इराण डायरी – तेहरान

दुबईहून विमान उडाले, आणि मनात एक हुरहुर दाटून आली. थोडी भीती, थोडे कुतुहूल! खरं तर भीतीच जास्त!गेले वर्षभर संजय कामानिमित्त इराणला जाणे-येणे करत होता. इराण खूप छान देश आहे, असे म्हणत होता. पण तरीही मनात धाकधूक होतीच. इराणमध्ये १९७९ साली इस्लामिक राज्यक्रांती झाली, तेव्हा मी कॉलेजमध्ये होते. पण पेपरातला तो खोमेनींचा उग्र चेहरा अजून आठवतो. त्यानंतरही इराणबद्दल अनेक बातम्या यायच्या, पण बहुतेक नकारात्मक!

सलमान रश्दींच्या पुस्तकामुळे त्यांच्या विरुद्ध काढलेला फतवा, अमेरिकन वकिलातीवरचा हल्ला अशाच या बातम्या होत्या. मग बेट्टी मह्मुद्चे ‘नॉट विदाउट माय डॉटर’ हे पुस्तक वाचले, सिनेमाही पाहिला. मनातली इराणची प्रतिमा अधिकच काळवंडली. आपल्या अगदी शेजारी असूनही, आपल्या मनातून इराण हा दूरच होत गेला.

मात्र संजय इराणला जायला लागला, त्याच सुमारास माझ्या हातात ‘गाथा इराणी’ हे मीना प्रभूंचे पुस्तक आले. इराणी माणसांच्या प्रेमळ वागणुकीने त्या भारावून गेल्या होत्या. इराणी सभ्यता, इराणमधील सुंदर शहरे पाहून एक वेगळाच इराण समोर येत होता. तेहरानला जाताना अशा मिश्र भावना माझ्या मनात होत्या. एका नव्या अनुभवाला सामोरे जायची उत्सुकता मनात होती.

दुबईहून तेहरानच्या विमानात बसताना, आजूबाजूच्या माणसांच्याकडे पाहिले तर ती सगळी युरोपियनच वाटत होती. गोरे, उंच, नाकेले पुरुष आणि बायका तर खूपच सुंदर! काळेभोर केस, काळे डोळे आणि गोरापान रंग. त्यांचा पेहरावही पाश्चात्यच होता. कोणीही डोक्याला ‘हिजाब’ म्हणजे रुमाल बांधलेला नव्हता. अर्थात काही बुरखा घेतलेल्या बायकाही दिसत होत्या.

खरंतर भारत आणि इराण हे अंतर काही खूप जास्त नाही. बंगलोर ते तेहरान हा प्रवास एकूण ४/५ तासांचा असेल. पण फक्त मुंबईहून तेहरानला इराण एअरची थेट विमानसेवा आहे. तीही आठवड्यातून बहुतेक दोनदाच आहे. नाहीतर दुबईमार्गे जावे लागते. माझे विमान बंगलोर – दुबई, दुबई – तेहरान, असे होते. दुबई – तेहरान हा प्रवास साधारण दीड तासांचा आहे. तेहरानला रात्री आठ वाजता विमान उतरले. तेहरानचा इमाम खोमेनी आंतरराष्ट्रीय विमानतळ हा शहरापासून जवळजवळ ७० किमीवर आहे.

विमान तेहरानला उतरले आणि बायकांनी पटापट डोक्याला रुमाल बांधले. मी ही बांधला. मी २१ मार्चला तेहरानला गेले, त्यावेळी तिथे चांगल्यापैकी थंडी होती. इराणमधला सर्वात मोठा सण ‘नोरुझ’ हा २१ मार्चला साजरा होतो. विमानातून बाहेर आल्यावर मला १५-२० वर्षांपूर्वीच्या मुंबई विमानतळाची आठवण झाली. वास्तविक हा विमानतळ नवा बांधलेला असूनही, त्यात नवेपणा, आधुनिकता दिसत नव्हती. उतरल्यावर चालताना दोन्ही बाजूला पर्सेपोलीस, इस्फाहान, शिराझ, काशान अशा निरनिराळ्या शहरातील मोठमोठे फोटो लावलेले होते. ते पाहत पाहत मी इमिग्रेशनपाशी आले. तिथे ‘फॉरिन’ या पाटीखाली अगदी थोडी माणसेच होती. विमानात पाहिलेली आणि युरोपीयन वाटलेली सगळीजण इराणीच होती. सगळ्या फॉरमॅलिटीज पूर्ण करून, सामान घेऊन बाहेर आले. इराणी माणसांचे भरभरून सामान येत होते. साधारण १९९०च्या सुमारास, सिंगापूरहून येताना आपली भारतीय माणसेही असेच भरभरून समान आणत असत, ते आठवले.

हवेत चांगलाच गारठा होता. आम्ही टॅक्सीत बसलो आणि तेहरानच्या दिशेने निघालो. तेहरान हे आपल्या मुंबई, दिल्ली सारखे महानगर आहे. प्रचंड मोठे! मात्र रस्ते सुनसान होते रात्र होती म्हणून असेल, असे वाटले.

सकाळी उठून रूमचा पडदा उघडला, तो समोर बर्फाच्छादित अल बोर्ज पर्वत! हा पर्वत तेहरानच्या उत्तरेला आहे आणि तो पाहताना इतका जवळ वाटतो, की सरळ चालत गेल्यावर आपण त्याच्या पायथ्याशीच पोचू, पर्वताला हात लावू शकू असेच वाटत राहते.

आज हवा अगदी छान होती म्हणून आम्ही फिरायला बाहेर पडलो. तर सकाळीही रस्ते रिकामेच होते. एवढे मोठे शहर, पण त्यात जिवंतपणा नव्हता. असे का? रस्त्यावरही सर्व बँका, दुकाने सगळं सगळं बंद. मग याचा उलगडा झाला. इथे ‘नोरुझ’ सणाच्या वेळी जवळजवळ पाच दिवस सर्व ऑफिसेस बंद असतात. सगळा इराण सुट्टी मानवत असतो. याचा प्रत्यय आम्हाला संध्याकाळीच आला.
आम्ही तेहरानमधल्या उत्तरेकडच्या एका भागात राहत होतो. या भागाला जॉरदॅन (jordan) असे म्हणतात. तिथून आम्ही दरबांद (Durband) या ठिकाणी गेलो. टॅक्सीने गेलो पण तिथे प्रचंड गर्दी होती. आम्ही राहत असलेल्या हॉटेल पारिज (Pariz) मध्ये काम करणारा आमीर नावाचा एक मुलगा आम्हाला तिथे भेटणार होता. इथे सगळेजण फार्सी भाषा बोलतात. इंग्रजी भाषा कमी जणांना येते असं जाणवलं. त्यामुळे टॅक्सीवाला आणि आमच्यात संभाषण होऊ शकत नव्हते. आमीरला फोन करून मग तोच त्याला कुठे टॅक्सी आण हे सांगत होता. शेवटी एकदाचे आम्ही पोचलो व आमिरही भेटला. रस्त्याच्या दुतर्फा गाड्यांची गर्दी होती. रस्ताही तसा लहानच होता. दरबांद ही जागा अल बोर्ज पर्वताच्या पायथ्याशी आहे. तिथून वर जायला ‘रोप वे’ आहे. पण ही ‘रोप वे’ म्हणजे बंद केबिन नसून, एक बाक होते. ‘रोप वे’ थोडी हळू झाली, की त्यात जवळजवळ ऊडी मारूनच बसायचे. त्यात बसल्यावर तर माझी गाळणच उडाली. थंडी आणि भीतीने मी गळाठून गेले. रोप वे संथ गतीने जात होती. खाली पाहिलं, की भीती वाटायची आणि समोर पाहिलं की काळाकभिन्न पर्वत जवळ येताना दिसायचा. थंडी तर खूप होतीच! अचानक मुलांचे चेहेरे डोळ्यांसमोर आले. आम्ही दोघे या डुगडुगत्या रोप वे मध्ये. काही झालं तर? मात्र तसे काही न होता, आम्ही वर पोचलो. वरून खाली जाणारा रस्ता दिसत होता. हॉटेल्स, गाड्या चिकार दिसत होत्या. जत्राच भरल्यासारखी वाटत होती. आम्ही चालतच खाली यायला निघालो. मी परत ‘रोप वे’त बसणं अशक्य होतं. आमच्या सोबत इतरही काहीजण डोंगर उतरत होते. आमिरशी गप्पा मारत आम्ही खाली आलो. पर्वतावरची माती अगदी भुसभुशीत होती. त्यामुळे बूट असूनही सारखे घसरायला होत होते.

