सरळ रस्त्यावरून जात असताना रस्त्याने अचानक वळण घ्यावं तसे आम्ही अचानक अमेरिकेत गेलो. काही वर्ष राहून पुण्याला परत येणार होतो. तिथे आहोत तोवर जमेल तेवढं फिरायचं ठरवलं. काही लहान रोडट्रीप केल्यावर इतका आत्मविश्वास आला, की तीन आठवड्यांची आणि पंचवीस राज्यांची रोडट्रीप ठरवली!
ही रोडट्रीप झाल्यावर आम्ही अमेरिकेच्या मुख्य भूमीवरच्या सगळ्या ४८ राज्यात जाऊन आलो. त्या ट्रीपबद्दलच्या चर्चा, प्लॅनिंगपासून ते प्रत्यक्ष ट्रीपच्या अनुभवांपर्यंत सगळं ह्या सात भागात लिहिलं आहे. नक्की वाचा.
भाग पहिला : कल्पना, संशोधन, तयारी आणि खूप काही!
तीन तास सलग गाडी धावत होती. गाडीच्या टाकीतले आणि आमच्या पोटातले कावळे अन्न-पाणी मागून मागून निपचीत पडायला आले होते. आसपास नजर जाईल तिथपर्यंत फक्त शेतं दिसत होती. थांबून पाय मोकळे करता येतील, पेट्रोल भरता येईल, आपलंही जेवण उरकता येईल, अशी जागा काही दिसत नव्हती. पुढे येणारं गाव मोठं, जरा सोयी असलेलं असेल असं वाटायचं. पण नकाश्यावर मोठं दिसणारं गाव प्रत्यक्षात मात्र चिमुकलं, मूठभर घरं असलेलं निघायचं.
आता काय करायचं, अशी संकट-चर्चा करताना अचानक ‘आमचे येथे पेट्रोल-कार्ड पाकिटं -चहा कॉफी-गरम नाश्ता- कोल्ड्रिंक -किरकोळ किराणा योग्य दरात उपलब्ध आहे’ अशा पद्धतीची पाटी दिसली. त्वरित त्या दिशेला गाडी वळवली. गाडीच्या आणि आमच्या सगळ्या हाकांना ‘ओ’ दिल्यावर निवांत झालो. जेवण झाल्यावर कॉफी पीत आरामात बसलो होतो. अगदीच आडवाटेची जागा होती. त्यामुळे दुकानात आम्ही आणि मालकीणबाई सोडून कोणीच नव्हतं. हातातलं काम संपवून मालकीणबाईं गप्पा मारायला आल्या.
सुरवातीचे नमस्कार-चमत्कार झाल्यावर त्या म्हणाल्या ‘ह्या भागातले दिसत नाही तुम्ही लोकं. इकडे कसे काय आलात आणि निघालात कुठे?’ मग संभाषणाची गाडी बरेच दिवस प्रवास करतो आहे, आजचा मुक्काम कुठे आहे, थंडी किती आहे, पाऊस किती झाला नाही? इकडे वळली. बोलता बोलता अचानक त्या म्हणाल्या ‘oh, so you guys are trying to hit all fifty states, are you not?’ आम्हाला दोघांना आपली गंमत ह्यांना कळली ह्याचा फार आनंद झाला! मालकीणबाई आमच्या कल्पनेवर फारच खूश झाल्या. त्यांनी आम्हाला पुढच्या सुरक्षित प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. आमचं आणि गाडीचं पोट भरलं होतं आणि गप्पा मारून मन हलकं झालं होतं. त्या छान मन:स्थितीत त्यांचा निरोप घेऊन आम्ही पुन्हा आमच्या रस्त्याला लागलो.
हा किस्सा आहे अमेरिकेतल्या साऊथ डाकोटा राज्यातला. त्या दिवशी आम्ही आमच्या लांबलचक रोडट्रीपच्या कीस्टोन, साऊथ डाकोटा ते बिस्मार्क, नॉर्थ डाकोटा ह्या टप्प्यात होतो. घर सोडून पाच दिवस झाले होते आणि घरी परतायला साधारण वीस दिवस होते. गेली पाचेक वर्षे अमेरिकेत होतो. इथे आलो तेव्हापासूनच महेशच्या डोक्यात ‘अमेरिकेच्या सगळ्या राज्यात जायचं’, अशी कल्पना होती. भारताच्या जवळपास तिप्पट क्षेत्रफळ असलेला हा अवाढव्य देश. इतकं मोठं अंतर रस्त्याने फिरायचं? मला ही कल्पना जरा धाडसी, जरा वेगळी, जरा भितीदायक वाटत होती. इतक्या दिवसांचा प्रवास एकसुरी होईल का? आपल्याला कंटाळा येईल का? अशी भीतीही मनाच्या कोपऱ्यात वाटत होती. पण तेव्हा नुसत्या गप्पा मारायचा विषय होता. त्यामुळे फार मनाला लावून घेण्याची गरजही नव्हती.
जसे आमचे मायभूमीत परतायचे विचार पक्के होऊ लागले, ऑफिसच्या रजेचा प्रश्न येणार नाही असे दिसले, तसा ह्या कल्पनेला जोर आला.मला फिरायची आवड असली, तरी मी घरप्रेमीही आहे. घर सोडून कुठेही जायचं म्हटलं की विचारांचा झोका ‘मजा येईल, नवीन भाग बघायला मिळेल. नवनवे अनुभव येतील’ ह्यापासून ‘कशाला उगीच सुखाचा जीव दुःखात घालायचा? गाडी बिघडली, आजारपण आलं तर किती अडचण येईल. शिवाय इथल्या हवेचा काही भरवसा नाही. कुठे वादळात, बर्फात अडकलो तर? ’ इथपर्यंत विचारांचा झोका चालू होतो. पण ‘नको जाऊया’ असं म्हणावंसंही वाटत नाही. मग सोपा मार्ग म्हणून मी सबबी शोधायला लागते. उत्तम अशी सबब मिळून प्रवास परस्पर रद्द झाला तर बरं! असा काहीसा वेडपट विचार त्यामागे असतो.
मी पुण्यात चारचाकी चालवते पण अमेरिकेत नाही. त्यामुळे ड्रायव्हिंगची बाजू अर्धांगाला सांभाळावी लागणार होती. त्याला ड्रायव्हिंगची आवड, सवय किंवा व्यसन आहे. तो कितीही लांब अंतर न कंटाळता, न दमता गाडी चालवू शकतो. त्यामुळे ही भीती दाखवायचे प्रयत्न वाया गेले. मुलाची सबब सांगायला तो काही लहान नव्हता. चांगला मोठा. कधी एकदा पंख पसरून मोकळ्या आकाशात भरारी मारतोय ह्या घाईत असलेला. त्याला सांगितल्यावर त्याने ‘आई, काय हा घरकोंबडेपणा! जा की. मस्त फिरून या.’ असं म्हणून तोही फुगा फोडला! एव्हाना मलाही ह्या आयडियाची कल्पना आकर्षक वाटायला लागली होती. त्यामुळे सबबींचा अभ्यास थांबवला आणि रोडट्रीपचा अभ्यास सुरू केला.
अमेरिकेत एकूण पन्नास राज्ये आहेत. त्यापैकी मुख्य भूमीवर अठ्ठेचाळीस आणि अलास्का, हवाई ही बाजूला. आधीच्या ट्रीपमध्ये आम्ही काही राज्यांमध्ये गेलो होतो. उरलेल्या राज्यांमध्ये जाणे, हा ह्या ट्रीपचा उद्देश होता. ही राज्ये बघितली, असं म्हणणार नाही, कारण प्रत्येक राज्यातच काय पण प्रत्येक गावातही बघण्यासारखं, अनुभवण्यासारखं खूप काही असतं. प्रत्येक राज्याला कमीतकमी एक आठवडा दिला, तरी पन्नास राज्ये बघायला साधारण एक वर्ष लागेल. तेवढं तर अशक्य होतं. मग महत्त्वाच्या जागा, शहरं थांबून बघायची आणि बाकी चालत्या गाडीतून असा पॅटर्न ठरवला होता.
पूर्ण ट्रीपचा नकाशा
ह्या ट्रीपची आमची तयारी म्हणजे एकदम ‘काय सांगू महाराजा!’ प्रकारची होती. पंचवीस ते तीस दिवस घराबाहेर राहायचं होतं. त्यामुळे कसं जायचं, कुठे राहायचं, काय बघायचं सगळंच ठरवायला आणि चर्चा करायला भरपूर संधी होती. मग काही ब्लॉग्स वाचले, यू ट्यूबवरचे व्हिडिओ बघितले, तिघांनी संयमित (आणि असंयमित)चर्चा केल्या आणि शेवटी ‘ऐकावे जनांचे आणि करावे मनाचे,’ असं म्हणत साधारण कसं जायचं त्याचा रस्ता नक्की केला. इतक्या मोठ्या प्रवासात ऐनवेळी बदल करावे लागतील, ह्याची कल्पना आणि तयारी होती. अगदी फारच विचित्र अडचणी आल्या तर शांतपणे घरी परत येऊ, अशीही तयारी होती.
आम्ही राहतो ते व्हर्जिनिया राज्य. तिथून वॉशिंग्टन राज्यातील सिऍटल हा पहिला टप्पा, तिथून ऍरिझोना राज्यातील फिनिक्स हा दुसरा टप्पा , तिथून लुईझियाना राज्यातील न्यू ओर्लियान्स आणि तिथून घरच्या दिशेने हा शेवटचा टप्पा असं ढोबळ प्लॅनिंग झालं. त्या त्या टप्प्यात काय काय बघायचं आणि कुठे राहायचं हे ठरवलं. एकूण मिळून ८००० मैलाच्या वर अंतर होत होतं. भारताच्या संदर्भात सांगायचं तर कन्याकुमारी ते लेह हे अंतर साधारण १८०० मैल आहे. त्यावरून अंदाज करता येईल.
पहिला टप्पा: व्हर्जिनिया ते वॉशिंग्टन राज्य
दुसरा टप्पा : वॉशिंग्टन राज्य ते ऍरिझोना
तिसरा टप्पा : ऍरिझोना ते लुईझियाना
चौथा टप्पा: लुईझियाना ते व्हर्जिनिया
जास्तीत जास्त आठ तास ड्रायव्हिंग करावं लागेल, ह्या बेताने रोजचं अंतर ठरवलं होतं. गाडी चालवताना साधारण दोन-अडीच तासांनी आम्ही नेहमीच थांबतो. सलग बरेच तास गाडी चालवणं त्रासदायक आणि धोक्याचं वाटतं. थांबून जरा तरतरी आली की बरं असतं. त्याप्रमाणे दिवसभरात दोन- तीन वेळा थांबणं व्हायचंच. हा वेळ गृहीत धरूनही सकाळी निघून दुपारी उशीरा शक्यतो काळोख होण्याच्या आत पोचता येईल असा हिशेब केला होता. ज्या दिवशी थांबून काही बघायचं असेल, त्या दिवशी कमी अंतर. अर्थात हे प्रत्येक वेळी शक्य झालंच असं नाही. कधी अगदी कमी म्हणजे पाच तास तर कधी जास्त म्हणजे दहा तास ड्रायव्हिंग झालं. पण सरासरी सात ते आठ तास ड्रायव्हिंग होत होतं. मुख्य उद्देश रोडट्रीप असल्याने प्रेक्षणीय स्थळांना काही वेळा कात्री लावावी लागली.
बाकीच्या गोष्टींबरोबर हवामानखात्याच्या सहकार्याची फार आवश्यकता होती. इतक्या मोठ्या मार्गात पाऊस, ऊन आणि थंडी ह्या सगळ्याचा सामना करावा लागेल, हे स्पष्ट होतं. अमेरिकेत अधिकृतरीत्या हिवाळा जरी २२ डिसेम्बरला चालू होत असला, तरी थंडी त्याच्या आधीच हातपाय पसरायला लागते. नोव्हेंबरापासून पुढे तीन-चार महिने बर्फाची वादळे होऊन रस्ते बंद होण्याची शक्यता असते. डोंगराळ भागात खात्रीच. ह्या अडचणी टाळण्यासाठी आम्ही २२ सप्टेंबरला म्हणजे इथल्या हेमंत ऋतूच्या म्हणजेच फॉलच्या पहिल्या दिवशी घर सोडायचं असं निश्चित केलं. हिवाळा तीन महिने लांब आहे, त्यामुळे आपण योग्य वेळी निघतोय, असं वाटलं होतं. ते बऱ्याच प्रमाणात खरं झालं पण मनापासून बघायचे होते ते काही भाग बर्फवृष्टीमुळे बघता आले नाही. त्याचं वर्णन पुढे येईलच.
सुरवातीच्या चार-पाच दिवसांच्या हॉटेल्सचं बुकिंग केलं. जसं जसं पुढच्या टप्प्याला पोचू, तशीतशी पुढची बुकिंग करायची असं ठरवलं होतं. म्हणजे काही कारणाने रस्ता बदलावा लागला, तरी बुकिंग रद्द करायची कटकट वाचली असती. शक्यतो मायक्रोवेव्ह, फ्रीज, व्या-फाय इंटरनेट आणि कॉम्प्लीमेंटरी ब्रेकफास्ट असेल, अशी हॉटेल ठरवली होती.
इतक्या मोठ्या प्रवासात ‘जेवण’ हा एक कळीचा प्रश्न असतोच. सकाळी नाश्ता करायची सोय हॉटेलमध्ये होती. दुपारचं जेवण रस्त्यात. पण इतके दिवस रोज रात्रीही बाहेर जेवणं ही कल्पना जरा त्रासदायक होती. देशात काय किंवा परदेशात इतके दिवस बाहेरचं खाणं काही खरं नाही. हॉटप्लेट घेऊन जायची एक कल्पना होती. पण एकतर ती चांगलीच जड असते, शिवाय जोडीला स्वैपाकाची भांडी न्यावी लागली असती. म्हणजे सामानात अजून भर. आधीच्या प्रवासांमध्ये मायक्रोवेव्ह-वापर-योग्य, असा राईस कुकर वापरला होता. त्यातला भात आणि रेडी टू कुक भाज्या असं बऱ्याच वेळा जेवलो होतो. त्यापेक्षा अजून काही चांगला पर्याय मिळतोय का? ह्यावर खल झाला.
अखेरीस ‘इन्स्टंट पॉट’ नामक जादूच्या भांड्याची खरेदी झाली. हा इन्स्टंट पॉट आणि एक प्रेशरकुकरमधला सेपरेटर इतक्या फौजफाट्याच्या बळावर आम्ही रोज रात्री घरचं जेवण जेवलो! ही कल्पना प्रत्यक्षात आणायची तर बरोबर भरपूर शिधा घेणं अपरिहार्य झालं. मला तसंही प्रवासाला जाताना घडू शकतील अशा सगळ्याच्या सगळ्या शक्यता गृहीत धरून खूप सामान घ्यायची इच्छा असते. पण आपण जेव्हा सार्वजनिक वाहनाने जातो, तेव्हा ह्या इच्छेला मुरड घालावी लागते. आता काय घरच्या गाडीनेच जायचं होतं. त्यातून मोठ्या गाडीत आम्ही दोघंच असणार होतो. म्हणजे पूर्ण बूट स्पेस आणि मागच्या सगळ्या सीट भरायला वाव होता. म्हणजे थोडक्यात ‘मौकाभी है और दस्तूरभी’ अशी संधी होती. मी त्याचा पूर्ण लाभ घ्यायचा असं ठरवून सामान जमवायला लागले.
कमीतकमी वेळात आणि सामानात करता येतील अशा पदार्थांचा विचार केला.
उपमा करण्यासाठी रवा फोडणीत कोरडा भाजून घेतला. बेसनही असंच फोडणीत भाजून घेतलं. मूग-मसूर डाळ मिक्स आणि तुरीची डाळ धुऊन वाळवून परतून घेतली. ह्या सगळ्याचे एका वेळेला दोघांना लागतील एवढे पोर्शन्स झिपलॉकमध्ये तयार केले. जिरं-खोबऱ्याची लसूण घालून चटणी केली. फोडणीसाठी तेल नेलं, तर सांडायची शक्यता म्हणून तूप घेतलं. मीठ, साखर, हळद घेतली . कांदे बटाटे टिकायचा प्रश्न नसतो त्यामुळे ते जास्ती घेतले. हे सगळं टिकाऊ सामान एका बॅगेत भरलं. त्याच बॅगेत कागदाच्या प्लेट, चमचे, हात पुसायला नॅपकीन आणि सुरी घेतली. कूल बॉक्समध्ये दूध, कॉफी, एका डब्यात कोथिंबीर,कढीलिंब, मिरच्या असा सरंजाम घेतला. दूध किंवा टोमॅटो, पालक, काकडी, गाजर, कोथिंबीर अशी नाशवंत सामग्री लागेल तशी घेत गेलो.
वाचायला हे सगळं ‘आवरा’ प्रकारचं वाटू शकेल. मलाही घेताना आपण जरा अतीच करतोय, असं वाटत होतं. पण आठ-आठ तास ड्रायव्हिंग, पायी फिरणे करून अनोळखी गावात हॉटेलमध्ये पोचल्यावर जेवणासाठी पुन्हा बाहेर पडावंसं वाटायचं नाही. त्यातून खूप थंडी किंवा उन्हाळा असेल तर अजूनच नको व्हायचं. इतकं दमून आल्यावर ज्या चवीची वर्षानुवर्षे सवय आहे, असं गरमागरम जेवताना इतकं बरं वाटायचं की त्यापुढे हा सगळा पसारा नेणं काही कठीण वाटलं नाही. ज्या दिवशी मुक्कामाला लवकर पोचलो अशा गावी किंवा जेवणाचे चांगले पर्याय उपलब्ध होते अशा गावी मात्र ही खटपट न करता बाहेर जेवलो.
प्रवासात प्यायच्या पाण्यासाठी आम्ही यूज अँड थ्रो बाटल्या न वापरता चांगल्या प्रतीच्या प्लॅस्टिकच्या बाटल्या वापरतो. इथे बऱ्याच ठिकाणी बाटल्या भरून घेता येतील अशी सोय असते. त्यामुळे प्रत्येक वेळी गाडीतून उतरताना रिकाम्या झालेल्या दोन-तीन बाटल्या बरोबर घेणे हा धडक कार्यक्रम पूर्ण प्रवासभर राबवला. तरीही पाण्याचे दोन-तीन कॅन घेऊन ठेवले होते. शिवाय गाडीत खायला थोडा कोरडा खाऊही बरोबर ठेवला होता. थोडक्यात म्हणजे परस्पर दक्षिण-उत्तर ध्रुवावर जायची वेळ आलीच, तरीही काहीही अडचण येऊ नये, अशा प्रकारची तयारी केली. तरीही ऐनवेळी काय अडचण येईल, प्रवास नीटपणे पार पडेल ना? अशी काळजी होतीच.
२०१९ मध्ये केलेल्या ह्या प्रवासाचं वर्णन आता बरेच दिवस उलटल्यावर लिहिते आहे. ह्या प्रवासात आम्हाला बघायला खूप मिळालं पण माणसं फारशी भेटली नाहीत. जेवायला गेल्यावर, हॉटेलमध्ये चेक-इन करताना तिथल्या कर्मचाऱ्यांशी रोज तीच वाक्य बोलली जायची. वैयक्तिक आमच्याशी कोणी गप्पा मारल्या, मैत्री केली असं काही झालं नाही. हा प्रवास आमचा, आमच्याबरोबरच झाला. त्यामुळे हे आमच्या प्रवासाचं वर्णन वाटण्यापेक्षा प्रवासातल्या आमचं वर्णन वाटू शकतं. पण त्याला काही इलाज नाही.
नमनाला हे एवढं घडाभर तेल जाळल्यावर आता प्रत्यक्ष प्रवासाला किती पेट्रोल जाळलं असेल ह्याचा अंदाज आला असेल!
भाग पहिला कल्पना, संशोधन, तयारी आणि खूप काही!
भाग दुसरा व्हर्जिनिया ते नेब्रास्का
___________________________________________________________________________________________
माझं बाकीचं लिखाण वाचण्यासाठी माझ्या ब्लॉगलाब्लॉगला जरूर भेट द्या. धन्यवाद
२२ सप्टेंबर २०१९ : फॉल्स चर्च,व्हर्जिनिया ते मौमी, ओहायो
‘हे घेऊ का ते घेऊ की दोन्हीही घ्यावं? थंडीसाठी घेतलेले कपडे पुरेसे होतील का? दोघांचे लॅपटॉप तर हवेतच.’ वगैरे अनंत प्रश्न सोडवण्यात आणि सामानाची भराभरी -उचकाउचकी करण्यात रात्री झोपायला उशीर झाला. पण तरीही लवकर उठून ठरलेल्या वेळेच्या किंचीतच उशीराने आम्ही घर सोडलं.
सामानाचा डोंगर कारमधे नीट रचला. विमान प्रवासात जसं चेक-इन-लगेज आणि कॅबिन लगेजची वर्गवारी करतो, तशीच कारच्या डिकीमध्ये ठेवायचं सामान, मागच्या सीटवर ठेवायचं सामान, गाडी चालू असतानाही हात मागे करून घेता येईल असं खाली ठेवलेलं सामान आणि जवळ हवीच अशी पर्स असं वर्गीकरण केलं होतं. ही काही पहिली रोडट्रीप नव्हती, त्यामुळे कधी काय सामान लागतं आणि कुठे काय सामान असलं की सोयीस्कर पडतं हे सरावाचं झालेलं होतं. सामान आणायला मदत म्हणून मुलगा खाली पार्किंगमध्ये आला होता. खरं म्हणजे तो आम्ही नक्की जातोय ना, ह्याची खात्री करायला येत असावा, अशी शंका घ्यायला भरपूर वाव होता! आता पुढचे वीस-पंचवीस दिवस आई-बाबा नाहीत, सगळं घर आपल्या ताब्यात ह्याचा आनंद लपवणं त्याला जरा जडच जात होतं.
