इतकंच बोलले.
" ठीक है चलो. सच मे लेट हुआ है ना तुम्हे"
मी बसत असताना कुणीही आजूबाजुला नसताना पण तो कुजबुजत म्हणाला , " आज का सब से मुश्किल काम. तुम्हे घर छोडना. "
" थोडा जल्दी निकलते तो एक लाँग राईड पे चल्ते पर अब लेट हुआ है. फिर किसी दिन"
- क्रमशः