ह्या गोल गोल ग्रीलच्या खिडकीतून ती आणि तो दिसतायत...
ती सोफ्यावर लोळत मोबाईलवर काहीतरी मिम्स बघत पडलेली... तो खालच्या कार्पेटवर झोपून इनटू दि वाइल्ड ओएसटी ऐकत सिलिंगकडे एकटक बघत असलेला...
मध्येच ती मोबाईल बाजूला ठेवून,
"ऐक... मला माहित्ये एक दिवस तू ठरवशील... तू जेव्हा ठरवशील तेव्हा सगळ्यात आधी येऊन मला सांगशील? तू असं ठरवतो आहेस म्हणजे कदाचित त्यावेळी आपण एकमेकांशी बोलतही नसू, मी कुचकट बनले असू शकेन, भांडखोर आणि शिष्टसुद्धा बहुतेक ... पण तरीही मला फक्त इतकं वचन हवं आहे कि तू आधी मला येऊन सांगशील. मी अडवेन किंवा नाहीही... मी मदत करेन किंवा नाही कदाचित पण आय जस्ट वांट टू नो, ओके?"
तो बघून हसत पडल्या पडल्या वचन द्यायला हात पुढे करतोय आणि ती सोफ्यावरून त्याच्या हातापर्यंत तिचा हात पोचवायचा प्रयत्न करते आहे.
...
पलीकडच्या हिरव्या फ्रेमच्या खिडकीतून बातम्या ऐकू येत असताना
जाळीच्या पडद्याआडून , पिवळ्या प्रकाशात हलणारी त्याची सावली...
"ही सिटीझन केन माझी आहे कि तुझी?.. कोणाचीही का असेना, मी नेतोय. तुला एनीवे आवडत नाहीच असले सिनेमे... " समोरच्या खोक्यात सीडी टाकत तो पुढच्या सिड्यान्कडे वळत...
ती तिच्या मिनी माउस शर्ट आणि हाफचड्डीत दाराच्या चौकटीला टेकून उभी. कधीतरी घाईघाईत कपाळावरची चंद्रकोर काढून चौकटीवर लावली होती, त्या टिकलीचा उरलेला चिकटपणा नखाने खरवडत उभी.
"ही उश्यांची कव्हरं... नवीन पंचे मी आणले होते हे खादी भांडारातून... तू काढले असलेस तरी माझे फोटो आहेत हे... ह्या निळ्या प्लेट्स... चहाचं पातेलं... हे स्टूल... ओशो चपला... पिवळी छत्री... ह्या फ्रेम्स माझ्या आहेत... हळद... फर्स्ट एड कीट... ब्रश... प्लास्टिक पिशव्यांची पिशवी... पडदा... बाटलीतलं जहाज... कार्पेट... तो आरसा...हे दिवे, हे बल्ब ... अगं थांबव ना मला...थांबव प्लीज!!"
त्याने बाजूला काढलेल्या स्टूलवर चढत शेजारच्या खोक्यातल्या नवीन पंचाने खोलीतला बल्ब काढून देते आहे.
...
एका फ्रेंच खिडकीतला तो उभा आहे खिडकीकडे पाठ करून... पहाटेच्या थंडीत तो आतून उघडा आणि वरून लोकरीची शाल गुंडाळून रेडीओ ट्यून करत उभा असलेला...
एका बाजूला सिगरेटची रांगोळी ... दुसऱ्या बाजूला मिंटच्या चांद्यांच्या बाहुल्या...
डोळे सुजलेले... लाल झालेले... गरम झालेले...
अनोळखी भाषेतल्या स्टेशनला येऊन रेडीओ थांबलाय आता... अनोळखी गाण्यावर डुलत, शाल घट्ट गुंडाळत उभा आहे तो...
...
बाथरूमच्या मोठ्या खिडकीतल्या टबात पडून ती गाते आहे. गाता गाता पाण्यात डोकं बुडवून बघत्ये पाण्याखाली गाता येतं का बघायला...
"ओके आय विल सिंग अ सायलंट सॉंग नाऊ... तू त्यावर नाच काय.. चालेल?"
तो फ्लश करत उठतो. तिच्याकडे बघत तयार उभा राहतो.
ती तोंड हलवायला लागते, हातांनी ताना पकडायला लागते, मधेच हेडबँगिंगही... तो वेड्यासारखा हातपाय हलवत नाचतोय. हवेत तरंगल्यासारखा नाचतोय, कंटेंपररी नाचतोय मग मधेच गरबा करतोय , मधेच हवेतल्या पार्टनरसोबत वाल्ट्झ करतोय, हवेतला पतंग उडवत मांजाही फिरवतोय...
ती अचानक थांबते. तो मागे वळून तिच्याकडे प्रश्नार्थक बघतो.
"साईड ए संपली.. बी लावत्ये थांब"
...
एका कडेकोट बंद खिडकी पलीकडे तो पेपर वाचत बसलाय. ती सुडोकू सोडवत त्याच्या पायाला टेकून बसली आहे.
"बाजूला होऊन बस कि गं जरा... पायाला मुंग्या आल्यात. "
ती उठून त्याच्या हातातला पेपर बाजूला करून त्याच्या मांडीवर जाऊन बसते आहे.
...
भांडी वाळत घातलेल्या खिडकीच्या आत ती ओट्यासमोर उभी राहून नुडल्स खाते आहे.
कुकरची दुसरी शिट्टी वाजते आहे.
कित्येक वर्षात खाल्लं नसेल इतक्या अधाशीपणे ती नुडल्स खात्ये... ओठांच्या कोपऱ्यात लागलेला सेझ्वान झोंबतोय आता तेव्हा मोठ्या बाटलीला तोंड लावून पिताना पाणी सांडतं आहे पण हु केअर्स? ती पुन्हा नुडल्स कोंबते आहे. शेवटचा नुडल खाऊन झाल्यावर पाणी पिऊन ढेकर देत चायनीज टेकऔटचे पुरावे नष्ट करते. तिसऱ्या शिट्टीनंतर वरणभाताचा कुकर बंद करत खिडकीतून तो आलेला दिसतोय का बघते आहे.
...
घोरण्याचा आवाज येतोय बाजूच्या अर्धवट बंद खिडकीतून...
दोघंही आळीपाळीने घोरत झोपलेत. दोघांच्याही कानात बोळे घातलेले.
ती मधेच चळवळून उठली आहे. त्याच्या नाका-तोंडावर हात ठेवते आहे, त्याला कुशीवर ढकलते आहे.
"झोपू दे यार" दोघं एकत्र म्हणतायत.
...
"मी ठरवलं आहे"
"ओके! आणि कसं ते?"
"खिडकीतून उडी मारणारे!"
"कोणत्या?"
दोघं एकमेकांच्या पाठीला टेकून खाली बसतात.. त्यांच्या घरातल्या शंभर खिडक्यांमधून शेवटची खिडकी कोणती निवडावी ह्याचा विचार करत. कुठल्याश्या खिडकीबाहेरच्या रातकिड्यांचा आवाज ऐकत!!