कॅनडातल्या एका छोट्या गावात रेल्वेलाईन शेजारच्या घरात खिडकीत बसून, रुळावरुन थडथडत धावणार्या मालगाड्यांची वाट बघत बसणं हा पाच वर्षाच्या छोट्या फ्रेडीचा आवडता छंद. मालगाड्यांची वर्दळ जेव्हा कमी होत असे तेव्हा रेल्वेलाईन पलिकडे पसरलेलं मोठ्ठ्च्या मोठ्ठं माळरान न्याहाळत बसणं हे फ्रेडीचं अजून एक काम. हिरव्यागार गवतात उगवलेली पिवळी-पांढरी रानटी फुलं,त्यावर घोंघावणार्या मधमाशा, रंगीबेरंगी फुलपाखरं, मधनूच भिरभिरणारे चतुर, फ्रेडी आपल्या पिटुकल्या डोळयांनी तासनतास निरखत बसे. एके दिवशी मांजरीच्या पिल्लासारख्या मऊमऊ अंगाच्या मधमाशीला पाहून अगदी न रहावल्याने फ्रेडी धावतच तिला पकडायला गेला. मधमाशीच्या अगदी जवळ जाताच मधमाशीने फ्रेडीच्या हाताला जोरदार डंख मारला. हाताला जोराचा झटका बसलेला फ्रेडी कळवळतच आईकडे धावला. आईने लागलीच जखमेवर मलमपट्टी करुन छोट्या फ्रेडीला समजावलं, "निसर्गाने संरक्षणासाठी मधमाशांना जन्मतःच तजवीज केलेली असते. नुसत्या हाताने मधमशी पकडायला गेलं तर त्या स्वरक्षणासाठी डंख मारतात. यापुढे कुठल्याही किट्काला नुसत्या हाताने स्पर्श करायला जाऊ नकोस." रोज खिडकीतून दिसणार्या पिटुकल्या मधमाशा इतक्या जोराने हल्ला करुन स्वतःच रक्षण करतात या गोष्टीचं फ्रेडीला राहून राहून कुतुहल वाटत होतं. वयाच्या पाचव्या वर्षी किट्क जगताशी जवळून झालेली ही छोटी ओळख फ्रेडीच्या आयुष्याला पुढे एक अनपेक्षित कलाटणी देणार होती.
कॅनडातल्या एका छोट्या गावात रेल्वेलाईन शेजारच्या घरात खिडकीत बसून, रुळावरुन थडथडत धावणार्या मालगाड्यांची वाट बघत बसणं हा पाच वर्षाच्या छोट्या फ्रेडीचा आवडता छंद. मालगाड्यांची वर्दळ जेव्हा कमी होत असे तेव्हा रेल्वेलाईन पलिकडे पसरलेलं मोठ्ठ्च्या मोठ्ठं माळरान न्याहाळत बसणं हे फ्रेडीचं अजून एक काम. हिरव्यागार गवतात उगवलेली पिवळी-पांढरी रानटी फुलं,त्यावर घोंघावणार्या मधमाशा, रंगीबेरंगी फुलपाखरं, मधनूच भिरभिरणारे चतुर, फ्रेडी आपल्या पिटुकल्या डोळयांनी तासनतास निरखत बसे. एके दिवशी मांजरीच्या पिल्लासारख्या मऊमऊ अंगाच्या मधमाशीला पाहून अगदी न रहावल्याने फ्रेडी धावतच तिला पकडायला गेला. मधमाशीच्या अगदी जवळ जाताच मधमाशीने फ्रेडीच्या हाताला जोरदार डंख मारला. हाताला जोराचा झटका बसलेला फ्रेडी कळवळतच आईकडे धावला. आईने लागलीच जखमेवर मलमपट्टी करुन छोट्या फ्रेडीला समजावलं, "निसर्गाने संरक्षणासाठी मधमाशांना जन्मतःच तजवीज केलेली असते. नुसत्या हाताने मधमशी पकडायला गेलं तर त्या स्वरक्षणासाठी डंख मारतात. यापुढे कुठल्याही किट्काला नुसत्या हाताने स्पर्श करायला जाऊ नकोस." रोज खिडकीतून दिसणार्या पिटुकल्या मधमाशा इतक्या जोराने हल्ला करुन स्वतःच रक्षण करतात या गोष्टीचं फ्रेडीला राहून राहून कुतुहल वाटत होतं. वयाच्या पाचव्या वर्षी किट्क जगताशी जवळून झालेली ही छोटी ओळख फ्रेडीच्या आयुष्याला पुढे एक अनपेक्षित कलाटणी देणार होती.
मेक्सिकोतल्या सिएरा माद्रेच्या डोंगराळ भागातले रस्ते फुलपताकांनी सजले होते. आस्तेकांच्या काळापासून चालत आलेला 'एल दिया दे लोस मुएर्तोस" - मृतात्म्यांसाठी सणाचा आज दिवस. घरोघरी जय्यत तयारी चालली होती. मंडळी नविन कपडे घालून, तयार होऊन स्मशानाच्या दिशेने मृतात्म्यांसाठी भेट्वस्तू घेउन लगबगीने निघाली होती. जन्माने मेक्सिकन असलेली कॅथी, अमेरिकन केन सोबत थोड्या निराशेनेच स्मशानाकडे निघाली होती. कॅथी-केन दांपत्याच्या निराशेचं कारणंही तसंच होतं. गेले दोन वर्ष रोज मोटरसायकलवरुन गावोगाव फिरुन दोघे हताश झाले होते. जंगजंग पछाडूनही हाती काहीच लागलं नव्हतं. केनसोबत स्मशानाकडे जाताच कॅथीला प्रसन्न वाटू लागलं. जागोजागी थडग्यांवर ठेवलेली रंगीबेरंगी फुलं, मृतात्म्यांसाठी आणलेले गोड्धोड पदार्थ, फळांच्या वासाने वातावरण प्रसन्न झालं होतं. फुलाफळांच्या वासाने रंगीबेरंगी फुलपाखरं, मधमाशा स्मशानात भिरभिरत होत्या आणि अचानक कॅथीचं लक्ष सिएरा माद्रेच्या पर्वतरांगेकडे गेलं. केनला खूण करुन तिने त्या दिशेने काहीतरी दाखवलं. क्षणातच दोघांच्या चेहर्यावर पुसटशी आनंदाची लकेर उमटली. ज्या कोड्याची उकल शोधण्याकरीता कॅथी व केनच नव्हे तर दूरवर कॅनडात अहोरात्र कुणीतरी धडपडत होतं त्या कोड्याचा एक महत्वाचा दुवा हाती लागला होता. जिग्सॉ पझलच्या अनेक तुकड्यांच्या पसार्यात एक महत्त्वाचा तुकडा योग्य ठिकाणी जुळला होता.
खाली पसरलेला निळाशार अथांग समुद्र आणि त्याहून निळं डोक्यावरचं आकाश, मध्यान्हीचा सुर्य तळपत होता. हवेच्या प्रचंड झोताबरोबर चिमुकल्या पंखांच्या सहय्याने 'अॅना' जीव तोडून ऊडत होती. पंखातली शक्ती हळूहळू कमी होत होती. क्षणभर टेकायला दूरदूर पर्यंत जमिनीचा पुसटसा मागमूस दिसत नव्हता. छोट्या 'अॅना' साठी हे मोठं धाडस होतं पण 'अॅना'जवळ दुसरा पर्याय उपलब्ध नव्ह्ता. हिवाळा जवळ आल्याची चाहूल तिच्या तीक्ष्ण मेंदूला केव्हाच लागली होती. आणि हा दूरवरचा प्रवास करणारी ती काही एकटी नव्हती. तिच्या आधी कित्येक पिढ्या वर्षानुवर्ष हा समुद्र पार करतच होत्या. तिलाही हे करावंच लागणार होतं. स्वतःसाठी नव्हे तर पुढच्या पिढीसाठी, ती जगवण्यासाठी, फुलवण्यासाठी. पण 'अॅना' नक्की कुठे चालली होती? आणि का?
