‘आई’ ह्या दोन अक्षरी शब्दात केवढं तरी आपलं विश्व सामावलेलं असतं. आई हे एक अजब रसायन असतं. मुलींना लग्न झाल्यावर, व स्वतः आई झाल्यावर खर्या अर्थाने आईपण कळायला लागतं. 'थोर आई' म्हटलं की आपल्याला आठवते जिजाबाई शिवाजीसारख्या महापुरूषाला घडवणारी! त्याच काळातील सामान्य अशी हिरकणीसुध्दा असामान्य असं दिव्य करून जाते ते आईपणाच्या बळावर. सामान्यातल्या अश्या कितीतरी असामान्य आया असतील, त्यांच्या बाबतीत आपल्याला ‘नाही चिरा, नाही पणती’ असं म्हणावं लागेल. माझ्या आईच्या निमित्ताने अश्या समस्त अनामिक आयांसाठी ही शब्दरूपी पणती उजळण्याचा हा छोटासा प्रयत्न!
माझी आई म्हणजे आमच्या चार भावंडांची आई, तीन बहिणी व एक भाऊ! आताची ‘शशिकला भालचंद्र जोशी’ आणि पूर्वाश्रमीची ‘काशी कानिटकर’, तिच्या आठ भावंडांमध्ये दोन नंबरची. मुलींमध्ये थोरली त्यामुळे सगळ्यांची ‘काशीताई’, बहुतेकांसाठी हीच तिची ओळख! राष्ट्रसेविका समितीची कार्यकर्ती! आजोबाही संघाचे कार्यकर्ते व त्याकाळचे फर्ग्युसनचे विद्यार्थी, एमए एलएलबी झालेले, पण इंग्रजांची चाकरी करायची नाही, ह्यावर ठाम व जोडीला भाऊबंदकी. त्यामुळे आलेल्या खडतर व हलाखीच्या आयुष्याचा सामना तिच्या संपूर्ण कुटुंबाला करावा लागला. एकंदरीत अश्या कठीण परिस्थितीत तिने मॅट्रीकची परीक्षा रसायनशास्त्र व गणित विषयासह खामगावला जाऊन दिली व उत्तीर्णही झाली. पुढे ही शिकण्याची अनिवार इच्छा परिस्थितीवश मनात विरून गेली.
१९५५ साली वडील कर्नाटकातील धारवाडचे भालचंद्र जोशी ह्यांच्याशी विवाह झाला. दोन्ही घरात भाषेसकट सगळ्याच बाबतीत प्रचंड तफावत होती, त्यामुळे पदोपदी तिला जुळवून घेण्याची कसरत करावी लागली. संसाराला हातभार म्हणुन नऊ वर्ष नोकरी केल्यानंतर, सगळ्यात धाकट्या बहिणीच्या जन्मानंतर तिला सांभाळायची सोय नसल्यामुळे नोकरी सोडावी लागली. त्यातच वडिलांचं काही कारणाने झालेलं संसाराकडे दुर्लक्ष, त्यामुळे आर्थिक चणचण व मानसिक त्रास, असा अत्यंत कठीण काळ होता तो. त्यातही ती धीराने उभी राहिली व खाजगी शिकवण्या घेऊ लागली. कालांतराने पुन्हा नोकरी मिळाली व त्यामुळे गाडी रुळावर आली. त्यात आम्ही दोघी जाणत्या झालो होतो. एकीकडे कौटुंबिक आघाडीवर सुखी व समाधानी असताना, दुसरीकडे वडिलांची गंभीर स्वरुपाची आजारपणं (किडनी ऑपरेशन, पॅरेलेसिस, घश्याचा कॅन्सर) ह्याच्याशीही यशस्वी लढा देत होती. दरम्यान दोन खोल्यांच्या भाड्याच्या घरातून स्वतःच्या हक्काच्या घरात राहायला येणे, ह्या इतकी दुसरी आनंदाची घटना नसेल.
आता निवृतीचं निवांत आयुष्य सुरू झालं, असं वाटत असतानाच लहान बहिणीचा ऐन तारूण्यात कॅन्सरने बळी घेतला. ही आमच्या संपूर्ण कुटुंबालाच हादरवून टाकणारी अतिशय दुर्दैवी घटना होती. काळाने जरी ह्या दुःखावर खपली धरली असली तरी ती जखम अजूनही ओली आहे. इतकं असूनही तिने तिच्या दुःखाचं भांडवल केलं नाही, की नशीबाचं गार्हाणं गायलं नाही. माझ्यात दुःख झेलण्याची ताकद आहे, म्हणून मला देवाने निवडलंय, असं तिचं अजब तत्वज्ञान. तिच्या आयुष्याचा आलेख काढायचा ठरवला तर सह्याद्रीच्या डोंगर रांगा काढता येतील. कधी सुखाची अत्युच शिखरं, तर कधी दुःखाची खोल खोल दरी!
मुळातच पिंड समाजसेवेचा, त्यामुळे एवढ्या कठीण काळातही सामाजिक बांधिलकी तिने जपली. शाळेतच नोकरी असल्यामुळे गरीब विद्यार्थ्यांची फी भरणं, किंवा गणवेष व पुस्तकांसाठी मदत करणं, ती आपसूक करायची. शिवाय राष्ट्रसेविका समितीची कार्यकर्ती असल्यामुळे तिथेही यथाशक्ती शेवटपर्यंत काम करत होती. कितीतरी नात्यातील व ओळखीची मुलं शिक्षण किंवा नोकरीकरिता आमच्याकडे राह्यला असायची. कुणी आधारासाठी बोट मागितलं तर हात पुढे करण्याची एकंदरीत वृत्ती होती आईवडिलांची. नाती जोडणं, जोपासणं व ती निभावणं, ही आमच्या आईवडिलांची खास वैशिष्ट्ये! असं असलं तरी ती देवमाणूस नव्हती. ‘माणूसच’ होती चुकणारी, रूसणारी व प्रसंगी रागवणारी! तिच्या न पटणार्या गोष्टींवर आमचे वादही व्हायचे, पण ती खिलाडूवृत्तीने विसरून जायची.
शेवटी काळासारखं दुसरं औषध नाही. मुलीच्या वियोगाचं दुःख मागं टाकत नातवंडांच यश, लग्नकार्य ह्यात आयुष्याचं उत्तरायण सुरू होतं. ह्यातच दोन पणतींची पणजी होण्याचा मान मिळाला. ही आयुष्यातली सरळ रेष फार काळ टिकली नाही. चार वर्षापूर्वी मला ओवरीज कॅन्सरचे निदान झालं. तेव्हा मी प्रापंचिक जबाबदारीतून मुक्त झाले होते. कुठलीही इच्छा अपूर्ण नाही, त्यामुळे मी कुठलेही उपचार घेणार नाही, असं मी जाहीर केलं. पण माझी आई व सासूसासरे ह्यांचा चेहरा डोळ्यासमोर आला अन् डोळे खाडकन उघडले. त्यांना आता ह्या उतारवयात वियोगाचं दुःख देण्याचा अधिकार मला नाही (माझ्या आईला तर दुसर्यांदा). लढाई न लढता शरणागती पत्करायची नाही आणि सहा केमो म्हणजे सहा परीक्षेचे पेपर्स आहेत (शारिरिक व मानसिक) हे पूर्ण तयारीनिशी द्यायचे, असं मनाशी ठरवलं. वरच्या विद्यापीठात काही घोळ झाला नाही तर ही परीक्षा आपण उत्तम प्रकारे पास होऊ ही आशा बाळगली आणि झालंही तसंच!
आईच्या जन्मापासून चालत आलेल्या सुख-दुःखाच्या पाठशिवणीच्या खेळाचा शेवट मात्र सुखाने झाला. शेवटच्या आजारपणात मुलां-नातवडांनी, विशेषतः सुनेने मुलीच्या प्रेमाने केलेली सुश्रुषा, असं दुर्मिळ भाग्यही तिच्या वाटेला आले. कुठलीही तगमग न होता शांतपणे तिच्या इच्छेप्रमाणे आमच्या घरीच तिने अखेरचा श्वास घेतला.
कवी यशवंत म्हणतात - ‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’! मग मी आज भिकारी झाले का? तर नाही.
तिने आम्हाला भरभरून दिलंय - पैसा, अडका, इस्टेट नव्हे तर तिची सोशिक पण स्वाभिमानी वृत्ती, जिद्द, चिकाटी व प्रचंड आशावाद! ह्यांचा वारसा देऊन गेली. तेव्हा, आईसाठी शेवटी एकच म्हणावेसे वाटते
‘घे जन्म तू फिरोनी, येईन मी ही पोटी, खोटी ठरो न देवा ही एक आस मोठी’
~ वंदना चोळकर