तर अशा पद्धतीने सामान रचणे, पेट्रोल भरणे इत्यादी सगळं आटपून आम्ही रस्त्याला लागलो. इतकी मोठी ट्रीप करत होतो, खूप काही बघायचं होतं. कुठे गच्च जंगल, कुठे वाळवंट, उत्तुंग इमारतींचं उच्च्भ्रू सौन्दर्य, कुठे मैलोनमैल पसरलेली सोनेरी शेतं, कुठे लाल रंगांचे खडकाळ डोंगर तर कुठे बर्फ़ाच्छादीत पर्वत. हेमंत ऋतूच वैशिष्ट्य असलेली रंगांची उधळण बघायला मिळणार होती. इतक्या सगळ्या सौन्दर्याला चालत्या गाडीतून मोबाईलवर टिपणं अशक्यच. हा प्रश्न सोडवण्यासाठी एका व्हिडीओ कॅमेऱ्याची खरेदी केली होती. रिअर व्ह्यू मिररजवळ त्याची प्रतिष्ठापना केली. असा सगळा लवाजमा घेऊन आम्ही मार्गाला लागलो. बरेच दिवस ह्या ट्रीपचं प्लॅनिंग, चर्चा, माहिती मिळवणं, सामानाची तयारी करणं चालू होतं. विचारांचा झोका ‘कधी एकदा निघतोय’ इथपासून ‘कधी एकदा परत घर दिसेल’ इथपर्यन्त झोके घेत होता. निघेपर्यंत होणारी जीवाची ही उलघाल, एकदा मार्गाला लागल्यावर मात्र हळूहळू शांत झाली आणि मी निवांत बसून बाहेर बघायला लागले.
हळूहळू ओळखीचा परिसर, परिचयाचे रस्ते मागे पडले आणि आमची ट्रीप खऱ्या अर्थाने सुरु झाली. इतके तास सलग ड्रायव्हिंग करताना महेशच्या शारीरिक क्षमतेचा आणि एकाग्रतेचा कस लागत होता. त्यामानाने मी रिकामी होते. स्पीडोमीटरचा काटा निर्धारित वेगाच्या फार पुढे जात नाही ना, इकडे लक्ष देणे, गप्पा मारणे, डी.जे.गिरी करून आवडीची गाणी लावणं, अगदीच कंटाळवाणं झालं की खाऊपिऊची सोय करणे अशी कामं करायचे. ह्या सगळ्याबरोबर मी अजून एक काम करते ते म्हणजे विणकाम करते. मला विणकाम करायला अगदी मनापासून आवडतं. एका लयीत चाललेल्या गाडीत मी व्यवस्थित विणूही शकते. ह्या लांबलचक ट्रीपसाठी मी विणायच्या सुया, लोकर, पॅटर्न अशी जय्यत तयारी केली होती. जंगलं, डोंगरदऱ्या किंवा सुंदर अशी शहरं-गावं असतील तर काचेला नाक लावून बाहेर बघायचं. तसं गमतीदार काही नसेल तर आपला ‘काही सुलट, काही उलट’ चा कार्यक्रम राबवायचा असं करत राहिले.
अशा लांबच्या ट्रीपमध्ये साधारणपणे एकदा जेवणाच्या आधी, जेवायला आणि जेवणानंतर दोनेक तासांनी ब्रेक घेतला जातो. असं थांबताना कॉफी प्यायची असेल, खायचं असेल तर तसं थांबायचो. नाहीतर राज्यांच्या सीमारेषेवर ‘आपले ___ राज्यात सहर्ष स्वागत आहे’ प्रकारची स्वागत केंद्रे असतात तिथे किंवा थोड्या थोड्या अंतरावर प्रवासी-मदत-थांबे असतात तिथे थांबायचो. आपली आवश्यक कामं उरकायची, गाडीत पेट्रोल भरायचं, थोडं काही तोंडात टाकायचं. जरा थांबून पाय मोकळे केले, बसून-बसून कंटाळा येतो तो झटकला की पुन्हा रस्त्याला लागायचो. प्रत्येक राज्यात अशा थांब्यांची संख्या किती आहे, त्यावरून त्या-त्या राज्यांच्या आर्थिक परिस्थितीचा अंदाज करणे हा आमचा एक आवडता उद्योग होता!
अमेरिकेतले रस्ते किती चांगले असतात, ह्यावर इतक्या थोर मंडळींनी इतक्या विविध प्रकारे लिहिलं आहे, की त्यात मी भर घालायचं काही काम नाही! पण एक मात्र आहे की अमेरिकेतल्या रस्त्यांचं जाळं प्रचंड आहे. त्या चक्रव्यूहातून मार्ग काढणे म्हणजे सोपं काम नाही. थोडी गडबड झाली, तर ‘जाना था जापान, पोहोच गये चीन’ अशी अवस्था होऊ शकते.
आता बहुतेक गाड्यांमध्ये रस्त्याची माहिती द्यायला नॅव्हिगेटर टूलची सोय असते. आमच्या ह्या नॅव्हिगेटर काकू म्हणजे एकदम हुशार बाई. एकतर त्यांना जगातल्या सगळ्या रस्त्यांची खडानखडा माहिती आहे आणि स्वभाव इतका शांत की विचारायला नको. कितीही चुकीची वळणे घ्या, भलत्याच रस्त्यांना लागा, काकू शांतपणे आपल्याला पुन्हा मार्गावर येण्यासाठी मदत करतात. अगदीच शक्य नसेल, तर ‘If possibel, make a legal U turn’ ह्या वाक्याचा जप करत राहतात. पण कुठल्याही परिस्थितीत संतापून ‘मघापासून ओरडते आहे. ओरडून घसा कोरडा पडला माझा. पण नाही वळलात. आता शोधा रस्ता तुम्हीच’ असं म्हणत नाहीत. मग त्याहून जहाल अपशब्द वापरायची बातच नको!! आमची ही ट्रीप सुख-शांतीत आणि यशस्वी होण्यात ह्या नॅव्हिगेटर काकूंचा फार मोठा वाटा आहे.
आज घरून निघून पहिल्या मुक्कामाला माऊमी ह्या ओहायो राज्यातल्या गावी पोचणे एवढाच कार्यक्रम होता. काही बघण्यासाठी थांबायचं वगैरे नव्हतं. ठरल्याप्रमाणे व्हर्जिनिया राज्यातून निघून मेरीलँड, पेनसिल्व्हेनिया राज्य पार करून आम्ही ओहायो राज्यात पोचलो.
२३ सप्टेंबर २०१९ : मौमी, ओहायो ते मिलवाकी विस्कॉन्सिन
विस्कॉन्सिन राज्यातल्या मिलवाकी गावात हार्डले डेव्हिडसन मोटारसायकल्सचं म्युझियम आहे. आमच्या आजच्या प्रवासाचा आकर्षणबिंदू तो होता. लग्नाआधी मी कल्याणला राहात होते. तेव्हा तिथे दुचाकी गाड्यांचा सुळसुळाट झालेला नव्हता. लोकल ट्रेन हेच वाहतुकीचं मुख्य साधन होतं. त्यामुळे गर्दीने खच्चून भरलेल्या ट्रेनमध्ये शिरता येणे, हे कौशल्य गरजेचं होतं. दुचाकी चालवता येणं हा जरा अभ्यासक्रमाच्या बाहेरचा विषय होता. लग्नानंतर पुण्यात आले तेव्हा सगळीकडे दुचाक्यांचं साम्राज्य बघून थोडी भीती, थोडं आश्चर्य वाटलं होतं. आता मीही पक्की पुणेकर झाले. ‘दुचाकीबिना जीवन सुना’ अश्या पायरीला पोचले आहे. त्यामुळे आजच्या ह्या भारी-भारी मोटारसायकल बघायची खूप उत्सुकता होती.
शिवाय आज अजून एक विशेष म्हणजे आधी कधी आलो नव्हतो, अशा विस्कॉन्सिन राज्यात प्रवेश करायचा होता. आत्तापर्यंत ज्या राज्यातून प्रवास केला, म्हणजे मेरीलँड, पेनसिल्वेनिया, ओहायो, इंडियाना आणि इलिनॉय ह्या राज्यांमध्ये आधीच्या रोडट्रीपमध्ये येऊन गेलो होतो. तशा अर्थाने आज ट्रीपची खरी सुरवात होणार होती.
साधारणपणे म्युझियम बघायचं म्हणजे जरा जीवावर येतं. एका शेजारी एक अशा असंख्य गोष्टी बघायच्या, शेजारी असलेल्या बोर्डवर असलेली बरीच लांबलचक माहिती वाचल्यासारखं करून, चेहऱ्यावर ज्ञानात भर पडते आहे असे भाव आणून पुढे सरकायचं. शेवटी तर ह्या चालण्या-थांबण्याच्या खेळात पायांचे तुकडे पडतात. पण ह्या म्युझियमची रचना चांगली होती. ज्याला वाहनक्षेत्राबद्दल माहिती आहे अशांनाही आवडेल आणि वाहन म्हणजे एका जागेपासून दुसऱ्या जागी जाण्याचे साधन असे विचार आहेत, अशांनाही रस वाटेल ह्याची काळजी घेतलेली होती.
अगदी जुन्या वाफेवर चालणाऱ्या मोटारसायकलपासून ते आत्ताच्या आधुनिक बाईकपर्यंतची प्रगती बघता आली. लोकांनी हौसेने कलाकुसर करून नटवलेल्या बाईक्स होत्या. लेगोचे ब्लॉक्स वापरून तयार केलेली नेहमीच्या आकाराची बाईक होती. अगदी शेवटी काही बाईक्सवर बसून फोटो काढायची सोय होती, त्याचा आम्ही दोघांनीही फायदा घेतला! एरवी हार्ले डेव्हिडसनच्या बाईक चालवायची संधी मिळायची शक्यता कमीच.
लेगो ब्लॉक्सची बाईक
म्युझियमपासून मुक्कामाची जागा जवळच होती त्यामुळे संध्याकाळच्या गच्च रस्त्यांवर फार वेळ अडकावं लागलं नाही.
२४ सप्टेंबर २०१९ : मिलवाकी,विस्कॉन्सिन ते मिनियापोलीस, मिनेसोटा
आज साधारण पाच तासांचं अंतर कापायचं होतं. त्यामुळे सकाळी निवांत निघालो तरी चालण्यासारखं होतं. मेडिसन ह्या विस्कॉन्सिन राज्याच्या राजधानीपर्यंत पहिला टप्पा होता. तिथली कॅपिटॉल बिल्डीन्ग बघायची होती. आम्ही अमेरिकेच्या राजधानीपासून म्हणजे वॉशिंग्टन डी.सी.पासून अगदी जवळ राहतो. अमेरिकेत आल्याआल्या ज्या जागा बघायच्या होत्या, त्या यादीत व्हाइट हाऊस आणि कॅपिटॉल हिल सुरवातीच्या नंबरवर होते. तेव्हा अगदी खास वेळ काढून अमेरिकेचा राज्यकारभार जिथून केला जातो, ते कॅपिटॉल हिल बघून आलो होतो. त्याची भव्यता बघून प्रभावित झालो होतो.
आज बघायची होती, ती एका राज्याची कॅपिटॉल इमारत. भारताशी तुलना करायची, तर नवी दिल्लीतील संसद भवन अक्षरशः जाता येता बघत होतो. आज मुंबईमधील विधानभवन बघायचं होतं. वॉशिंग्टन डी.सी. मधल्या कॅपिटॉल हिलजवळ कार पार्क करायला मिळणं सामान्य माणसासाठी जवळपास अशक्यच. तिथे नेहमीच सुरक्षा कर्मचाऱ्यांची, पर्यटकांची भरपूर वर्दळ असते. इथेही तसंच असेल, लांब कुठेतरी कार पार्क करून चालत यावं लागेल, अशी खात्रीच होती. पण चमत्कार म्हणजे कॅपिटॉल बिल्डीन्गच्या अगदी जवळच जागा मिळाली. सगळं पार्किंग रिकामं होतं. आमच्या सावध स्वभावाला जागून आम्ही पुढेमागे जाऊन आपण ‘नो पार्किंग’ झोनमध्ये गाडी लावली नाहीये ना, असं पुन्हापुन्हा तपासलं. असं हवं तिथे पार्किंग मिळतंय म्हणजे काहीतरी गडबड आहे, अशी खात्रीच वाटत होती. पण तसं काही नव्हतं. बहुधा तिथलं अधिवेशन चालू नसल्यामुळे इतका शुकशुकाट असावा.
कॅपिटॉल बिल्डीन्गचं डिझाईन अगदी डी.सी.तल्या सारखंच होतं. इमारतीला प्रदक्षिणा घालत असताना मोनोना लेकची दिशा दाखवणाऱ्या पाट्या दिसल्या. अमेरिकेतलं हे ‘लेक किंवा तळं’ प्रकरण जरा वेगळंच असतं. आम्हाला कल्याणला ‘काळा तलाव’ अगदी लहानपणापासून माहिती होता. मग ठाण्याला जायला लागल्यावर ‘तलावपाळी’ माहिती झाली. त्यामुळे तळ्याचं डोळ्यासमोरचं मॉडेल साधारण ह्याच आकाराचं होतं. अमेरिकेतली तळी म्हणजे अफाटच मोठी! इथेही विस्तीर्ण जलाशय, शेजारी चालायला-बसायला-सायकलला जागा होती. पाणी असलेली जागा कधी निराश करत नाही. तिथे छानच वाटतं. थोडावेळ बसून परत गाडीच्या दिशेने निघालो.
पुढे मिनियापोलीस राज्यात प्रवेश केला आणि त्या राज्याची राजधानी सेंट पॉल इथली स्टेट कॅपिटॉल बिल्डीन्ग बघितली. पुन्हा मेडिसनसारखाच प्रकार होता. रिकाम्या पार्किंगच्या जागा आणि एकंदरीत शुकशुकाट. बिल्डीन्गचं डिझाईन पुन्हा एकदा डी.सी.च्या कॅपिटॉल बिल्डीन्गसारखंच.
आधीच आम्हाला प्रेक्षणीय जागा बघायचा आळस आणि त्यातून ह्या एकसारख्या इमारती. जरा निराश होऊन आम्ही जवळपास अजून काही पाहण्यासारखं आहे का? ते शोधायला गुगलबाबांना साकडं घातलं. १५ मिनिटांच्या अंतरावर मीनेहाहा पार्क आहे अशी खूषखबर कळल्यावर तातडीने त्या दिशेला गाडी वळवली.
दोन्ही स्टेट कॅपिटॉल बिल्डिंगजवळ फुकट आणि सोयीस्कर पार्किंग मिळालं होतं, त्याचं इथे पूर्ण उट्ट निघालं. एकतर त्या भल्यामोठ्या पार्कमध्ये नक्की कुठे थांबावं हेच कळेना. शेवटी एका ठिकाणी कार पार्क केली आणि नकाशाच्या मदतीने मीनेहाहा धबधबा शोधला. पार्क नेहमीप्रमाणे सुबक, स्वच्छ आणि सुंदर होतं. दिवसभर गाडीत बसून बसून पाय आखडले होते. चालताना बरं वाटत होतं. आरामात चालत त्या धबधब्यापर्यंत गेलो. फोटो काढले आणि पुन्हा गाडीत बसून मुक्कामाची जागा गाठली.
२५ सप्टेंबर २०१९ : मिनियापोलीस, मिनेसोटा ते लिंकन, नेब्रास्का
आजचा कार्यक्रम बराचसा कालच्यासारखाच होता. मिनासोटा राज्यातून निघायचं. आयोवा राज्य पार करून नेब्रास्का राज्यात मुक्काम करायचा होता. दोन कॅपिटॉल बिल्डीन्ग (हरे राम!) आणि एक शिल्प प्रदर्शन बघायचं होतं.
अमेरिकेत एकूणच लोकवस्ती विरळ. त्यातून आमच्या आताच्या रस्त्यात थोडी मोठी शहरं पार करत होतो तरी बराचसा रस्ता भलीमोठी शेतं किंवा गवताळ कुरणं असलेल्या भागातून जात होता. इतकी भलीमोठी शेती कशी करत असतील? असं कुतूहल वाटायचं. पण ते प्रश्न शेवटपर्यंत आमच्याच जवळ राहिले. काही मंडळींना कुठेतरी कोणीतरी मराठी बोलणारे, गेला बाजार भारताबद्दल विलक्षण आकर्षण असलेले स्थानिक लोकं भेटतात. आग्रह करकरून घरी राहायला-जेवायला बोलावतात. आमच्या बाबतीत तशातला काही चिमित्कार झाला नाही. तिथल्या लोकांच्या आयुष्याबद्दल जे कुतूहल वाटत होतं त्याचा एकमात्र उपयोग असा झाला की इतके दिवस इतके तास गाडीत बसून एकमेकांशी काय बोलायचं? हा एक गहन प्रश्न असतो. ‘अमेरिकेतील शेतीव्यवसाय व शेतकऱ्यांचे जीवन’ ही चर्चा स्फोटक होत नाही. असे बरेच सुरक्षित विषय आम्ही ह्या ट्रीपमध्ये चर्चेला घेत होतो!
तर नेहमीप्रमाणे निघून आम्ही नेहमीप्रमाणे आयोवा राज्याची राजधानी दी मॉइन इथे पोचलो. नेहमीप्रमाणे कॅपिटॉल इमारतीला एक प्रदक्षिणा घातली. जेवायची वेळ झाली होती. रोजचा ब्रेकफास्ट हॉटेलमध्ये व्हायचा आणि रात्री घरचं वरण/ भाजी / पिठलं भात किंवा उपमा जेवायचो. दुपारी जेवताना जरा चॉईस असायचा. इथे कॅपिटॉल इमारतीजवळ फूडट्र्क दिसल्यावर आशा पल्लवीत झाल्या. फास्ट फूड व्यतिरिक्त काहीतरी खाऊ, अशा विचाराने तिथे गेलो. पण खाण्याचे फार काही आकर्षक पर्याय दिसले नाहीत. त्यामुळे ‘पुढे मिळेल काहीतरी’ असा विचार करून पुढे निघालो.
तिथेच जवळ एका बागेत एक कायमस्वरूपी शिल्पप्रदर्शन होतं. तिथे चक्कर मारली. हवा चांगली होती. छान उबदार, सोनेरी ऊन पडलं होतं. ऑफिसेस मधून जेवायला बाहेर पडलेली मंडळी उन्हात फिरत होती. त्यातच काही देशबांधव व भगिनी दिसल्या. ह्या लोकांची देशातून ‘अमरीकामे किधर रहता है?’ ह्या प्रश्नाचं उत्तर देताना किती तारांबळ होत असेल, ह्या विचाराने मला त्यांची जरा दया आली! कारण ह्या गावाचं नाव लिहिताना ‘Des Moines’ आणि उच्चारी ‘दी मॉइन’ आहे.
आम्ही जेवणाचा प्रश्न लांबणीवर टाकून पुढे निघालो. इतकं राजधानीचं गाव, मॅक डी नाहीतर के एफ सी असेलच पुढे, ह्या खात्रीने निघालो खरे, पण लगेचच शेतं आणि पवनचक्क्यांचा भाग सुरु झाला. तिथले थोडे फोटो काढले पण रिकाम्या पोटी त्यातही मजा येईना. कितीतरी अंतर गेलो तरी गावं नाहीतच. आता आज बिस्किटं आणि चिप्स खाऊन वेळ भागवावी लागणार, असं वाटत असताना एक सबवे सॅन्डविच आलं. पोटात अन्न गेल्यावर आम्ही माणसात आलो आणि पुन्हा कृषीविषयक चर्चा करायला लागलो!
नेब्रास्का राज्याची राजधानी लिंकन. तिथल्या कॅपिटॉल बिल्डीन्गला भेट देणे हाआजचा शेवटचा कार्यक्रम होता. एव्हाना बऱ्याच कॅपिटॉल बिल्डीन्ग बघितल्या होत्या त्यामुळे त्याबाबतीतला उत्साह ओसरला होता. इथे चटकन एक चक्कर मारायची, की हॉटेलमध्ये पोचून आराम करायचा अशी स्वप्नं मी बघत होते. डावीकडे लांब क्षितिजावर कॅपिटॉलचा घुमट दिसत दिसत होता. डावीकडे मान करून त्या घुमटाकडे बघताना पुढे लांबवर धुराचे लोट दिसत होते, तिकडे आधी लक्षच गेलं नाही. लक्ष गेलं तेव्हा कुठेतरी वणवा असेल किंवा कारखान्याचा धूर असेल असं वाटलं. पण इतका वेळ एका लयीत धावणाऱ्या गाड्या अचानक थांबलेल्या दिसल्या, तेव्हा पुढे रस्त्यावरच काहीतरी अपघात झाला आहे, हे लक्षात आलं. एव्हाना दोन्हीकडची वाहतूक पूर्णपणे थांबली होती. घरातून निघाल्यापासून अगदी ठरवल्यासारखा प्रवास होत होता. अडकायला असं झालं नव्हतं. आता इथे मात्र सगळं ठप्प झालं.
अर्धा तास झाला, तरी आमच्या बाजूची परिस्थिती जैसे थे होती. दुसऱ्या बाजूने मात्र काही वाहने येताना दिसत होती. रस्त्याच्या दोन्ही भागांमध्ये मोठा खड्डा होता. थांबायचा कंटाळा येऊन काही जण यू टर्न मारून तो खड्डा पार करून विरुद्ध बाजूला सामील होत होते. आमची काही ते धाडस करायची हिम्मत झाली नाही. एक भलामोठा ट्रेलर-ट्रक कारसारखा यू-टर्न मारायला गेला आणि खड्ड्यात अडकला! त्याला आता पुढेही जाता येईना आणि मागेही येता येईना. इतका वेळ बसून सगळ्यांनाच कंटाळा आला होता, त्यांच्या करमणुकीची जबाबदारी त्या ट्रकवाल्याने आपणहून स्वीकारली होती. त्याची गंमत बघताना थोडा वेळ बरा गेला. असा तास-दीड तास गेल्यावर मुंगीच्या वेगाने आमच्या पुढच्या गाड्या हलायला लागल्या. तीन लेनची एक लेन झाली होती, त्यामुळे अगदी सावकाश जात जात आम्ही अपघाताच्या जागी आलो. दोन ट्रकची जोरदार टक्कर होऊन आग लागली होती. ट्रक आणि त्यातल्या सामानाचा अक्षरशः कोळसा झाला होता. नंतर बातम्यांमध्ये ऐकलं की इतका मोठा अपघात होऊनही जीवितहानी झाली नव्हती. ते कळल्यावर जरा बरं वाटलं. ह्या सगळ्या भानगडीत इतका उशीर झाला, की आम्ही कॅपिटॉलला जायचा बेत रद्द करून थेट हॉटेल गाठलं.
उद्याच्या टप्प्यात साऊथ डाकोटा राज्यातल्या माउंट रशमोर ह्या जागेला भेट द्यायची होती. जसं भारत म्हटलं की परदेशी लोकांच्या डोळ्यासमोर ताजमहाल, वाराणसीचे घाट येत असतील, तसं माझ्या डोळ्यासमोर अमेरिका म्हटल्यावर येणाऱ्या चित्रातलं एक चित्र माउंट रशमोरच्या पुतळ्याचं होतं. पण तिथे पोचण्यासाठी आत्तापर्यंत रोज जेवढं अंतर कापत होतो, त्यापेक्षा बरंच जास्त अंतर पार करायचं होतं. वेळेच्या गणितात सगळं बसेल ना? असे विचार करत आजचा दिवस संपला.
रोजचा दिवस असे काहीतरी वेगवेगळे रंग दाखवत होता. आजची सुरवात ऐटबाज कॅपिटॉल बिल्डिंग बघून झाली. त्यानंतर भुकेले तास. संध्याकाळी बरेच तास रस्त्यात अडकल्यामुळे ठरवलेला कार्यक्रम बदलावा लागला. पण दिवसाच्या शेवटी फार उशीर न होता मुक्कामाच्या जागी सुरक्षित पोचणं हे सगळ्यात महत्त्वाचं ठरतं. कुठलाही प्रवास असो, ‘कुछ खोना, कुछ पाना’ हेच आलंच की..
भाग पहिला कल्पना, संशोधन, तयारी आणि खूप काही!
भाग दुसरा व्हर्जिनिया ते नेब्रास्का
माझं बाकीचं लिखाण वाचण्यासाठी माझ्या ब्लॉगला जरूर भेट द्या
ह्या मालिकेतील आधीचा भाग वाचण्यासाठी कृपया खालील दुव्यावर टिचकी मारा
भाग दुसरा : व्हर्जिनिया ते नेब्रास्का
२६ सप्टेंबर २०१९ लिंकन, नेब्रास्का ते की स्टोन, साऊथ डाकोटा
भारतासारख्या देशात भाषा, राहणी, चालीरीती, परिधान अशा बऱ्याच गोष्टींचं भरपूर वैविध्य आहे. स्वातंत्र्यानंतर राज्यांची जी पुनर्रचना झाली, ती भाषांच्या आधारे. आपल्याकडच्या राज्यांच्या किंवा जिल्ह्याच्याही सीमारेषा साधारणपणे नद्यांच्या असतात. नदीच्या अलीकडच्या काठाला हे राज्य तर पलीकडच्या काठाला ते राज्य असतं. अमेरिकेत ‘भाषावार प्रांतरचना’ हा प्रश्न आलाच नसावा. त्यामुळे काही राज्यांच्या सीमारेषा नदीकाठी तर काही राज्यांच्या सीमारेषा नकाश्यावर पट्टी ठेवून आखलेल्या सरळ रेषा आहेत. अगदी काटकोनात एकमेकींना छेडणाऱ्या ह्या रेषांमुळे ह्या राज्यांना ‘चौकोनी राज्यं’ असं यथायोग्य नाव मिळालं आहे. काही ठिकाणी चार राज्यांच्या सीमा एकत्र येतात. तिथे तर एकेक पाऊल एका-एका राज्यात आणि हात पसरले, तर पसरलेले हात अजून दोन राज्यात अशी गंमत होते! आता आम्ही ज्या भागात होतो, ते अशा चौकोनी राज्यांमध्ये.
सगळीकडे तुरळक वस्ती, मोठमोठी शेतं आणि गवताची कुरणं दिसत होती. मोठी शहरं जवळपास नाहीतच. सगळी लहान-लहान गावं. त्यामुळे जेवायला थांबायच्या, पेट्रोल भरायच्या सोयी थोड्या कमी आहेत. भाषेचा लहेजा वेगळा. सावकाश, लक्षपूर्वक बोललं-ऐकलं तरच एकमेकांना उलगडा होणार! ही राज्य काहीशी पारंपारिक विचारांची म्हणूनही ओळखली जातात. धार्मिक विचारांचा पगडा ह्या भागात जास्त. त्यामुळे ‘प्रो-लाईफ’ विचारसरणीचा प्रचार आणि प्रसार करणारी होर्डिंग्ज जागोजागी दिसायची. त्याबरोबर ‘त्याला’ शरण जा. ‘तो’ सगळे प्रश्न सोडवेल, हेही असायचं.
आमच्या पातळीवर बोलायचं तर आज ५०० मैलांचा मोठा टप्पा गाठायचा होता. त्यातून डोंगराळ भाग. इंटरस्टेट हायवे असले तरी वेग कमी होता. काही ठिकाणी तर अगदीच गाव खात्यातले रस्ते होते. त्यामुळे इतकं अंतर जायला आठ तास तरी लागतील, असं वाटत होतं. शिवाय आज माउंट रशमोर आणि क्रेझी हॉर्स मेमोरियल ह्या दोन महत्त्वाच्या जागांना भेट द्यायची होती. त्यामुळे ड्रायव्हिंगला लागणारा वेळ आणि ह्या दोन जागा बघायला लागणार वेळ लक्षात घेतला तर आज वेळ कमी पडेल, मुक्कामाला पोचायला बरीच रात्र होईल ही काळजी होती. त्याबरोबरच आमच्या पुढच्या रस्त्यावर एक बर्फाचं वादळ येऊ घातलं होतं, त्याचीही काळजी कुरतडत होती.
सकाळी भराभर आवरून नेहमीपेक्षा जरा लवकरच निघालो. रस्ता शांत होता. ५०० मैलांचा आकडा जरा घाबरवत होता. दोन्ही बाजूंना पसरलेली शेतं, कुरणं, लहान लहान गावं बघत रस्ता कापायला सुरवात केली. आजही हवा चांगली होती. छान उबदार, मऊसर, सोनेरी ऊन पडलं होतं. निवांत आयुष्य असलेल्या जगातून पुढच्या टप्प्यावर पोचण्यासाठी आम्ही घाईघाई करत होतो.
आज अंतर जास्त असल्याने कमीतकमी वेळा आणि कमीतकमी वेळ थांबत दुपारपर्यंत माउंट रशमोरला पोचलो. साऊथ डाकोटा हे शेतीप्रधान राज्य आहे. तिथे पर्यटनाला चालना देण्यासाठी अमेरिकेच्या जॉर्ज वॉशिंग्टन, थॉमस जेफरसन, थिओडोर रुझवेल्ट आणि अब्राहम लिंकन ह्या चार अध्यक्षांचे प्रचंड मोठे पुतळे ग्रॅनाइटच्या डोंगरात कोरले आहेत. मोठे म्हणजे किती? तर चेहऱ्याची उंची साठ फूट आहे! म्हणजे सहा मजली इमारतीइतके उंच..
मूळ कल्पना ह्या महापुरुषांचे अर्धपुतळे करायचे अशी होती, पण निधीच्या अभावामुळे फक्त चेहरे कोरले गेले, हे कळल्यावर गंमत वाटली. पुतळे, त्यांबद्दलचे वाद आणि पुरेसे पैसे सरकारकडून न आल्याने काटछाट करावी लागणे, हे प्रश्न वैश्विक पातळीवरचे आहेत, अशी ज्ञानात भर पडली. हे चेहरे इतके मोठे आहेत की मला घाटासारख्या रस्त्याने वळणे घेत वर येताना इकडून-तिकडून दिसत होते पण ‘नजर हटी, दुर्घटना घटी’ असं होऊ नये, म्हणून महेशला मात्र तसे बघता येत नव्हते. पार्किंगपासून तिथे जायला थोडासा चढाचा रस्ता आहे. तिथे पोचल्यावर आधी ह्या मंडळींच्याबरोबर एक सेल्फी काढून घेतली!
इकडून- तिकडून निरीक्षण करून झाल्यावर निवांत बसलो. आसपासच्या जनतेच्या हातात आइसक्रीम दिसत होतं. आम्हीही लगेच आइसक्रीम घेऊन आलो. अमेरिकेतल्या बहुतेक पर्यटन स्थळांना प्रवेश फी चांगली सणसणीत असते. ह्या जागेला मात्र प्रवेशमूल्य नव्हतं. पार्किंगचे नाममात्र पैसे तेवढे द्यावे लागत होते. त्यामुळे पर्यटन वाढवण्यासाठी बांधलेल्या ह्या जागी सरकारपेक्षा आइसक्रीमचं दुकानाला जास्त फायदा होत असेल, असं वाटलं…
खरंतर ह्या अध्यक्षांशी माझा परिचय नावापुरताच होता. महाराष्ट्रातल्या एखादा किल्ला बघताना शिवाजी महाराजांबद्दल वाटणाऱ्या आदराच्या भावनेने ऊर भरून येतो किंवा जालियनवाला बाग बघताना हालायला होतं, तशा प्रकारच्या भावना ह्या मंडळींशी जुळलेल्या नव्हत्या. त्यांच्या आयुष्यातल्या काही गोष्टी आठवतील, त्यांचं कार्य आठवून उचंबळून येईल असं काही कनेक्शन नव्हतं. आइसक्रीम खाऊन झालं, फोटो काढून झाले आणि आम्ही निघालो.
भारतात सुरवातीपासूनच एकच प्रमाण वेळ आहे. अमेरिकेत मात्र सहा प्रमाणवेळा आहेत. त्यातून डेलाइट सेव्हिंगची भानगड. म्हणजे वर्षात एकदा घड्याळं एक तास पुढे करायची आणि एकदा एक तास मागे करायची. त्यातही काही राज्यात हे डेलाईट सेव्हिंग करत नाहीत. त्यामुळे अमेरिकेतील ‘अ‘ जागा आणि ‘ब’ जागा ह्यांच्या घड्याळात काही महिने दोन तासांचा फरक तर काही महिने तीन तासांचा फरक असतो. अर्थात भारतातली बरीच माणसं वैयक्तिक टाइम झोन ठरवतात, हा एक मुद्दा आहेच म्हणा! दुसऱ्या शहरात राहत असलेल्या कोणाला फोन करायचा असला, म्हणजे त्यांच्या भागातली वेळ गूगलवर तपासून मगच मी फोन करायचे. एरवी ह्या सगळ्याचा वैताग येत असला, तरी आज मात्र ते प्रकरण फारच पथ्यावर पडलं. साऊथ डाकोटा राज्याच्या दोन भागात एक तासाचा फरक आहे. त्यामुळे आम्हाला पंचवीस तासांचा दिवस मिळाला आणि पुढचं क्रेझी हॉर्स मेमोरियल बघायला पुरेसा वेळ मिळाला.
अमेरिकेत इंग्रज लोकं येण्याआधी स्थानिक इंडियन अमेरिकन राहत होते. आपल्या टोळ्यांचे नियम पाळून निसर्गातल्या शक्तींचा आदर करत राहत होते. नंतर आलेल्या मंडळींनी ‘हा भाग माझा- हा पुढचा तू घे ’ असं परस्पर ठरवून टाकलं. युद्ध झाली. युद्धात पराभूत झाल्यावर ह्या इंडियन अमेरिकन टोळ्यांमधील मुलांना वसतिगृहात ठेवण्यात आलं. त्यांचे कपडे, नावं बदलली गेली. त्यांच्या चालीरीती, भाषा, धर्मही बदलून आदिम अशा संस्कृतीला संपवायचे पद्धतशीर प्रयत्न केले गेले.
ह्या भागात राहणाऱ्या लाकोटा जमातीच्या अतिशय शूरवीर अशा योद्ध्याला इंग्रजांनी पकडून तुरुंगात टाकलं आणि त्यातच त्यांचा अंत झाला. त्या क्रेझी हॉर्स ह्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या वीराचा महाकाय पुतळा बांधायचं काम अनेक वर्षांपासून चालू आहे. अमेरिकन सरकारकडून निधी घ्यायला नकार देऊन फक्त देणग्या आणि पर्यटकांकडून मिळणाऱ्या पैशांवर हे काम चालू आहे. तिथेच इंडियन अमेरिकन संग्रहालय आणि त्यांचं सांस्कृतिक केंद्रही आहे. इंडियन अमेरिकन लोकांच्या पुढच्या पिढीतील मुलांना ह्या सांस्कृतिक वारशाची ओळख व्हावी म्हणून प्रयत्न चालू आहेत. विस्मरणात गेलेली संस्कृती, भाषा, परंपरा, चालीरीती ह्यांना पुन्हा जिवंत करण्यासाठी धडपड चालू आहे.
हा क्रेझी हॉर्स पुतळा जेव्हा पूर्ण होईल, तेव्हा माउंट रशमोरच्या पुतळ्यांपेक्षा खूप मोठा होईल. तिथले चेहरे साठ फूट उंचीचे आहेत तर ह्या पुतळ्याचा चेहरा 87 फूट उंच आहे. म्हणजे नऊ मजली उंच इमारतीइतका. इतकं भव्य शिल्प उभारायला बरीच वर्षे लागतील. सध्या तर फक्त चेहरा, केस आणि हात इतकाच भाग तयार आहे. शिल्प जवळून बघता यावं ह्यासाठी बसची सोय आहे. ते बघून झाल्यावर तिथलं संग्रहालय बघितलं.
आजच्या दिवसात ड्रायव्हिंगही बरंच झालं होतं आणि शिवाय ह्या दोन जागा बघताना फिरणंही पुष्कळ झालं होतं. आता मात्र थकवा जाणवत होता. अर्ध्या तासात हॉटेलमध्ये पोचलो. अमेरिकेत बांधकामासाठी लाकडाचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. वरच्या मजल्यावर चालतानाचे आवाज खाली स्पष्ट येतात आणि झोपमोड होते. त्यामुळे आम्ही शक्यतो हॉटेलच्या वरच्या मजल्यावरची खोली घेतो. इथे मात्र चॉइस मिळाला नाही. हॉटेलच्या सगळ्या खोल्या भरलेल्या होत्या. आम्ही जी होती ती खोली ताब्यात घेतली. खोलीत सामान नेल्यावर आणखीनच शीण जाणवायला लागला. गरम वरण-भात जेवून लगेचच झोपून गेलो.
२७ सप्टेंबर २०१९ : की-स्टोन, साऊथ डाकोटा ते बिस्मार्क, नॉर्थ डाकोटा
काल फार धावपळ, दमणूक झाली होती. आजचा दिवस निवांत होता. ड्रायव्हिंगचं अंतर 325 मैल म्हणजे कालच्या मानाने बरंच कमी होतं. शिवाय काही बघण्यासाठी थांबायचंही नव्हतं. आजचा कार्यक्रम फक्त ह्या गावातून निघून पुढच्या मुक्कामाला पोचणे, इतकाच होता. साऊथ डाकोटा राज्यातल्या दोन वेगवेगळ्या टाइम झोनचा काल फायदा मिळाला होता. पंचवीस तासांचा दिवस मिळाल्यामुळे दोन्ही जागा बघता आल्या. आजचा दिवस तेवीस तासांचा होणार होता. पण आजचा दिवस ‘रेस्ट डे’ प्रकारचा असल्याने काही अडचण येणार नव्हती. फार घाई नसल्याने जरा आरामात उठून, आवरून निघालो.
चार दिवसांपूर्वी घरून निघालो तेव्हा उंच इमारती, वर्दळीचे रस्ते, कुठे ट्रॅफिक जॅममध्ये अडकायची चिंता होती. आता ते सगळं मागे पडलं होतं. इथे इंटरस्टेट हायवेवरही वाहतूक शांततेत चालू असायची. लहान रस्त्यांवर तर विचारायलाच नको. काहीवेळा दृष्टिपथात पुढे-मागे एकही गाडी नाही अशी अवस्था असायची. आजचा रस्ताही तसाच होता. प्रत्येक राज्यात प्रवेश करताना ‘**** राज्यात स्वागत’ ह्या प्रकारचे फलक असायचे. चालत्या गाडीतून अशा बोर्डांचे फोटो काढायचं काम माझ्याकडे होतं. आज साऊथ डाकोटा राज्यातून नॉर्थ डाकोटा राज्यात शिरलो, तेव्हा रस्ता रिकामा असल्याने गाडी रस्त्याकडेला थांबवून चवीने फोटो काढता आले.
सपाट प्रदेश संपून डोंगराळ प्रदेशात पोचलो होतो. खूप वेगवेगळ्या आकाराचे, रंगांचे डोंगर दिसत होते. वळणावळणाच्या रस्त्यावरून जाताना प्रत्येक वळणानंतर नवे आकृतिबंध, नवी दृश्य, नवे आश्चर्य वाट बघत होते. एरवी मी बाहेर बघता बघता एकीकडे विणकाम करते. पण आज बाहेर इतकं काही बघायला होतं, की मी विणकामाला हातही लावला नाही. अशा रस्त्याची मजा घेत घेत आम्ही मुक्कामाला पोचलो सुद्धा. रोडट्रीप सुरू केल्यापासून आज पहिल्यांदाच दुपारी हॉटेलमध्ये पोचलो होतो. माझ्यापेक्षा महेशला विश्रांतीची जास्त गरज होती. रोज सात-आठ तास ड्रायव्हिंग थकवणारं होतं. थोडी विश्रांती घेतल्यानंतर पोहायला गेलो. सारखं गाडीत बसून शरीर आखडून गेलं होतं. आज जास्तीची विश्रांती आणि पोहण्याने पुन्हा ताजेतवाने झालो.
प्रवासाच्या पुढच्या टप्प्यात मोन्टाना ह्या निसर्गसंपन्न राज्यात जायचं होतं. तिथली नॅशनल पार्क्स बघायची आणि ‘रोड टू सन’ ह्या नावाने प्रसिद्ध असलेला ड्राइव करायचा बेत होता. त्याच्या आसपासच्या हॉटेलची बुकिंग सहज मिळत नाहीत, म्हणून आधीपासूनच करून ठेवली होती. पण त्या भागात प्रचंड मोठं हिमवादळ येऊ घातलं होतं. जवळपास दोन ते अडीच फूट बर्फ पडायची शक्यता वर्तवली जात होती. रस्ते बंद होतील, हे उघड होतं. असं काही होऊ नये, थंडीचा-बर्फाचा अडथळा न येता ठरवल्याप्रमाणे सगळं बघता यावं म्हणून आम्ही फॉल सीझनच्या पहिल्या दिवशीच निघालो होतो. पण बर्फाने आम्हाला चकवलं होतं. अपेक्षेपेक्षा बरेच दिवस आधी बर्फवृष्टी सुरू होणार होती. खूप वाईट वाटलं. पण माहिती असताना मुद्दाम संकटात उडी मारण्यात काही अर्थ नव्हता. शेवटी जड मनाने आम्ही जिथे वादळाचा मोठा फटका अपेक्षित होता, तो भाग टाळून दुसरीकडे जायचं ठरवलं. त्यामुळे पुन्हा एकदा रस्ता ठरवणे, आधीची बुकिंग्स रद्द करणे, नवीन बुकिंग्ज करणे ही कामं पुढ्यात आली. शिवाय आता जो रस्ता ठरवला होता, तिथली काय अवस्था आहे, ह्याचे अपडेट्स इंटरनेटवरून घेत होतो.
नाही म्हटलं तरी काही भाग बघायला मिळणार नाही, ह्यामुळे जरा निराशा आली होती. पुढच्या रस्त्यात काही अडचण येऊन अडकणार तर नाही ना, ही काळजीही वाटत होती. घरून निघालो, त्याला अजून आठवडाही झाला नाही, तर हे वादळ समोर आलं. अजून कितीतरी प्रवास करायचा होता. अजून कायकाय अडचणी येतील, काय माहीत? असे विचार डोक्यात फिरत होते. अशा जरा बिचाऱ्या मूडमध्ये दिवस संपला.
२८ सप्टेंबर २०१९ : बिस्मार्क, नॉर्थ डाकोटा ते बिलिंग्ज, मोन्टाना
पहाटेपासूनच पाऊस जोरदार पडत होता. काल झोपताना दोन दिवसांनी येणारं वादळ, जोरदार बर्फवृष्टी, रस्त्यांची अवस्था ह्या सगळ्याची काळजी वाटत होती. उठल्यावर ती काळजी आणखीनच गडद झाली. त्याच मन:स्थितीत आन्हिकं आवरली, ब्रेकफास्ट करून आलो, सामान गाडीत भरून पुढच्या मार्गाला लागलो. बिस्मार्क नॉर्थ डाकोटा राज्याची राजधानी आहे. त्यामुळे कॅपिटॉल कॉम्प्लेक्सला भेट देणं अत्यावश्यक होतं! एव्हाना आम्ही कॅपिटॉल कॉम्प्लेक्स बघण्यात तरबेज झालो होतो. त्या स्किलचा वापर करून आम्ही गाडीतूनच हा भाग बघितला. ही इमारत डी. सी. च्या कॅपिटॉल सारखी नव्हती. आधुनिक पद्धतीने बांधलेली गगनचुंबी इमारत होती. त्यामुळे जरा बदल झाला.
हे वाचून असं वाटेल की इतका कंटाळा येत होता, तर कॅपिटॉल बिल्डिंग्ज बघायला कशाला जायचं? त्या ऐवजी प्रत्येक शहरात, राज्यात इतकं काही बघण्यासारखं असतं, ते का नाही बघितलं? पण एकतर आमच्याकडे वेळ कमी होता आणि दुसरं म्हणजे ही सगळी राज्य निसर्गसौंदर्याने परीपूर्ण आहेत. रस्त्याने जाताना काय बघू आणि काय नको, अशी अवस्था व्हायची. काही बघण्यासारख्या जागा फार वेळ मोडेल म्हणून टाळल्या. ह्या सगळ्या अटी-शर्तींमध्ये जे बसलं ते बघितलं गेलं. ही ट्रीप ‘रोडट्रीप’ होती. पर्यटनाचा हेतू जरा मागे ठेवला होता.
अजून उन्हाचा काही मागमूस नव्हता. धुक्यामुळे गाड्यांचा वेग कमी होता. आम्हाला आज चारशे मैलांचं अंतर कापायचं होतं. अशीच हवा राहिली तर उशीर होईल असं वाटत होतं. रस्त्यावरचे वेगमर्यादेची तसंच इतरही माहिती देणारे बोर्ड जवळ गेल्याशिवाय दिसत नव्हते. सुदैवाने तासाभरात हवा सुधारली. ऊन नसलं तरी रस्ता स्वच्छ दिसायला लागला. आम्ही जरा रिलॅक्स होऊन इकडेतिकडे बघायला लागलो. उडणाऱ्या हंसांचं प्रतीक असलेलं एक इंडियन अमेरिकन शिल्प बघायला मिळालं.
गवत लावलेलं दिसत होतं. गवताची कापणी करून त्याचे अजस्त्र रोल करून शेताच्या कडेला आणून ठेवलेले बहुतेक सर्व ठिकाणी दिसत होते. हळूहळू शेतजमिनींच्या ऐवजी डोंगराळ प्रदेश सुरू झाला आणि मोन्टाना राज्याची हद्द सुरू झाली. मोन्टाना राज्यात त्याच्या नावाप्रमाणे माउंटन्सचं, पर्वतांचं राज्य. आगळ्या-वेगळ्या रंगांचे, आकाराचे डोंगर- दऱ्या- झाडं दिसत होती. हवा सुधारली होती म्हणून ठीक होतं, नाहीतर अशा घाटरस्त्यांवरून धुक्यात गाडी चालवताना जरा भीतीच वाटली असती.
सपाट भागातून जाणारे रस्ते काहीवेळा एकसुरी होतात. सतत एकाच प्रकारचं दृश्य दिसत असतं. इथे तसं नव्हतं. क्षणोक्षणी वेगळं काहीतरी बघायला मिळत होतं. रस्ता असा सुंदर असल्यामुळे अंतर कधी संपलं ते कळलंही नाही. चेक-इनच्या वेळेआधीच तासभर आम्ही हॉटेल गाठलं. इथे हवा आणखीनच थंड होती. पाऊसही पडत होता. गाडीतून बाहेर पडल्यावर कुडकुडायला होत होतं. आता चेक-इनची वेळ होईपर्यंत थांबायला लागलं तर पंचाईत झाली असती. पण आमची गारठलेली अवस्था बघून हॉटेलमालकांनी आम्हाला खोली दिली शिवाय सामान वर न्यायला मदतही केली.
थंडगार खोली गरम झाल्यावर जीवात जीव आला. आजही अर्धा दिवस हातात होता. पण बाहेर पाऊस चांगलाच कोसळत होता. त्यामुळे त्या गारठ्यात बाहेर पडण्याऐवजी आम्ही खोलीतच आराम करायचा छानसा निर्णय घेतला. उबदार पांघरुणात शिरून मस्त झोप काढली. नंतर दुसऱ्या दिवशीच्या वादळाचे अपडेट्स बघत कुठल्या रस्त्याने जाणं बरं, ह्याचा अभ्यास करायला लागलो. टी. व्ही. वरही त्याच बातम्या होत्या. मुलाशी रोज बोलणं व्हायचंच. तोही काळजीने कुठून जाणार आहात? नीट जा, फोन करा वगैरे सांगत होता.
त्यातल्या त्यात बरा वाटणारा रस्ता नक्की केला. गरम भाजीभात जेवलो आणि पावसाचा आवाज ऐकत ‘उद्याचं उद्या बघू’ असा एकमेकांना दिलासा देत झोपलो.
_________________________________________________________________
माझे इतर लिखाण वाचण्यासाठी माझ्या ब्लॉगला नक्की भेट द्या. धन्यवाद
ह्या मालिकेतील आधीचा भाग वाचण्यासाठी कृपया खालील दुव्यावर टिचकी मारा
भाग तिसरा : नेब्रास्का ते मॉन्टाना
२९ सप्टेंबर २०१९ बिलिंग्ज, मोन्टाना ते आयडाहो फॉल्स, आयडाहो
आजच्या वादळाचे ढग आमच्या मनावर गेल्या चार दिवसांपासूनच घोंघावत होते. सकाळी उठून बाहेर बघितलं, तर रात्रीतून कधीतरी बर्फ पडायला सुरवात झाली होती आणि रस्त्यांवर-छपरांवर बर्फ साठला होता. वादळाच्या आधी जो रस्ता ठरवला होता, त्याची पुन्हा एकदा चाहूल घेतली. पण तिथे ३० ते ३६ इंच बर्फाची शक्यता होती. यलोस्टोन नॅशनल पार्कचे बरेचसे रस्ते वाहतुकीसाठी बंद केले होते. त्यामुळे ह्या ट्रीपमध्ये तिथे जाता येणार नाही, हे आता अगदी निश्चित झालं. कुठेही फिरायला जाताना ठरवलेलं सगळं आणि त्याबरोबर अनपेक्षितपणे काहीतरी छान बघायला, अनुभवायला मिळावं, असं वाटतंच. पण तसं कधीतरीच होतं. बहुतेक वेळा काहीतरी बघायचं राहतंच. कधी उशीर झाला म्हणून तर कधी दुरुस्ती चालू आहे म्हणून कधी पुरेशी माहिती मिळाली नाही म्हणून. आज निसर्गाची कृपा नव्हती. जाऊद्या झालं. पुन्हा ह्या भागात येण्यासाठी काहीतरी कारण हवंच की. सगळंच बघितलं तर परत यावंसं वाटणार नाही. कारच्या खिडकीतून बाहेर पडणारा बर्फ बघत मी माझीच समजूत घालत होते.
कालपासून गाडीचा एक टायर त्रास देत होता. हवा कमी असल्याची वॉर्निंग सारखी मिळत होती. बाहेर चांगलीच थंडी होती. थंडीमुळे हवा आकुंचन पावली की अशी वॉर्निंग येते, हे माहिती होतं. तसंच असेल, असा विचार करून सुरवातीला फार लक्ष दिलं नाही. एका ठिकाणी थांबून हवा भरली, तरी प्रश्न सुटला नाही. परत एकदा थांबून त्या टायरकडे प्रेमाने निरखून-निरखून बघितलं तेव्हा रस्ता प्रवासातला अवघड आणि अनिवार्य प्रश्न ‘पंक्चर’ बरोब्बर नको त्या टप्प्यात, नको त्या वारी आपल्या प्रश्नपत्रिकेत पडलेला आहे, हे समजलं! आमचा आजचा सगळा प्रवास डोंगराळ भागातून होणार होता. रस्त्यात अतिशय विरळ लोकवस्ती असलेली लहानलहान खेडी होती. संध्याकाळपर्यंतच्या रस्त्यात एकही मोठं शहर नव्हतं. रविवार असल्याने बरीचशी दुकाने, वर्कशॉप्स बंद असणार. ‘कसं होईल,काय होईल?’ ही चिंता करत निघालो.
कारचे टायर ‘रन-फ्लॅट’ प्रकारचे होते. त्यामुळे स्पेअर व्हील नव्हतं. पण रन-फ्लॅट टायर असल्यामुळे ताशी ५० मैल (८० किमी) इतक्या वेगात पुढे जाता येणार होतं. त्या भरवशावर निघालो. प्रत्येक रस्त्यावर किती बर्फ आहे, रस्त्यांची अवस्था कशी आहे हे इंटरनेटवरून आरामात कळू शकतं. तरीही समोरच्या बाजूने येणाऱ्या गाड्यांच्या टपावर किती बर्फ आहे, इकडे मी बारीक लक्ष ठेवून होते. शक्य असतं, तर त्यांना थांबवून त्यांची मुलाखतही घेतली असती!! बाहेर डोंगर, झाडं आणि बर्फ असं सुंदर चित्र दिसत होतं. अफाट पसरलेल्या शेतांचा भाग मागे पडला होता. डोंगराळ भागातून जात होतो.
जोरात बर्फ पडत होतं. रस्ता, झाडं, आसपासची घरं सगळं कृष्णधवल रंगातलं चित्र असावं तसं दिसत होतं. भारतात असताना बर्फवृष्टीचं फार अप्रूप वाटायचं. आपल्या उबदार, सुरक्षित घरात बसून गरम कॉफीचा कप हातात घेऊन भुरूभुरू पडणारं बर्फ बघायला अजूनही मजाच वाटते. ऑफिसला, शाळा-कॉलेजला सुट्टी मिळते. मस्त गरम-गरम जेवायचं, टीव्हीवर काहीबाही बघायचं आणि अचानक मिळालेली सुट्टी साजरी करायची! पण आत्ता आम्ही घरापासून खूप लांब, कधी न बघितलेल्या भागात, कडाक्याच्या थंडीत, घसरड्या रस्त्यांवर, एक टायर अधू असलेल्या गाडीत होतो. मुक्कामापासून जवळपास ५०० किलोमीटर लांब.
निघाल्यावर सुरवातीचा जो रस्ता होता, तो बहुधा नुकताच उद्घाटन झालेला असावा कारण आमच्या नेव्हिगेशनवाल्या काकूंना तो रस्ता माहिती नव्हता. चांगल्या सुसज्ज रस्त्यावरून जात असतानाही मॅपमध्ये मात्र आम्ही कुठल्यातरी माळरानातून जात आहोत असं दिसत होतं! हतबुद्ध होऊन काकू ‘If possible, take a legal U turn’ किंवा ‘when leaving turn right’ अशा कायच्याकाय सूचना देत होत्या. त्यांच्या ओळखीच्या रस्त्याला लागल्यावर त्यांनी कपाळावरचे घर्मबिंदू टिपले असावेत, असं वाटलं. तास-दीडतास गेल्यावर बर्फ पडायचा थांबला आणि आभाळ जरा स्वच्छ झालं. जरा जीवात जीव आला.
रस्त्यात दिसणारी दृश्य जीव ओवाळून टाकावा इतकी अप्रतिम होती. निसर्गाने आपलं वैभव इथे उधळून टाकलं होतं. कुठे बघू आणि कुठे नाही, असं होत होतं. अस्पर्श्य अशा ह्या निसर्गाची जादू सगळीकडे पसरली होती. आजचा सगळा दिवस नेत्रसुखाचा होता. मॉन्टाना, वायोमिंग दोन्ही राज्यात असं धावतपळत येणं म्हणजे चविष्ट खाद्यपदार्थांची रेलचेल असलेल्या मेजवानीमधून फक्त पापडाचा तुकडा खाऊन घरी जाण्यासारखं होतं. इथे निवांत वेळ काढूनच यायला हवं.
‘वेडीवाकडी वळणे, वाहने जपून चालवा, घरी तुमची कोणीतरी वाट बघत आहे’ अशा पाट्या लावता येतील अशा प्रकारचे रस्ते येतजात होते. थोडा सपाट भाग असला की अगदी बारकी गावं लागत होती. एक चर्च, एक दुकान, थोडी घरं आणि थोड्या इतर सोयी. संपलं गाव. त्याच दुकानाच्या बाहेर पेट्रोल भरायची सोय. आम्ही थांबून टायरच्या दुरुस्तीची काही सोय होईल का? ह्याची चौकशी खूप ठिकाणी केली. पण रविवार असल्याने शक्य नाही, असं नम्र शब्दात सांगितलं गेलं. जिथे शक्य होतं, तिथे हवा भरून घेत होतो. इतक्या थंडीत हवा भरताना हात गारठत होते. एरवी ह्या सगळ्या त्रासामुळे खूप चिडचिड झाली असती. पण निसर्गाची मजा बघताना त्या त्रासाचा विसर पडत होता.
यलोस्टोन नॅशनल पार्कला जाता येणार नव्हतं. पण दुधाची तहान ताकावर भागवावी तसं आम्ही त्याला लागून असलेल्या नॅशनल फॉरेस्टमधून जाणारा रस्ता निवडला होता. इथे पुन्हा एकदा बर्फाचं साम्राज्य पसरलं होतं. रस्त्यांवरचं बर्फ बाजूला केलेलं होतं तरी जपून, सावकाश काळजीपूर्वक तो भाग पार केला आणि आयडाहो राज्यात प्रवेश केला.
असं करत करत आम्ही डोंगररांगांमधला प्रवास संपवून मैदानी भागात आलो. जरा लोकवस्तीत आलो. एरवी ड्रायव्हिंग करताना पुढची एखादी गाडी कमी वेगात जात असेल, तर ओव्हरटेकिंग लेन आल्याआल्या पुढे सटकणाऱ्या मंडळींमध्ये आम्ही असतो. आज पंक्चरल्यामुळे भूमिकांची उलटापालट झाली होती. आमच्या मागची मंडळी आम्हाला मागे टाकून पुढे सटकत होती. ती सगळी मंडळी जर मराठी असतील, तर त्यांनी आपल्याबद्दल कायकाय म्हटलं असेल, ह्याची कल्पना करून आमची बरीच करमणूक झाली!
आता ही रोडट्रीप करून जवळपास दीड वर्ष झालं. आजही ह्या ट्रीपची आठवण आली की हा दिवस डोळ्यासमोर उभा राहतो. हा दिवस ट्रीपचा हायलाइट होता. एखादा चित्रपट जसा सगळ्या रसांनी परिपूर्ण असतो, तसा हा दिवस होता. वादळ, बिघडलेली गाडी असा थरार होता. यलोस्टोन नॅशनल पार्क बघायला न मिळाल्याची बोच होती. पण बर्फाच्छादित पर्वतांचं रौद्र सौंदर्य होतं, प्रत्येक वळणानंतर ‘आहा’ म्हणावंसं वाटेल असं निसर्गसौंदर्य होतं, हेमंत ऋतूच्या पिवळ्या-लाल रंगात रंगलेली झाडं अद्भुत दिसत होती. इतक्या अडचणीतून जेव्हा नीटपणे मुक्कामाच्या जागी पोचलो तेव्हा मात्र अगदी सगळं भरून पावलो.
३० सप्टेंबर २०१९ आयडाहो फॉल्स, आयडाहो ते पेंडलट्न,ओरेगॉन
साधारणपणे सोमवारी सकाळी दोन दिवसांची सुट्टी संपल्याचं, कामाचा आठवडा सुरू झाल्याचं ‘अरे देवा’ फिलिंग असतं. आज मात्र सोमवार उजाडल्याचा फार्फार आनंद झाला. आता सगळीकडंच जनजीवन पूर्वपदावर येऊन गाडीची दुरुस्ती करता आली असती. पुण्यात हवा भरणे-पंक्चर काढणे स्वरूपाची कामं करणारे घराजवळचे एक अण्णा आहेत. तशा अण्णांना शोधत गेलो. ‘कुठून आलात? इतक्या लांबचा प्रवास का करताय?’ वगैरे गप्पा झाल्यावर अण्णांनी गाडी ताब्यात घेतली. थोड्याच वेळात गाडी दुरुस्त झाली आहे, असं सुहास्य वदनाने सांगत अण्णा आले. इतकं हायसं वाटलं की बस्स! त्यांचे आभार मानून निघाल्यावर त्वरित जवळच्या वॉलमार्टकडे गाडी वळवली. टायर पंक्चर झाला तर तात्पुरती दुरुस्ती करण्यासाठी एक किट मिळतं, त्याची खरेदी केली. खरं म्हणजे घरून निघण्यापूर्वी ही खरेदी करायला हवी होती. ते जरा चुकलंच म्हणायचं.
कालच्या आणि आजच्या रस्त्यांच्या डिझाइनमध्ये खूपच फरक होता. कालचे बरेचसे रस्ते डोंगराळ भागातून जाणारे, त्यामानाने अरुंद होते. आजही डोंगराळ भाग होता. पण इंटरस्टेट हायवे असल्यामुळे वेगमर्यादा जास्त होती. बर्फाचं साम्राज्य मागे पडलं होतं. ठराविक वेगात, नेहमीच्या लयीत गाडी धावत होती. टायर दुरुस्ती झाल्यामुळे मनावरचं दडपणही गेलं होतं.
घर सोडून आठवडा झाला होता. चाकावरच्या दिवसाचं रूटीन पक्कं सेट झालं होतं. रोजचं सकाळी उठून आन्हिकं आवरली की नेमाने थोडं स्ट्रेचिंग, थोडा व्यायाम करायचो. नंतर ब्रेकफास्ट. येऊन अंघोळी करायच्या, मोबाईल चार्ज करायचे. आदल्या दिवशी पोचल्यावर काहीनाकाही सामान बाहेर आलेलं असतंच. ते पुन्हा सुस्थळी पाठवायचं. सगळ्या बॅगांच्या मुसक्या आवळल्या की निघायचं. गाडीत कुठली बॅग कुठे ठेवायची, हे शहाणपण अनुभवातून आलेलं होतं. त्यांची प्रतिष्ठापना झाली की झालं. नॅव्हिगेटर काकूंना पुढचा पत्ता सांगायचा की रस्ता धरायचा. दिवसभरात दोन-तीन वेळा कुठेतरी थांबणं व्हायचंच. काही बघायचं असेल तर तसं, नाहीतर नुसताच ब्रेक. संध्याकाळी मुक्कामाला पोचलो की हॉटेलमध्ये पोचलो की सरावाचं हसू, सरावाची वाक्य टाकून खोलीची किल्ली ताब्यात घ्यायची. रूममध्ये फ्रेश झालो की थोडा टी.व्ही., लेकाशी फोनवर गप्पा, स्वैपाक, जेवण की झोप. सकाळी उठून पुन्हा ‘उद्या पहाटे दुसऱ्या वाटा, दुज्या गावचा वारा’.
अमेरिका ह्या देशाबद्दलची माझी प्रतिमा मोठमोठी शहरं, गगनचुंबी इमारती, शिस्तबद्ध गाड्यांच्या रांगा मिरवणारे प्रशस्त रस्ते, समुद्रकिनारे अशी होती. अमेरिकेतल्या समृद्ध निसर्गाची मला कल्पनाही नव्हती. सध्या ज्या भागातून जात होतो तिथली इतकी भव्य जंगलं आणि डोंगररांगा बघताना आश्चर्य वाटत होतं.
काही दिवसांपूर्वी नेटफ्लिक्सवर ‘वाईल्ड वाईल्ड कंट्री’ नावाची मालिका बघेपर्यंत ओरेगॉन राज्याचा आणि पुण्याचा इतका जवळचा संबंध आला होता, ह्याचीही मला कल्पना नव्हती! पुण्याच्या कोरेगाव पार्क भागात ओशो आश्रम आहे. इतकी वर्षे पुण्यात राहून मी ओशो आश्रमाकडे कधीही फिरकले नव्हते. त्या आश्रमाचा उपयोग मी फक्त एका साईटचा पत्ता सांगायला केला होता. १९८० च्या दशकात भगवान रजनीश ह्यांच्या शिष्यांनी ओरेगॉन राज्यातल्या अँटेलोप नावाच्या गावात जवळपास ८०,००० एकर जागेवर आश्रम वसवला होता. पुणे आणि ऑस्टीन (टॅक्सास), पुणे आणि सॅन होजे (कॅलिफोर्निया) ह्या सिस्टर सिटीज आहेत. तशी महाराष्ट्र आणि ओरेगॉन ही ह्या संदर्भाने चक्क बंधू राज्य झाली की! भगवान रजनिशांच्या ह्या आश्रमात पुढे बरेच बरेवाईट प्रकार झाले. गुन्हे दाखल झाले, तुरुंगवास घडले. आज ही वादग्रस्त जागा वैराण-एकाकी अवस्थेत आहे. ती जागा आमच्या आजच्या रस्त्यावर नव्हती आणि रस्ता वाकडा करून बघायला जायचा अजिबात विचारही नव्हता. पुण्यातला चालू अवस्थेतला आश्रम बघायला गेले नव्हते तर इथला वादग्रस्त झालेला बंद आश्रम बघावासा वाटायची काही शक्यताच नव्हती.
आजचं ड्रायव्हिंगचं अंतर जास्त होतं. पण गाडीची प्रकृती सुधारलेली होती त्यामुळे आमची मन:स्थितीही सुधारली होती. रस्ते सोपे होते आणि कुठे थांबायचं नव्हतं. वेळेवर मुक्कामाच्या गावी पोचलो. वॉलमार्ट गाठून दूध, पाणी, भाजीची रसद भरून घेतली आणि दिवस संपला.
०१ ऑक्टोबर २०१९ पेंडलट्न,ओरेगॉन ते सिऍटल, वॉशिंग्टन स्टेट
भारतातल्या लहान-मोठ्या कुठल्याही गावात एक जागा असतेच असते, महात्मा गांधी चौक! अमेरिकेत असे जॉर्ज वॉशिंग्टन साहेब सापडायचे. अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डी.सी., माझा मुलगा पदव्युत्तर शिक्षण घेत होता त्या विद्यापीठाचं नाव जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी. आता आज ज्या राज्यात जाणार होतो, ते राज्याला नावही वॉशिंग्टन साहेबांचंच होतं. रस्ता फार सुंदर होता. डोंगर-दऱ्या होत्या पण घाबरवणाऱ्या नव्हत्या. अलगद वळणांचे घाट, देखणी शेतं, फळबागा, द्राक्षांचे मळे आणि वायनरी, लांबवर दिसणाऱ्या पर्वतरांगा. एक उंच बर्फाच्छादित शिखर वारंवार सगळीकडून दर्शन देत होतं. तो माउंट रेनियर होता, हे नंतर कळलं. हा सगळा भाग मला फार आवडला.