निसर्गाच्या एका विलक्षण कोड्याचं गुपित 'अॅना'च्या प्रवासात दडलं होतं. प्रवास नुसत्या किलोमीटर, मैल असल्या फुटकळ परिमाणात मोजला जाणारा नव्हे तर प्रवास अनेक पिढ्यांचा, वर्षानुवर्षं अविरत चालत आलेला. किटकशास्त्रातलं एक अजब स्थलांतर.
फ्रेडीचं निसर्गावरचं निस्सिम प्रेम, वर्षानुवर्षं त्याने उपसलेले कष्ट, निराशेत जागलेल्या अनेक रात्री, कॅथी-केनची अफाट धडपड आणि त्याच्याच जोडीला अमेरिकेतल्या हजारो निरपेक्ष हातांनी केलेली मदत - या सर्वाचा परिपाक म्हणून निसर्गाच्या एका अनोख्या चमत्कारची उकल होणार होती. या जिग्सॉ पझलचा शेवटचा तुकडा जेव्हा जोडला गेला तेव्हा "२० व्या शतकातला किटकशास्त्रातला एक सर्वात मोठा शोध" जगाला अवाक करुन टाकणार होता.
कॅनडात जन्मलेला छोटा फ्रेडी म्हणजेच प्रसिद्ध प्राणीशास्त्रज्ञ डॉ. फ्रेड ऊर्कहट (Dr. Fred Urquhart).खिडकीत तासन तास बसून पक्षी आणि किटकांना न्याहाळणारा फ्रेडी हळूहळू भीड चेपल्यावर किडे पकडू लागला. फुलांवर बसून मध चाखण्यात गुंग असलेली फुलपाखरं,भुंगे काचेच्या बरणीने हळूच झडप तो घालून पकडत असे. किटकांनी भरलेली बरणी घरी आणून निरिक्षण करीत बसणं हा फ्रेडीचा नवा उद्योग. बरेचदा फ्रेडीची ही शिकार बंद बरणीत एक-दोन दिवसात गुदमरुन मरुन जात. असे मृत किट्क मग फ्रेडीच्या 'कलेक्शन बॉक्स'मधे संग्रह करण्यासाठी जात असत. शाळेजवळच्या दलदलीभोवती फिरणारे विविध प्रकारचे किटक बघत बसणं फ्रेडीला आवडत असे. शाळा आणि किटकसंग्रह याव्यतिरिक्त फ्रेडीची आवडती जागा म्हणजे गावतलं सार्वजनिक वाचनालय. साधारण आठ वर्षाचा होईपर्यंत फ्रेडीने या वाचनालयतल्या लहान मुलांच्या विभागातील निसर्ग व विज्ञानावरील सर्व पुस्तकांचा फडशा पाडला होता. निसर्गाविषयीची त्याची आवड व वाचनाचा अवाका पाहून ग्रंथपाल मिस मॅकिनटोश यांनी फ्रेडीला मोठ्यांच्या विभागातली पुस्तक वाचायची परवानगी दिली. परवानगी मिळताच फ्रेडीने निवडलेलं पहिलं वहिलं पुस्तक होतं, चार्ल्स डार्विन यांचं, "Origin of the Species".
पुढे महाविद्यालयात जीवशास्त्र हा विषय अभ्यासासाठी निवडल्यावर, किटकांविषयी शास्त्रीय माहिती फ्रेडला मिळत गेली. त्यातच त्याची आवड व उत्सुकता पाहून जीवशास्त्र शिकवणारे प्राध्यापक श्री.टायलर यांनी फ्रेडीला जीवशास्त्रची प्रयोगशाळा खुली करुन दिली. या प्रयोगशाळेत बंद बाटलीत ठेवलेले अनेक प्रकारचे पक्षी, किटक त्यांची शास्त्रीय माहीती फ्रेडसाठी मोठा खजिना होता. संगीताची आवड असल्याने फ्रेड भुंग्यांची गुणगुण, रातकिड्यांची किरकिर यात संगीत शोधत असे. याच आवडीचा उपयोग करुन त्याने पुढे 'Morphology and Ecology of the Orthoptera' या विषयात १९४० साली त्याने डॉक्टरेट मिळवली.
याच प्रयोगशाळेत एक विभाग फुलपाखरांसाठी ठेवलेला होता. विविध प्रकारच्या रंगीबेरंगी फुलपाखरांमधे नारींगी-काळया पंखांच्या फुलपाखरांकडे फ्रेड्चं विशेष लक्ष आकर्षून घेतलं. हिच ती फुलपाखरं फ्रेड लहान असतांना उन्हाळ्याच्या दिवसात हजारोंच्या संख्यने आसपास उडतांना पहात असे. आणि हिवाळा होताच आश्चर्यकारकरित्या ती गायब होत असतं. हिवाळ्यात हि फुलपाखरं जातात तरी कुठे? हा छोट्या फ्रेडीला नेहमीच पडणारा प्रश्न! फ्रेडला बुचकळ्यात टाकाणारी ही फुलपाखरं होती - 'मोनार्क'.
मोनार्क बटरफ्लाय अथवा मोनार्क या नावाने ओळखली जाणारी ही उष्णकटीबंध प्रदेशात लाखो वर्षांपासून अस्तित्वात असणारी फुलपाखराची एक जात. उत्तर अमेरिकेत सुरवातीच्या काळातल्या स्थायिक होणार्या बरेचसे लोक (इ.स.१६५०-१७०२) इंग्लंड व हॉलंड या देशातून आल्या होते. अमेरीका खंडात पाहिलेली ही सुंदर आणि शानदार फुलपाखरांची ही जात या लोकांना नविन होती. तुलनेने मोठाले पंख, गडद नारींगी-काळा रंग, त्यावर अधून मधून दिसणारे पांढरे ठिपके पाहून या फुलपाखरांना त्यांनी आपला लोकप्रिय राजा 'King of Orange विल्यम दुसरा' याच्या नावावरुन 'मोनार्क' असं राजेशाही नाव दिलं. मोनार्क या शब्दाचं मुळ Monarkhes या ग्रीक शब्दात आहे. Monos म्हणजे एकटा + arkhein म्हणजे राज्य करणे. हाच शब्द पुढे लॅटीन मधे Monarcha व इंग्रजीत Monarch असा वापरला जातो. मोनार्क जातीच्या फुलपाखाराच वैज्ञानिक नाव Danaus. Danaus हा ग्रीक देवता झ्युसचा नातू. असं म्हणतात Danaus च्या मुली आपला सक्तीने केला जात असलेला विवाह टाळण्यासाठी आपली जन्मभूमी सोडून पळून गेल्या. मोनार्क या नावाच्या बरोबरीने 'King Billy butterfly' तसंच मिल्कविड बटरफ्लाय असंही या फुलपाखरांना संबोधलं जातं.
अमेरिकेत टेक्सास ते न्यू इंग्लंड, फ्लोरिडा ते मिनेसोटा तसंच दक्षिण कॅनडात उन्हाळ्याच्या दिवसात सर्रास दिसणारी ही फुलपाखरं फक्त मिल्कविडच्या पानांवर आपली गुजराण करतात. साधारण अर्धा ग्रॅम वजनाची, चार पंख व सहा पाय असलेल्या या फुलपाखरांत नर हे माद्यांपेक्षा गडद रंगाचे असतात. इतर फुलपाखरांच्या जातींप्रमाणे मोनार्कही जन्मापासून अंड(३-४ दिवस), अळी (१०-१४ दिवस), कोष(१०-१४ दिवस) आणि प्रौढावस्था अशा चार अवस्थेतून जातात. सर्वात महत्त्वाची अवस्था अर्थातच अळी. या काळात मूळ आकारमानापेक्षा अळी २००० पट वाढते.
उन्हाळ्यात हजारोंच्या संख्येने उत्तर अमेरीकेत आढळणारे मोनार्क हिवाळ्याची चाहूल लागताच मात्र आश्चर्यकारकरित्या गायब होतात. फुलपाखरांच्या इतर अनेक जातींप्रमाणे मोनार्कही हिवाळ्याच्या दिवसात उष्ण प्रदेशात स्थलांतर करतात. परंतु एकदा स्थलांतर केल्यावर फिरुन परतणारी मोनार्क ही एकमेव जात!
पण मग हिवाळा सुरु होताच हे नाजूकसे जीव जातात तरी नक्की कुठे? संपूर्ण हिवाळा त्यांचं वास्तव्य कुठे असतं? लहानपणासून फ्रेडला सतावणार्या या प्रश्नांची उकल करण्यात डॉ. फ्रेड ऊर्कहट (Dr. Fred Urquhart). यांनी एक- दोन नव्हे तर आपल्या आयुष्याची तब्बल चाळीस वर्ष या प्रश्नांची उत्तरं शोधण्यात खर्ची केली. ही कथा आहे छोट्या प्रवाशांच्या सर्वात लांबच्या प्रवासाची.
(क्रमशः)
संदर्भ :
(१) Monarch Butterflies - Mysterious Travelers By Bianca Lavies
(२) The Incredible Journey of the Butterflies (DVD -2009)
(३) The Monarch Butterfly - International Traveler By Fred Urquhart
(लेखात वापरलेली सर्व चित्रे आंतरजालावरून घेतलेली आहेत व प्रताधिकारमुक्त आहेत.)
शिक्षण पूर्ण करताच डॉ. फ्रेड ऊर्कहट यांनी प्राणीशास्त्र हा विषय शिकवण्यास सुरवात केली. तरीही हिवाळ्यात अचानक गायब होणार्या मोनार्क फुलपाखरांचं कोडं मात्र त्यांना स्वस्थ बसू देईना. थोड्या निरिक्षणांती त्यांना दक्षिणेकडे जाणारी फुलपाखरं उन्हाळा सुरु झाला की परतांना दिसून आली.
त्यातच पुढे दुसरं महायुद्ध सुरू झाल्याने मोनार्कसंबंधी संशोधनाला अर्धविराम देउन डॉ. फ्रेड यांना रॉयल कॅनेडियन एअर फोर्सच्या हवामान विभागात ऑफिसर म्हणून रुजू व्हावं लागलं. दुसरं महयुद्ध संपल्यावर फ्रेड यांनी प्राध्यापकाची नोकरी पुन्हा सुरु केली. त्याच वेळी सहकारी नोरा पॅटरसन या तरुणीशी त्यांची ओळख झाली. किटकांविषयी विशेषतः फुलपाखरांविषयी असणारं कुतुहल व प्रेम या दोघांना एकत्र आणण्यात कारणीभूत ठरलं. नोराशी विवाह झाल्यावर मोनार्क स्थलांतराचा मागोवा काढणं दोघंचं स्वप्न बनलं.
मोनार्क जातीची फुलपाखरं स्थलांतर करत असतीलच तर त्यांच्या प्रवासाचा मार्ग, लागणारा वेळ, अंतर व दिशा जाणून घेणं अत्यावश्यक होतं. यासाठी या फुलपाखरांच्या मागावर रहाणं आवश्यक होतं, पण शक्य मात्र नव्हतं. यावर डॉ. फ्रेड यांनी या फुलपाखरांच्या पंखांवर काहीतरी खूण करण्याचं ठरवलं. अतिशय नाजूक, पातळ आणि चपळ अशा या फुलपाखरांच्या पंखांवर खूण करायची तरी कशी हा यक्षप्रश्न होताच. यावर उपाय म्हणून फुलपाखरांना एखाद्या लेबल अथवा चिकट कागदाने टॅग करायची युक्ती फ्रेड यांनी काढली. त्यानुसार रंगीबेरंगी कागदाला गोंद लावून फुलपाखराच्या पंखाला तो कागद चिकटवयचा प्रयत्न त्यांनी केला. पण जसं फुलपाखरु हवेत उडायला लागलं तसं हवेच्या जोरदार झोताने तो कागद उडून गेला. वेगवेगळ्या प्रकारचे स्टिकर्स, कागद, चिकटपट्ट्या वापरुन डॉ. फ्रेड यांनी मोनार्कना टॅग करायचा प्रयत्न केला पण हवेच्या प्रचंड झोतापुढे यातला कुठलाही प्रयत्न यशस्वी झाला नाही. पुढे नोरा आणि फ्रेड यांनी कॅलिफोर्नियामधील मॉनिटरी पेनिन्सुला या भागातल्या मोनार्क्सवर पोस्टाच्या स्टँपप्रमाणे प्रिंटेड लेबलचा वापर करायचं ठरवलं. परंतु एखाद्या मोठ्या उत्सवानंतर रंगीबेरंगी पताका रस्त्यावर विखुरल्या जाव्यात त्याप्रमाणे एका रात्री मुसळधार पावासात भिजललेया गवतात हे सर्व स्टँप गळून पडले. अजून एक अयशस्वी प्रयत्न नोरा आणि फ्रेड यांच्या पदरात पडला.
(नोरा आणि फ्रेड ऊर्कहट)
अनेक अयशस्वी प्रयोगानंतर १९४० साली डॉ. फ्रेड यांच्या एका मित्राच्या सल्ल्यानुसार काचेच्या वस्तू विकणारे व्यापारी किंमती चिकटवायला जे लेबल वापरतात त्या लेबल्सचा उपयोग करायचं ठरवलं. या लेबल्सना चिकटण्यासाठी विशेष द्रव्य वापरलं जातं ज्यामुळे याप्रकारची लेबल सहजासहजी निसटू शकत नाहीत, सरतेशेवटी फ्रेड व नोरा यांना पट्कन चिकटण्याजोगी, हलक्या हाताने लावता येण्यासारखी, फुलपाखरांच्या नाजूक पंखांना इजा न करणारी व कुठल्याही प्रकारच्या हवामानाला तोंड देतील अशी ही लेबल्स मिळाली होती. मनाजोगी लेबल्स मिळाल्यावर फ्रेड व नोरा यांनी मोनार्क टॅग करायला सुरवात केली. प्रत्येक टॅगवर एक क्रमांक लिहिलेला असे तसेच 'Send to zoology University of Toronto Canada' असा मजकूर छापलेला असे. काम सुरु होताच हळूहळू नोरा व फ्रेडच्या लक्षात येऊ लागलं की स्थलांतराचा मार्ग शोधण्यासाठी लाखोंच्या संख्येने मोनार्क टॅग करणं आवश्यक होतं आणि हे काम फक्त दोन माणासांना पेलणं अशक्य होतं. यावर उपाय म्हणून डॉ. फ्रेड यांनी १९५२ साली 'Natural History Magazine' या मासिकात 'Marked Monarch' नावाचा लेख लिहून मोनार्क स्थलांतराविषयी सविस्तर माहीती लिहीली तसंच या प्रकल्पात मोनार्क्सना टॅग करण्याच्या कामासाठी स्वयंसेवकांना आवाहनदेखील केले. या आवाहनाला उत्तर म्हणून १२ जणांनी विनामोबदला मदत करण्याविषयी पत्राद्वारे कळविले. या सकारात्मक सुरवातीबरोबर नोरा व फ्रेड यांनी 'Insect Migration Association' या संस्थेची स्थापना केली.
