बदतमीज़ दिल - २६

मी ते ऍग्रीमेंट साइन करायला नको होतं. खोटं तर ते होतं, नक्कीच. कुठली लीगल डॉक्युमेंट्स 'हूमसोएव्हर इट मे कन्सर्न' ने सुरू होतात!! पण तरीही तो कागद महत्त्वाचा होता. त्या किसनंतर सायरा नक्कीच घाबरलेली होती.. आय गेट इट. टेबलावरचा काचेचा पेपरवेट फिरवत तो विचार करत होता.

फक्त कलिग्स ते एकदम कारमध्ये किस करणारे कपल हा अगदीच लाँग शॉट होता. मी पुढे जाण्यासाठी तयार असलो तरी ती असायलाच हवी असं नाही. तिच्या निर्णयावर कुठलाही दबाव येणार नाही याची काळजी घ्यायला हवी. तिच्या इच्छेचा आदर आहे म्हणूनच तिला हवा असलेला वेळ आणि स्पेस मी देतोय. पण अजून किती वेळ देऊ शकेन हे मलाच कळत नाहीये. आधी ती माझ्यासाठी फक्त एक सुंदर दिसणारी मुलगी होती, मी तिच्यात इन्वॉल्व झालंच पाहिजे असं काही नव्हतं. पण आता, सगळंच बदललंय. किस करताना बदललेल्या ज्या जाणिवा होत्या त्यांचं काय करायचं? तेव्हा ती जशी वागली, खूप दिवसांपासून हवी असलेली गोष्ट फायनली मिळाल्यासारखी, त्याचं काय करायचं?

ती OT मध्ये माझ्याकडे बघताना मला दिसते. तिने कितीही चोरटे कटाक्ष टाकले तरी मला कळतात. जेव्हा बघताना चुकून माझी नजर तिला भिडते तेव्हा तिचे गाल लाल होतात. किंवा एखादं इन्स्ट्रुमेंट देताना तिच्या बोटांचा मला स्पर्श झाला तरी ती मी कानात कुजबुजल्यासारखी लाजते.

शी'ज अ टोटल मेस! मंगळवारी स्क्रब करताना तिच्याशी बोलल्यानंतर ती लगेच गायब झाली. बुधवार, गुरुवार तिला एकटीला गाठताच नाही आलं. शुक्रवारी सर्जरी संपल्यावर काहीतरी जेवावं म्हणून तो लाऊंजमध्ये गेला. त्याने प्लेटमध्ये चिकन नूडल सुपचा बोल ठेऊन शेजारी भरपूर भाज्या घातलेला पास्ता प्रिमावेरा वाढला. टुडेज स्पेशल डेझर्ट बघून त्याला रहावले नाही. चीट डे म्हणून लहान डेझर्ट प्लेटमध्ये त्याने एक डच ट्रफल पेस्ट्री वाढून घेतली.

तो सगळं घेऊन टेबलवर बसतानाच समोर सायरा दिसली. त्याचं लक्ष जायची वाट बघत ती दारात थांबली होती. आतल्या अजून दोन तीन डॉक्टरांनी तिच्याकडे बघितल्याने तिची चुळबुळ सुरू होती. ती अजून स्क्रब्जमध्ये होती आणि नेहमीची घट्ट पोनिटेल. तिने कितीही साधं, कडक दिसायचा प्रयत्न केला तरी ती मोहकच दिसत होती. गोबरे गाल, लांब काळ्याभोर पापण्या. त्याच्याकडे लक्ष जाताच डोळे चमकून ती हसली. आता ती नुसती मोहक नाही कातिल सुंदर दिसायला लागली.

आय विश, तिच्या शर्टवर माझं नाव बहात्तर साईज फॉन्टमध्ये लिहायला हवं.

तो उठून पुढे गेला. "तू आत येऊ शकतेस. कोणी ओरडणार नाही तुला!"

ती हसून जागेवरच थांबली. तिचा बहुतेक त्याच्या बोलण्यावर विश्वास नव्हता. "कमॉन इन!" म्हणून तो वळल्यावर तिला जावंच लागलं. ती डोळे विस्फारून डॉक्टरांना मिळणाऱ्या लग्झरीज बघत होती. "नशीब इथे दारात रेड कार्पेट आणि दोन्ही बाजूला बाऊन्सर्स नाहीत! तेवढंच बाकी आहे."

तो किंचित हसला.

"आमच्या लाऊंजमधलं साधं वेंडिंग मशीनसुदधा दोन थपडा मारल्याशिवाय चालत नाही."

"तू इथे वेंडिंग मशीनबद्दल तक्रार करायला आली आहेस का?" तो तिरकस हसत म्हणाला.

"नोss कमॉन!" तिचं लक्ष प्लेटकडे गेलं. "वॉव! डच ट्रफल पेस्ट्री? तुम्ही चक्क गोड खाताय?" तिने पटकन जीभ चावली.

"चीट डे असतो कधीतरी. घे ना, मी नंतर दुसरी घेईन." त्याने प्लेट पुढे सरकवली.

"अम्म.. नको. फक्त टेस्ट करते.." म्हणत तिने वितळलेल्या चॉकलेटमध्ये बोट बुडवून तोंडाजवळ नेले. तिचं वागणं सहज होतं तरीही त्याचं पूर्ण लक्ष तिने बोट तोंडात घालून, चंबू करून चोखणाऱ्या ओठांवर होतं. आता आग लागायचीच बाकी होती.

"डॉ. पै?"

"हम्म.."

"मी काय म्हणाले ते ऐकलं का तुम्ही?"

"नॉट ऍट ऑल."

हम्म, लांब श्वास सोडून ती बोलायला लागली."मी विचारायला आले होते की उद्या नाईट शिफ्ट ऐवजी मी डे शिफ्ट करून लवकर निघू का? नेहाला चेकअपसाठी न्यायचं आहे."

त्याने डोक्यातले बिनकामाचे विचार बाजूला सरकवले. "चालेल, तशीही उद्या सर्जरी नाहीये. नेहाला काय झालं?"

"विशेष काही नाही, जस्ट रुटीन अपॉइंटमेंट आहे."

"गुड. पण तुम्ही जाणार कश्या? पाऊस काही थांबण्यातला नाही."

"फार लांब नाहीये, बसने जास्तीत जास्त अर्धा तास लागेल."

"हवी असेल तर कार घेऊन जा. मी  हॉस्पिटलमध्येच असेन."

त्याची ऑफर ऐकून ती अवाक झाली.

"काय झालं?" त्याने न हसता विचारलं.

तिच्या चेहऱ्यावर आता गुपित कळल्यासारखं हसू पसरलं. "तुम्ही सगळ्या एम्प्लॉईजना कार वापरू देता?"

तिला काय सुचवायचंय ते कळून त्याने समोर हात झटकला. " शुअर! त्यात काय! शुभदा कायम माझी कार घेऊन जात असते."

ती फुटलीच! त्याला चक्क गप्पा मारत हसताना बघून येणारे जाणारे डॉक्टर्स त्यांच्याकडे बघत जात होते. फ* ऑफ! मी ह्या मुलीशी गेल्या तीन दिवसात धड बोललोसुद्धा नाहीये वर एक ऍग्रीमेंट साइन केलंय ज्यात मी हिला किस करण्यावर बंदी आहे. पण या क्षणी मला तेच हवंय.  तिची पोनिटेल मागे खेचून, हनुवटी वर होईल. तिला पाय उंचावून चवड्यांवर उभं रहावं लागेल, मी थोडा खाली वाकेन म्हणजे तिला सोपं होईल. बस! मागच्या वेळपेक्षा हा किस नक्कीच चांगला असेल...

ती हसता हसता अचानक थांबली. तिचे डोळे विस्फारले आणि हळूच ओठ विलग झाले. ओह येस, सायरा. तू ऍग्रीमेंट साइन करून घेऊ शकतेस, पण ह्या फीलिंग्स? तू ओठावरून जीभ फिरवलीस कारण तू तोच विचार करते आहेस जो मी करतोय आणि तू आत्ता तुझे लाल होत चाललेले गाल बघितले पाहिजेस.

"थँक्स डॉ. पै."

तो मान हलवत हसला. परत डॉ. पै! जसं काही असं म्हटल्यामुळे ती मला लांब ठेऊ शकणार आहे.

"झालं बोलून?" त्याने भुवई उंचावली.

"हो, म्हणजे नाही, अं.. मी निघते. पेस्ट्रीसाठी थँक्स." ती खुर्ची सरकवून उठताच तो दारापर्यंत तिच्याबरोबर गेला. ती न थांबता चालत सुटली.

"सायरा, लिफ्ट त्या बाजूला आहे." त्याने गालात हसत बोट दाखवलं.

ती पटकन उलट फिरली. "हो माहितीये.." आणि लिफ्टकडे पळत सुटली. तो हसून त्याच्या जेवणाकडे वळला.

एक आठवडाही टिकत नाही ही!

---
संध्याकाळपासून तूफान पाऊस पडत होता. शुभदा कधीच निघून गेली होती. तो लॅपटॉपवर टॅप टॅप करत पेपरवर्क संपवायच्या मागे होता. आता नऊ वाजत आले होते. खिडकीबाहेर बघून त्याने फोनवर नजर टाकली. ह्या स्पीडने काम सोमवारपर्यंत संपणार नाही. एव्हाना शिफ्ट संपून बरेचसे लोक निघून गेले होते. तरीही तो हातातला छोटा बास्केटबॉल हवेत उडवून कॅच करत बसला होता. एकतर यामुळे त्याला नीट विचार करता येत होता आणि त्याचे हात एंगेज रहात होते. नाहीतर एव्हाना त्याने सायराला कॉल केला असता. त्याला तिची काळजी वाटत होती आणि दोघी घरी नीट पोचल्याचं चेक करायचं होतं.

फक्त एकच मिनिट! म्हणून त्याने फोन हातात घेतलाच. त्याने कॉन्टॅक्ट लिस्टमधून तिचा नंबर घेतला होता पण तिच्याकडे अजूनही त्याचा पर्सनल नंबर नव्हता.

विचार बदलण्यापूर्वी त्याने कॉल केला.

काही रिंगनंतर तिने फोन उचलला. "हॅलो?"
तिचा आवाज वेगळा येत होता.

"सायरा?"

"मी नेहा बोलतेय. सायरा बाथरूममध्ये आहे. कोण बोलतंय?"

त्याने टेबलावरच्या दोन फाईल सरळ केल्या. फोन ठेवावा की काय न सुचून तो पुढे बोलला. "धिस इज डॉ. पै."

"नो वे!! एक मिनिट, एक मिनिट." ती फोनवर हात ठेवून ओरडली. "दी ss लवकर ये. तुझ्या डॉक्टरांचा फोन आहे."

फोनमधून काहीतरी खुडबुड आणि दबके आवाज आले. मॅकड्रिमी!

"खेचू नको" सायराचा आवाज आणि मागोमाग हेअर ड्रायर सुरू केल्याचा आवाज. ती बाथरूममधून बाहेर आली असणार. "धिस इज नॉट फनी!"

"तिला वाटतंय, मी प्रँक करतेय." नेहा फोनवर त्याला म्हणाली.

"नेहू, तुझी ऍक्टिंग अतिशय वाईट आहे. मला माहितीये फोनवर कोणी नाहीये." सायराचा आवाज.

नेहा हसत सुटली."आय स्वेअर ते आहेत! तूच बघ."
तिने फोन बहुतेक सायराकडे दिला.

"हाहा, काहीही!" तिच्या आवाजात नेहाचा प्रँक पकडल्याचा आत्मविश्वास होता. "हॅलो डॉ. पै, कॉल केल्याबद्दल थॅंक यू! तुम्हाला शंभर वर्ष आयुष्य आहे कारण मी आत्ता तुमचीच आठवण काढत होते."

तो खळखळून हसला आणि ती किंचाळली.

"फोनवर कोणीतरी आहे!" ती नेहाकडे बघून ओरडली.

"मी आधीच सांगितलं होतं." नेहाचा दबका आवाज.

तिने घसा खाकरून स्वतःला जरा ताळ्यावर आणलं. "अम्म, हॅलो?"

"सायरा, मी अनिश बोलतोय."

"ओह, हॅलो डॉ. पै! प्लीज मी आधी जे काय बरळले ते विसरून जा."

तो तिरकस हसला पण तिला जरा शांत करावं म्हणून बोलू लागला." मी फक्त तुम्ही दोघी नीट घरी पोचलात ना हे विचारायला फोन केला होता."

"काय?" ती अजून शॉकमध्येच होती.

"बराच पाऊस होता म्हणून." आता तोही जरा विचार करून बोलला.

"हो. व्यवस्थित पोचलो. नो प्रॉब्लेम." तिने काहीतरी खुसखुस करून दार लावल्याचा आवाज आला. "सॉरी, मी नेहाला इथून बाहेर काढत होते."

"अरे हो, तिची अपॉइंटमेंट कशी होती?"

तिने उत्तर द्यायला थोडा वेळ लावला."ठीक आहे सगळं. तुम्ही फक्त एवढंच विचारायला फोन केलाय की अजून काही आहे? खरं सांगा."

खरं? खरं सांगायचं तर मी एकटा शनिवारी रात्री केबिनमध्ये काम करत बसलोय. कदाचित आधी एवढ्याने मी समाधानी होतो पण आता अचानक सगळं बदललंय. मला खूप काही विचारायचंय. तू आंघोळ करून घरात कुठले कपडे घातलेत, तू डिनरसाठी काय बनवलं आहेस, तू जेवणानंतर मूव्ही बघशील की वाचत बसशील? मला तुला पुन्हा किस करून काय वाटतंय ते बघायचंय आणि तू ते मला करू देणार नाहीस, म्हणून मी काहीतरी कारण काढून हा कॉल केलाय. कदाचित मी समजतोय त्यापेक्षा माझं मन तिला जास्त उमगलंय कारण मी हे काहीही न बोलताच पलीकडे तिचा आवाज मऊशार झाला.

"अनिश? सगळं ठीक आहे ना?"

त्याने एकदम मान झटकून सगळे विचार बाजूला केले. "ऑल ओके! सोमवारी भेटू."

क्रमश:

Keywords: 

लेख: