अचिंत्यदान (कथा)

अचिंत्यदान (कथा)

मावळतीच्या उन्हांत ११व्या मजल्यावरील बाल्कनीत व्हील चेअरमध्ये बसून ती समोरच्या रहिवासी इमारतीच्या गच्चीत पकाडापकडी खेळणार्‍या मुलांकडे एकटक पाहत होती. त्या मुलांकडे पाहून तिला राहून राहून आपली चिमुरडी आठवत होती. नऊ वर्षांच्या कोवळ्या पोरीला घरी सोडून गेले दहा दिवस इथे या हॉस्पिटलात येऊन राहिलो आहोत आपण, वेगवेगळ्या तपासण्या, चिकित्सा यांसाठी. गेले जवळजवळ चार वर्ष असलेली विलक्षण डोकेदुखी आणि इतर त्रास याच्या मुळाशी नेमकं काय दडलंय ते शोधण्याचा डाँ. चा प्रयत्न, त्यासाठीच सार्‍या चाचण्या. बस्स ! आता एकच, उद्याची शेवटची आणि सर्वांत महत्वाची चाचणी. तिच्या निदानात डॉक्टरांना काही हाताशी लागो आणि ट्रीटमेंट सुरु होऊन मी लवकर बरी होवो, घरी माझ्या दोन मुली आतुरतेने वाट बघत असतील, आई बरी होऊन घरी यायची. निदान त्या दोन चिमुकल्यांसाठी तरी देवा, या डॉक्टरांना यश मिळू दे.

संध्याकाळचे जेवण आल्याचा निरोप घेऊन मावशी आल्या आणि व्हीलचेअर ढकलत सीमा वॉर्डात आली.

दुसरा दिवस अगदी गडबडीचा. काय काय घडले त्या एकाच दिवसात. .... सकाळीच सीमाची चाचणी झाली. १९८० च्या दशकात आपल्या देशात असलेल्या वैद्यकीय सुविधा आणि त्यांच्या मर्यादेनुसार ही एकच चाचणी जी अत्यंत वेदनादायक आणि आयुष्यात केवळ एकदाच करता येण्यासारखी, शरीरातील कुठल्याही भागात असलेला ट्युमर दाखवून देणारी. २ वर्षांपूर्वी हेच डॉक्टर म्हणाले होते, ‘ही एक चाचणी सोडून बाकी सार्‍या केल्या, कुठेच काही आढळत नाही. तूर्तास ही चाचणी टाळलेलीच बरी. पुढे-मागे अति त्रास झाला तरच करु.’ पण ती वेळ आलीच. सीमाचे दुखणे बळावतच गेले दोन वर्षांत आणि चाचणीचा रिझल्ट डॉक्टरांच्या अपेक्षेप्रमाणे पॉझिटिव्ह आला. ' ब्रेन ट्युमर' ….शस्त्रक्रिया, हा आणि हाच एक उपाय. मात्र त्यानंतरही रुग्ण बरी होण्याची पूर्ण शाश्वती नाहीच. कंसेंट फॉर्मवर सही करताना सीमाच्या नवर्‍याचे हात अक्षरशः थरथरत होते. पण उपचार तर करायलाच हवा. न जाणो, देवकॄपेने सारे सुरळीत झाले आणि सीमा पूर्ण बरी झाली तर..... त्यासाठी शस्त्रक्रियेची रिस्क घ्यायचीच हे सर्वानुमते ठरले. दिवसभर नातलगांची रीघ लागली होती,शस्त्रक्रियेपूर्वी एकदा तिला भेटण्यासाठी. मुलीही आईला भेटून गेल्या. सीमाला सारे खरे सांगण्यात आले. डॉक्टरांनी स्वतः तिची इच्छा विचारली. त्या अवस्थेतही काय सांगावं तिनं.... तर डॉक्टर यदाकदाचित मला शस्त्रक्रियेदरम्यान मॄत्यू आला तर.... तर माझे दोन्ही डोळे दान करा, माझ्या डोळ्यांनी कुणीतरी हे जग माझ्या पश्चातही बघेल......