(अमेरिकन वृत्तपत्रातील स्वयंसेवकांना आवाहन करणारी जाहिरात)
बारा स्वयंसेवकांनी सुरु झालेल्या या संस्थेची सदस्यसंख्या बघता बघता १९७१ पर्यंत ६०० च्या वर पोहोचली. १९६५ साली फ्रेड आणि नोरा यांच्या 'Insect Migration Association' ला नॅशल जिओग्राफिक सोसायटी, नॅशनल रिसर्च काउंसिल ऑफ कॅनडा व अनेक स्वयंसेवकांकडून अनुदानाच्या रुपात भक्कम आधार लाभला.
अमेरीकाभर पसरलेल्या स्वयंसेवकांनी हजारोंच्या संख्येने फक्त मोनार्क्स टॅग करण्यात हातभार लावला असं नाही तर टॅग केलेले मोनार्क्स आपल्या आसपास आढळल्यावर लागलीच दूरध्वनी अथवा पत्राद्वारे ती माहीती डॉ. फ्रेड यांना कळवित असत. कॅलिफोर्नियातील अशाच एका गोल्फरला आपला पहिला स्ट्रोक मारण्यासाठी तयार असतांना गोल्फबॉलवर टॅग केलेलं सुंदर मोनार्क फुलपाखरू आढळलं. त्याने लागलीच पत्राद्वारे डॉ. फ्रेड यांना त्याची माहीती कळवली. अशा प्रकारची माहीती मिळताच नोरा व फ्रेड ती टिपून ठेवत असत, तसंच नकाशावर मार्ग आखून ठेवत. कॅनडातील ओंटारीओ, अमेरीकेच्या पूर्वेकडील मेन या भागात टॅग केली गेलेली फुलपाखरं दक्षिणेकडे कॅलिफोर्निया, टेक्सास, फ्लोरिडा या भागात आढळली. या संकलीत माहीतीच्या आधारावरून मोनार्क्सच्या स्थलांतराच्या मार्गाचं पुसटसं स्वरुप समोर येत होतं. त्यातून काही निरिक्षणं नोंदवली गेली.
(टॅग केलेलं मोनार्क फुलपाखरु)
अनेक स्वयंसेवकांनी नोदवलेल्या निरीक्षणाच्या सखोल अभ्यासानंतर काही आश्चर्यजनक माहीती उघड झाली. आतापर्यंत नोंदवलेल्या निरिक्षणानुसार - बहुतांश नर मोनार्क उन्हाळ्यात परततांना मृत पावल्याचे आढळून आले. स्थलांतर करतांना मोनार्क रात्री प्रवास करीत नसल्याचं आढळलं तसंच एकच क्रमांक असलेलं टॅग मोनार्क फुलपाखरु एकाच दिवशी दोन वेळा दोन वेगवेगळ्या ठिकाणी पकडून सोडण्यात आलं. या फुलपाखराने एका दिवसात तब्बल ८० मैल प्रवास केला होता.
कॅनडातल्या ओंटारीओमधे उन्हाळ्यात आढळणारी बरीचशी फुलपाखरं नविन, तजेलदार पंखांची, टवटवीत असत परंतु त्यांच्या जोडीला थकलेली, निस्तेज मोनार्क्सही नजरेला पडत. या मोनार्क्सचं अभ्यासपूर्ण निरिक्षण केल्यानंतर असं आढळलं की एकाच वेळेला मोनार्क्सच्या निरनिराळ्या पिढ्या स्थलांतर करतात. तजेलदार पंखांची मोनार्क्स निश्चितच जवळच्या ठिकाणावरून आलेली असणार तर थोडी निस्तेज पंख असलेली मोनार्क फुलपाखरं बराच लांबचा पल्ला पार करुन येत असावीत. या निरीक्षणाच्या आधारावर असा निष्कर्ष काढण्यात आला की जी मोनार्क स्थलांतर करतात ती उन्हाळा संपता संपता अंड्यातून बाहेर आलेली असतात. अशा उशीरा जन्माला आलेल्या मादी फुलपाखरांचं अंडाशय अपुर्या प्रकाशाअभावी पूर्ण वाढ झालेलं नसतं. अशा माद्या जोवर हिवाळा काढू शकतील अशा प्रदेशापर्यंत पोहोचत नाहीत तोवर समागम करण्यास असमर्थ ठरत असाव्यात. अशा प्रदेशात मिळणार्या मुबलक सूर्यप्रकाशात या माद्यांचं अंडाशय परिपक्व होऊन त्या स्थलांतर करीत असतांनाच अंडी घालत असाव्यात. त्यातून जन्म घेणारी नविन मोनार्क्स ही कमी अंतराचा प्रवास करुन आल्याने तजेलदार दिसत असावीत.
उत्तर अमेरीकेच्या दक्षिण भागात सापडणार्या टॅग केलेल्या मोनार्क्सवरुन नवनविन निष्कर्ष निघत होते, अंदाज बांधले जात होते तरीही स्थलांतर करणारी मोनार्क फुलपाखरं हिवाळ्यात नक्की कुठे वास्तव्य करतात हे मात्र अजूनही गुपितच होतं. स्वयंसेवकांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर स्थलांतराचा मार्ग ढोबळमानाने उत्तरेच्या थंड प्रदेशांकडून दक्षिणेकडच्या उष्णप्रदेशांकडे जाणारा होता. त्यामुळे टेक्सास ते मेक्सिको यामधे कुठे ना कुठे हिवाळ्यात त्यांचं वास्तव्य असल्याचा कयास डॉ. फ्रेड यांनी बांधला. त्यानुसार फ्रेड आणि नोरा यांनी काही काळ आपलं बस्तान टेक्सासमधे हलवलं. टेक्सासच्या दक्षिणेकडील भागात काही काळ शोधाशोध करुन काहीही हाताला न लागल्याने निराश मनाने दोघेही कॅनडात परतले. मधली काही वर्ष हताशपणे काढल्यानंतर नोरा यांनी मेक्सिकोच्या वृत्तपत्रात मोनार्क स्थलांतर संशोधनाविषयी माहीती देणारी तसंच मोनार्क फुलपाखरं टॅग करण्यासाठी स्वयंसेवकांची आवश्यकता असल्याची जाहीरात दिली. फारशी अपेक्षा नसतांना अनपेक्षितरित्या २६ फेब्रुवारी १९७३ रोजी पत्राद्वारे या जाहिरातीला केनेथ सी. ब्रगर या तरूणाचा प्रतिसाद आला. मेक्सिको सिटीतून लिहिलेल्या या पत्रात केनेथ म्हणतो, "I read with interest your article on Monarch. It occurred to me that I might be of some help...."
मेक्सिकोस्थित अमेरिकन केन ब्रगर मोनार्क स्थलांतराच्या अभ्यासातील एक महत्त्वाचा दुवा ठरणार होता.
(क्रमशः)
संदर्भ :
(१) Monarch Butterflies - Mysterious Travelers By Bianca Lavies
(२) The Incredible Journey of the Butterflies (DVD -2009)
(३) The Monarch Butterfly - International Traveler By Fred Urquhart
मोनार्क - १
मोनार्क - २
मोनार्क - ३
केनेथ अर्थात केन ब्रगर, मेक्सिकोत वास्तव्यास असणारा अमेरिकन निसर्ग अभ्यासक. विस्कॉन्सिनमधे जन्मलेल्या केनला तिथला कडक हिवाळा रुचत नसे. त्यामुळे हिवाळ्याचे दिवस मेक्सिकोत व्यतित करण्यासाठी आपला पाळीव कुत्रा कोलासोबत छोट्याश्या Winnebago(१) मधे त्याने फिरतं घर थाटलं होतं.
कॅटेलिना आग्वादो - धीट, स्वतंत्र बाण्याची विशीतली मेक्सिकन तरूणी. लहान वयातच तिने मेक्सिको, ग्वाटेमाला, एल साल्वादोर तसंच बरचसा अमेरिका व कॅनडाचा भूभाग एकटीने पायथा घातला होता. सुट्टी घालवण्यासाठी अकापुल्कोच्या नयनरम्य किनार्यावर मित्रमैत्रीणींसोबत आलेली कॅटेलिनाला पहाताचक्षणी केन तिच्या प्रेमात पडला होता.खरंतर कॅटेलिनाच्या एका मित्रानेच ही भेट घडवून आणली होती. कॅटलीनाचं मोहक रुप आणि धाडसी स्वभाव केनला तिच्या प्रेमात पडायला पुरेसा ठरला. त्यातच फुलपाखरांविषयी वाटणार्या जिव्हाळ्यामुळे त्यांचं नातं अधिकच दृढ झालं.
डॉ. फ्रेड यांनी मेक्सिकन वृत्तपत्रात दिलेली जाहिरात जेव्हा कॅथीला दाखवली तेव्हा थोड्याश्या नाखुशीनेच ती उत्तरली, "Good Luck with Compesinos (२) and the Mexican Goverment." पण केनने नेटाने आपलं म्हणणं लावून धरल्यावर मात्र कॅथीकडे हो म्हणण्याशिवाय दुसरा कुठलाही मार्ग उरला नाही. कॅथीचा होकार या कामासाठी मोठा फायद्याचा होता. मेक्सिकन असल्याने तिची स्पॅनिश मातृभाषेची उत्तम जाण, चुणचुणीत, उत्साही व्यक्तिमत्त्व तसचं स्थानिक गावकर्यांशी असलेल्या ओळखी या सगळ्याचा आपसूकच मोनार्क संशोधनाकरीता उपयोग होणार होता.
डॉ. फ्रेड यांची पत्राद्वारे परवानगी मिळताच केन आणि कॅथीची भटकंती सुरु झाली. आठवडभर नोकरी करुन सुट्टीच्या दिवशी आसपासची गावं पाळीव कुत्रा कोला याच्यासोबत पालथी घालणं हा दिनक्रम झाला. अनेकदा दूरच्या अशा खेड्यात जाण्यासाठी कॅथीच्या मदतीने एखादा गावकरी वाटाड्या म्हणून बरोबर घेत असत. डॉ. फ्रेड यांनी संदर्भासाठी मोनार्क फुलपाखरांची छायाचित्र त्यांना देऊ केली होती. ही छायाचित्र दाखवून कॅथी गावकार्यांना अशाप्रकरच्या फुलपाखरांच्या शोधात आम्ही आहोत, हे काम आम्ही एका अभ्यासासाठी करतोय हे पटवण्याचा प्रयत्न करी. बरेचदा गावकरी नकरात्मक उत्तरं देत, कधी कधी चुकीची माहीती मिळे. अनेकदा त्यांना गावकर्यांच्या रोषाला ही सामोरे जावे लागे. कित्येकदा आपल्या गावात लपवलेलं गुप्तधन चोरायला ही मंडळी आलीत की काय असा संशय घेउन गावकर्यांनी कॅथी व केनला जीवे मारण्याची धमकीसुद्धा मिळत असे. या मनसोक्त भटकंतीत अनेकदा मुसळधार पावसाचा अडसर येत असे तर कधी कधी त्यांची Winnebago प्रवासात बिघडल्याने अवघड चढणीवर सामानसुमानासहीत चढावे लागे.
सुरवातीला डॉ. फ्रेड यांच्यासाठी स्वयंसेवक म्हणून काम करीत असल्याने बराचासा खर्च कॅथी आणि केनला आपल्या खिशातून करावा लागे. परंतु काही काळ डॉ. फ्रेड यांच्यासोबत काम केल्यावर त्यांच्या कामाविषयी खात्री पटल्यावर डॉ. फ्रेड यांनी केनची नियुक्ती आपला सहाय्यक म्ह्णून केली. त्यानंतर बराचसा खर्च फ्रेड यांच्या संस्थेतर्फे केला जाई. दिवस जात होते, प्रयत्न चालू होते परंतु हाताला काहीच लागलं नव्हतं. थोडं निराशेतच असलेलं कॅथी व केन हे दांपत्य थोड्याच दिवसात येऊ घातलेल्या मेक्सिकन सण 'एल दिया दे लोस मुएर्तोस"च्या तयारीला लागले. आस्तेकांच्या काळापासून चालत आलेला हा मृतात्म्यांसाठी सण. घरोघरी जय्यत तयारी चालू होती. सुट्टीच्या या दिवशी कॅथी व केनही आपल्या नेहमीच्या कामगिरीवर निघाले होते. सिएरा माद्रेच्या डोंगराळ भागात एका स्मशानाजवळ जेव्हा दोघे पोचले तेव्हा स्मशानात आपल्या पितरांसाठी रंगीबेरंगी फुलं आणि विविध प्रकारची फळं अर्पण करण्यासाठी एकच गर्दी जमली होती. कॅथी व केन या लोकांकडून काही माहीती मिळेल या आशेवर त्या दिशेने निघाले. थोडा वेळ स्मशानाजवळ शांततेत गेल्यावर कॅथीच लक्ष एका थडग्यावरील फुलांवर भिरभिरणार्या सुंदर फुलपाखरावर गेलं. नाजूक नारींगी पंखांवर काळेभोर ठिपके असलेलं ते फुलपाखरू मोनार्क तर नव्हे? डॉ. फ्रेड यांनी दिलेल्या छायाचित्रात दिसणारं फुलपाखरु असंच तर होतं. धडधडत्या ह्र्द्याने कॅथीने आसपासच्या थडग्यावर उडणार्या फुलपाखरांकडे पाहिलं. हो ते मोनार्कच होते! तिने केनला त्या फुलपाखरांकडे खूण करताच त्याचाही आपल्या डोळ्यांवर विश्वास बसेना. आसपास अजून बारकाईने निरिक्षण केलं असता सिएरा माद्रेच्या डोंगराळ रांगांकडे मोनार्क्सचा थवा उडतांना त्यांना आढळला. गेले दोन वर्ष जंगजंग पछाडूनही ज्या गोष्टीचा तीळमात्र सुगावा लागला नव्हता त्याच मोनार्क्सची गाठ अशी अचानक पडावी हा योगयोगच होता. केनने तात्काळ दूरध्वनी करुन डॉ. फ्रेड यांना संपर्क केला. अत्यानंदाने पलिकडून डॉ. फ्रेड यांचा आवाज आला, "We feel that you have zeroed in on the right area." मोनार्क्स स्थलांतर संशोधनाच्या कामात एक महत्त्वाचा दुवा हाती लागला होता.
अनेक दिवस वाट पाहिल्यानंतर मिळालेल्या या पहिल्या यशाने कॅथी आणि केन यांचा उत्साह द्विगुणित झाला. सिएरा माद्रेच्या घनदाट अरण्यात कुठेतरी मोनार्क फुलपाखरांचं हिवाळी वास्तव्य असलं पाहिजे या आधारावर पुढचा प्रवास चालू झाला. त्यातच एके दिवशी केन, कॅथीला भेट्ण्यासाठी याच भागातून प्रवास करीत होता. त्या अंधार्या रात्री पाऊस धोधो कोसळत होता. अतिशय अरुंद व नागमोडी वाटेवरुन प्रवास करीत असतांना अचानक एके ठिकाणी तो आश्चर्यचकीत होउन थबकला. जोरदार पावसाने सुकलेली पानं गळून पडावीत त्याप्रमाणे कित्येक मृत, जीर्ण-शीर्ण मोनार्क फुलपाखरांचा वर्षाव होउन गाडीच्या काचेवर ती चिकटली होती. त्या काळ्याकुट्ट रात्री ही मोनार्क्स नक्की कुठून आलीत याचा मात्र पत्ता लागत नव्हता. केनने लागलीच पत्राद्वारे डॉ. फ्रेड यांना या घटनेचा सविस्तर तपशील कळवला. यावर उत्तर आलं. "You must be getting really close. These butterfly remains suggested that birds had been feeding on large flocks of Monarchs."
या घटनेमुळे कॅथी आणि केनचं मनोधैर्य तर उंचावलंच होतं त्याबरोबर आता काहीही करुन या प्रकरणाचा छडा नक्कीच लावण्याचा ध्यासच घेतला. २ जानेवारी १९७५ चा तो दिवस कॅथी आणि केनसाठी नेहमीप्रमाणेच उजाडला. पण आज उगवलेला सूर्य मात्र त्यांच्या आयुष्याला नविनच वळण देणार होता. रोजच्याप्रमाणे दोघेही पहाटे पहाटे आपला पाळीव कुत्रा कोला आणि स्थानिक वाटाड्याला घेउन भटकंतीसाठी निघाले.सिएरा माद्रेची जरा अवघड अशी चढण चढल्यावर काही मोनार्क्सचे थवे भिरभिरतांना त्यांना आढळले. तिथेच आसपास लाकूड गोळा करणार्या एका गावकर्याजवळ चौकशी केली असता त्याने अजून थोडं वर सेतो पेलोन(Cerro Pelón)च्या आसपास या फुलपाखरांचे थवेच्या थवे असल्याची माहीती दिली.
घनदाट देवदार वृक्षांमुळे पहाटेच्या अंधुक प्रकाशातही काळाकुट्ट भासणारी, अरूंद, वळणावळवणाची अशी सेरो पेलोनला जाणारी चढणीची, पालापाचोळ्यांनी भरलेली वाट हळूहळू सूर्य माथ्यावर येऊ लागला तशी बरीच सुसह्य झाली. वळणावळणाची चढण ज्या ठिकाणी संपली त्याठिकाणी पोचताच कॅथी आणि केनला सुर्यप्रकाशात एकाएकी चमकणार्या नारींगी-तपकीरी रंगाने एका जागी खिळवून टाकलं. समोर दिसणारा नजारा अचंबित करणारा होता. कधीही न कल्पलेला निर्सगाचा अजब चमत्कार. लाखो नारिंगी-तपकीरी मोनार्क फुलपाखरं झाड्यांच्या फांद्यांना चिकटलेली, जणू झाडांना पानांऐवजी मोनार्कच बहरली असावीत. अगदी जंगलभरुन. जमिनीवर पहावं तर एखादा सुंदर, नक्षीदार गालिचा पसरावा तसा सकाळच्या थंड हवेत पंख बंद केलेली नारींगी-काळ्या रंगाची मोनार्क्स पसरली होती. नजर जावी तिथे दूरदूर पर्यंत पसरलेली मोनार्क्स.
"I see them! I see them!" कॅटेलिना अत्यानंदाने चित्कारली.
"We have located the colony!" त्याच दिवशी संध्याकाळी तातडीने केनने डॉ. फ्रेड यांना दूरध्वनी केला. त्याच्या आवाजात उत्साह, आनंद ओसंडून वाहत होता. "We have found them-millions of Monarchs-in evergreen besides mountain clearing."
गेली कित्येक वर्ष डॉ. फ्रेड आणि नोरा यांनी ज्या शक्यतेची फक्त आणि फक्त कल्पना केली होती ती स्वप्नवत कल्पना आज सत्यात उतरली होती. सरतेशेवटी मोनार्क फुलपाखरांचं मध्य मेक्सिकोतलं हिवाळी वास्तव्याचं ठिकाणं सापडलं होतं.
पण तरीही कॅनडा आणि उत्तर अमेरिकेमधून हिवाळ्यात अचानक गायब होणारी मोनार्क्स नक्की हीच असावीत का? एवढ्या लांबचा प्रवास पूर्ण करुन हा छोटासा नाजूक जीव सेरो पेलोनच्या घनदाट जंगलात कसा बरं पोचत असेल?
अनेक प्रश्न अजून अनुत्तरीतच होते.
(क्रमशः)
टीपा :
(१) Winnebago
(२) Compesinos - स्पॅनिश शब्द, अर्थ - गावकरी
संदर्भ :
(१) Monarch Butterflies - Mysterious Travelers By Bianca Lavies
(२) The Incredible Journey of the Butterflies (DVD -2009)
(३) The Monarch Butterfly - International Traveler By Fred Urquhart
मोनार्क - १
मोनार्क - २
मोनार्क - ३
मोनार्क - ४
केन आणि कॅथीला सिएरा माद्रेच्या डोंगराळ भागात अचानक सापडलेली मोनार्क फुलपाखरांची वसाहत हे मोनार्क स्थलांतराच्या अभ्यासातील एक मोठं यश होतं. तरीही उत्तर अमेरिकेमधून हिवाळ्यात अचानक गायब होणारी मोनार्क्स नक्की हीच असावीत का याबद्द्ल प्रश्नचिन्ह कायम होतं. “You must keep searching for more colonies and you MUST find a tag to prove that they are our migrating butterflies from up North – search for a tag, we must find a tag” डॉ. फ्रेड यांच्या या सल्ल्यानुसार कॅथी व केन या परीसरातील मोनार्क्स टॅग करीत होते. सेरो पेलोनच्या आसपासच्या भागात फिरुन टॅग असलेलेली मोनार्क शोधण्याचं कामही जोमात चालू होतं. पण म्हणावं तसं यश अद्याप हाती आलं नव्हतं.
नॅशनल जिओग्राफी सोसायटीच्या मदतीने डॉ. फ्रेड, त्यांच्या पत्नी नोरा व फोटोग्राफर बियांका लाविएस ९ जानेवरी १९७६ ला मेक्सिकोला पोहोचले. सिएरा माद्रेजवळ एका मॉटेलमधे कॅथी व केनला भेटल्यावर स्थानिक वाटाड्याच्या मदतीने त्यांनी पुढचा प्रवास सुरू केला. उतारवयात १०००० फूट उंचीवर पोचल्यावर डॉ. फ्रेड व नोरा यांना त्रास जाणवू लागला. परंतु जे स्वप्न दोघांनी संपूर्ण आयुष्य पाहिलं होतं, चाळीस वर्ष त्यासाठी अविरत कष्ट केले होते ते स्वप्न सत्यात पहाण्यासाठी काही पावलं उरली होती. देवदार वृक्षांनी वेढलेल्या घनदाट जंगलात एके ठिकाणी निसरड्या उतारावरुन घसरत खाली जाताच जमिनीवर शांतपणे पसरलेले नारींगी- काळ्या रंगाचे थवेच्या थवे त्यांना दिसले. झाडांवर हजारोंच्या संख्येने गुच्छासारखी बहरलेली, जमिनीवर गालिच्यासारखी नजर जाईल तिथे मोनार्क पसरली होती. काही दिवसातच वसंत ऋतू सुरु होणार होता आणि हे थवे त्यासोबत उत्तरेकडे प्रयाण करणार होते.
आनंदाने सद्गदीत झालेले डॉ. फ्रेड जवळच पडलेल्या लाकडाच्या ओंडक्यावर विसावले. मात्र समोर हजारोंच्या संख्येने मोनार्क्स पहात असतांनाच उत्तर अमेरीकेत लाखोंच्या संख्येने टॅग केलेल्या मोनार्क्सपैकी एकही मोनार्क फुलपाखरु या गर्दीत दिसत नव्हतं. आणि... त्याचक्षणी एका देवदार वृक्षाची साधारण तीनएक इंचाची, मोनार्क्सनी लगडलेली फांदी अचानक तुटून जमिनीवर कोसळली. त्याचबरोबर त्या फांदीवर लगडलेली मोनार्क्स जमिनीवर पसरली. कुतुहलाने डॉ. फ्रेड त्याजागेच्या आसपास असणार्या मोनार्क्सचं निरीक्षण करु लागले आणि काय आश्चर्य!! या पसरलेल्या मोनार्कमधे एक मोनार्क फुलपाखरु आपला पांढरा टॅग मिरवरत होतं. विस्मयित झालेल्या डॉ. फ्रेड यांनी लागलीच त्या मोनार्कला उचलून त्यावरील क्रमांक पाहिला. त्या टॅगवर क्रमांक होता - PS 397. दूरवर अमेरिकेतील मिनासोटा राज्यातील चास्का प्रांतातल्या डीन बोयेन व जिम स्ट्रिट या दोन शाळाकरी मुलांनी आपले शिक्षक जिम गिल्बर्ट यांच्या सहाय्याने टॅग केलेलं हे PS 397 या क्रमांकाचं मोनार्क फुलपाखरु किटकशास्त्राच्या इतिहासात अजरामर झालं होतं. वैज्ञानिक संशोधनात नशिबाने आपली खेळी योग्य वेळी खेळली होती.
(ज्यावेळी डॉ. फ्रेड यांना टॅग केलेलं मोनार्क सापडलं त्याचक्षणी नॅशनल जिओग्राफिक सोसायटीच्या छायाचित्रकार बियांका लाविएस यांनी काढलेला फोटो)
पुढील काही दिवस मेक्सिकोतील आपल्या वास्तव्यात डॉ. फ्रेड यांनी नोरा,कॅथी व केन यांच्या सहाय्याने जवळजवळ १०००० मोनार्क फुलपाखरं गुलाबी रंगाच्या लेबलने टॅग केली. कालांतराने उन्हाळा सुरु झाल्यावर एप्रिल महिन्यात यातली दोन फुलपाखरं अमेरिकेतल्या टेक्सास राज्यात सापडली. यावरुन सिद्ध करता आलं की हिवाळ्यात उत्तर अमेरिका व कॅनडामधून मेक्सिकोत स्थलांतर करणारी मोनर्क्स उन्हाळा सुरु होताच पुन्हा उत्तरेचा रस्ता पकडतात.
डॉ. फ्रेड व नोरा यांची चाळीस वर्षांची मेहनत सफळ झाली होती. निसर्गाचं एक मोठं गुपित त्यांनी कॅथी व केनच्या सहाय्याने त्यांनी उकललं होतं. १९९८ साली कॅनेडीयन सरकारतर्फे मोनार्क स्थलांताराच्या शोधासाठी डॉ. फ्रेड व नोरा यांना Order of Canada या देशातला दुसर्या क्रमांकाच्या सन्मानाने गौरवण्यात आलं. तसचं या शोधाला सरकारकडून “One of the greatest natural history discoveries of our time.” असंही गौरवलं गेलं. डॉ. फ्रेड यांच्याच शब्दात सांगायचं तर -
“I do not know of any species of insect that has aroused a greater interest among the populace in many parts of the world than the monarch butterfly. One of the great pleasures Norah and I have had in our studies of the monarchs has been receiving letters from children and adults alike, expressing their delight at being introduced to the study of nature through our program of monarch butterfly tagging and research. Studying monarch butterflies has been a source of great happiness for us.” – Fred Urquhart, 1987.
नोव्हेंबर २००२ साली डॉ. फ्रेड ऊर्कहट यांनी या जगाचा निरोप घेतला. मोनार्क स्थलांतर संशोधनासाठी काम करणार्यांपैकी कॅटलिना (कॅथी) आग्वादो या हयात असून सध्या त्या अमेरीकेतील टेक्सास राज्यात रहातात. २००८ साली युनेस्कोने सरकारने सिएरा माद्रेच्या डोंगराळ भागत जिथे हिवाळयात मोनार्क्स वस्ती करतात त्या भागाला वर्ल्ड हेरीट्ज साईट म्हणून घोषित केलं. मेक्सिकन सरकारतर्फे या भागाला विशेष संरक्षण पुरवलं जातं.
मोनार्कचं स्थलांतर -
फुलपाखरांच्या अनेक जाती हिवाळ्यात स्थलांतर करतात. मोनार्क हा त्यातला एक लहान गट. फुलपाखरांच्या इतर जातींमधे एकच पिढी दुहेरी स्थलांतर करते म्हणजेच जी पिढी हिवाळा सुरु होताच स्थलांतर करते तिच पिढी उन्हाळा सुरु होताच परतते. मोनार्क मात्र याला अपवाद. मोनार्कची पहिली पिढी उत्तर अमेरीका खंडातून दक्षिणेला स्थलांतर करते परंतु परततांना त्यांची बहुतेकवेळा चौथी पिढी सुखरुप उत्तरेला पोहोचते. आता मधे तीन पिढ्यांचं अंतर असतानांही मोनार्कच्या पाचव्या पिढीला पुन्हा हिवाळा सुरु होताच दक्षिणेचा प्रवास कसा समजतो हे मात्र अद्याप कोडंच आहे. उत्तर अमेरीका व कॅनडापासून सुरू होणारा दक्षिणेला मेक्सिकोपर्यंतचा हा लांबाचा असा नेत्रदीपक प्रवास हे चिमुकले मोनार्क नक्की कसा करतात ते आता पाहू.
मेक्सिकोपर्यंत पोचणं या इवल्याश्या जीवाला सोपं नाही. आणि मेक्सिकोला जाणं म्हणजे फक्त दक्षिण दिशेने उडणं नव्हे. मोनार्क्स जर उत्तरेकडून सरळ दक्षिणेला उडत राहिले तर मेक्सिकोला पोचण्याऐवजी थेट मेक्सिकोच्या आखातात पोहोचतील. उत्तरेकडून वेगवेगळ्या भागातून येणारी मोनार्क्स वेगवेगळे मार्ग अवलंबतात. वॉशिंग्टन डी.सी च्या बाजूने येणारी मोनर्क्स अटलंटाजवळ पश्चिमेकडून नैऋत्येला वळतात तर कानसास राज्यातून येणारी मोनार्क्स दक्षिणेकडून नैऋत्येकडे वळतात. स्थलांतराचा मार्ग मोनार्क कसा ठरवतात हे शास्त्रज्ञांना पडलेलं कोडं आहे. परंतु प्राथमिक माहितीनुसार स्पर्शज्ञानासाठी फुलपाखरांच्या डोक्यावर असलेले दोन अँटेना या कामात मदत करतात. हे अँटेना मेंदूला संदेश पुरवण्याचं काम चोख बजावतात. पण त्याचबरोबर या दूरच्या प्रवासात नशिबाची साथही तितकीच महत्त्वाची असते.
स्थलांतराच्या मार्गातील बेसुमार जंगलतोड व शहरीकरणामुळे मोनार्क्सना अनेक अडथळे टाळावे लागतात. या अडथळ्याच्या शर्यतीत प्रमुख भूमिका बजवतात ती धूर ओकणारी वाहनं, यंत्रांच्या सहाय्याने फवारली जाणारी प्राणघातक रसायनं, जागोजागी दबा धरुन बसलेली कोळ्याची जाळी व पक्षांची हमखास शिकार मोनार्क होतात.
स्थलांतर करतांना मोनार्क्स नेहमीप्रमाणे पंख फडफड्वत उडण्याऐवजी हवेच्या झोताचा वापर करुन तरंगण्याचं तंत्र मोठ्या कौशल्याने वापरतात. सूर्य माथ्यावर येऊ लागल्यावर हवा तापायला लागते. तापलेल्या हवेचं वस्तुमान वाढतं. गरम हवेच्या पट्टयात शिरताच मोनार्क गरुडाप्रमाणे आपले पंख पसरतात व उर्ध्वगामी उडायला सुरवात करतात. एकदा का गरम हवेच्या पट्ट्यात एकदम वरती पोहचलं की मोनार्क्स तरंगायला सुरवात करतात. गरम हवेचा पट्टयाच्या मदतीने मोनार्क्स साधारणपणे १००० फूटपर्यंत प्रवास करु शकतात. दर २०-३० फूटावर २-३ वेळा पंख फडफडवले की पुढच्या गरम हवेच्या पट्टा येईपर्यंत प्रवास सुखकर होतो. अशा प्रकारच्या तरंगण्यामुळे मोनार्क्स उर्जा तर वाचवतातच तसंच त्यांच्या नाजूक पंखांचंही संरक्षण होतं. याचमुळे मेक्सिकोत सुखरुप पोचणार्या मोनार्क्सपैकी बरीचशी मोनार्क्स २००० मैलाचा प्रवास करुनही चांगल्या स्थितीत आढळतात.
उत्तर अमेरीका खंडातून दक्षिण अमेरीका खंडात शिरतांनाच क्षणी अचानक बदलेल्या वातावरणाचा व बदललेल्या भौगोलिक रचनेचा सामना मोनार्क्सना करावा लागतो. मैलोन् मैल पसरलेली जंगलं, शेतजमीन , मोठंमोठे तलाव यातून मार्ग काढण्यासाठी मोनर्क्स आपल्या तीक्ष्ण संवेदनांचा वापर करतात. स्थलांतराच्या मार्गात जर मोठा तलाव पार करायचा असेल व हवामान उडण्यासाठी योग्य नसेल तर मोनर्क्स हवामनात योग्य तो बदल होईपर्यंत वाट पहातात. एकदा का मोनार्क्स ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस मेक्सिकोत पोहोचले की तेथील डोंगराळ भागातून मार्ग काढत सिएरा माद्रेच्या जंगलातील घनदाट वृक्षांवर येउन विसावतात. एकामागून एक फांदीला चिकटून बनलेल्या मोनार्क्सच्या समूहाला 'कॉलनी' असं संबोधतात. एका एकरात साधारणपणे २५ लाख मोनार्क्स विसावलेली असतात. नोव्हेंबर ते मार्च हिवाळा या ठिकाणी काढल्यावर फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी मोनार्क्स परतीच्या प्रवासाला लागतात.
मोनार्क्स साधारणणे दिवसाला ३-५ तास उडून ३०-५० मैलाचा प्रवास पूर्ण करतात. स्थलांतराच्या काळात मोनार्क्सचा दिवस काहीसा असा असतो -
सकाळी ९ - रात्रभर आराम केल्यावर सकाळच्या कोवळ्या उन्हात मोनार्क्स आसपासच्या फुलांवर मध गोळा करतात.
सकाळी १० - तासभर मध खाऊन ताजंतवानं झाल्यावर मोनार्क्स पुढच्या प्रवासाला लागतात. थोड्याथोड्या वेळाने १०-१५ मिनीटं भूक लागल्यावर मध गोळा करण्यासाठी व विश्रांतीसाठी अधेमधे विराम घेतला जातो.
संध्याकाळी ४:३० - स्थलांतर थांबवून आसपासच्या फुलांवरचा मध गोळा केला जातो.
संध्याकाळी ५-५:३० - मोनार्क्स विश्रामासाठी जागा सुरक्षित अशी जागा शोधतात.
संध्याकाळी ५:३०- ६:३० - नुकताच गोळा केलेला मध पचवून उर्जा मिळण्यासाठी रक्तात साखर शोषली जाते.
संध्याकाळी ७ ते सकाळी ९ - झोप
१९९२ साली डॉ. फ्रेड यांनी निवृत्ती घेतांनाच आपल्या Insect Migration Association या संस्थेला पूर्णविराम दिला. युनिवर्सिटी ऑफ कानसास येथे चिप टायलर यांनी मोनार्क टॅग करण्याची प्रक्रिया आपल्या MonarchWatch या संस्थेतर्फे पुन्हा चालू केली. गेल्या वीस वर्षात दहा लाखांहून अधिक मोनार्क्स या संस्थेतर्फे टॅग केली गेली. त्यातली जवळजवळ सोळा हजार मोनार्क्स टॅग केल्यानंतर विविध ठिकाणी सापडली. दरवर्षी Monarch Watch दोन लाख टॅग्ज स्वयंसेवकांना वितरीत करतात. या टॅग्जचं नीट विश्लेषण केलं असता अनेक आश्चर्यजनक गोष्टी पुढे आल्या. शंभर वर्ष वयाची मिशिगनमधे रहाणारी एक बाई जिने डॉ. फ्रेड यांच्या Insect Migration Association या संस्थेसाठी १९५२ स्वयंसेवकाचं काम सुरु केलेलं ती आजही Monarch Watch या संस्थेसाठी काम करुन निरिक्षणं नोंदवते.
(१९७६ साली डॉ. फ्रेड यांनी 'At Last Found - The Monarch's Winter Home' या नावाने नॅशनल जिओग्राफिक मॅगझिनमधे लेख लिहून पहिल्यांदा मोनार्क स्थलांतराच्य शोधाची कहाणी जगासमोर मांडली. नॅशनल जिओग्रफिक मॅगझिनच्या मुखपृष्ठावरील कॅट्लिना आग्वादो यांचं छायाचित्र)
२०१२ साली याच विषयावर अतिशय सुंदर तयार केलेली कॅनेडीयन डॉक्युमेंट्री Flight of the Butterflies न चुकवण्यासारखी आहे. ही एक झलक -
याच फिल्ममधला आधीच्या लेखात उल्लेख केलेला 'एल दिया दे लोस मुएर्तोस' या सणाचा प्रसंग इथे पहाता येईल.
मोनार्क माग्रेशनशी संबधित हा एक - दुवा
संदर्भ :
(१) Monarch Butterflies - Mysterious Travelers By Bianca Lavies
(२) The Incredible Journey of the Butterflies (DVD -2009)
(३) The Monarch Butterfly - International Traveler By Fred Urquhart
(संपूर्ण)