घरातली उरलीसुरली भाजी संपवायला जालावर थोड्या रेसिप्या शोधून हा पुलाव जमेल असं वाटलं, म्हणून रविवार सत्कारणी लावला :P
तर ते उरलंसुरलं साहित्य असं आहे:
तांदूळ - दीड वाटी
पालक - साधारण पाव जुडी
खडे मसाले- मिरीदाणे, वेलदोडा, दालचिनी, लवंग, जिरे, तमालपत्र इ. आवडीनुसार आणि शिल्लक असतील ते :P
हिरव्या मिरच्या - तीन उभ्या चिरून
पुदिना- सात आठ पाने
आलं लसूण ताजी पेस्ट - १ मोठा चमचा
कांदा - दोन- उभा चिरुन
फ्लॉवर, गाजर, बटाटा - तुकडे करून (आवडीची कुठलीही फळभाजी घ्या)
हिंग
गरम मसाला किंवा बिर्याणी मसाला
मीठ - आवडीनुसार
लिंबू - एक
आता कृती :
१. तांदूळ धुवून १५ मिनिटे बाजूला ठेवा. नंतर कुकरमध्ये एक शिट्टी करून अर्धवट शिजवून बाहेर काढून ठेवा. (गार पाणी घालून ड्रेन करा म्हणजे शिजणे थांबून भात मोकळा राहील)
२. पालक चिरून त्यात थोडे चिरलेले आलंलसूण, हिरवी मिरची, धने, अर्धा कांदा, थोडं मीठ हे सगळं घालून मिक्सरमधून काढा. ही हिरवी प्युरी बाजूला ठेवा.
३. कढईत तेल गरम करून हिंग जिऱ्याची फोडणी करा, त्यात आलं लसूण पेस्ट, हिरव्या मिरच्या आणि खडे मसाले घालून नीट परता, नंतर त्यात चिरलेल्या भाज्या आणि गरम/बिर्याणी मसाला घालून शिजू द्या.
४. आता त्यात हिरवी प्युरी घालून त्यात पुदिना घालून एक मिनिट परता, त्यात अर्ध लिंबू पिळा म्हणजे रंग हिरवागार राहील. थोडं मीठ घालून अर्धी वाटी पाणी घाला.
५. आता त्यात शिजलेला भात घालून, ज्योत वाढवून भराभर परता, थोडं थोडं पाणी शिंपडत रहा. तेव्हाच चव बघून मीठ कमी वाटलं तर पुन्हा घाला. परत थोडा गरम मसाला घालून परता. झाकण ठेवून एक वाफ काढा.
पालक पुलाव तयार!