अनुदिनी अनुतापे तापलो रामराया
परमदीनदयाळा निरसी मोहमाया |
अचपळ मन माझे नावरे आवरीता
तुजवीन शीण होतो धाव रे धाव आता ||
समर्थांच्या करुणाष्टकातलं हे पाहिलंच पद मला कायम एक कोडं घालायचं. जागात सर्वात वेगवान, चंचल काही असेल तर ते आपलं मन... खुद्द मनाच्या श्लोकाताही समर्थच मनाला चंचल म्हणतात... तर मग या पडत अ-चपळ का? बरं, मन अचपळ म्हणावं, तर पुढे ‘नावरे आवरीता” सुद्धा आहे. म्हणजे अचपळ मनाला आवरता येत नाही?? कसंकाय बरं? काही तरी फार गूढ गहन आहे असं समजून मी यावर विचार करायचा प्रयत्न सोडला.. पण जसा उत्तम शिक्षक आपल्या ढ विद्यार्थ्याचा हात कधीच सोडत नाही, तसा हा समर्थांचा “अचपळ” काही मला सोडेना.
- अन एका अवचित क्षणी डोक्यात प्रकाश पडला.. अरे, आपलं मन इतकं अचपळ असता उत्तर कसं मिळणार??? अ-चपळ म्हणजे दुसरं तिसरं काही नसून ‘रिजिड’च नाही का? मग ज्या मनाने चपळताच सोडली आहे, हलायच नाहीच असं ठरवलंय, ते काय उत्तर शोधणार?
खरंच आपण आपल्या मनाला किती रिजिड केलं आहे. या अचपळतेच्या किती छटा... क्रोध, ईर्ष्या, मत्सर, स्पर्धा, ताण, अहम, मानापमान, अस्मिता, वय, नाती, धर्म, अभिमान.......
अन काय काय! इतकं सगळं लादून घेतल्यावर मन तर अचपळ होणारंच ना!
यामागे काय बर कारण असावं... अर्थात आपले विचार.
मध्यंतरी माझ्या गुलाबाच्या रोपाचे वाढ अचानक खुंटली. एरवी ८-१० फुलांनी डवरलेलं रोप अचानक खुरट वाटू लागलं. जरा नेट वर शोधल्यावर “non blooming buds” बद्दल कळालं. एका प्रकारे आगंतुक फांद्या. या फांद्या दिसतात अगदी इतर सामान्य फांद्याप्रमाणे. मात्र न त्या बहरतात न रोपाला बहरू देतात. अशा काही फांद्या छाटल्या अन आठवड्याभरात नवे कोंब येऊन काही दिवसातच नव्या कळ्या दिसू लागल्या.
तर हे नॉन ब्लुमिंग बड्स म्हणजेच आपले विचार.
विचाराची एक गम्मत असते.. एका विचारातून दुसरा.. दुसऱ्यातून तिसरा कधी आला कळतंच नाही. त्यात नकारात्मकता! मन या निगेटीव्हीटीकडे खूप सहज आकर्षित होत.. सकारात्मकतेमध्ये, सृजनात्मकतेमध्ये प्रयत्न आहेत, कष्ट आहेत. त्यामानाने घसरण सोपी...
उदाहरणार्थ, अबक माणसाने नवीकोरी गाडी घेतली. गाडी घेण्याचा त्याला स्वाभाविक आनंदही झाला. त्याच बरोबर याही गोष्टीचा आनंद झाला, मी हे सिद्ध केलं, की गाडी काय मी पण घेऊ शकतो. अमुक कोणी मला हिणवलं होतं... आता येतील बरोबर माझ्यामागे. यातूनच पूर्वी झालेले वाद, मानापमान वगैरेची उजळणी होते.. अन गाडीपेक्षा हे विचारच जास्त अस्वस्थ करतात. हे म्हणजे ब्रेक नसलेली गाडी बर्फावरून घसरत जाण्यासारखं आहे. निष्पन्न काय.. गाडी घेण्याआधीही मन असमाधानी अन नंतरही. हीच ती अचपळता... आवरुनाही नावरणारी.
हे विचार खरंतर येउच न देणं उत्तम... पण अवघड! पण जिथे प्रश्न असतो, उत्तर किंवा पर्याय देखील असतातच ना!
मुळात काय, आपले विचार हीच आपली शक्ती आहेत. आपले मूड्स, प्रतिक्रिया, मतं, दृष्टीकोन आपल्या विचारांतूनच येतात. म्हणजेच आपले विचार आपल्याला ड्राईव करात असतात. सतत.
एका क्षणात विचार बदलता येऊ शकतात का? अर्थातच नाही.. पण हो... विचार ‘निवडता’ तर येऊ शकतील ना.. कुठल्याही गोष्टीवर सकारात्मक आणि नकारात्मक असे पर्याय आहेतच. म्हणजेच आपले “चांगला” विचार करायचा की ‘वाईट’ हे तर आपल्याच हातात आहे ना!
मग निगेटीव्हीटीकडे निघालेल्या विचारांना जाणीवपूर्वक ब्रेक लावला तर?
पण इथे आपलं लाडकं मन म्हणेल.... माझ्या विचार करण्यात बदल आणून काय जग बदलणार आहे का? लोक तर तसेच रहातील. अगदी मान्य. पण मनात राग, स्पर्धा, ईर्ष्या ठेउनतरी जग बदलेल का? उलट फक्त विचार बदलून आपल्यापुरतं जग तर स्वच्छ होईल.
केवळ विचारांना योग्य दिशा दिली की झालं!
अन ही दिशा पण समर्थच आपल्याला दाखवतात.. तयालागी हे सर्व चांचल्य दीजे||
आपल्या मनातल्याच राघवाला... आपल्यातल्या त्या राघवाच्या अंशाला स्मरून चांगल्या विचारांचा स्वीकार करण्याइतका सोपा मार्ग समर्थांनीच दाखवला आहे!
चला तर मग, आज पासुन, कुठलाही घसरणीवर नेणारा विचार आलाय हे जाणवताक्षणी पर्याय शोधुन आपलं मन बदलता येतंय का ते तपासुयात.
आणि आपलं 'अहल्य' मन विचाररुपी राघवस्पर्शाने मुक्त होतंय का ते बघुयात!
||जय जय रघुवीर समर्थ||