स्नेहश्रीला खुप घेराचा साध्या पॅटर्नचा अनारकली ड्रेस शिवुन हवा होता तर मॅडमनी मला त्यासाठी ऑर्डर दिली. वे़ळेअभावी मी पुर्ण ड्रेस शिवुन न देता सेमीस्टीचड् शिवुन द्यायचे कबुल केले. तिला वाईन कलरमधे ब्रासो नेट चे मटेरीयल हवे होते, ते आमच्या कडे (बोईसरला) मिळाले, पण अस्तराचे कापड मिळाले नाही. तिने कलर कॉम्बिनेशनसाठी एक वेबसाईट सुचवली, पण त्यातले सेम कॉम्बिनेशन्स बोईसरला मिळणे मुश्कील होते, म्हणुन स्वतःच्या मनानेच एक कॉम्बो शोधला आणि कापड विकत घेतले.
स्नेहश्रीला मोठा घेर हवा होता. आजपर्यंत मी २४ कळ्यांचा (मागुन १२ कळ्या , पुढुन १२ कळ्या) अनारकली शिवला होता, पण मोठा घेर आणण्यासाठी ४० कळ्यांचा अनारकली शिवण्याचे ठरवले.
अनारकलीच्या कळ्या पाडणे आणि त्या शिवणे हा खुप कीचकट , त्रासदायक भाग आहे. तो झाला की ८०% काम पुर्ण होतं, त्याचवेळी ऑफीस मधे काम वाढल्याने थकुन भागुन आणि पी.एम.एस. ची दुखणी संभाळत कळ्या कट करुन शिवुन घेतल्या. नंतर पॅटर्न बनवलं , बिझिलिझी मटेरीयलमधे अस्तर विकत घेउन अस्तराला ही पुढुन मागुन अश्या १२-१४ कळ्या पाडल्या आणि सेमीस्टीचड् ड्रेस स्नेहश्रीला स्पीड पोस्टने पाठवुन दिला.