" कस पसंत केलत हो तुम्ही एकमेकांना ? " आजी धडधाकट असताना आमच्या कौटुंबिक गप्पामध्ये एकदा तरी आजी आजोबांना हा प्रश्न विचारला जायचाच . कारण माझे आजोबा म्हणजे अमिताभ बच्चन आणि आजी जया भादुरी. स्वभावही दोन ध्रुवावरचे .. मग दोघेही गाल्यातल्या हसायला लागायचे. हसायला कारणही तसच. प्रश्न जसा ठरलेला तस ऊत्तरही ठरलेलं.
"आम्ही पसंत पडलो ते एकमेकांच्या आई बाबांना . तुझ्या आजीला सर्वात प्रथम पाहिल ते लग्नात . तोपर्यत कुठली बायको, कूठला नवरा आणि कुठल काय. वडील माणस सांग्तील ती पूर्वदिशा . त्यानीच ठरवायच , आम्हाला फ़क्त माळ घालायला ऊभ केल जायच " इति आजोबा.
" आजच्यासारख नव्हत आमच्या वेळेस . देवावर , वडील माणसांवर विश्वास ठेवून पुढच पाऊल टाकायच. संसार निभण हे पूर्णपणे नशिबावर अवलंबून " वयाचे ७६ पावसाळे पाहिलेल्या माझ्या आजीच स्वगत.
भारतात लग्न फ़क्त दोन माणसांची होत नाहीत. लग्न दोन कुटुंबाची होतात. मानापमानाच्या , देवाण घेवाणीच्या , रुढी परंपरेच्या, प्रतिष्ठेच्या तगाद्यात ज्यांच लग्न होणार असत अशांना गृहीत धरल जात. आजही या परिस्थितीत फ़ार फ़रक नाही. ऑनर किलिंगच्या बातम्या आजही ऐकू येतात. अरेंज मॅरेजच्या नावाखाली झालेल्या लग्नात ते दोन जीव खरेच सुखी आहेत हे फ़ारस मह्त्वाच नसत . शरद कटारिया दिग्दर्शित " दम लगा के हैशा " गोष्ट सांगतो अश्याच एका संसाराची ..
प्रेम प्रकाश तिवारी ( आयुषमान खुराणा ) ऊत्तर प्रदेशातील दहावी नापास , जुन्या कैसेटच दुकान असलेला एक सामान्य युवक. त्याचे रागीट वडिल ( संजय मिश्रा ) त्याच लग्न बीएड केलेल्या संध्या वर्माशी ( भूमी पेडणेकर) ठरवतात.गोल गरगरीत असलेल्या संध्याशी लग्न करायला प्रेम अर्थातच नकार देतो. मात्र वडिलांच्या दबावामुळे किंवा त्याहूनही घरची परिस्थिती सुधारायला त्याला होकार द्यावा लागतो. संध्याच्या बीएडमुळे एक कमावत माणूस घरात येणार असत. लग्नाला होकार दिला तरीही त्याचे आणि संध्याचे सूर जुळत नाहीत. छोट्या मोट्या गोष्टी घटस्फ़ोटापर्यत जातात. मात्र कोर्टाच्या नियमामुळे त्यांना सहा महिने एकत्र राहण भाग पडतं. घुसमटून जगत असतानाच पारंपारिक "दम लगा के हैशा " स्पर्धा जाहीर होते. जगण्याच्या, अस्तिवाच्या , नात टिकवण्याच्या धडपडीतून सुरु होतो प्रेम आणि संध्याचा प्रवास. हा त्यांचा यशस्वी होतो का, एकमेकांना नकोश्या अशी त्यांची परिस्थिती कायम राहते का, त्याम्च्या नात्याच पुढे काय होतं ?, चित्रपटात म्हटल आहे तसे प्रत्येक वेळी जिंकण महत्वाच नसून भाग घेण महत्वाच असत का ? या सर्वाची ऊत्तर चित्रपटात मिळत जातात.
चित्रपटाचा काळ ९० च्या दशकातला आहे. हा काळ सर्वाथाने भारतीय समाज, अर्थव्यवस्था यातील बदलाचा होता. बदल हा सापे़क्ष असतो. काही जण वाहत्या लाटेत तरतात. तर काही जण वाहून जातात. चित्रपटातील प्रेमच जुन्या कॅसेटच दुकान त्याच वाहण्याच्या मार्गावर आहे. कारण नवा जमाना कॉम्पक्ट डिस्कचा आहे. स्पर्धेत टिकून राहायच तर दुकानात बदल करायला हवेत , त्यासाठी पैसा हवा . अश्या वेळि संध्याशी लग्न हाच ऊपाय आहे. कारण दहावी नापास , फ़ारशी कमाई नसलेल्या प्रेमपुढे तसाही पर्याय नाही. संध्याची मात्र या प्रवासात घुसमट होते. नवर्याची नसलेली साथ, नावाला असलेला संसार, यात संध्याची मात्र फ़रफ़ट होते.
इंग्लिशमुळे दहावी नापास झालेला, त्यामुळे कुढत असलेला , वडिलांच्या दबावाखाली असलेला प्रेम आयुषमानने छान रंगवला आहे. त्याला आयुष्यात काही एक करायच आहे , इतर मुलांप्रमाणे त्याचीही अशी एक स्वप्न आहेत. त्याच वेळेस स्वतच्या मर्यादामुळे तो जगावर ऊखडलेला आहे. मित्राला सुंदर बायकॊ मिळाली , त्याला चांगली नोकरी मिळाली त्याच वेळेस स्वतच्या आयुष्यात मिळालेल दान पाहून मनात असलेली घुसमट पडद्यावर त्याने छान व्यक्त केली आहे. त्यात कुठेही आक्रस्ताळेपणा जाणवत नाही. संध्या झालेल्या भूमीने काम चोख बजावल आहे. पहिलाच चित्रपट असूनही तिच नवखेपण कुठेही जाणवत नाही. नवर्य़ावर मनापासून प्रेम करणारी, त्याच्या हिडिस फ़िडिस करण्याने, झालेल्या अपमानाने दुखावलेली, वेळ पडताच दोन शब्द सुनावणारी संध्या छान ऊभी केली आहे. या दोघांनाही बाकीच्या कलाकारांनी तितकीच तोलामोलाची साथ दिलेली आहे. संजय शर्माचा पुराणमतवादी बाप विषेश लक्षात राहतो.तलावावरचा प्रेम आणि संध्याचा शांत प्रसंग ऊल्लेखनीय आहे.
९०च्या दशकातल जुन ऊत्तर भारतातल शहर मनु आनंद या छायाचित्रकाराने पड्द्यावर सुरेख चितारल आहे. मला वाटत यात कला दिग्दर्शकाचाही तितकाच वाटा आहे.जुन्या पद्धतीची घर, तिथल वातावरण, गल्ल्या, लोकांच्या सवयी, जुन्या पध्दतीचे फोन, सार काही चित्रपटात सुंदर रीतीने मांडल आहे. चित्रपटातला नर्म विनोद ही सुद्धा एक मजेची बाजू. पहिल्या भागाच्या मानाने दुसरा भाग काहीसा संथ वाटतो . मात्र त्याने चित्रपट कंटाळवाणा होत नाही. ’ ये मोह मोह के धागे ’ गाण पडद्यावरही तितकच सुरेख अनुभवायला मिळत. पडद्यावर शांत गल्लीतल्या रस्त्यावर जुन्या बजाजवर जात असलेले प्रेम आणि संध्या त्याच वेळेस मोनालीच्या आवाजातल बॅकग्राऊंडला वाजत असलेल हे गाण खिळवून ठेवत.
चित्रपटाचा शेवट अपेक्षित आहे . मात्र अस असूनही आपल्याला नवीन काही अनुभवल्यासारख वाटत. शरद कटारियाने नेमके संवाद आणि प्रसंगातून कथा फ़ुलवली आहे. दिग्दर्शक म्हणून त्याच हे यशच. चित्रपटाच्या ओघात काही गोष्टी सहज येऊन जातात. कुमार सानूची एन्ट्री त्यापैकीच एक ! कुठलाही प्रसंग ओढून ताणून आणलेला नाही . सहज सुंदर असा चित्रपट बाहेर पडल्यानंतरही विशेष लक्षात राहतो.
व्यावसायिक गरज म्हणून चित्रपटात शेवट दाखवलेला असला तरीही प्रत्यक्ष आयुष्यात असा शेवट किती जोडप्यांच्या वाटेला येत असेल हा प्रश्न बाहेर आल्यावर पडला . रुढि परंपरेत अजूनही बंदिस्त असलेल्या भारतीय लग्न चौकटीत असे किती प्रेम आणि संध्या घुसमटत राहत असतील ! का ते लोक आजीच्या म्हणण्याप्रमाणे पदरी पडल आणि पवित्र झाल अस मानून चालत असतील कुणास ठाऊक !