लेखिका - धारा
बेंट हॉमस्ट्रॉम आणि ऑलिव्हर हार्ट
चित्र सौजन्य : ndtv.com
नोबेल पारितोषिक विजेते : ऑलिव्हर हार्ट(Oliver Hart) आणि बेंट हॉमस्ट्रॉम (Bengt Holmström)
विभाग : अर्थशास्त्र
देश : अमेरिका
ऑलिव्हर हार्ट, (पारितोषिक श्रेय : १/२)
जन्म : ९ ऑक्टोबर १९४८ (सध्या वय : ६८ वर्षे)
बेंट हॉमस्ट्रॉम, (पारितोषिक श्रेय : १/२)
जन्म : १८ एप्रिल, १९४९ (सध्या वय : ६७ वर्षे)
कॉन्ट्रॅक्ट थिअरीविषयी अर्थात करार सिद्धांताविषयी क्रांतिकारी स्वरूपाचं संशोधन करणारे ब्रिटिश अर्थतज्ज्ञ ऑलिव्हर हार्ट आणि फिनलंडचे अर्थतज्ज्ञ बेंट होमस्ट्रॉम यांना अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात येणार आहे.
विश्वासावर चालणारे करार :
कॉन्ट्रॅक्ट अर्थात करार हे आधुनिक समाजात अत्यंत उपयुक्त अशी कार्यपद्धती. कोणत्याही दोन व्यक्ती, संस्था, कंपनी किंवा सरकारे यांच्यातील करार हे सहकार्य आणि विश्वासावर होत असतात. काहीवेळा नमूद गोष्टींचे उल्लंघन केल्यास हे करार संपुष्टात येतात. भविष्यातील कार्यपद्धती सुकर होण्यासाठी करार हे सर्वांत महत्त्वाचे ठरतात. उदा. नोकरीसंदर्भातील करारामध्ये चांगल्या कामगिरीसाठी बक्षीस व काही अटींच्या उल्लंघनासाठी हकालपट्टीची कारवाई केली जाते. हे करारामुळेच शक्य होते.
काय आहे कॉन्ट्रॅक्ट थिअरी/करार सिद्धांत?
हा सिद्धांत कराराचे स्वरूप, त्याची व्याप्ती समजावत कराराचा आराखडा समोर मांडतो. कराराच्या विविध पद्धती व आराखडे का असतात, हे उलगडून सांगणे या सिद्धांताचा महत्त्वाचा उद्देश आहे.
करारासंदर्भातील विशिष्ट परिस्थिती व संदर्भ ह्यांवर हा 'करार सिद्धांत' आधारित आहे. हा सिद्धांत कराराच्या मूळ समस्येवर विचार करायला भाग पाडतो. रोजच्या जगण्यातले विविध करार बनवताना, आणि नव्याने कराराची रचना करताना येणाऱ्या प्रश्नांवर हा सिद्धांत उत्तरं देतो.
- कामगिरीसाठी वेतन (प्रोत्साहन भत्ता) आणि विमा : कोणतीही कंपनी, संस्था ही नोकरदारांच्या कामगिरीवरच त्याचा पगार ठरवित असते. कुठेही मालक हा कामगारांपेक्षा जास्त धोके पत्करू इच्छितो. कामगाराचे तसे नसते. कामगाराचा प्रोत्साहन भत्ता (Incentives), तसेच आपत्कालीन परिस्थिती कामास येणारा विमा हे त्याच्या पगारावर अवलंबून असते. हा पगार नोकरी करार ठरवते. त्यामुळे कामगार चांगल्या पगारासाठी चांगले काम करण्यास उत्सुक असतो. १९७० नंतर कामगिरीमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी प्रोत्साहन भत्त्याची संकल्पना तयार झाली.