खाली येऊन आम्ही एका हॉटेलात गेलो. इथे साधारण प्रत्येक हॉटेलात हुक्का असतोच. इथे त्याला ‘गायल्यून’ असे म्हणतात. बसायला चक्क मोठ्या डबलबेड सारखी बेडच असते. त्यावर तक्के-लोड असतात. चपला बूट काढून आरामात पाय पसरून बसायचे, आणि मग जेवणाखाण्याची ऑर्डर द्यायची. जेवणात मुख्यत्वेभात आणि कबाब असतात. शाकाहारी माणसाची इथे निव्वळ उपासमारच होते.
दरबांदहून आम्ही तजरीश या जागी गेलो. तजरीश हे तेहरानचेच एक उपनगर! तेहरानमधील मेट्रोचे हे उत्तरेकडील शेवटचे स्टेशन. तजरीश मार्केटच्या जवळ मशीदही आहे. सुंदर, निळ्या, गडद निळ्या रंगांचे मोझाईक वर्क केलेले मशिदीचे घुमट लक्ष वेधून घेत होते. इथले बाजारही एका विशिष्ट पद्धतीचे असतात. लहान लहान दुकाने आणि लहान लहान गल्ल्या! भाजीपाला, कापडचोपड ते सोन्याचांदीपर्यंत सर्व इथे मिळते. मात्र त्यासाठी या गल्ल्यांची थोडी ओळख व्हावी लागते. तजरीश भागातच पर्वताच्या उतारावर शहाचा ‘सादाबाद पॅलेस’ आहे. रस्त्याच्या बाजूला छान छान बागा होत्या. सर्व ठिकाणी ‘नोरुज’ सणासाठी केलेली खास सजावट दिसत होती.

नोरुज’चे पहिले चार-पाच दिवस संपूर्ण इराणला सुट्टी असल्याने, सर्व म्युझियम्स, पॅलेसेस, बाजार सगळे बंद होते. त्यामुळे आम्ही आमचा मोर्चा तेहरानच्या बागांकडे वळवला. इथे मेल्लाद पार्क, अब-ओ-अताश, जमशिदिये अशी अनेक सुंदर आणि मोठी उद्याने आहेत. त्याशिवाय ठिकठिकाणी छोट्या छोट्या बागा आहेतच. सुट्टी असल्याने इराणी लोक या बागांमध्ये मोठ्या उत्साहाने पिकनिकला येताना दिसत होते. इराणी माणूस हा कुटुंबवत्सल आहे. पिकनिकला सगळे कुटुंबासकट आलेले दिसत होते. खाण्यापिण्याचे सामान, चहाचे थर्मोस, एक-दोन कार्पेट्स (इथे चटई दिसत नाही) असा सगळा जामानिमा घेऊन, आणि खेळाचे सामान गाडीत घालून सगळे आलेले दिसत होते. मुले बॅडमिंटन खेळताना, स्केटिंग करताना दिसत होती. सर्व बागात लहान-थोर इराणी माणसे सुट्टी मनवत होती.

इथे जवळ जवळ प्रत्येकाकडे गाडी असते. इराणमध्ये मुळात पेट्रोल अतिशय स्वस्त आहे. त्यातही प्रत्येकाला दर महिन्याला काही लिटर पेट्रोल हे सरकारतर्फे अधिक सवलतीच्या दराने मिळते. त्यामुळे सगळ्यांकडे गाडी असते. गाड्या मुख्यत्वेकरून ‘सायपा’ आणि ‘पायकन’ या इराणी मेकच्या असतात. परदेशी गाड्या इथे दिसतात पण प्रमाण कमी आहे. इथे रस्तेही मोठे आहेत. जवळ जवळ सर्व इराणभर तीन-तीन लेनचे दुतर्फा रोड आहेत. दर किलोमीटरला रस्ता पार करण्यासाठी पूल आहेत. गाड्या खूप असल्याने बसेस मात्र कमी दिसतात. बससेवा तितकीशी चांगली नसली तरी जी आहे ती अतिशय स्वस्त आहे.

तेहरानभर मेट्रो सेवा आहे. मेट्रो शहरातल्या बहुतांशभागात जमिनिखालुनच जाते. तेहरानसारख्या मोठ्या शहरात फिरण्यासाठी ही मेट्रो सोयीची वाटते. इराणभर सर्व पाट्या, मग त्या रस्त्यांच्या असोत की दुकानांच्या, फार्सी भाषेतच आहेत. मात्र मेट्रो स्टेशनवरच्या पाट्या फार्सी आणि इंग्रजी भाषेत आहेत. त्यामुळे मेट्रोतून फिरणे आम्हाला सोपे वाटले. अनेकांना इंग्रजी येत नसले, तरी तोडक्या-मोडक्या भाषेत ते बोलण्याचा प्रयत्न करतात. तरुण लोकांना मात्र इंग्रजी येते असे जाणवले.

आम्ही भारतीय आहोत हे कळल्यावर अनेकांनी राज कपूर, सलमान खान, शाहरुख खान अशी नावे घेतली. एक-दोन टॅक्सिवाल्यांनी हिंदी सिनेमातील गाणीही गाऊन दाखवली. इराणी लोकांच्या स्मरणात अजूनही राज कपूर, दिलीपकुमार यांचे चित्रपट, या काळातील गाणी आहेत. त्यानंतर इस्लामिक राज्यक्रांतीमुळे बहुतेक हिंदी सिनेमांवर बंदी आली असावी. त्यामुळे मधल्या काही वर्षातले हिरो, सिनेमे त्यांना माहितीच नसावेत असे वाटले. एकदम त्यांना आताचे शाहरुख, आमिर, सलमान माहिती आहेत. थोडक्यात ७०-८० च्या दशकातले राजेश खन्ना, धर्मेंद्र, ऋषी कपूर हे हिरो त्यांच्या फारसे परिचयाचे नाहीत.

आम्ही तेहरानमधल्या फिल्म सिटीतही जाऊन आलो. एक सुंदर रस्ता तिथे उभारण्यात आला आहे. त्याचप्रमाणे जेरुसलेममधील एक चौकही उभारण्यात आला आहे. शिया मुस्लिमांचा पूजनीय ‘इमाम अली’ यांच्यावर एक प्रसिध्द सिनेमा काढण्यात आला होता. त्या सिनेमाच्या चित्रीकरणासाठी एक प्राचीन खेडेही उभारण्यात आले होते, ते ही पाहिले. तेहरान मधील एक-दोन प्रसिध्द इमारतींच्या प्रतिकृतीही उभारण्यात आल्या आहेत. आम्हाला ही जागा आवडली. मात्र इराणी चित्रपट न पाहिल्यामुळे या जागेशी तितकी नाळ जुळली गेली नाही.
खरंतर, आजच्या जागतिक चित्रपटात इराणी सिनेमे हे एका वेगळ्या पातळीवर जाऊन पोचले आहेत. वेगळे विषय, संवेदनशील हाताळणी, उत्कृष्ट अभिनय आणि दिग्दर्शन या सिनेमातून पाहायला मिळतो असे अनेक नामवंत कलाकारांच्या मुलाखतीत वाचलेले आहे. आता असे चांगले चित्रपट नक्की पाहायचे असे ठरवून या चित्रनगरीचा आम्ही निरोप घेतला.

