आसन प्रवेश परीक्षा प्राविण्याने (डिस्टिंक्शन) उत्तिर्ण झाल्यावर मी आमच्याच संकुलात नि:शुल्क वर्ग घ्यायला सुरुवात केली. वर्षभराने "यंदा 'आसन प्रवीण' परीक्षाही द्यावी" असा विचार मनात आला. आसन प्रवीणचा वर्ग १५ एप्रिल ते ३१ मे असा होता. १० एप्रिलला मी नागपुरला पोचले आणि १२ पासुन सराव वर्गात जायला लागले. १५ तारखेपासुन आसन प्रवीण वर्ग सुरु झाला.
यात आता गंमत अशी होती की आम्हा सर्वाना आधी 'प्रि-प्रवीण टेस्ट' द्यायची होती. गुरुजी सांगतील ती आसनं सांगतील तितका वेळ करणे. बास्स्स्स!!!!! म्हणजे आसनाच्या पूर्णस्थितीत ते सन्गतिल तितका वेळ 'हसतमुखाने' टिकणे. 'स्थिर-सुखम-आसनम' हीच आमची परिक्षा होती. कोणती आसनं, किती वेळ, टेस्ट कधी..... काहीच माहिती नाही. तुम्ही फक्त वर्ग अटेंड करा. टेस्टचा विचार करु नका अशी गुरुजींची प्रेमळ ताकिद होती. साधारण ८ दिवसानी टेस्ट घेण्यात आली. म्हणजे.... वर्गात जाउन, प्रार्थना केल्यवर 'आज टेस्ट घ्यायला येतोय' असा गुरुजींचा निरोप आला. नेमकं काय करायच आहे याबाबत आमचे शिक्षकही काहीसे अनभिज्ञ होते. परिक्षाप्रमुख श्री.नानेकर सरांसोबत गुरुजी आले. आन आम्हाला "चला.... लावा अर्धमत्स्येंद्रासन' इतकच म्हणाले!!!!टेस्ट्ला साधारण २४-२६ पुरुष आणि तितक्याच महिला होत्या. पुढे सर्व पुरुषमंडळी अन मागे आम्ही.
आसनाची स्थिती घेतली आणि पुढच्या सुचनेची वाट पाहु लागलो. गुरुजी प्रत्येकाजवळ जाउन आसन तपासत होते. या आसनानंतर पश्चिमोत्तानासन अन मग पद्मासन लावायला सांगितलं. टेस्ट आटोपली. आम्ही व्याख्यानाला गेलो.
१मे ला रीझल्ट! इतक्या दिवसात आम्ही उषःपान (नाकाने दुध/ पाणी पिणे), सुत्रनेती वगैरे शिकलो होतो. रिझ्ल्ट लागला आणि आपण टेस्ट क्लियर केली हे ऐकुन एक नवा उत्साह संचारला.
रोज नवनवी, अवघड आसनं शिकायला मिळत होती. अत्यंत उत्तम असे शिक्षक लाभल्यामुळे खुपच मस्त मार्गदर्शन मिळत होतं. थेयरी मध्ये योगिक उपचार, शुद्धीक्रिया, अॅनोटॉमी, पातंजल योगसुत्र, योगस्वरुप अशा अनेक विषयांचा अभ्यास होत गेला. "योग'शास्त्राची व्याप्ती जाणवू लागली.
या काळात रोजचा दिवस साधारण पहाटे ४-४:१५ ला सुरु व्हायचा. स्नान, उषःपान करुन साधारण ५ पर्यंत मंडळात हजर. आश्रमसेवा (ऐछिक) करुन रोज वस्त्रधौती, जलधौती, सुत्र्नेती वगैरे शुद्धीक्रिया करुन ५:३० ला वर्ग सुरु व्हायचा. ७ पर्यंत प्रात्यक्षिक मग व्याख्यान! शुद्धीक्रियांमुळे आपोआप खाण्यावर आलेला संयम. आहार, विहार आणि निद्रा याच सुंदर नियमन जमु लागलं. अशातच एक महिना कधी संपला आणि परिक्षा कधी झाली कळलंच नाही.
या सर्व काळात माणुस आणि योगाभ्यासी म्हणुन मी अंतर्बाह्य बदलले. लहान लहान गोष्टींमधुन, आजुबाजुच्या कार्यकर्त्यांकडून अन सर्वात महत्वाचं म्हणजे आमचे शिक्षक आणि गुरुजी यांच्याकडुन खुप काही शिकायला मिळालं. अभ्यास किंवा परीक्षेपेक्षाही कायम मार्ग दाखवतील असे विचार, निष्ठा आणि प्रेरणा मिळाली. प्रामाणिकपणे कार्य करायची इच्छा असली की सर्व मार्ग सापडतात हा सर्वात मोठा गुरुमंत्र मिळाला.
श्री जनार्दन स्वामींनी १९५१ साली नागपुरात 'योगाभ्यासी मंडळाची" स्थापना केली. तेव्हा आरंभलेला हा योगप्रचाराचा यज्ञ अविरतपणे प्रज्वलीत आहे. मंडळात प्रतीदिन नि:शुल्क योगवर्ग सुरु असतात. उपचारासाठी येणारे रोगी, योगसाधक सारेच स्वामीजींवरच्या निष्ठेने कार्य करतात. "कर्मण्येवाधिकारस्ते माफलेशु कदाचन' चे पालन इथे सतत होत असते. स्वामीजींचा संदेश हेच जीवनध्येय म्हणुन स्वामी कार्याला हातभार लावण्यास प्रत्येक जण उत्सुक असतो.
या सर्वांत सहभागी व्हायला मिळालं आणि आता हे कार्य यथाशक्ती पुढे नेण्याचं सामर्थ्य मिळावं हीच प्रार्थ्ना!
||समाधानाय सौख्याय निरोगत्वाय जीवने|
योगमेवाभ्यसेत प्राज्ञः यथाशक्ती निरंतरम||