हॉलस्टॉर्म यांनी प्रोत्साहन भत्त्यासंदर्भात १९८१ पासून केलेल्या संशोधनामध्ये टीम वर्कवर जास्त जोर देण्यात आलेला आहे. एक समूह म्हणून होणारी कामगिरी आणि एकल म्हणून कामगिरी, यावरच प्रोत्साहन भत्त्याचे स्वरूप ठरते. विम्यामुळे माणूस निष्काळजी बनतो, याचबरोबर पूर्ण विमा नैतिक अध:पतनास कारणीभूत असतो, असेही हा सिद्धांत मांडतो. त्यानुसार 'बक्कळ तरीही संतुलित प्रोत्साहन भत्ता' हा कामगार व मालक - दोन्ही बाजूंना फायदेशीर ठरतो.
- संपत्तीचे अधिकार : स्थावर मालमत्तांची मालकी यावर हार्ट यांनी संशोधन केले आहे. यामध्ये संपत्तीचे अधिकार विशद करताना संपत्तीचे व्यवहार करताना अधिकारांची देवाण-घेवाण कशी होते, याचा ते आढावा घेतात. तरीही, यावर अधिक संशोधनाची गरज असल्याचेही हार्ट स्पष्ट करतात.
- अपूर्ण करार : अपूर्ण करार होण्यामागील कारणमीमांसा आणि त्यावरील उपाय, करार सिद्धांत सुचवतो. करारामध्ये अटी स्पष्टपणे दाखवल्यास करार अपूर्ण राहणार नाहीत, यावर या सिद्धांतात जोर देण्यात आला आहे.
- आर्थिक करार : अपुर्ण करार मुख्यतः आर्थिक करारांच्या घोळामुळे होतात. आर्थिक करारामध्ये फायदा आणि तोटा याचा नेमका विचार होतो. वरवर मजबूत वाटणारे हे करार कधीही संपुष्टात येऊ शकतात. उद्योजक आणि गुंतवणूकदारांमध्ये अशा प्रकारचे आर्थिक करार होत असतात.
- खासगीकरण आणि सार्वजनिकीकरण : हार्ट-हॉमस्ट्रॉमचा करार सिद्धांत खासगी क्षेत्र व सार्वजनिक क्षेत्राची विभागणी करताना खासगीकरणाचे व्यापक रूप आणि त्याचे समाज-जीवनावरील परिणाम, यातील काही समजांवर प्रकाशझोत टाकतो.
करार सिद्धांतामुळे विमा पॉलिसी, अतिवरिष्ठ पदांवरील व्यक्तीचं वेतन या क्षेत्रांमध्ये आमूलाग्र बदल घडले. त्याचबरोबर तुरुंग व्यवस्थापनातही मोठ्या सुधारणा झाल्या. 'शिक्षक, तुरुंगांचे सुरक्षारक्षक, आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी यांना त्यांच्या कामानुसार वेतन दिले जावे का', किंवा 'शाळा, रुग्णालयं, तुरुंग यासारख्या सेवा खासगी असाव्यात की सार्वजनिक मालकीच्या असाव्यात' या अत्यावश्यक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी हार्ट आणि होमस्ट्रॉम यांनी करार सिद्धांताद्वारे काही साधने तयार केली. संपूर्ण व्यवस्थेतील संतुलन कायम राखण्याचे काम त्या दोघांच्या सिद्धांतामुळे झाल्याचे प्रशंसोद्गार नोबेल निवड समितीने काढले आहेत. या संशोधनातून दिवाळखोरीशी संबंधित घटनात्मक आणि राजकीय धोरणांचा पाया घातला गेला, असेही म्हणता येईल.
इतर काही खास:
- २०१६ साली नोबेल पारितोषिक मिळवून देणारे हे संशोधन ८०च्या दशकात सुरू झालं आहे.
- हे संशोधन प्रत्यक्ष प्रयोगात यशस्वीरित्या अंमलात आणलं गेलं आहे.
- ऑलिव्हर हार्ट यांची मुलाखत
- ऑलिव्हर हार्ट यांचे अधिकृत संकेतस्थळ
- बेंट हॉमस्ट्रॉम यांची मुलाखत
- बेंट हॉमस्ट्रॉम यांचे अधिकृत संकेतस्थळ
संदर्भ :