शस्त्रक्रियेचा दिवस उजाडला. उजाडला तो सीमाव्यतिरिक्त इतरांसाठीच, कारण सीमा दिवस उजाडतानाच देवाघरी निघून गेली होती, शस्त्रक्रियेआधीच.....दोन्ही मुलींना पोरके करुन....सार्‍या वॉर्डात शोककळा पसरली होती. सगळं सुन्न, स्तब्ध, भकास वाटू लागलं सार्‍या नातलगांना.

मात्र ड्युटीवरील एक डॉक्टर सतर्क होती. तिला सीमाचे आदल्या दिवशी डॉक्टरांसह झालेले संभाषण आठवले. सीमाची अंतिम इच्छाच ठरली ती, ती तर पूर्ण करायलाच हवी. सीमाच्या पतीला याची कल्पना होती. तात्काळ सही केली त्याने आणि सारी चक्रे वेगाने फिरु लागली. रुग्णालयातील नेत्र विभागातील कर्मचारी, डॉक्टर्स यांची धावपळ सुरु झाली. आवश्यक ती प्रमाणपत्रे, दस्तऐवज व सर्वांत शेवटी मुख्य प्रक्रिया..... सारे सोपस्कार पूर्ण झाले. सीमा गेली पण स्वतःची दॄष्टी अमर करुन... तिच्या नजरेतून कुणी दोन जीव हे सुंदर जग बघू शकणार होते.

------------
मुंबईच्या प्रभादेवी येथील सिद्धिविनायकाच्या मंदिरात देवासमोर नतमस्तक अवस्थेत विनय आणि त्याची आई. आईच्या डोळ्यांतील पाणी खळत नव्हते. डोळ्यांसमोर जरी गणपतीची मूर्ती असली तरी विनयच्या मनात, नजरेसमोर होता सीमा ताईंचा न पाहिलेला चेहरा. तिचे नाव 'सीमा' हेही ठाऊक नव्हते त्यास. 'ताई'... बस्स ! दॄष्टी मिळाल्याप्रित्यर्थ आईने केलेला नवस फेडण्यास मंदिरात आलेला, राहून राहून देवाचे आभार मानतांना त्या ताईंच्या आत्म्याला शांती लाभावी, त्यांच्या वियोगाचे दु:ख पचवण्याची ताकद त्यांच्या कुटुंबियांना मिळावी हेच मागत होता तो."देवा माझ्या आईने मला जन्म दिला, अंध असल्यामुळे डोळ्यांत तेल घालून सांभाळले.लहानपणीच वडीलांचे छत्र गमावले असूनही माझ्यासाठी या दोन्ही भूमिका ती नेटकेपणे पार पाडत राहिली. स्वतः राब-राब राबली पण मला घडवले. आज या कोण कुठच्या ताई--- त्यांच्यामुळे मी हे जग पाहू शकलो. त्यांची मरणोत्तर नेत्रदानाची इच्छा , त्यानंतर लगेच झालेला मॄत्यू, नेत्रपेढीत प्रतिक्षेत असलेल्यांत त्याच वेळी नेमका माझाच वर आलेला नंबर आणि माझ्यावर करण्यात आलेली यशस्वी नेत्रप्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया..... हे सारं घडवून आणण्यात तुझा खचितच काही हेतू असावा परमेश्वरा ! तुझी योजना मी काय जाणणार ? मात्र एक वचन आज मी तुझ्या साक्षीने त्या ताईंच्या आत्म्यास देतो की त्यांनी केलेल्या या अनमोल दानाची कायम जाण ठेवेन. या डोळ्यांमार्फत चांगले आणि उचित तेच बघण्याचा आणि त्यानुसार वागण्याचा प्रयत्न करेन ".
प्रसाद ग्रहण करुन दोघेही बाहेर आले. गर्दीतून विनय आईला सावकाश हाताचा आधार देत बाहेर आणत होता, आज पहिल्यांदाच, तो आईला आधार देत होता. गेल्या महिन्यात शस्त्रक्रिया होईपर्यंत हेच काम त्याची आई करीत असे. ही अशी अनपेक्षितपणे झालेली भुमिकांची अदलाबदल निर्मलाबाईंना सुखावत होती.
नकळत गत जीवनातील घडामोडी त्यांच्या डोळ्यांसमोर दिसू लागल्या………विनय अगदी ३-४ महिन्यांचा असतांना त्याचे वडील अपघातात दगावले आणि आभाळ कोसळलं निर्मलाबाईंवर. कोकणात, मालवणात वडीलोपार्जित घर आणि थोडी शेती होती हाताशी. शेती करत मुलाला वाढवत होती बिचारी. मुलगा आपल्याकडे बघत नाही, त्याच्या नजरेत ओळख दिसत नाही हे जाणवायचं पण इलाज सापडत नव्हता. एके दिवशी शाळा मास्तरांच्या सांगण्यावरुन तालुक्याला गेली आणि तिथल्या प्राथमिक आरोग्य केंद्राने चिठ्ठी देऊन सरकारी रुग्णालयात पाठवलं. तिथे निदान झालं की मूल अंध आहे. एका दु:खातून सावरत असतांनाच दुसरा जीवघेणा आघात. आता या चिमुरड्याला घेऊन कुठे जाऊ? काय करु? त्यात मी एकटी बाईमाणूस, कुणाचा आधार नाही, काही सुचेनासे झाले. कित्येक रात्री त्यांनी रडून, जागून काढल्या, जीवाला चैन नव्हते. शाळेच्या मास्तरांनीच मग सल्ला दिला की काही वर्षे जाऊ देत. त्यानंतर मात्र अंध मुलाला शिकवण्यासाठी विशेष शाळा शहरांत असतात, त्याचा विचार करावा. निर्मलाबाईंनी खूप विचार केला. त्यांचा भाऊ मुंबईत राहत होता. पण त्याची परिस्थितीही बेताचीच. आपण मुंबईला जायचे हा त्यांचा विचार पक्का होत होता. मुंबई गाठायची ती मुलाच्या शिक्षणासाठी, त्याच्या डोळ्यांच्या इलाजासाठी, मात्र कुणावरही अवलंबून न राहता पडेल ते काम करुन स्वाभिमानाने जगायचे, हे त्यांनी नक्की केले.
एव्हाना विनय ५ वर्षांचा झाला होता. आपली शेती एका जोडप्याला करायला देऊन निर्मलाबाईंनी बिर्‍हाड मुंबईला हलवले. सगळे स्थिरस्थावर होईपर्यंत भावाकडेच त्या राहिल्या. भावाच्या ओळखीने एका गार्मेंट कंपनीत त्या रोजंदारीवर कामाला लागल्या. जवळच्याच अंध मुलांच्या सरकारी शाळेत त्यांनी विनयचे नाव नोंदवले. विनयचे शिक्षण सुरु झाले. जात्याच हुशार असलेल्या विनयने 'ब्रेल' लिपीवर लवकरच प्राविण्य मिळवले. या लिपीतून तो भरपूर वाचन करु लागला. वेगवेगळे विषय आत्मसात करु लागला. त्याच्या शाळेतच विद्यार्थ्यांची नियमित वैद्यकीय तपासणी होत होती. त्यानुसार त्याच्या आजाराचे निदान करुन 'कॉर्निया प्रत्यारोपणाची' शस्त्रक्रिया केल्याने दॄष्टी येऊ शकते असे सांगितले होते. पण़ कॉर्निया तर मरणोत्तर नेत्रदानातूनच मिळू शकतो आणि त्यासाठी भलीमोठी प्रतिक्षा यादी असते हे ही त्यांना सांगण्यात आले. तसेच विनयचे वयही लहान होते. त्यामुळे लगेच काहीच उपाय करता येण्यासारखा नव्हता. सरकारी आणि धर्मादाय तत्वांवर चालवल्या जाणार्‍या एका खाजगी नेत्रपेढींत त्याचे नाव नोंदवण्यात आले. देवावर श्रद्धा ठेऊन, विनयला स्वतःच्या पायावर उभे रहाण्यासाठी, शिक्षण देऊन सक्षम करण्याचे सारे प्रयत्न निर्मलाबाई करीत होत्या. आता त्या भाड्याने खोली घेऊन स्वतंत्र राहू लागल्या.
दिवसांमागून दिवस सरत होते. विनय मोठा होत होता. शिकत असतांनाच तो आईला हातभार म्हणून लहान-सहान कामे करत असे. एक-एक इयत्ता पार करत तो दहावीची परीक्षा उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाला. अंध विभाग असलेल्या एका कला शाखेच्या महाविद्यालयात त्याला प्रवेश मिळाला.
महाविद्यालयात अर्थशास्त्र या विषयात विनयला विशेष आवड निर्माण झाली. तो खूप मेहनत घेऊन अभ्यास करीत होता. त्याला वाचनासाठी ब्रेल लिपीतील पुस्तके, पेपर लिहायला लेखनिक अशा सोयी महाविद्यालयातर्फे पुरवल्या जात होत्या. आपल्या आईला आपल्या अपंगत्वामुळे कराव्या लागणार्‍या अतिरिक्त कष्टांची विनयला जाण होती. शिक्षण पूर्ण करुन लवकरात लवकर स्वतःच्या पायावर उभे रहायचे आणि आईला विश्रांती द्यायची हेच त्याचे उद्दिष्ट होते.
लवकरच विनयच्या मनाजोगे घडून आले. पदवी परीक्षा पहिल्या वर्गात उत्तीर्ण होऊन विनय नोकरीच्या शोधात असतांनाच त्याला एका राष्ट्रीयीकॄत बँकेत 'अपंग कोट्यातून' टेलिफोन ऑपरेटरची नोकरी मिळाली.
आजचा दिवस निर्मलाबाईंसाठी फार मोलाचा.... त्यांचा एकुलता एक अंध मुलगा आज स्वतःच्या पायावर उभा राहिला होता. माझ्याशिवाय याचे कसे होईल? ही आईला कुरतडणारी चिंता दूर झाली होती. एक फार मोठा पल्ला माय-लेकांनी मिळून गाठला होता.
विनयची नोकरी सुरु झाली. नोकरीच्या ठिकाणी विनयचे बसने येणे-जाणे सुरु झाले. काही दिवसांतच त्याने कामाचे स्वरुप आत्मसात केले. आपल्या संयमित स्वभावाने त्याचे इतर सहकार्‍यांशी चांगले जमू लागले. विनयच्या म्हणण्याप्रमाणे निर्मलाबाईंनी आता कामावर जाणे थांबवले.
दिवस सरत होते. विनय नोकरीत कायम झाला आणि एक दिवस अचानक.... त्याला मामाचा निरोप मिळाला. मामाला नेत्रपेढीतून फोन आला होता, विनयसाठी नेत्रदाता मिळाल्याचा. मामा स्वतः भाच्याला घेऊन तेथे पोहोचला. तिथे विनयची तपासणी, कागदपत्रांची चाचपणी वगैरे सोपस्कार होऊन त्याच्यावर 'प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया’ करण्याचे निश्चित करण्यात आले. विनय आणि मामा दोघांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. दोघांनी घरी जाऊन निर्मलाबाईंना ही आनंदाची बातमी दिली. बस्स... तेव्हापासून त्या माऊलीने आनंदाश्रूंचा अभिषेक सुरु केला तिच्या देवाच्या मूर्तीवर. हा दिवस असा अनपेक्षितपणे येईल अशी सुतराम शक्यता नव्हती. हर्षवायू झालेल्या अवस्थेतच सगळे आवरुन , विनयच्या बँकेतून सुट्टी काढून ते इस्पितळात दाखल झाले, प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी....
निर्मलाबाई ओ.टी.च्या बाहेर थांबल्या असतांना अखंडपणे नामजप करत होत्या, लेकाची शस्त्रक्रिया यशस्वी होण्यासाठी, त्याला आपला नेत्र देऊ केलेल्या 'माऊलीच्या' चिरशांतीसाठी, तिच्या कुटुंबियांसाठी.
गतकाळातील सार्‍या आठवणी त्यांच्या डोळ्यांपुढे फेर धरुन नाचत होत्या. राहून-राहून त्यांना उमाळे येत होते. वहिनी कशीबशी त्यांना सावरत होती. काही वेळातच डॉक्टरांनी येऊन शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची बातमी दिली. डोक्यावरचे ओझे उतरले निर्मलाताईंच्या.
आज डोळ्यांवरील पट्टी काढण्याचा दिवस..... आज पहिल्यांदा आपलं लेकरु हे जग बघणार. विनयने आपल्यासाठी स्वतःचे सारे जीवन झिजवणार्‍या आईलाच सर्वप्रथम पाहण्याची इच्छा व्यक्त केली. निर्मलाबाई समोर आल्या. नर्सने हळूवारपणे पट्टी काढली आणि..... आणि गेल्या कित्येक वर्षांत जी दिसली नव्हती ती ओळख विनयच्या नजरेत त्यांनी पाहिली..... विनू.... आता दिसतंय ना रे तुका? त्यांनी हंबरडाच फोडला आणि पुढच्याच क्षणी माय लेकांची गळाभेट झाली. ….. एक समाधान दोघांच्या चेहर्‍यावर फाकले होते.
सारे आठवून त्या पुन्हा रडू लागल्या. देवाला, लेकरावर अशीच कॄपादॄ‍ष्टी ठेवण्यास विनवू लागल्या.
इकडे विनयची अवस्थाही फार वेगळी नव्हती. शस्त्रक्रियेनंतर तोही आज प्रथमच बँकेत जात होता.सार्‍या सहकार्‍यांना प्रथमच पहात होता. सारे येऊन त्याला भेटत होते. अभिनंदनाचा वर्षाव करत होते त्याच्यावर. खूप भारावून गेला विनय, सगळ्यांचे हे अकॄत्रिम प्रेम पाहून. सकाळी देवळात त्याने मनोमन शपथ घेतलीच होती, सर्वांशी चांगले वागण्याची, सर्वांना सर्वतोपरी मदत करण्याची, यावर पुन्हा एकवार शिक्कामोर्तब झाले.
विनय त्या दिवसापासून कटाक्षाने सर्वांना हर प्रकारे मदत करु लागला. मित्र, सहकारी, ग्राहक, स्वतःला कितीही त्रास झाला तरी दुसर्‍याच्या हितास जपणे हेच त्याचे ब्रीद झाले. मला कुणीतरी अशी मदत केली म्हणून मी हे जग पाहू शकतोय त्यापुढे मी करत असलेली मदत, सेवा नगण्यच आहे असे मानून तो झटू लागला. कुणाच्याही अडी-अडचणीत हा आधी पोहोचणार. परमेश्वराने 'ताईंमार्फत' मला दॄष्टीदान देऊन माझ्यावर कॄपावर्षाव केला. त्याची परतफेड तर मी कधीच, कोणत्याही स्वरुपात नाही करु शकत. पण त्याच परमेश्वराची जी इतर लेकरे आहेत, ज्यांना मदत, अधाराची गरज आहे, ती मदत, आधार मी अशांना नक्की देऊ शकतो आणि काही अंशी तरी त्या सर्वांच्या जीवनात आनंद आणू शकतो, हा एकच ध्यास त्याने घेतला. मदतीस तत्पर अशा स्वभावाने त्याचा जनसंपर्कही मोठा होता. अशाच कुणाकडून त्याला एका अध्यात्मिक अधिष्ठान असलेल्या सेवाभावी संस्थेविषयी समजले. त्यांचे कार्य, उद्देश यांनी प्रेरित होऊन आपणही या संस्थेमार्फतच 'भक्तिमय सेवा' करीत रहायचं हा त्याने चंग बांधला. या संस्थेतर्फे दिले जाणारे 'आपत्कालीन व्यवस्थापनाचे’ प्रशिक्षण पूर्ण करुन तो कोणत्याही नैसर्गिक वा मानवनिर्मित आपत्तींच्या ठिकाणी बचाव व सेवाकार्य करीत असे. लागेल ते काम आनंदाने करीत असे.
दुसरीकडे बँकेतील नोकरीही चालूच होती. स्वकर्तुत्वावर, अधिकारी वर्गाच्या परीक्षा उत्तीर्ण होऊन आता तो अधिकारी बनला होता. कर्ज काढून स्वतःचे घर घेतले त्याने. आईचा तर प्रत्येक शब्द झेलायचा, ही तर प्रतिज्ञा होती त्याची. एकंदर सारं सुखा-समाधानात सुरु होतं. विनयच्या आईने आता सूनमुख पाहण्याची इच्छा प्रदर्शित केली. विनयने मंजुरी देत “मी केवळ अंध मुलीशीच विवाह करु इच्छितो”, असे आईस सांगितले. "आई, जशी तू मला कायम आधार देत राहिलीस माझी सावली बनून, अगदी तसाच मी अशा एखाद्या मुलीचा कायमचा आधार बनेन". लेकाची मागणी अर्थातच आईला मन्य करावी लागली. लवकरच विनयच्या महाविद्यालयात शिकणार्‍या सालस अशा सविताचे घरात सून म्हणून पदार्पण झाले.
विनयचा सुखी संसार सुरु झाला. दिवस, महिने, वर्षे सरत होती. घरात आता चिमणा पाहुणाही आला होता. विनयचे मदतीचे, सेवेचे व्रतही कायम होते.
आता विनय एका सरकारी इस्पितळात पेशंटसची सेवा करण्यास जात असे.तेथील एक तरुणी जन्मतःच मूत्रपिंडाच्या विकाराने त्रस्त होती. तिची दोन्ही मूत्रपिंडे निकामी झाली असून मूत्रपिंड प्रत्यारोपणामुळेच ती वाचू शकत होती. मुलीचे आई-वडील मूत्रपिंड देण्यास तयार होतेही, मात्र ती जुळत नसल्यामुळे हतबल झाले होते. हे सारे ऐकताच विनयचे डोळे चकाकले. त्याच्या डोळ्यांसमोर 'न पाहिलेला ताईंचा चेहरा’ तरळून गेला. डोक्यांत विचारचक्र सुरु झाले, एक निर्णय त्याने मनोमन घेऊन टाकला.
घरी येताच त्याने आई आणि पत्नीजवळ आपला मनोदय बोलून दाखवला. काळजात चर्र झाले दोघींच्या. कसलेही नाते नसलेल्या, एका परक्या मुलीसाठी, आपला मुलगा कसलीही अपेक्षा न ठेवता ही मूत्रपिंड दानाची,एव्हढी मोठी जोखीम जिवंतपणी पत्करणार, .... विचारानेच आवंढा आला निर्मलाबाईंच्या गळ्यात. जर काही बरे वाईट घडले तर सविता आणि या चिमुकल्याचे काय, त्यांना कोण आधार देईल? मनातील शंका त्यांनी बोलून दाखवली, पण विनयचा निर्णय पक्का होता. त्या त्याला रोखू शकल्या नाहीत, कारण त्यामागची लेकाची भावना त्यांनाही पटत होतीच. निर्मलाबाई आणि सविता दोघींनीही त्याला खंबीरपणे पाठिंबा द्यायचे ठरवले. विनयच्या आनंदाला पारावार राहिला नाही. आई आणि सविता पाठीशी असतांना मी कोणत्याही प्रसंगातून तरुन येईनच याची खात्रीच होती त्याला. मनोमन देवाला तो विनवू लागला की "देवा काहीही कर पण माझे मूत्रपिंड या मुलीशी जुळू दे".
अशी नि:स्वार्थीपणे केलेली प्रार्थना देवालाही ऐकावीच लागली. लवकरच सरकारी रुग्णालयात दोघांची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. त्या तरुणीला विनयमुळे जीवनदान मिळाले आणि विनयला ......'ताईंच्या' नेत्रांतून उचित तेच बघून, हेरुन, उचित कॄत्य केल्याचे समाधान!!!
देणार्‍याने देत जावे, घेणार्‍याने घेत जावे
घेणार्‍याने एक दिवस देणार्‍याचे हात घ्यावे....
या काव्यपंक्ती विनयवरच रचल्या असतील का?

Keywords: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle