पहाटेचा हवेतला गोड सुगंध, हातात वाफाळता कप आणि समोर कोरं करकरीत वर्तमानपत्र.. हिवाळ्यातली सुट्टीची सकाळ म्हणजे पर्वणीच! गरमागरम चहाला फ्रेश विचारांची आणि निवांतपणाची साथ एरवी दुर्मिळच! रोजची धावपळ, उलटसुलट विचार अन ताण जणु अंधारातच विरघळला.. अन मस्त अशा मनस्थितीत मी पेपर वाचायला घेतला. पहिल्या पानावरच 'भारत स्वच्छता अभियाना'ला मिळत असलेला भरघोस प्रतिसाद याविषयीचा २-३ बातम्या! सोबत हातात झाडू अन खराटे घेतलेल्या स्वयंसेवकाचे प्रकाशचित्र! स्त्री-पुरुष, तरुण-वयस्कर स्वयंसेवक, नेतेमंडळी, सेलिब्रीटी.. जातपात, धर्म या अन अशा कोणत्याही बंधनात न अडकता देशाच्या स्वच्छतेचा मार्ग रेखत होते.. म्हटलं.."चला... बरं झालं .. या न त्या.. काही कारणाने का असेना, प्रगती होतेय ना! मग झालं तर! नाही तर अवघड आहे देशाचं !" अशी सोयिस्कर टिप्पणी करुन मी पान उलटलं.
बातमीपत्राच्या दुस-या पानावर नजर टाकली अन उत्साहाचा फुगा फुटला! अख्खं पान चोर्यामार्या, खून, बलात्कार.. या ना त्या गुन्ह्यांच्या बातम्यांनी भरलेलं. सगळा ताजेपणा कोमेजुन गेला आणि मन अचानक नैराश्याने भरुन गेलं. असं वाटलं, रस्ते, गाव हे सारं होईलही या मोहिमेने स्वच्छ पण या इतर घाणीचं काय?? देश स्वच्छ करुन आपण आजारपणं तर घालवु पण मनाला आणि पर्यायाने समाजाला अन देशाला पोखरणार्या इतर 'घाणी'चं काय्? विचारांच्या मंथनातच पेपर बाजुला ठेवला... एकीकडे देशातला केर-कचरा साफ करायचा पण देशाला खर्या अर्थानं समृद्ध करणार्या 'नागरिका'ची सफाई कधी करणार? देश सशक्त व्ह्यायला हवा असेल तर आधी समाज निरोगी झाला पहिजे.. आणि 'समाज-समाज' म्हणजे तरी काय हो.. तर तुमच्या माझ्या सारखी असंख्य माणसंच ना!!त्यामुळे या मोठ्या पल्ल्याच्या प्रवासाची सुरुवात स्वतःपासुन केली पहिजे याची जाणीव झाली..हा विचार मनात आला अन जागेपणातुन मन जागृत झालं.
मन फ्रेश असलं ना, की 'मी'पणाच्या पुढे जाउन विचार करतं! माझ्याच अंतरंगात डोकावताना जाणवलं, किती गढुळ करुन ठेवलं होतं मी माझंच मन.. रोजची घाई ते कामवाली बाई, घरापुढली गल्ली ते थेट दिल्ली.. मनात कशाबद्दलच सकारत्मकता नाही. स्वतःच्या कोषात राहून विचार करण्यामुळे दॄष्टीसुद्धा गढुळलेली. कोणत्याही गोष्टी कडे बघताना संशय, पुर्वग्रह अन त्यामुळे राग अशाच चष्म्यातून त्याकडे मी बघत होते आणि स्वतःला त्रास करुन घेत होते. मनात पुर्वग्रह ठेवल्यमुळे दुस-याच्या बाजुने,स्वतःला दुस-याच्या जागी ठेउन समजुन घेण्याची गरजच मी विसरत चालले होते.'सिम्पथी'च्या मागे धावताना 'एम्पथी'चा विसर पडला होता.. सजग नागरिक म्हणवताना मी माझ्यातच साठलेलं शेवाळलेलं डबकं मी बघू शकले नाही. स्वतःतला हा कचरा दिसला अन सगळी झोप उडाली.
पैसा, शिक्षण अन तंत्रज्ञानाच्या जोरावर आपण आज खुप प्रगती केली आहे. पण या 'सुपरफस्ट' काळात आपणही पट्कन.. अगदी सहज ट्रॅफिक सिग्नल तोडण्यापासुन डोनेशन, एजंटगिरी.. वेगवेगळ्या मार्गाने भ्रष्टाचाराला खतपाणी घालतो अन उपोषणासाठी देखिल 'नो पार्किंग' मधे गाडी लावुन बसतो, नाही का? गोष्टी लहान असल्या तरी अशाच गोष्टीतुन देश मागे रहातोय ना! आज आपण स्वतःला आधुनिक म्हणवतो. मॉडर्न कपडे, मॉडर्न घरं, मॉडर्न खाणंपिणं सुध्धा! पण विचारांनी आपण खरंच आधुनिक आहोत का?? आजही समाजात, बाह्यरुपाला जास्त महत्त्व दिलं जातं.. विचार अन स्वभाव जाणुन घेण्याआधीच बाह्यप्रतिमेवरुन मतं बनवली जातात.. वर्ण, रूप, पेहराव यावर मनाच्या सौंदर्याकडे दुय्यम महत्त्व देतो. विचारांनी कितीतरी दशकं मागे आहोत.. स्त्रीमुक्ती, समानता, स्त्रियांविषयी घडणारे गुन्हे या अन अशा अगदी पायाभूत समस्यांचा अजुन उतारा आपल्याला सापडला नाही.. बदलते संदर्भ बघता खरं तर पुढच्या, भविष्यात घडणार्या पिढीची मानसिकता बदलणं गरजेच आहे.. पण आपण आपल्याच भूतकाळातून बाहेर पडायला तयार नाही.. इतरांच तर सोडा पण आपल्या व्यक्तिगत विकासासाठी तरी आपण काही विशेष प्रयत्न करतो का? मग जर समाजातली मनंच इतकी कलुषित असतील तर राष्ट्र कसे स्वच्छ होईल??
स्वतःच्या मनात अजुन तळाशी गेले अन उत्तर सापडलं....अगदी सहज, इच्छाशक्तीच्या झाडूने.. जर पूर्वग्रह अन मत्सराची जळमटं नष्ट केली आणि 'स्व-स्वच्छतेची त्रिसुत्री' पाळली तर व्यक्ती आणि पर्यायी समाज बदलायला वेळ लागणार नाही. 'स्व-स्वच्छतेची त्रिसुत्री' म्हणजे 'सु-दर्शन, सु-श्रवण अन सु-संवादाची चाळणी'!
पहिला नियम म्हणजे कोणत्याही व्यक्ती, घटना किंवा विचाराकडे बघताना दृष्टी, मन आणि विचार निर्मळ ठेवणं म्हनजे 'सु-दर्शन'. पुर्वग्रह, पुर्वानुभव आणि पुर्वदुषित मन आपल्याला वेगळीच प्रतीमा दाखवतं अन आपल्या विचारांची दिशा भरकटते. त्यामुळे मनावरचे 'सनग्लासेस' काढुनच लख्ख प्रकाशात सर्व बघायचं.
दुसरा नियम काहीही ऐकताना विश्वासार्हता आणि उपयुक्ततेच्या निकषांवर तोलून, आपल्यासाठी खरंच योग्य असेल तरच कानातुन मनाकडे पाठवणं म्हनजे सु-श्रवण. जे काही आपण ऐकत आहोत ते खरंच सत्य आहे का? आणि खरंच माझ्या उपयोगाचं आहे का? हे प्रश्न जर जागृत ठेवले तर आपोआपच मनात केवळ चांगले विचार पोचतात. त्यामुळे अनावश्यक गोंधळ अडवणारे 'इयरप्लग्स' कानात ठेऊनच गरजेइतकंच ऐकयचं.आणि
आणि हे दोन्ही नियम अंमलात आणून जे काही मनात उरेल त्यावर गरज असेल तरंच आणि सकारात्मकंच भाष्य करणं म्हणजे सु-भाष्य!! आपल्याला मिळालेल्या ज्ञानाला (knowledge) सूज्ञतेत (wisdom) परिवर्तीत करून योग्य वक्तव्याच्या 'मिडीया'तून इतरांपर्यंत पोचवायचं.
वरवर लहान वाटणा-या या गोष्टी आपल्या मनाची अन पर्यायाने बुद्धीची नव्याने मशागत करण्यास पुरेशा असतात. पण चुकार मन म्हणतं, खरंच गरज आहे का इतकी उठाठेव करण्याची? तर मला सांगा, आपल्या रहात्या घरात रोज केर-कचरा जमा होतो.. धूळ साठते. मग रोजच तर घर घाण होतं म्हणुन आपण ते स्वच्छ करायचं सोडतो का? नाही ना? उलट पाहुणे येणार असले की आपल्या आधी तीट्पावडर लावून घरच आधी सुंदर दिसतं.. तसंच आपलं मन जर निर्मळ अन सजलेलं असेल तर सारंकाही प्रसन्नच वाटेल ना!!!
मग.. करणार ना आज पासुनंच या 'स्वच्छता अभियाना'ला सुरुवात!
-कल्याणी कुळकर्णी-भोसेकर