मी लहान असतांना टी.व्ही. वर केल्विनेटरच्या रेफ्रिजरेटरची जाहीरात यायची. त्यांचा ब्रँड अँबॅसेडर होता अॅनिमेटेड पेंग्विन पक्षी. त्या केल्विनेटरच्या फ्रीजमधून तो पेंग्विन थंडीने कुडकुडत बाहेर यायचा आणि 'दॅट वॉज द कूलेस्ट वन' असं बोलायचा. तेव्हापासून पेंग्विन म्हटलं की 'ठंडा ठंडा कूल कूल' हेच फिलिंग येतं माझ्या मनात.
अंटार्क्टीका या ध्रुवीय बर्फाळ खंडातील हे पाण्यात पोहणारे आणि बर्फात चालणारे पेंग्विन्स, मुंबईत - राणीच्या बागेत आणले आहेत आणि तेही कायमच्या वास्तव्यासाठी हे तर सर्वांना माहीत असेलच. या पेंग्विन्सनी मुंबापुरीत दाखल होण्याआधीच वर्तमानपत्रे,सोशल मिडीयावर दणदणीत पदार्पण केलं. त्यांना कोण कुठून आणणार ? त्यांच्यासाठी राणीच्या बागेत काय आणि कसे बदल करणार? त्यांचे दर्शन केव्हा , किती पैसे देऊन मिळेल, या पेंग्विन्सच्या निमित्ताने गाजलेली राजकारणी खडाजंगी, तसंच ते इथे आले त्यावेळेस त्यांच्या स्पेशल बॅग्समधून त्यांना बाहेर काढतांच त्यांनी टाळ्यांच्या गजरात राणी बागेतील त्यांच्या खास कक्षात केलेला प्रवेश यांचे व्हिडीओजही आपण पाहिले असतीलच.
मार्चच्या दुसर्या तिसर्या आठवड्यापासून हे सारे वर्णन आणि त्यानंतर त्यांना बघायला उडालेली झुंबड, ती गर्दी नियंत्रणात आणायला बोलावली गेलेली आपत्कालिन व्यवस्थापनाची खास कुमक हे सगळं ऐकुन्/वाचुन लेकाला (आणि मलाही) वेध लागले राणीच्या बागेत, पेंग्विन्स बघायला जायचे. तसे मला याआधी ते तारापोरवाला अॅक्वेरिअम रिनोवेशननंतर बघायचेही वेध लागले होतेच. पण त्याचा काही अजून योग आलेला नाही.
या वेळी लेकाला म्हटलं की थांब जरा, थोडी गर्दी ओसरु दे. तोपर्यंत परीक्षाही आटपतायत तुझ्या. तसंही आमच्याकडे परीक्षांचा सिझन वगैरे काही नसतोच. सगळा आनंदी आनंदच. सगळे दैनिक व्यवहार, खेळ व्यवस्थित सांभाळत फावल्या वेळात उद्याच्या पेपरचा अभ्यास करायचा हे इतकं पक्कं आहे डोक्यात की परीक्षा झाल्यावरच पेंग्विन्स बघायला जायचे या दोन गोष्टींचा परस्परांशी काय संबंध? असेच भाव त्याच्या चेहर्यावर उमटले. पण मी आपलं माझ्या समाधानासाठी आणि 'अभ्यासपूर्ण वातावरण निर्मितीसाठी'
परीक्षेनंतरच्या शनिवारचाच प्लॅन केला.
आम्ही तिघे आणि लेकाचा एक मित्र असे जाणार होतो. किती गर्दी असेल आणि किती वेळ उन्हांत रांगेत उभे रहावे लागेल याचा अंदाज नसल्याने आईंनी घरातूनच पेंग्विन्सना कोपरापासून हात जोडले. अजून एक सीट गाडीत शिल्लक असल्यामुळे अजुन एका मित्राला प्रवेश मिळाला.
सकाळी दहा वाजतांच , मागे बसलेल्या ‘तीन होऊ घातलेल्या’ टीन एजरांच्या कूल गप्पा ऐकत चील होत आमचा टळटळीत उन्हात प्रवास सुरु झाला. या वयातील मुलांच्या गप्पा ऐकणे हा एक स्ट्रेस्बस्टर आहे. वयाने तशी लहानच पण स्वतःला आपण फार मोठे झालो आहोत, सगळं काही समजतंय आपल्याला असा आवेश मात्र असतो त्यांचा.
अर्ध्या तासात पोचलोही पण राणी बागेचं पार्कींग त्याआधीच फुल्ल झालेलं. मग आम्हांला खाली उतरवून बाबा पार्कींगच्या शोधात आणि मी त्रिदेवांसह तिकीट काउंटरवर. तिकीटे घेतली आणि डीझॅस्टर मॅनेजमेंटचे लोक दिसत होते त्यांच्याशी बोलून गर्दीचा अंदाज घ्यावा म्हणून त्यांच्याकडे चौकशी करु लागले. त्यांनी सुखद बातमी दिली ती म्हणजे अजून तरी विशेष गर्दी नाहीये आम्ही लवकर आल्यामुळे फार काळ वेटींग नसावं.. हुश्श्य...
बाबा आल्यावर आम्ही सारे आत गेलो. आत जाणारा प्रत्येक जण प्रवेशद्वाराजवळ जाऊन "पेंग्विन कुठे? पेंग्विन कुठे?" हेच विचारत होता. त्यामुळे कोणाला काही न विचारता पुढे गेलेल्यांना आम्ही फॉलो करु लागलो. घरात पाहुणे यायचे असतील तर आपण जसे घर आवरुन ठेवतो तसे काहीसे राणीच्या बागेचे झाले आहे. तिनं टाकलेली कात पाहून खरंच मस्त वाटलं. आखीव रेखीव बागा, नीटसपणे छाटलेली झाडे, फुले, रंगवलेले कुंपण, डेकॉरेटीव्ह कुंड्या., इतर प्राण्या- पक्ष्यांच्या पिंजर्यांचे चालू असलेले रंगकाम…एकंदरीत कलरफुल वातावरण होतं अधेमधे पाना-फुलांचा कल्पक वापर करुन कार्टुन कॅरॅक्टर्स बनवली होती. ते प्रत्येक कॅरॅक्टर एकेक सेल्फी पॉईंट झाला होता हे सांगायला नकोच. एक अशीच रंगीबेरंगी फुलांचा फ्रॉक घातलेली बाहुली दिसली आणि मी नकळत खेचल्यासारखी तिच्या दिशेने जाऊ लागले. नवरा म्हणतोय , "अगं तिथे कुठे जातेस? पेंग्विन या बाजूला आहेत". बाबाचा आवाज ऐकताच पुढे गेलेला लेक बाबाला म्हणतोय "बाबा, अरे आई तिथे सेल्फी काढून डीपी चेंज करुन येईल, तू थांब" किती ते आईला व्यवस्थित ओळखायचं :P
पेंन्ग्विन्स असलेली बिल्डींग नवी उभारली आहे. तिच्या आवारात स्टीलचे रॉडस लावून रांगेसाठी जागा आखली होती. सुदैवाने आमच्या आधी रांगेत थोडीशीच मंडळी होती. एका वेळी साधारण दहा ते वीस लोकांना आत सोडत होते. आत प्रवेशताच उजवीकडे मोठा ए. सी. हॉल लागला.साधारण २१ -२२ डीग्री तपमान असावं. पण उजवीकडे सम्पूर्ण पारदर्शक काच व त्याच्या पलिकडे पाणी होते. पाण्याच्या वरील भागात बर्फ होता. ते पेंन्विन चेंबर. तिथे 'स्नो वर्ल्ड'सारखं साधारण -२० ते -३० डीग्री तपमान स्थिर ठेवलं होतं. या चेंबरमध्ये सात पेंग्विन पाण्यात पोहत होते. आम्ही आत पोहोचलो तेव्हा आमच्यासमोर एकही पेंग्विन नव्हता. सर्व पलिकडच्या बाजूला होते आणि आधी आत गेलेली माणसे त्यांना बघत होती. म्हणून आम्ही आपले आजूबाजूला पाहू लागलो. तिथे अवतीभवती हेल्प डेस्क किऑस्क ठेवले होते आणि त्यांवर पेंग्विन्सबद्दलची माहिती देणारी फिल्म सुरु होती.आजूबाजूला अंटार्क्टीकाचा फिल येईल असे फॉल्स सिलिंग व इतर सजावट. छान केलंय , आवडलं आम्हाला. एव्हाना सिक्युरिटीच्या लोकांचे पुढे जा, पुढे जा सुरु झाले होते. आम्ही पुढील भागात पोचतोय तोच सातही पेंग्विन्स पोहत आधीच्या भागात. अर्र्रर हे काय? आम्ही मागे जाऊ लागलो तर आम्हाला अडवले गेले, नंतरची माणसे तिथे पोहोचली होती. पैकी दोन पेंग्विन्सच्या काय मनात आलं कुणास ठाऊक?आपल्याला बघायला आलेल्या पाहुणे मंडळींसमोर नीट वागायला हवं वगैरे काहीसं असावं.. ते दोघे यू टर्न घेऊन आमच्या समोर हजर झाले व पोहू लागले. मात्र सात पैकी एकाही पठ्ठ्याला पाण्यातून बाहेर येऊन, उठून उभे राहून माणसासारखे लुटुलुटु चालावेसे काही वाटले नाही. हे पोहणारे पेंग्विन्स तर मला सुरमईसारखेच वाटत होते. त्यांचा पांढरा रंग पाण्याखालीच गेला होता. पेंग्विन्स बघण्यातली मजा त्यांची चाल निरखण्यात अधिक आली असती. पण ते काही नशिबात नव्हतं.थोडावेळ तिथेच वाट पहायची आमची तयारी होती पण ड्युटीवरील सिक्युरिटीची नव्हती. बाहेर गर्दी वाढत होती आणि आम्ही बाहेर पडलो.
आलोच आहोत तर बाकीचे प्राणी-पक्षीही बघुयात असा विचार करुन सगळ्या बागेत फेरी मारली. इतर लोकही होते. पिंजर्यातले बगळे, करकोचे, माकडे, ससे, हत्ती माना वळवून आम्हाला पाहत होते. भल्या थोरल्या अंधार्या गुहेत चार चार वेळा डोळे फाडून शोधूनही न दिसलेले अस्वल, त्या गुहेबाहेर लावलेल्या फलकावरील सुचनेमुळे "कृपया अस्वलाला दगड मारु नये" ते अस्वल तिथे असणार अशी आम्ही मनाची समजूत करुन घेतली.....पेंन्विन्समुळे का होईना पण आपल्याला बघायला हल्ली गर्दी वाढलीये हे त्या प्राण्यांनाही जाणवले असावे. एकंदर सगळी राणी बाग या नव्या सवंगड्याला उद्देशून "तुम आ गये हो, नूर आ गया है' असं गात असावी असं वाटलं.
राणीच्या बागेतून बाहेर पडलो तर जेमतेम साडे अकराच वाजले होते. आता पुढे काय? याचं उत्तर त्रिदेवांनी दिलं - मुंबईदर्शन... मग आईचं आधीचं, बाबाचं, दुसर्या दोघांच्या आई-बाबांचं ऑफिस बघायला म्हणून बॅलार्ड इस्टेट, नरिमन पॉईंट, कफ परेड या सर्व भागांना भेट दिली. गेट वे ला जाऊन बोट राईड घेतली आणि कबाब्स बिर्याणी खायला दिल्ली दरबार. दिल्ली दरबारच्या समोर फुटपाथवर सटरफटर खरेदी करुन मी पण जीवाची मुंबई करुन घेतली आणि आमची वरात घरी पोचली.
घरी येताच आईंचा पहिला प्रश्न, "कसे होते पेंग्विन्स?"
पेंग्विन्स कसे होते?? कसे होते? ब्लँकच झाले मी एकदम. विचार करु लागताच पेंग्विन्स सोडून बाकीचा सर्व घटनाक्रम डोळ्यांसमोर आला. ती बोट राईड, ते शीग कबाब्स, ते मुलांसोबत हसणं खिदळणं सारं आठवलं पेंग्विन्स सोडून.
अचानक लहानपणीचा एक असाच प्रसंग आठवला. आम्ही सारे एका ट्रॅव्हल कंपनीच्या ग्रुप टूरने बंगलोर, म्हैसूर, उटी आणि तिरुपतीला गेलो होतो. तिरुपती दर्शनाच्या आदल्या रात्री टूर मॅनेजरने उद्या सकाळी लवकर निघायचे आहे, बराच वेळ रांगेत उभे रहायची तयारी ठेवा असा सुचनांचा भडीमार केला होता. ते ऐकताच ग्रुपमधल्या एका आजींनी जाहीर केले की मी दर्शनाला न येता इथे हॉटेलातच थांबेन. मला ते रांगेत उभे राहणे काही झेपायचे नाही. आम्ही बाकी सर्व ठरल्यानुसार दुसर्या दिवशी पहाटे निघालो आणि संध्याकाळी परत आलो. परत येताच आजीबाईंनी पहिला प्रश्न हाच विचारला होता की "दर्शन कसं झाल? बालाजी कसा आहे?" मला काहीच सांगता आले नव्हते. त्या मूर्तीसमोर काही क्षण उभे रहायला मिळाले होते. त्यामुळे ती मूर्ती नजरेत साठवताही नव्हती आली. रांगेत उभे असतांना ठिकठिकाणी ठेवलेल्या दक्षिणेच्या भल्यामोठ्या हुंड्या, ती केस कापत असलेली माणसे, एक रुपयात मिळालेल्या दोन अजस्त्र इडल्या आणि तसेच दोन सांबारात पोहणारे वडे आणि ते संपवत असतांना माझ्या आणि ताईच्या नाकी नऊ आलेले हे इतर तपशीलच स्मरणात होते.तसेच काहीसे आज झाले होते.पेंग्विन्स सोडून बाकी सारे आठवत होते.
पण काहीही का असेना, त्या सात पेंग्विन्सच्यामिषे आमच्या आयुष्यातील अजून एक दिवस चाकोरीबाहेरचा आणि एकदम 'कूल' झाला, हे फिलिंगच किती 'चील' आहे, नाही का? म्हणून हा एक 'कूल' अनुभव इथे पेश केला.