हां तर जायचं बरंच आधी ठरलं होतं हे तर माहिती आहेच तुम्हाला. राजेश हीरल बरोबर मी मागच्या वर्षी हिमाचल ट्रिप केलेली. आणि हीरलबरोबर गोवा वुमेन्स ड्राईवपण. त्यांच्या मुलीला स्पेनमधल्या एका युनिवर्सिटीत अॅडमिशन मिळाली हा स्पेनचा ट्रिगर. तिला तिकडं सेटल करून पुढं अँडाल्युशियाची ट्रिप असा प्लॅन होता. आम्ही तिकिटं बुक केली मुंबई-मद्रिद रिटर्न. विजा वगैरे उरकलं. मग दोन भेटी, अनेक कॉल्स आणि असंख्य वॉटसॅप मेसेजेस मधून गावं आणि तारखा ठरल्या. अयरबीएनबी अपार्टमेंटस बुक झाले. मीनवाईल, इतर मित्रमैत्रिणींशी बोलून माझं हे ठरलं की बार्सेलोनाशिवाय स्पेन अपूर्ण आहे. ते दोघं वर्सिटीत जाऊन येतील तोवर मी बार्साला जाऊन येईन असं पण ठरलं. पहिलं गाव होतं ग्रनाडा. पण मग मला बार्सात एकच दिवस मिळाला अस्ता. म्हणून मी ते स्किप केलं ( ज्याचं मला फार वाईट वाटतंय) आणि त्यांना मलगाला जॉईन करायचं ठरवलं.
आमच्या बरोबर अजून एक कपल असणार होतं. पण ते आधीच कॅटेल्युन्या ( बार्सेलोना पण याच प्रांतात येतं) मधे एका सायकलींग ट्रिप साठी गेले होते.
हीरल वर्सिटीला जायचं म्हणून ४ दिवस आधीच निघाली होती. म्हणून मी आणि राजेश मुंबईहून निघालो.
खूप विचारांती मी मद्रिद- बार्सा बुलेट ट्रेन बुक केली होती. कारण त्या ट्रेनचा एक अनुभव आणि बरीच जमीन पहायला मिळणं हा उद्देश. शिवाय डोमेस्टिक फ्लाईटस चे रिव्युज मिक्स्ड होते. पुढं तिथला सगळाच आंतरदेशिय प्रवास ट्रेन आणि कारनी केला. ही ट्रेन मी ज्या दिवशी बुक केली त्या दिवशी ती तिथल्या स्वस्त फ्लाईटच्या साडेतीन पट महाग होती.
मी एकटी बार्साला जाणर होते. त्यांच्या सिस्टम्स, स्पॅनिश पब्लिक कल्चर, कस्टमर सर्विस कशाचीच माहिती नव्हती . अयरपोर्टवरून ट्रेन स्टेशन किती लांब वगैरे माहिती अस्लं तरी टुरिस्टांचे रिव्युज वाचून गोण्धळले होते. उगच कट्टाकट्टी आणि धावपळ नको म्हणून ५ तासांचा गॅप ठेवला होता बुकींग करताना. सामान घ्यायचं , टर्मिनल्स चेंज करायचे. तिथून लोकल मेट्रो घेऊन रेन्फे ( ही तिथली बुलेट ट्रेन ऑपरेटर कं. ) च्या अटोचा नावाच्या स्टेशनला जायचं , तिथं दुजे करून मग ट्रेन पकडायची असा प्लॅन होता. राजेश मद्रिदहून लगेच वर्सिटीत जाणार असा मूळ प्लॅन होता.
पण त्या कॉलेजकन्यकेचा विजा उशिरा आल्यामुळं हीरल एकटीच मद्रिदमधे होती. आणि ते दोघं दोन दिवस तिथंच रहाणार होते. ती म्हणाली गौरी, माझ्या अपार्टमेंटपासून तुझं अटोचा स्टेशन चालत ७ मिनीटं आहे. आपण जाऊ. निवांत जेऊ. चुरोज विद चॉको सॉस खाऊ मग आम्ही तुला स्टेशनला सोडतो. हाऊ रिलिव्ड आय वॉज.
मग तिनं आम्हाला तिथल्या सॅन मिग्युएल मार्काडोमधे नेलं. ही इथली खाऊ गल्ली. मांसाहारी लोकांसाठी अलिबाबाची गुहा.
मी आणि हीरल शाकाहारी असल्यामुळं आमचं काम सोपं होतं. एक पित्झा, दोन आयस्क्रीम्स आणि पटेटो वेजेसस, पिकल्ड ऑलिव्ज वगैरे सटरफटर गोष्टी खाऊन आमचं काम झालं. राजेश मात्र मस्त ताव मरून जेवला. पोर्कच्या तंगडीला इकडं खमॉन ( jamon )
म्हणतात. ही त्यांची राष्ट्रिय डिश असावी. ओला नंतर सगळ्यात जास्त ऐकलेला शब्द हाच. शिवाय सगळीकडं या तंगड्या लटकवलेल्या. याचे सॉवेनिर्स पण असतात.
मग एका १८५३ सालच्या चुरो प्लेसला चुरोज खायला गेलो. शेवग्याच्या शेंगांइतके मोठे चुरोज आणि कपातून चॉकोलेट सॉस. खरं सांगायचं तर मला त्या दिवशी तिथलं कॉम्बो इतकं चविष्ट वाटलं नाही.
हे करून आम्ही अटोचाला गेलो. तिकिट हातात होतं पण पुढं काय कसं करायचं हा प्रश्न होता. सांगायला कोण हे माहीत नव्हतं. बहुतेकांना इंग्लिश येत नव्हतं. मला येणार्या बेसिक स्पॅनिशचा फारसा उपयोग नाही हे पाच मिनिटात कळलं . तरी मोबाईलवर ऑफलाईन ट्रान्सलेटर होता.
चौकशी खिडकीतला बाब्या संतपदाला पोचलेला होता. १५ मिनिटात दोन माणसांना उरकलं त्यानी. मग म्हटलं हे काही खरं नाही. कुठं जायचं , किती प्लॅटफॉर्म आहेत, किती वेळ लागेल काही माहीत नव्हतं. मझ्या पुढची गोरी साउथ आफ्रिकन बाई पण हताश झालेली. मग कस्टमर केयर च्या डेस्कवर गेले. त्या गोर्या सा आ बाईनी सांगितलेलं की तिथं तर अजूनच वाईट परिस्थिती आहे. ती गेली तर तिला हातवार्यांनीच हाकलून दिलं होतं. तरी गेले. इंग्लिश येत अस्लं तरी बोलणार नाही असे भाव चेहर्यावर थापूनच एक तरुणी बसली होती. तिला तिकिट दाखवून याचं काय करायचं ते विचारलं. म्हणजे हे प्रिंट ऑट देऊन बोर्डिग पास किंवा छापील तिकिट मिळतं का हा मूळ कन्सर्न होता. तिनी तिकडेच विचार असे हातवारे केले आणि स्पॅनिशमधे म्हणाली मला कळत नाहीय तू काय म्हणतेयस. मग मी मोडक्या तोडक्या स्पॅनिशमधे हे बास आहे का या तिकीटाचं अजून काही करायचं हे विचारलं. स्पॅनिश बोलल्यामुळं बाईनी मदत केली. वर जा , सगळे प्लॅटफॉर्म्स तिथंच आहेत हे सांगितलं. मग त्या गो. सा. आ. बाईला पण सांगितलं आणि आम्ही पळत वर गेलो. तिथं अयरपोर्टवर असतात तसे बोर्डस होते. पण तिथं फक्त पुढच्या पाच मिनिटानी येणार्या ट्रेन्सची माहीती झळकत होती.
मग शेजारी बसलेल्या माणसाला विचारलं , त्याला थोडं इंग्लिश येत होतं. मग त्याची इंग्लिशची प्रॅक्टिस आणि माझी स्पॅनिशची पणाला लावत कोण कुठं वगैरे झालं. आमच्या ट्रेन्स एकाच वेळी होत्या. तो दर ५ मिनिटानी बोर्ड बघून यायचा. मग पळत आला आणि तुझी लागली बघ ४ नंबरवर. माझी नाही अजून आणि अतिशय गोडपणे निरोप दिला. बार्सा मस्त आहे. खूप मजा कर म्हणून.
पुढं ट्रेनमधून त्याचं छोटसं गाव दिसलं.
ताशी ३०० किमिच्या वेगानी जाणारी ती आगगाडी अडीच तासात बार्साला पोचली. आणि एक अफेयर सुरू झालं :)
हिंदी / मराठी
इंग्लीशUse Ctrl+Space to toggle
इंग्लीशUse Ctrl+Space to toggle