तर तो दिवस आला. म्हणजे तसा तो नेहेमीच येतो. पूर्वी त्या दिवसाच्या, त्याला भेटायच्या कल्पनेने सुद्धा माझ्या छातीत धडकी वगैरे भरायची, पण अलिकडे मी त्यावर मात केली होती. म्हणजे मी नेटाने त्याला सामोरे जायचे. अर्थात त्यात माझ्या धाडसाचा वाटा कमी आणि त्याच्या चांगुलपणाचा जास्त होता. पण ते असो. तर अपरोल्लिखित "तो" म्हणजे माझा केसकापक. "वाहनचालक", "परवानाधारक" सारखे "केसकापक" का नसते?
मला आठवत आहे तेव्हापासून माझे केस अगदी सुंदर पात्त्त्त्तळ होते. तरूणपणी मी उगीचच सिल्की वगैरे म्हणून पहायचा प्रयत्न केला पण ते काही खरे नव्हे. माझ्या केसांना "पातळ" हे एकच वर्णन लागू पडते. सगळे लहानपण आईच्या दोघी मैत्रिणींनी(एकत्र नव्हे वेगवेगळ्या वेळी) केस कापून दिल्यामुळे आणि मूळातच फॅशन, दिसणे, हेअर स्टाईल अशा कामांसाठी फारसा वेळ नसल्याने, केस कापून येणे हा फार काही ट्रॉमॅटिक अनुभव नव्हता. तेव्हा आजन्म सावित्री सारखा माझा ब्लण्ट कट असायचा. साधारण २ महिन्यानी, केस नेमून दिलेले आत वळायचे काम सोडून जत्रेत हरवलेल्या मुलासारखे भरकटायला लागले की कापायची वेळ झाली हे कळायचे. त्या मावशीला फोन करून मी येते गं रविवारी असे सांगून ठेवले की सुखेनैव पुढचे सगळे पार पडायचे. शिक्षणाकरता घर सोडल्यावर अजून बर्याच सुखांबरोबर हे सुख पण संपले. आणि सुरू झाले एक भीषण चक्र!
गल्लीतल्या छोट्या पार्लर पासून ते अतीव महागड्या सलॉन्स पर्यन्त कुठेही जा, आधी ती बाई किंवा बुवा माझ्या केसांना हात लावला की एकदम मेलेल्या पालीच्या शेपटाला हात लावल्यासारखे चेहरा करतात. चेहेर्यावर भाव असे असतात की याचसाठी का मी केस कापायला शिकलो/ले होतो/ते? देवा, हाच दिवस दाखवायचा होतास तर शिकवलेस तरी कशाला वगैरे वगैरे न बोललेले संवाद मला अगदी स्पष्ट ऐकू येत असतात. साधारण अडीच मिनिटे, शक्य तितक्या तुसडेपणाने आणि चेहेर्यावर अत्यंत हीन भाव घेऊन माझ्या केसांत खेळल्यावर सर्वसाधारण पणे शेकडा ९९% लोक "केस फार पात्तळ आहेत. काहीच नाही करता येणार" हे शब्द उच्चारतात. उरलेले १% लोक काहीच बोलत नाहीत, त्यांचा चेहेरा पुरेसा बोलका असतो. आजवर मी या वाक्याची मराठी, हिंदी, इंग्लिश आणि जपानी आणि बहुधा चायनीज, बहासा ईंडोनेशिया आणि फ्रेंच मधली व्हर्जन्स ऐकली आहेत. चायनीज, बहासा आणि फ्रेंच मला कळत नाही पण त्यांचा चेहेरा आणि माझा आजवरचा दांडगा अनुभव मला सगळे काही सांगून जातो.
मान्य आहे माझे केस पातळ आहेत पण ते वाढतात, एका ठराविक लांबीपेक्षा जास्त लाम्बी त्यांनी गाठली के ते अजून डाएट मोडमधे जाऊन अजून पातळ दिसायला लागतात. कुठल्याही प्रकारे त्या नाठाळ केसांना वठणीवर आणता येत नाही. सकाळी आरसा बघणे नकोसे होऊ लागते. अगदी जवळचे लोक (आई, नवरा, बहिणी) वगैरे त्यांना प्रेमानी उंदराच्या शेपट्या वगैरे म्हणायला लागतात. त्यामुळे मला केस कापावेच लागतात. जर हे असे काही झाले नसते तर मी कशाला दर वेळी त्यांच्या दारी गेले असते ना?तर माझी अशी माफक अपेक्षा आहे की हे त्यांनी समजून घ्यावे, केसांना तर ते देऊ शकत नाहीत तर मला तरी २ गोड शब्द बोलून आधार द्यावा, हे दु:ख आजन्म मला जपायचे आहे हे मला महिती असले तरी खोटे का होईना हे ही दिवस जातील असा विश्वास द्यावा. पण नाहीच. बहुधा, ब्यूटी ट्रीटमेंटस वगैरेच्या कॉलेज मधे ह्यूमन सायकॉलॉजी शिकवत नाहीत जगात कुठेच. तिथे देश, शहर, भाषा ओलांडून सगळे अगदी अगदी सारखेच वागतात.
अर्थात मी पण हार मानत नाही. कितीही जीवघेणा वाटला तरी दर २ महिन्यांनी मी या प्रकाराला सामोरी जाते. (न जाऊन सांगते कोणाला? पर्सिस खंबाटा सुंदर तरी होती.)गंमत म्हणजे, एकदा तुझ्या केसात काही राम नाही, नाईलाज म्हणून मी माझी कात्री तुझ्या डोक्यावर चालवणार आहे आणि परिणामांची कोणतीही जबाबदारी माझी नाही हे स्टॅम्पपेपर वर लिहिल्यासारखे संवाद आमच्यात होऊन गेल्यावर तरी पुढचा प्रवास नीट असावा. तर तो ही नाही. म्हणजे मी आता सलॉन ची लॉयल कस्टमर झाले आहे, परत परत कोणी ही हीन वागणून देउ नये म्हणून दुप्पट पैसे देऊन मी तोच/तिच हेअर आर्टिस्ट मागितली तरी परत ते माझा अपमान करून दाखववात. अरे, तूच या केसात काही अर्थ नाही म्हणलास ना? मग तू नुसत्या कात्री फिरवलेल्या आणि मी नुसता कंगवा फिरवलेल्या केसांमधे २ महिन्यांमधे काय जादू घडणार आहे? का परत परत तेच बोलतोस? हे असे दोनदा अपमान झाले की मी निमूटपणे सलॉन बदलते आणि नव्या दमाने, नव्या ठिकाणी, नव्या आर्टिस्ट कडून अपमान करून घ्यायला तयार होते.
पण या सगळ्या सिक्वेन्स मधे २ वर्षापूर्वी एक बदल झाला. रोजच्या जाण्यायेण्याच्या वाटेवर एक नवीन देखणे सलॉन नुकतेच उघडले होते. काचेतून काहीबाही दिसायचे, अल्पावधीतच गर्दी पण वाढली होती. माझ्या अपमानाने पोळलेल्या मनाने परत उचल खाल्ली आणि मी अपमानाची अपॉइंटमेंट घेतली पण. फोनवर कोण आर्टिस्ट हवा असे विचारले तेव्हा पहिल्यांदाच येत आहे त्यामुळे माहिती नाही असे म्हणल्यावर त्या सुंदरेने वेबसाईट वर आर्टिस्ट चा बायोडेटा आहे असे सांगितले. अगदीच कोणी पण चालेल गं, माझे केस ते किती असे म्हणायचा मोह आवरून बावळट दिसू नये म्हणून मी फोन बंद करून वेबसाईट पाहिली. पण कोणाचेच चेहेरे दिसत नव्हते. म्हणजे साईटला प्रॉब्लेम नव्हता पण सगळ्या आर्टिस्ट्सचे केस एवढे त्यांच्या चेहेर्यावर आले होते की काहीच दिसत नव्हते. खाली त्यांचा बायोडेटा होता, त्यामधे प्रत्येकाची केशकर्तन आणि केशरंजन स्पेशालिटी लिहिली होती. शिवाय खाली त्यांचे टोपणनाव होते. त्यांचे जन्म ठिकाण, छंद, आवडता पदार्थ, हॉलिडे डेस्टिनेशन, आवडता कोट पण लिहिले होते. माझ्या चिमूटभर केस कापण्याचा आणि या सगळ्याचा संबंध काय हे माझ्या आकलनशक्तीच्या पलिकडे होते. (या सगळ्यातून त्या आर्टिस्टची पर्सनॅलिटी कळते म्हणे. आणि तुमचा तिथला वेळ त्यांच्याशी गप्पा मारत छान जातो म्हणे. डोईवर भरघोस केस असलेल्यांसाठी छानच सोय होती की. माझ्यासारखीला अगदीच निरूपयोगी! )असो. मग अक्कड बक्कड करून आणि त्यातल्या त्यात ज्याच्या नावाची कांजी(चित्रलिपी) सहज वाचता आली असा बाबा निवडला आणि फोन केला. नेमका तो सुट्टीवर होता, आता परत ते छंद वाचणे आले का असा विचार करेपर्यंत पलिकडची सुंदरा म्हणाली की पुढच्या आठवड्यापर्यंत थांबायची तयारी असेल तर बघा. जास्त विचार न करता त्याला बुक केले आणि तो आठवडा अनामिक हुरहुरीत गेला. त्या बाबाचे काही कौतुक नाही, दरवेळी सलॉन बदलताना ही हुरहूर दाटून येतेच.
ठरलेल्या दिवशी त्या मिस चमको वाल्या पिक्चर प्रमाणे,मळलेला शर्ट कसा तुम्हाला देऊ प्रमाणे, तेलकट, चिप्प केस कसे तुला दाखवू, म्हणून तिथे करायचा असून पण शॅम्पू वगैरे करून माझ्या परीने बरी दिसत मी वेळेवर हजर झाले. जरा वेळाने मागून तो आला. चक्क केस चेहेर्यावर नव्हते. स्वछ चेहेरा दिसत होता. अर्थात त्याच्या फोटोमधे त्याच्या चेहेर्यावर एवढी जुल्फं होती की, फोटोवरून मी मागितलेला आर्टिस्ट आणि हा एकच हे कळायला काहीच स्कोप नव्हता. त्याच्या छातीवरची नेमप्लेट खरी असावी बहुतेक. ती वाचता येत होती मला.तर हा महानुभव, २७ वर्षांचा असून, तोक्योमधेच लहानाचा मोठा झाला, अमेरिका आणि पॅरिस मधे शिकून आलेला आहे आणि त्याला करी-राईस आणि बीफ कटलेट्स खायला आवडतात, सुटीच्या दिवशी त्याला मासेमारी करायला आणि जपानी ढोल बडवायला आवडतात एवढी भरभक्कम आणि निरूपयोगी माहिती माझ्याकडे होती. आता हा खाल्लेल्या करीला राखून माझा कमी अपमान करणार का पेशाला जागून तात्काळ आणि भरपूर करणार एवढाच सस्पेन्स बाकी होता. तेवढ्यात त्याने हवापण्याच्या गप्पा सुरू केल्या. अशा उन्हाने केस/स्किन कशी कोरडी पडते वगैरे बोलायला लागला. चल बाबा माझे केस बघ ,अपमानाच्या प्लेझंटरीज लवकर संपव आणि मला रिकामे कर एवढेच माझ्या डोक्यात होते. पुढच्या मिनिटाभरात त्याने माझ्या केसात हात घातला आणि कसे कापायचे आहेत असे विचारले. इथे बोलायची पाळी त्याची होती, त्याने केसाला हात लावताक्षणी त्याबद्दल घालून-पाडून बोलणे आणि चेहेर्यावर ते फेमस भाव दाखवणे मला अपेक्षित असल्याने मी बावळटासारखी बघत बसले होते. पण १० सेकंद गेले, २० सेकंद गेले