अग्निशिखा

परवाच पाली महागाव रस्त्यावर ही अग्निशिखा भेटत राहिली. घनदाट जंगल, सभोवताल हिरवागार निसर्ग,मोठाले वृक्ष आणि पसरलेल्या वेली, हिरवागार गवत चारा, देशी गाईंची खिल्लारे आणि अशा पाचुबेटांमधून मधेच डोकावणारी अग्निशिखा मन वेधून घेत होती.

 

अग्निशिखा, तामिळनाडूचे राज्यपुष्प ट्रॉपिकल हवामानात फुलणारी ही  औषधी वनस्पती लिली म्हणून पण ओळखली जाते. मोठ्ठाली ठळक रेषांची पाने,हिरव्याचाफ्यासारखी आत मोदक करणारी पाकळ्यांची रचना,पराग कणांचा बाहेर पसरता फेर फार लोभस दिसतो.

 

पलाश, पांगारा चक्क वैशाख वणव्यात फुलणाऱ्या विरागी शिखा आणि या अशा समृद्ध हिरव्या राज योगात बहरलेली ही अग्निशिखा म्हणजे ऐश्वर्य आणि वैराग्य या दुर्मिळ योगातल्या परमेश्वरी सारखी भासते. विपुलता, संपन्नता आणि विद्द्येच्या आराध्याचे तसेच जेष्ठाकनिष्ठांचे आगमन ,लक्ष्मीचे स्वागत आणि अलक्ष्मीचे विसर्जन सुचविणारा भद्र असा भाद्रपद चालू आहे. ह्या वातावरणात 'दिपज्योति नामोस्तुते' म्हणणारी ही अग्नीशीखा मनात कोरली जाते.

 रश्मी भागवत.

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle