सगळ्यात शेवटी भेटलेला वसंत हा माझा जुना कलीग. वसंत कुलकर्णी. अजूनही त्याचं वय माझ्या वयाच्या दुपटीपेक्षा जास्त आहे. पण वसंत हा तसा 'मैत्रीखोर' माणूस असल्यामुळे नवीनच आलेला पोस्टग्रॅडही वसंतला फार न घाबरता वसंत म्हणू शकतो. थोडा वातावरणाचाही भाग असावा. वसंत आणि त्याच्या दोन तृतीयांश वयाच्या त्याच्या आणि माझ्या, (म्हणजे मित्र माझेही) मित्रांच्या म्हणण्यानुसार मुलींशी मैत्री करण्यासाठी वसंत फार उतावीळ असतो. मागे एकदा म्हणे त्याच्याकडे समर स्टुडंट म्हणून काम करायला कोणीही मुलगी तयार न झाल्यामुळे त्याने एक टेप ड्राईव्ह असूयेचा अटॅक आल्यामुळे मोडला होता. पाच-सात समर-स्टुडंट्समधे एकच मुलगी होती आणि साधारण तेवढ्याच लोकांनी समर प्रोजेक्ट्सचे गाईड म्हणून काम करण्याची तयारी दाखवली होती. पण त्या मुलीने ज्याच्याबरोबर प्रोजेक्ट केलं त्याच्याबद्दल वसंतला तेव्हा फारच राग होता. मी त्याच फॅकल्टीबरोबर एका पेपरवर काम करत होते. वसंत अधूनमधून त्यावरून माझ्यासमोर गॉसिप मारायचा. मला त्यात फार गंमत वाटायची. उगाचच बायकांना bitching करण्याबद्दल बदनाम करतात. असो, मुद्दा असा की वसंत आणि माझी मैत्री व्हायला फार वेळ लागला नाही.
डोक्यावरचे केस उडत चाललेले, उरलेले पांढरेच. मध्यम उंची, मध्यम बांधा आणि शांतपणे चालणं. कन्नडीगा तसे बेंगरूळच असतात अशी प्रतिमा पक्की करणारे कपडे. वसंतचं मूळ गाव बेळगाव. मातृभाषा कन्नडा. मराठी समजते... असं तो म्हणतो. मी कधी त्याच्याशी मराठीत काही बोलले नाही. काही पिढ्यांपूर्वीच त्याचे पूर्वज पुण्याहून बेळगावला गेले असले तरीही वसंतकडे तसा पुणेरी बाणा चिक्कार आहे. त्यातला एक मुख्य मुद्दा म्हणजे "तू काही सदाशिव पेठेतली नाहीस. तुझं मराठी काय प्रमाण मराठी नाही." असं तो मला नेहेमी प्रमाण भारतीय इंग्लिशमधे ऐकवत असे. प्रमाण मराठी कोणतं, तर ग्रंथपाल सुनीता मुळची सदाशिव पेठेतली, ती पुण्यात पूर्वी सायकल चालवायची, नंतर अनेक वर्ष स्कूटर चालवते, तिचं मराठी हे प्रमाण मराठी. वसंत आवडीने मराठी सारेगमप वगैरे पहातो, बहुतेक त्याला त्यातली ती भावगीतं वगैरे वयानुसार आवडत असणार. आणि मला ते फार बोअर होतं. म्हणून त्याला मराठीबद्दल माझ्यापेक्षा अधिक प्रेम. म्हणजे निदान असं तो तरी समजतो. वसंतला मी कधीही मराठी बोलताना ऐकलेलं नाही. ऑफिसातल्या बाकीच्या अॅडमिनच्या लोकांशी तो हिंदी किंवा इंग्लिशमधे बोलत असे. मी कधी त्या लोकांशी गप्पा मारायचे तेव्हा हे लोकं मला विचारायचेही, "ते कुलकर्णीसाहेब काय बोलतात ते तुम्हाला समजतं का?". वसंतच्या तोंडातल्या तोंडात बोलण्याची सुरूवातीला सगळेच गंमत करत असत. काही काळानंतर सवय झाली की तो काय बोलायचा ते समजायचं... किंवा असं आपणच समजून घ्यायचं. मी एकदा त्याला (अर्थातच इंग्लिशमधून) म्हटलंही, "वसंत, मी असं-असं मराठी संस्थळांवर मराठीत लिहीते. तिथे मला कोणी माझं मराठी 'खराब' असल्याचं सांगितलेलं नाही. तिथे चिक्कार पुणेकरही आहेत." वसंतने ते कधीच मान्य केलं नाही. पण आम्ही दोघं कधीच सुनीताची साक्ष काढायला गेलो नाही. आमचं दोघांचंही सुनीताबद्दल चांगलं मत असल्यामुळे भांडणापायी तिच्या गुडबुकातून जाण्याची भीती बहुदा वाटत असावी.
