ला बेला विता - १

आज दुसरा कुठलाही दिवस असता तर कदाचित हा माणूस बेलाच्या इतका डोक्यात गेला नसता आणि तो कोण आहे हे माहीत असतं तर त्याच्यापासून ती चार काय, आठ पावलं लांबच राहिली असती पण... पण तिला ते माहीत नव्हतं आणि आजचा सोमवार असा होता की मंडे ब्लूज ही फारच सॉफ्ट टर्म झाली. आख्खा लंच अवर म्हणजे डोक्याला शॉट झाला होता. आज तर नुपूरासारखी थंड डोक्याची मुलगीसुद्धा अश्या अवस्थेत असती की तिने नक्की कोणा ना कोणावर डाफरुन आपला राग काढला असता.

पण तिची मैत्रीण आणि 'La Bella Vita'ची असिस्टंट मॅनेजर नुपूरा तिथे नव्हती आणि आज तिची कमी अजूनच जाणवत होती. सकाळी आल्यापासूनच नुपूरा खूप थकलेली, आजारी दिसत होती. तिचा दमलेला, फिकुटलेला चेहरा पाहूनच बेलाला तिची काळजी वाटली. नंतर तासाभरातच बेलाचे म्हणणे मान्य करून तिने बोलावलेल्या उबरमध्ये बसून ती घरी निघून गेली तेव्हा सकाळचे दहा वाजले होते आणि अख्ख्या रेस्टोची जबाबदारी मालकीण असलेल्या बेलावर पडली होती. अर्थात बेलाला हे सगळं उत्तम प्रकारे जमत होतं कारण तिची हॉटेल मॅनेजमेंटची डिग्री झाल्यावर तिने रोम आणि मिलानमध्ये सहा वर्षे जॉब केला होता. त्यानंतर भारतात येऊन वडिलांची प्रसिद्ध साऊथ इंडियन रेस्टॉरंट चेन जॉईन न करता, तिने स्वकष्टाने हे तिचं इटालियन लव्ह चाईल्ड 'ला बेला विता' मोठं केलं होतं.

प्रचंड गर्दी, गोंगाट, वेटिंग, निम्मा स्टाफ सुट्टीवर, ग्रोसरीवाल्याचा पत्ता नाही आणि त्यात  कुठल्याश्या सेमिनारमधून आलेले भांडकुदळ कस्टमर्स! लंच अवर सुरू होताच बेलाचं डोकं म्हणजे सणसणीत तापलेला तवा झाला होता ज्याच्यावर बर्फ ठेवला तरी त्याची भसकन वाफ होईल!

एकाच वेळी तिची होस्टेस पासून, वेटर्सना मदत करणे, बिलिंग करणे ते किचनमध्ये वैतागलेल्या शेफला शांत करण्यापर्यंत सगळीच कामं सुरू होती. ह्या सगळ्या वैतागामागे एक न लपण्यासारखं कारण होतं ते म्हणजे काल रात्री संपलेली तिची सहा महिन्यांची रिलेशनशिप. मान्य आहे की त्यात पुढे जाण्यासारखं काही दिसत नव्हतं पण तिने ब्रेकअप करण्याआधी निखिलनेच तिला डंप करणं आणि तेही एका फोन कॉलवर! हे अतीच झालं! रागाने ती आतल्या आत जळत पण सर्विस इंडस्ट्रीच्या अनुभवी, हसऱ्या चेहऱ्याने पटापट काम संपवत होती.

बारा नंबर टेबलवरच्या वेटरला काहीतरी सांगत असताना मागून 'बेला' म्हणून खणखणीत हाक आली, मागे वळून पाहिलं तर मागच्या टेबलवर संजीव येऊन बसला होता. संजीव तिला शाळेत एक वर्ष सिनियर आणि तेव्हाचे त्यांचे फ्लॅट एकाच सोसायटीत असल्यामुळे जुन्या ओळखीतला होता. तसा हुशार सीए पण एक मुलगी काही पटत नव्हती त्याला. गेलं वर्षभर तो बेलाच्या मागेमागे करत असला तरी तिने त्याला ला बेलाच्या अकाउंटिंग आणि ऑडिटचे काम देण्याव्यतिरिक्त बाकी दुर्लक्षच केले होते. तसा तो ठीक होता पण आयुष्यभर एकत्र रहाण्याइतका नक्कीच नाही.

"हेय, हाय संजू! आज दुपारी कसा काय इकडे? ऑफिस?" तिने जवळ जात विचारले.

"हाय! ऑफिस आहे जागच्या जागी, मीच इकडे जवळ आलो होतो ऑडिटसाठी." तो आपल्याच जोकवर खूष होऊन हसत म्हणाला. "आज रश दिसतेय खूप..."

"हम्म, सोमवार आणि त्यात हे एका सेमिनारमधले लोक आलेत सगळे." ती टिश्यूने हळूच कपाळावरचा घाम टिपून घेत म्हणाली. तेवढ्यात धाडकन दार ढकलून आत येणाऱ्या माणसाकडे तिचे लक्ष गेले. ब्लॅक डेनीम्स, ग्रे टीशर्ट त्यावर त्याचे ब्रॉड खांदे न झाकू शकणारे टॅन लेदर जॅकेट, आत आल्यावरसुद्धा डोक्यावर स्वूश साईनवाली काळी कॅप आणि डोळ्यांवर काळे एव्हीएटर्स! ती त्याच्याकडे रागाने पहात असतानाच तो च्युईंगगम चघळत, सेलफोनमध्ये पहात कोपऱ्यातल्या टेबलवर जाऊन बसला जिथून सगळ्या टेबल्सचा व्ह्यू मिळत होता.

"...पण तू मात्र कितीही कामात असलीस तरी छानच दिसतेस. हा आउटफिट खूप सूट होतोय तुला."  संजीव तिच्या क्रिस्प व्हाईट शर्ट आणि नेव्ही ब्लू पेन्सिल स्कर्टकडे पहात म्हणाला.

"अर सॉरी,  हां..थँक्स, काय ऑर्डर देऊ लंचसाठी?" तिने घाईत त्याच्याकडे नजर वळवत विचारले.

"आज स्पेशल काय आहे, ते कर ऑर्डर तुझ्या आवडीने. तुझ्या हॉटेलचा मेन्यू तुलाच जास्त माहीत."

"प्च, हॉटेल नाही रे, रेस्ट्राँट!" ती भुवई उडवत म्हणाली.

"हो बरोबर, जुनाट आहे ना हॉटेल म्हणणं! आता लवकर जेवायला घाल मला, जाम भूक लागल्ये." तो जरा दुखावून म्हणाला.

"ओके. मग ग्रील्ड चिकन फार्महाऊस सॅलड, स्पगेटी मीटबॉल्स विथ टोमॅटो ब्रॉथ अँड क्लासिक तिरामिसू. चलेगा?" तिने हातातल्या आयपॅडवर ऑर्डर टॅप करत, पुन्हा कस्टमर फ्रेंडली हसू चेहऱ्यावर आणत विचारले.

"डन! ASAP!" तो अंगठा दाखवत म्हणाला. तिने ok टॅप केले तेव्हाही तिची नजर पुन्हापुन्हा कोपऱ्यातल्या टेबलकडे जात होती. कोपऱ्यातला 'तो' आता आरामात पाय लांब करून, सोफ्यावर रेलून आजूबाजूच्या टेबलवरच्या लोकांचं संभाषण गालातल्या गालात हसत ऐकत होता.

"बाकी? सध्या काय नवीन? कुठलं नाटक वगैरे बघितलं की नाही?" संजीवला जरा खूष करायला तिने विचारले. तो नाटकांसाठी फारच हौशी होता.

"नाटक तरी नाही पण सध्या एका कमिडियनचे गिग्ज सुरू आहेत. फारच ऐकलंय त्याबद्दल. उद्याच आहे संध्याकाळी. येणार का?" त्याने उत्साहाने विचारले.

"ईss स्टँड अप आहे का? बोर करतात बाबा ते लोक. काहीतरी रेसिस्ट नाहीतर नवरा-बायको, जाड्या बायका असले काहीतरी फालतू जोक्स मारत बसतात. मूर्ख, छपरी आणि अतिशहाणे लेकाचे.. आय हेट इट लाईक एनिथिंग..." तिचा आवाज नकळत वाढला होता, त्यामुळे आजूबाजूला अचानक शांतता पसरली. "सॉरी.." ती जीभ चावत म्हणाली. "पण नकोच ते".

"मी ऐकलंय त्यावरून तरी असं काही नाहीये. हा ऍक्ट बराच वेगळा आहे. तरी ठीक आहे मॅडम, तुमची इच्छा. मी जाईन दुसऱ्या कुणाबरोबर." तो खोटं रागावून दाखवत म्हणाला. त्याला डोळे फिरवून दाखवत ती रिसेप्शनकडे निघाली.

"सना, फिफ्टीन का क्या ऑर्डर है?" तिने कोपऱ्यातून येणाऱ्या वेट्रेसला थांबवत विचारले.

"मॅम, सिर्फ सीझर सॅलड बोला है.." वेट्रेस घाबरत म्हणाली.

"व्हॉट? आज कंपल्सरी मिनिमम थ्री कोर्स लंच होता है, याद है ना? उसको बोला क्यू नही? इतनेसे ऑर्डर के लिये हम पूरा चार का टेबल वेस्ट नही कर सकते. ठीक है, मै देखती हूं" ती वैतागत म्हणाली.

"एक्सक्युज मी सर, दिस इज अ टेबल फॉर फोर. वूड यू माईंड शिफ्टिंग टू अ स्मॉलर टेबल? तिने त्याच्या टेबलसमोर जात विचारले.

"नो, आय प्रिफर दिस स्पॉट." तो तिच्याकडे पहात स्पष्टपणे म्हणाला.

काय माणूस आहे! याला आत्ताच डोकं खायला यायचं होतं.. मनात म्हणत तिने मान हलवली. "सर, प्लीज को- ऑपरेट.. देअर आर पीपल वेटिंग फॉर अ प्लेस. इफ यू हॅड अ सिंगल पर्सन विथ यू, आय वूड हॅव अलाउड टू कीप दिस टेबल.." ती आता त्याला तिथून उठवणारच होती.

"ओह, इज इट सो? आय सी अ सिंगल ऑक्यूपंट देअर.." तो संजीवकडे बोट दाखवत म्हणाला.

"ही'ज माय गेस्ट." म्हणत तिने वेळ मारून नेली खरी पण त्याचा मुद्दा बरोबर होता.

"वेट अ मिनिट" म्हणून तो उठून सरळ संजीवच्या टेबलकडे गेला आणि काहीतरी बोलून त्याला खांद्यावर हात टाकून घेऊन आला. ती संजीवकडे रागाने बघताना, संजीव तिला एक स्माईल देत त्याच्यासमोर बसला.

"ओके नाउ?" तो ग्लेअर्सवरून भुवया उंच करत म्हणाला.

हम्म.. म्हणत एक खोटी स्माईल देत ती रिसेप्शनवर निघून गेली. संजीव तर तिथे बसून लंच एन्जॉय करत मारे त्याला गप्पा मारत टाळ्या बिळ्या देत होता. पण पूर्ण वेळ तिला मात्र का कोण जाणे, त्याचं तिथलं अस्तित्व, त्याचा तो स्पॉटच डोळ्यांना खुपत होता.

भाग २

Keywords: 

लेख: