:)
'एक चित्र हजार शब्दांची जागा घेतं... पण एक शब्द मनात हजार चित्रांना जन्म देतो....."
लोणावळा! सह्याद्रीच्या कुशीतलं सुंदर अन प्रसन्न असं पाचुचं गाव.. अशा लोणावळ्यात मला रहायला मिळालं.. सुरुवातीला छोटंसं माझं पिल्लू, घरचे व्याप यातच २-३ वर्ष गेली आणि कुठेतरी मन अस्वस्थ रहायला लागलं. सगळं काही नीट, सुरळीत असुनही मनाला काहीतरी सलत होतं. खरं तर माझ्या बडबड्या स्वभावामुळे नव्या मैत्रीणी मिळाल्या होत्या, लिखाणाला भरपूर वेळ आणि शांततासुद्धा होती.. थोडा विचार केल्यावर जाणवलं, इथं 'सोशल लाईफ' अगदीच संपल्यात जमा झालंय! त्यातून पुस्तकांची कमतरता जाणवायला लागली.. चळवळ्या स्वभावामुळे मला काही स्वस्थ बसवेना! आणि यातूनच मनात 'खास स्त्रियांसाठी एखादा गट किंवा फोरम असावा' ही कल्पना रुजली.याच विचारातुन, जन्म झाला 'बुक क्लब' संकल्पनेचा! वाचनालय किंवा पुस्तक भिशी सारखा काही उपक्रम करता येईल का, यावर मी विचार करु लागले. अशातच माझा हा विचार मी आमच्या कँपसमधिल शाळेतल्या शिक्षिका सौ.गायकवाड मॅडम यांना बोलून दाखवली. त्यांनाही वाचनाची प्रचंड आवड आणि सामाजिक उपक्रमांत रस असल्याने त्यांनी या संकल्पनेला आनंदाने पाठिंबा दिला. आणि हा उपक्रम अंमलात आणण्यासाठी प्रोत्साहन दिले.
'एक से भले दो' झाल्याने माझा उत्साह वाढला होता. मॅडमचा अनुभव आणि माझा उत्साह यातून क्लबच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली.
पहिला टप्पा होता, संपूर्ण संकुलात आमच्या या उपक्रमाची माहिती पोचवणे आणि त्यानुसार सभासद संख्येचा अंदाज घेणे. संकुलात जवळपास २५ इमारती.. अन प्रत्येक इमारतीत १२-१६ कुटुंब!
आम्ही प्रत्येक इमारतीतून एक 'व्हॉलेंटीयर' नेमला. आमच्या या कार्यकर्त्या उपक्रमाबाबत आमच्या इतक्याच उत्साहात होत्या. आमची संकल्पना आम्ही आधी त्यांना समजावली .. ती म्हणजे:
१. हा उपक्रम केवळ स्त्रियांसाठी आहे.
२. इच्छुक व्यक्ती एक पुस्तक देऊन सभासद होईल. दर महिन्यात एकदा सगळे सभासद एकत्र येतील आणि पुस्तकांची अदलाबदल केली जाईल.
३. प्रत्येक सभासदाने स्वतःच्या वाढ्दिवसाला एक नवंकोरं पुस्तक उपक्रमाला भेट द्यायचं.
ही सर्व माहिती आमच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या इमारतीत पोचवली. आणि सभासद संख्येचा आम्हाला अंदाज आला.
आम्हाला जवळपास २५ सभासद मिळणार होते. संक्रांतीच्या दिवशी आम्ही उपक्रमाचा पहिला राउंड झाला आणि अहो आश्चर्यम.... आम्हाला २८ सभासद आणि ३२ पुस्तकं मिळाली!!
प्रत्येक महिन्यात पुस्तकांव्यतिरीक्त आम्ही वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करतो. पहिल्यांदा 'वाचन आणि मी' तर दुसर्यांदा 'सौंदर्य-मनाचं' या विषयावर सदस्यांनी मतं मांडली.
या महिन्यात महिला दिनाची थीम ठेवण्याची तयारी चालली आहे.
... असा आमचा 'बुकशेल्फ बुकक्लब'! अजुन अगदी पायाभरणीला आहे.. पण त्यातूनही खुप आनंद मिळतो. पुस्तकांतुन मिळणारं ज्ञान तर आहेच पण त्याच बरोबर माझी आवड आणि नेतृत्व एक साकार रूप घेतंय याचा जास्त आनंद वाटतो. प्रत्येक सदस्य जेव्हा माझ्याशी जोडली जाते, मैत्रीण म्हणुन मोकळेपणाने बोलते, तेव्हा एक चांगली व्यक्ती म्हणून बहरत जाण्याचा अनुभव मिळत रहातो... त्यामुळे आमचा हा क्लब आनंद, उत्साह आणि मैत्रीचं 'क्लबिंग' करतो, असं म्हणायला हरकत नाही!!