अगदी सुरवातीचे दिवस सोडले तर पुढे सपाट मैदानी प्रदेश, अफाट पसरलेली शेतं आणि माळरानं होती. नंतर आला डोंगरदऱ्या आणि जंगलांचा निसर्गसंपन्न भाग. आज खूप दिवसानंतर मोठ्या शहरात आलो होतो. सिऍटलला खूप कायकाय बघण्यासारखं आहे. बोईंगच्या कारखान्याला भेट द्यायची होती, फेरी बोटींच्या वेळेत तिथे पोचायचं होतं. मायक्रोसॉफ्ट कॅम्पस म्हणजे माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातल्या मंडळींच्या पंचतीर्थातील एक तीर्थक्षेत्र!! त्यामुळे तिथून एक चक्कर मारणं गरजेचं होतं. इतकं सगळं करून मग शहरापासून थोडी लांब असलेली मुक्कामाची जागा गाठायची होती. एकूण काय अगदी भरगच्च दिवस होता. तरी वेळ कमी पडेल ह्या अंदाजाने स्पेस नीडलसारख्या जागांवर आधीच फुली मारली होती.
मोठ्या शहरात अशी आकर्षणं बरीच असतात. पण त्याबरोबर रस्ते गाड्यांनी तुडुंब भरलेलेही असतात. बरेच दिवस रिकाम्या रस्त्यांवरून फिरल्यावर आज जिथे-तिथे अडकायला होत होतं. पण तरीही आम्ही विमानाच्या वेगाने जात बोईंग टूरची वेळ गाठली. त्या टूरसाठी जाताना आपलं वैयक्तिक सामान, मोबाईल सगळं एका लॉकरमध्ये ठेवावं लागतं. जड मनाने मोबाइलचा निरोप घेऊन टूरच्या गटात सामील झालो.
विमानप्रवास आता बऱ्यापैकी सरावाचा झाला असला, तरी ते तयार होताना बघायची उत्सुकता वाटत होती. दीड तासाची ही ट्रीपमध्ये आपल्याला त्या कारखान्यात तयार होणारी विमानं बघायला मिळतात. आम्ही एका पुलासारख्या भागावर उभे होतो आणि दोन्ही बाजूंना पसरलेली प्रचंड मोठी शेड होती. प्रवासी विमानं, मालवाहतुकीची विमानं, लहान विमानं अशी विमानांची रांग लागलेली होती आणि अनेक लोकं त्या विमानाच्या निरनिराळ्या भागांवर काम करत होते. विमानांचा आकार, त्यांना फिरायला लागणारी जागा लक्षात घेतली म्हणजे ती शेड किती मोठी असेल, ह्याचा अंदाज येईल. त्या शेडचं स्केल फार प्रभावित करणारं वाटलं. अशा अनेक शेड्स त्या कॅंपसमध्ये आहेत. भरपूर मोठा पसारा आहे. अर्थातच त्यातला छोटासा भाग आपल्याला बघायला मिळतो.
काही भाग त्यांच्या बसमधून दाखवतात. तेव्हा बरोबरच्या गाइडनं बोईंग विमानांना 747, 787 अशी नावं का मिळाली, त्यांच्यात काय वेगळं असतं अशी कायकाय माहिती सांगितली. त्याबरोबरच आपण खाजगी विमान विकत घेणार असलो, तर त्यात कुठले बदल करता येतात, ते ताब्यात घेताना बोईंगकडून पार्टी कशी देतात वगैरे बिनाकामाची आणि म्हणून मनोरंजन करणारी माहितीही मिळाली. परत येऊन मोबाईल आणि अन्य गोष्टी ताब्यात घेतल्या. तिथे टेस्टिंगसाठी एक धावपट्टी केलेली आहे. गच्चीवर जाऊन थोडावेळ ती गंमत बघितली. फोटो काढले आणि वॉटरफ्रंटच्या दिशेने निघालो.
एव्हाना दुपार उलटून गेली होती. सगळे चाकरमानी घराच्या दिशेने निघाले होते. जिकडे तिकडे ट्रॅफिक अडकला होता. त्यातून मार्ग काढतकाढत वॉटरफ्रंटला पोचून पार्किंग शोधून फेरी बोटीच्या धक्क्याला पोचलो तोवर ती शेवटच्या फेरीसाठी निघून गेली होती. चालायचंच. मग आम्ही तिथल्या जायंटव्हीलकडे मोर्चा वळवला. निळ्या-हिरव्या रंगाचं अथांग पाणी बघून डोळे आणि मन शांत झालं. खाली आल्यावर कॉफी घेऊन तिथेच जरा चक्कर मारली. निरनिराळी दुकानं, उपाहारगृहं, पर्यटक, सायकलवर सुसाट जाणारी मंडळी सगळीकडे उत्साह भरून ओसंडत होता. त्या उत्साहाच्या किनाऱ्याने फिरताना त्याचे थोडे तुषार आमच्यावरही उडले आणि सगळी मरगळ निघून गेली.
सिऍटल आणि कॅनडाची सीमा अगदी जवळ आहे. मायक्रोसॉफ्ट कॅम्पसकडे जाताना मला आपण एखादा रस्ता चुकलो तर अचानक पलीकडे जाऊ अशी फार काळजी वाटत होती. मला अशा कॅनडा सीमेजवळच्या शहरात गेल्यावर नेहमीच ही भीती वाटायची. बरीच वर्षे अमेरिकेत असलेल्या एका नातेवाइकांचा मुलगा डेट्रोईटला नोकरी करत होता. तो पुण्याला आला होता तेव्हा आम्ही कधीकधी जेवायला, समोसे खायला कॅनडात जातो, असं म्हणाला होता तेव्हा मला अमाप आश्चर्य वाटलं होतं. माझ्या डोळ्यासमोर दोन देशांच्या सीमा म्हणजे काटेरी तारांचं कुंपण, रात्रंदिवस गस्त घालणारे शस्त्रधारी सैनिक असं चित्र होतं. समोसे खायला परदेशात म्हणजे काहीही असा विचार आला होता. पण इथे आल्यावर, फिरल्यावर तो सांगत होता ते खरं आहे, शक्य आहे आणि सोपंही आहे, हे लक्षात आलं. आमचा काही समोसे खायचा विचार नव्हता, त्यामुळे पलीकडे जायची गरज नव्हती.
मायक्रोसॉफ्ट कॅम्पसच्या आसपास एक चक्कर मारली आणि मुक्कामाच्या दिशेने निघालो. आज दिवसभर दगदग बरीच झाली होती आणि उशीरही झाला होता. हॉटेलवर पोचून पुन्हा स्वैपाक करायचा उत्साह नव्हता. शिवाय सिऍटल परिसरात भारतीय उपाहारगृहांची रेलचेल आहे. त्यातलंच एक गाठलं. सिऍटल म्हणजे आमच्या प्रवासाचा पहिला मोठा टप्पा संपला होता. उद्यापासून दिशा बदलून ऍरिझोना राज्याकडे जायचं होतं. हा टप्पा सुरळीत पार पडल्याचं सेलीब्रेशन म्हणून भात-भाजी-उपम्याला सुट्टी देऊन मस्त चमचमीत जेवलो, आयस्क्रीम खाल्लं. गच्च भरलेल्या पोटाने आणि खूप काही बघितल्यामुळे तृप्त झालेल्या मनाने मुक्कामाला पोचलो.
ह्या मालिकेतील पुढचा भाग वाचण्यासाठी कृपया खालील दुव्यावर टिचकी मारा
भाग पाचवा : वॉशिंग्टन स्टेट ते नेवाडा
ह्या मालिकेतील आधीचा भाग वाचण्यासाठी कृपया खालील दुव्यावर टिचकी मारा
भाग चौथा : मॉन्टाना ते वॉशिंग्टन स्टेट
०२ ऑक्टोबर २०१९ सिऍटल, वॉशिंग्टन स्टेट ते ग्रँट्स पास, ओरेगॉन
आजपासून पुढचे काही दिवस रोजचं पार करायचं अंतर 400 मैलांच्या आसपास होतं. इंटरस्टेट हायवेवरची वेगमर्यादा ताशी ५५ ते ६५ मैल असते. म्हणजे साधारण सहा-सात तासांचं अंतर. त्यामुळे ज्या दिवशी काही बघायचं असेल, तर निवांतपणे बघण्यासाठी आणि काही बघायचा प्लॅन नसेल तर थोडा आराम करायला वेळ मिळणार होता. ह्या संपूर्ण प्रवासात मिळून जी पंचवीस राज्य फिरायची होती, त्यातली अर्ध्याहून अधिक पार केली होती आणि दिवसांच्या हिशेबात साधारण निम्मे दिवस संपले होते. बर्फ-थंडी, डोंगर-दऱ्या, घनदाट जंगलं असलेला भाग संपून आता हळूहळू लालसर खडकांच्या वाळवंटी प्रदेशाच्या दिशेने जाणार होतो. निसर्गाची किती वेगवेगळे विभ्रम ह्या प्रवासात बघायला मिळत होते!
परवा दिवशी ओरेगॉन राज्यातून वॉशिंग्टन स्टेटमध्ये आलो. आज वॉशिंग्टन स्टेटमधून पुन्हा एकदा ओरेगॉन राज्याच्या वेगळ्या भागात जायचं होतं. कालचा दिवसभर बरीच धावपळ, दगदग झाली होती. त्यामुळे आज जरा निवांत जाऊ असं आधीच ठरवलं होतं. जरा आरामात उठून आवरून निघालो तोवर सिऍटलवासी मंडळी आपल्या ऑफिसमध्ये पोचली होती. फक्त पोचलीच नव्हती, तर ‘कॉफी आणि आजच्या हवामानासंदर्भातील गप्पा’ हे अमेरिकेतील सकाळचे आवडते कार्यक्रम संपवून कामालाही लागली होती. त्यामुळे आम्हाला सकाळच्या तुडुंब वाहतुकीचा सामना करावा लागला नाही.
अडीच-तीन तासात पोर्टलॅंडला पोचलो. तिथे जवळच मलनोमाह फॉल्स नावाची अत्यंत सुंदर जागा आहे. हे सगळे धबधबे असलेली पर्वतरांग, त्यापलीकडे मोठा रस्ता आणि त्याच्याही पलीकडे कोलंबिया नदीचं विस्तीर्ण पात्र आहे. नदीच्या ‘अल्याड ओरेगॉन, पल्याड वॉशिंग्टन, मध्ये वाहते कोलंबिया’ असा सीन होता. रस्ता आणि नदी ह्यांच्या मधल्या जागेतून ट्रेनचे ट्रॅकही गेलेले आहेत. नेमकं तेव्हाच एखादं विमान आकाशातून गेलं असतं की (आणि डोळ्यांपेक्षा मोठा गॉगल लावलेला पायलट खिडकीतून डोकावत असता तर!) पु.लं. च्या पानवालामधलं सूर्योदयाचं चित्र पूर्ण झालं असतं.
डोंगराच्या घळीघळीतून लहान-मोठे-सरळसोट-टप्प्याटप्प्याने वाहणारे असे खूप सारे धबधबे उड्या मारत होते. डोंगरातून-जंगलातून चालत किंवा सायकलवर फिरायच्या उत्तम सोयी होत्या पण आमच्याकडे तेवढा वेळ नव्हता त्यामुळे आम्ही बराचसा भाग गाडीत बसूनच फिरणार होतो. इथल्या धबधब्यांची नावं मला फार आवडली. ब्रायडल व्हेल फॉल, हॉर्सटेल फॉल, लिटिल नेकटाय फॉल, मिस्ट फॉल, पोनीटेल फॉल वगैरे. नाव वाचलं की त्या धबधब्याचं चित्र डोळ्यासमोर आलंच पाहिजे. कधी गाडीतूनच, कधी उतरून बघत होतो. एका ठिकाणी दोन-तीन टप्प्यात पाणी कोसळत होतं. तिथे बाजूने चालत थोडं वरपर्यंत जाता येईल, अशी सोय होती. तिथे चालत गेलो.
पुढे एक सिनीक ड्राइव्ह होता, त्या रस्त्याला लागलो. रस्ता लहानसा होता. समोरून गाडी आली, तर दोन्ही गाड्यांना अंग चोरून एकमेकांना रस्ता द्यावा लागेल, इतका लहान. पण काय रस्ता होता! दोन्ही बाजूंनी हिरवीगार मोठीमोठी झाडं. मध्येच एखादं झाड पानगळीच्या आधीच्या लाल-पिवळ्या रंगात रंगलं होतं. बाहेर झगझगीत वाटणारं ऊन इथे मऊमऊ-सुखद वाटत होतं. लांबवरून पाणी कोसळण्याचा गंभीर आवाज येत होता. गाडीच्या काचा खाली करून जंगलाचा असा एक विशिष्ट वास असतो तो भरभरून घेत होतो. तो रस्ता संपल्यावर अक्षरशः एखाद्या स्वप्नातून जाग यावी, तसं वाटलं. त्या भागातल्या सगळ्यात उंच जागी सगळा परिसर नीटपणे बघता येईल अशी सोय केलेली होती. नदीचं प्रचंड पात्र, दोन्ही बाजूंच्या डोंगर रांगा, जंगल सगळं नजरेत आणि मनात साठवून घेतलं.
पुढे एक लहानसं गाव होतं. काही गावं बघितली की सगळं सोडून इथेच राहावं असा मोह होतो ना, तसं हे गाव होतं. तिथे बऱ्याच लव्हेंडरच्या बागा होत्या. त्या वासात ते गाव गुरफटलं होतं. ताज्या ताज्या लव्हेंडरच्या काड्या घेऊन गाडीत ठेवल्या. पुढचा सगळा प्रवास तो वास गाडीत घमघमत होता. अजूनही तो वास आला, की त्या ड्राइव्हची आठवण येते. पुढे मोठ्या रस्त्याला लागलो. अजून जवळपास २५० मैल अंतर जायचं होतं. जेवायला थांबलो, पेट्रोल भरलं. हिरव्या रंगाचा निरोप घेऊन ठरलेल्या रस्त्याला लागलो.
आजचा मुक्काम ग्रँट्स पास ह्या गावी होता. हॉटेल गाठेपर्यंत दमायला व्हायचंच. चेक-इन झालं की सगळं सामान खांद्यावर, पाठीवर, हातात वागवत खोली गाठायची. असंच ‘संपला आजचा प्रवास!’ असं मनाशी म्हणत खोलीत शिरलो तर समोरच्या कपाटावर एक बुटांची जोडी दिसली. ‘आधीचे लोकं विसरले वाटतं सामान’ असं म्हणायच्या आधीच अजून सामान दिसलं. रिसेप्शनवाल्या ताईंचा काहीतरी गोंधळ झालाय हे लक्षात आल्यावर आम्ही घाईघाईने बाहेर आलो. पुन्हा लळालोंबा करत रिसेप्शन गाठलं आणि दुसऱ्या खोलीची किल्ली ताब्यात घेतली. असं कधी होत असेल, अशी मला शंकाही आली नव्हती. नशिबाने त्या खोलीत कोणी नव्हतं. नाहीतर किती विचित्र वेळ आली असती. त्यानंतर आम्ही प्रत्येक ठिकाणी खोली ताब्यात घेताना सावधपणे आत जायला लागलो आणि आत गेल्यावर दाराचा नीट बंदोबस्त करायला लागलो! प्रवासाने मनुष्याला चातुर्य येतं म्हणतात ना, ते हेच असावं बहुतेक!!
०३ ऑक्टोबर २०१९ ग्रँट्स पास, ओरेगॉन ते फॅलन, नेवाडा
आजच्या दिवसाचा अजेंडा फक्त मुक्कामाला पोचणे, इतकाच होता. काही बघायला थांबायचं नव्हतं. पुढचा महत्त्वाचा टप्पा लास व्हेगास होता. सरळ लास व्हेगासला जाणंही शक्य नव्हतं कारण ते अंतर एका दिवसात पार करायला जास्त होतं. शिवाय मध्ये एक प्रचंड मोठा वाळवंटाचा भाग होता. उशीर झाला असता, तर तिथे थांबायची काही सोय नव्हती. हे हिशोब लक्षात घेऊन असे शांत दिवस अधेम्धे तयार झाले होते. मधल्याच एखाद्या दिवशी काही अडचणींमुळे ठरलेल्या कार्यक्रमाऐवजी आधीच मुक्काम करावा लागला, तर असे दिवस सगळं बिनसलेलं वेळापत्रक जागेवर आणायला उपयोगी पडले असते. इतकी मोठी ट्रीप ठरवताना कुठेतरी काहीतरी बिघडणार,ही शक्यता गृहीत धरलेली होती.
आज सहा तासात पुढच्या मुक्कामाला पोचलो असतो. त्यामुळे सकाळी घाई-गडबड करायची गरज नव्हती. निवांत उठून, आवरून, सामान भरून निघालो. ओरेगॉननंतर कॅलिफोर्निया आणि मग नेवाडा असा रस्ता होता. मुळात ट्रीप ठरवली तेव्हा कॅलिफोर्नियात एक मुक्काम करणार होतो. फार छान स्नेह असलेल्या मित्र-कुटुंबाला भेटायचं आणि मग लास व्हेगासकडे जायचं असा प्लॅन होता. पण ड्रायव्हिंगचं अंतर आणि उपलब्ध दिवस ह्याचं गणित गडबडायला लागलं. शेवटी मन घट्ट करून रस्ता बदलला. मित्र-कुटुंबाला आणि आम्हालाही फार वाईट वाटलं. पुन्हा कधीतरी खास त्यांच्याकडे जायचं किंवा सगळ्यांनी मिळून हिमालयातला एखादा ट्रेक करायचा ,असं नक्की ठरवलं आहे.
लहान असताना भूगोलाच्या पुस्तकात कॅलिफोर्निया भागाचं वर्णन ‘फुलाफळांचा प्रदेश’ असं केलेलं असायचं. अमेरिकेत प्रत्येक राज्याचं काहीतरी स्लोगन असतं . उदाहरणार्थ साऊथ डाकोटा ‘ग्रेट फेसेस, ग्रेट प्लेसेस’ किंवा फ्लोरिडा ‘द सनशाईन स्टेट’ वगैरे. मला उगीचच कॅलिफोर्नियाचं स्लोगन ‘स्टेट ऑफ फ्रूट्स अँड फ्लॉवर्स’ असेल असं वाटलं होतं. पण ते तसं नसून ‘द गोल्डन स्टेट’ असं आहे! तिथे सोन्याच्या खाणी सापडल्यावर त्या राज्याची भरभराट झाली म्हणून आणि वसंत ऋतूत पिवळ्याधमक रंगांच्या गवतफुलांनी तिथली शेतं-माळरानं सोनपिवळी होतात म्हणूनही.
नेवाडा राज्यात शिरल्यावर मात्र हा हिरवा रंग जरा दुर्मिळ झाला. इथे अधिराज्य होतं ते पिवळसर, लालसर, तपकिरी रंगांचं. नेवाडा ह्या राज्याचा बहुतेक सगळा भाग म्हणजे वाळवंट आहे. प्रचंड उन्हाळा, रुक्ष, कोरड्या अशा ह्या भागात काय पिकणार? पण अमेरिकन लोकं पैशांचं पीक काढण्यात चतुर! कुठल्याही परिस्थितीत, निसर्गाची साथ असो वा नसो, त्यांची नोटांची सुगी तेजीतच असते. मला लास व्हेगास हे ह्याचं उत्तम उदाहरण वाटतं.
आजच्या वेळापत्रकात बरेच तास सुट्टीचे होते. त्यामुळे दुपारीच मुक्कामी पोचलो. लहानसं गाव होतं. थोडा आराम केल्यावर संध्याकाळी बाहेर चक्कर मारून आलो. सगळीकडे पिवळसर रंगाची वाळू पसरलेली होती. झाडांची संख्या कमी झाली होती. उन्हाचा चटका जाणवत होता. आत्ता काही दिवसांपूर्वी आपण बर्फाची काळजी करत होतो, हे खरं वाटत नव्हतं. दुकानातून आवश्यक वस्तूंची खरेदी केली. इकडे तिकडे फिरून थोडे पाय मोकळे झाल्यावर पुन्हा हॉटेलवर आलो. खोली थंडगार करून आराम केला. पुढच्या धावपळीसाठी तयार झालो.
०४ ऑक्टोबर २०१९ फॅलन, नेवाडा ते लास व्हेगस, नेवाडा
कालचा दिवस निवांत वेळापत्रकाचा होता. आजचा दिवस मात्र गडबडीचा होता. साधारण ४०० मैल ड्राइव्ह करून लास व्हेगासला पोचायचं. हॉटेलमध्ये चेक-इन करून जरा फ्रेश होऊन लास व्हेगास फिरायला जायचं असा भरगच्च कार्यक्रम होता. त्यामुळे सकाळी भराभर आवरून, गाडीत सामान भरून नेहमीपेक्षा जरा लवकरच निघालो. निघाल्यावर लगेच आम्ही ‘डेथ व्हॅली’त शिरलो. काय पण नाव!! वाचायला जरा डेंजर वाटलं तरी त्यामागची गोष्ट अशी आहे, की एकोणिसाव्या शतकात काही लोकं त्या तप्त, वाळवंटी भागात रस्ता चुकले. त्यांच्यातल्या एका माणसाचा मृत्यू झाला, पण बाकीचे सगळे तिथून सुरक्षित बाहेर पडले. त्या अनुभवाने ती मंडळी इतकी हादरली होती की त्यांनी त्या भागाचा निरोप घेताना ‘गुडबाय डेथ व्हॅली’ असे उद्गार काढले. त्यानंतर ह्या भागाचं नाव ‘डेथ व्हॅली’ पडलं.
उन्हाळ्यात इथलं तापमान ५७ सेल्सियसपर्यंत जातं. अजून उन्हाळा पुष्कळ लांब होता. आत्ता हवा सुखद होती. मात्र जिकडे बघू तिकडे शुष्क, कोरडं वातावरण होतं. उघडे-बोडके डोंगर आणि लांबचलांब पसरलेलं वाळवंट. वेगवेगळ्या आकारांचे, रंगांचे डोंगर बघायला छान वाटत होतं. सृष्टीचं सौंदर्य म्हणजे फक्त वृक्षराजींनी नटलेल्या पर्वतरांगा नाहीत. असे हे लाल-पिवळे-किरमिजी डोंगर आणि त्यांनी तयार होणारे आकृतिबंधही तसेच सुंदर दिसतात. आमचा डेथ व्हॅलीतील रस्ता साधारण दीडशे मैलांचा होता. अमेरिकेच्या विमान दलाचा एक तळही ह्या भागात होता. असं वाटलं होतं की ह्या भागात जेवायची सोय नसेल. पण ठराविक अंतरावर रेस्ट एरियाजही होते आणि एका ठिकाणी पेट्रोल भरायची आणि जेवाखायचीही सोय होती. सकाळी लवकर निघालो होतो, त्यामुळे दुपारी दोनच्या सुमाराला लास व्हेगासला पोचलो.
लास व्हेगास! एकदा वाटलं होतं, ह्या जागेबद्दल काहीच लिहू नाही. कारण त्या शहराची ख्याती ‘ What happens in Vegas, stays in Vegas’ अशी आहे! इथे काहीही करता येतं, असं सुचवणारी ही प्रसिद्ध लाइन आहे. प्रत्येक शहराचा आपला एक स्वभाव, एक प्रकृती असते. अमेरिकेतलं वॉशिंग्टन डी.सी. म्हणजे सत्ता, ऐट, राजकारण. न्यूयॉर्क म्हणजे गती, धावपळ. तसं जीवाची चार घटका मौज करायची असेल तर अमेरिकेची पावलं लास व्हे कडे वळतात. इथल्याइतकी हॉटेलच्या खोल्यांची संख्या जगात कुठेही नाहीये. गंमत म्हणजे हे शहर ‘चट लग्न आणि पट काडीमोड’ ह्यासाठीही प्रसिद्ध आहे!
इथल्या मुख्य रस्त्याच्या म्हणजेच स्ट्रीपच्या दोन्ही बाजूंना प्रचंड मोठी हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, कसीनोज आहेत. वेगवेगळ्या स्थापत्य शैलीत बांधलेल्या इमारती, आयफेल टॉवरपासून पिरॅमिडपर्यंत अनेक प्रतिकृती, कुठे गोंडोला तर कुठे संगीतावर नाचणारी कारंजी तर अजून कुठे ज्वालामुखी. कुठे आणि काय बघावं, हाच प्रश्न. सगळ्या इमारती, सगळे रस्ते सगळं झगमगत असतं. मला हे शहर म्हणजे प्रचंड मोठा व्हिडिओ गेम वाटला. खरंही नाही आणि खोटंही नाही. सगळं भासमान. करमणूक हा ह्या शहराचा मूलमंत्र आहे. लहान मुलांसाठी सर्कस, साहसी खेळ, जादूचे प्रयोग, संग्रहालये आहेत. मोठ्या माणसांसाठी तर विचारायलाच नको. त्यांच्यासाठी सगळ्या म्हणजे अगदी “सगळ्या” प्रकारची करमणूक इथे सहज उपलब्ध आहे. ‘नाइट लाईफ’ साठी प्रसिद्ध असलेल्या ह्या जागी खरंतर रात्र अशी होतंच नाही. पहाटेपर्यंत संध्याकाळच असते.
बाकी बरंच काही घडत असलं तरी व्हेगासच्या आर्थिक उलाढालीत सगळ्यात महत्त्वाचे आहेत ते इथले कॅसिनोज. प्रचंड मोठे कसीनोज इथे अधिराज्य गाजवतात. निरनिराळी स्लॉट मशीन्स आणि इतरही बरेच प्रकार आपण सगळ्यांनी हॉलिवूड सिनेमांमध्ये बघितलेले असतात. आज मी प्रत्यक्ष बघत होते. इथलं वातावरण वेगळंच असतं. अंधुक उजेड असतो. बाहेर नक्की किती वाजले आहेत, दिवस आहे की रात्र हे कळू शकणार नाही. काळवेळाचं भान राहणार नाही असं काहीतरी. सगळा पैशांचा खेळ असल्याने शस्त्रसज्ज सुरक्षारक्षकांची वर्दळ असते. स्लॉट मशिन्स रंगीबेरंगी उजेड उधळत असतात. एरवीच्या आयुष्यात जे नियम, जे तर्क वापरून आपण आपले निर्णय घेतो, ते इथे गळून पडतात. कधी मित्र-मैत्रिणींबरोबर गंमत म्हणून, कधी पैसे मिळवायची संधी म्हणून, कधी खेळताना येणारी झिंग अनुभवण्यासाठी, कधी आयुष्यातल्या प्रश्नाचा विसर पडावा म्हणून लोकं गँबलिंग करतात. ‘The house always wins’ हे अनेक वेळा सिद्ध झालेलं असलं तरी एरवी नीटपणे गुंतवणूक करणारी मंडळी ‘आजचा दिवस माझाच’ ह्या खात्रीने खेळत राहतात.
आता मी काही लहान नाही. आपला स्वतःच्या मनावर पुरेसा ताबा आहे, ह्याची मला खात्री आहे. आयुष्यात एकदा कसीनोत जाऊन गॅम्बलिंग केलं तर मला जुगाराचं व्यसन लागणार नाही, हे नक्की माहिती आहे. पण तरीही मी ते करू शकले नाही. मोठमोठ्या कसीनोत गंमत म्हणून, आयुष्यात एकदा घ्यायचा अनुभव म्हणूनही माझी पावलं स्लॉट मशीनकडे वळली नाहीत. हे सांगताना काही फुशारकी मारायचा उद्देश नाही. पण तो आपला रस्ता नाही, हे नीटच कळलं.
आम्ही स्ट्रीपच्या एका टोकाला कार पार्क केली आणि रमत-गमत चालत निघालो होतो. आसपास इतकं काही घडत होतं की नक्की किती चाललो हे कळलंही नाही. गोंडोला बघितले, कारंजी बघितली. एका हॉटेलच्या लॉबीत हेमंत ऋतूच्या स्वागताप्रित्यर्थ भारतीय संस्कृती आणि सौन्दर्यावर आधारित सुरेख सजावट केली होती, ती बघितली. कितीतरी जिने चढलो, उतरलो. चालूनचालून पायांचे अक्षरशः तुकडे पडले. एका जागी थांबून जेवून घेतलं. पुन्हा चालत पार्किंग पर्यंत आलो आणि हॉटेलकडे निघालो. गाडीत रेडिओ लावला होता. फ्रॅंक सिनात्रा ह्या अतिशय लोकप्रिय गायकाबद्दलचा कार्यक्रम चालू होता. व्हेगासच्या सगळ्या प्रतिमा डोळ्यासमोर नाचत होत्या, तेव्हा हे गाणं ऐकल्यावर फारच भिडलं. हे गाणं लास व्हेगाससाठी रचलं होतं की नाही, मला कल्पना नाही. पण व्हेगासचं वर्णन करायला इतके योग्य शब्द सापडणं शक्य नाही.
This town is a lonely town
Not the only town like-a this town
This town is a make-you town
Or a break-you-town and bring-you-down town
This town is a quiet town
Or a riot town like this town
This town is a love-you town
And a shove-you-down and push-you-'round town
This town is an all-right town
For an uptight town like-a this town
This town, it's a use-you town
An abuse-you town until-you're-down town
ह्या मालिकेतील पुढचा भाग वाचण्यासाठी कृपया खालील लिंक बघा
भाग सहावा : नेवाडा ते टेक्सास
ह्या मालिकेतील आधीचा भाग वाचण्यासाठी कृपया खालील लिंक बघा
भाग पाचवा : वॉशिंग्टन स्टेट ते नेवाडा
०५ ऑक्टॉबर २०१९ लास व्हेगस, नेवाडा ते फिनिक्स, ऍरिझोना
आहा! आजचा दिवस एकदम स्पेशल होता.
आज फिनिक्समध्ये माझ्या मैत्रिणीच्या घरी मुक्कामाला जायचं होतं. एकेकाळी आम्ही दोघी पाच मिनिटात एकमेकींच्या घरी पोचायचो. जरा जास्त वेळा पोचायचो. वह्यांची देवाणघेवाण, एखादं आजिबात येत नसलेलं आणि फार-फार महत्वाचं गणित विचारायला, कधी एकत्र अभ्यासाच्या नावाने, कधी नुसत्याच खुसूखुसू गप्पा मारायला, कधी त्यांच्या अंगणातल्या बकुळीची फुलं वेचायला. खरं सांगायचं तर काही कारण नसायचं आणि काही कारण लागायचंही नाही. अश्विनी आणि मी बालवर्गापासून एका वर्गात होतो ते थेट बारावीपर्यंत. नंतर मात्र आमची फाटाफूट झाली. ती फिजिओथेरपी शिकायला लागली आणि मी आर्किटेक्चर. ही कायम आपल्याबरोबर असणार हे मी इतकं गृहीत धरलं होतं की ती बरोबर नाहीये हे पचायला बराच वेळ लागला.त्यामुळेच की काय पण आम्ही आमच्या-आमच्या कॉलेजात फार रमलो नाही. कॉलेजव्यतिरिक्त करायच्या गोष्टी म्हणजे फॅशन स्ट्रीटची चक्कर, एखादा सिनेमा, अन्य काही खरेदी नेहमी बरोबर करायचो.
हळूच ही वर्षे संपली. मग लग्न करून ती एका गावात गेली आणि मी दुसऱ्या गावात गेले. मग काहीकाळ ती पृथ्वीच्या एका टोकाला आणि मी दुसऱ्या टोकाला, असे दिवस आले. आमच्या दोघींच्याही घरात बाळपावलं आली. संसाराचा सराव झाला. सगळं बदललं. पण मैत्री कायम राहिली. प्रत्यक्ष भेटी कमी झाल्या पण ओढ, जिव्हाळा तसाच होता. आयुष्याचा प्रवाह पुढे जातोच. आमचाही गेला. नव्या ठिकाणी घरं मांडली, आवरली आणि पुन्हा दुसऱ्या जागी मांडली. हे सगळं करताना एखाद्या क्षणी वाटायचं, मला हे जे वाटतंय किंवा होतंय ते कोणाला नाही कळलं तरी तिला कळलं असतं. पण कधीतरी होणाऱ्या तुटपुंज्या भेटी, पत्रं, इमेल, फोनवरची संभाषणं ह्यात ते सांगायचं मनातच राहायचं. ह्यालाच मोठं होणं म्हणतात.
आमची ही मैत्री काही गोडमिट्ट वगैरे नव्हती. लहानपणी तर पुष्कळ भांडणं व्हायची. कोणी कोणाच्या घरी बोलवायला जायचं? हा मुख्य विषय. नंतर तह करून मधला एक स्पॉट नक्की केला होता. तिथे भेटून पुढे एकत्र जायचं आणि येताना तिथे निरोप घ्यायचा, अशी तहाची कलमं होती. निरोप घेताना उभं राहून अर्धा-अर्धा तास गप्पा मारायचो पण ‘मला लांब पडतं’ असं म्हणून घरी जायचं नाही म्हणजे नाही. जिद्द म्हणजे जिद्द!! नंतर भांडणं अशी नाही झाली. तिला काय बोलावं आणि काय बोलू नये, ही समजूत खूप चांगली आहे. माझा त्याबाबतीत जरा आनंदच आहे. त्यामुळे नको इतकं बोलणे, नको ते बोलणे आणि नको तेव्हा बोलणे ही माझी खासियत आहे. ते पोटात घालून त्याचा डाग मैत्रीला न लागू देणे, ही तिची खासियत आहे.पण आपण चुका आपल्या हक्काच्या जागीच करतो ना? वय वर्षे तीनपासून मी हा हक्क तिच्यावर गाजवते आहे. तिच्या मैत्रीने मला फार समृद्ध केलं आहे.
आता आमच्या लग्नांना पंचवीस वर्षे होऊन गेली. पण आम्ही चिकटपणे आमची मैत्री सांभाळून ठेवली आहे. मध्यंतरी काही वर्षे संपर्क थोडा कमी झाला होता. मी कैलास-मानसला जाऊन आल्यावर त्याचं वर्णन लिहिलं. त्या निमित्ताने काहीशा दुरावलेल्या मैत्रिणी, नातेवाईक पुन्हा जोडले गेले. त्या लिखाणाने मला दिलेली ही अपूर्व अशी भेट आहे. त्यानंतर आम्ही मैत्रिणी + मुलं मिळून हिमालयातल्या एका सुंदर ट्रेकलाही गेलो होतो. आमच्या मैत्रीची ही वेल पुढच्या पिढीपर्यंत पोचली, ह्याचा फार आनंद होतो.
काही वर्षांमागे महेशच्या कामाच्या निमित्ताने आम्ही अमेरिकेत घर मांडलं. तिला अमेरिकेत येऊन बरीच वर्षे झाली होती. आम्ही अमेरिकेच्या दोन टोकांना होतो. एका गावात आलो असतो तर हत्तीवरून साखरच वाटली असती बहुतेक! दोघींच्या गावांमध्ये अंतर खूप होतं तरी एकदा तिच्याकडे एकटी गेले. एकदा सहकुटुंब सहपरिवार गेले. एकदा व्हर्जिनिया ते ऍरिझोना अशी रोडट्रीप केली आणि आता मोठ्या रोडट्रीपमधला विश्रांतीचा दिवस तिच्या घरी होता! थोडक्यात काय इकडून तिकडून कुठूनही कुठेही गेलो की आमच्या रस्त्यात फिनिक्स येतंच!
तसंच ह्या ट्रीपमध्ये रस्ता थोडास्सा वळवून आम्ही फिनिक्सच्या दिशेने निघालो होतो. आज प्रवासाचा दुसरा टप्पा संपणार होता. आजचं अंतरही कमी होतं. तीनशे मैलांच्या आसपास. रस्त्यात हूव्हर डॅमला भेट देणार होतो. उद्या आम्हाला आणि गाडीला एक दिवसाची विश्रांती मिळणार होती. त्यात आराम करणे, रसद पुन्हा भरून घेणे आणि मुख्य म्हणजे गप्पा मारणे असा छानसा कार्यक्रम होता.
काल लास व्हेगासच्या रस्त्यांवर भरपूर पायपीट झाली होती. रात्रभर छान विश्रांती झाली तरीही पाय ठणकत होते. अशा कुरकुरणाऱ्या पायांसकट गाडीत बसून निघालो. व्हेगासपासून हूव्हर डॅम अगदीच जवळ आहे. नेवाडा आणि ऍरिझोना राज्याच्या सीमेवरील कोलोरॅडो नदीवरचं हे धरण आहे. दरवर्षी जवळपास दहा लाख पर्यटक ह्या जागेला भेट देतात. ह्या वर्षीचा हा आकडा गाठण्यासाठी आम्ही हातभार लावला होता. बाकी धरण-रस्ते-पूल हे विषय आर्किटेक्ट मंडळींच्या कक्षेत येत नसल्यामुळे त्याबद्दल मी काही बोलायचं काम नाही.
धरणाकडे जाताना सुरक्षेसाठी गाडीची अगदी कडक तपासणी झाली. नंतर थोड्या पायऱ्या चढून गेल्यावर धरणाचं विहंगम दृश्य बघता येतं. पायऱ्या चढताना मधेमधे थांबून विश्रांती घेता येईल अशा जागा केल्या आहेत. तिथे धरणाची, त्याच्या बांधकामाची माहिती दिली आहे. जी माहिती खाली उतरेपर्यंतही लक्षात राहात नाही, ती माहिती अक्षरओळख आहे म्हणून मी उगीच वाचते. इथेही वाचली. वर भणाण वारा होता. त्या बाल्कनीसारख्या जागेच्या एका बाजूला नदीचा अडवलेला प्रवाह दिसत होता तर दुसऱ्या बाजूच्या हायवेवरून गाड्या ‘वेगे वेगे’ धावत होत्या. आसपास दिसणारे डोंगर लालसर दगडांचे होते. महाराष्ट्रासारखाच हा भागही ‘राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा’ होता. पूर्ण प्रवासात जिथेजिथे राज्यांच्या सीमारेषा आल्या, तिथल्या ‘xxx राज्यात स्वागत आहे’ अशा बोर्डचे फोटो काढत होते. चालत्या गाडीतून असे फोटो काढायचे म्हणजे शिकार केल्यासारखं सावध राहावं लागायचं. इथे मात्र निवांतपणे फोटो काढता आले.
कोलोरॅडो नदीचं वरून दर्शन घेतल्यावर गाडीत बसून त्या भागातून अजून थोडी चक्कर मारली आणि फिनिक्सच्या दिशेने निघालो. घरून निघाल्यापासून रोजच्या रात्रीच्या जेवणाची सगळी भिस्त इन्स्टंट पॉटवर असल्यामुळे रोज आमटी/ पिठलं / रस्सा + भात किंवा उपमा असं जेवत होतो. त्यामुळे अश्विनीबरोबर झालेल्या (असंख्य) फोनकॉलमध्ये आम्ही आलो की भात आणि रवा हे पदार्थ नसतील, असं काहीही जेवायला कर, अशी सूचना आधीच दिलेली होती. त्यामुळे घरच्या सुग्रास अन्नाचा वास मला दोनशे मैल अंतरावरूनच येऊ लागला होता.
०७ ऑक्टॉबर २०१९ फिनिक्स, ऍरिझोना ते अल पासो, टेक्सास
अश्विनी-अजित ह्यांचा निरोप घेऊन निघालो. तिथे होतो तोवर खूप गप्पा झाल्या. अजित, अश्विनी, तिच्या सासूबाई आणि मी सगळे कल्याणचे. तेव्हाचं कल्याण लहान होतं. सगळे एकमेकांना ओळखायचे. त्यामुळे कॉमन ओळखी भरपूर. महेशला कंटाळा येईल म्हणून कल्याणच्या गप्पा नाही मारायच्या असं ठरवलं तरी कुठूनतरी विषय निघून तिथेच येत होतो. भरपूर गप्पा, विनोद, हसाहशी, खाणे आणि ड्रायव्हिंगला सुट्टी ह्या सगळ्यामुळे प्रवासाचा शीण गेला होता. आता ताजेतवाने होऊन पुढच्या प्रवासाला निघालो होतो.
व्हर्जिनिया ते वॉशिंग्टन स्टेट ते ऍरिझोना असे दोन टप्पे संपले होते आणि आता प्रवासाच्या तिसऱ्या टप्प्यात ह्युस्टनकडे निघालो होतो. ह्या रस्त्याचा बराचसा भाग मेक्सिकोच्या सीमेजवळून जात होता. ऍरिझोनानंतरचं पहिलं राज्य ‘न्यू मेक्सिको’ होतं. त्यामुळे सीमेच्या एका बाजूला न्यू मेक्सिको (मेक्सिको खुर्द) आणि पलीकडे नुसतं मेक्सिको (मेक्सिको बुद्रुक) आहे, असं वाटत होतं. जिथे जाणार होतो, ते ‘अल पासो’ तर अगदी सीमेवरच आहे. ह्या भागात बेकायदा स्थलांतर करून अमेरिकेत येण्याचे प्रकार घडत असतात. त्यामुळे सीमा सुरक्षा दलाची इथे बरीच वर्दळ असते, असं कळलं होतं. मेक्सिकन आणि भारतीय लोकांची चेहरेपट्टी काहीशी सारखी असते, केसांचा रंगही सारखा असतो. त्यामुळे काहीवेळा भारतीय लोकांना थांबवून त्यांची कागदपत्रे बघितली जातात, असं ऐकलं होतं. पण आमच्याबाबतीत तसं काही झालं नाही.
बाहेर अजूनही लालसर दगडांच्या पर्वतांचं राज्य होतं. वेगवेगळ्या आकाराच्या दगडांनी तयार झालेले आकृतीबंध बघायला मिळत होते. अल पासो हे गाव मेक्सिको देश, न्यू मेक्सिको राज्य आणि टेक्सास राज्य ह्या तिन्हीच्या सीमारेषांच्या जवळ आहे. मुक्कामावर पोचायच्या थोडंसंच आधी टेक्सास राज्यात प्रवेश केला. हे आमच्या प्रवासातलं एकविसावं राज्य होतं. काही राज्यामध्ये एकही मुक्काम केला नाही, तिथे काही बघायलाही थांबलो नाही. तिथला अगदी थोडासा भाग पार केला. अशा वेळी आम्ही ‘ह्या राज्यात आपण शास्त्रापुरतं जायचं आहे’ असं म्हणायचो. टेक्सास राज्यातून तीन दिवस प्रवास करायचा होता. हे राज्य भौगोलिक दृष्ट्या मोठं राज्य आहे. आम्ही जो रस्ता निवडला होता, तो टेक्सासच्या ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत जाणार होता. म्हणजे महाराष्ट्राच्या संदर्भात बोलायचं तर अगदी ‘चांद्यापासून बांद्यापर्यंत’ म्हणता येईल असा रस्ता होता!
अल पासोला पोचल्यावर हॉटेलमध्ये जाण्याआधी वॉलमार्टमध्ये जाऊन दूध-भाजी खरेदी करायची होती. तिथे गेलो तर आवारात शस्त्रधारी पोलिसांची बरीच वर्दळ दिसली. आधी वाटलं की मेक्सिकोच्या सीमेवरचं शहर असल्यामुळे इथे वाढीव बंदोबस्त असेल. पण मग टी.व्ही. बघताना कळलं की काही महिन्यांपूर्वी ह्याच वॉलमार्टमध्ये एकाने अंदाधुंद गोळीबार केला होता. काहीही चूक नसताना वीस लोकं त्या गोळीबारात गेली. म्हणून इथे पोलीस पहारा होता.
अमेरिकेत दारू किंवा सिगारेट विकत घ्यायची तर वयाची अट आहे. तुम्ही अगदी जख्ख म्हातारे असलात तरी ओळखपत्र दाखवल्याशिवाय ह्या गोष्टी विकता येत नाहीत. जर एखादा दुकानदार ओळखपत्र न तपासता ह्या वस्तूंची विक्री करताना पकडला गेला तर अत्यंत गंभीर परिणाम होतात. हे कायदे योग्यच आहेत. पण त्याच देशात तुम्ही एके-47 सारखी प्राणघातक शस्त्र आपल्या घरात ठेवू शकता. तुमच्या घराच्या बागेत वाघ-सिंह पाळू शकता. तुमच्या शेजाऱ्याने असे प्राणी पाळले असतील, तर तुमच्यासाठी विमा कंपन्यांनी वेगळी पॉलिसीही तयार केलेली आहे.
गंमत आहे की नाही!!
०८ ऑक्टॉबर २०१९ एल पासो, टेक्सास ते जंक्शन टेक्सास
गेली तीन-चार वर्षे अमेरिकेत राहात होतो. त्याआधी अमेरिकेत कधी आलेही नव्हते. पुस्तकातून किंवा सिनेमातून जेवढी ओळख होती तेवढीच. सिनेमापेक्षा पुस्तकातूनच जास्त. वाचनातून अमेरिकेतील समाजजीवनाचे वेगवेगळे थर माहिती झाले. त्यातलंच एक पुस्तक म्हणजे जॉन ग्रिशॅम ह्या लेखकाचं ‘The painted house.’ हे पुस्तक मला फार आवडतं. अमेरिकेतल्या खेड्यातल्या शेतकरी कुटुंबातल्या सात-आठ वर्षांच्या मुलाचं आयुष्य आणि साधारण एक वर्षात होणाऱ्या घडामोडी असं ढोबळ कथानक आहे. इथली शेतं बघताना मला त्या पुस्तकाची खूप वेळा आठवण आली. खरं तर ते कथानक टेक्सास राज्यात घडत नाही. जेव्हा यांत्रिक शेतीचं प्रमाण कमी होतं तेव्हाच्या जुन्या काळातली ती गोष्ट आहे. तेव्हा असं सगळं असलं तरी ती मैलोनमैल पसरलेली शेतं , त्यातलं एखादं घर बघताना ‘ल्यूकचं घर’ असंच दिसत असेल, असं वाटायचं खरं. लान्स आर्मस्ट्रॉंग ह्या सायकलपटूच्या ‘It’s not about the bike’ ह्या पुस्तकातून टेक्सास राज्याची ओळख झाली होती. तिथले रस्ते, निसर्ग हे वर्णन वाचून फार प्रभावित झाले होते. पुढे त्या सायकलपटूने आपली कामगिरी सुधारण्यासाठी उत्तेजक औषधांचं सेवन केल्याचं उघडकीला आलं. हे कळल्यावर माझा मुलगा इतका चिडला की ते पुस्तक त्याने चक्क केरात टाकून दिलं!! टेक्सासच्या रस्त्यांवरून जाताना हे असं कायकाय आठवत होतं.
सुरवातीच्या टप्प्यांमध्ये आपण घराकडे पाठ करून प्रवास करतोय, घरापासून लांब जातोय, असं वाटत होतं. आता मात्र घराच्या दिशेने जातोय, असं वाटत होतं. साधारण आठवड्याभरात घरी पोचलो असतो. प्रवासाचा कंटाळा आला नव्हता. पण घराची ओढ तीव्र होत होती. घरी जायला किती दिवस आहेत, घरी गेल्यावर काय करायचं, कुठली कामं लगेच करायला हवी आहेत? लवकरच मायदेशी कायमचं परतायचा बेत होता. त्यादृष्टीने काय तयारी करायची आहे, हे विषय सारखे चर्चेला येत होते.
आजच्या प्रवासात काही बघायला थांबायचं नव्हतं. एका गावाहून निघायचं चारशे मैल ड्राइविंग करायचं आणि पुढच्या गावाला पोचायचं, इतकाच अजेंडा होता. नेवाडा राज्यात शिरल्यापासून वाळवंट बघत होतो. लाल-किरमिजी रंगांचे डोंगर, वाळूसारखी पिवळसर माती, हिरवा रंग जरा दुर्मिळच झाला होता. आता पुन्हा एकदा मैदानी प्रदेशाकडे निघालो होतो. विस्तीर्ण अशी शेतं दिसत होती.
आता अगदीच सरावाचे झालेले ‘सकाळची आन्हिके-ब्रेकफास्ट - सामान गाडीत भरणे - नेव्हिगेशन काकूंना पत्ता सांगणे - गाणी ऐकणे - जेवायला थांबणे - कॉफीसाठी थांबणे - हॉटेल गाठणे - चेकइन करणे - खोली अस्ताव्यस्त करणे - स्वैपाक - जेवण - टीव्ही - उद्याचं हवामान- झोप’ हे रुटीन अजून एकदा गिरवलं आणि आजचे कार्यक्रम संपले. उद्या भेटू ह्याच जागी, ह्याच वेळी असं जाहीर केलं आणि निवांत झोपलो.
०९ ऑक्टॉबर २०१९ जंक्शन टेक्सास ते व्हिडोर टेक्सास
माझा मामा डहाणूला राहात असे. तिथे गेल्यावर भरपूर गुजराती कानावर पडायचं. मामा तर अस्खलीत बोलायचाही. मुंबईत तसंही ट्रेनमध्ये-दुकानात गुजराती कानावर पडत राहतं. पुढे स्वतःचा व्यवसाय सुरु केल्यावर बांधकाम-प्लॅस्टर-टाईल्सचं काम करणारे कॉन्ट्रॅक्टर गुजराती होते. इतक्या सगळ्या अभ्यासावर मला तोडकं-मोडकं गुजराती बोलता येतं आणि बऱ्यापैकी कळतंही. अमेरिकेत बऱ्याच ठिकाणी पटेल मंडळी मोटेल्स / हॉटेल्स चालवतात किंवा त्याचं व्यवस्थापन बघतात. तसा अंदाज आला, की मी माझी चार ठरलेली गुजराती वाक्य सुरवातीला म्हणून टाकत असे आणि शेवटी ‘आव जो’ म्हणून निरोप घेत असे! तेवढीच जरा गंमत.
आज जिथे राहात होतो, तेही ‘जितुभाईंना मोटेल’ होतं. प्रथेप्रमाणे मी माझी चार वाक्य टाकली. त्यांनीही थोडं जास्त हसून स्वागत केलं होतं. मात्र तो आनंद काही मिनिटंच टिकला. हॉटेलमध्ये नूतनीकरणाचं काम चालू होतं. सगळीकडे धूळ, सिमेंटचं राज्य होतं. आम्ही बुकिंग करताना ब्रेकफास्टची सोय आहे, असं बघूनच हॉटेल ठरवायचो. पण इथे आल्याआल्या जितुभाईंनी ‘ब्रेकफास्ट नाहीये. फक्त फळं आणि बिस्किटं मिळतील’ असं सांगितलं. संध्याकाळ होत आली होती. दमलोही होतो. त्यामुळे बुकिंग रद्द करून दुसरं हॉटेल शोधण्याइतकी शक्तीही नव्हती आणि वेळही. त्यामुळे नाराज होऊन खोली गाठली. आतलं चित्र बघून अजूनच नाराज झालो. आतला सगळा सीन जरा जुनाट होता. पडदे, बेड कव्हर्स बिचारी. टेबल-खुर्चीवर चरे आले होते. अमेरिकेत आल्यापासून पुष्कळ फिरलो. पण असा अनुभव आला नव्हता. तो इथे आला, त्याचं थोडं वैषम्य वाटलं.
सकाळी आयता ब्रेकफास्ट मिळणार नव्हता. त्यामुळे उपमा केला. तो खाऊन, भांडी धुवून, सामान भरून निघेपर्यंत जरा उशीरच झाला. इथे प्रत्येक हॉटेल रूममध्ये नियम असल्यासारखी बायबलची प्रत असतेच असते. आज कुठे काही विसरलो नाही ना, ते बघताना एका ड्रॉवरमध्ये बायबलच्या सोबतीने इंगजीतील भगवद्गीता होती, ते बघून अंमळ मजा वाटली.
आजही चारशे मैल म्हणजे साधारण सहा-सात तासांचं ड्रायव्हिंग होतं. फिनिक्सच्या रस्त्यावर हूव्हर डॅम बघितला, त्यानंतर काही बघायला असं थांबलो नव्हतो. आज सॅन अंटानियो ह्या गावातला एक ऐतिहासिक प्लाझा बघायचा होता. ह्यूस्टनला जेवायच्या वेळेपर्यंत पोचलो असतो. तिथून दीड-दोन तासावर मुक्कामाचं गाव होतं. तीन दिवस टेक्सास राज्यात फिरत होतो, आता आज ह्या राज्यातला शेवटचा मुक्काम होता.
सॅन अंटानियो इथे अलामो प्लाझा बघायला जायचं असं आधीच ठरलेलं होतं. ‘इतकं काही खास नाही. It’s overrated’ असं अश्विनीच्या कन्येने आधीच बजावून सुद्धा आम्ही ठरल्याप्रमाणे आलो होतो. इथे मिशन, चर्च, थोडा नागरी युद्धाचा इतिहास असं कायकाय होतं. टेक्सास आणि मेक्सिकोच्या युद्धात ह्या जागेला महत्त्व होतं. आपल्याकडे अशा लढायांचा इतिहास, एखाद्या वास्तूचं स्थानमाहात्म्य आपल्याला माहिती असतं. अमेरिकेत फिरताना अशा जागी हा प्रश्न नेहमीच येत होता. एकतर त्यांचा इतिहास माहिती नाही. तिथल्या यादवी युद्धातले वीर, महत्त्वाच्या लढाया माहिती नाहीत. त्यामुळे भावना उचंबळून येण्याचा संभव नव्हता. तिथे गेलो, फिरलो, माहिती देणारी एक फिल्म दाखवत होते ती बघितली.
बाहेर येऊन कॉफी शॉपमध्ये शिरलो. इथली कॉफी मात्र छान होती. छान तरतरीत होऊन पुन्हा गाडीत बसलो. सॅन अंटानियोमध्ये जरा जास्तीच शुकशुकाट वाटला. बरीच दुकानं बंद होती. रस्त्यावरही फारशी वर्दळ नव्हती. असं का असेल, हा चर्चा विषय आम्ही ह्युस्टन येईपर्यंत पुरवला. आजचा उरलेला प्रवास लांबचलांब क्षितिजापर्यंत पसरलेले रस्ते, शिस्तीत पण वेगात धावणाऱ्या गाड्या आणि आत्ता दिसत आहेत तोवर दृष्टीआड होणारी चिमुकली गावं बघताना संपला सुद्धा.
ह्या मालिकेतील पुढचा भाग वाचण्यासाठी कृपया खालील लिंक बघा
ह्या मालिकेतील आधीचा भाग वाचण्यासाठी कृपया खालील लिंक बघा
भाग सहावा : नेवाडा ते टेक्सास
१० ऑक्टोबर २०१९ : व्हिडोर टेक्सास ते सलीडेल लुईझियाना
आजचा दिवस भरगच्च होता. डायव्हिंगचं अंतर साधारण अडीचशे मैल, म्हणजे आमच्या सरासरीपेक्षा जरा कमी होतं. पण दोन जागा बघायच्या होत्या. दुसऱ्या प्रेक्षणीय स्थळापासून मुक्कामाची जागा अगदी जवळ होती. तसं नसेल तेव्हा फिरताना पुढच्या अंतराचं, संध्याकाळच्या गच्च रस्त्यांचं भान ठेवावं लागायचं. आज तसा काही प्रश्न नव्हता. निवांत फिरता येणार होतं.
आमच्या ह्या ट्रीपचा मुख्य उद्देश जास्तीतजास्त राज्यांना भेट देण्याचा असल्यामुळे आम्ही कुठल्याच राज्यात फार रेंगाळलो नाही. एखाद्या राज्यात तर एकही मुक्काम झाला नाही. टेक्सास राज्यात मात्र तीन मुक्काम झाले होते. आज निघाल्यावर लगेचच टेक्सासची हद्द संपली आणि आम्ही लुईझियाना राज्यात प्रवेश केला. सुरवातीचा बराचसा रस्ता ‘जंगल झाडीत’ लपलेला होता. उंच उंच झाडी आणि वळणाचा रस्ता. मध्येच लांबवर एखादं तळंही दिसत होतं. छान वाटत होतं. हवा चांगली होती. इतक्या झाडीमुळे ऊन लागत नव्हतं. रस्ता सोडून एखाद्या तळ्यापाशी जावं, असा मोह व्हायचा. पण जवळच आहे, अशा दिसणाऱ्या जागा प्रत्यक्षात बऱ्याच लांब असतात, हा अनुभव घेऊन झालेला असल्यामुळे ‘दुरून तळी साजरी’ असा जप करत गप्प बसले!! शिवाय आज ज्या दोन जागा बघायच्या होत्या, त्या पाण्याजवळच्या होत्या. त्यामुळे पाणी बघून डोळे थंडावणार होतेच.
हा सगळा हिरवा भाग संपला आणि आम्ही बॅटन रुश नावाच्या एका छानशा गावी पोचलो. यु.एस.एस. किड नावाच्या युद्धनौकेचं मिसिसिपी नदीच्या किनारी जतन केलेलं आहे, ते बघायला गेलो. नेव्हीमधून निवृत्त झालेली मंडळी आपले गणवेश आणि इतर बिरुदं मोठ्या अभिमानाने मिरवत होती. इथे आलेल्या प्रवाशांना तिकीटे, माहिती देणं, तिथल्या भेटवस्तूच्या दुकानाची व्यवस्था बघणं ही सगळी कामं ह्या लोकांकडे होती. आम्हीही तिकिटं घेऊन बोटीकडे निघालो.
एक लहानसा पूल ओलांडून बोटीत पोचलो. सगळ्यात आधी डोळ्यात भरलं ते मिसिसिपी नदीचं पात्र. रुंद पात्र, स्वच्छ पाणी. मला पाण्याचं फार आकर्षण आहे. पाणी दिसलं की मी खूष!! एकेकाळी कल्याणच्या खाडीवर पोहणे, हा आयुष्यातला मुख्य कार्यक्रम होता तेव्हा पाणी दिसलं की पोहायला उतरायचं हा अलिखित नियम होता. ‘चला, चार हात मारूया’ हे बोधवाक्य होतं. आता तसं करणं अशक्यच आहे. पण पाणी दिसलं की मी कल्पनेत का असेना, त्यात उडी मारून पोहून येते!!
बोट फार मोठी नव्हती. हातात नकाशा होताच. त्याच्या मदतीने खलाशांच्या राहण्याची सोय, मॅप रूम, दारुगोळा साठवण्याची कोठारं असं बरंच कायकाय बघितलं. दुसरं महायुद्ध, कोरिया युद्ध, शीतयुद्ध अशी देशाची सेवा करून निवृत्त झालेली ही बोट आहे. बघून झाल्यावर संग्रहालय बघायला गेलो. तिथे त्या राज्यातल्या हुतात्म्यांची माहिती होती. असं सगळं बघून झाल्यावर पुन्हा गाडीत बसलो आणि न्यू ऑर्लिन्सच्या रस्त्याला लागलो.
फ्रेंच क्वाटर्स. ह्या जागेवर सतराव्या शतकात फ्रेंच लोकांचं राज्य होतं. त्यामुळे इथल्या बऱ्याच रस्त्यांना फ्रान्समधल्या राजघराण्यातील व्यक्तींची आणि कॅथॉलिक संतांची नाव दिलेली आहेत. पण इथली भरभराट झाली ती स्पॅनिश अमलाखाली. त्यामुळे इथल्या इमारतींच्या वास्तुशैलीवर स्पॅनिश शैलीचा अधिक पगडा आहे. हा सगळा भाग अमेरिकेचा राष्ट्रीय वारसा म्हणून जतन केलेला आहे. जॅझ संगीताची सुरवात ह्याच भागात झाली. एप्रिल-मे महिन्यात इथे जॅझ फेस्टिव्हल असतो, तेव्हा संगीताचे दर्दी इथे गर्दी करतात.
आम्ही गेलो होतो, तेव्हा असा काही फेस्टिव्हल नव्हता. तरीही ही जागा म्हणजे खूप मोठी जत्रा आहे, असं वाटलं. सगळीकडे मजा चालू होती. गाणी-नाच-कसरती-जादूचे प्रयोग अशी गंमत चालू होती. उत्साह, हसण्या-खिदळण्याला ऊत आला होता. बार आणि पब्जमध्ये चाललेली धमाल फसफसून रस्त्यावर येत होती. आम्हीही त्या मजेत सामील होऊन हिंडत होतो. बोहेमियन कपडे, दागिने ह्यांची दुकानं, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, गेस्ट हाउस अशी भाऊगर्दी होती. पर्यटकांच्या यच्चयावत गरजा पूर्ण होतील, असा सेटअप होता.
फिरत फिरत जॅक्सन स्क्वेअरमध्ये आलो. मोठं पार्क, चर्च आणि प्रचंड मोठा चौक. इथे अजून मोठी जत्रा होती. समोर बसवून लगेच आपलं कॅरिकेचर काढून देणारे चित्रकार, टॅरो कार्ड किंवा हात बघून भविष्य सांगणारी मंडळी बसली होती. एकीकडे गाण्याचे-वाद्यांचे आवाज घुमत होते, कुठे गर्दीच्या वर्तुळात गमतीचे खेळ चालू होते. हे सगळं बघत बघत आम्ही नदीकाठी आलो. एकीकडे पाण्याचा संथ-शांत प्रवाह आणि दुसरीकडे ‘खिलाना-पिलाना‑हसना‑हसाना’ चा गडबडीचा प्रवाह वाहत होता. दोन्हीचा आनंद घेत थोडावेळ तिथेच थांबलो. निघताना पाण्याच्या कडेला एक जाळी आणि त्यावर लावलेली असंख्य कुलुपं दिसली. आधी हा काय प्रकार आहे, ते कळलं नाही. मग जवळ जाऊन बघितलं तेव्हा तिथले ‘Love Wins’ वगैरे सुविचार वाचल्यावर ही कुलुपं म्हणजे ‘तुम्हे दिलमें बंद करके दर्यामें फेक दू चाबी!!’ ह्या गाण्याचा अमेरिकेतील प्रेमिकांनी वाक्यात उपयोग केलेला आहे, हे लक्षात आलं….
११ ऑक्टोबर २०१९ सलीडेल लुईझियाना ते गार्डनडेल ,अलाबामा
काल फ्रेंच क्वाटर्समध्ये फिरताना इतकी मजा येत होती की आपण नक्की किती फिरलो, हे कळलंही नाही. हॉटेलमध्ये आल्यावर मात्र त्या चालण्याचा शीण जाणवला होता. त्यामुळे लवकर उठायचं असं ठरवूनही जरा उशीरच झाला. मग घाईघाई आवरून ब्रेकफास्ट केला, सामानाच्या मुसक्या बांधल्या आणि जायला निघणार तेवढ्यात चक्क वीजपुरवठा खंडीत झाला!! मायदेशी जी शक्यता कायम गृहीत धरावी लागते, ते इथे अमेरिकेत होईल असं अजिबात वाटलं नव्हतं. वादळ-बर्फ असलं काही अपरिहार्य कॅटॅगरीतलं कारणही नव्हतं. हॉटेल होतं तीन मजली आणि आम्हीच हौसेने तिसऱ्या मजल्यावरची खोली मागून घेतली होती. थोडा वेळ थांबून काही प्रगती होते का ह्याची वाट बघितली. पण सगळं आवरून झाल्यावर नुसतं बसायला कंटाळा आला. मग काय, सगळं सामान उचलून जिने उतरलो आणि हाश्श-हुश्श्य करत गाडीत जाऊन बसलो. आता ह्या रूटीनची इतकी सवय झाली होती, की गाडी सुरू केल्यापासून पहिल्या पाच मिनिटात आम्ही व्यवस्थित सेटल व्हायचो. कुठे काय ठेवायचं, कधी काय लागतं हे गणित अगदी हातच्यांसकट पक्कं झालं होतं.
साडेतीनशे मैल अंतरातलं तीनशे मैल संपवून आम्ही बर्मिंगहॅमला पोचलो. नाही, नाही. ते राणीचं बर्मिंगहॅम नाही. हे वेगळं. अमेरिकेत ही मजेदार गोष्ट आहेच. जगभरातल्या जवळपास सगळ्या प्रसिद्ध शहरांची नावं इथल्या शहरांना मिळालेली आहेत. आम्ही फिरताना गमतीत म्हणायचो की त्या अर्थाने अमेरिकेत फिरलं की जगभर फिरल्यासारखंच आहे!! अलाबामा राज्यातल्या ह्या अमेरिकन बर्मिंगहॅममध्ये व्हिन्टेज मोटरस्पोर्ट्स म्युझियम आणि त्याला लागून रेसट्रॅक अशी जागा आहे, ती बघायला गेलो. अगदी जुन्या काळातल्या व्हिन्टेज बाइक्सपासून अत्याधुनिक बाइक्स आणि रेसकार्स मिळून जवळपास सोळाशे वाहनं आहेत. चिरपरिचित अशा बजाज M-80 आणि स्कूटरची मूळ डिझाइन्स बघून मजा वाटली.
गाड्यांचं दर्शन घेऊन झाल्यावर त्या इमारतीच्या मागे कार रेसिंग ट्रॅक होता, तो बघायला गेलो. शर्यतीच्या गाड्या सूं सूं करत पळत होत्या. आत्ता स्पर्धा चालू नव्हती. प्रॅक्टिस राउंड होते. त्या ट्रॅकवरून जाणारा एक पूल होता, तिथे बघण्यासाठी बरेच लोकं थांबले होते, आम्हीही थोडावेळ बघितलं. महेशला ह्या प्रकाराची फारच आवड आहे, त्यामुळे त्याला मजा येत होती. त्या पुलाच्या काही भागात काचेची जमीन होती. तिथूनही गाड्या दिसत होत्या. थोड्या वेळाने पलीकडे बाग होती, तिथे गेलो. छोटीशी तळी, झाडं, हिरवळ, बसायला बाक अशी छान जागा होती. एका वळणावर एक मोठा साप दिसल्यावर मी अस्फुट का काय म्हणतात तशी किंचाळले. मग तो खोटा आहे, हे लक्षात आल्यावर त्या सापाला कुरवाळतानाचा फोटो काढून घेतला! थोडा वेळ तिथे आरामात बसलो. बाहेर पडताना एका ठिकाणी मोठा जगाचा नकाशा होता. भेट देणाऱ्या मंडळींनी आपल्या गावावर पिन लावायची, अशी कल्पना होती. आम्ही कल्याण, पुणे, धुळे सगळ्या गावावर ठसा उमटवला आणि बाहेर आलो.
ट्रीप सुरू करताना काय बघायचं, कुठे जायचं, राहायच्या जागा, जेवायचं कुठे सगळ्याच्या याद्या केल्या होत्या. एकेक दिवस पुढे सरकत गेला, तशी यादी लहान होत गेली. आज तर ह्या सगळ्याच याद्या संपल्या. नवीन राज्यांच्या यादीतलं शेवटचं राज्य अलाबामा होतं. तिथे पोचलो होतो.बघायच्या जागांमधलं शेवटचं मोटरस्पोर्ट म्युझियम बघितलं आणि यादीतल्या शेवटच्या हॉटेलमध्ये चेक-इन केलं. उद्याचा मुक्काम मित्र कुटुंबाकडे आणि परवा रात्री घरी!!!
१२ ऑक्टोबर २०१९ गार्डनडेल अलाबामा ते नॅशव्हिल, टेनिसी
आजचा निवांत आणि मजेदार दिवस होता. आज मैत्रीण भेटणार होती. आमचं पुत्ररत्न शाळेत जायला लागलं तेव्हा त्याची त्याच्या वर्गातल्या मुलांशी मैत्री व्हायच्या आधी माझी त्याच्या वर्गमैत्रिणीच्या आईशी मैत्री झाली होती. नंतर शोध लागला की घरापासून अक्षरशः एक मिनिटाच्या अंतरावर राहते. मग मुलांना शाळेत नेणे-आणणे, त्यांचे खेळ, पालक सभा, कारणाशिवाय भेटून गप्पा-टाईमपास सगळं बरोबर होऊ लागलं. तिची माझी मैत्री फार चांगल्या मुहूर्तावर झाली असणार. त्यामुळे तिच्या मैत्रिणींच्या गोतावळ्यात मी अलगद सामावले गेले. पुण्यात कुठे, काय चांगलं मिळतं हे ज्ञान ह्याच मैत्रिणीमुळे मिळालं. मी ह्या मैत्रिणीमुळे खऱ्या अर्थाने पुण्यात स्थिरावले. आमची मुलं माध्यमिक शाळेच्या वयाची असताना हे लोकं अमेरिकेत आले. त्यालाही आता बरीच वर्षं झाली. मुलं मोठी झाली. शिक्षण संपवून आपल्या मार्गाला लागली. आम्ही अमेरिकेत आल्यामुळे आता ह्या सगळ्या मंडळींना भेटून मधल्या काळातल्या गाळलेल्या जागा भरायची नामी संधी होती.
आजचं ड्रायव्हिंगचं अंतर अगदीच कमी म्हणजे दोनशे मैल होतं. सकाळी जरा निवांत उठून सगळं आवरलं. यादीतल्या शेवटच्या हॉटेलमधून चेक-आउट करताना मिश्र भावना होत्या. जितके कष्ट त्या यादीला तयार करायला लागला त्यापेक्षा कमी वेळात ही यादी संपलीसुद्धा, असं काहीतरी फिलिंग येत होतं. सवयीनुसार सगळं सामान गाडीत चढवलं आणि निघालो. एकीकडे मैत्रिणीशी गप्पा चालूच होत्या. ‘बरेच दिवस घराबाहेर आहात. उद्या घरी जायची प्रॅक्टिस म्हणून तुम्ही इकडे येताय ना!’ अशी चेष्टा-मस्करी चालू होती.
निवांत वेगाने गेलो, तरी अंतरच कमी असल्याने चार तासात तिच्या दाराशी पोचलोदेखील. मग काय मजाच मजा. फिनिक्सला अश्विनीकडे गेलो होतो, तेव्हा चर्चेचा मुख्य विषय ‘कल्याण’ होता. आता तो ‘सहकारनगर-02, पुणे-०९’ हा होता. त्या बरोबर कॉमन ओळखीच्यांचे अपडेट्स, फारच वेगाने मोठ्या झालेल्या मुलांच्या बाळपणीच्या आठवणी, थोडं चटकदार गॉसिपही. ह्या सगळ्यातून वेळ काढून नाश्ते-जेवण-चहापाणी वगैरे. दिवस कसा संपला हे कळलं देखील नाही. रात्री सगळे मिळून बोर्ड गेम खेळलो. नंतर पुन्हा कॉफीबरोबर एक गप्पांचा राउंड झाला आणि अगदी डोळे मिटायला लागले तेव्हा जाऊन झोपलो. आजचा दिवस तर छानच गेला होता, रात्री झोपताना आता उद्या घरी जायचं ह्या कल्पनेने अजूनच छान वाटत होतं!
१३ ऑक्टोबर २०१९ नॅशव्हिल, टेनिसी ते फॉल्स चर्च व्हर्जिनिया
आज घरी जायचं ह्या कल्पनेने पहाटे लवकर जाग आली. घर सोडून चार दिवस झाले की मला कधी एकदा परत जाते, असं वाटायला लागतं. प्रवासाला जायची जेवढी उत्सुकता वाटते, त्यापेक्षाही घरी जायची जास्त वाटते. अगदी खरं सांगायचं तर ‘घरी जायचं’ ही भावना अनुभवायला मिळावी, हा माझा प्रवासाला जाण्यामागचा एक महत्त्वाचा उद्देश असतो!
आजचं अंतर जरा जास्त होतं, त्यामुळे चटचट आवरून पटापट निघालो. बरीच वर्षे कोपऱ्यावर राहणारी, वाटेल तेव्हा भेटता येणारी, जिच्याबरोबर सूर-ताल-लय सगळंच जुळलं होतं ती मैत्रीण इतकी लांब गेली ह्या नेहमीच्या हळहळीवर ‘पुन्हा लवकर भेटूया, फोन तर चालू राहतीलच’ ह्या आश्वासनांची मलमपट्टी करायचा प्रयत्न केला. सगळ्यांचा निरोप घेऊन रस्त्याला लागलो.
हायवेला लागल्यावर अंतर वेगाने संपायला लागलं आणि घर जवळ येऊ लागलं. प्रवास संपत आल्यामुळे ‘का आलो होतो’ ह्या सनातन प्रश्न डोक्यात घिरट्या घालत होता. नवीन देश, नवा प्रदेश बघणे हा एक उद्देश तर होताच. पण आमच्या आयुष्यातल्या एका मोठ्या स्थित्यंतराला लवकरच सामोरं जाणार होतो. एका अर्थी ही ट्रीप त्या बदलाची नांदी होती. मुलाचं शिक्षण पूर्ण होत आलं होतं. आता तो नोकरीनिमित्त अमेरिकेत राहणार होता आणि आम्ही इथून गाशा गुंडाळून पुण्याला कायमचे परत जाणार होतो.
इतकी वर्ष कामाच्या, घरच्या, कुटुंबाच्या जबाबदाऱ्या ह्यांचा भोज्या करून लपाछपी, शिवाशिवी करण्यात पळून गेली. इतक्या गोष्टी सतत घडत असायच्या. ऑफिसची कामं, मीटिंग, प्रवास, घर चालवणे, आजारपणं, लग्नकार्य, पैशाच्या व्यवस्था, मुलाला वेळ देणे, त्याचा अभ्यास-खेळ. मुठीतली वाळू गळून गळून जावी तशी ही घाई-गडबडीची वर्ष संपली. आता आयुष्याचा वेग संथ झाला होता. आता ‘तू तिथे मी’ च्या टप्प्यावर एकमेकांची पुन्हा नव्याने ओळख करून घ्यावी असं वाटत होतं. तसा संसाराचा रौप्यमहोत्सव नुकताच झाला होता. पण आता सगळी परिमाणं बदलली होती, प्राधान्यक्रम बदलले होते. आता एकमेकांबरोबर, एकमेकांसाठी जगायचे दिवस आले होते. त्याची ही पूर्वतयारी होती.
संध्याकाळी जरा उशीराने घरी पोचलो. घरी गेल्यावर जीव थंडगार झाला. पुढचे काही दिवस इतकं अगडबंब सामान पुन्हा सुस्थळी लावणे, प्रवासातले फोटो बघणे, तिथल्या गमतीजमती मुलाला सांगणे आणि आम्ही नसताना त्याने काय-काय केलं ते ऐकणे असं प्रवास संपल्यानंतरचं कवित्व चालू राहिलं. आम्ही हा प्रवास २०१९ च्या सप्टेंबर-ऑक्टॉबर मध्ये केला. त्यानंतर काही महिन्यातच कोविडच्या साथीमुळे सगळं जग उलटंपालटं झालं. ‘न्यू नॉर्मल’ मध्ये इतक्या असंख्य ठिकाणी जाणं, राहणं, खाणं-पिणं जमलंच नसतं. सगळं कुलूपबंद झालेलं असताना त्या दिवसांबद्दल लिहिताना आपण हा प्रवास नक्की ह्याच जन्मात केला की मागच्या जन्मात? अशी शंका येते.
अमेरिकेबद्दल लिहायचं म्हणजे लेखन मुक्तपीठीय होण्याची फार धास्ती होती! तसं होऊ नये अशी काळजी घेतली आहे पण ‘त्या’ धर्तीचे काही अनुभव सांगायचा मोह आवरत नाहीये. वेगासच्या हॉटेलच्या लॉबीत एकांनी मला चक्क ‘रामराम’ घातला होता!! त्यांच्या अस्सल अमेरिकन उच्चारांमुळे ते काय म्हणत आहेत, त्याचा उलगडा व्हायला मला जरा वेळच लागला. पण कळलं तेव्हा मजा वाटली. ते बरीच वर्षं सिंगापूरला नोकरी करत होते. तिथल्या भारतीय सहकाऱ्यांकडून ते ‘रामराम’ म्हणायला शिकले होते.
आयडाहो फॉल्सला पोचलो त्या दिवशी बर्फाचं वादळ, बर्फवृष्टी, बंद झालेले रस्ते ह्या अडचणीबरोबरच ‘एकादशीच्या घरी शिवरात्र’ न्यायाने गाडीचं चाक पंक्चरलं होतं. रविवार असल्याने दुरुस्ती करायला कोणी उपलब्ध नव्हतं. सोमवारी सकाळी गाडी दुरुस्तीला नेली. तिथे काम सुरू झाल्यावर व्हर्जिनिया राज्याची नंबर प्लेट बघून तिथल्या माणसाने ‘इतक्या लांब कसे काय आलात? आता कुठे जाताय? वगैरे चौकश्या केल्या होत्या. त्याच्याशी बोलताना एकीकडे आता खिशाला किती फोडणी बसणार? असं डोक्यात येत होतं. कार दुरुस्त झाल्याची सुवार्ता घेऊन अण्णा आल्यावर त्यांनी पैसे घ्यायला चक्क नकार दिला!! ते काही वर्षांपूर्वी आमच्या भागात राहत होते. तिथल्या एक रेस्टॉरंटची त्यांना फार आठवण येत होती. तिथलं जेवण त्यांना फार आवडायचं. ‘तुम्ही परत गेलात की तिथे जाऊन नक्की जेवा. Drive safe and have a great trip’ असं म्हणून त्यांनी सुहास्य निरोप घेतला.
पैसे वाचल्यामुळे आनंद तर झालाच. पण त्यांनी असं का केलं असेल, ह्यावर आम्ही बराच वेळ चर्चा केली. इतक्या लांबलचक रोडट्रीपमध्ये ‘करमणूक’ हा जरा कळीचा विषय असतो. असा काही आजचा ताजा विषय मिळाला तर बरंच वाटायचं. भारतात ट्रेन-बस-कार असा कुठलाही प्रवास करताना मला बाहेरच्या पाट्या वाचायची सवय आहे. पण अमेरिकेतल्या रस्त्यांवर सगळीकडे सारख्याच पाट्या. त्यामुळे इथे ती करमणूक नाही. कार किंवा ट्रकवर ‘गांवमें है खेती मेरी, खेतीमें है गन्ना, गाडी मेरी हेमामालिनी, मै हूँ राजेश खन्ना’ किंवा ‘बुरी नजरवाले तेरा मुंह काला’ असलं काही लिहिण्यातली गंमत अमेरिकन लोकांना माहिती नाही. पण ट्रकवर ‘drivers wanted’ अशी जाहिरात असायची आणि त्याबरोबर भावी ‘शिवराम गोविंद’ लोकांना काही लालूच दाखवलेली असायची. म्हणजे ‘वीकेंडला घरी, प्रत्येक मैलामागे --- डॉलर्स बोनस’ वगैरे वगैरे. ते वाचून माफक करमणूक व्हायची. बाकी रेडिओ, हिंदी-मराठी गाणी वगैरे चालूच असायची. बऱ्याच न्यूज चॅनल्सचे लोकं जसे फारसा काही मुद्दा नसताना चर्चा करू शकतात, ती कला आम्हाला ह्या ट्रीपमध्ये चांगलीच अवगत झाली!
अजून एक बारकी करमणूक म्हणजे कारच्या नंबरप्लेट वाचणे. गाडीच्या नंबरसाठी भारतात असतो त्यापेक्षा कितीतरी जास्त चॉइस अमेरिकेत असतो. म्हणजे पुण्यात रजिस्टर झालेल्या गाडीचं उदाहरण घ्यायचं तर ‘MH12 ZZ 1234’ अशाच पॅटर्नचा नंबर असतो. अमेरिकेत मात्र ‘RAJEEV’ ‘JONSMOM’ ‘KNITTER’ ‘NEPAL’ असे कुठलेही‘‘नंबर’’ घेता येतात. मंडळी घेतातही. त्यामुळे पुढच्या गाड्यांच्या पाट्यांकडे लक्ष देऊन वाचताना गंमत येत असे.
इतकं फिरून आम्ही काय बघितलं? रोडट्रीप असल्यामुळे खूप सारे, मैलोनमैल पसरलेले रस्ते बघितले. कुठे प्रचंड वाहतुकीचा सामना केला तर कधी पुढे-मागे दृष्टिपथात एकही कार नाही असंही झालं. कुठे बर्फाच्छादित डोंगर तर कुठे वाळवंट बघितलं. कधी निबिड जंगल तर कधी सपाट मैदानी प्रदेश बघितले. खरं सांगायचं तर खूप बघितलं आणि काहीच बघितलं नाही. अमेरिका म्हणजे मोठमोठे मॉल्स, गगनचुंबी इमारती आणि वर्दळीचे रस्ते इतकंच माहिती होतं. ह्या ट्रीपमुळे त्या व्यतिरिक्त किती कायकाय ह्या देशात आहे, ह्याची झलक मिळाली. अमेरिकेला नैसर्गिक साधनसंपत्तीचं वरदान मिळालं आहे. दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या, जंगलं, खनिज संपत्ती. दळणवळणाच्या उत्तम सोयी असल्यामुळे ह्या गोष्टींची वाहतूक सहज होत असेल. अगदी दुर्गम भागातही रेल्वेचं जाळं पसरलेलं आहे. फिरताना कितीतरी ठिकाणी लांबचलांब मालगाड्या धावताना दिसायच्या. रस्त्यांबद्दल तर इतक्या जणांनी इतकं काही लिहिलं आहे, की मी अजून नवीन काय लिहिणार? मला कौतुक वाटलं रस्त्याची माहिती देण्याच्या शास्त्राचं. कार चालवणाऱ्या व्यक्तीला कुठे काय सूचना द्यायला हवी, कुठली माहिती मिळायला हवी ह्या शास्त्राचा बारकाईने अभ्यास केला गेला असणार. योग्य वेळी योग्य माहिती मिळतेच मिळते.
हे झालं ह्या रोडट्रीपमध्ये काय बघितलं त्याबद्दल. पण अमेरिकेत आलो, तेव्हाच काही वर्षांनी पुण्याला परत जायचं हे नक्की होतं. त्यामुळे हे सगळे दिवस आम्ही प्रवासात असल्यासारखेच राहिलो. त्या प्रवासातही बरंच काही बघितलं, अनुभवलं.
आपण भारतात अमेरिकेबद्दल चांगलं-वाईट ऐकत-वाचत-बघत असतो. त्याचा प्रभाव मनावर होताच. परदेशात येण्याची ही काही पहिली वेळ नव्हती. तरी सुरवातीला गोंधळायला झालं. वेगळ्या उच्चारातलं इंग्लिश कळायचं नाही, रस्ता क्रॉस करताना गाड्या नक्की कुठल्या दिशेने येतील, हे लक्षातच येत नसे. अमेरिकेत कार चालणाऱ्यांच्या दयाळूपणावर माझे सुरवातीचे दिवस पार पडले. पुढे दुकानात, लायब्ररीत जायला लागले तशी अमेरिकन लोकांच्या सौजन्याचा अनुभव वारंवार आला. दारात असताना समोरून कोणी येत असेल तर त्या माणसासाठी थांबणं, चालतानाही एकमेकांचं सहजपणे भान ठेवून दुसऱ्याची सोय बघणं, रेटारेटी न करता रांग लावणं खूप लोभस वाटायचं. अमेरिकेतला अजून एक आवडलेला भाग म्हणजे लष्करात काम करणाऱ्या व्यक्तींना लहान-मोठे ‘Thank you for your service’ असं म्हणून मान देतात. विमानाने जात असताना कोणी गणवेशधारी प्रवास करत असेल, तर विमान कर्मचारी त्यांचे सेवेबद्दल विशेष आभार मानतात. ते करत असलेल्या देशसेवेचं मोल सगळे जाणतात.
काही वर्ष अमेरिकेत राहूनही माझा स्थानिक लोकांशी विशेष संपर्क आला नाही. कोणाशी मोकळेपणाने राजकीय, धार्मिक, कौटुंबिक गप्पा माराव्या इतकं मैत्र कोणाशी जुळलं नाही. त्यामुळे जे प्रश्न जाताना डोक्यात घेऊन गेले, त्यातले बरेचसे येताना तसेच होते. कौतुक वाटायचं ते नियम पाळण्याकडे असलेल्या प्रवृत्तीचं, लहान-सहान बाबतीतही दुसऱ्याचा विचार करण्याचं. ह्या नागरिकशास्त्राचं बाळकडू लहान असल्यापासून मिळाल्यामुळे तो स्वभावाचा भाग होत असावा.
साधारणपणे शिक्षणासाठी किंवा नोकरीच्या सुरवातीच्या टप्प्यावर भारतातून मंडळी अमेरिकेत येतात. काही परततात तर काही स्थायिक होतात. आमच्या बरोबरच्या बऱ्याच लोकांनी Y2K च्या आसपास परदेशी भरारी मारली. आम्ही मात्र त्यांच्या मानाने उशिरा म्हणजे पन्नाशीच्या कलत्या उन्हात इथे आलो. तारुण्यातला लवचीकपणा कमी होऊन काहीसे जून झाल्यावर. हे फक्त शारीरिक बाबतीत नाही, तर मानसिक बाबतीतही होतं. विचार, आवडी-निवडी, सवयी एव्हाना पक्क्या झालेल्या असतात. बदलणं अशक्य नाही तरी अवघड निश्चित जातं.
त्यामुळे मी अमेरिकेत आले, तेव्हा भारतातलं सगळं सुलटं आणि अमेरिकेतलं सगळं उलटं हे डोक्यात पक्कं होतं. कितीतरी गोष्टी अमेरिकेत वेगळ्या आहेत. इथे अंतर, वजन, तापमान मोजायची एककं वेगळी. तारीख लिहायची पद्धत, घराचा पत्ता सांगायची पद्धत, पाकिटावर पत्ता लिहायची पद्धत वेगळी. किती गोष्टी सांगायच्या. भारतात आपण रस्त्याच्या डावीकडून वाहनं चालवतो तर अमेरिकेत उजवीकडून. शाळेपासून जिन्यात, पॅसेजमध्ये डावीकडून चालायची सवय असते. इथे मात्र उजवीकडून चालायचं. भारतात विजेच्या बटणाच्या ज्या पोझिशनला दिवा चालू होईल त्या पोझिशनला इथे बंद होणार. अगदी गाडी चालवताना वायपर आणि टर्न इंडिकेटरची पोझिशन विरुद्ध. आल्याआल्या तर सगळं वेगळं, चुकीचं, उलटं आहे अशी खात्री वाटायची.
आता इतके दिवस राहून, इतकं फिरून, इतकं काही बघून झाल्यावर मात्र माझं मलाच कळेनासं झालंय की नक्की काय सुलट आणि काय उलट?