प्रिय काकूस,
अनेक अनेक नमस्कार. पत्र लिहीण्यास कारण की आज तुझा ८१वा वाढदिवस आणि आज आम्ही तो सर्व जवळची मंडळी साजरा करणार आहोत. तुझ्या वाढदिवसाची चर्चा नुसतीच तुझ्या घरी नाही, तर आमच्या घरीही सुरू होती. काय करायचं?, तुम्हा लोकांचे काय प्लान आहेत? वगैरे वगैरे...
मग अचानक गेल्या आठवड्यात विद्यावहिनीचा फोन आला ठरलं, की आज ‘तुझा’ वाढदिवस साजरा करायचा. विचार करता करता लक्षात आलं की ८१ वर्षे, बापरे! किती हे मोठं वय... मी तुला किंवा तू मला माझ्या जन्मापासून ओळखत आहोत, पण तरीही तुझा उत्साह बघितला की मला अजूनही खरं वाटत नाही की तुझं वय ८१ वर्षे आहे.
८१ वर्षे.. बापरे! कधी संपली? कळलंच नाही.. म्हणजेच खरोखर वाटत नाही की.. असो! कधीपासून ते आठवत नाही, पण जेव्हापासून आठवत तेव्हापासूनच मी तुला कायम चिकटलेली असायचे. खरंच नाही आठवत काकू, बहुदा तिसऱ्या-चौथ्या महिन्यापासूनही असेल. मला नेहमी आठवते ते दात घासणे, मी ’दिपक’मधल्या किचनच्या बाजूला असलेल्या बेसिनजवळ उभी असायचे आणि तू बोटाने माझे दात घासायचीस, ’ईईईई कर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र’ करून. मग झाले की म्हणायचीस, “बघ! किती मोत्यासारखे दात आहेत तुझे" :) आंघोळीपासून रात्री झोपेपर्यंत कायम तुझ्याबरोबर असायचे, तुझ्यामागे असायचे शेपटासारखे.
कायम दादा मला चिडवायचा, अर्थात आता हा वारसा ’चिन्मय’ चालवतो. शब्द दोनच असायचे ’आई माझी आहे’ पण ते दोन शब्द पचवणंसुद्धा किती कठीण होतं, ते तुला माहितीच आहे. माझे ते ठरलेले शब्द, “नाही! माझी आहे” म्हणून. आता खूप हसू येतं, पण तेव्हा डोळ्यातलं पाणी कधी खळायचं नाही. तू काय.. काका काय.. तुम्हीच माझे खरे वीकपॉईंटस. माझ्या, सुमित-आई-बाबा-आजी इतकेच.
कायम साडी नेसताना मला तुझी आठवण येते. आठवतं काकू? रोज ऑफीसमधून तू आणि आई घरी आलात की आपला एक कार्यक्रमच असायचा. तू नेसलेली साडीच मला नेसायला हवी असायची. त्याचे पुरावे म्हणजे फोटो बघताना अजून त्या गोष्टी आठवतात. अजून आठवतात त्या तू सांगत असलेल्या गोष्टी, बहुदा माझ्या इतक्या त्या गोष्टी अजून कुणी ऐकल्या नसतील. दोन कोळिणींच्या व बडा राक्षस - छोट्या राक्षासाच्या गोष्टी, खरं ना?
मला अजून आठवतं ते १९८६ साल, तेव्हा तुम्ही ’दिपक’ सोडून ’चिंतामणी’मध्ये गेला होतात ते. आपल्याला सगळ्यांनाच एकमेकांच्या सहवासाची सवय झाली होती की सोडून जाणं जामच कठीण होतं. मग दर शनिवारी रविवारी तुम्ही ’दिपक’मध्ये येणं किंवा आम्ही ’चिंतामणी’मध्ये येणं आपला कित्येक महिन्यांचा उपक्रम/ दिनक्रम होता.
आई-बाबा काश्मिरला गेले असताना तू, आजी, काका आणि आजोबांनी मला सांभाळलं होतं, तेव्हा रात्री झोपताना मी रोज सांगत असे तू माझ्याकडे तोंड कर म्हणून. किती तो बालहट्ट! :)
तशीच गोष्ट माझ्या माळेची, तुझ्या गळ्यातल्या माळेसाठी मी कायम हट्ट करायचे आणि गळ्यात घालून बसायचे. :)
पुढची गोष्ट फक्त आपल्या दोघींमध्येच :) :) :)
तुझं आणि वहिनीच्या नात्याचं उदाहरण तर मी कायम देत असते. एकदा परंपरा सुरू केली की आम्हीही सुरू ठेवणारंच.
काकू, आपल्या कुटुंबाला धरून कोणी ठेवलं असेल तर ’तू’ आणि ’काकानेच’. कायम दोघांनी ’आपल्या’ कुटुंबाला सांभाळून घेतल्यामुळे आपण सगळे आज एक आहोत.
काकू, तुला मी अनेक रुपांमध्ये बघितलंय. वहिनींपासून ते आजेसासुच्या भुमिकेत. कितीही छोटं मूल असो वा आमच्यासारखं मोठं, तुझा लळा प्रत्येकालाच आहे.
अगदी गणपतीपासून ते आपल्या घरी असलेल्या लग्नापर्यंत सगळ्याना तूच हवी असतेस. सगळ्या म्हणतात, ’मोठ्या वहिनी आहेत ना मग काही काळजी नको’
अशी सगळ्यांना हवीहवीशी तू आज ८१ वर्षांची होत आहेस. तुला अनेक अनेक शुभेच्छा!!!!
खरं सांगू? हे पत्र खूपच अपूर्ण आहे. आज सकाळी सुचलं ते पटकन उतरवत आहे मी, असो.
अजून छान आरोग्यदायी आणि हसतमुख जीवन जग.. आम्ही सगळे तुझ्याबरोबर आहोतच की. :)
तुझी (स्वघोषित) लाडकी पुतणी,
स्नेहश्री