बिन तात्पर्याची गोष्ट (नाटुकले - लहानग्यांचे)

[सोसायटीच्या नाटकांच्या स्पर्धेसाठी स्क्रिप्ट निवड करण्यासाठी जमलेली मुले]
[सोसायटीचं आवार...मुलं घोळका करुन काहीतरी डिस्कस करतायत. बरेच हातवारे...मतभेद वगैरे व्यक्त करुन झाल्यावर शेवटी मेजॊरिटी विन्स म्हणत निर्णय घेऊन रुद्रच्या बाबांकडे मदत मागायला रवाना होतात]
(रुद्रचे बाबा शिक्षक + लेखक आहेत)
(मुलं रुद्रच्या दारावरची वेल वाजवतात..रुद्रचे बाबा दार उघडतात..मुलं आत येतात)
रुद्रचे बाबा: आज काय सगळ्या मुलांचा मोर्चा माझ्या घरावर का?
रुद्र: मोर्चा काय रे बाबा! आम्ही तुझी मदत मागायला आलोय
बाबा: काय? कांदाभजी की वडपाव? कसली पार्टी उकळायचा बेत आहे आज?
रिया: आज यातल काही नकोय काका. आज फ़क्त नाटकाच स्क्रिप्ट निवडायला मदत हवेय.
बाबा: नाटकाच? अरे मग पुलं, सई परांजपे अशांच्या नाटकांपैकी काही बसवा
आर्यन: तेच तर काही सुचत नाहीये ना काका. तुम्हीच आमची मदत करा ना आता. प्लीज प्लीज प्लीज
बाबा: आमची मदत करा नाही रे, आम्हाला मदत करा असं म्हणतात
आर्यन: तेच ते हो काका काय ते, पण कराल ना मदत. प्लीज
बाबा: बरं बघू काय सुचतय ते.
(बाबा विचार करत डोकं खाजवत फ़ेऱ्या मारतायत...मुलं अपेक्षेने मानेनेच त्यांन फ़ॉलो करतायत)
(थोडा विचार करुन पॉझ घेऊन बाबा "युरेका" म्हणत समोर येऊन उभे रहातात)
बाबा: एक मस्तं गोड गोष्ट बसवा तुम्ही. रिया तू ये इकडे..(रियाच्या हाताला धरुन तिला एका जागी उभं करत) ह्म्म तर ही रिया होईल परीराणी, आर्यन तू हो दुष्ट राक्षस आणि रुद्र तू या राक्षसाचा ज्यात जीव असतो तो पोपट. ही परीराणी फ़ुलांवरुन उडत नाचत गात असते (दोन मुलं खाली झाडं पान बनुन दोन्ही हात वाऱ्यावर डोलवत बसलेली आहेत आणि ही परिराणी त्यांच्या हातांना टाळी देत गुणगुणत उड्या मारत चाललेय) तेव्हढ्यात..
(बाबाला अर्धवट तोडत तोंड वाकडं करत रुद्र म्हणतो)
रुद्र: ए बाबा, ही माझी लहानपणीची बेड टाईम स्टोरी झाली. ही नको. वी आर ग्रोन अप्स नाऊ
अनन्या: हो हो काका, ही नको ही फ़र चाईल्डीश होईल
बाबा: (चाईल्डीश आणि बेड टाईम स्टोरी या दोन्ही कमेन्टस ऐकून .. तुमची उंची किती? तुम्ही बोलताय काय? टाईपचा लूक देतात) बऽऽर! चाईल्डीश होईल तर कॅन्सल करुया ही बेड टाईम स्टोरी. दुसरी शोधू आपण एखादी
(थोडा विचार करुन) ही चालेल का जादुच्या शंखाची गोष्ट?
अनन्याला पुढे बोलवून - ही होईल यातली आई. रुद्र आणि रिया हीची मुलं. हे सगळे खूप गरीब असतात. आर्यन साधू महाराज. जो भाकरीच्या भिक्षेच्या बदल्यात जादूचा शंख देतो मुलांना आणि..
रुद्र: (बाबाला मधेच तोडत) ए बाबा! ही माहीतेय मला. तू मला गेल्यावर्षी बालनाट्य़ बघायला नेलेलीस तिथे ही बघीतलेय मी. ही नको. आणि जादू बिदू तर नक्कोच नको. अशी काय जादुची वस्तु नसते.
बाबा: अरे! एक कल्पनाविलास झाला तो. गम्मत असते अशा गोष्टींचीही एक
रुद्र: नाताळला सांताक्लॉज गिफ़्ट देतो तसं मलाही हवं म्हणतो तेव्हा म्हणतोस सांताक्लॉज इज नॉट रिअल. भंपक आहे ते सगळं. आण आता काल्पनिक गोष्टीत गंमत असते म्हणतोस.
बाबा: बरं राहीलं, ही नको तर नको. मग असं केलं तर? झाडे लावा झाडे जगवा...पाणि वाचवा, वीज जपून वापरा, प्लास्टिकचा वापर कमी कर असा काही सामाजिक संदेश देणारी स्क्रिप्ट निवडली तर? (प्रत्येक वाक्यासोबत तशी कृती करताना मागे दोन तीन जणं... म्हणजे झाडे लावा ...झाडे जगवा असं वाक्य येईल तेव्हा बॅकग्राउंडला एकजण मातीत झाड लावतोय (झाड म्हणून एक मुलगा खाली पाय मुडपून बसलेला) दुसरा पाणि घालतोय आणि रुजलेल झाड म्हणून तो मुडपून बसलेला मुलगा उभा राहून हात फ़ांद्यांसारखे पसरतोय).. पाणी वाचवा म्हणताना मागे एक जण पटापटा नळ बंद केल्याची ऍक्शन करतोय. हे सगळं चार कोपऱ्यात चार सीन्स क्रिएट केल्याप्रमाणे)
आर्यन: काका नको हा हे असलं काही. शाळेचा प्रोजेक्ट केल्यासारखं वाटतय ते.
बाबा: अरे पण हमखास बक्षिस मिळवून देतात असे काही विषय. त्यातून तुमची सामाजिक जाण दिसते. झालच तर तुम्हालाही सुजाण नागरीक बनायला या विषयांच्या अभ्यासाची मदत होते (शिक्षकी पेशाला अनुसरुन मुलांचा वर्ग घ्यायला सुरवात करतात)
(अनन्या रुद्रच्या दंडाला चिमटा काढून त्याला पुढे ढकलते आणि त्याच्या करवी त्याच्या बाबांचा तास संपवते)
रुद्र: ए बाबा! इथेपण शाळा नको ना रे घेऊस आमची. आम्ही ऑलरेडी आहोतच ते सुजाण बिजाण काय ते. सोसायटीच्या आवारात, गावातही रस्त्यावर आम्ही ना कसला कचरा फ़ेकतो ना येता जाता पानाच्या पिचकाऱ्या मारतो.
माझा खाऊ मला द्या चा वापर आम्ही नेहमीच करतो (इथे रिया कचरापेटीसारखा आ वासून उभी आहे आणि रुद्र तिच्या तोंडात पेपर मिंटची गोळी टाकतोय हे वाक्य म्हणताना)
प्लॅस्टीकही कमीच वापरतो, पाणि पण तर जपून वापरतो आम्ही. आम्ही आहोत सुजाण बिजाण काय ते.
रिया: हा आर्यन तर पाणी वाचवायला अधूनमधून अंघोळीलाही बुट्टी मारतो.
अनन्या: येस येस काका, वी आर फ़ुल्ली अवेअर ऑफ़ एन्व्हारयमेन्टल क्लॉजेस. सो नो मोअर सायन्स प्रोजेक्ट्स फ़ॉर अवर नाटक कंपनी प्लीज
बाबा: हे पण बाद? बरं ठीक आहे मग ते तुमचं लाडकं छोटा भीम, डोरेमॉन टाईप काही?
रिया: त्यावरची नाटकं आता आऊट डेटेड झाली काका
बाबा: रोज तर कान नाक डोळे सगळं त्या टिव्हीच्या खोकड्यात घुसवून तासंतास रिपीट टेलीकास्ट बघत असता त्याचे आणि म्हणे आउट डेटेड झाली
अनन्या: तिला म्हणायचं होतं काका की खूप कॉमन झालीत ती. अर्ध्याच्यावर मुलांच्या नाटकांच्या जाहीरातीत तेच तर दिसत. आम्हाला असं काही कॉमन नकोय
रुद्र: आणि बाबा भीम डोरेमॉनच बघायचे तर आम्ही कार्टून नेटवर्क लावून ओरीजीनलच बघू ना. त्यांचे नाटकातले डुप्लीकेट्स का बघू?
बाबा: (अवाक होऊन बघतात) बर मग हे ही बाद करु. मग असं केलं तर?
सगळे: कसं? कसं?
बाबा: अभ्यासाची नावड असलेल्या मुलाला अभ्यासाची कशी गोडी लागली त्यावर काही लिहीलं तर?
(सगळे चेहरा वाकडा करुन नापसंती दर्शवतात)
बाबा: हट्टं करण्याचे दुष्परीणाम, न ऐकण्याचे किंवा सगळ्या भाज्या फ़ळे असा चौरस आहार न खाता पिझ्झा बर्गर खाण्याचे दुष्परीणाम कळून एक मुलगा कसा बदलतो त्यावर स्क्रिप्ट केलं तर?
रुद्र: बाबा तू माझ्याबद्दल बोलतोयस का?
बाबा: नाही रे इन जनरल. तू काय हट्टी आहेस का फ़ारसा? तुला कुठे मॅकडीचा बर्गर, पिझ्झा हटचा पिझ्झा दररोज लागतो? चालतो की आठवड्यातून एकदाच मिळाला तरी
रुद्र: बाबा आता तू सरकॅस्टीकली बोलतोयस कळतय हा मला
आर्यन: काका हे असले प्रिची काही नकोच ना पण
बाबा: का रे पण? का नको प्रिची?
रिया: सतत चालूच असतं की हे असलं काही रिअल लाईफ़ मधे. शाळेत तेच, घरी तेच, सुविचार तसलेच आणि परत इथेही तेच?
(एक एक मूल पुढे येत म्हणतं)
असं वागा...तसं वागू नका
हे करा...ते करु नका
हे खा...ते नको
हे घाला....ते नको
अभ्यास करा... पाठांतर करा
होमवर्क झाला का?
टिव्ही फ़ार बघू नका
पुस्तकं वाचा अरे मुलांनो
मोकळ्या हवेत खेळा जरा त्या इडीयट बॉक्स समोर बसण्यापेक्षा
मस्ती कमी करा
पसारा आवरा
अनन्या: आणि हे सगळं आमच्या करताच हा फ़क्त. मोठे मुळ्ळीच असं वागत नाहीत
रुद्र: बरोब्बर. मोठ्यांना तरी आवडेल का त्यांना असं एक्स्पोज केलेलं? मग आम्हालाच का वेठीला धरता?
बाबा: एक्स्पोज? स्पेलिंग काय रे आणि डिक्शनरी मिनींग सांग बघू पटकन.मोठे काय वेड्यासारखं वागतात का त्यांना सुचना द्यायला?
रुद्र: बाबा प्लीजच हा. तुला बघायचय का मोठे कसं वागतात ते? थांब दाखवतोच
(सगळ्यांना बोलावतो. घोळका काही डिस्कस करतो आणि मग..)
रिया आणि आर्यन बोलत असतात
पल्लवीला बघीतलस का?
पल्लवी म्हणजे तिच ना ती नवीन आलेय अनन्याच्या शेजारी रहायला ती?
हो ग तिच.
तिच काय?
बघीतलं नाहीस आज तिला? कसली झगा मगा मला बघा स्टाईल कपडे घालून गेली ते. अशी मिरवत जणू ही मिस युनिव्हर्सच आहे

तितक्यात पल्लवी तिथे येते (पल्लवीच काम अनन्या करतेय)
रिया आर्यन: हाय! पल्लवी. कशी आहेस? ए वॉव! काय सुरेख दिसत्येस. तुझ चॉईस एकदम युनिक असतो हा
(फ़्रेम फ़्रीज)
रुद्र: बाबा आता हा सिन बघ
रुद्र सोफ़्यावर पसरुन फ़ोनवर मित्राशी बोलतोय: नाही रे जमणार आज यायला. यायची खूप इच्छा होती. अरे मग काय आपण समाजाचे देणं लागतो. ते फ़ेडायची संधी या निमित्ताने मिळत असते पण हे ऑफ़ीसवाले पण ना! वर्क प्रेशर रे सध्या वर्कलोड खूप आहे. आज रविवार असून मी ऑफ़ीसला सडतोय. नेक्स्ट टाईम पक्का. काउंट मी इन या सी यु बाय.

बाबा: अरे!असते कधी कधी मजबुरी. कोणी दुखावलं जाऊ नये म्हणून बोलाव लागतं कधीतरी खोटं
रुद्रः मग आम्हाला का सांगता "नेहमी खरे बोलावे" "हे करावे ते करु नये टाईप सुविचार
अनन्या: हो ना मी तर एकदा वैतागुन आईच्या सुचनांवर एक कविताच केली होती
बाबा: कविता? कोणती बर. म्हण बघू
(अनन्या सुरवात करते आणि मग सगळेच तिच्यासोबत म्हणतात)
आईची हाक आली;
पळापळा
कामाची यादी सांगते;
पळापळा
हे करुन ठेव;
ते भरुन ठेव
आंबे खूप खाल्लेस;
आता थोडं जेव
जेवणात काय?;
तर पोळी नि भाजी
महिन्यातून एकदाच म्हणे;
खावी पावभाजी
उन्हात नको जाऊस;
सनस्ट्रोक होईल
हात नको सोडूस;
पळवून कोणी नेईल
घड्याळाची टिक् टिक
आईची किट किट
थांबतच नाही
मनासारख वागता
येतच नाही

बाबा: अच्छा! म्हणजे थोडक्यात तुम्हाला सुचना असलेलं काहीच नकोय तर
सगळे: होच्च मुळी! नाटकात तरी अजिबातच नकोय.
रुद्रः त्या जातक कथांमधेही एक तो तात्पर्य नावाचा तापदायक प्रकार असतो शेवटी. निव्वळ धम्माल मस्तीची अशी बिन तात्पर्याची काही गोष्ट सुचव की रे बाबा
बाबा: ह्म्म! अशी गोष्ट फार फार प्रयत्न करुन शोधून काढावी लागेल रे. तोपर्यंत तुम्ही असं का नाही करत? सर्वांना नाटकातून तुम्हाला नेमकं काय हवय तेच का नाही सांगत. म्हणजे यापुढे कोणीतरी अशा बिनतात्पर्याच्या धम्माल गोष्टी लिहायलाही घेईल तुमच्यासाठी

सगळी मुलं: चालेल.

(प्रेक्षकांकडे बघत)
ज्यात नसेल शिकवणी
ज्यात नसेल सुविचार वाणी
गोष्ट म्हणजे गोष्टच नुसती
ज्यात निव्वळ धम्माल मस्ती

अशी बिनतात्पर्याची गोष्ट द्याल का लिहून आम्हाला?

(विशेष आभारः श्यामली. तिच्यामुळे हा प्रकार लिहून तरी बघुया म्हणून खरडून काढला.)

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle