या फराळाला.
हे बेसनपिठाचे पुर्या लाटून, तळून, चुरून केलेले लाडू.
लागणारा वेळ:
१ तास
लागणारे जिन्नस:
१ की. बेसन
१ की. साखर( कमी गोड हवे असल्यास जरा कमी घ्यायची)
वेलची ४-५
काजू, बदाम, बेदाणे आवडीनुसार
तळायला तूप
क्रमवार पाककृती:
शक्य असेल तर हरभरा डाळ गिरणीतून दळून आणायची. अगदी बारीक न दळता जराशी जाडसर दळायला सांगायची.
पुर्या साठी मळतो साधारण तसेच घट्ट पिठ मळायचे. ह्यात मोहन घालायची गरज नसते.
ह्या पिठाच्या जाडसर पुर्या लाटायच्या. पातळ केल्या तर तळताना कडक होतात.
ह्या पुर्या (साजूक) तुपातच तळायच्या. तेलात तळल्या तर हवी ती चव येत नाही.
चुरण्याची पारंपारीक पद्धतः (गरम असतानाच चुरल्या म्हणजे लवकर आणि बारीक चुरल्या जातात . काय करायचे पहिल्या दोन तीन पुर्या हाताने तोडुन घ्यायच्या जराश्या गार झाल्या की मग दोन्ही हाताने चुरायच्या. पुढच्या पुर्या चुरायला घेताना पुरीसोबत हा चुरा पण हातात घ्यायचा म्हणजे हाताला भाजत नाही. एकीकडे तळायचे आणि एकीकडे चुरायचे काम सुरु असते. सगळे चुरुन झाले कि दळण साफ करायच्या चाळणीने चाळुन घ्यायचे. बारिक न चुरला गेलेला चुरा शिल्लक असतो, तो गार झाल्यामुळे हाताने चुरणे शक्य नसते तर पुर्वी तो खलबत्त्यात घालून कुटला जाई तो मिक्सरमध्य बारीक करता येतो.)
वरच्या चुरण्याच्या कामाला शॉर्ट्कट म्हणजे सगळ्या पुर्या तळून झाल्या की मग त्यांचे तुकडे करून मिक्सरमध्ये बारीक करायचे.
हा सगळा चुरा एका परातीत घालुन ठेवायचा. वेलचीची पुड ह्यातच टाकायची.
पुर्या तळायला घेतानाच पाक करायला ठेवायचा. गोळीबंद पाक व्हायला हवा. पाक झाला की नाही हे पहाण्यासाठी एका छोट्या ताटलीत पाणी घेऊन ठेवायचे. पाक सतत ठवळत रहायचे आणि मधुनच थोडासा पाक पाण्यात टाकून पहायचा. बोटांनी गोळा करायचा प्रयत्न करायचा. आधी तो पाण्यात टाकता क्षणीच पसरतो. पाण्यात त्याची गोळी झाली म्हणजे पाक पक्का झाला असे म्हणतात.
थोडा चुरा वाटीत काढून ठेवायचा. हा पाक ताबडतोब परातीतल्या चुर्यावर पसरवून टाकायचा. काढून ठेवलेल्या चुर्याने कढई पुसुन घ्यायची आणि परातीत टाकायचा. उलथण्याने खालीवर करुन चांगला मिक्स करायचा. एकसारखा करुन कापड टाकुन झाकुन ठेवायचा.
तासाभराने बघायचे की लाडू बांधायला जमतात की नाही. अजुनही जरासे ओलसर वाटले तर थोडावेळ राहू द्यायचा. लाडू हलक्या हाताने बांधायचे. काजू, बदाम, बेदाणे लाडू वळताना त्यात घालू शकता किंवा आधीच चुर्यात मिसळून घेवू शकता.
अधिक टिपा:
हे लाडू थंड झाले की जरा कोरडे होतात. अगदीच कोरडे नको असतील तर पाक गोळीबंद होण्याआधीच काढून घ्यायचा.
दिवाळीच्या स्वयंपाकात आई सुगरण होती. तिच्या हाताखाली गिरवलेले हे धडे. आईकडून सगळ्या गोष्टींचे प्रमाण लिहुन घ्यायचेच राहून गेले.
नगर भागात हे लाडू लग्नात रुखवदात तसेच पाटीसोबत देण्याची प्रथा आहे. लेकीला सासरी जाताना तर सुनेला माहेरी जाताना दिवाळीची बुथ देतात, त्यात हि दिले जातात.
माहितीचा स्रोत:
आई
शंकरपाळे
१ वाटी साखर (मापासाठी घेतलेली वाटी ही आपण भारतात वापरतो ती स्टीलची वाटी)
पाऊण वाटी तूप
१ ते दिड कप दूध ( आपण भारतात वापरतो तो चहाचा कप)
गव्हाचे पीठ साधारण अर्धा ते पाऊण किलो.
तळण्यासाठी तेल किंवा तूप.
परातीत किंवा मोठ्या खोलगट भांड्यात साखर घ्यायची (पिठीसाखर नाही बरं का! ).
तूप, साखर आणि गरम दूध एगबिटरने साखर विरघळेपर्यंत मिक्स करून घ्यायचे.
(एगबीटर नसेन तर परातीत हाताची पाची बोटे पसरुन साखर आणि तूप एकाच दिशेने फिरवत रहायचे. त्यात गरम दूध घालून पुन्हा हाताची बोटे पसरवुन साखर विरघळेपर्यंत हलवायचे.)
आता हात फिरवतच ठेवायचा आणि थोडे थोडे करुन पीठ टाकत जायचे. जेवढे बसेल तेवढेच घालायचे. चांगले मळुन घेऊन लगेच लाटायला घ्यायचे.(थोडा वेळ ठेवून लाटायला घेतेलेत तर शंकरपाळे विरघळतात.)
थोडी जाडसरच पोळी लाटायची. लाटतानाच पोळीला पुड सुटल्याचे जाणवते.
शंकरपाळे कापून घ्यायचे. सगळे करुन झाले की मध्यम आचेवर तळायचे.
अगदी खुसखुशीत, छान शंकरपाळे होतात. शिवाय तूपकट होत नाहीत. तळायलाही जास्त तूप लागत नाही.
शेव
अर्धा की बेसन. चवीपुरते मीठ, आवडीनुसार लाल तिखट, १ चमचा थंड तेल. सगळे व्यवस्थीत एकसारखे एकत्र करून घेतले. तेल सगळ्या बेसनाला लागावे म्हणून हाताने चोळले.
मिक्सर मधे २ चमचे जिर्याची पूड केली त्यात भरपूर लासूण घालून वाटले. पाणी घालून जमेल तेवढे बारीक वाटले व हे मिश्रण गाळणीने गाळून बेसनात मिसळले. सोर्या दाबायला जड जाणार नाही तेवढेच घट्ट भिजवले.
तेलात वेढा तळताना जरासा पिवळा दिसतानाच बाहेर काढला कारण बाहेर काढले तरी तळण्याची क्रीया संपलेली नसते. नंतर शेवेचा रंग बदललेला जाणवला.
बालूशाही
चिवडा - मुरमुरे, कॉर्नफ्लेक्स चा
प्रतिक्रीयेतील इतर पाकृ इथे देत आहे.
बेसनाच्या वड्या
१ वाटी बेसन
१/२ वाटी तूप
१/२ वाटी खवा
१ वाटी साखर
कृती- तूपावर बेसन भाजायला घ्यायचं, दुसरीकडे साखरेचा पाक करायला ठेवायचा. बेसन थोडं भाजून झालं की खवा घालून परत भाजायचं. साखरेचा पक्का / गोळीबंद (वरच्या लाडवात आहे तसा) पाक झाला की तो बेसन-खवा मिश्रणात ओतायचा. नीट मिक्स करून ताटात वड्या थापायच्या. गार झाल्या की मस्त लुसलुशीत, रिच वड्या तयार!
याचा सेव्हिंग ग्रेस असा, की पाक चुकला, पक्का झाला नाही, आधीचा झाला, तर याच मिश्रणाचे लाडू वळता येतात! winking चवीचा प्रश्नच नाही! ती मस्तच असते, आकाराचा काय तो फरक! biggrin
सौजन्य : पूनम
खारे शंकरपाळे - मॉमची रेसिपी. तिने कुठेतरी वाचली असावी. तिच्या जुन्या वहीत आहे.
नमकपारे / खारे शंकरपाळे
१ वाटी मैदा
१ वाटी गव्हाचे पीठ
१/२ वाटी तेल
मीठ
ओवा भरड पूड
जिरे भरड पूड
हळद किंचित
मैदा, पीठ, ओवा भरड पूड, जिरे भरड पूड कोरडे मिक्स करायचे. दोन हाताच्या तळव्यात थोडे थोडे घेऊन छान १० मिनीट चोळायचे
नंतर तेल कडकडीत गरम करून हे मोहन पीठावर सर्व बाजुने ओतायचे. चमच्याने मिक्स करायचे. हळद घाला. आता पुन्हा दोन हाताच्या तळव्यात थोडे थोडे घेऊन छान १० -१५ मिनीट चोळायचे.