मी तिथेच नोकरी करत असताना वसंत निवृत्त झाला. त्याने सगळ्यांना कँपसवरच डिनर-पार्टी दिली. आम्ही पुख्खा झोडला. आता चहाबरोबर वसंतच्या गप्पा नाहीत असं काही फार जाणवलं नाही. पण मला ऑफिसातून कॅण्टीनमधे जाताना काही दिवस एकटेपणा आला. आम्ही बर्याचदा एकत्रच कॅण्टीनला जायचो. वसंत अधूनमधून कँपसवर येत असे, आठवड्यातून दोनेक दिवस. त्याची खासगी इंपाला आहे, ती बरेचदा कँपसवर दिसत असे. इंपाला म्हणजे रिक्षा. तो रिक्षावाला वसंतच्या ओळखीचा होता. ठराविक वेळेला वसंतला इंपालामधे लिफ्ट मिळत असे. कँपसवर बँक आणि डॉक्टर असल्यामुळेही वसंतच्या फेर्या होत असत. एक दिवस वसंतला स्कूटर चालवता येते असाही शोध आम्हाला, म्हणजे पोराटोरांना, लागला. वसंत निवृत्तीनंतरच एक दिवस ऑफिसात आला होता. दुपारी बाराच्या सुमारास माझ्या ऑफिसात आला. "तुझी अॅक्टीव्हा आहे ना?" त्याला विद्यापीठाच्या आवारात दोन-चार ठिकाणी कामं होती, 'उन्हातून कोण चालणार' म्हणून स्कूटर हवी होती. मला काहीच अडचण नव्हती. मी नेहेमीप्रमाणे सव्वा-दीडच्या सुमारास जेवायला कॅण्टीनमधे गेले. वसंत आणि माझे (तेच ते दोन लाईनमारू, मध्यमवयीन) मित्र मला येताना पाहून जोरजोरात हशा-टाळ्यांची देवाणघेवाण करायला लागले. माझं जेवणाचं ताट घेऊन तिथे गेले तर म्हणे, "तुझ्या स्कूटरचे इंडीकेटर्स चालत नाहीत. तुम्हां पोरींना आम्ही एवढे प्रेमाने वागवतो ("हं, प्रेमाने काय!") आणि तू अशी मोडकी स्कूटर देतेस मला? मला या वयात काही झालं असतं म्हणजे?" मला काही समजेचना! "वसंत, चिल माडी!" मी एक जालीय ड्वायलाक मारला. वसंत माझ्या तोंडून "माडी" ऐकून उडलाच. पण पट्टा सुरूच होता. शेवटी एका मित्राला बोलायची संधी मिळाली, "वसंत, तू इंडीकेटर लावून पुण्यात गाडी चालवतोस? बरा आहेस ना? आत्तापर्यंत एकही अपघात नाही झाला तुझा?" वसंत आता दमला होता. मग मलाही संधी मिळाली, "इंडीकेटर मोडले आहेत म्हणजे? मी कालच रात्री साडेबारावाजता बाहेरून परत आले. अंधारात मला तर दिसले इंडीकेटरचे दिवे चमकताना. रात्री थंडीने मोडले का काय दिवे?" वसंतचा चेहेरा फुलला, "आवाज करत नाही तो कसला इंडीकेटर!" अन्य दोन मित्रांनी माझी 'मोडकी' स्कूटर आणि वसंतचं ड्रायव्हींग यावरून स्वतःची भरपूर करमणूक करून घेतली. वसंतनेही, मुलींनी ओढणी घेऊन स्कूटरवर बसताना काळजी घेतली नाही तर काय होतं, याचा एक प्रसंग सांगितला. तशी ती गोष्ट बरेचदा ऐकलेली असल्यामुळे, मी नेहेमीप्रमाणे नाव ऐकण्याचा प्रयत्न करून बाकी दुर्लक्ष केलं. हा प्रसंग नक्की कोणाच्य बाबतीत घडला होता ते मला अजूनपर्यंत समजलेलं नाही.
वसंत हा 'मेड इन इंडीया'च्या पहिल्या पिढीचा रेडीओ अॅस्ट्रॉनॉमर. गोविंद स्वरूपांनी भारतात रेडीओ टेलिस्कोप बनवले. त्यांच्या चेल्यांपैकी एक वसंत. मूळ शिक्षण सॉलिड स्टेट फिजीक्समधे. तेव्हा तो TIFRमधे होता. गोविंदनी त्याला तिथूनच उटीला नेला. तर वसंत असाच एक दिवस चहाला आला होता. एप्रिल महिना, दुपारचे चार वाजलेले. आम्ही कँटीनबाहेर झाडाच्या सावलीत, घाम पुसत चहा-कॉफी-सरबतं घेऊन उभे होतो. कोणाचं कशावर फार प्रेम आहे, अशी चर्चा सुरू होती. वसंतकडे नजर फिरली. "माझं सॉलिड स्टेट फिजीक्सवरच खरं प्रेम आहे. पहिलं प्रेम हेच खरं." आम्ही तरूण पिढीने वसंतकडे फार आश्चर्याने पाहिलं. सिनीयर मंडळींना हा विनोद माहितीचा असावा. दोन मध्यमवर्गीय मित्रांचा चेहेरा डँबिस आनंदाने फुललेला दिसलाच. वसंतने आम्हां पोराटोरांकडे पाहिलं, "खरं प्रेम आहे म्हणून तर सॉलिड स्टेट फिजिक्स सोडून अस्ट्रॉनॉमी केलं ना आयुष्यभर!"
दुसरा वसंत भेटला किंवा न भेटला त्यांना मी वसंत असं तोंडावर कधीच म्हटलं नाही. पण डोक्यात कायमचं बसलेलं 'वश्या'. वडलांपेक्षा दहा-पंधरा वर्षांनी वश्या **** मोठा असेल. उगाच आडनाव सांगून ओळख कशाला जाहीर करा?
आमच्या ओळखीतले, आमचे बा-बापू वगळता, बाकीचे लोक त्यांचा उल्लेख वश्या आठवले किंवा वश्याकाका असा करत. अर्थातच आमच्या वयाचे लोकं मोठ्यांसमोर वसंताकाका म्हणायचे आणि मोठे लोकं वसंता. पण तृतीयपुरुषी उल्लेख 'वश्या' असाच. आम्ही लहान होतो तेव्हा वसंताकाका हेच ऐकत आलो होतो, पण एकच अपवाद होता तो म्हणजे बाळमामाचा.
हा काही नात्याचा मामा नव्हे, आई-बाबांचा मित्र. मामा वसंताकाकाचा उल्लेख न चुकता "वश्या भडवा" असाच करत असे. भडव्या आणि भोसडीचा हे शब्द काही मोठे लोकं वापरतात आणि काही मोठे लोकं वापरत नाहीत अशी माझी लहानपणची समजूत होती. (मोठं झाल्यानंतर ते खोटं नाही याचा साक्षात्कार झाला.) मामी त्याला बर्याचदा ओरडायची, "अहो, पोरांसमोर भाषा सांभाळा तुमची! त्यांच्या समोर काय शिव्या घालता?" अशा वेळेस मामा आपल्याला कानच नाहीत असा आव आणून बाबांच्या दिशेला बघत असे. माझा असा अंदाज आहे की बाबा मामीला आमच्या मागे सांगायचे, "पोरांसमोर बाळ्याला बोलू नकोस. असे शब्द वापरणं शिष्टसंमत नाही असं आमच्या पोरांना समजलं तर ते उगाच आणखी चौकशा करतील. त्यापेक्षा बाळ्याचं जे चाल्लंय ते काही वाईट नाही." आमच्याकडे मामा बरेचदा यायचा. आमच्याशीही चिक्कार गप्पा मारायचा. "गणपतीशप्पथ तुला सांगतो मन्या ..." असं म्हटलं की ते खोटं असतं अशी शेजारच्या सोहोनी काकांची थिअरी. पालीच्या गणपतीची मामाने शपथ घेतली की हे काहीतरी धडधडीत खोटंच असतं, अशी आमची लहानपणापासून समजूत होतीच. मामाचा पालीच्या गणपतीवर फार विश्वास आहे. दर चतुर्थीला त्याचा उपासही असतो, रविवार असेल तरीही! असो. तर मुख्य विषय वसंता काकाचा.
माझा वसंताकाकाशी फारसा संबंध आला नाही कधी. तो काही बाबांचा जवळचा मित्र नव्हे. बाबांचे बहुतेकसे मित्र एकतर मध्यमवर्गीय इंटुक, कॉलेजातले मास्तर, किंवा संघवाले. वसंताकाका प्रामाणिकपणे यांच्यातला एकही नसावा. मध्यम उंची, वयाप्रमाणे आलेलं स्थौल्य, डोक्यावर पांढर्या, तुरळक केसांची झालर आणि एकदा चेहेरा पाहिला तर पुन्हा लक्षात न रहाण्याची शक्यता बरीच जास्त. कदाचित तरूण वयात वसंताकाका तसा सरासरी हँडसम असावा ... अशी शंका वसंताकाकाची मुलगी पाहून येत असे. मामाच्या भाषेत वसंताकाकाच्या मुलीचं वर्णन ... नको, नकोच ते! पांढरपेशा शेंडीगोपाळांनी हे वाचलं तर त्यांना उगाच त्रास होईल. वसंताकाकाच्या गुडघ्यांचा काहीतरी प्रॉब्लेम असावा. त्याचे दोन्ही गुडघे एकमेकांकडे वळलेले होते. त्यामुळे तो थोडा विचित्र चालत असे. वरच्या मजल्यावरच्या संघवाल्यांकडे तो आला असेल आणि वेळ असेल तर आमच्याकडेही यायचा. बाबांचे आणि त्याचे काही कॉमन संघवाले मित्र होते, हेच बहुदा बाबा आणि त्याचं "कनेक्शन". घरी आला तर बाबा आणि काका काहीतरी बोलत असत, ते न ऐकण्याची आम्हाला दोघा भावंडांना परवानगी होती. त्यामुळे वसंताकाका घरी आलाच तर आम्ही दोघं आतल्या खोलीत बसून गॉसिप मारणार हे समीकरण नेहेमीचंच होतं. त्यातून वसंताकाकाही हाफप्यांटवालाच. एकंदर संघवाल्यांचं वेळी-अवेळी घरी येणं, घरी आल्यानंतर भारतीय संस्कृतीवरून विशेषतः मला पकवणं वगैरेंमुळे आम्ही बाबांच्या या मित्रांपासून लांबच रहायचो. वसंताकाका त्या सुक्या लाकडांमधे ओल्यातला होता हे बाबांच्या मागे लक्षात आलं.
त्याला आम्ही दोघं शिंग फुटेपर्यंत वसंताकाका म्हणायचो. यथावकाश त्याचं दोघांपुरतं नामकरण केलं. कारण मामाच. मामा त्याच्या चालण्याची अशी काही नक्कल करायचा की त्याचं नाव 'शिशिर' ठेवावं का 'ग्रीष्म' यावरून माझं आणि भावाचं भांडण झालं. शेवटी अभिव्यक्तीस्वातंत्र्यच खरं असं मानून आम्ही दोघांनी 'agree to disagree' यावर समेट केला. कधी सोयीसवडीनेही नाव ठरवलं जात असेल. भाऊ चहा करणार असेल तर मी त्याच्या नावालाच मत देत असे; बाबांनी चहा केला तर मी माझा हेका सोडत नसे. यथावकाश मित्रमंडळात 'वश्याकाका' किंवा 'वश्या'ही झालं.
मामाचं घर तळमजल्याला. आमच्या घरापासून अगदीच जवळ आणि नेहेमीच्या जाण्यायेण्याच्या रस्त्याला. वसंताकाका त्याच इमारतीत रहात असे. मामाकडे चिक्कार प्राणी-पक्षी होते. कबूतरं, पोपट, लव्हबर्ड्स असं काय काय होतं. हे सगळे पक्षी घराबाहेर भिंतीला लागून पिंजर्यांमधे होते. कबुतरं मात्र दारात जो पॅसेज होता त्यावर माळा बनवून त्यावर. एक कुत्रा तर पाहिजेच पाहिजे. माझ्या लहानपणी एल्सा नावाची डॉबरमन होती. काही महिने तर त्याच्याकडे गिधाडही होतं. कोणालातरी सापडलं. या आमच्या वरणभात लोकांना काय माहित गिधाडाचं काय करायचं ते! जखमी होतं. मामाकडे आणून सोडलं. मामाकडे त्या काळात कबूतरं, पोपट, लव्हबर्ड्स आणि एक गिधाड होतं. वसंताकाका रोज त्याच्या नातीला खेळवायला खाली घेऊन यायचा आणि पक्षी दाखवायचा. वसंताकाका बाहेर उभा दिसला की आम्ही मामाकडे जाणं टाळायचोच. का कोण जाणे! बहुदा त्याचं कारणही मामाच असावा. शनिवारी संध्याकाळी बरेचदा मामा आमच्याकडे डोकावून जात असे. अधूनमधून मामाचा वैतागही दिसायचा, "हा वश्या भडवा रोज नातीला खेळायला घेऊन येतो. कधी पोपटासाठी एखादा पेरू नाहीतर मिरची आणली तर याच्या बोच्याला मिरची लागणारे का? पण बाळ्या करतोय ना, मग बघा फुकट!" बोचा हा शब्द मला खूप आधीपासून माहित असला तरी अर्थ फारच उशीरा समजला.
हा वसंताकाका कधी आमच्याशी फार बोलत नसे. आम्हीपण त्याला टाळतच असू. शेवटचं त्याला कधी भेटले होते कोण जाणे! ठाणंही कधीचंच सोडलंय.
तिसर्या वसंताला मी कधीच भेटलेले नाही. हा वसंता बहुदा माझ्या जन्माआधीच मेला असावा. त्याच्या मरणाचा कोणाला कधी शोक झाला होता का नाही असाही प्रश्न पडत असे. कारण हा वश्या मामाचा कुत्रा होता. आणि या कुत्र्याचं नाव मामाने वसंताकाकावरून ठेवलं होतं. तसा मामाकडे मोरेश्वर नावाचाही एक कुत्रा होता म्हणे! वसंताकाका बिल्डींगबाहेर पडताना दिसला की मामा घरातूनच ओरडायचा, "वश्या भडव्या, कुठे शेण खाल्लंस रे?" आणि पुन्हा बाहेर बघत, "नाही, या आमच्या वश्याला ओरडतोय मी!" वसंताकाका खरंतर एवढा गरीब होता की तो "हो" म्हणून जात असे.
(पूर्वप्रकाशित.)