इराणी माणसाला संगीतही खूप आवडते असे जाणवले. टॅक्सीमध्ये वा इतर ठिकाणीही संगीत/गाणी ऐकू येतात. पण इस्लाममध्ये स्त्रियांनी गाऊ नये असे सांगितले आहे. त्यामुळे ही गाणी पुरुषांच्याच आवाजातील होती. पण त्यांचे संगीत मात्र भारतीय संगीताशी नाते सांगणारे वाटले.

नोरुझचे पहिले चार-पाच दिवस झाल्यावर आम्ही ‘गुलेस्तान’ राजवाडा पाहायला निघालो. हा राजवाडा तेहरानच्या दक्षिणेला, अगदी गजबजलेल्या भागात आहे. ‘तेहरान बाजार’ हा प्रसिध्द बाजार या राजवाड्याच्या जवळच आहे. राजवाडा पाहायला मोठी गर्दी होती. तब्रिझ, इस्फाहान, शिराझ या इराणच्या इतर मोठ्या शहरातून अनेकजण तेहरान पाहायला आले होते. गेल्या वर्षात इराणच्या रियाल या चलनाची मोठ्या प्रमाणावर घसरण झाल्यामुळे इराणी लोक, इराणमध्येच सुटी घालवताना दिसत होते. नाहीतर इराणी लोक सुट्टीसाठी मोठ्या प्रमाणावर युरोपमध्ये जात असत, असे काही जणांशी बोलताना समजले.

‘गुलेस्तान’ हा राजवाडा क्वाजौर घराणे, जेव्हा सत्तेत होते, तेव्हा त्यांनी बांधलेला होता. इथे राजवाडा म्हणजे एक मोठी थोरली इमारत असे नसते, तर अनेक इमारतींचे संकुल या जागेत असते.या ठिकाणी शस्त्रांचे म्युझियम्, चित्रांची कला दालने, आरसे महाल, अशा अनेक इमारती आहेत. या इमारती आकाराने लहान पण सजावटीने अप्रतिम आहेत. आरसेमहाल पाहून तर डोळे दिपून जातात. नोरुज असल्याने या राजवाड्याच्या उद्यानातही छोटी जत्राच भरलेली होती.

शहाचा सादाबाद राजवाड्याचे संकुल अल बोर्झ पर्वताच्या उतारावर आहे. या ही संकुलात अनेक म्युझियम्स आहेत. मात्र इथला ‘ग्रीन पॅलेस’ हा प्रामुख्याने पाहण्यासारखा आहे. येथील खोल्यांची सजावट, रंगसंगती, गालिचे, फर्निचर, इतर वस्तू या अत्यंत कलात्मक रीतीने सजवलेल्या आहेत. इराणची वैभवी परंपरा या राजवाड्यातून आपल्यासमोर सदर होते.

‘सादाबाद’ प्रमाणेच ‘नियाव्हेरोन पॅलेस’ ही पाहण्यासारखा आहे.या ठिकाणी शहा स्वत: रहात होता. या राजवाड्यात शहाला अनेकांनी दिलेल्या भेटी, मोठमोठे चित्रांसारखे गालिचे, रशिया, चीन, भारतीय, फ्रेंच, ब्रिटीश बनावटीचे फर्निचर, याच देशातून आलेल्या भेटी, यात कोरीव काम असलेल्या अनेक वस्तू, फुलदाण्या, काचेच्या वस्तू अशा साऱ्या गोष्टींचा समावेश आहे. शहा, त्याची मुले, त्याची राणी फारा दिबा यांची काही चित्रे, पोर्ट्रेटस, त्यांचे पोशाख – सर्व काही जतन करून ठेवले आहे. आणि या सर्व गोष्टीही आवर्जून पहाव्यात अशाच आहेत.

तेहरानमधील आणखीन एक खास म्युझियम म्हणजे, ‘मोसे जवाहिरात’! म्हणजेच ‘ज्वेलरी म्युझियम’. ‘बँक मेल्ली इराण’ या बँकेच्या तळघरात हे म्युझियम आहे. कडेकोट बंदोबस्तात असलेल्या या म्युझियममध्ये गेल्यावर समोरच सोन्याचे प्रचंड मोठे सिंहासन दिसते. कलाकुसर केलेले, हिरे, माणके, मोती जडवलेले हे सिंहासन पाहून जी बोलती बंद होते, ती पुढचे तासभर बंदच होते. वेगवेगळ्या राजवटीतले रत्नजडित दागिने पाहून अक्षरशः डोळ्यांचे पारणे फिटते.
आम्हांला फार्सी येत नाही याचा मोठाच फायदा आम्हांला इथे झाला. आम्ही तिथे म्युझियम वरील एक पुस्तक विकत घेतले. इतर सगळ्याजणांना तिथला गाईड माहिती सांगत होता आणि गर्दी असल्यामुळे पुढे सरकायला सांगत होता. आम्ही मात्र त्यातील चित्रे पाहत आणि त्यातील माहिती वाचत, प्रत्येक कपाटाजवळ जास्ती वेळ थांबत होतो. थोडेसे सावकाश पुढे जात होतो. बहुतेक आम्ही त्यांचे पाहुणे असल्याने, आम्हाला कोणी घाई करत नव्हते.

रत्नजडित हत्यारे, माणकांचा कप, हिरे,पाचू, माणके आणि मोत्यांच्या लडी जडवलेला कॅण्डल स्टॅन्ड! हिरेजडीत पृथ्वीचा गोल, असंख्य ब्रूचेस, फतेह अली शाह या क्वाजॉर घराण्यातील राजाचा रत्न-मोती जडित मुकुट, आणि सोन्याच्या, चांदीच्या तारांनी मढवलेली राजवस्त्रे, काय काय म्हणून सांगू? याच ठिकाणी नादिरशहाने भारतातून लुटलेला ‘दर्या-ए-नूर’ हा गुलाबी रंगाची झाक असलेला हिरा आहे.

नादिरशहाने लुटलेले ‘मयूर सिंहासन’ मात्र इराणपर्यंत पोचलेच नाही. वाटेतच या सिंहासनवरून मारामारी होऊन, त्याचे तुकडे-तुकडे करून ते लुटण्यात आले, असे इथल्या गाईडने सांगितले. म्युझियममध्ये गेल्यावर समोर दिसते, ते मयूर सिंहासनासारखे बनवलेले दुसरे सिंहासन होते. सिंहासन कसले, राजाची मुले-मुली, अगदी सगळे कुटुंब आरामात बसू शकेल, असा मोठा पलंग वा दिवाणच होता तो! त्यावर सोन्याचे पत्रे लावलेले आणि रत्ने मढवलेली! अक्षरशः ‘मोसे जवाहिरात’ मध्ये जी दौलत आपण पाहतो, ती पाहून आपले डोळे दिपून जातात. तिथले शिरपेच, दागिने पाहताना मला वारंवार ‘मुघल-ए-आझम’, ‘अनारकली’ अशा मुस्लीम ऐतिहासिक सिनेमांची आठवण येत होती. मोठ्या कष्टाने या दौलतीवर एक शेवटची नजर टाकून, आम्ही बाहेर पडलो.

हे म्युझियम बघण्यासाठी आम्ही रांगेत उभे असताना, अनेक इराणी लोकांनी, इथल्या बऱ्याचशा गोष्टी भारतातूनच लुटून आणल्या आहेत असे आवर्जून आम्हाला सांगितले. एका इराणी दम्पतीशी आमची ओळख झाली. ते ‘तब्रिझ’हून आले होते. या नवरा-बायकोला इंग्रजी छान येत असल्याने आम्ही खूप गप्पा मारल्या.

तेहरानमध्ये काही दिवस राहिल्यानंतर अनेक वेगळ्या गोष्टीही नजरेस पडल्या. या शहरात प्रत्येक रस्त्यावर सतत दिसणारी गोष्ट म्हणजे बँक! इथे पर्शियन, तिजारत, पासरगड, अयानदेह, बँक मेल्ली इराण – अशा इतक्या बँका आहेत, की बस! मला तर गम्मतच वाटली. एकूण लोकसंख्येच्या मानाने अनेक बँका आहेत, असे जाणवले. या सर्व बँका फायद्यात चालत असतील का? असाही विचार मनात डोकावून गेला.

दुसरी गोष्ट म्हणजे, खूप वेळा नाकाला बॅन्डेज केलेली माणसे, मुख्यत्वे मुलं-मुली दिसतात. इराणमध्ये नाकावर प्लास्टीक सर्जरी करणे खूप कॉमन आहे, असं वाचलं होतं, त्याचे प्रत्यंतर आले. मुळात सुंदर असलेल्या नाकांवर, ही मुलं सर्जरी का करतात असाही प्रश्न पडला. अर्थात इथे स्त्रियांचा चेहरा, हात आणि पाय (म्हणजे चपला व बूट) फक्त दिसतात. त्यामुळे स्त्रिया इथे मेकअप खूप करतात. विशेषतः ‘आय मेकअप’! केस स्ट्रीक केलेल्याही अनेक तरुणी दिसल्या. ‘नेल स्पा’ च्या मोठमोठ्या जाहिराती रस्त्यांवर दिसतात. हाताच्या नखांना गडद, बोल्ड रंग लावण्याची, नखांवर रंगसंगती करण्याची पध्धत आढळते. नखांवर नक्षीही काढतात. पायांतील शूज, सॅन्डल हे ही महाग व बऱ्याचदा रंगीत दिसतात. म्हणजे लाल किंवा तपकिरी रंगांचे! पायाचे शूज व डोक्याचा हिजाब म्हणजे बांधायचा रुमाल, यांचेही काही तरुणी मॅचिंग करताना दिसतात. अर्थात हे फक्त वीकेंडलाच! कारण या बायकांना कामाच्या ठिकाणी रंगीत कपडे घालता येत नाहीत. काळ्या, गडद निळ्या वा राखाडी रंगाचेच कपडे घालावे लागतात. साहजिकच हिजाब ही काळ्या रंगाचाच असतो.

स्त्रियांवर बंधने असली तरी इराणमध्ये सर्व ठिकाणी महिला काम करताना दिसतात. पुरुषांच्या बरोबरीने सर्व कार्यालयात, बँकात, एअरलाईनच्या ऑफीसात, ट्रॅव्हल-टूरच्या ऑफीसात, हॉटेलात स्त्रियांची लक्षणीय उपस्थिती जाणवते. इतकेच काय, इथे स्त्रिया टॅक्सी चालवतानाही दिसतात. अर्थात असे असले, तरी कायद्याच्या दृष्टीने त्यांना समान अधिकार नाहीत हे ही तितकेच खरे आहे.

काळ्या कपड्यांनी वेढलेल्या इथल्या सुरेख इराणी स्त्रिया पाहिल्या, की वाईट वाटते. केसांत गजरा माळणे, फुल घालणे, निरनिराळ्या केशरचना करणे, हे सगळं आयुष्यातून वजा होणे हे बायकांच्या दृष्टीने दु:खाचेच आहे. आपल्या इथे दिवसातून अनेकवेळा टीव्हीवर दिसणारी, वा मासिकात, पेपरात दिसणारी शाम्पूची जाहिरात इथे मी अजिबात पहिली नाही. या केसांवरून मला आपल्याइथले जावेद हबीब आणि शहनाझ हुसेन आठवले. भारतात एक आघाडीची नाममुद्रा (brand) झालेली ही दोघेजण! एखाद्या मुस्लीम देशात असती, तर त्यांच्यातील कला-कौशल्याची मातीच झाली असती.

-स्नेहा केतकर

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle