अमेरिकेची सफर - लेखमालिका

पार्श्वभूमी - गेली १२ वर्ष जर्मनीत वास्तव्य असल्यामुळे जर्मनी आणि युरोप मधल्या अनेक देशात भटकंती झाली. यावर्षी, एप्रिल २०२५ मध्ये पहिल्या अमेरिका भेटीचे योग जुळून आले, त्याबद्दलची ही लेखमालिका !

Keywords: 

अमेरिकेची सफर २०२५ - भाग १ - पूर्वतयारी

गेल्या बारा वर्षात युरोप मध्ये बरीच भटकंती झाली. Schengen करारांतर्गत जर्मनीत राहून आजूबाजूचे अनेक देश फिरू शकलो, कारण वेगळा Visa लागत नाही. दोन वर्षांपूर्वी युके मध्ये जाऊन आलो, तेव्हापासून आता भविष्यात अमेरिकेत सुद्धा जाऊ कधीतरी, या विचाराने उचल खाल्ली. तिथल्या काही जागा पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेतच, पण मुख्य तो देश अनुभवण्याची इच्छा होती. त्यासोबत बरेच मित्र मैत्रिणी पण तिथे आहेत त्यांची भेट होऊ शकेल असंही वाटायचं. तिथे भारतीय पदार्थ मिळतात, इथल्या पेक्षा जास्त प्रकार आणि चांगले असंही ऐकलं होतं, तेही अनुभवायचं होतं. युरोप मध्येही अजून बरंच आहे, पण त्यात जरा बदल म्हणून अमेरिका ट्रिप डोक्यात येत होती. पण हे सगळं नुसतं म्हणत होतो, त्यावर काहीही गंभीर विचार केला नव्हता. यावर्षीच्या सुरुवातीला जर्मन नागरिकत्व झाल्यानंतर आता अमेरिकेत (आणि जगभरात बऱ्याच ठिकाणी) विनासायास प्रवास करता येणार होता आणि त्यामुळे २०२५ मध्ये अमेरिकेची सफर करू यावर शिक्कामोर्तब झालं.

अमेरिका हा अतिशय मोठा देश आहे. एकाच देशात नऊ वेगळे टाईम झोन आहेत. पर्यटनासाठी तिथे अनेक उत्तम पर्याय आहेत. त्याबद्दल ऐकून, वाचून जुजबी माहिती होती. बऱ्याच शहरांचे, पर्यटन स्थळांचे फोटो पाहिले होते, पण ते नेमके कुठे आहेत हे माहित नव्हतं. मग अमेरिकेचा भूगोल या विषयाचा अभ्यास करायला सुरुवात झाली. कोणती राज्य कुठे आहेत, तिथलं हवामान, आम्हाला काय आवडतं, आवडेल, सृजनसाठी विशेष काय काय आहे हे सगळं शोधायला सुरुवात केली. अमेरिकन ड्रीम किंवा तिथला झगमगाट बघायचा असेल तर न्यूयॉर्क सारखी अनेक शहर आहेत. तिथल्या Skyline, तिथली नावाजलेली म्युझियम्स आहेत. नायगारा फॉल सारख्या प्रसिद्ध जागा आहेत. आणि याशिवाय अजून अनेक ठिकाणं आहेत. आम्ही एप्रिल मध्ये शाळेच्या इस्टर सुट्ट्यांमध्ये जायचं ठरवत होतो, त्या दरम्यान हवामान कुठे चांगलं असेल हाही विचार होता, आधीच सहा महिने थंडी असते, आता पुन्हा ते नको असं वाटत होतं. आम्हाला दोघांनाही थोड्या वेळात शहरांचा कंटाळा येतो, पण युरोप पेक्षा तिथल्या शहरांचा अनुभव पूर्ण वेगळा असेल, त्यामुळे एखादं शहर आणि काही नॅशनल पार्क्स बघू शकतो असं वाटलं.

Grand canyon सुमेधच्या डोक्यात होता, तिथेच आजुबाजूला Arizona राज्यातल्या अजून काही जागा पण चांगल्या वाटत होत्या. मुख्य म्हणजे आम्ही आजवर युरोप मध्ये जेवढं फिरलो आहे, त्यापेक्षा या भागात पूर्ण वेगळा Landscape बघायला मिळेल अशी अपेक्षा होती, ती इथे पूर्ण होईल असं वाटलं. फिरताना नुसतं प्रत्येक ठिकाणी जाऊन नुसते फोटो काढून पुढे जायचं असा प्लॅन नको होता. निवांत वेळ मिळायला हवा हे पक्कं डोक्यात होतं. काही मैत्रिणींकडून माहिती मिळवली. आमचे दोघांचेही बरेच मित्र मैत्रिणी अमेरिकेत आहेत, पण आमची वेळ आणि आवडलेल्या जागा त्या सगळ्यांपासून बऱ्याच दूर होत्या, त्यामुळे त्यांच्या भेटी होणार नाहीत, पण पुढच्या वेळी ठरवू असं ठरवलं. म्हणता म्हणता एक बेसिक प्लॅन तयार झाला. त्या दृष्टीने जवळचं शहर म्हणजे Las Vegas. तशी तिकिटं बघायला सुरुवात केली, शोधाशोध करत काही पर्याय मिळाले आणि बुक झाले. मग सविस्तर कोणत्या दिवशी कुठे काय करायचं यावर चर्चा झाल्या, त्याप्रमाणे हॉटेल बुक झाले.

पूर्ण वेगळ्या देशात, खंडात जात असल्यामुळे काही बाबतीत थोडी भीती पण होती. युरोपात आता कुठेही फिरताना बऱ्याच गोष्टींचा अंदाज असतो, तसं तिथे खूप नवखेपण वाटेल का अशी शंका होती. Comfort zone बाहेरचा हा प्रवास असणार होता. शिवाय मनात तिथली gun पॉलिसी बद्दल पण भीती होती. त्यातून आम्ही ज्या भागात जाणार तो वाळवंटी भाग, थोडा विराण सुद्धा, काही झालं तर काय असं ही डोक्यात येऊन गेलं. पण या सगळ्या शंका बाजूला ठेवून एकेक तयारी सुरू झाली.

अमेरिकेत फिरण्यासाठी गाडी हाच मुख्य पर्याय आहे. इथल्या लायसन्स वर तिकडे गाडी चालवता येते, त्यामुळे तसा प्रश्न नव्हता. मग गाडी शोधून तीही बुक केली. जर्मन नागरिकांना अमेरिकेत ९० दिवसांपर्यंत Visa लागत नाही, पण त्यांच्या एका वेबसाईट वर रजिस्ट्रेशन करून, आपली सगळी माहिती भरून त्यावर approval घ्यायचं असतं, तेही काम झालं.
तिथलं सिम कार्ड, अमेरिकन डॉलर्स, त्यासाठी काही कार्ड्स वर डॉलर्स लोड करणे, तिथले ड्रायव्हिंगचे नियम समजून घेणे, कुठे ॲडव्हान्स ऑनलाइन बुकिंग करावे लागतात का हे शोधून ठेवणे अशा बऱ्याच गोष्टी होत्या.

अजून दोन महिने, मग एक महिना, मग दोन आठवडे असं करत जायची तारीख चार दिवसांवर आली. सृजन अमेरिकेत जाणार ही वार्ता वर्गभर पसरली होती. आमच्याही सगळ्या मित्र मैत्रिणींच्या शुभेच्छा मिळाल्या. शुक्रवारी out of office इमेल सेट करून मग खऱ्या पुढच्या तयारीला, बॅग भरण्याला सुरुवात झाली.

पहिल्यांदा चाललो तेही Vegas मध्ये याची आम्हालाही गंमत वाटत होती. सृजन सोबत Las Vegas Wink अशी बऱ्याच जणांची त्यावर पहिली reaction होती. What happens in Vegas remains in Vegas याच्या अगदी उलट प्रत्येक गोष्ट मी लिहायला घेतली

क्रमशः

मधुरा देशपांडे शेंबेकर
२७-०४-२५

Keywords: 

अमेरिकेची सफर - भाग २ - प्रयाण

विकेंड हाताशी होता तेव्हा घरातल्या झाडांची सोय लावणे, गार्डन मध्ये रोज पाण्याचा टायमर लावून ठेवणे अशी सगळी कामं झाली. प्रवासात सोबत म्हणून ठेपले करून घेतले. कितीही प्लॅन केला तरी शेवटी काहीतरी फ्रिज मध्ये राहतं, ते वाया जाऊ नये म्हणून एका भारतीय मित्राच्या घरी देऊन आलो. सोमवारी सकाळी लवकर उठून, घरातल्या सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा तपासून, गणपती बाप्पा मोरया म्हणून प्रवास सुरु झाला. विमानप्रवास आता नवीन राहिलेला नाही, पण एवढ्या वर्षात ११ तास एकाच विमानात असा प्रवास कधीही केला नव्हता, तो यावेळी होता. फ्रांकफुर्ट हून थेट Los angeles आणि तिथून Las Vegas ५० मिनिटे असा प्रवास होता. फक्त केबीन बॅग होत्या, प्रत्येकी एक, त्यामुळे चेक इन बॅग देण्यात वेळ जाणार नव्हता. आधीच वेब चेक इन झालेलं असल्यामुळे थेट सिक्युरिटी, इमिग्रेशन करून, तिथेच थोडं खाऊन मग विमानाची वाट बघत बसलो.

बोर्डिंग सुरु झालं, ग्रुप प्रमाणे ते लोक यायला सांगतात. त्याप्रमाणे तो माणूस सगळ्यांना विचारत होता. आमचा ग्रुप ५ म्हणून आम्ही बाजूला उभे होतो. सगळ्या लोकांना एक माणूस which group विचारत होता, त्याने सृजनला एकदम how old are you? विचारलं. त्याने ग्रुप विचारला असं समजून सृजनने फाईव्ह असं सांगितलं. मग मी "नाही, आठ वर्षांचा आहे" असं सांगितलं आणि त्याने आम्हाला फॅमिली साठीच्या रांगेत जायला सांगितलं. आपण वेगळंच ऐकलं आणि म्हणून चुकीचं उत्तर दिलं म्हणून सृजनला जरा वाईट वाटलं (इज्जत का सवाल Wink ) पण मग लगेच त्यावर हसू पण आलं आणि आम्ही विमानात बसलो. आम्हाला विंडो सीट साठी बरेच पैसे जास्त भरावे लागणार होते, त्यामुळे विंडो सीट घेतली नव्हती. हे सृजनला सांगितलं तेव्हा त्याला फारच वाईट वाटलं होतं. पण ते पैसे वाचवून त्यात तुझे चार गेम येतील हे समजावल्यावर तो शांत झाला होता. तरीही, प्रत्यक्ष विमानात बसल्यावर त्याच्या दुःखाने पुन्हा डोकं वर काढलं. मधल्या चार पैकी तीन सीट वर आम्ही होतो, विमान निघे पर्यंत चौथ्या सीटवर कुणीही आलं नाही त्यामुळे ते दुःख फार टिकलं नाही, कारण आजतागायत कधीही अशी रिकामी सीट आमच्या नशीबात नव्हती. विंडो पेक्षा याचा आनंद जास्त होता, तो साजरा करत विमान निघालं.

स्क्रीन बंद असणे याबाबतीत आणि स्क्रीन रिस्पॉन्स अतिशय हळू असणे याबाबतीत Lufthansa पूर्णपणे Air India ची आठवण करून देत होतं. तरीही सृजनने त्याच्या आवडीच्या गोष्टी शोधल्या आणि तो त्यात बिझी झाला. मी कोणता सिनेमा बघावा या प्रश्नातच अडकले, मग जाऊदे ते ठरवू नंतर, तोपर्यंत गेम खेळू म्हणून दोन तीन गेम खेळून पाहिले. पण स्क्रीन रिस्पॉन्स इतका हळू होता की मी एक मुव्ह केल्यावर दोन मिनिटांनी ते दिसायचं. मग सुडोकू सोडवू म्हणून ते उघडलं, तर तेही इतकं हळू, दहा वेळा एका आकड्यावर क्लिक केलं की मग तिथे काहीतरी सिलेक्ट व्हायचं, वैतागून तेही बंद केलं. बॉलीवूड म्युझिक म्हणून एक अल्बम लावला, तर त्यात 'सुट्टेबाज हसीना' नावाच गाणं पहिल्यांदाच ऐकलं, काहीही गाणी काय असतात, शब्द संगीत कशालाच काही अर्थ नाही. चाळीशी जवळ येते आहे तसं 'आमच्या वेळची गाणी भारी होती यापेक्षा' असं म्हणण्यात मजा येते. अगदी Arijit Singh ची गाणी लावली तर तीही या विमानात बोअरिंग होती . मग अजून एक दोन documentary बघितल्या, खरंतर ऐकल्या. पॉडकास्ट ऐकत बसले. चक्क एक जर्मन पॉडकास्ट चांगला वाटला, पासपोर्टचा इतिहास आणि त्यात झालेले बदल असा विषय होता. बाकी तीन चार ऑडिओ बुक सुरू केली, पण रटाळ वाचन वाटलं आणि बंद केली. मग एक अजून हिंदी गाण्याचा अल्बम दिसला, त्यात "पहली पहली बार मुहब्बत की है" हे ऐकून आपण विमानात नाही तर एखाद्या टॅक्सी मध्ये बसलो आहे असं वाटलं.

स्वतःच्या स्क्रीन शिवाय आजूबाजूला कळत नकळत लक्ष जातंच. समोरच्या एकाच्या स्क्रीन वर Friends सुरू होतं. पलीकडे कोपऱ्यात एक बाई होती ती लॅपटॉप घेऊन बसली होती. विमान निघायच्या वेळी Air Hostess ने तो तात्पुरता बॅग मध्ये ठेवा हे सांगितल्यावर, तिने सरळ खालीच ठेवला, आणि त्यावर अल्मोस्ट पाय ठेवले. एवढा महागचा लॅपटॉप त्याला असे पाय लागत आहेत हे बघून मलाच आश्चर्य वाटलं. पुन्हा लॅपटॉप वापरता येतील हे ऐकता क्षणी तिने WiFi विकत घेऊन त्यावर काहीतरी काम सुरू केलं आणि दहा मिनिटात लॅपटॉप बंद करून ठेवून दिला. दहा मिनिटांसाठी हिने वायफाय का विकत घेतलं असा प्रश्न माझ्या मनात आलाच. असो.

या सगळ्या दरम्यान जेवण, सृजनची झोप, गप्पा हेही सगळं सुरु होतं. दर थोड्या वेळाने "बरं झालं शेजारी कुणी नाही आलं" यावर आम्ही आनंद व्यक्त करत होतो. यावेळी बॅग भरताना आपलं एकही भांडण झालं नाही असंही बोलणं झालं आणि मग आपण परफ्यूम विसरलो आहे आणि तू घेतो म्हणालास, तू म्हणाली म्हणून मी घेतला नाही असे माफक संवाद होत ती कमी भरून काढली. अगदी त्याच वेळी ऑन एअर शॉपिंग साठी त्या बायका फिरत होत्या, त्यात एक परफ्युम माफक किमतीत दिसला म्हणून आम्ही तो चक्क विकत घेतला. याआधी मला प्रश्न पडायचा की इथे कश्याला शॉपिंग करायचं? मी नुसती ती मॅगझीन बघायचे पण कधीही खरेदी केली नव्हती. एरवीही आम्ही शॉपोहोलिक नाही, पण त्या दिवशी सहज आलं मनात आणि घेतला परफ्युम असं झालं.

स्क्रीन वर अधून मधून विमान कुठून जात आहे हेही बघत होतो. यूके, आइसलँड, ग्रीनलँड, कॅनडा असा प्रवास करत आम्ही एकदाचे Los Angeles मध्ये लँड झालो. विमान लास वेगास वरूनच गेलं, तेव्हा इथे जरा थांबलं असतं तर असं वाटलं. लँडिंग अगदीच रफ झालं, त्यामुळे आधीच बंद असलेलं माझं नाक त्रासला आणि कान दुखायला लागला. डोळे चुरचुरत होते. आम्ही थकायला सुरुवात झाली होती कारण आमचे जर्मनीतले रात्रीचे दहा वाजून गेले होते. विमानतळावरच beige रंग वेगळा वाटत होता. उतरून इमिग्रेशनसाठी गेलो, तिथे भली मोठी रांग होती. लहान मुलांसाठी कुठेही वेगळी प्रायोरिटी नव्हती. अगदी २-४ वर्षांची बरीच मुलं सुद्धा रांगेत होती. युरोपात सहसा मुलांसाठी वेगळी काउंटर असतात, पण इथे काही दिसलं नाही. जवळपास तासभर रांगेत थांबल्यावर एक माणूस आला आणि आम्हाला त्याने पुढे जायला सांगितलं. लगेच नंबर लागला, काहीही जास्त चौकशी झाली नाही, दोन प्रश्न आले आणि काम झालं. आता पुढे वेगासचं विमान होतं. ते टर्मिनल बरंच दूर होतं आणि आतून तिथे जाण्यासाठी काही सोय नव्हती. मग बरंच चालल्यावर तिथे पोचलो, तर अगदीच लहान गेट होतं, बसायलाही जागा नव्हती. आणि इथे ज्या ठिकाणी पासपोर्ट चेक झाले ती बाई फारच उद्धट होती, तिचं इंग्रजी समजत नव्हतं ते वेगळं, पण तिचे हावभाव, बोलण्याची पद्धत आणि आवाज सगळंच डोक्यात जाणारं होतं. या सगळ्यामुळे जरा वैतागलो होतो. त्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेतले भारतीय लोक कसे एवढा प्रवास करतात याचं पुन्हा एकदा कौतुक वाटत होतं. युरोपातून आठ तासात भारतात पोचू शकण्याचा आनंद जास्तच वाढला.

शिवाय सृजन साठी काहीतर खायला घेऊ म्हणून गेलो तर एक म्हणजे पर्याय फारच कमी होते, त्यातले त्याला चालतील असे अजून कमी होते आणि मग त्या काउंटर वरच्या बाईचं इंग्रजी समजायलाच आम्हाला वेळ लागला. कसं आहे की १०-१५ वर्षांपूर्वी हे झालं असतं तर काही वाटलं नसतं, आपण नवीनच आहोत म्हणून हसण्यावारी नेतो. पण आता अनुभवी प्रवासी, पर्यटक म्हणून फिरत असताना, अगदी जर्मन भाषा पण सहज येते, आणि इंग्रजी उच्चार समाजात नाही हे पचवायला अवघड वाटतं. अर्थात शेवटी यावर हसूच येतं, खरेदी करून आम्ही एक जागा शोधून बसलो. वायफाय मिळालं त्यामुळे घरी मेसेज केले. अमेरिकन सिम कार्ड ऍक्टिव्हेट केलं आणि मग पुढच्या विमानात बसलो. आता विंडो सीट होती, अर्धवट झोपेत त्या खिडकीतून बघत तासाभरात व्हेगास मध्ये उतरलो.

या दोन्ही विमानतळांवर साइन बोर्ड कमी आहेत असं जाणवलं. नव्हते असं नाही, पण पटकन दिसतील आणि अजून थोडे जास्त चालले असते असं वाटलं. लोकही फार कमी होते, आणि जे होते तेही आमच्या सारखेच शोधात होते. शेवटी टॅक्सी साठीची जागा शोधून तिकडे जायला निघालो. टॅक्सी साठीची app इन्स्टॉल करून ठेवली होती, पण त्यात कार्ड लिंक करा, टॅक्सी शोधा आणि त्यांचा पिक अप पॉईंट शोधा यात वेळ गेला. टॅक्सी आली, त्या माणसाने हसून स्वागत केलं, तो केनिया मधून आला आहे वगैरे सांगत होता पण आम्ही एवढे थकलो होतो, की फार काही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हतो. हॉटेलला पोचलो तेव्हा जर्मनीतले पहाटेचे ५ वाजले होते, व्हेगास मध्ये संध्याकाळ होती. आता उद्या व्हेगास बघू असं म्हणतच फ्रेश होऊन गाढ झोपलो.

क्रमशः

1

2

3

4

मधुरा देशपांडे शेंबेकर
२८-०४-२५

Keywords: 

अमेरिकेची सफर - भाग ३ - लास वेगास

सकाळी, खरंतर पहाटेच जाग आली आणि खूप भूक लागली होती. तासाभरात ब्रेकफास्ट साठी जाऊ म्हणून सहा वाजण्याची वाट बघितली आणि आवरून ब्रेकफास्ट करायला गेलो. बरं अमेरिकेत बाथरूम मध्ये आंघोळीसाठी fixed shower head आहेत, युरोपात Hand shower आहेत ज्यामुळे केस ओले होण्याची काळजी नसते. मी हे ऐकून होते आणि शॉवर कॅप घेऊन गेले होते पण एकूणच Hand shower प्रकार आंघोळीसाठी किती सोयीचा आहे हे पुन्हा एकदा जाणवलं. बरं हॉटेल वाल्यांनी पण शॉवर कॅप दिली नव्हती. या गोष्टीसाठी अमेरिकेचा एक मार्क कमी केला. Wink

मग ब्रेकफास्ट साठी गेलो तर कुणी हाय हॅलो म्हणालं नाही, साधं पाणी पटकन सापडलं नाही, मग तिथे Single use plastic बघून धक्का बसला आणि अजूनच काही मार्क कमी केले गेले. (या प्लास्टिक वापरा बद्दल आधी एक पोस्ट लिहिली आहे, ती पण इथे आणते) खायला ब्रेड, अंडी हेच मुख्य होते. म्युसली होती, ती खाल्ल्या क्षणी सृजनने खूप गोड आहे म्हणून बाजूला केली. युरोपात काकडी, टोमॅटो हे प्रकार पण ब्रेकफास्ट मध्ये असतात, इथे तसं काहीच नव्हत. चीज, मीट याचेही प्रकार खूप असतात आणि ब्रेडचे पण, त्यामानाने इथे अगदीच कमी पर्याय होतें पण भूक खूप लागली होती, ब्रेड अंडी खाऊन जरा बरं वाटलं. नशिबाने scrambled egg चांगलं होतं. Waffel Machine मधून Waffel करून त्यावर चॉकलेट सॉस घालून सृजनने आनंदाने खाल्लं. कॉफी साठी मशीन नव्हतं आणि जी कॉफी होती त्याला काहीही चव नव्हती. जर्मन लोक त्यांच्या कुरकुरत बसण्याबद्दल प्रसिद्ध आहेत (meckern Kultur) आपण तेच करतोय असं जाणवलं Mosking पण गोष्ट खरी होती. अर्थात जर्मनी, इटली या देशात कॉफी प्यायल्या नंतर अमेरिकन कॉफी फारच बोर आहे असं वाटलं. या सगळ्यानंतर पुन्हा खोलीत येऊन थोडी झोप काढली, थकवा जाणवत होता. थोडा आराम झाल्यावर बरं वाटलं.

हा दिवस तसा निवांत ठेवला होता. मग टॅक्सी बोलावली आणि पहिल्या ठिकाणी जायला निघालो - Sphere. एक थिएटर, जिथे जगातली सगळ्यात मोठी स्क्रीन आहे, अर्धगोलाकार किंवा त्याहून मोठी.

टॅक्सी आली त्या क्षणी त्या ड्रायव्हर बाईने, ladies on the front seat and rest on back seat असं specifically सांगितलं. सुमेध पुढे बसला असता तरी त्यात वावगं काय वाटलं हे समजलं नाही, पण ओके म्हणून आम्ही निघालो आणि १५ मिनिटात पोचलो. जाताना शहर जवळून बघता आलं, सगळ्या बिल्डिंग आता नीट दिसत होत्या.

दुपारी पावणे तीनचा एक शो होता, आधीही आम्ही ऑनलाईन तिकीट काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ते होत नव्हतं. मग आता प्रत्यक्ष जाऊन बघू असं ठरवलं होतं. इथे बाहेर त्यांचे अनेक लोक होते आणि ते सांगत होते, पण खूप चालावं लागलं आणि त्यांच्या बोर्ड वरची नावं म्हणजे काय हे जरा कन्फ्युजिंग होतं, शेवटी मुख्य बिल्डिंग मध्ये गेलो. तिथेही पुन्हा बरीच मोठी रांग होती आणि हळू सरकत होती. बराच वेळ रांगेत थांबावं लागलं पण तिकीट मिळालं. security check झालं आणि मग आतल्या लॉबी मध्ये लगेच दिसला एक रोबो, खरंतर ती रोबो.

तिच्यासोबत एक खरी बाई होती आणि ती प्रेक्षकांना तुम्हाला हिला काही विचारायचं आहे का असं विचारत होती, आणि ते प्रश्न रोबोटला विचारत होती. एक भारतीय वृद्ध जोडपं होतं त्यांच्या मुलासोबत, त्यांच्या लग्नाचा पन्नासावा वाढदिवस होता, मग त्यावर त्या रोबोने प्रेम आणि लग्न याबद्दल काहीतरी सांगितलं. तिचे डोळेही फिरत होते. प्रत्येकाचे प्रश्न सुरू होते आणि रोबो उत्तरं देत होती.

सृजनने तिला why is Bermuda triangle so dangerous असा प्रश्न विचारला. मग तिने, "सृजन, असं असं आहे" म्हणून उत्तर दिलं. सगळं एकूण चकित करणारं होतं. आम्ही दोघंही तंत्रज्ञान विषयक काम करतो पण या विषयात नाही, त्यामुळे आजवर फक्त ऐकल्या होत्या गोष्टी. आम्हाला राधिका नावाचा एक धडा होता शाळेत, तेव्हा हे असं काही खरं प्रत्यक्षात असेल याची कल्पना केली नव्हती, ते याची देही याची डोळा बघितलं.

मग खायला चिप्स घेतल्या आणि सीट शोधत आत गेलो. इथे गळ्यात एक ट्रे आणि त्यात मर्यादित दोन खायचे पदार्थ विकणाऱ्या लोकांकडे पण कार्ड पेमेंट होतं हे आम्हाला नवीन होतं, याबाबतीत आम्ही जर्मनीत अजून बरेच मागे आहोत, कॅश देतो किंवा देऊ शकतो. :)

१७६०० लोक बसू शकतील एवढं मोठं थिएटर, भव्य दिव्य. किती उंच असाव्यात त्या पायऱ्या, धडकी भरेल असं सगळं होतं. ठरल्या वेळी फिल्म सुरू झाली, एका लहान स्क्रीन वर सुरू होऊन क्षणभरात मग मोठी झाली, त्या पूर्ण थिएटर भर व्यापून राहिली आणि आम्हाला जगभरात घेऊन गेली.

एक खास अनुभव घेऊन बाहेर पडलो. आपली पृथ्वी, तिची साधन संपत्ती आणि मनुष्याने केलेला विनाश, कदाचित भविष्यात येऊ घातलेली परग्रहावरची वस्ती हा विषय होता. सिनेमॅटोग्राफी आणि एकूण विषय आवडला, तरीही काही ठिकाणी भारत आणि मेक्सिको सारख्या देशांना मुद्दाम कचरा/विनाश या संदर्भाने दाखवलं गेलं असं वाटलं आणि ते खटकलं.

हेच सगळं बोलत पुढे चालत Venetia Mall मध्ये गेलो. इथे सगळीकडे स्लॉट मशीन होती आणि जे काही Vegas सिनेमा मधून दिसलं होतं ते प्रत्यक्षात दिसत होतं. मुलांना घेऊन तिथे थांबता पण येत नाही, आम्ही नुसतं बघत पुढे गेलो. गर्दी त्यामानाने कमी होती. पुढे एक आईसक्रीमचं दुकान दिसलं, तिथे थांबून आइस्क्रीम आणि कॉफी घेतली, ही इटालियन कॉफी चांगली होती.

मॉल मधल्या दुकानात विंडो शॉपिंग करत गेलो. काही antiques पाहिले. खरं व्हेनिस आम्ही पाहिलं आहे, अगदी तेच सगळं तिथे आत उभं केलं होतं आणि ते हुबेहुब केलेलं होतं, फरक एवढाच की इथे पाणी स्वच्छ होतं, खऱ्या व्हेनिस मध्ये ते नाही. अगदी ते बोटीतून नेणारे लोक होते, लोकांनी तिथे पाण्यात कॉइन टाकले होते. युरोपियन, मुख्य इटालियन लुक सगळ्याला होता. मग तिथून बाहेर पडलो आणि वेळ आहे तर स्ट्रिप म्हणजे तिथल्या मुख्य नावाजलेल्या रस्त्यावरून बघत गेलो.

Vegas मध्ये काहीही घडू शकतं, हा तर पूर्ण कसिनो रस्ता. अजून उजेड होता त्यामुळे त्याचा मुख्य Business सुरु झाला नव्हता, तरी काही अजब फॅशन बघायला मिळाल्या. Lol Lol इथून पुढे आल्यावर दिसला High Roller. मोठा आकाश पाळणा जो आपल्याला संपूर्ण शहराचा नजारा दाखवेल. आता वेळ आहेच तर बघू म्हणून गेलो, तिकीट काढलं, गर्दी अजिबात नव्हती त्यामुळे लगेच नंबर लागला. निवांत बसून शहर बघितलं, सभोवताली दिसणारे डोंगर पाहिले. इथे पार्किंग साठी किती मोठ्या जागा आहेत आपल्या पेक्षा याचं नवल वाटत होतं. तिथून Hotel शोधण्याचा प्रयत्न केला. काही काचेच्या इमारती आता सूर्योदयाची वेळ आली तश्या चमकत होत्या. स्ट्रिप वरची गर्दी वाढत होती. रात्रीसाठी Vegas सज्ज होत होतं. आम्ही खाली उतरलो आणि Taxi करून सरळ हॉटेल वर आलो. मेक्सिकन फूड ऑर्डर केलं, पोटभर जेवून मग झोपलो.

आता दुसऱ्या दिवशी गाडी घ्यायला जायचं होतं. त्याबद्दल पुढच्या भागात

क्रमशः

1

2

3

4

5

6

मधुरा देशपांडे शेंबेकर

०१-०५-२५

अमेरिकेची सफर - भाग ४

हा अमेरिकेतला तिसरा दिवस होता, आलो तो दिवस वगळला तर हा दुसराच दिवस. अजूनही सकाळी खूप लवकर जाग येत होती, त्यामुळे सहा वाजताच ब्रेकफास्ट करून आलो. पुढच्या हॉटेल मध्ये ब्रेकफास्ट काही वेगळा असेल तर बरं होईल असं ते खाताना सारखं वाटत होतं. मग थोड्या वेळाने आवरून पुन्हा टॅक्सी करून विमानतळावर असणाऱ्या कार Rental area मध्ये पोचलो. तिथे एकाच ठिकाणी दहा वेगवेगळ्या रेंटल कंपनीजची ऑफिसेस होती. प्रत्येक ठिकाणी गर्दी होती, बरेच जण विमान प्रवास करून लगेच गाडी घ्यायला आले होते, आम्ही लांबचा प्रवास असल्या मुळे एक दिवसानंतर आलो होतो. गाडी घेण्याबद्दल या आधीच्या पोस्ट मध्ये लिहिलं आहे, ती इथेच देते.

जर्मनीत जेव्हा आम्ही रेंटल कार बुक करतो, आणि मग प्रत्यक्ष कार घ्यायला जातो, तेव्हा साधारण हा क्रम असतो -
कागदपत्र (ओळखपत्र आणि लायसन्स आणि जे लोक गाडी चालवणार आहेत त्या सगळ्यांचे, नवरा बायको असले तरी प्रत्येकाचे) तपासले जातात आणि मग गाडीच्या किल्ल्या हातात दिल्या जातात, त्यावर ठराविक गाडी क्रमांक लिहिलेला असतो, त्या गाडीचे कागदपत्र असतात. बहुतांशी वेळा तिथला माणूस आपल्या सोबत गाडी पर्यंत येतो, गाडी चेक करतो आणि मग बाय करून जातो. आम्ही गाडी पूर्ण चेक करतो, कुठे काही प्रॉब्लेम दिसला तर त्या कागदांवर लिहून घेतो आणि मग ती गाडी घेऊन निघतो. हे असंच युरोपात बहुतांशी देशात घडतं.

आता आज अमेरिकेत -
गाडी आम्ही आधीच बुक केली होती. हॉटेल मधून Taxi करून तिथपर्यंत आलो. बरीच मोठी रांग होती पण पटकन नंबर लागला, कागदपत्र पाहिले, क्रेडिट कार्ड वगैरे सोपस्कार झाले आणि दोन कागद हातात दिले. वर parking लॉट मध्ये आमचा माणूस असेल तो पुढे सांगेल एवढं सांगितलं आणि झालं. त्यावर गाडीचा नंबर कुठेही नव्हता, किल्ल्या नव्हत्या. आम्ही वर गेलो, तर त्या माणसाने फक्त कोणत्या प्रकारची गाडी हे विचारलं (Compact, Van etc), तो कागद पाहिला आणि त्या पुढच्या लेन मध्ये जा गाडी आहे म्हणाला. इथे आम्ही पूर्ण confused लुक मध्ये होतो, कोणती गाडी वगैरे काहीच सांगितलं नाही, किल्ल्या कुठे आहेत असे सगळे प्रश्न होते. त्याबद्दल विचारल्यावर तो म्हणाला, की आमच्या कडे ७००० गाड्या आहेत, एवढ्या किल्ल्या मी नाही ठेवू शकत, किल्ल्या गाडीत आहेत. हवी ती घेऊन जा. ओके म्हणून, 'ऐसा भी होता है' असा विचार करत जरा साशंक मनानेच आम्ही तिथे पुढे गेलो, तर चार वेगवेगळ्या गाड्या होत्या, आम्ही ठरवू शकत होतो यातली कोणती घ्यायची ते. हे असं काहीही सवयीचं नसल्या मुळे, तिथेच थांबून बघत होतो. तेवढ्यात त्याच कंपनीचा अजून एक जण तिथून चालला होता, त्याने any problem? असं विचारलं. आम्ही यातली हवी ती घेऊ शकतो हे एकदा त्याला पुन्हा विचारलं, मग त्याच्याशी अजून गप्पा झाल्या आणि त्याला ही पार्श्वभूमी सांगितली आणि सगळे त्यावर हसलो. उपलब्ध गाड्यांमधून आम्ही दोघांनी एक गाडी एकमताने निवडली (जर्मन ब्रँड Cool ), सवयीने सगळं चेक केलं, एक दोन फोटो काढून ठेवले आणि अजून नवीन अनुभव घेत पुढे निघालो.

तर गाडी घेऊन मग आता गाडीने प्रवास सुरू झाला, हा दिवस Vegas मध्येच होता. गाडीत in built navigation नव्हतं, फोन वर पत्ता टाकला आणि गाडी घेऊन निघालो वॉलमार्टकडे, अमेरिकेतलं सुपरमार्केट/डिपार्टमेंटल स्टोअर. एक म्हणजे तिथून सृजन साठी बुस्टर सीट घ्यायचं होतं, आम्ही सोबत नेलं नव्हतं. रोड ट्रिप साठी स्नॅक्स आणि अजून काही सामान पण घ्यायचं होतं.
आणि कोणत्याही नवीन ठिकाणी गेलो की तिथली सुपरमार्केट बघायला मला आवडतं. काय वेगळं मिळतं इथल्यापेक्षा ते समजतं, किमती कश्या आहेत समजतं, याही सगळ्यातून देशाबद्दल समजून घेता येतं. पहिले काही वेळ गाडी पूर्ण नवीन ठिकाणी चालवत असल्यामुळे सरावाचं नव्हतं . खरंतर जर्मनीत खूप जास्त नियम आहेत, रस्ते तसे लहान आहेत, अमेरिकेत त्यामानाने रस्ते प्रचंड मोठे, पार्किंग मोठे आणि रहदारी कमी. ड्रायव्हिंग साईड दोन्ही कडे एकच आहे त्यामुळे ते सोपं होतं. तरीही सगळ्याचा अंदाज यायला थोडा वेळ लागतो, त्यातून आम्ही इकडे किलोमीटर वापरतो आणि तिकडे माईल. पुढचा टर्न अमुक मीटर नंतर म्हणजे किती असेल याचा आमच्या नजरेला अंदाज आहे, ते सगळं बदललं. तसा रस्ता फार दूर नव्हता, गाडीची रंगीत तालीम चांगली झाली आणि आम्ही वॉलमार्ट पर्यंत पोचलो. आत जाऊन सीट घेतलं, फोन गाडीत लावण्यासाठी होल्डर घेतलं. आणि बाकी काही बघे पर्यंत भूक लागली, म्हणून अजून काही खरेदी न करता तिथून सरळ एका भारतीय रेस्टॉरंट मध्ये गेलो.

एक भारतीय किराणा माल दुकान आणि शेजारीच एक लहान रेस्टॉरंट सारखी खायची सोय. तिथे जाऊन पराठे, छोले असं सगळं खाऊन बरं वाटलं. तीन दिवसानंतर भारतीय पदार्थ खाल्ले. गर्दी अजिबात नव्हती, त्यामुळे तिथल्या ताईंसोबत भरपूर गप्पा झाल्या. (मी सवयीने काकूच म्हणणार होते पण हल्ली मी स्वतःचं वय लक्षात घेते आणि कुणाला एकदम काकू म्हणत नाही Wink ) कुठून आलात, कुठे फिरणार आहात वगैरे बोलणं झालं. त्या म्हणाल्या की मी वाटल्यास मला फोन करा मी उद्या पण बनवून देईन, तुमच्या वेळेप्रमाणे करून देईन काहीतरी तुम्हाला न्यायचं असेल तर. कुणी हे म्हणणं सुद्धा खूप आहे, बघू ठरवू असा विचार केला. पण ते पराठे पण फ्रोजन गरम करून दिले असावेत असं वाटलं, सगळ्याची चव चांगली होती हे महत्त्वाचं)
खाऊन मग त्या शेजारच्या भारतीय दुकानातून ३ मिनिटात होणारे पोहे, उपमा आणि काही चिक्की, बनाना चिप्स असे पदार्थ घेतले. पुढे जिथे जाणार तिथे हॉटेल मध्ये किचन होतं आणि बाहेर सोयी कमी होत्या, त्यांच्या वेळा पण बघाव्या लागतात, त्यामुळे अश्या वेळी हे पदार्थ उपयोगाला येतात. तिथल्या फ्रोजन सेक्शन मध्ये अळू वड्या बघून मला त्या घ्याव्या वाटल्या पण तेवढ्या संपणार नाही असं वाटलं, म्हणून नाही घेतल्या.

ती खरेदी करून मग पुन्हा वॉलमार्ट मध्ये गेलो. आता तिथल्या रस्त्यांची जरा सवय झाली होती. तरी Vegas मध्ये रस्त्यावर मार्किंग कमी आहेत, जे आहेत ते पेंट केलेले नाही त्यामुळे ते जरा समजायला अवघड होते. ही अडचण नंतर आली नाही, Vegas पुरतीच होती. ट्रॅफिक सिग्नल अमेरिकेत चौकाच्या पलीकडे आहेत, जर्मनीत अलीकडे आपल्याच बाजूने आहेत, अश्या लहान सहान गोष्टी लक्षात येत होत्या.

आता वॉलमार्ट मध्ये जाऊन काही फळं, बिस्कीट, नट्स असे स्नॅक्स, एक दोन औषधं सोबत असावीत म्हणून ते अशी खरेदी केली, प्रत्येक सेक्शन आता निवांत फिरून बघितला. का माहीत नाही, माझा जरा भ्रमनिरास झाला. खूप मोठं दुकान असेल, भव्य असेल असं मला वाटत होतं. मोठं असलं तरी इथे जर्मनीत पण काही तसे आहेत त्यामुळे खूप वेगळं वाटलं नाही. हे Vegas मधलं असेल म्हणून, कदाचित California किंवा न्यूयॉर्क या बाजूला अजून मोठे असतील. जर्मनीशी तुलना केली तर मला पास्ता प्रकार खूप कमी दिसले, इथे इटालियन Influence खूप आहे म्हणून असेल. इथे कॉफी आणि चहा, भारतीय चहा नाही पण विविध प्रकारचे tea जे मिळतात ते तिथे अमेरिकेत खूप कमी दिसले. पाणी घेतलं त्यात पण इथे खूप ब्रँड आणि मोठे सेक्शन आहेत, ते तिथे अगदीच लहान वाटले. औषध, जे without prescription मिळतात ते सेक्शन खूप मोठे होते. फ्रोजन प्रकार खूप होते पण शाकाहारी प्रकार त्यात इथल्या पेक्षा कमी दिसले. आणि आत ट्रॉली घेऊन फिरण्यासाठी काही गल्ल्या अगदीच लहान होत्या, जिथे चार लोक एकाच वेळी येऊन गडबड होत होती. शिवाय काउंटर वर प्लास्टिक पिशव्या बघून जर्मनीची आठवण आली, इथे त्या अजिबात वापरल्या जात नाहीत, सगळेजण आपापल्या पिशव्या किंवा बास्केट घेऊन येतात. मी एक लहान घडी होईल अशी कापडी पिशवी सोबत घेतली होती, पण ती पुरली नसती म्हणून काही प्लास्टिक पिशव्या घ्याव्या लागल्या. पण हे असं रोज अमेरिकेत वापरलं जातं हे काही पचनी पडत नव्हतं. Shok किंमती बघितल्या तर काही गोष्टी जर्मनी पेक्षा स्वस्त तर काही महाग वाटल्या. अशा प्रकारे सुपरमार्केट ॲनालिसिस करून खरेदी करून बाहेर पडलो. (नंतर अजून काही स्टोअर पाहिले, त्याबद्दल नंतर येईलच)

या पूर्ण प्रवासात प्रकर्षाने जाणवलं ते म्हणजे जर्मनीतून इथे आल्यामुळे, बरेचदा जर्मन दृष्टिकोनातून सगळीकडे पाहिलं जातं. अर्थात वेगळे देश, वेगळे खंड त्यामुळे बरेच फरक आहेत. चांगल्या वाईट दोन्ही गोष्टी आहेत आणि अजून फक्त दोन दिवस झालेत, तेही या महाकाय देशाच्या एकाच शहरात. तेवढ्यात 'फरक स्पष्ट करा' या एकाच प्रश्नावर उत्तर काय, अख्खा पेपर लिहिता येईल एवढ्या गोष्टी दिसत आहेत. ते एकेका भागात येत राहील.

पुन्हा हॉटेल वर गेलो. अमेरिकेत बहुतांशी हॉटेल मध्ये washer dryer होते ही सोय चांगली वाटली, आम्हीही मग काही कपडे धुवून घेतले. दुसऱ्या दिवशी निघायचं होतं म्हणून बॅग पुन्हा भरल्या. पहिले दोन दिवस तसे बरेच संथ, निवांत घालवले होते. नीट आराम केला होता, अमेरिकेतला वॉर्म अप झाला होता . मोठ्या प्रवासासाठी भरपूर खाऊ सोबत होता. आता पुढचे पाच दिवस मात्र Arizona राज्यात, Colorado नदीच्या वळणा वळणांवर, यापेक्षा फार वेगळे होते, भारावून टाकणारे होते. ते तसे असावेत असं वाटत असलं तरी त्या क्षणी हे माहित नव्हतं. त्याच Grand canyon ला डोक्यात ठेवून झोपलो..

क्रमशः

1

मधुरा देशपांडे - शेंबेकर
०२-०५-२०२५

अमेरिकेची सफर - भाग ५ - Route 66 and Grand canyon

Williams हे Route 66 वर असलेलं एक गाव, जिथे आमचा पुढचे दोन दिवस मुक्काम असणार होता. आम्ही तिथे जाताना आधी Vegas जवळ असणाऱ्या Hoover Dam बघून मग पुढे Grand canyon ला जाणार होतो. पण हवामानाचा अंदाज बघितला तर Grand canyon मध्ये थंडी वाढत होती, दुसऱ्या दिवशी पाऊस दाखवत होता. मग Hoover Dam नंतर करू, आज सरळ Grand canyon पर्यंत जाऊ असं ठरवलं. सकाळी लवकरच उठून निघालो.

गाडी हायवेला लागली तसं आजुबाजूच दृश्य बदललं. दूरवर हिरवळ बघण्याची आम्हाला सवय, इथे करडा रंग आणि त्यात काही हिरवी झुडपं. पण थोड्याच वेळात झाडांचे प्रकार बदलले, थोडी उंच झाडी आली, दर काही अंतरावर भूभाग बदलत होता. ट्रॅफिक काही म्हणजे काहीच नव्हता, अधून मधून एखाद दोन गाड्या दिसायच्या फक्त. आणि त्यामानाने रस्ते खूप मोठे. आता जर्मनीत पण मोठे हायवे आहेत, पण अमेरिकेइतकी जागा नाही, त्यामुळे आम्हाला फरक जाणवत होता. थोड्याच वेळात Arizona राज्यात प्रवेश केला. मला Arizona म्हटलं की Grey's Anatomy मधली Arizona आठवते. जरी तिचं नाव या राज्यावरून ठेवलेलं नसतं, तरी.

मग एका ठिकाणी गाडी थांबवायला जागा दिसली म्हणून उतरलो तर दूरवर कोलोरॅडो नदी दिसली. तपकिरी मातकट करडे डोंगर आणि एकच निळसर तुकडा नदीचा आणि खूप शांतता. पाच मिनिटच थांबलो आणि पुढे निघालो. पहिला स्टॉप असणार होता Route 66 वरचा एक पेट्रोल पंप. Route 66 हा अमेरिकेतला एक ऐतिहासिक आणि प्रसिद्ध असा रस्ता. शिकागो ते Santa Monica California पर्यंत जाणारा हा रस्ता. आता तिथे इतर हायवे झाले आहेत पण तरी बऱ्याच पाट्या तश्याच ठेवल्या आहेत. त्याबद्दल अजून माहिती पुढच्या भागात येईलच.

पेट्रोल भरायचं होतं आणि तिथेच Route 66 ची मोठी साईन आहे, तीही मग बघणार होतो. जाऊन त्या साईन जवळ फोटो काढले, गरम होत होतं म्हणून खायला आइस्क्रीम घेतलं, दोन तीनच प्रकार होते आणि जे घेतलं तेही आवडलं नाही. Sad थोडा वॉलमार्ट मधून घेतलेला खाऊ खाल्ला आणि पुढे निघालो.

ही ठिकाणं ऑनलाइन बघून मला किंचित भीती मनात होती. थोडं रांगड्या संस्कृतीचं हे ठिकाण, तिथले cowboy पेहरावात असलेले लोक हे फोटो बघून जरा शंका होती. प्रत्यक्षात गेल्यावर बहुतांशी टुरिस्ट लोक होते. Vibe वेगळा होता पण भिती अशी वाटली नाही.

आता पुढे निघालो आणि पोचलो थेट Grand canyon च्या entrance पर्यंत. इथे तिकिटासाठी गाड्यांची खूप रांग असते असं ऐकलं होतं पण आम्ही दुपारच्या वेळी गेलो त्यामुळे विशेष गर्दी नव्हती. Welcome to Grand canyon असं म्हणत एका उंच गोऱ्या चष्मेवाल्या आजोबांनी स्वागत केलं. पास घेतला आणि पुढे निघालो. ३५ डॉलर मध्ये गाडीचं पार्किंग, गाडीतले लोक आणि हे सगळं ७ दिवस valid, शिवाय त्यांची बस आत वापरता येणार हे सगळं बघता ही किंमत अतिशय वाजवी वाटली. त्यामानाने युरोपात महागाई आहे असं वाटलं (अर्थात काही पूर्ण उलट अनुभव आले नंतर दुसरीकडे, पण या नॅशनल पार्क्सला पूर्ण मार्क, आवडलं हे) आता आत सुरूची झाडं, जंगल असा भाग होता. वाळवंटी भागातून ब्लॅक फॉरेस्ट ची आठवण आली. आत बरंच अंतर गेल्यावर मुख्य पार्किंगची जागा आहे, जिथून नॉर्थ रिम दिसते. गाडी पार्क केली, भूक लागली होती म्हणून तिथे समोरच जे ठिकाण दिसलं आधी तिथे गेलो. अंडी आणि बटाटे, चीज घातलेला Tortilla रोल एवढाच बरा पर्याय होता. बाहेर मोकळी जागा आहे एवढी, तर या खाण्याच्या ठिकाणी कंजुषी का केली असेल असा प्रश्न पडला, जरा दहा लोक उभे राहू शकतील एवढी तरी जागा हवी होती. तिथेच Souvenir पण होते थोडे, सगळी गर्दी होती. पण खाऊन बरं वाटलं. आत बसण्याची काहीच सोय नव्हती, त्यामुळे बाहेर उभं राहून ते खाताना वाट लागली, कारण भयंकर वारा होता.
पटपट खाऊन मग मोर्चा वळवला रिम बघायला. एक दोन खारुताई भेटल्या. पुढे पाच मिनिटात चालत तिथे पोचलो आणि बघतच राहिलो. समोर भव्य, Grand शब्दाला जगणारा असा नजारा होता. याआधी फोटो आणि व्हिडिओ बघून इतका अंदाज आला नव्हता, ते प्रत्यक्ष बघण्यातली मजा खऱ्या अर्थाने अनुभवली.

इथे एक आमच्या शेजारच्या गावातला जर्मन माणूस भेटला. त्याच्याशी गप्पा झाल्या (याबद्दल आधी लिहिलं आहे, ती लिंक कमेंट मध्ये). थोड्या वेळात वाऱ्याचा जोर आणि थंडी अजून वाढली होती. आम्ही अजून पुढचे एक दोन पॉईंट पायी जाऊन बघितले, प्रत्येक ठिकाणाहून दिसणारे Canyon वेगळे होते. जाताना रस्त्यात दिसलेली काही झाडांची खोडं पण लक्षात राहतील अशी होती. सगळं मनात आणि फोटोंमध्ये साठवून घेत होतो, थंडी अजूनच वाढली होती आणि आम्ही तेवढ्या थंडीचे कपडे नेलेले नव्हते. या सगळ्या वाळवंटी भागात संध्याकाळ नंतर पटकन गार होतं हे वाचलं होतं, Layers मध्ये कपडे ठेवले होते पण एवढं कमी तापमान आम्ही इथून निघे पर्यंत दिसत नव्हतं. मग गाडीने पुढे जाऊन एक संग्रहालय आहे असं दिसलं, तिकडे गेलो. जाताना हरिण/सांबर जमातीतले काही वन्य प्राणी दिसले (नेमकी नावं माहीत नाहीत). त्या संग्रहालय / दुकानात गेलो, ते बंद व्हायला २०च मिनिट होते, तेवढ्या वेळात बघू असं वाटलं.
हे पूर्ण दुकान डोळ्यांना सुरेख वस्तूंची मेजवानी होती.
या ठिकाणी Native American लोकांनी, त्यातही मुख्य yavapai या आदिवासी जमातीच्या लोकांनी केलेल्या वस्तू होत्या. प्रत्येक वस्तूतली सुबक कलाकुसर वाखाणण्या सारखी होती. योगायोग असा की तिथली काही डिझाईन आपल्या कडच्या वारली डिझाइन सोबत मिळती जुळती होती.
दोन वेगळ्या खंडातले लाखो किलोमीटर दूर असणारे लोक, पण जंगलात एकरूप झालेले, त्यातून आलेल्या शैली स्वतंत्र असल्या तरी त्यात एखादा असा समान धागा असावा. :)
खरेदी काही केली नाही, कारण सगळं बघून नेमकं काय घ्यावं हे पटकन ठरवता येत नव्हतं. तिथे दुकानात पण जॅकेट्स होती, पण दोन दिवसासाठी थंडी असेल असा विचार करून घेतली नाही. तसंही अजून एक दिवस पुन्हा आम्ही Grand Canyon ला येणारच होतो. दुसऱ्या दिवशी पाऊस असेल तरी अजून एक दिवस आमच्या हातात होता. आज सगळ्याची फक्त झलक अनुभवली होती. पुढच्या एका भागात पुन्हा Grand canyon बद्दल येईलच.

हॉटेल मध्ये आलो, चेक इन केलं आणि बॅग ठेवून लगेच तिथून अगदी दोन मिनिटांवर असणाऱ्या भारतीय रेस्टॉरंट मध्ये गेलो. हे आधीच शोधून ठेवलं होतं. तिथे Buffet होता पण आम्ही रोटी, पालक पनीर अशी ऑर्डर दिली. रेस्टॉरंट स्वरूप एखाद्या धाब्यासारखा होतं. तिथली मालकीण माझ्या एका मैत्रिणी सारखी दिसत होती आणि त्याही मैत्रिणीचं बुलढाण्यात Restaurant (हॉटेल म्हणायचो आम्ही, रेस्टॉरंट आता आता सवय झाली आहे) होतं. गरम गरम रोटी खाऊन त्या थंडीत जीव सुखावला. पोटभर जेवण झालं. निघताना मी त्या मुलीला जेवण खूप आवडलं असं सांगितलं. मग तिने 'सुबह भी बहोत कुछ होता है हमारे यहाँ पे, छोले पुरी बनाते है, आ सकते हो कल भी' असं सांगितलं. त्या वेळी तरी ते आमच्या डोक्यात नव्हतं, पण दुसऱ्या दिवशी हवामान खात्याला जागून बर्फ पडणार आहे हे माहीत नव्हतं. छोले पुरीके दाने दाने पे हमारा नाम लिखा हुआ था, त्याबद्दल पुढच्या भागात ...

क्रमशः

मधुरा देशपांडे - शेंबेकर
०३-०५-२०२५

1

2

3

4

5

6

7

8

9

10

screenshot_20250522-2210312.png

screenshot_20250522-2210392.png

screenshot_20250522-2210442.png

अमेरिकेची सफर - भाग ६ - Williams

पुढचा दिवस उगवला तो बर्फ घेऊनच. सकाळी उठून बाहेर पाहिलं तर थोडा थोडका नाही, भरपूर बर्फ पडत होता. नाश्ता करायला गेलो तर या हॉटेलने अजूनच निराशा केली. पुन्हा प्लास्टिक कटलरी, तेच मोजके पदार्थ आणि मुख्य सगळ्यासाठी अतिशय कमी जागा. बाहेर त्यांच्या आवारात एवढी निवांत जागा होती, मग ही ब्रेकफास्ट रुम एवढी लहान का? तिथे प्रचंड गर्दी झाली होती. गर्दीच्या वेळी थोड्या प्रमाणात हे इतरत्रही अनुभवलं आहे, पण हे नक्कीच त्यापेक्षा जास्त त्रासदायक होतं. कसंबसं थोडंसं खायला घेऊन एक टेबल शोधून बसलो. आता स्नो असेल तर काय करता येईल यावर विचार केला.

आमच्या डोक्यात होतं Sedona नावाच्या गावात जायचं, तिथून जमलं तर Flagstaff आणि मग परत. पण बर्फ बघता Sedona कॅन्सल करावं लागेल असं वाटलं. थंडी साठी हॉटेल मध्येच हिवाळी टोप्या दिसल्या, त्या विकत घेतल्या. अजून कुठे स्वस्तात जॅकेट मिळाली तर बघू असा विचार करून फॅमिली डॉलर नावाच्या दुकानात गेलो. त्या पूर्ण रस्त्यावर प्रचंड बर्फ होता आणि अजून रस्ते क्लिअर करायला कुणी आलेलं नव्हतं. त्यामुळे जपून गाडी चालवत तिथे गेलो, आत तसंही काही नव्हतं म्हणून तसेच हॉटेल वर परत आलो. जोपर्यंत रस्ते नीट होत नाहीत तोवर आता बाहेर पडायला नको हे एकमताने ठरवून तासभर नेटफ्लिक्स बघत बसलो.

थोड्या वेळाने भूक लागली, सृजनला आता McDonald मधून काहीतरी हवं होतं, हे फक्त ट्रिप मध्ये मिळतं म्हणून त्याची क्रेझ, त्याला तिथून घेऊन दिलं आणि आम्ही आदल्या दिवशी गेलो होतो त्याच धाब्यावर गेलो. छोले पुरीची ऑर्डर दिली, बाहेरच्या शून्य डिग्री तापमानात ते खाऊन पोटोबा तृप्त झाले, चव उत्तम होती, अस्सल पंजाबी अशी. चहा पण घेतला आणि निघालो.

मग Williams गावात गाडीनेच चक्कर मारत तिथल्या Route 66 वरची जी बाजारपेठ आहे ती बघायला गेलो. इथे बऱ्याच ठिकाणी Indian ( विशेषतः Indian jewelry अश्या पाट्या )
अश्या पाट्या दिसतात, त्याचा अर्थ भारतीय नसून native Indian American असा आहे. तरी ते Indian बघून क्षणभर आपलंच वाटतं. गावातली बरीच Motel बघून आपल्याकडच्या पुर्वी धर्मशाळा होत्या त्याची आठवण आली. बिल्डिंगची पद्धत थोडी सारखी वाटली. या शिकागो ते कॅलिफोर्निया अश्या रस्त्यावरून पूर्वीच्या काळी शेतकरी आणि कामगार वर्ग प्रवास करायचा, Midwest ते वेस्ट कोस्ट पर्यंत. त्यांच्या सोयीसाठी अनेक Motel, खानावळी इथे सुरू झाल्या, बाजारपेठा वाढत गेल्या. मग पुढे काही लेखकांच्या साहित्यात Route 66 ला स्थान मिळालं. नंतरच्या काळात नवीन हायवे झाले, पण तरी या रस्त्याचं महत्त्व अबाधित राहिलं. त्यावरून दिसणारा निसर्ग, पर्यायाने पर्यटन आणि Cowboy स्टाईलची, antique लुक असणारी दुकान आणि रेस्टॉरंट, तिथे मिळणाऱ्या वस्तू अश्या अनेक कारणांनी हा रस्ता आजही प्रसिद्ध आहे. एका ठिकाणी गाडी पार्क करून तिथल्या एका दुकानात गेलो. इतक्या प्रसिद्ध रस्त्यावर गाडीला सहज पार्किंग साठी जागा मिळणे, तीही ऐसपैस हे विशेष वाटलं. सुमेधला तिथल्या त्यांच्या खास टोप्या बघण्यात रस होता. त्या दुकानात जश्या खास त्यांच्या वस्तू होत्या, jewllery होती, तश्याच काही Made in India (आपलाच भारत इथे) Made in Bangladesh अशाही होत्या. टोप्या मात्र लोकल तिथल्या आणि काही अमेरिकेतच दुसरीकडे बनलेल्या होत्या, मग त्यावर बराच खल करून सुमेधने एक निवडली आणि एक ती खास खरेदी झाली.

आता बर्फ जरा कमी झाला होता, पण वेळ बघता Sedona पर्यंत जाण्यात काही अर्थ नव्हता. म्हणून Flagstaff ला जायचं ठरवलं. हायवे वरची परिस्थिती कशी आहे हे ऑनलाइन बघितलं आणि मग निघालो. Flagstaff मध्ये एक observatory आहे, तिथे जातानाचा रस्ता तर डिसेंबर मध्ये जर्मनीत प्रवास करतो असं भासवणारा होता, प्रचंड बर्फ, सुरूची झाडं आणि हायवे संपल्यावर घाटाचा रस्ता. ते सगळं सुंदर दिसत होतं, पण थंडीमुळे काकडलो होतो. ही हिवाळी ट्रिप म्हणून डोक्यात नव्हती.

त्या पार्किंग मध्ये पोहोचलो आणि आत जाणार तेवढ्यात एक माणूस बाहेर आला आणि म्हणाला की बर्फामुळे त्यांच्या सगळ्या जागांवर जाऊ शकत नाही, त्यामुळे ते बंदच करत आहेत. मग आल्या पावली तिथून परत फिरलो. आता वेळ आहे तर तिथून जवळच असलेल्या Target नावाच्या दुकानात गेलो. तिथे जाऊन पुन्हा विंडो शॉपिंग केली. हे दुकान मला वॉलमार्ट पेक्षा आवडलं, खरेदी केली नाही पण अनेक वेगळ्या वस्तू बघायला मिळाल्या. इथे बोर्ड गेम्सची प्रचंड व्हरायटी होती. डेकोरेशनच्या वस्तू, आर्ट ॲन्ड क्राफ्ट वस्तू सुरेख होत्या.
सृजनला एक चॉकलेट हवं होतं तिथून, त्याच्या यूट्यूब बघण्यातून समजलेलं, तेवढं घेतलं आणि पुन्हा परतीच्या रस्त्याला लागलो. सकाळी भरपूर जेवण झालं होतं, त्यामुळे भूक नव्हती. गरज लागलीच तर खाऊ, फळं सोबत होती. मग Hotel वरच आराम केला.

Sedona ला जायला जमलं नाही याचं वाईट वाटत होतं. पण असे दिवस प्रवासात असतातच, ते आपल्या हातात नसतात. वाळवंटी प्रदेशात तसा नेहमीचा नसणारा बर्फ त्या निमित्ताने बघायला मिळाला. एरवी खास बर्फ बघायला काही आम्ही अमेरिकेत येणार नाही. हवामान खात्याच्या अंदाजा प्रमाणे उद्या सूर्यदर्शन होणार होतं, थंडी असली तरी पाऊस किंवा बर्फ नव्हता. शक्य तेवढे जाड कपडे आणि लेअर्स या तयारीवर आपण तेवढी थंडी निभावू शकू असं वाटत होतं. Grand canyon पुन्हा निवांत बघून मग Page या गावात पुढचे तीन दिवस मुक्काम असा प्लॅन होता. त्याबद्दल पुढच्या भागात..

क्रमशः

मधुरा देशपांडे शेंबेकर
०४-०५-२०२५

१

२

३

४

५

६

७

अमेरिकेची सफर - भाग ७ - Grand Canyon to Page

पुन्हा एकदा Grand canyon बघण्यासाठी आज उत्सुक होतो. हॉटेल मधला तोच ब्रेकफास्ट नको म्हणून Route 66 वरच्या एका कॅफे मध्ये थांबून खायला घेऊ आणि पुढे जाऊ असं ठरवलं. चेक आऊट करून निघालो. एक जाणवलेली गोष्ट म्हणजे चेक आऊट करताना रिसेप्शन वरचं कुणीही तोंडदेखलं सुद्धा How was your stay? किंवा Hope you enjoyed your stay असं काहीही विचारत नव्हतं. Las Vegas मधल्या hotel मध्येही हाच अनुभव होता. किल्ल्या द्या आणि निघा असा व्यवहारी मामला होता.

ठरल्या प्रमाणे त्या cafe मध्ये गेलो. सँडविच, मफिन असे काही पदार्थ घेतले. तिथे बसूनच खाणार होतो पण सगळं take away boxes मध्येच आलं. चवबदल म्हणून ठीक होतं. बाहेर बर्फ बराच वितळलेला दिसत होता. थोडं उन यायला सुरुवात झाली होती. Grand canyon मध्ये आधी जे पॉईंट्स पाहिले, त्यापेक्षा वेगळा रूट आता बघू असं ठरवलं होतं. त्याप्रमाणे तासाभरात तिथे पोचून गाडी पार्क केली. याच ठिकाणी एक ट्रेन स्टेशन पण आहे. तिथून चालत जाऊन बस स्टॉप पाशी आलो. इथे प्रत्येक वेगवेगळ्या रूट साठी शटल बसेस आहेत, दर १० ते १५ मिनिटांनी त्या बस येतात. हवं त्या स्टॉप वर आपण उतरू शकतो आणि पुन्हा नंतरच्या बसने पुढे जाऊ शकतो. ही सोय अतिशय उत्तम आहे. फक्त रांगेत थोडा वेळ थांबावं लागू शकतं. पहिल्या ठिकाणीच मोठी रांग होती, त्यामुळे पहिल्या बस मध्ये आमचा नंबर लागला नाही.

पुढच्या बस मधून मग निघालो. रस्त्यात पुन्हा काही प्राणी दिसले. एक दोन पॉईंट गेल्यावर मग उतरलो. खाली पाहिलं तर दूरवर Colorado River दिसत होती. ते डोंगर, दऱ्या आणि खोलवर दिसणारा पाण्याचा लहान तुकडा, जो फक्त तसा लहान भासत होता, प्रत्यक्षात ती नदी मोठी आहे. आम्ही जिथे होतो तिथून साधारण मैलभर खोल आणि तेवढीच दूर ती होती. एक geological museum पण पाहिलं, जिथे त्या डोंगरातल्या प्रत्येक खडकांच्या लेअर बद्दल माहिती होती. साधारण २ कोटी वर्षांपूर्वीचा इतिहास असलेला हा सगळा निसर्ग, त्या लाखो वर्षात ही नदी कशी ते दगड कापत गेली आणि त्यातून या दऱ्या कश्या तयार होत गेल्या, तिथे दिसणाऱ्या प्रत्येक दगडांचे प्रकार, कोणते किती जुने आहेत आणि या सगळ्यातून Grand canyon कसा तयार होत गेला हे अचंबित करणारं आहे.

प्रत्येक point वर उतरून तिथलं दृश्य अनुभवत पुन्हा बसने पुढे जात होतो. कधी नदी दिसते, कधी नदीचे दोन सेक्शन दिसतात, कधी नदी दिसतच नाही, तपकिरी करड्या रंगांच्या विविध छटा डोंगरात दिसतात. या सगळ्या पॉइंट्स रूट वर पायी जाण्यासाठी पण चांगली सोय आहे पण थंडी बरीच होती म्हणून आम्ही बसनेच जात होतो. काही खाली उतरून करायचे ट्रेक आहेत, त्यातले काही सोपे तर काही अनुभवी लोकांनीच करावे असे आहेत. आम्ही त्याबाबतीत अनुभवी नाही, इथे आम्ही लहान मोठे ट्रेल नेहमी करतो, पायी फिरायला खूप आवडतं, कदाचित एखादा सोपा ट्रेल थोडा जमला असता, पण या ट्रिप मध्ये तो मुख्य मुद्दा नव्हता, तेवढ्या फिटनेस तयारीने आलो नव्हतो आणि हवामान पण तसं नव्हतं. पण या विविध पॉईंट्स वर फिरत जे काही सगळं दिसलं, ते सगळं अप्रतिम होतं.

असे stop घेत शेवटच्या पॉइंट पर्यंत आलो. तिथे काहीतरी खायची सोय असेल असं वाटलं पण चॉकलेट शिवाय बाकी काही नव्हतं. Hot chocolate घेतलं तेही खूप गोड होतं. तिथून मग बसने पुन्हा पहिल्या स्टॉप वर, जिथून सुरुवात केली होती तिथे आलो. इथे नीट खायची सोय होती, चांगलं मेक्सिकन फूड मिळालं. ते खाऊन मग Souvenir Shop मध्ये गेलो, मॅग्नेट घेतले आणि मग पुढच्या प्रवासा साठी निघालो. त्याच वेळी grand canyon train स्टेशन मध्ये उभी होती आणि ती निघाली. रिकामीच दिसत होती. आम्ही फोटो काढले. त्यावर सृजन म्हणाला की तुम्ही दोघं एवढे excite का झाले? आपल्या कडे अश्या कित्येक ट्रेन दिसतात. मुद्दा बरोबर होता, पण म्हणूनच तर ते विशेष होतं.

आता गाडीत बसून पुढचा लांब प्रवास होता. तरी जाता जाता नवीन काही पॉईंट्स दिसले तर थांबायचा मोह होत होता. आणि प्रत्येक वेळी खरंच उतरलो ते बरं झालं असं वाटत होतं. अजून काहीतरी नवीन दिसायचं. निवांत प्रत्येक जागा शांततेत बघायला अजून दोन दिवस तरी असायला हवेत, पण जेवढा वेळ मिळाला तेवढाही ठीक होता. दुपारचे चार वाजून गेले त्यामुळे आता मात्र खरंच Grand canyon बाहेर पडलो.

आता हा प्रवास अजूनच वेगळा होता. थोड्याच वेळात रस्त्यात मातीची उंच ढेकळं, त्यांना डोंगर म्हणता येणार नाही, पण तरी जरा उंच असे दिसायला लागली. आपण परग्रहावर आहोत असं वाटत होतं. रस्त्यात काही ठिकाणी Native American jewllery च्या पाट्या दिसत होत्या, मोठं दुकान वगैरे नाही, आपल्याकडे गावाकडचे बस स्टॉप असतात आणि तिथे शेजारी शेव फाफडा चहाची दुकान असतात तश्या जागा होत्या. पण नुसत्या पाट्या होत्या, ना तिथे लोक होते ना वस्तू. बाकी तसा विराण भागातून प्रवास. खरं तर थोड्या वेळाने अशा रस्त्यांवर उदास वाटायला लागतं, हे आम्ही आइसलँड मध्येही अनुभवलं होतं, ते सगळं वेगळं, छान असलं तरीही लोकवस्ती काहीच नाही, हिरवळ अगदी कमी, कुठे फुलं नाही की शेती नाही यामुळे प्रवास एकाकी वाटायला लागतो. त्याच वेळी रेंज पण बरी नव्हती त्यामुळे गाणी लावता येत नव्हती. त्यातून हा पूर्ण रस्ता फार वरखाली होता, सारखी गाडी हिंदकळत होती. एकही व्हिडिओ नीट येत नव्हता.

पण हे सगळं अगदी थोडाच वेळ वाटलं. कारण पुन्हा lansacape बदलून लाल मरून रंग वाढला, सूर्यास्ताची पण वेळ झाली आणि पुन्हा गाड्यांची रहदारी वाढली. आता आजुबाजूला दगड, डोंगर सगळ्यात प्रत्येक त्याचा थर वेगळा दिसत होता. हे अगदी युनिक होतं. याचं नेमकं वर्णन करणं फार अवघड आहे, फोटोत सुद्धा तेवढं येत नाही, पण पुढच्या तीन दिवसात हे सगळं जवळून बघितलं तेव्हा नीट फोटो येतीलच.

Page हे गाव Arizona राज्यात असलं तरी ते Utah राज्याच्या बॉर्डर जवळ आहे. या दोन राज्यात एक तासाचा वेळेचा फरक आहे. त्यामुळे काही वेळा गुगल गल्लत करून Utah मधली वेळ दाखवतो. आमच्या नेव्हिगेशनने हाच गोंधळ घातला, त्यामुळे पोचण्याची वेळ एक तास उशीराची दाखवत होता, मग गुगलनेच खरी वेळ सांगितली. तिथे पोचलो तेव्हा अंधार झाला होता. हॉटेल बाहेरून छान वाटत होतं. चेक इन केलं, ग्राउंड फ्लोअर वरच खोली होती. किचन आणि सगळ्या सोयी होत्या. आता सोबत आणलेले पोहे उपमा खाऊ असं आम्ही ठरवलं. त्याच वेळी एकदम जोरात एक आवाज आला. त्या आवाजाने मी पण किंचित घाबरले, पण सृजन फार घाबरला आणि मला येऊन बिलगला. पुन्हा नेमके काही लोकांचे पळण्याचे आवाज आले, काहीच नसेल असं वाटत असलं, लहान मुलं असतील असं वाटलं तरी अशा वेळी भीती वाटलीच. कुठे काही झालं असेल का अश्या शंका मनात आल्याच. रिसेप्शन वर कॉल करून विचारलं, तिने सगळं ओके आहे असं सांगितलं. मग सृजन शांत झाला. थोडं खाल्लं, प्रवासाने फार थकलो होतो त्यामुळे झोपेची नितांत गरज होती. आता पुढचे तीन दिवस इथे मुक्काम होता आणि ट्रिप मधलं सगळ्यात आवडलेलं गाव हे ठरलं. ते का हे पुढच्या भागांमध्ये कळेलच.

मधुरा देशपांडे - शेंबेकर

०६-०५-२०२५

1

2

3

4

5

6

7

8

9

10

11

12

13

14

15

16

17

18

19

20

2१

22

अमेरिकेची सफर - भाग ८ - पेज (Page, Arizona)

आमच्या हॉटेल समोरच एक Glenn Canyon Dan Overlook अशी जागा आहे हे आम्ही वाचलं होतं. अगदी पायी चालत जाऊन पाच मिनिटांच्या अंतरावर. तिथे गेलो आणि सगळे लाल दगड दिसायला लागले. त्या रेषा रेषांचे, प्रत्येक थर वेगळा दिसूनही एकरूप झालेले दगड, त्याच दगडांचे डोंगर आणि त्यावरून उतरून गेलं की खाली पुन्हा दिसणारी कोलोरॅडो नदी, तिच्यावर बांधलेलं Glenn Canyon धरण, आणि त्यातून तयार झालेला Lake Powell असा सगळा तो परिसर, raw Nature. सगळी मोकळी जागा होती त्या परिसरात फिरायला, एक जागा वगळता कुठेही कठडे नव्हते, नदी प्रचंड खोल होती पण तरी सुरक्षित राहून बहुतांशी जागांवर जाता येत होतं. अपेक्षेपेक्षा जास्त वेळ इथेच थांबलो, सगळ्या जागांवरून दिसणारं दृश्य बघितलं, ती जागा मनात भरून घेतली, फोटो काढले. हॉटेल लोकेशन चांगलं निवडलं याचा आनंद वाटला.

1

2

3

4

22

मग निघालो काही गुहा बघायला, जागेच नाव होतं Page shores amphitheatre.
गाडी पार्क केली, ही प्रमुख पर्यटन जागांमध्ये येत नाही, त्यामुळे गर्दी कमी असते. या caves कडे गेल्यावर तिथला अर्धा तास पुन्हा वेगळ्या जगात असल्या सारखं वाटत होतं, मंगळावर असल्यासारखं म्हणता येईल, लाल वाळूतून चालत जाऊन मग लाल तपकिरी डोंगर, त्यातल्या गुहा आणि ऊन सावलीचे चालणारे खेळ, त्यानुसार बदलणारे नजारे हा पूर्ण सुरेख अनुभव होता. इथेही निवांत बराच वेळ थांबलो. इथून पुढे चालत जाऊन एक walkway आहे आणि तिथे एक Amphitheater आहे, पण आता भुक लागली होती. या जागेवर येऊन शांत वाटलं होतं, समाधान वाटलं होतं त्यामुळे पुढे न जाता, इथूनच परत जाऊन जेवायला जागा शोधू म्हणून निघालो.

23

एक सुपरमार्केट आणि तिथेच जवळ बरीच खाण्याची ठिकाणं अशी जागा दिसली. तिथे जाताना Page गावात चक्कर झाली. खास पर्यटनासाठी वसलेलं हे गाव, तिथली शाळा, लायब्ररी हेही या रस्त्यात दिसलं. मग ठरल्या ठिकाणी पोचल्यावर काय पर्याय आहेत आणि काय खायचं यावर चर्चा होऊन Domino's मध्ये शिरलो. तिथे नेमकं ऑर्डर मध्ये गोंधळ झाला, एक भारतीय माणूस ऑर्डर देऊन कुठेतरी बाहेर जाऊन थांबला, हे आम्हाला माहितच नाही, त्याची आणि आमची ऑर्डर सारखीच होती, पदार्थांच नाव ऐकून आम्ही गेलो, मग नंतर लक्षात आल्या गोष्टी. Sad या सगळ्यात आमच्या एका ऑर्डरला खूप वेळ गेला, शेवटी Pizza Pasta चांगला मिळाला. तिथेच Safeway नावाने स्टोअर होतं, तिथून काही फळं घेतली आणि पुढे निघालो जवळच असलेल्या Antelope Point Marina या ठिकाणी -

इथे जाताना टोल होता, सात दिवसांसाठी ३० डॉलर. आम्ही तिथली बोट टूर अजून बुक केलेली नव्हती, त्यामुळे टोल देऊन उपयोग होईल का, की परत फिरावं असा विचार मनात आला, पण त्यावरच पुढे अजून एका viewpoint पर्यंत जाता येईल हेही त्या बाईने सांगितलं. मग सरळ टोल भरून पुढे गेलो, गाडी पार्क केली.

इथे खाली बोटींकडे जायचा रस्ता बंद होता, रिक्षा सदृश वाहने होती, त्याने खाली जायचं होतं. आधी वरच्या दुकानात चौकशी केली, तिथे नीट अशी उत्तरं मिळाली नाही. मग त्या रिक्षाने खाली गेलो, त्या रिक्षांचा रस्ता हा अतिशय युनिक, भन्नाट, कायम लक्षात राहील असा होता, त्याचा व्हिडिओ पुढच्या एका भागात येईलच.

तर खाली पोचलो, तिथे एक रेस्टॉरंट दिसलं, बोट टूर बद्दल विचारायला गेलो तिथे sold out होते सगळे असं कळलं. हे ऐकून सृजन खूपच नाराज झाला. "हे असंच असतं, असं का असतं" अशी सुरुवात होऊन एकदम त्याला रडायला यायला लागलं. इथे येण्यापूर्वी आमचा काही नक्की प्लॅन नव्हता तसा, तरीही ते पाहिल्यावर आणि आमच्या समोर इतर लोक जाताना दिसले तेव्हा त्याला जाण्याची खूप इच्छा झाली असावी. एरवी हट्ट केला, तर आई बाबा जरा कडक भूमिकेत येतात आणि नाकारू शकतात. पण आज वाईट वाटून, रडून, अतिशय शांतपणे रुसून बसला, तेव्हा मात्र आम्हाला पण वाईट वाटलं. त्याला मनापासून जावं वाटत होतं. मग एवढ्या लांब आलोच आहे तर जाऊन येऊ असं वाटलं. परवा सकाळी वेळ आहे तेव्हा लवकर टूर असेल तर बुक करू असं ठरवलं.

6

इथे प्रत्येक ठिकाणी काम करणाऱ्या या लोकांचा तोंडवळा इतका सारखा कसा आहे, एकाच घरातले आहेत की काय असं वाटत होतं. हे सगळे नेटीव अमेरिकन, आपल्याला अमेरिकन म्हणून जे चित्र डोळ्यासमोर येतं त्यापेक्षा हे वेगळे. Navajo जमातीतले हे लोक, हा पूर्ण भाग Navajo Nation म्हणूनच ओळखला जातो. हे सगळे काळे सावळे, जाड अंगकाठी आणि थोडे एशियन वाटतील असे. (वापरलेले हे शब्द केवळ वैशिष्ट्य म्हणून दिले आहेत, कोणत्याही रंगाचा/शरीर यष्टीचा अपमान करण्याचा यात हेतू नाही.) बहुतांशी काम करणाऱ्या बायका होत्या सगळीकडे हेही जाणवलं, टोल नाक्यापासून तर सगळीकडेच. या पूर्ण भागात हे पुढचे दोन दिवस पण जाणवत राहिलं.

आता आलो आहे तर काहीतरी खायला घेऊ असा विचार केला, आइस्क्रीम घेऊ ठरवलं तर ते नव्हतं, अजून चार प्रकार विचारले तेही नव्हते. इथे सगळ्या लोकांच्या कामात एक प्रकारची उदासीनता वाटत होती हे मात्र जाणवलं. नीट सर्व्हिस वगैरे तर त्यांच्या गावीच नव्हती असं वाटत होतं. मग नाईलाजाने एक कॉफी आणि एक चॉकलेट ब्राऊनी घेतली. इथून दिसणारा Lake Powell पण छान होता. पाण्यात मोजून दोन बदकं दिसत होती. बऱ्याच बोटी उभ्या होत्या. कॉफी घेत थोडा वेळ इथे या तळ्याकाठी शांत बसून राहिलो. हळूहळू सृजनचा मूड पण सुधारला. एक दिवसानंतरच्या बोट टूर चे बुकिंग पण केलं.

आता याच Lake Powell च्या अजून एका पॉईंट पर्यंत जायचं होतं. त्याचं नाव होतं Wahweap Point. दहा मिनिटात इथे पोचलो, हा रस्ता पण छान होता. गाडी पार्किंग साठी जागा होती, खाली दूरवर तलाव दिसत होता. वर दोन तीन बाक होते बसायला, अगदी २-४ लोक थोडे खाली गेलेले दिसत होते. बाकी प्रचंड शांतता, वाऱ्याचा आवाज, मधूनच एखाद्या बोटीचा येणारा आवाज, एखादा पक्षी दिसला तर, दूरवर दिसणारे डोंगर, त्यांचे ते अद्भुत रंग आणि पाणी. इतक्या जवळून असा निसर्ग आणि असे क्षण अनुभवता येतात तेव्हा खोलवर पोचतं सगळं.

एकीकडे सृजन प्रश्न विचारत होता, हे इकडे बघ, तिकडे बघ असं दाखवत होता. त्याला कुतूहल वाटत असतं, त्यातून असे अनेक प्रश्न येतात, ज्याची उत्तरं द्यायला हवीत, पण सगळे इतके सोपे प्रश्न नसतात, बराच वेळ हे केल्यावर आता मला पाच मिनिट इथे न बोलता बसायचं आहे असं त्याला सांगितलं.

आणि त्याला तिथे एक दगड सापडला ज्याने लिहिता येत होतं, म्हणून त्याने मग आमची नावं तिथे लिहिली. इथे आइसलँड मधल्या एका जागेची मला आठवण आली, तिथेही असाच सुकून वाटला होता.

7

8

9

10

19

इथे काही मराठी मुला मुलींचा ग्रुप भेटला, त्यांच्याशी थोड्या गप्पा झाल्या. अजून काही लोक येत होते, पुढे जात होते. आम्ही मात्र बराच वेळ इथेच बसून होतो. तासाभराने मग पुढे निघालो Horseshoe bend कडे जाण्यासाठी. इथल्या अगदी प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक. काही वेळा असे पॉईंट्स खूप हाइप केलेले असतील का, अशी शंका येते. पण तरीही प्रत्यक्ष जाऊन बघायचं होतं. इथून सूर्यास्त छान दिसतो त्यामुळे जमलं तर तीच वेळ साधू असं वाटत होतं. ठरल्या वेळी तिथे पोचलो. ही सगळी ठिकाणं एकमेकांपासून १०-२० मैलाच्या आतली होती. त्यामुळे प्रवास कमी होता.

पार्किंग करून पुढे बरंच चालत जावं लागतं आणि मग वळसा घालून १८० कोनात वळलेली ती नदी दिसते. हे खरोखर बघण्यासारखं आहे याची तिथे पोचल्यावर खात्री पटते.

मुख्य पॉईंट जवळ फेन्सिंग आहे, तिथून खाली एक घर आणि एक दिवा दिसत होता, सृजनला तिथे कोणी राहत असेल का हा प्रश्न पडला होता. Kara and Nate नावाचे युट्यूबर आहेत, त्यांनी या अश्या कोणत्या तरी ठिकाणी Camping केलं होतं ते आठवलं. आता त्या कड्यावरुन पुढे चालत निघालो. त्या लाल कड्यावरून चालत प्रत्येक ठिकाणाहून खालची नदी वेगळी दिसत होती. अभ्यासकांच्या मते काही लक्ष वर्षांपूर्वी झालेल्या भूगर्भाच्या हालचालींमधून ही नदी आणि कडे यातली उंची बदलत गेली. या नदीच्या प्रवाहासोबत वळणावळांवर अद्भुत जागा तयार होत गेल्या. अजून भविष्यात यातही काही बदल होऊ शकतील. एक मुख्य पॉईंट सोडला तर बाकी फेन्सिंग नाही, मोकळं आहे सगळं. भीती वाटू शकते, इथून नदी साधारण १००० फूट खोल आहे. बहुतांशी लोक तसे जबाबदारीने वागत होते. त्यातल्या त्यात सेफ जागा शोधून, पण थरारक असे फोटो काढत होते. काही जण ट्रायपॉड घेऊन होते. आम्ही पण मोजके फोटो काढले. सूर्यास्ताची वेळ झाली तेव्हा एक जागा शोधून बसलो. थोड्या वेळापूर्वी खूप शांतता अनुभवली होती, इथे गर्दी होती, थोडे आवाज होते पण त्याचा त्रास होत नव्हता, ते दृश्य अप्रतिम होतं. सूर्य मावळत होता, आकाशातले रंग बदलत गेले.

11

12

13

15

14

परत येऊन हॉटेल मध्ये बाहेर एक छान फायर प्लेस होती, तिथे बसून सगळे फोटो बघत बसलो. आज पाहिलेल्या चारही जागा एकाहून एक सरस होत्या. हा पूर्ण दिवस ट्रिप मधला उच्चांक ठरला होता. स्वाभाविक पणे अतीव समाधानाने झोपलो. उद्या पुन्हा लवकर उठायचं होतं, antelope canyon साठी pre booking केलेलं होतं आणि त्यासाठी आठ वाजता निघायचं होतं.

क्रमशः

मधुरा देशपांडे शेंबेकर

१४-०५-२०२५

Keywords: 

अमेरिकेची सफर - भाग ९ - Antelope Canyon & Monument Valley

सकाळी ब्रेकफास्ट करायला गेले, तेव्हा एका अमेरिकन माणसाने गप्पा मारायला सुरुवात केली. Where are you from? या प्रश्नाचं उत्तर बरीच वर्ष बाहेरच्या देशात राहिल्यानंतर एका शब्दात देता येत नाही. मूळ भारतातून पण आत्ता जर्मनीहून आलो असं मी सांगितलं. जर्मनीत बऱ्याच ठिकाणी अमेरिकन आर्मी कॅम्प आहेत, तिथे तो दोन वर्ष होता, त्यामुळे त्या गप्पा झाल्या. रोज ब्रेकफास्ट मध्ये तेच ते प्रकार खाऊन कंटाळा आला होता, त्यामुळे थोडं खाऊन लगेच निघालो आणि १० मिनिटात ठरलेल्या ठिकाणी पोचलो. Antelope canyon - या जागेबद्दल फार उत्सुकता होती. भरपूर पैसे भरून टूर बुक केली होती. पार्किंग करून चेक इन काउंटर वर गेलो, चेक इन करून जिथून टूर सुरू होतात तिथे गेलो. अजून आधीच्या ग्रुपचे लोक जात होते. आमची वेळ झाली, नावाप्रमाणे एकीने बोलावलं, एका टाईम स्लॉट मध्ये साधारण ६० लोक होते, त्यांचे १२-१५ लोकांचे ग्रुप करून ते एकेका गाईड सोबत मग पुढे जाणार होते. आम्ही ग्रुप मध्ये १३ जण होतो, गाईडने स्वतःची ओळख करून दिली, काही नियम सांगितले, मुख्य म्हणजे इथे व्हिडीओ काढायला परवानगी नाही, खाली अरुंद खिंडीतून जायचं असल्यामुळे बॅग, पर्स यालाही परवानगी नाही याबद्दल सांगितलं. एकेक ग्रुप निघाला, तो पुढे गेला की पुढचा असे आम्हीही निघालो. पाच मिनिट चालत आलो lower antelope canyon सुरू होतात तिथे. इथेच खाली असं काही आहे हे लक्षातही येत नव्हतं, समोर नुसते ते केशरी लाल रंगाचं पठार आहे असं वाटत होतं. त्या घळीत उतरून दुसऱ्या टोकाने आम्ही बाहेर येणार होतो. पायऱ्या बांधलेल्या होत्या, त्यावरून खाली उतरून निघालो आणि एका वेगळ्या दुनियेत प्रवेश केला. पुढचा एक तास आम्ही केशरी रंगाच्या कपारीतून चालत होतो, काही अरुंद रस्ते, मधूनच जरा मोकळी जागा आणि वळसे घालत गेलेल्या दगडांमधून तयार झालेले विविध आकार, त्यातून दिसणारा आकाशाचा तुकडा हे सगळं बघताना बाकी सगळ्याचा विसर पडला होता. अद्भुत या शब्दाचा वापर इथे केला तर त्यात काही अतिशयोक्ती ठरणार नाही.

गाईडनेच फोन वर कोणत्या सेटिंग मध्ये चांगले फोटो येतील हे सांगितलं. ठराविक अंतरावर ती स्वतः प्रत्येकाचे Photo काढून देत होती.

गाईड छान गप्पिष्ठ होती. Navajo जमातीतले हे सगळे लोक, या वाळवंटी भागात अत्यंत धैर्याने राहणारे. शेती, पशुपालन हे मुख्य उद्योग. हा पूर्ण भाग, इथली पर्यटन स्थळं सगळं Navajo Nation मध्ये येतं. अमेरिकेचा भाग असला तरी या लोकांची स्वतःची सगळी सिस्टीम आहे. त्यांचा प्रेसिडेंट आहे, त्याचे पोलिस आहेत, या कॅन्यन काही कंपनीच्या मालकीच्या आहेत. Lower and upper अश्या दोन Canyon प्रसिद्ध आहेत. वर्षानुवर्षांच्या फ्लॅश फ्लड, वारा यातून हे कॅन्यन तयार झाले आहेत. Upper Canyon मध्ये सूर्यप्रकाश, काही ठराविक जागी येणारी तिरीप हे जास्त प्रसिद्ध आहे, त्यामुळे त्यांच्या टूर जास्त महाग आहेत आणि ३-४ महिने आधीच बुक होतात. Lower antelope साठी दोन टूर ऑपरेटर आहेत, जे भावा बहिणींचे आहेत आणि कौटुंबिक वादातून ते वेगळे झाले आहेत. आम्ही त्यातली Ken's Tour book केली होती. गाईड लोकांमध्ये पण वादविवाद सुरू असतात, कोण किती वेळ घेतं आहे, लोकांना कसं हॅण्डल करतात, उशीर करतात अशा गोष्टींवरून खटके उडत असतात हेही ती सांगत होती. तिचे आजोबा कसे घरगुती उपायच उत्तम असं म्हणून डॉक्टर कडे जायचे नाहीत, त्यांच्यासाठी हे सगळं आधुनिक युग वेगळं आहे, तिच्या लहानपणी सुद्धा तिथे कुठेही वीज पाणी यांची सोय नव्हती हेही तिने सांगितलं. इथला वारा बाधतो असं म्हणे त्यांचे पूर्वज सांगतात, त्यामुळे इथून घरी गेल्यावर माझी आई काही पदार्थ जाळून ते माझ्या भोवती फिरवते असं ती म्हणाली तेव्हा गंमत वाटली. तिने जे वर्णन केलं ते आपण दृष्ट काढतो तसंच काही वाटलं, पुन्हा एकदा जगभर काही गोष्टी कशा सारख्या असतात असं जाणवलं.

तासाभराने बाहेर आलो. बराच वेळ जमिनीच्या खाली आणि ते वळणदार रस्ते, डोळ्यांना दिसणारे वेगळे रंग यामुळे त्रास असा झाला नाही तरी जरा डोकं दुखायला लागलं. पण त्याच वेळी हे काही संपूच नये असं पण वाटत होतं. मी अजूनही त्या जागेवर पुन्हा जाऊ शकते इतकी त्याची भुरळ पडली आहे.

1

2

3

4

परत आल्यावर आधी काहीतरी खायला घेऊ आणि मग पुढे monument valley कडे जाऊ असं ठरवून निघालो. एक इटालियन ठिकाण होतं, स्नॅक्स होते तिथे, दिसायला छान दिसत होते म्हणून जे काही घेतलं ते पुन्हा अती गोड होतं. आमच्यासोबत असलेला थोडा खाऊ खाल्ला, फळं घेतली आणि Monument Valley कडे जायला.

5

6

7

Arizona मधून Utah मध्ये प्रवेश केला, घड्याळ एक तास पुढे गेलं. दोन्ही राज्यांच्या बॉर्डर वर ही व्हॅली आहे. हा सगळाच परिसर म्हणजे नैसर्गिक आश्चर्यांनी भरलेला आहे. विराण जमीन आणि मधूनच एखादा उंच खडक असं दिसायला लागलं. Monument Valley मध्ये पैसे भरून आत गेलो. नजर पोचेल तिथवर एकतर जमीन नाहीतर एकदम उंच सुळके असं ते चित्र होतं. पुन्हा पुन्हा नेमकं काय वर्णन करणार, शांतता आणि निसर्गाशी कनेक्ट करता येईल असं ते वातावरण होतं. काही सिनेमांच शूटिंग झालं आहे, त्याबद्दल माहितीचे फलक होते.

8

इथे Offroad ड्रायव्हिंग करत आतल्या सगळ्या पॉइंट्स पर्यंत एक राऊंड ट्रिप करता येते. यासाठी त्यांची टूर घेता येते किंवा SUV गाडी असेल तर आपणही जाऊ शकतो. आमची कॉम्पॅक्ट SUV होती; सुमेधच्या ड्रायव्हिंग वर पूर्ण विश्वास ठेवून निघालो. हा रस्ता खराब पेक्षाही खराब होता, थोडं थ्रिलिंग वाटत होतं, थोडा वैताग आणि भीती सुद्धा. गाडी बंद पडली तर काय अशी शंका होती. ठरलेल्या धुळमय रस्त्याने जाऊन काही पॉईंट्स पाहिले आणि मग अर्ध्या रस्त्यातून परत आलो. परत येताना एकाने हात दाखवून गाडी थांबवली, ते दोघं त्यांच्या गाडीत होते आणि आम्हाला का थांबवलं कळेना. प्रश्न आला की तुम्ही West Virginia मधून आले का? आम्ही प्रश्नार्थक चेहऱ्यानेच नाही असं सांगितलं, त्यावर तुमच्या गाडीवर दिसलं मी पण तिथला असं तो म्हणाला आणि मग एन्जॉय म्हणून पुढे गेला. ते दोघं लग्नाचा ड्रेस घालून होते आणि खास वेडिंग फोटो साठी आले होते. अगदी सुरुवातीच्या काळात पुण्यात MH २८ गाडी दिसली तर अप्रूप वाटायचं, पण तरी असं जाऊन थांबवून कुणी विचारलं नाही. आणि आता तर त्यात काही वेगळं वाटणार नाही. हा गमतीशीर प्रसंग लक्षात राहील.

9

10

परत येऊन कोल्ड कॉफी घेतली, तिथल्या दुकानात विंडो शॉपिंग केली. इथेही सुरेख वस्तू होत्या पण बॅग मधली जागा, किंमत या सगळ्याचा विचार करता काही खरेदी केली नाही.

11

इथून थोडं पुढे गेल्यावर एक ठिकाण आहे जिथे फॉरेस्ट gump या सिनेमाचं चित्रीकरण झालं आहे. तिथे पोचलो तेव्हा रस्त्याच्या मध्ये येऊन फोटो काढण्याची स्पर्धा असावी असं वाटत होतं. गाड्या आल्या की लोक बाजूला जायचे, पुन्हा जाऊन फोटो काढायचे. हे सगळं अमेरिकेत घडत होतं हे विशेष होतं. आम्ही रस्त्याचे फोटो काढले, त्यात लोक येऊ नये म्हणून जास्त वेळ गेला. मग सृजनला म्हणाले की एक तुला फोटो काढायचा आहे का, लक्ष देऊन गाड्या बघत पटकन एक फोटो काढला आणि लगेच परतीच्या रस्त्याला लागलो.

screenshot_20250526-143008.png

12

13

आता अंधार पडला होता, त्यामुळे प्रवासचा जरा कंटाळा आला होता. सरळसोट रस्ते, कुठेही मानवी वस्ती नाही, गावं नाही. याही रस्त्यात रेंज नीट मिळत नव्हती. त्यामुळे गाणी पण ऐकता येत नव्हती. आम्ही दोन वेगळ्या कंपनीचे सिम कार्ड घेतले होते, अधून मधून जशी रेंज मिळेल तेवढा वेळ काहीतरी ऐकत होतो. आता थकवा पण आला होता. शेवटच्या अर्ध्या तासात कधी एकदा हॉटेल वर पोचतो असं झालं होतं. शेवटी पोचलो, आराम केला. कपडे धुवून घेतले, बॅग भरल्या आणि झोपलो. बोट टूर साठी सृजन excited होता आणि Bryce Canyon साठी आम्ही..

14

क्रमशः

मधुरा देशपांडे -
१५-०५-२०२५

Keywords: 

अमेरिकेची सफर - भाग १० - Bryce National Park

पुन्हा एकदा चेक आऊट करून निघालो. आजही कुणी एक शब्दाने how was your stay? Was everything alright? वगैरे काहीही विचारलं नाही. एकीकडे टॉयलेट मध्ये small टॉक करणारे अमेरिकन भेटले Mosking आणि एकीकडे हे असे व्यवसायाचा भाग म्हणून सुद्धा काही इच्छा नसणारे वाटले.

ठरल्या प्रमाणे बोट राईड साठी गेलो. पुन्हा त्या रिक्षाने खाली गेलो, खाली पोचल्यावर पुन्हा चेक इन करून बोटीची वाट बघत बसलो. बोट निघाली, ठरलेले सेफ्टी measures सांगितले गेले. मला ते सगळं सांगतात तेव्हा हमखास भीती वाटते, काही झालं तर काय अशी शंका मनात येते. पण मग ते बाजूला ठेवून मी पुन्हा वर्तमानात रमते.

आमच्या शेजारी ज्या दोघी जणी बसल्या होत्या त्यांच्या बोलण्यावरून त्या नेदरलँड्स मधल्या असाव्यात असा आम्ही अंदाज लावला. जर्मन आणि डच भाषेत जे साम्य आहे त्यावरून हे वाटलं. मग गाईडने सगळ्यांनाच तुम्ही कुठून आलात विचारलं. बहुतांशी लोक युरोपातले होते, नेदरलँड, पोलंड, हंगेरी असे, एकच जण अमेरिकेतल्या दुसऱ्या राज्यातून आलेले, त्यावर मग हास्यविनोद झाले. जर्मनीतले आम्हीच होतो, भारतीय पण आम्हीच होतो. शेजारच्या बाईंबाबतचा अंदाज बरोबर होता. तिच्याशी बोलणं झालं तेव्हा मग ती जर्मन मधून बोलायला लागली. नेदरलँड्स मधल्या बऱ्याच लोकांना जर्मन भाषा येते, विशेषतः जर्मनीच्या जवळच्या भागातल्यांना. तुम्ही कुठे फिरतात, अजून कुठे जाणार यावर देवाणघेवाण झाली. गाईड जे काही सांगत होता त्याच्या कडे पण लक्ष होतं.
तिथे एक मोठी हाऊस बोट उभी होती, ती काहीशे हजार डॉलर मध्ये रेंट वर घेऊन तुम्ही जाऊ शकता, पलीकडे एक डोंगर आहे तिकडे लोक खास लग्नासाठी येतात अशा काही first world stories ऐकल्या. कोलोरॅडो नदी, या कॅन्यन, इथला इतिहास याबद्दल पण तो बोलत होता. इथे पाण्यात पेट्रोल पंप उर्फ गॅस स्टेशन होते, जे पहिल्यांदा पाहिलं.

बोटीत बसून आम्ही बाहेरचे डोंगर बघत होतो. अनेक लोक kayaking करत होते. अगदी लहान मुलांना घेऊन पण होते. या अश्या साहसी लोकांचं मला फार कौतुक वाटतं. त्या पात्रात या रंगीत kayak आणि त्यांचे लयीत हलणारे हात हे बघायला एकदम छान वाटत होतं. बोट मग एका Canyon मध्ये शिरली, थोड्या वेळाने परत फिरून आलो, राईड संपली. दोन दिवस आधी इथे आलो होतो तेव्हा हे काही नक्की नव्हतं, पण बरं झालं आलो असं तेव्हा वाटलं.

1

2

3

आता पुढे निघायचं होतं Bryce National Park कडे. Page या गावाला बाय केलं. Page will be a happy and beautiful Page in our lives and may be we will come back here again असं त्याक्षणी वाटत होतं.

4

5

6

Bryce National Park कडे जाताना Zion national पार्क पण जवळच आहे. आम्ही ठरवून तिथे जाण्याचा प्लॅन केला नव्हता, कारण तिथे जो निसर्ग आहे त्या पद्धतीचा आम्ही जर्मनीत जवळपास बघितला आहे. तिथे नक्कीच काही वेगळ्या गोष्टी बघायला मिळाल्या असत्या, पण हातातला वेळ बघता आम्ही सरळ Bryce कडे जायचं ठरवलं होतं. या रस्त्यात आता जरा पाण्याचे ओढे दिसायला लागले, एक गाव लागलं तिथे तर दोन झाडं फुलांनी पूर्ण बहरलेली दिसली, दोनच Wink पण जरा हिरवळ वाढली, काही शेती पण दिसली. आणि खास Bryce ची ओळख असणारे लाल रंगाचे hoodoo (हा शब्दच मला पहिल्यांदा कळला, फोटोत बघून समजेल) दिसायला लागले.

7

8

9

10

11

12

13

Bryce National Park मध्ये पोचलो आणि रिम पर्यंत गेलो तेव्हा हे काय आहे समोर ते बघून mesmerizing वाटलं. याची माहिती शोधताना जे काही फोटो बघितले होते, त्यावरून माझ्या मनात जर्रा शंका होती, की हे नेमकं कसं असेल? सारखे ते लाल रंग, नॅशनल पार्क याचा कुठे या स्टेज पर्यंत आपल्याला कंटाळा येईल का? पण या सगळ्या शंका खोट्या ठरल्या याचा मला आनंद झाला. ते सगळं बघता क्षणी weirdly beautiful ही माझी पहिली reaction होती. रंग तेच असले तरी फॉर्मेशन वेगळं होतं, अचंबित करणारं होतं. Antelope canyon was more रेखीव whereas here it was all ओबडधोबड, yet it had a common similar structures which in turn was magical. इथे येई पर्यंतच्या रस्त्यात या प्रकारचे फॉर्मेशन दिसले थोडे तरी ते फक्त सिनेमाच्या पोस्टर सारखे होते, आणि हा खराखुरा भव्यदिव्य सिनेमा होता. इथे बरेच हायकिंग रूट पण आहेत, पण माझा जरा पाय दुखत होता आणि आमच्या हातात फार वेळ सुद्धा नव्हता. मग सुमेध आणि सृजन दोघं एका ट्रेल वरून चालत गेले, त्यातला काही भाग बंद होता त्यामुळे त्यांना अजून वेळ लागणार होता, मग ते अर्ध्या अंतरावरुन परत आले.

14

15

16

17

हे दोघं ट्रेलवर गेले तेव्हा मी बसून होते. दोन अमेरिकन कुटुंब, खरंतर दोन बायका यांच्यातलं संभाषण ऐकत होते. एकतर हे लोक अतीव लाडात येऊन बोलतात, एकीचं सारखं पन्नाशीच्या पुढच्या तिच्या नवऱ्याला बेबी बेबी करत फोटो काढणं सुरू होतं. नवऱ्याला बेबी म्हणणं याचं मला हसूच येतं *haahaa2*, हल्ली बऱ्याच मराठी लोकांचं पण ऐकलं आहे म्हणा हे. ते लोक कुठून आलेत यावर त्यांच्या गप्पा सुरू होत्या. पण जवळच्या बऱ्याच पर्यटनाच्या जागा त्यांना अजिबात माहिती नव्हत्या. मग सुमेध आणि सृजन परत आल्यावर जरा गॉसिप करायला विषय मिळाला Wink

आता गाडीनेच या पार्क मधल्या अजून काही पॉईंट्स पर्यंत गेलो, पण मुख्य ठिकाणी जेवढं आवडलं तेवढे हे बाकीचे वेगळे वाटले नाहीत. Grand canyon मध्ये सगळेच छान होते, इथे बाकीचे ओकेच होते.

आता इथून निघालो मुक्कामी, दुसऱ्या दिवशी पुन्हा Vegas मध्ये जायचं म्हणून त्या रस्त्यावर असलेल्या Cedar City मध्ये हॉटेल बुक केलं होतं. जाताना Pizza Hut मधून खायला घेऊ असं ठरवलं, तिथे एवढा अंधार दिसला, बाहेरूनच इतकं विचित्र वाटलं की आत जायला नको वाटलं. त्यापेक्षा हॉटेलवर मागवू असं ठरवून हॉटेल वर गेलो. हे हॉटेल फारच बोर होतं, एकच रात्र होती म्हणा इथे, उद्या Vegas कडे परतीचा प्रवास होता.
Pizza मागवून खाल्ला आणि उद्या on the way काय बघता येईल हे शोधत झोपलो. त्याबद्दल पुढच्या भागात...

क्रमशः

मधुरा देशपांडे - शेंबेकर
१६-०५-२५

अमेरिकेची सफर - भाग ११ - Cedar City to Las Vegas

सकाळी उशिरा उठलो, त्यामुळे हॉटेल मध्ये ब्रेकफास्टची वेळ संपली होती. तसंही पुन्हा तेच ब्रेड अंडी खाण्याची इच्छा नव्हती. मग इथे जवळपास काय आहे शोधलं. एक फ्रेंच बेकरी दिसली, तिथे जाऊ असं ठरवलं. पहिल्या ठिकाणी गेलो तर ते बंद होतं, जवळच त्यांची दुसरी शाखा होती असं दिसलं. तिथे आत गेलो तर कुणीच नव्हतं, म्हणजे लोकही नव्हते आणि काउंटर पलीकडे पण कुणीच नव्हतं. दोन मिनिट वाट पाहिली, कुणीच आलं नाही मग आम्हीच बाहेर पडलो.

एक योगा कॅफे अशी जागा दिसली. तिथे जरा पहिल्यांदा भाज्या, Humus वगैरे घालून ब्रेड खायला मिळाला आणि चक्क प्लास्टिक ऐवजी सिरॅमिक प्लेट होत्या. सतत त्या प्लास्टिक प्लेट वरून एवढा Upgrade म्हणजे विशेष वाटत होतं. मी विमानात एक Yoga बद्दल डॉक्युमेंटरी पाहिली होती, मूळ योग आणि त्याचं आता झालेलं glorified रूप, त्यातून आलेले फॅशन ट्रेंड आणि महाग कपडे, त्याचं विशेषतः पाश्चात्य देशात बदलत चाललेलं स्वरूप, Yoga मूळ उद्देशापासून दूर जात आहे का याची वाटणारी काळजी अश्या बऱ्याच गोष्टींबद्दल चर्चा होती. हा कॅफे बघून त्याची आठवण आली. खाऊन मग निघालो Vegas कडे, पण मध्ये एक स्टॉप घ्यायचा ठरवला होता - Red Cliff national conservation Area. पुन्हा एकदा लाल रंगातले डोंगर आणि तिथे काही ट्रेल होते, आणि डायनासोर चे ठसे आहेत हेही दिसलं होतं.

इथे पार्किंग सिस्टीम वेगळीच होती. त्या बोर्डवर लिहिलेलं होतं पण समजत नव्हतं. एक App आहे, त्यावर गाडीच्या नंबर प्लेट आणि त्या पार्किंग जवळ एक ठिकाण आहे तिथल्या कागदावर हे सगळं लिहून ते गाडीमध्ये ठेवायचं अशी फार कॉम्प्लेक्स सिस्टिम वाटली. App वरून जमलं सगळं पण तो कागद कुठे मिळेल ते दिसत नव्हतं. आम्ही इकडे तिकडे बघून आलो, काही लोक दिसले मग त्यांना विचारलं. त्यातला एक जण म्हणे मी हे काही करत नाही, कुणी बघत नाही. आम्ही एरवीही हे करणार नाही, त्यात आम्ही रेंटल कार घेऊन गेलो होतो, त्यामुळे अशी रिस्क नको होती, शेवटी अजून एकाच्या मदतीने तो कागद शोधला, पैसे भरले आणि आता निःशंक मनाने पुढे जायला निघालो. बाकी तो आधीचा अमेरिकन माणूस भरपूर गप्पा मारत होता. तो IT मध्ये काम करतो आणि हैदराबाद मध्ये त्याचे collegue आहेत असं सांगत होता.

3

4

5

6

7

जागा छान होती, नकाशे होते, त्यावर सगळे रूट मार्क केलेले होते. पण हे काही गर्दी असणारं पर्यटन स्थळ नव्हतं. त्यामुळे परक्या भागात जरा धाकधुक वाटली. जरी लोकं भेटले तरी सगळे आपापल्या मार्गाने जात होते. खाली तिथे एक लहान घर होतं आणि बरेच लोक तिथल्या Backyard मध्ये गप्पा मारत बसले होते. कदाचित Airbnb सारखं काही असेल. पण त्यांच्यामुळे जरा माणसात असल्यासारखं वाटलं. थोडं वर चढत गेल्यावर ते ठसे दिसले. कुणी सांगितलं नसतं तर ते लक्षात पण आले नसते. तरी इतक्या वर्षांपूर्वीचा हे असं काही आहे, त्याचा लोकांनी अभ्यास केला आहे आणि ते सिनेमातून जे काही पाहिलं आहे ते इथे प्रत्यक्ष असेल हे सगळं तेव्हा डोक्यात आलं. सृजन आता डायनासोर फेज मधून बाहेर आला आहे, पण त्याबद्दल मागे एक लेख लिहिला होता, तेव्हाच्या सगळ्या आठवणी काढत अजून थोडं वर चढत गेलो. पण सगळा ट्रेल काही होणार नाही असं वाटलं.

8

9

10

11

12

13

उतरताना पुन्हा ते डायनासोर ठसे बघून आम्ही परत खाली आलो, तर दोन जर्मन मुली नकाशा बघून आपापसात बोलत होत्या. आम्ही दिसलो तर त्यांनी इंग्रजीतून आम्हाला ते डायनासोर ठसे कुठे आहेत विचारलं, आम्ही जर्मन मधून उत्तर दिल्यावर त्या मुलीला फारच आनंद झाला. जर्मनीत कुठे वगैरे चौकशी झाली. मग त्या ज्या रस्त्याने गेल्या होत्या तिथले फोटो तिने दाखवले आणि तुम्ही तिकडे जाऊ शकता असं सांगितलं. फारच गप्पा मारण्याच्या मूड मध्ये होती. त्यांना बाय करून मग आम्ही निघालो. ऊन तळपत होतं, आता त्याचा त्रास होत होता. तरी अजून थोडं थोडं म्हणत चालत गेलो. एक ओढा होता ज्यात आता काहीच पाणी नव्हतं तिथपर्यंत गेलो आणि मग परत निघालो.

तो मघाचा अमेरिकन माणूस पुन्हा भेटला. त्याला बाय केलं. पार्किंग जवळ पाण्याची हापशी होती, सावलीत काही बाक टाकलेले होते आणि बरेच जण आता तिथे बसले होते. परत गाडीपाशी आलो. काही तरुण मुलं आली, तिथे जाण्याच्या आधीच चांगलं आहे का, नेमकं कसं दिसतं, चांगला View आहे का, जाऊ का, कोणत्या बाजूने चांगलं असेल असे बरेच प्रश्न सुरू झाले. आम्ही थोडक्यात सांगितलं, पण एकीकडे 'आता इथपर्यंत आले आहात, तर बघा ना जाऊन, कदाचित तुमच्या अपेक्षेतला नसेल पण तरी वाईट नाही वाटणार ' असं मनात आलं. त्यांनी पण मग कुठून आलात वगैरे चौकशी झाली आणि बाय करून निघालो.

आता मात्र थेट Vegas मधले हॉटेल गाठू असं ठरवून निघालो.

1

2

तरी रस्त्यात एक तलाव दिसला तेव्हा मोह झाला जरा थांबायचा, पण इथे रस्त्याचं काम सुरू होतं आणि वेळ हाताशी नव्हता म्हणून थांबलो नाही, गाडीतूनच फोटो काढले.

14

आता Vegas कडे निघालो, हायवे सुरू झाला. आज बरेच दिवसांनी हायवे वर प्रवास होता, इतके दिवस ज्या भागात होतो तिथे एवढी रहदारी दिसली नव्हती, पण आता ती जाणवली.

मागच्या काही दिवसात लपंडाव खेळणारे फोन नेटवर्क आता नॉर्मल झाले. गाडीत त्यामुळे गाणी लावता आली. हायवे असला तरी घाटरस्ता सुरू झाला. दोन्ही बाजूंना उंच डोंगर होते, बाहेरचं प्रत्येक दृश्य अप्रतिम दिसत होतं. हा रस्ता इतका सिनीक असेल असं डोक्यात नव्हतं, त्यामुळे जास्त छान वाटलं. खास रेकमंड करण्यासारखा हा रस्ता आहे. या प्रवासादरम्यान Virgin River ही नदी दिसली. या नावाची Netflix series पाहिली होती, म्हणून ही नदी माहिती झाली. खरी नदी आणि सिरीज मधली गोष्ट / लोकेशन वेगळे आहेत, पण तरी या नदीबद्दल आपलेपणा वाटत होता Cool या रस्त्याने जाताना Sartaj truck नावाचा ट्रक दिसला. अनेक भारतीय, विशेषतः पंजाबी लोक ट्रक व्यावसायिक आहेत असं ऐकलं होतं, त्याचं उदाहरण समोर दिसलं. बाकी यावरून आठवलं, अमेरिकेतले आणि युरोपातले ट्रक पूर्ण वेगळे आहेत. युरोपात त्यांना नाक नाही आणि अमेरिकेत आहे Lol त्यामुळे दिसायला अमेरिकन ट्रक छान दिसतात Wink आणि हो अमेरिकेत हायवेच्या बाजूने मोठमोठ्या पाट्या / बोर्ड / मोठे advertising hording
दिसतात, भारतात आहेत तसेच. जे युरोपात मी क्वचित पाहिलं आहे. म्हणता म्हणता Arizona मधून परत Nevada राज्यात प्रवेश केला, कसिनो दिसायला लागले, Vegas नजरेच्या टप्प्यात आलं आणि हॉटेल पर्यंत पोचलो, चेक इन केलं आणि थोडा वेळ आराम केला.

16

17

18

19

20

आज जेवायला भारतीय रेस्टॉरंट मध्येच जायचं असं ठरवलं होतं, आपल्या चवीची फार आठवण येत होती. एक रेस्टॉरंट शोधून गेलो, खायला उत्तम मिळालं, त्यामुळे पोटोबा शांत झाले. इथे बाहेर एक जाईचा (किंवा जुईचा, नक्की मला समजलं नाही) वेल होता, जो मला तिथून भारतात घेऊन गेला. कशी गंमत असते, फुलांचं वेड असणाऱ्या मला जर्मनीत हजारो फुलं दिसतात, ती आवडतात पण ही भारतीय फुलं कधी दिसत नाहीत. त्याचा वास घेत मी तिथेच रेंगाळले. Vegas मधला, अमेरिकेतला उद्याचा शेवटचा दिवस होता, तेव्हा हूवर dam बघायचा होता, त्याबद्दल पुढच्या भागात.

क्रमशः

मधुरा देशपांडे - शेंबेकर

१९-०५-२०२५

अमेरिकेची सफर - भाग १२ - Hoover Dam आणि परतीचा प्रवास

तंत्रज्ञानाच्या दृष्टीने अत्यंत ऐतिहासिक आणि महत्त्वाचं मानलं जाणारं कोलोरॅडो नदीवर असलेलं हे धरण. सकाळी निवांत उठून निघालो. वेगास पासून अर्ध्या तासाच्या अंतरावर हे धरण आहे, तिथे पोचलो, आधी गाडीची सुरक्षा तपासणी झाली, जी नावालाच होती. पार्किंग मध्ये गेलो तेव्हा cash दिली तर चालेल हे पहिल्यांदा पाहिलं, नाहीतर सगळीकडे कार्डच होते. गाडी पार्क करून त्यांच्या visitor center कडे गेलो. त्यांचे काही टूर आहेत ज्यात पॉवर प्लॅन्ट आणि धरणाचा परिसर दाखवतात. दोन पैकी जी लगेच होती ती बुक करून आम्ही निघालो. आधी एक लहान पाच मिनिटांची फिल्म दाखवली गेली. मग पुढे लिफ्टने जाऊन धरण कसं बांधलं गेलं, काय अडचणी आल्या, त्यातून काय फायदे झाले वगैरे सांगितलं. ही टूर ठीकच होती, वाईट नाही पण खास पैसे भरून केली नाही तरी चालू शकेल. इथून पुढे एक पूल लागतो, खरंतर दोन पूल आहेत एक जरा पुढे आहे, या दोन्ही ठिकाणी टूर शिवाय जाता येतं, इथे काही प्रवेश शुल्क नाही. त्यावरून आपण पायी Arizona राज्यात प्रवेश करतो, अलीकडे Nevada आणि पलीकडे Arizona असं. धरणाची भिंत, तिथला अजून एक पूल हे सगळं प्रचंड मोठं आणि बघण्यासारखं आहे. Switzerland मध्ये एका ठिकाणी असंच धरण आहे, जे हूवर Dam सारखं आहे, तिथे गेलो होतो तेव्हा हूवर बद्दल माहिती शोधून वाचली होती, तो प्रत्यक्ष बघण्याचा योग आला. त्या काळात अत्याधुनिक यंत्रणा आणि हजारो लोकांचे अविरत कष्ट (वर्षातून फक्त दोन दिवस सुट्टी होती कामगारांना आणि ठरवलेल्या वेळेच्या २ वर्ष आधी काम पूर्ण केलं गेलं) याचं हे रूप.

1

2

3

4
5

हे सगळं बघून मग तिथल्या कॅफे मध्ये गेलो. इथेही पर्याय खूप नव्हतेच. खायला घेऊन बाहेर बसलो, तेव्हा आजूबाजूचे दोन तीन टेबल जर्मन लोकांनीच भरलेले होते. त्यातले काही नंतर निघाले, एक ग्रुप होता शेजारी, सुमेध सध्या ज्या ठिकाणी कामानिमित्त जातो, त्याच गावातला तो माणूस होता. त्यावरून मग त्यांच्याशी गप्पा झाल्या. भारतीय चेहरे आणि अचानक जर्मन बोलतात, तेव्हा समोरच्याच्या चेहऱ्यावर पहिल्यांदा जे काही भाव असतात, ते बघण्यात पण गंमत असते. एरवी इथे जर्मनीत त्यात काही विशेष वाटत नाही, पण बाहेरच्या देशात जाणवतं.

आता गाडी पण परत द्यायची होती म्हणून तिकडे गेलो. गाडी परत देऊन टॅक्सीने पुन्हा हॉटेल वर परत आलो. सृजनने स्विमिंग पूल मधली हौस भागवली. आम्ही पुन्हा बॅग भरून ठेवल्या. हे हॉटेल फारच छान होतं. या पूर्ण ट्रिप मधली गंमत म्हणजे, एकूण चार हॉटेल मध्ये राहिलो, त्यात दोन ठिकाणी आम्हाला फ्लोअर वरची पहिली रूम मिळाली आणि दोन ठिकाणी शेवटची, टोकाच्या फक्त.

ट्रिप आता संपत आली होती, ट्रिप संपण्याचं वाईट वाटत असलं तरी घरची आठवण पण येत होती. पहाटे चार वाजता टॅक्सी बुक करून ठेवली होती. त्यामुळे तसे भरपूर अलार्म लावून झोपलो. पण अलार्मच्या आधीच जाग आली, तयार होऊन बॅग पुन्हा एकदा चेक केल्या आणि खाली आलो. टॅक्सी आलीच होती. या टॅक्सीत मागे एक डिव्हाईस होता ज्यावर काही गेम होते. योग असे की त्यावर जर्मन भाषेबद्दल क्विझ सुरू होते. सृजनला मजा वाटली आणि ते खेळतच आम्ही विमानतळावर पोहोचलो.

विमानतळावर भरपूर गर्दी होती. सिक्युरिटी मध्ये आमची एक बॅग बराच वेळ आली नाही, पलीकडच्या बाजूला गेली होती. काहीच तसं कारण समजत नव्हतं, सगळ्या बॅग आम्ही सोबत ठेवल्या होत्या. असे बॅग अडकलेले बरेच जण होते, एकेक होत आमचा नंबर आला तेव्हा तो माणूस म्हणे की पुन्हा द्या, बहुतेक स्कॅन झाल्या नाही काही बॅग आमच्याकडून आणि मग बॅग काहीही प्रॉब्लेम न होता पुढे आली. हसावं की रडावं समजेना, उगाचच या गोंधळात अर्धा तास गेला होता.

लोक पहाटे पहाटे निघेपर्यंत पुन्हा विमानतळावर कॅसिनोवर नशीब आजमावून बघत होते. Rollingeyes गेट वर आलो, तिथे काहीतरी खायला बघू ठरवलं तर शाकाहारी पर्याय काहीच नाही, चिकन सँडविच वगैरे सुद्धा नाही. पहिल्या विमानात food inclusive नव्हतं, त्यामुळे आम्ही थोडा खाऊ सोबत ठेवला होता. तरी खाण्याचे इतके कमी पर्याय बघता, इतकी वर्ष Frankfurt Airport ला ठेवलेली नावं परत घेतली
Lol जर्मनीतल्या बेकरीत मिळणाऱ्या असंख्य पदार्थांची आठवण आली.

Vegas to Montreal विमानात मात्र गर्दी नव्हती. आम्ही तिघं तीन सीट वर बसलो होतो. विमान उडालं, अमेरिकेला बाय बाय केलं. बराच वेळ खालची कोलोरॅडो नदी आणि तिचे असंख्य कॅन्यन दिसत होते. कॉलोराडोच्या वळणांवर झालेला प्रवास अविस्मरणीय ठरला होता.

6

7

8

9

Montreal मधे उतरलो तेव्हा पुन्हा प्रचंड गर्दी होती. पण मग Frankfurt साठी वेगळ्या रस्त्याने जायचं होतं, तिथे पासपोर्ट आणि बोर्डिंग कार्ड चेक झाले आणि खायला शोधायला लागलो. खूप भूक लागली होती, खाऊन कॉफी घेऊन जरा बरं वाटलं. अजून सात तास प्रवास बाकी होता. Frankfurt कडे जाणारं विमान निघालं, आता एकही सीट रिकामी नव्हती. आम्हाला प्रचंड झोप येत होती, थोडा वेळ झोप, मग खाणं, मग झोप टाळायला स्क्रीन असं करत प्रवास झाला. आमच्या शेजारची मुलगी बहुधा भारतीय होती, पण तिने पूर्ण वेळ Sweatshirt Hoody घुंघट पेक्षा जास्त डोक्यावरून ओढलं होतं मला काही फरक पडणार नव्हता पण तरी गंमत वाटली.*mosking*

जर्मनीत उतरलो तेव्हा चेहऱ्यावर थकवा ओसंडून वाहत होता. येऊन पुढचे दोन दिवस भरपूर झोप काढली. ९ तासांचा फरक चांगलाच जाणवत होता. इस्टर सुट्ट्या संपल्या, सोमवार पासून पुन्हा शाळा, ऑफिस, डबे हे सगळं सुरू झालं आणि त्यात जमेल तसा वेळ काढून मी लिहायला सुरुवात केली.
तसा हा शेवटचा भाग, पण सगळ्याचा आढावा म्हणून अजून एक शेवटचा लेख येईल, त्यामुळे क्रमशः :)

मधुरा देशपांडे - शेंबेकर
२०-०५-२५

अमेरिकेची सफर - भाग १३ - अंतिम

खरंतर मुख्य ट्रिप बद्दल मागच्या भागात पूर्ण लिहून झालं, पण एक सगळ्याचा आढावा म्हणून एक शेवटचा भाग लिहावा वाटला म्हणून ही पोस्ट.

पूर्वतयारी मध्ये लिहिलं होतं तसं ही ट्रिप थोडी comfort zone बाहेरची वाटत होती. एवढा लांबचा प्रवास करून जातो आहोत, तर अपेक्षा पूर्ण होतील का? म्हणजे कश्याला एवढा प्रवास करून एवढ्या लांब जायचं? इथेच अजून नवीन ठिकाणी जाऊ किंवा फक्त एखाद्या रिसॉर्ट मध्ये जाऊ हेही आधी वाटलं होतं. पण season, सुट्ट्या, बजेट, आधीच्या ट्रिप कुठे आणि कधी झाल्या आहेत हे बघून मग, अशी एखादी मोठी ट्रिप ठरते आणि सुफळ संपूर्ण होते तेव्हा समाधान वाटतं.

नेमकं आपण पर्यटन का करतो हे अश्या मोठ्या ट्रिप नंतर माझ्या मनात येतं, आपला उद्देश काय होता, काय वाटलं याबद्दल एक चिंतन केलं जातं. ही ट्रिप तशी अचानक ठरवली. ठरवताना काय बघायचं, कुठे राहायचं, किती दिवस कुठे ठेवायचे, एखाद दोन दिवस काही हवामानामुळे कुठे जाता आलं नाही तर काय हे सगळं डोक्यात ठेवावं लागतं. मुळात अमेरिकेत कुठे हा प्रश्नही होता. पहिल्यांदा जात होतो तर एवढे रिमोट भाग बघायचे की शिस्तीत जरा पटेल स्पॉट फक्त करावे यावर बराच विचार केला. पूर्णपणे स्वतःचं स्वतः शोधून वेगळ्या देशातली ट्रिप प्लॅन करणं फार वेळखाऊ आणि पेशन्सचं काम असतं. सगळ्या पर्यटनाच्या जागा शोधताना त्या माहितीचा अतिरेक होऊ नये जेणेकरून नंतर मजा वाटणार नाही, आणि तरी बेसिक माहिती असावी, आपल्या आवडीची जुळणारी ठिकाणं आहेत का याचा अंदाज घ्यायचा. हॉटेलचे खर्च, खाण्याची सोय जवळपास आहे का हे सगळं बघावं लागतं. यावेळी तर प्लॅनिंग mostly सुमेध बघत होता. त्याचा एक फायदा असा झाला की मला सगळ्याचं जास्त अप्रूप, नावीन्य वाटत होतं. काही कंटाळवाण्या प्रवासात त्याचा त्रासही वाटला, काही अनपेक्षित ठिकाणी गेलो तेव्हा दुपटीने आनंद झाला.

आता या सगळ्याबद्दल नंतर लिहायला पुन्हा तेवढाच वेळ लागतो. प्रत्येक ठिकाणची माहिती, त्याला प्रत्यक्ष अनुभवांची जोड आणि सगळं लिखाण रोजचे उद्योग सांभाळून करणे, फोटो Sort करणे, ते अपलोड करणे अश्या प्रत्येक स्टेप मधून शेवटी लेख लिहून होतो.

काही वेळा का लिहिते मी सगळं हा प्रश्न पडतो. इंस्टाग्राम आणि रिलच्या काळात एवढं लिहायचं . काही नेहमीचे लोक सोडले तर अजूनही लिखाणाचा reach तेवढा नाही. तरीही मी लिहिते कारण मुळात लिहायला आवडतं आणि ते शेअर करायला आवडतं. आम्ही आवडीने फोटो, व्हिडिओ काढतो पण त्या त्या क्षणी मी त्या जागा पूर्ण अनुभवते. आठवण म्हणून, फोटोग्राफी ची माफक आवड म्हणून हे आम्ही करतो, पण एखाद्या ठिकाणाहून निघताना सृजन जेव्हा "मला इथे खूप आवडलं" म्हणतो ते माझ्यासाठी महत्त्वाचं असतं. त्याने जास्त बरं वाटतं. मला जेवढं व्यक्त व्हायला आवडतं, तेवढेच त्या त्या वेळी स्वतःसोबत, कुटुंबासोबत वेळ घालवायला आवडतो. त्यामुळे या सगळ्या भटकंतीत मुख्य उद्देश तो असतो, त्यानंतर मग लिखाण येतं. अर्थात काही फोटो खास नंतर लिहिताना संदर्भ म्हणून वापरता येईल असं डोक्यात ठेवून काढले जातात, हे नाकारता येणार नाही. तरीही शांत म्हणजे नेमकं काय हे शब्दातून सांगण्याएवढी मोठी लेखिका मी नाही. आम्ही एरवीही खरंतर तसं शांत ठिकाणीच राहतो, इथेही निसर्ग भरभरून भेटतो. पण प्रत्येक जागेची एक ताकद असते, Aura असतो आणि तो पर्यटनातून समजतो आणि शब्दात लिहिताना त्याला मर्यादा येतात. त्यामुळे काही वेळा लिखाणात तोचतोच पणा वाटू शकतो, काय ही एवढं सविस्तर लिहिते असंही वाटू शकतं. पण लिखाणावर, भाषेवर प्रेम आहे त्यामुळे शेवटी मी लिहीत राहते.

पहिल्यांदा अमेरिकेत गेलो तरी गेली १३ वर्ष भारताबाहेर असल्यामुळे, साहजिक दृष्टीकोन वेगळा होता. कदाचित पहिल्यांदा ज्या काही गोष्टींबद्दल wow वाटलं असतं, तेवढं झालं नाही. ठरवून केलं नाही तरी दोन ठिकाणांची, देशांची तुलना होत होती. आधी हे सगळे देश माझ्यासाठी फक्त पाश्चात्य देश होते, त्यातल्या प्रत्येकाची स्वतःची ओळख, वैशिष्ट्ये आता तिथल्या वास्तव्यात, भटकंतीत जवळून लक्षात येत आहेत.

अमेरिकन स्मॉल टॉक बद्दल ऐकलं होतं, मोकळेपणे बोलणारे लोक आहेत हे ऐकलं होतं. तसे काही जण भेटलेही.
युरोपात त्यामानाने सुरुवातीला हे लोक खूप रिझर्व्ह आहेत असं वाटू शकतं, पण आता इतक्या वर्षांनंतर सहज गप्पा मारणारे लोक इथेही भेटले आहेत. त्यामुळे फरक असला तरी आता त्यात खूप वेगळं वाटलं नाही, त्यातून आम्ही अमेरिकेत असलो तरी Navajo Nation मध्ये जास्त होतो, तोही फरक असावा.

तरीही मला उगाच गोडवे गायलाही जमत नाहीत आणि उगाचच टीकाही जमत नाही. तश्याच या ट्रिप मधल्या काही गोष्टी आवडल्या, काही नाही. त्यामुळेच गोडाचा अतिरेक, प्लास्टिक वापर, सर्व्हिस यासारख्या गोष्टी खटकल्या, स्पेशली सगळ्याच दृष्टीने मोठा आणि प्रगत देश या पार्श्वभूमीवर जास्त जाणवलं. त्याच वेळी नॅशनल पार्क मधल्या बऱ्याच सोयी, निसर्ग, मोठे रस्ते, Route 66 वरच्या वेगळ्या vibes आवडल्या. Mexican and Indian food विशेष आवडलं, बाकी भाज्यांची कमतरता वाटली. हॉटेल जागेच्या दृष्टीने मोठी होती, पण लहान सहान गोष्टी मिसिंग होत्या ज्या युरोप मध्ये अंगवळणी पडल्या आहेत. रेंटल कार मधलं वैविध्य विशेष वाटलं, तरी युरोपात सारख्या दिसणाऱ्या जर्मन गाड्या मिस पण केल्या. सगळीकडे क्रेडिट कार्ड ही सोय असली तरी जर्मन लोकांना ती उधळपट्टी का वाटू शकते हेही समजलं. खर्चाचा काही ताळमेळ राहणार नाही का असं वाटलं (हे जुनाट वाटू शकेल, जर्मनीत अजून एवढी डिजिटल क्रांती झालेली नाही आणि इथे काही बदल खरंच व्हायला हवेत पण तरी अमेरिकेत दुसर टोक वाटलं)

मुख्य जे बघण्याच्या उद्देशाने आलो त्याला पूर्ण न्याय मिळाला होता. Page, antelope canyon, grand canyon, Bryce and the list can go on for all the favorite places...अमेरिकेत अजून अश्या अनेक जागा आहेत ज्या बघण्याची इच्छा आहे. त्यामुळे भविष्यात पुन्हा नक्कीच अमेरिकेची सफर होईल. तेव्हा त्याबद्दल लिहिता येईल. कोलोरॅडोच्या वळणांवरचा हा प्रवास (तात्पुरता) समाप्त.

तोपर्यंत, सगळ्या वाचकांचे मनःपूर्वक आभार. तुम्ही हे लेख वाचत असाल, फोटो बघत असाल तर प्लीज एक लाईक तरी अवश्य द्या, म्हणजे पुढच्या लिखाणाला प्रोत्साहन मिळतं. धन्यवाद.
तळटीपा -

सगळे फोटो Google Pixel फोन वरून काढलेले आहेत. इथे टाकलेल्या फोटोंपैकी एक दोन वगळले तर काहीही प्रोसेसिंग केलेलं नाही, सगळी no filter photography आहे. चांगला मोठा कॅमेरा असेल, तर अजून नीट फोटो काढता येतील, पण सध्या ट्रिप मध्ये फोन सोयीचा वाटतो. आणि शेवटी कोणत्याही जागेला, तिथे प्रत्यक्ष जाण्याला फोटो न्याय देऊ शकत नाहीत.
या सगळ्यात आमचे तिघांचे फोटो कमी असतात, कारण ते प्रत्यक्षात पण कमीच असतात. आणि जे आहेत ते सगळे पब्लिक अकाउंट असल्यामुळे मी अजूनच कमी पोस्ट करते. मुख्य भर तिथे पाहिलेल्या ठिकाणांवर असतो. प्रतिसादात एक फोटो देते आता.

सगळे भाग आवर्जून वाचणाऱ्या, प्रतिसाद देणाऱ्या सगळ्यांचे मनःपूर्वक आभार. सगळ्या भागांवर प्रतिसाद देणं प्रत्येकीला शक्य नाही हे मी समजू शकते, तशी अपेक्षा नाही पण तुम्ही हे भाग वाचले असतील, आवडले असतील तर या शेवटच्या किंवा एखाद्या भागावर प्रतिसाद दिला तर मला छान वाटेल.

मधुरा देशपांडे - शेंबेकर
२२-०५-२०२५

इथे थोडक्यात आमचा प्लॅन देते आहे कुणाला लागला तर -

दिवस १ - जर्मनी ते अमेरिका प्रवास
दिवस २ - लास वेगास स्फीअर आणि सिटी टुर
दिवस ३ - रेंटल गाडी घेऊन पुढच्या रोड ट्रिपची तयारी, सुपरमार्केट फिरणे
दिवस ४ - Route 66, Grand Canyon, Williams
दिवस ५ - Sedona, फ्लॅगस्टाफ असा प्लॅन होता, पण बर्फामुळे जमलं नाही
दिवस ६ - ग्रँड कॅन्यन, पेज कडे प्रवास
दिवस ७ - पेज
दिवस ८ - Antelope Canyon & Monument Valley
दिवस ९ - बोट टूर आणि Bryce Canyon Nation Park, सेदार सिटी मध्ये मुक्काम
दिवस १० - वेगास ला परतीचा प्रवास - (एका दिवशी खूप लांब नको म्हणून सेदार सिटी मध्ये मुक्काम करून मग पूढे वेगास असं ठरवलं होतं) रेड क्लिफ नॅशनल पार्क त्या रस्त्यात होता म्हणून तोही यात.
दिवस ११ - हुवर डॅम
दिवस १२ - जर्मनीत परत