ट्रॅव्हलब्लॉग: नॅशनल हायवे-४४
नॅशनल हायवे ४४.... हा लेख (प्रवासवर्णन) मी नुकताच एका दिवाळी अंकात वाचला. बरेच दिवस तो अंक माझ्याकडे होता. विशेषतः प्रवासाशी संबंधित असल्यामुळे मुद्दामच वाचायला आणला होता मी. तरी हल्ली अंक वाचणे कमीच झाले आहे. आपल्याला हवी असलेली माहिती पाहिजे तेव्हा, हव्या असलेल्या स्वरूपात मिळणे आपल्या गुगलबाबानी सोपे केले आहे, मग कशाला ती अडगळ जपून ठेवा, पण खरं सांगू हवे असलेले शोधून वाचण्यापेक्षा, काहीतरी नवीन... न माहिती असलेलं नवीन स्वरूपात वाचण्यात पण एक वेगळी मज्जा आहे, असे वाचन कधी कधी खूप काही शिकवते.
असाच त्यादिवशी मी हा अंक चाळायला घेतला, आणि नॅशनल हायवे ४४ हा शीर्षक वाचला. मनात उत्सुकता निर्माण झाली काय बुवा असेल हे, पुढे वाचल्यावर समजले, हा एक आपल्या भारतातील थेट दक्षिणेचं एक टोक उत्तरेला जोडणारा देशाच्या मधोमध आखलेल्या सरळ रेषेप्रमाणे निर्माण केलेला एक एक्सप्रेस हायवे आहे. आणि त्याला नॅशनल हायवे ४४ नामकरण केले आहे. माझ्यासाठी हि नवीन माहिती होती. एकूण मजा आली, तब्बल ३७४५ किलोमीटर, ११ राज्य, ३५ दिवस, ३४ रात्री आणि ७ कलंदर भटके यांचा हा प्रवास..... प्रथम वाचण्यापूर्वी मी अंदाज केला त्यात काय हायवे पकडून सरळसरळ तर प्रवास करायचा आहे, त्यात वाटेत बरीचशी विश्रांतीगृहं पण असतील. पण जसजसं मी हा लेख वाचायला सुरुवात केली, तशी एक गोष्ट नकळतच माझ्या लक्षात आली हा काय साधा सुद्धा प्रवास नाही, मलासुद्धा प्रवासाची आवड आहे, बरेच जण हॉलिडे प्लॅन करतात , प्रत्येक प्रवासात आता अनेक ऑप्शन्स आले आहेत. वेगवेगळ्या ट्रॅव्हल एजन्सी आता ऍडव्हेंचर टूर, एजुकेशन टूर, ऐतिहासिक टूर, धार्मिक टुर, रोमान्टिक टुर अशा विविध नावांनी पॅकेजेस विकतात आणि नक्कीच रोजच्या धकाधकीच्या धावपळीतून रिलॅक्स होण्यासाठी, फॅमिलीसाठी थोडा क्वॉलीटी टाइम स्पेंड करायला हे पॅकेज टूर मदत करतात. हवं असलेल्या ठिकाणी आपल्या बजेटप्रमाणे मनोसक्त फिरता येते.
पण प्रवास हे फक्त रिलॅक्सींग नाही, हया लेखातून मला समजले. हया प्रवासातील ७ कलंदर भटक्यांनी आपल्या प्रवासातून मला प्रवासाची नवीन व्याख्या सुचवली. हयांचा प्रवास हा थेट कन्याकुमारीपासून सुरु झाला आहे आणि प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यावर वसलेल्या गावांचा इतिहास, तेथील संस्कृती, तेथील लोकांच्या समस्या, त्यांचे राहणीमान हया सगळ्या गोष्टीचा उलघडा घेत हा प्रवास चालू होता.
हया प्रवासात त्यांनी बऱ्याच विस्थापित, प्रगतशील शहरांना पण भेटी दिल्या. पण नक्की देशाची प्रगती आणि विकास काय आणि कशात आहे हे सुद्धा जाणवून दिले आहे. प्रवासात नवीन लोकांना भेटणे त्यांच्याशी संवाद साधने, त्यांच्या समस्या एकूण घेणे हि नवीन गोष्ट मला समजली. जर आपण कुठल्याही नवीन ठिकाणाला भेट देतो. पण तिथे जाऊन फक्त वरवरचं देखावे पाहून आलो तर काय प्रवास अधुराच.... जेव्हा आपण तिथल्या लोकांशी संवाद सादतो तेव्हाच त्या राज्याबद्दल किंवा त्या गावाबद्दल आपल्याला पूर्ण माहिती भेटते.
सध्या टेक्नोलॉजीचं माहेरघर असलेला बंगळुरू बद्दल उल्लेख केला आहे. एक जण त्याची नाराजी व्यक्त करताना सांगतो, "प्रॉब्लेम यह है कि यंग जनरेशनको सिर्फ पैसा कमाना आता है, जीना नही आता". बंगळुरू काय आपल्या मुंबईची पण हिच कहाणी आहे, लोकलच्या गर्दीत लोकांनी जगणं विसरले आहेत. आता काय तर नवीन हेल्थ प्रॉब्लेम, व्हिटॅमिन-डी ची कमतरता. सकाळी कोवळे ऊन येण्याअगोदर ऑफिसच्या एसी त शिरतो, तो थेट सूर्य मावळ्यानंतर बाहेर पडतो.... कुठून भेटणार कोवळे ऊन.....
हया प्रवासवर्णनातच हळूहळू विनाश पावणाऱ्या आपल्या कलासंस्कृतीचाही उल्लेख केला आहे.आपल्या भारतात विविध ठिकाणी प्रसिद्ध असलेले कलाकौशल्य जसेकी हातमाग, लाकडी खेळणी अशा विविध गोष्टी कष्टाने बनवणाऱ्या आपल्या भारतीय कलाकारांना त्यांच्या कलेची योग्य ती किंमत मिळतच नाही, मग कसे काय ते आपल्या पुढच्या पिढीला त्यांना उपजत असलेल्या कलेची विद्या देतील? आता त्यांना देखील वाटते आपल्या मुलांनी खूप शिक्षण घ्यावे, शहरात जाऊन बड्या पगाराची नोकरी करावी, जेणेकरून त्यांचे पुढचे आयुष्य सुखात जाईल.. आणि त्यात चूक काय आहे? पण त्याच वेळेला काही जण असेदेखील आहेत जे विदेशातील मोठ्या पगाराची नोकरी सोडून, भारतात आपल्या कुटुंबासह मानाने जगायला छोटा मोठा व्यवसाय करतायत.... अशाच छान छान गोष्टी हया लेखात आहेत.
हा लेख वाचायला घेतला तेव्हा हातातून ठेवावा असे वाटत नव्हते. प्रवासातील प्रत्येक दिवशी एक नवीन गोष्ट, शिवाय प्रवासही साधा सोप्पा नाही. तर भर पावसात अंधारातून मिळेल त्या ठिकाणी राहायचं आणि मिळेल ते खायची तयारी. पण खरंच एक रोमांचक प्रवासवर्णन आहे. हया प्रवासातील एका गावाची गोष्ट नक्कीच शेयर करावीशी वाटते.
हि गोष्ट आहे एका गावाची, त्या गावाचे नाव आहे बदकूट्ट. हे गाव विधवा स्त्रियांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. म्हणे हया गावातील सगळे पुरुष हे नॅशनल हायवे ४४ वर अपघाताने मेले. आणि हया गावात फक्त विधवा स्त्रिया आणि लहान मुले राहतात. हया गावावरची डॉकमंटोरीज पण जगभरात गाजल्या आहेत. प्रथम मलादेखील थोडे विचित्र वाटले. पण पुढे वाचल्यावर समजले, तसे काही नसून त्या गावातील बरेच पुरुष हे दारू पिऊन, आजारी पडून आणि काही रात्रीचे अंधारातून हायवेवरून दारू पिऊन येताना ऍक्सिडेंटने मेले. पण न्यूज चॅनेल्सना नेहमी काहीतरी नवीन मसालेदार खबर हवी असते म्हणून काहीतरी खोट्या बातम्या देऊन गावाला प्रसिद्ध केले आणि गावातील लोक सुद्धा गरिबीपोटी काही थोड्या पैशांसाठी खोटी ढोंगं करतात. अगदी त्यांचा पारंपरिक पेहराव घालून स्त्रिया मोठ्या मोठ्याने रडून दाखवत.
पण कसं आहे ना आपला देश एकीकडे विकसनशील असल्याचा दावा ठोकतो पण दुसरीकडे अजूनही प्राथमिक गरजा पुरेसं पाणी, दोन वेळेचं जेवण, औषोधोपचार अजून बऱ्याच गावात पोहोचल्या नाहीत. सगळं काही ऑनलाईन झाले, हि अशी गावे भारताच्या नकाशात आहेत पण विकासनशीलमधे त्यांचा वाटा आहे का?
मी हा लेख वाचून नक्कीच भारताने स्थापित केलेल्या हया नॅशनल हायवे ४४ चे कौतुक करेन, पण हया रचनेमुळे बऱ्याच जणांची राहती घरे, पिकते शेत, रोजीरोटी उध्वस्त झाले त्याचेसुद्धा वाईट वाटते.... पण आपले सरकार नक्कीच हया सर्व प्रश्नांची उत्तरं देईल.
एकूणच हा नॅशनल हायवे प्रवास आपल्या भारताची विविधता पण एकता दर्शवतो.... हया हायवेमुळे विविध राज्यातील लोक पोटापाण्यासाठी हवे तिथे आपले पुनर्वसन करू शकतात. एकूणच आपल्या देशातील दळण-वळण सोपे केले आणि टुरिजम पण वाढवले. शेवटी एकच इच्छा आहे कि एकदा तरी हया हायवेने भारत दर्शन करावे........
----
कविता ठाकूर
(HappyMyTrip.com)
संदर्भ: लोकमत दीपोत्सव २०१६- नॅशनल हायवे फोर्टी फोर | संकल्पना, संपादन : अपर्णा वेलणकर