तरी पठ्ठ्या काही बोलेना, भरीस भर म्हणजे केसात हात फिरवणे पण थांबवेना. न राहावून मीच म्हणले की माझे ना केस खूप पातळ आहेत. त्यावर हरकत नाही, असतात बर्याच जणांचे असे म्हणून परत माझे बोलणे अपेक्षेने ऐकू लागला. मला कळणे बंद झाले होते. हे सगळे मला नवीन होते. गहिवरून येऊन घशात हुंदका दाटल्यासारखे वाटायला लागले होते एव्हाना. याला अनुभव नाही म्हणावे तर बायोडेटा मी वाचला होता. शेवटी खरंच हा चांगला माणूस आहे किंवा या सलॉन मधे सुट्टीच्या दिवशी ह्यूमन सायकॉलॉजीचे क्लासेस असतात असे मनातल्या मनात निष्कर्ष काढून मी बोलू लागले. खूप खूप मनात साचून राहिलेले सगळे बोलून घेतले. त्याने पण समजून घेतले आणि माझ्या पाठीवर थोपटून माझे सांत्वन केले.(म्हणजे असे मला वाटले, तो प्रत्यक्षात मसाज करायला सुरूवात करत होता.) पण एकूणच पुढचा एक-दीड तास मी स्वर्गात होते. त्या आनंदात मी त्याला चिकन करी बनवायचे नुस्खे पण सांगितले आणि जपानी ढोलाचा इतिहास पण ऐकून घेतला!!केस कापून झाल्यावार आरसा पाहिल्यावर देखिल त्याच्या बद्दलच्या भावना कायम राहिल्या. म्हणजे खरंच सुंदर कापले होते केस. मी भावनेच्या भरात केलेला "मला ना माझ्या केसांना जरा व्हॉल्युम हवा आहे" हा लाडिक हट्ट सुध्धा त्याने त्याच्या परिने पुरवला होता.मला अगदी त्याला घट्ट मिठी वगैरे मारावीशी वाटत होती, पण एकतर त्याच्या कमरेला एक मोठे लेदरचे म्यान गुंडाळले होते, ज्यात त्याने कात्र्या, कंगवए आणि अजून पण काय काय अगम्य उपकरणी ठेवली होती, आणि दुसरे म्हणजे आजूबाजूला गिर्हाइकं होती. पुढचे काही दिवस केसांतून सारखा हात फिरवणे, उगाचच आरसा पहाणे, सारखे त्याच्याबद्दल बोलणे वगैरे षोडशवर्षीय उद्योगही करून झाले. नवरा बिचारा गरीब आहे. समजून घेतो तो हे सगळे.
तर दिवस असे मजेत चालले होते. मी भलतीच धाडशी झाले होते. केस कापायला जायची वाट वगैरे बघायचे. एकदा हिंमत करून मला ना एकदा केस कलर करायचे आहेत असे म्हणल्यावर त्याने "ठाण्याहून/येरवड्याहून्/मिरजेहून आलात काय?" असा चेहेरा न करता मला सुंदर ऑरगॅनिक कलर पण करून दिला होता. परत एकदा भावनेच्या भरात त्याला तुझी मागच्या किंवा ह्या जन्मीची गर्लफ्रेंड माझ्यासारखी दिसते का वगैरे विचारणार होते पण मनाला आवर घातला. तेच हो, आजूबाजूची गिर्हाइके दुसरे काय!!पण भगवंताला हे सुख फार काळ बघवले नाही बहुतेक. मागच्या वेळी केस कापता कापता सहज बोलावे तसे म्हणला, की आता आमची मॅनेजमेंट सगळी बदलणार आहे. त्यामुळे मी पण आता तोक्यो सोडून दुसर्या शहरात जाईन. मी एवढ्या जोरात मान फिरवून पाहिले की त्याच्या हातातून कात्री पडली. आजूबाजूचे पण बघायला लागले. पण बातमी १००% खरी होती.साश्रू नयनांनी त्याचा निरोप घेऊन, शेवटच्या माझ्या सुंदर केसांकडे बघत आणि त्याचे गोड वागणे आठवत बाहेर पडले.
मनाला समजावत होते की मॅनेजमेंट बदलली तरी तेच सलॉन आहे, कदाचित सगळेच जण इथे सायकॉलॉजी शिकत असल्याने चांगले असतील. जग आता बरेच पुढे गेले आहे, कस्टमर हा देव असतो, तू भरपूर पैसे देतेस तर अपमान सहन करून घेऊ नकोस ना..वगैरे वगैरे..होता होता २ महिने उलटले आणि परत एकदा माझ्या केसांनी आपले मूळ रूप धारण केले. एका दिवशी मनाचा हिय्या करून वेब्साईट बघून एक बरासा बाबा निवडावा म्हणले तर वेबसाईट अण्डर कन्स्ट्रक्शन होती. मग सरळ फोन करून पलिकडच्या सुंदरेला, या शनिवारी हजर असणार कोणता पण बाबा/बाई चालेल असे सांगून अपॉइंटमेंट घेऊन टाकली.
नुकतेच उद्घाटन झाले असल्याने, रिसेप्शन लॉबी फुलांच्या गुच्छांनी भरून गेली होती. नेहेमीच्या सुंदारांपासून आतल्या आर्टिस्ट आणि त्यांचे युनिफॉर्म सगळेच बदलले होते. मला धडधडायला लागले. तेवढ्यात एका सुंदरेने मला आत नेऊन खुर्चीवर बसवले आणि माझ्या समोर "योगा फॉर मेंटल पीस" आणि " हाऊ टू लूक सेक्सी विथ जस्ट ५ सेट्स ऑफ क्लोद्स" अशी २ मॅगझिन्स दिली. तिचा तो चॉईस बघून तिने माझ्याबद्दल काय कल्पना केल्या असाव्यात असा विचार करण्यात मी गढले तेवढ्यात तिने एका कडे बोट दाखवून हा तुझा आर्टिस्ट, त्याचे काम संपवून ५ मिनिटात तुझ्याकडे येईल असे सांगितले. त्याचा चेहेरा दिसत नव्हता केसांमुळे. मागच्या वेळी निरूपयोगी वाटणारी छंद वगैरेची माहिती पण नव्हती या वेळेला त्यामुळे अधिकच हरवल्यासारखे वाटत होते. तो माझ्याकडे येताना दिसल्यावर चटकन कोणते मॅगझिन उचलावे म्हणजे जरा आपले बरे इंप्रेशन पडेल असा विचार करताना हाती लागलेले "योगा फॉर मेंटल पीस" घेऊन बसले. तेवढ्यात आलाच तो. पुढच्या सगळ्या घटना अगदी वार्याच्या वेगाने घडल्या. दिडच मिनिटात त्याने माझ्या केसांचा पक्षी माझा घनघोर अपमान केला, कलर केलात लवकरच विग लावायची वेळ येईल हे आजूबाजूच्या लोकांची पर्वा न करता सांगून टाकले. मी काहीही केले तरी तुझ्या केसांना व्हॉल्यूम येणार नाही ही काळ्या दगडावरची रेघ असे सांगून हे सगळे कमी म्हणून की काय मला ऑटोमॅटिक शॅम्पू मशिन कडे घेऊन गेला. मी बळी द्यायला निघालेल्या बकर्यासारखी त्याच्याबरोबर जाऊन ते ऑटोमॅटिक शॅम्पू प्रकरण आणि पुढचे केशकर्तन उरकले. मागून त्याने आरसा दाखवल्यावर उरल्या सुरल्या आशा पण संपुष्टात आल्या. केस कापले म्हणण्यापेक्षा त्याने कुरतडले होते.
हताश होऊन, माणूसकीवरचा विश्वास उडून तिथून बाहेर पडले खरी पण आता पुढचा प्रश्न मोठा आहे. अपमान गिळून तिथेच परत जायचे की परत नवीन ठिकाणी हेच चक्र सुरू करायचे. अजून एकदा तिथे हा अनुभव घेतला जी स्टँपकार्ड पूर्ण भरून मला डिस्काउंट मिळेल. त्यामुळे अजून एकदा तरी त्याला संधी द्यावी म्हणते.