अ बॉय इन द सिटी
सकाळची नेहमीची धांदल. मुन्नाचं कॉलेज सुरु झालेलं. अनुला आता बाप व लेक दोघांचे डबे व नाष्टा तयार ठेवायचा होता. अंघोळ करुन बाथरुमबाहेर आला की मुन्नाचा .....झाला का डबा ? असा धोशा सुरु होई. अनु इतके दिवस नव-याला वादळ म्हणे पण आता मुन्नाच्या रुपाने चक्रीवादळ सकाळी घरात घोंगावे. अरे रुमाल , डबा ,पाण्याची बाटली वगैरे वगैरे वस्तूंच्या आठवणीचा पुकारा घरात चालू असे.ही सर्व तयारी आणि गडबड इतकी वर्ष होतच होती पण आता "रेल्वेची वेळ गाठण" ही नवी कसोटी त्यात वाढली होती. मुन्ना आता मिनीटांचे हिशोब करु लागला होता. उशीर झाला तर त्याला शेअर रिक्षाची भली मोठी रांग आणि रेल्वेच्या डब्यातील गर्दी दिसू लागली होती. मुन्ना कॉलेजला जाऊ लागला आणि मुंबईच्या जगण्याची खरी ओळख त्याला रेल्वे करुन देऊ लागली.
सगळं काम आटपून अनु मुन्नाच्या खोलीत गेली. टेबलवर नवीन नोंदवही होती. अनु व मुन्नाला स्टेशनरी साहीत्याच फारच व्यसन होतं.जरा वेगळ्या बांधणीची, छान सजवलेल्या कव्हरची वही दिसली की अनु ती मुन्नाला भेट देत असे. ही पण अशीच एक वही. सहज म्हणून अनुनी ती चाळली.
काय होतं त्या वहीत?
###आता रोज कॉलेजला ट्रेननी जायचं. सुरवातीला तरी खूप भारी वाटतंय. शाळेत असताना आजुबाजुचे लोक सात नंबर, आठ नंबर प्लॅटफॉर्म, रेल्वे पास, टीसी वगैरे काय काय बोलायचे तेव्हा वाटायचं हे सर्व आपल्याला समजेल का?मी तर स्कुलबसनी यायचो जायचो. पण आता ट्रेननी जाणार. रोज किती त-हेत-हेची माणसं दिसतात ह्या रोजच्या प्रवासात.
###आता कॉलेजचे मित्रही ट्रेनमधेच भेटायला लागले. आज डब्यातल्या लोकांनी आम्हाला आमचं स्टेशन यायच्या आधीच दाराशी पुढे जायला रस्ता करुन दिला. त्यांच्या सराईत नजरेने आम्ही न्यू एॅडमिशनवाले ट्रेनचे नवीन प्रवासी आहोत हे ताडलं. अनोळखी असलो तरी किती मदत करतात लोक?
###परवा फर्स्ट क्लासचा पास काढला. आता फर्स्ट क्लासने प्रवास. दोन्ही डब्यातील लोकांच्या वागणूकीत केवढा फरक ? आज खूप राग आला मला ह्या फर्स्ट क्लास मेंट्यालिटीचा. एक आजोबा काहीतरी देवाच पुटपुटत होते तर एक काका किती तुसडेपणाने बोलले त्यांच्याशी आणि गप्प केलं आजोबांना. एक सणसणीत ठेऊन द्यायचं मन झालं होतं त्या काकांच्या. हे सर्व पहाणारे इतर कम्युटर काहीही बोलले नाहीत. सगळे चिडीचूप. सेकंडक्लास मधे एकतर असं झालंच नसतं आणि नाहीतर इतर चार लोकांनी गुजराथी,हिंदीत त्या काकांना झापलं असतं. आणि मग थोडा वाद होऊन सगळं मिटलं असतं..................class difference
मला तर जमेल तेव्हा सेकंड क्लासने जायला आवडेल. माणुसकीचा प्राणवायू मिळवायला.
तसं तर एकदा त्या भजनवाल्यांच्या डब्यात पण शिरुन बघणारे मी एकदा
अनुला हे सर्व वाचताना मजा येत होती. खरंतर त्याची डायरी वाचणं अत्यंत चुकीचं होतं हे समजूनही तिचा मोह तिला आवरता आला नाही.हे एक माध्यम होतं मुलाची जडणघडण समजून घेण्याचं.तिला मुलगा मोठा होतोय याची जाणीव ही डायरीच देणार होती.
आज त्यामानाने मुन्ना कॉलेजमधून लवकर आला. अनु व तो एकत्र चहा पीत होते. एकदम मुन्ना म्हणाला तू काय टी शर्ट घालतेस?आणि हे केस एका खांद्यावरुन असे पुढे घेऊ नको.
अनु......का? मला टी शर्टस आवडतात. आणि केस पुढे न घेण्याचा काय फंडा आहे ?
काही नाही गं........छान दिसत्येस
खूप दिवसात डायरी पाहिली नाही हे अनुच्या लक्षात आलं............
###आज चिकू नेहमीची ट्रेन गाठू नाही शकला. मी, पप्या,टेकस सगळे वैतागलो होतो. नेहमीची ट्रेन गेली. पप्याची ७.२१ ची आयटम आमच्यासमोरुन गेली आणि टेकस हसता हसता तिला ठोकणार होता. नशीबाने ती आणि टेकस पण वाचला.नाहीतर पप्याने त्याला फोडला असता. तसं पप्याचा आणि त्या मुलीचा काही संबंध नाहीये ओळख पण नाहीये पण तरी ती पप्याची आयटम आहे असं आम्ही ठरवून टाकलंय. तर आम्ही चिकूची वाट पहात होतो.तो आला तेवढ्यात पुढची ट्रेन आली. आम्ही घाईने चढलो आणि आत जायला जागा नव्हती त्यामुळे थोडा वेळ दाराजवळ उभे होतो इतक्यात पिंगट केसांची ,मोठ्या डोळ्यांची ती धावत पुढे गेली. तिच्या मानेवरचा टॅटू कुठूनही ओळखता येतो. पप्या माझ्याकडेच पहात होता बहुतेक, मला म्हणाला ,"गेला का टॅटू?" मी म्हटलं ना मागच्या गाडीने येतो. टॅटू दिसायला तर टी शर्ट घालते ती रोज.
पप्या अभ्यास करुनही हे सगळे अपडेट्स कसे ठेवतो ?लक्ष तर बारीक असतं लेकाचं
अनुला हसूनहसून वेड लागायची वेळ आली होती. आता टी शर्ट चा अर्थ लागला होता.
अनु आज खूप दिवसांनी ट्रेननी जाणार होती. नोकरी करत होती तेव्हा तिचा पास होता आता पाच - सहा वर्ष ट्रेनचा नेहमीचा प्रवास नव्हता होत. ती आणि मुन्ना दादरला भेटणार होते. अनु तिकीटाच्या रांगेत उभी होती. आपण स्मार्ट कार्ड, कुपन्स काहीतरी जवळ ठेवायला हवं होतं. तितक्यात मुन्नाचा फोन आला. "निघालीस का ?"..........."हो रे पण इतकी मोठी रांग आहे तिकीट विंडोला!" "चील!!! तू व्हाईट लाईनवर आहेस का ? मग तुला पाच मिनीट लागतील तिकीट मिळायला."अनुनी फोनवर बोलता बोलता खाली पाहीलं.आणि तिला हसू आलं. काल ट्रेननी जाऊ लागलेल पोरगं किती शहाणं झालय.............चील
आज मुन्ना झपाटल्यागत घरी आला कॉलेजमधून.काय झालय? आज आम्हाला टी सी नी पकडलं. मी आणि सायन्टीस ............???????सॉरी आकाश..........आपल्या स्टेशनपर्यंत गप्पांमधे गुंग होतो . तो त्याच्या स्टेशनला उतरायचं विसरला. त्याचा पास तिथपर्यंतच असतो. मग टीसीने फाईन भरायला सांगितली. मग मी त्यांना (टीसी) म्हटलं माझीपण चुकी आहे आम्ही दोघ गप्पा मारत होतो. मी अर्धे पैसे देतो त्याला एकट्याला का शिक्षा? तर टीसी हसले आणि म्हणाले एकदम जिगरी दोस्त आहात रे! आणि त्यांनी फाईन कमी केली आमची. आकाश माझ्याकडून पैसे घेत नव्हता पण मी दिलेच त्याला.
एक प्रवास माणसाला काय काय शिकवतो? माणसं जोडणं, संकटात उभं रहाणं,मैत्री...........अनु काही बोलली नाही.
अनुनी आज ब-याच दिवसांनी डायरी वाचली.
### काल मुंबईत पावसाने हाहा:कार माजवला. कॉलेज मधून बाहेर पडलो तर सर्वत्र गर्दी ,गोंधळ.रिक्षा मिळत नव्हत्या. ट्रेन्स बंद झाल्या होत्या. आब्बास कॉलेजजवळ रहातो. त्याच्या घरी त्याने सक्तीने नेले. गेल्या गेल्या त्याच्या आईने डोकं पुसायला टॉवेल आणि बदलायला आब्बासचे कपडे दिले. त्यांच्या घरात नॉनव्हेज पदार्थ होते. तिने लगेच बाहेरुन माझ्यासाठी व्हेज सॅण्डविज मागवले. तिचं आब्बासशी बोलणं मला आईची आठवण करुन देत होतं.त्याचे बाबा बाहेरुन आले ते ही एकदम माझ्या बाबांसारखच बोलत होते म्हणजे माझी चौकशी वगैरे. आमच्या घरासारखे संस्कार असलेलं घर वाटलं मला.आचार विचार चांगले असले की काय हिंदु नी काय मुस्लिम? आज मी जवळून एक चांगल मुस्लिम कुटुंब पाहीलं.
###आज एमटु ( वर्षातील एक परीक्षा) चा निकाल लागला. आमच्या वर्गातील गोपाल सगळ्या विषयात नापास झाला. रोज किती लांबून येतो तो कॉलेजला ! इथे त्याच्या चाच्याकडे रहातो. कॉलेजला येण्यापूर्वी चाचीला घरकामात मदत करतो.त्याचे ,चाचाचे कपडे धुतो. त्यात त्याची इंग्लिशची बोंब आहे. तिकडे अलाहाबादला मोठ घर, शेती आहे.पण आता पुन्हा सगळी फी भरावी लागणार.इतके पैसे नाहीयेत म्हणाला बाबुजींकडे. खूप निराश झाला होता. आम्ही त्याला बोलतं केलं. काहीतरी वेडावाकडा विचार करु नको म्हणून सगळ्यांनी बजावलं.
एकदा घराबाहेर पडल्यावर हे शहर काय काय आणि किती मुन्नाला शिकवत होतं ! रोजची रिक्षावाल्यांची नाटकं तर कधी त्यांच्याशी मारलेल्या गप्पातून त्यांचे प्रॉब्लेम समजणं, कुणा मित्राच्या घरचे प्रॉब्लेम, कुणाचे असलेले सिंगल पॅरेंट, कुणी व्यसनात शिरु लागलेला, कुणाच्या गर्लफ्रेंडची नाटकं ! कधी आपलं सगळ बरोबर असूनही मार्कशीट नव्या मार्कींग सिस्टीमने भलतेच आकडे दाखवणारी, मग आपल्या लाडक्या प्रोफेसरनी मैत्रीत ह्या सिस्टीमकडे बघण्याचा दाखवलेला द्रुष्टीकोन. प्लॅटफॉर्मवरील बुटपॉलिश करणा-या राजूचं बेरकी हसणं तर कॅन्टीनमधल्या रमेशची शिकण्याची आवड, घरी येणारा कॉलेज करुन एकीकडे केबलचं कलेक्शन करुन पैसे कमावणारा जितु ;कॉलेज , नोकरी सांभाळून गरजुंसाठी कपडे भांडी गोळा करणारे आमच्या घरी येणारे जनजागृती एन जी ओ चे कार्यकर्ते सगळे मुन्नाला आयुष्याचे धडे शिकवणारे होते. रोजच्या प्रवासात आजुबाजुच्या परीसरात आणि एकुणच सर्वत्र दिसत असलेला कचरा पाहून सजग होणारा मुन्ना, प्लॅस्टीकचा कमीतकमी वापर करणारा मुन्ना, प्रदुषणाच्या चिंतेने त्यावरील उपाय योजनेत स्वत:हून सहभागी होणारा मुन्ना. भ्रष्टाचार, वशिलेबाजी, आरक्षण ,स्त्रीयांवरील अत्याचार याची ओळख होत असतानाच चांगुलपणा ,सकारात्मता ह्यानेही बरेच काही बदलू शकेल यावर विश्वास ठेवणारा मुन्ना दिवसा दिवसागणिक घडत होता. ह्या शहरातील कडू गोड बरेच अनुभव अजून त्याला घ्यायचे होते. ये तो बस एक शुरवात थी..........अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा होता. पण रोज प्रचंड उर्जेने भरलेले , कितीही मोठ संकट आलं तरी दुस-या दिवशी पुन्हा उभे रहाणारे हे शहर त्याला अजून काय काय शिकवणार होत ? असे अनेक "बॉय इन द सिटी " उद्याची सुंदर , खुशाल मुंबई घडवणार होते.
अंजली मायदेव
१८/१०/२०१७