पाणी घालुन मळायचे. घट्ट भिजवावे. मध्यम आकाराचे गोळे करुन साधारण अर्धा इंच जाडीची पोळी लाटावी. काट्याने बारीक रेषा ओढुन शंकरपाळे करुन तळावेत. मंद आंचेवर तळावेत.
सौजन्य : प्रिंसेस
मूगाचे लाडू आणि चण्याच्या पीठाचे लाडू
अर्धा किलो मूग / चणे
चिकिचा गूळ
तूप - २ ते ३ टेबलस्पून
मूग / चणे मंद गॅसवर भाजून घ्यावे. आमच्या गावी चक्कीवर भरडून देतात आणि मग त्यातील साल तेच काढून बारीक दळून देतात. अस दळलेल पीठ थोड कच्च वाटत असेल तर एक टि स्पून तूपात ५ मि. भाजून घ्याव. गूळ किसणीने किसून किंवा कुकरला तीन शिट्या देऊन गूळ पातळ करून घ्या. त्या पाकात हे पिठ मिक्स करा. जर गुठळ्या असतील तर मिक्सरमध्ये वाटून घ्या. छान पीठ तयार होत. मग त्यात थोड तूप, भाजलेल सुक खोबर्याच्या किस, ड्रायफ्रूटस पावडर किंवा तुकडे, जायफळ पूड घालून लाडू वळा. मूग आणि चणे मी जरा जास्तच भाजले अस चक्कीवाली म्हणाली त्यामूळे मी पुन्हा तुपात पीठ नाही भाजले. तुम्ही पाक करण्यात एक्सपर्ट असाल तर हेच लाडू गुळाच्या पाकात ही करतात. पण मला आजीची बिनपाकाची पद्धत सोपी वाटली. बिघडायचा चान्स नाही.
आमच्या पंजाबी शेजार्यांनी खारी शंकरपाळी/मठरीची शिकवलेली पद्धत, आम्हाला आवडली. मी मागच्या आठवड्यात गावी काळी मिरीच्या बनवल्या आणि त्या मामीला आवडल्या, तिने सुद्धा काल बनवल्या ह्या पद्धतीने.
खा.शं. बनवताना कोणताही एकच पदार्थ घाला म्हणजे त्याची चव छान लागते. हळद किंवा तिखट नाही घालत त्यांच्याकडे.
पाव किलो मैदा,
काळी मिरी - १५- २० हे खलबत्त्यात भरड काढून घ्यायचे.
किंवा कलोंजी - ही अंदाजे १ टे.स्पून
किंवा जिरे - कोरड गरम करून भरड करुन
तूप - लागेल तस गरम करून
तळण्यासाठी तेल
चवीपुरत मीठ
कृती:
चाळलेल्या मैद्यामध्ये मीठ, काळी मिरी भरड किंवा कलोंजी किंवा जिर्याची भरड घालून सगळ मिक्स करून घ्याव. त्यात अर्धी वाटी किवा अंदाजे तूप गरम करून घालाव आणि पुन्हा मिक्स करून कोरड्या पीठाचा गोळा होतो का बघाव नाहीतर पुन्हा तूप गरम करून घालाव. कोरड्या पीठाचा गोळा झाल्यावर त्यात पाणी घालून पीठ घट्ट भिजवून शंकरपाळी किंवा मठरी बनवावी.
सौजन्य : आरती
गुळपापडी
तूप घरी केलेलं साजुक मी कढईत टाकलं, मग साधारण मोठी वाटी कणिक अगदी मंद gasवर तासभर भाजली, लालसर खमंग झाली मग त्याच वाटीत पतंजली गुळपावडर घेतली, अगदी भरून नाही थोडी कमी. ती घातली. बदाम, काजू, वेलची आणि एव्हरेस्ट मिल्क मसाला पण घातला. थोड्या दुधाचा हबका मारायला लागला कारण तूप कमी पडलं. मग सगळं एकजीव करत राहिले थोडा वेळ. जरा मऊच ठेवल्या मी कारण ती कुस्करून सार्थकला दुधातून देता येईल आणि बाबांना दात नाहीत तेपण खाऊ शकतील. आपल्याला हवी तशी करावी. आई पार सुकडी करायची पूर्वी, पाक वगैरे करून पण मला तेवढं नाही आवडत. त्यामुळे सर्व एकजीव झाल्यावर मी काढलं. ताटाला तूप लावून वड्या पाडल्या.
सौजन्य : अन्जू
करंजीचे सारण :
पद्धत १ :
२ वाट्या रवा जर भिजवला असेल, तर ह्या प्रमाणात सारण लागते :
१ वाटी सुक्या खोबर्याचा खिस
१ वाटी पिठी साखर
१ मोठा चमचा खसखस
सढळहस्ते बेदाणे आणि काजू
चिमूटभर वेलची पूड
हे सगळं एकत्र करा. सारण तयार.
पण ह्याच्या करंज्या आतून पोकळ होतात. त्या पोकळ सुद्धा मस्त लागतात. पण पोकळ नसतील आवडत, तर पद्धत २ वापरा.
पद्धत २ :
२ वाट्या रवा जर भिजवला असेल, तर ह्या प्रमाणात सारण लागते :
१ वाटी सुक्या खोबर्याचा खिस
१ वाटी कणीक तुपावर खमंग भाजून
१.५ वाटी पिठी साखर (साखरेचे प्रमाण जास्त आहे - प्लिज नोट)
१ मोठा चमचा खसखस
सढळहस्ते बेदाणे आणि काजू
चिमूटभर वेलची पूड
हे सगळं एकत्र करा. सारण तयार.
अवांतर :
तिळाच्या करंज्या पण छान होतात. आमच्याकडे खूप आवडतात. त्याची ही पद्धत :
२ वाट्या रवा जर भिजवला असेल, तर ह्या प्रमाणात सारण लागते :
१ वाटी तीळ कोरडेच खमंग भाजून घ्या. तीळ लक्ष देऊन भाजावे लागतात. काळ्सर व्ह्यायला लागले की कढईतून काढून घ्या लगेच. नाहीतर कढईच्या ऊबेने करपतात. ते कडसर लागू शकते.
तीळ थंड होवू द्या.
गूळ चिरून घ्या. चिरलेला गूळ १ वाटी व्ह्यायला हवा.
थंड झालेले तीळ आणि गूळ मिक्सर वर फिरवून त्याचे कूट करा.
त्यात थोडी वेलचीपूड घाला आणि मिसळून घ्या.
सारण तयार. ते भरून करंज्या करा. ह्या करंज्या पण खूप छान लागतात.
मठरी - मसाला मठरी
१. २ वाट्या मैदा, १/२ वाटी कणीक, १/२ वाटी बेसन, १/४ वाटी रवा
२. १ चमचा ओवा, १ चमचा जिरे, २ चमचे कसूरी मेथी हाताने चुरडून
३. २ चमचे धणे, २ चमचे बडिशेप, १ चमचा काळे मिरे, ४-५ लवंगा - हे मिक्सर वर जाडसर भरडून
४. मोहन म्हणून - पाऊण वाटी तेल गरम करून
५. मीठ चवीनुसार
६. तळण्यासाठी तेल
साधी मठरी
१. २ वाट्या मैदा
२. १ चमचा ओवा, १ चमचा जिरे, मीठ चवीनुसार
३. मोहन - अर्धी वाटी तेल.
कृती-
१.वरील घटक एकत्र करून हाताने मळून घ्या. तेल जास्त असल्याने हाताने मुटके पडतील त्याचे. मग लागेल तसं पाणी घालून तिंबून घ्यावं.
२. त्याची जाडसर पोळी लाटून छोट्या कुकी कटर ने / वाटीने मठर्या कापून घ्याव्या.
३. मध्यम आचेवर तळून घ्याव्या. पेशन्स इज की. गॅस मोठा नाय करायचा. जास्त घाई असल्यास प्रोजेक्ट हाती घेऊच नका. पण घेतल्यास उतू नका मातू नका.
टीपा -
१. पिठाच्या एक चतुर्थांश तेल मोहन म्हणून घ्यायचं. कमीही घेऊ शकता. पण खुसखुशीत पणा कमी होईल.
सौजन्य : शरी
मम्मीची या सारणाची पद्धत -
१ वाटी सुकलेले खोबरे किसुन, मांद आचेवर कोरडे भाजुन
१/४ वाटी बारीईईईईक रवा तुपावर खमंग भाजुन
१ वाटी पिठीसाखर
१ चमचा खसखस खमंग भाजुन, भरड पूड करुन
२ बेलदोडे बारिक पूड करुन
किंचीत जायफळ
हे सर्व सामान एकत्र करायचे.
आजीची अजुन एक कोरड्या सारणाची आमच्या घरातली तुफान हिट रेसिपी - http://www.vadanikavalgheta.com/2009/10/blog-post.html
सौजन्य : Mints
साबाफेम खवाबेसन लाडू : http://www.maayboli.com/node/39839
सौजन्य : चिन्नु