वैद्यकशास्त्र किंवा जीवशास्त्रातील २०१६ चे नोबेल पारितोषिक विजेते: योशिनोरी ओह्सुमी!

लेखिका - धारा

Osumi_wiki
चित्र सौजन्य : Tokyo Institute of Technology

नोबेल पारितोषिक विजेते : योशिनोरी ओह्सुमी (Yoshinori Ohsumi)
विभाग : वैद्यकशास्त्र किंवा जीवशास्त्र
जन्म : ९ फेब्रुवारी, १९४५ (सध्या वय : ७१ वर्षे)
देश : जपान

ओह्सुमी यांचा नोबेल पारितोषिक विजेत्या संशोधनाचा मुख्य विषय आहे - स्वभक्षण (autophagy) ! स्वभक्षण म्हणजे शरीरातील पेशींनी स्वतःचाच नाश करणं, किंवा अजून सोप्या भाषेत - स्वतःलाच खाणं.

ओह्सुमी यांनी आपल्या याआधीच्या संशोधनांमधून पेशी आपल्या आतील गोष्टींना कसे रिसायकल करते, याविषयी नवा अर्थबोध लावून दाखवला होता. त्यामुळे १९९० मध्ये जगाला काही खास आजारांचे आकलन तर झालंच, शिवाय विविध शरीरविज्ञानशास्त्रविषयक (physiological) प्रक्रियांमधील स्वभक्षणाचं महत्व कळालं. पेशींच्या स्वभक्षणातील हे फेरफार (Mutations) कॅन्सरसारख्या आजारांमध्ये, किंवा मेंदूचे विकार जसे की पार्किन्सन्स विकार, यांमध्ये फार महत्वाची भूमिका बजावतात.

तर, आपल्या नोबेल पारितोषिक विजेत्या संशोधनात, ओह्सुमीनी यीस्ट्मधल्या स्वभक्षणासाठी निर्णायक भूमिका बजावणार्‍या जनुकांना शोधून काढले. ते करता करताच यीस्टमधील स्वभक्षण प्रक्रियेची मूलभूत यंत्रणाही सापडली, आणि महत्वाचे म्हणजे, त्यांनी यीस्ट व मानवी पेशींमध्येही समान यंत्रणा असल्याचे दाखवून दिले.

संशोधन कसे केले? :
मानवी शरीर विविध पेशींनी बनलेले असते. पेशींच्या आत अनेक भाग आणि उपविभाग असतात. व्हक्युओल (vacuole) हा मानवी पेशींमधला एक उपविभाग. या व्हॅक्युओलमधील स्वभक्षणाची प्रक्रिया ओह्सुमींना समजून घ्यायची होती. यीस्ट ही बुरशी आपण बेकिंगमध्ये अनेकदा वापरतो. या यीस्टच्या पेशी मानवी पेशींचं मॉडेल म्हणून संशोधनात वापरतात. परंतु या पेशींचा आकार अत्यंत लहान असतो. म्हणून त्यांना यीस्टच्या पेशींमधील अंतर्गत रचना आणि कार्य पाहण्याची प्रक्रिया ओह्सुमींनी विकसीत केली. या यीस्ट पेशींच्या व्हॅक्युओलमधील स्वभक्षणाची प्रक्रियेमध्ये ओह्सुमींनी व्यत्यय आणला. यामुळे व्हॅक्युओलमध्ये ऑटोफॅगोझोम (autophagosomes - पेशींचा अजून एक उपविभाग) गोळा होतात. ते त्यांनी सूक्ष्मदर्शकाखाली दाखविले.

त्यासाठी त्यांनी व्हॅक्युओलमधील हानी करू शकणारे वितंचके (enzymes) काढून टाकून म्युटेटेड यीस्टचं विरजण बनवले, आणि त्याच वेळी स्वभक्षणासाठी तयार करण्यासाठी पेशींना अनुकूल वातावरणही बनवले. या सगळ्या प्रक्रियेत त्यांना हानी (degrade) होऊ न शकणारे व्हॅक्युओल सापडले. त्यावरून त्यांनी यीस्टमध्ये स्वभक्षण होते, हे सिद्ध केले आणि त्यात समाविष्ट असलेली जनुके शोधून काढली.

इतर काही खास:

  • नोबेल पारितोषिक जिंकणारे ओह्सुमी हे २५वे जपानी व्यक्ती आहेत.
  • त्यांच्या पत्नी मारिको त्यांच्या संशोधन कार्यात सोबत काम करतात. ओह्सुमीच्या बर्‍याच संशोधनात त्या सह-लेखिका आहेत.
  • संशोधन क्षेत्रात काम करायला उद्युक्त केल्याचे सगळे श्रेय ते त्यांच्या वडिलांना देतात.
  • ओह्सुमी यांची मुलाखत
  • ओह्सुमी यांची अधिकृत वेबसाईट

संदर्भ :

अधिकृत वैज्ञानिक मराठी शब्द :
Vacuole - रिक्तिका
Autophagy - स्व-अंश-भक्षण
Mutation - उत्परिवर्तन

Keywords: 

उपक्रम: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle