(मिसळपाव.कॉमवर पूर्वप्रकाशित मुलाखत नवरात्रीच्या निमित्ताने मैत्रीणवर आणते आहे.)
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
भरगच्च भरलेला सायंटिफिक सोसायटीचा हॉल, पायर्यांवर व व्हरांड्यात उभे असलेले श्रोते असं चित्र आता नागपूरकरांसाठी नवीन नाही. हे असं चित्र वर्षातून तीनदा नक्कीच, कधीकधी चार-पाच वेळा दिसत आलं आहे गेली तेवीस वर्षं! दर्दी रसिकांची गर्दी म्हणजे ‘स्वराली' हे समीकरण आता पक्कं झालंय!
स्त्रियांनी, स्त्रियांसाठी तर आहेच पण फक्त स्त्रियांसाठी नाही, तर दर्दी, रसिक, संगीतप्रेमी श्रोत्या व कानसेनांना तृप्त करण्याचा ध्यास घेतलेली संस्था म्हणजे ‘स्वराली’! ह्या संस्थेच्या वाटचालीला तेवीस वर्षं पूर्ण झाली व आता तिचे डोळे लागले आहेत ते रौप्यमहोत्सव साजरा करण्याकडे, आजवरच्या जपलेल्या परंपरेला साजेसे, दर्जेदार कार्यक्रम देण्याकडे! 'ये स्वराली, है निराली'... स्वरालीचं निराळेपण काय आहे, ते जाणून घेऊ या ह्या संस्थेच्या संचालिका सौ. नंदिनी सहस्रबुद्धे ह्यांच्याकडून.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
प्रश्नः आपण सुरुवात एकमेवाद्वितीय ‘स्वराली’च्या स्थापनेपासूनच करू!
नंदिनीताई: मी धरमपेठेतील शेवाळकर संगीत महाविद्यालयातून (पूर्वीचे बुटी संगीत महाविद्यालय) एकोणीसशे पंचाऐंशीमध्ये सतार विशारद झाले. त्या वेळेला नागपुरातल्या एकमेव दिलरुबा वादक पेंढारकरबाई शिकवायला यायच्या धंतोलीतून. त्यांना दूर पडायचं, तर त्यांनी म्हटलं की आता तू शिकवत जा आणि मी ही गुर्वाज्ञा मानून सतार शिकवू लागले काही अनुभव नसताना! विद्यालयाचा वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम दर वर्षी असतो आणि वाद्यवृंदांचा कार्यक्रम बसवणं व उत्तम तर्हेने सादर करणं ह्यात पेंढारकरबाई भाग घेत असता मी त्यांना बघत आले होते. हे करायची माझ्यावर जेव्हा वेळ आली, तेव्हा मी घाबरलेच. पण प्राचार्य पं. प्रभाकर देशकर - हेही माझे गुरूच - माझ्या पाठीशी उभे राहिले व म्हणाले, "तू सुरुवात तर कर…" आणि सुरुवात केली अन मग मागे वळून बघायची वेळच आली नाही. हे करत असताना लक्षात आलं की वादिका स्वतंत्रपणे वाजवताना घाबरतात, आत्मविश्वास कमी पडतो, पण समूहात वाजवताना त्या उत्तम तर्हेने वाजवतात आणि गायिकांना वाटायचं की आम्हालाही असंच व्यासपीठ मिळालं, तर….
मुली गाणं, वाद्य, शिकतात, डिग्र्या घेतात, लग्न होतं आणि डिग्र्या फाइलमध्ये बंद होतात, गवसणीबंद वाद्य दिवाणखान्याची शोभा वाढवतात , गाण्याचा संबंध अंगाई गीत गाण्यापुरता उरतो. विवाहित मुलींना बऱ्याचदा घरच्यांची साथ नसते किंवा कधी त्यांची इच्छाशक्ती कमी पडते. मीही एक संसारी स्त्री, गृहिणी असल्यामुळे ही व्यथा समजू शकत होते. हे चित्र बदलावं, ह्या माझ्यासारख्या संगीतप्रेमी गृहिणींना व्यासपीठ मिळवून द्यावं, असं तीव्रतेने वाटू लागलं. माझ्याकडे शिकायला येणाऱ्या मैत्रिणी हेमा पंडित व नंदा सोमण ह्यांच्याजवळ ही कल्पना बोलून दाखवली. त्यांनी ती लगेच उचलून धरली व अशा तर्हेने, लग्न झालेल्या स्त्रियांकरिता १९९३मध्ये गोकुळाष्टमीच्या सुमुहूर्तावर 'स्वराली' स्थापन झाली.
सुरुवातीला कुणाकडे सत्यनारायणाच्या, वाढदिवसाच्या निमित्ताने वाद्यवृंदवादनाचा कार्यक्रम करू लागलो. गाणाऱ्या मुलींनाही वाटायला लागलं की असं व्यासपीठ मिळालं, तर....हम तीन निकल पडे और कारवां बनता गया ... पेटी, तबला, व्हायोलिन वादिकाही आमच्या जथ्यात सामील होत गेल्या.
आता आमच्याकडे पंचवीस जणी वाद्यवृंद वादिका आहेत. शास्त्रीय, सुगम व नाट्यसंगीत अशा वेगवेगळ्या प्रकारांत पारंगत पंचवीस-तीस गायिका आहेत. आज स्वरालीच्या कुटुंबाची सदस्यसंख्या साठच्या जवळपास आहे.
प्रश्नः स्वरालीच्या अनेक सांगीतिक वैशिष्ट्यांविषयी खूप जाणून घ्यायचंय, पण त्याआधी स्वरालीच्या कुटुंबाविषयी! दोन बायका एकत्र नांदणं कठीण! स्वरालीच हे स्त्री कुटुंब गेली तेवीस वर्षं गुण्यागोविंदाने नांदतंय, हे एक आश्चर्यच आहे! डॉक्टर, व्यावसायिक, गृहिणी, कलाकार, नोकरदार अशा ह्या साठ जणींचा समा कसा काय बांधता?
नंदिनीताई: आम्ही ही संस्था फक्त आणि फक्त विवाहित मुलींसाठीच काढणार असं ठरलं, त्या वेळी आम्हाला पूर्ण कल्पना होती ह्या मुलींना येणाऱ्या अडचणींची, त्यांना समजून घ्यावं लागणार आहे ह्याची! त्या अडचणी वेळोवेळी समजून घेत गेलो, तसे तसे कुटुंबाची वीण घट्ट व मजबूत होत गेली आणि त्याला कारण म्हणजे आमच्यात असलेला समान धागा आणि तो म्हणजे निरपेक्ष 'संगीतप्रेम'.
कुटुंब आणि तेही फक्त बायकांचं म्हटलं की रुसवे-फुगवे, हेवे-दावे, ईर्ष्या- मत्सर असणार. पण आश्चर्य वाटेल, ह्याचं गालबोटही आजपर्यंत लागलेलं नाही. कुठल्याही संगीत कार्यक्रमात ज्याप्रमाणे वाद्यांचा मेळ बसवावा लागतो, तसाच इथे गायिकांच्या, वादिकांच्या मनाचा ‘मेळ’ बसला की रसिकांसमोर उत्तम ‘भेळ’ येते. ‘सतार लावताना ’काही तारा आवळायच्या काही सैल सोडायच्या, तसंच काही जणींच्या बाबतीत कठोर, शिस्तप्रिय राहावं लागतं, तर काहींच्या बाबतीत मृदू, मवाळ. प्रत्येकीच्या घरातील वातावरण, प्राधान्य हे वेगवेगळं असणारच ना? ते समजून घेतलं की बास.
प्रश्नः आता सांगीतिक वैशिष्ट्यांविषयी सविस्तर सांगा.
नंदिनीताई: आम्ही दर वर्षी आपल्या खर्चाने तीन कार्यक्रम करतो. नि:शुल्क. स्वतःला व श्रोत्यांना आनंद व समाधान देणं हीच आमची कमाई! प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात अर्ध्या तास वाद्यवृंद वादनानेच करतो, हे आजतागायत कटाक्षाने पाळत आलोय, हे सर्वात मोठं व मुख्य वैशिष्ट्य आहे स्वरालीचं. वादनानंतर प्रत्येक कार्यक्रमाची संकल्पना असेल त्याप्रमाणे गाणी म्हणतो. माणिक वर्मा, व्ही. शांताराम, शांता शेळके, ए.आर. रेहमान, हृदयनाथ मंगेशकर अशा अनेक कवी, गायक, संगीतकारांवर आधारित कार्यक्रम केले. ‘मावळतीचे रंग’ ह्यात संध्याकाळी गायले जाणारे राग, ‘ केशरी पहाट’, बंदिशींची अंताक्षरी, फक्त नाट्यसंगीत, भैरव प्रकार आणि त्यावर आधारलेलं एखादं गाणं वाद्यवृंदांवर वाजवायचं किंवा रागांवर आधारित कार्यक्रम असेल तर धून वादन करू लागलो. पण त्यापूर्वी जयोस्तुते, वंदेमातरम अशी गाणी वाजवायचो. प्रत्येक वेळी वेगवेगळे प्रयोग करत गेलो, तशा नवनवीन कल्पनाही सुचत गेल्या, रसिकांनीही त्या उचलून धरल्या. रसिकांच्या अपेक्षा उंचावल्या. त्या पूर्ण करण्यासाठी उत्साहाने, जोमाने कामाला लागायचो, अशी एक छान झंकारित शृंखला तयार होत गेली.
प्रश्नः स्वरालीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे वक्तशीरपणा....
नंदिनीताई: हा हा! हो, आहे खरं हे वैशिष्ट्य! आपल्या देशात तरी! आमच्या कुणाकडेही नोटेशनचा कागद नसतो, त्यामुळे खूप सराव करावा लागतो. सगळ्या जणी वेळेवर आल्या नाहीत, तर सराव कसा काय होणार? सोलो गाणाऱ्यांच्या वेळा मागेपुढे झाल्या, तरी चालवून घेऊ शकते, पण वादकांसाठी शक्य नाही, ही झाली आमची अंतर्गत शिस्त.
दुसरी शिस्त म्हणजे जर आम्ही पत्रिकेवर वेळ छापतोय, तर ती पाळली गेली पाहिजे ही आमची जबाबदारी ना! कमीत कमी पंचवीस जण व त्यांची वाद्यं स्टेजवर असतात. प्रत्येक जण प्रेक्षकांना व्यवस्थित दिसायला पाहिजे. हे सगळं लक्षात घेऊन रचना करायला फार वेळ लागतो. एवढ्या सतारी लावणं हे एक वेळखाऊ पण अतिशय महत्त्वाचं काम असतं. त्याप्रमाणे वेळेचं नियोजन करतो आणि ते कसोशीने पाळतो. लोकांनाही आता सवय लागली आहे वेळेच्या आधी येऊन, जागा पकडून वाद्यवृंद ऐकण्याची!
प्रश्नः तुमचा प्रवास 'गल्ली ते दिल्ली' त्याबद्दल सांगा.
नंदिनीताई: गल्ली ते दिल्लीमध्ये गोंदिया, बिलासपूर, रायपूर, चंद्रपूर असे थांबे वाटेत होते. नागपुरातच संस्कार भारतीचा कार्यक्रम होता. तिथे दिल्लीचे लोक आले होते. वनिता समाज संस्थेचा रौप्यमहोत्सव होता, त्यासाठी तिथून बोलावणं आलं. ही महाराष्ट्रीय लोकांचीच संस्था. त्यामुळे तिथे वाद्यवृंद व मराठी गाणी असा कार्यक्रम केला.
तिथून मुरादाबादला गेलो संस्कार भारतीच्या कार्यक्रमासाठी. खूप मोठी रिस्क घेऊन आमच्या मनासारखा पूर्ण सतारवादनाचा विविधतेने नटलेला कार्यक्रम केला. रसिक अत्यंत खूश झाले. विशेष म्हणजे दोनशे लोकांनी दोन तास चुळबुळ न करता तो तन्मयतेने ऐकला. मुलींनी तबला, वाद्यांवर लावणी वाजवली, तर रसिक अतिशय खूश झाले. गंमत म्हणजे तिथल्या बायकांना अप्रूप वाटलं होतं एवढा मोठा चमू गाण्यांसाठी बाहेर पडलेला बघून!
पुण्याला आमचे कार्यक्रम झाले. अक्कलकोटचा अनुभव तर खूपच छान होता. लोकसत्तेतला लेख वाचून त्यांनी बोलावलं होतं. जाण्या-येण्याचा खर्च व राहण्याची सोय एवढीच आमची माफक अपेक्षा असते अशा संस्थांकडून, त्यांनी ती पूर्ण केली. पण तिथल्या भाविकांनी जी दाद दिली, त्याने आम्ही भारावून गेलो.
आमची वाद्यं पाहून लोकांना वाटतं की आम्ही ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम करतो की काय? तशी बोलावणी आम्हाला चिक्कार येतात. पण मुळात आमचा पिंड (जॉनर)च नाही ऑर्केस्ट्राचा! ' स्वान्त सुखाय:' आणि मुळात पैसे कमावणे, खूप कार्यक्रम करणे हा आमचा उद्देश नाहीचे. आम्ही केवळ आणि केवळ स्वानंदासाठी गातो, वाजवतो. एकटीने आनंद घेण्यापेक्षा मला गुणाकारित घ्यायला आवडतो. अमेरिकेत मुलाकडे जाते, तेव्हा कुणाच्या तरी घरी आग्रहास्तव केला, तरच तेवढाच सोलो असतो. एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ!
प्रश्नः श्री श्री रविशंकरांच्या सतारवादनातला सहभागाबद्दल सांगा.
नंदिनीताई: हो, तो खूपच छान अनुभव होता. तिथे खूप शिकायला मिळालं. सहस्र सतारवादनाचा कार्यक्रम होता. आमची पंचवीस-तीस जणींना सांभाळताना दमछाक होते, त्यांनी हजार जणांना..... काय काय पापड बेलावे लागले असतील! तिथलं मॅनेजमेंट कळलं, समजून घेतलं, शिकता आलं.
प्रश्नः तुम्ही देशभरात पोहोचलात ते 'इंडियाज गॉट टॅलेंट'मधून. एवढ्या मोठ्या मंचावर पोहोचता, तेव्हा ती एक मोठी जबाबदारी असते तुम्हाला सिद्ध करण्याची, हो ना?
नंदिनीताई: हो, अगदी खरंय! आम्हाला चॅनेलवाल्यांकडून बोलावणं आलं. नागपुरात पहिली फेरी झाली आणि निवडले गेलो. नंतर शेवटच्या सहापर्यंतही पोहोचलो. जवळपास महिनाभर मुंबईला राहावं लागलं आणि त्यात गौरी-गणपतीचे दिवस! नोकरी करणाऱ्यांची, गृहिणींची नुसती धावपळ. घरच्यांच्या, मुलांच्या पाठिंब्यामुळे तळ्यात मळ्यात करत होत्या बिचाऱ्या विमानाने!
तिथे आम्हाला सिनेमातली गाणी वाजवावी लागली. ते ती बसवून देत होते, सरावही खूप करून घ्यायचे. त्यांना खूप समजावून सांगितलं की ही वाद्यं ह्या गाण्यांसाठी नाही म्हणून, पण त्यांची गणितं काही वेगळीच असतात. जे चित्रित केलंय तेच दाखवतील ह्याची काही शाश्वती नसते. शेवटच्या फेरीचाही सराव करून घेतला, पण ती वेळ आली नाही. आम्हा भोळ्या गृहिणींच्या ज्ञानात भर पडली - ‘राजकारण’ हाही ह्या स्पर्धांचा अविभाज्य भाग असतो.
प्रश्नः काही खंत किंवा काही वाईट अनुभव आले का ?
नंदिनीताई: नाही, खरंच अजिबात वाईट अनुभव नाही आले. पण निंदक भेटले. निंदक असावे शेजारी ... त्यातूनच आपण शिकत असतो, वृद्धिंगत होत असतो. एखादा जाणकार कार्यक्रमाच्या शेवटी सांगतो की तुमचा हात वर होता, पण कोपऱ्यातल्या वादिकेचा खाली होता.... मेघमल्हार वाजवताना! लोकांच्या निरीक्षणशक्तीला दाद देऊन नम्रपणे कधी सांगावं लागतं की आज ती प्रथमच जाहीर कार्यक्रम करतेय म्हणून, तर कधी दुर्लक्ष करावं लागतं, हे अनुभवातून आता समजू लागलंय.
प्रश्नः स्वरालीच्या सदस्यत्वासाठी काही निकष लावता का?
नंदिनीताई: काही निकष, नियम आहेत. मुख्य अट म्हणजे निवेदिका सोडून गायिका/वादिका संगीतशिक्षित विवाहित असाव्या. पण तबला, ऑक्टोपॅड अशा वाद्यांकरिता अविवाहित मुलींना किंवा पुरुषांना घेतो. मेंबर झाल्याबरोबर चान्स मिळेलच असं नाही, वाट पाहावी लागेल, संपर्कात राहावं लागेल, मानधन मिळणार नाही, लग्न, मुंज, हॉटेलात कार्यक्रम करणार नाही इ. इ. हे सगळे नियम, निकष पाळत आलो आहोत. आमच्यापैकी जुन्या काही बदलून गेल्या, काही हे जग सोडून गेल्या, काही वयपरत्वे इच्छा असूनही सहभागी होऊ शकत नाहीत. आमच्यातली एक तरुण गायिका नुकतीच अपघातात गेली. येणे आणिक जाणे! येताना स्वरसुमने घेऊन येती, जाताना नादमय आठवणी ठेवुनी जाती! अजून मी निवृत्तीचा विचार नाही केला, पण आमची दुसरी फळी तयार आहे. सुमेधा मारावार - जी आमची सदस्या आहे, तिनेच आमची साईट www.swaraleesangeet.org बनवली आहे. सध्या ती मुलं, संसार, नोकरीत व्यग्र असल्यामुळे ताजी नवीन माहिती त्यात चढवली गेलेली नाही.
प्रश्नः अविस्मरणीय कार्यक्रम ?
नंदिनीताई: नागपूरला जागतिक संस्कृत दिन झाला होता. त्या वेळी वसंतराव देशपांडे हॉलमध्ये कार्यक्रम केला देशविदेशातून आलेल्या लोकांसमोर. कवयित्री शांता शेळके , रवींद्र साठे व सुधीर मोघे यांची गाणी त्यांच्यासमोर सादर केली. मल्हार शास्त्रीय संगीत वाजत असताना पेंटिंग्ज, नृत्य केलं. आमचा बायकांचा संगीताचा व एक बायकांचाच नृत्याचा ग्रूप असा एकत्र कार्यक्रम केला होता.
प्रश्नः काही बक्षिसं, पारितोषिकं, सत्कार वगैरे ?
नंदिनीताई: स्थानिक पातळीवरच सत्कार, सन्मान झाले. जेसीज, हर्णे महिला समाज, विरंगुळा इ. संस्थांनी सन्मानित केलं.
प्रश्नः तुम्हाला घरून बिनशर्त व सक्रिय पाठिंबा होता ह्यात शंकाच नाही. त्याबद्दल व तुमच्याबद्दल सांगा.
नंदिनीताई: लहान वयात, म्हणजे मी पदवीधर होण्यापूर्वीच माझं लग्न झालं. अकरा भावंडांचं कुटुंब. पोहणं, बेस बॉल इ खेळ खेळायचे, गाणं शिकले नव्हते. मला गाण्याची आवड होती. रेडिओवर ऐकलेलं गाणं जसंच्या तसं म्हणायचे. लग्नानंतर मी पदवी घेतली. गायन वर्गात जागा नव्हती, म्हणून सतार शिकू लागले व त्यातच विशारद केलं ते केवळ घरच्यांच्या पाठिंब्यामुळे, जो आजतागायत अविरत सक्रिय मिळतोच आहे. आमच्या पंचवीस-तीस जणींची आसन रचना करायची आणि मग ती बदलून पुढचा कार्यक्रम, त्यात बराच वेळ जातो. माझे पती इंजीनियर. त्यांनीआपली कल्पकता व ज्ञान वापरून त्यांनी सरकता मंच करून माझा स्त्री हट्ट पुरवला. तो एक आमचा अभिनव प्रयोग झाला. हॉल बुक करणं, परवानग्या काढणं, परिनिरीक्षण मंडळाची परवानगी वगैरे कामातही ह्यांची मदत होते. माझी मुलगी सोनाली लग्नापूर्वी मदत करायची, तबला वाजवायची. तिला सहा वाद्यं वाजवता येतात, गाण्याची जाण आहे, पण मुलाला नाही. पाठिंबा मात्र असतो.
प्रश्नः सवाई गंधर्वला, सातासमुद्रापलीकडे जावं, एखादा रेकॉर्ड (विक्रम) करावा असा कधी प्रयत्न केला नाही का ?
नंदिनीताई: खरं सांगू आम्ही सगळ्या जणी गाण्यात पक्क्या आहोत, पण अर्थकारण, राजकारणात तर कच्च्या आहोतच, त्याशिवाय प्रसिद्धीचा हव्यास, ध्यास, अट्टाहास नाहीये कुणालाच. रौप्यमहोत्सवी वर्षात दर महिन्याला एक, एका वेगळ्या संकल्पनेसह असे बारा कार्यक्रम करायचा मानस आहे. पंडित रविशंकर, शाहीद परवेझ, अमेरिकेत ज्यांच्यासमोर सतार वादन केलं होतं, त्यांच्यासमोर एखादा कार्यक्रम झाला तर खूपच आनंद होईल... अर्थात हे प्रत्यक्षात उतरेल आर्थिक पाठबळ मिळालं, तर! आपण कशासाठी गातोय, वाजवतोय हे प्रत्येकीला उमजतंय, सूर गवसलाय. आजपर्यंत जे कमावलं त्यात तृप्त, कृतार्थ आहोत आम्ही!
स्वरालीच्या मनोकामना पूर्ण होवोत व तुमची कीर्ती तुमच्यासह सातासमुद्रा पार जावो! शुभेच्छा!
*******************************************