काल रात्री अमर फोटो स्टुडिओ हे नाटक बघायचा योग आला. फार आधी (जवळजवळ दीडेक वर्ष झालं असेल) या नाटकाच्या शुभारंभाच्या प्रयोगाआधी मराठी फेसबूक विश्वामध्ये आलेली ब्लॅक ऍंड व्हाईट फोटो प्रोफाईल अपडेट करायची कॅंपेन या नाटकाच्या टीमने सुरू केली होती. तेव्हापासूनच, नाटकाचे नाव लक्षात राहिलं होतं. साधारणपणे टीव्ही मालिकेमधले “स्टार्स” घेऊन येणारं नाटक हे बर्याॅचदा त्या मालिकेची अथवा स्टार्सची प्रसिद्धी एन्कॅश करायच्या नादांत असतात, नाटक दर्जेदार असेलच असं नाही.
अमर फोटो स्टुडिओमधले चारही मुख्य कलाकार हे दिल दोस्ती दुनियादारी या झी युवाच्या गाजलेल्या मालिकेमधले स्टार्स. त्यापैकी अमेय वाघ तर सध्या फास्टर फेणे असल्याने आबालवृद्धांमध्ये (त्यात कॉलेज तरूणीही आल्याच!!) सुप्रसिद्ध. सखी गोखले दिदोदु मध्ये कधीही आवडली नाही. सुव्रत तिथंही जरा शांतच दाखवलाय आणि पूजा ठोंबरे कायम दिदोदुमध्ये असून नसल्यासारखी जाणवत राहिली. मात्र, मालिकेमधलं इम्प्रेशन या नाटकानं पार घालवलं हे नमूद करायलाच हवं. मनस्विनीची लेखन शैली आणि निपुणचं तिरकस शैलीमधलं दिग्दर्शन यामुळे हे चारही कलाकार एकदम छा जाते है. त्यातही सखीचे अधिक कौतुक. जबरदस्त एनर्जीने तिनं काम केलं आहे. सुव्रत तर या नाटकाची खरी जान आहे. अमेय वाघची भूमिका टाळ्याखाऊ असली तरी सुव्रतने त्याला दिलेली साथ फार महत्त्वाची आहे. वेगवेगळ्या कालखंडामधली भाषा वेगवेगळ्या लयीत वापरणे एकदम ब्रिलियंट. सुव्रतने केलेला बाप आणि मुलाचा प्रसंग फार अनोखा आणि करायला कठीण आहे, पण त्यानं ताकदीनं निभावला.
पूजा ठोंबरे अतिशय वेगात बोलते आणि त्यामुळे तिचे कित्येक शब्द स्पष्ट येत नाहीत. भाषेचा एकदम ठसकेबाज वापर करून आणि आवाज दणदणीत असूनही केवळ वेगामुळे तिचे संवाद निसटतात.
अमेय वाघबद्दल काय बोलावे? अतिशय सुरेख आणि चपळ वावर. त्यानं साकारलेला व्ही. शांताराम अत्यंत अफलातून आहे. कृष्णधवल सिनेमाचं शूटिंगवाला प्रसंग एकदम परफ़ेक्ट. त्यात अमेयने त्याच्या मोठ्या डोळ्यांचा केलेला अफलातून वापर फार धमाल आहे. मूळ सिनेमा ज्यांनी पाहिलाय त्यांना हे लगेच लक्षात येईल. काळाचे संदर्भ फटाफट बदलत असतानाही प्रत्येक छोट्याछोट्या गोष्टींचं राखलेलं भान अधिक आवडलं. इंटरनेटबद्दल माहिती देतानाचा प्रसंग तर जाम हहपुवा!!!
नाटक वरकरणी विनोदी असलं तरी त्याचा गाभा सकस आहे. काळाचे घेतलेले दोन खंड अत्यंत समर्पक आणि आजच्या परिस्थितीला चपाखल बसतील असेच आहेत. बंडखोरी ही केवळ कुठल्याही काळाची मक्तेदारी नाही, प्रत्येक पिढीमध्ये बंडखोरी होतच असते, पण आता घडत असलेली बंडखोरी ही केवळ बंडखोरी नाही तर मुस्क्टदाबी आहे, वर हीच मुस्कटदाबी मह्णजे कशी योग्य हे सिद्ध करण्यासाठी झालेली झटापट तर अधिक दुर्भाग्यपूर्ण. सोशल मीडीयाचा वाढता वावर, प्रत्येक साध्यासरळ गोष्टींचं झालेलं विचित्र क्लिष्टीकरण हे आमच्या आजच्या पिढीचं आव्हान. रॅट रेस ही एकेकाळी फक्त शाळा कॉलेजांमधल्या मार्कांपुरती अवलंबून होती, अता ती आयुष्याच्या प्रत्येक क्षणाचा भाग बनली आहे. अमेरिकेत झालेल्या कुण्या सेलीब्रीटीच्या घटस्फोटाची माहिती जर तीन सेकंदामध्ये आपल्यापर्यंत पोचली नसेल तर आपण आऊटडेटेड झालेलो असतो. माहिती ही टिकवून ठेवण्याची शाश्वत गोष्ट नसून, वचावचा गोळा करून मिरवायची बाब बनली आहे. कुठल्याही साध्याश्या गोष्टीचं आपल्याला प्रचंड डिप्रेशन येतं. खरंतर गरज नसते, इतका विचार करण्याची, मनाला लावून घेण्याची. आभासी जगामधल्या आभासी विचारांनी स्वत:ला शिणवून घेण्याची. तरीही, ते आपण करतोच आहोत. अशावेळी काळाची चक्रं जेव्हा उलट सुलट फिरतात तेव्हा जाणवतं की “दिस टू शॅल पास.”
आज ज्या गोष्टीसाठी आपण इतका अट्टहास करत आहोत अजून काही वर्षांनी त्यांचं मूल्य कदाचित उरणारच नाहीये, आज आपण ज्या वेगानं धाव्त आहोत तो वेगच काही दिवसांनी कालबाह्य होणार आहे. अशावेळी अधिकाधिक वेग वाढवून स्वत:ला बर्न आऊट करायचं की आहे त्या क्षणाला आपलंसं मानून तिथंच आपलं इप्सित शोधायचं हा आपला चॉइस.
योग्य तो चॉइस जर निवडलाच असेल तर भेट द्या एकदा अमर फोटो स्टुडिओला आणि बंदिस्त व्हा काळाच्या एखाध्या इवल्याशा कणामध्ये. कायमचे. अमर होऊन.