काल खूप वर्षांनी एखादा चित्रपट फर्स्ट डे फर्स्ट शो बघितला आणि तो बघून इतकी मजा आली की लगेच लिहायलाच बसले!
तनुजा चंद्राने दिग्दर्शित केल्यामुळे एक जरा धाकधूक होती की तिचे आधीचे दुश्मन, संघर्ष असे मारधाड थ्रिलर्स असल्यामुळे एकदम हा रॉमकॉम कसा काय असेल.. पण मध्ये इतकी आठ दहा वर्षे गेल्यामुळे असेल कदाचित पण तिने हा विषय हाताळला आणि खूप सुंदर ट्रीटमेन्ट दिली आहे.
कुठल्याही मेट्रो सिटीत असणाऱ्या दोन पस्तिशीच्या सिंगल्स रेडी टू मिंगल लोकांची कथा आहे. दोघेही एकमेकांपेक्षा अतिशय वेगळे अगदी चॉक अँड चीज characters आहेत. विमा कंपनीतील अधिकारी जया (पार्वती) आपल्या एकट्या आयुष्याला कंटाळून, एका मैत्रिणीच्या आग्रहाला बळी पडून ऑनलाइन डेटिंग साईटवर नाव नोंदवते, तिथे तिला भेटतो हरफनमौला शायर योगी (इरफान). इरफानच्या एंट्रीपासूनच इतकी धमाल सुरू होते की ज्याचं नाव ते! त्याच्या एंट्रीलाच टाळ्यांचा कडकडाट झाला म्हणजे पहा :fadfad: सॉलिड पंचेस आणि इंटेन्स चेहऱ्याच्या जोरावर इरफान अक्षरशः तडतड फुटलाय! पार्वती मल्याळम सिनेमातून हिंदीत पहिल्यांदाच आली आहे तरीही इरफानला मस्त कॉम्प्लिमेन्ट करते.
सगळी गोष्ट एका रोड ट्रिपने पुढे जाते त्यामुळे पिकूची आठवण आल्याशिवाय रहात नाही. ऋषिकेश, राजस्थान, गंगटोक अशी लोकेशन्स असल्यामुळे डोळ्यांना थंडावा मिळतो. गोष्ट अगदीच दोन ओळीत संपेल म्हणून सांगत नाही, पण कथेचा फ्लो इतका सुंदर आहे की अरे काहीच घडत नाहीये म्हणेपर्यंत पुढच्या गोष्टी घडलेल्या कळत जातात. फक्त शेवट जरा अचानक आल्यासारखा वाटला, थोडी एडिटिंगची गडबड असावी.
गाणी कथेचा भाग म्हणूनच येतात, फार लक्षात राहण्यासारखी नाहीत. पण त्यांचे शब्द तो मूड दर्शवतात त्यामुळे त्या त्या सीनमध्ये फिट बसतात.
पूर्णपणे कौटुंबिक विकेंड पॉपकॉर्न सिनेमा आहे, घाणेरडे विनोद किंवा ऑकवर्ड प्रसंग अजिबात नाहीत. आजी आजोबांपासून लहान मुलांपर्यंत सगळे बघू शकतात. आमच्या शेजारी बसलेल्या लहान मुलानेसुद्धा खूप एन्जॉय केला.
चित्रपट पाहून बाहेर आल्यावरही आम्ही चेहऱ्यावरचे हसू पुसू शकलो नाही :)
मी काही समीक्षक नाही तरी माझ्याकडून ३.५ स्टार्स! नक्की बघा..