मी अमेरिकेत पहिल्यांदा गेले त्याला आता दहा वर्षं होऊन गेली. गंमत अशी आहे की परदेशप्रवासाचे सगळे अनुभव इथूनतिथून सारखेच असले तरी ते दुसऱ्याला सांगावेसे वाटतात. मग ते वाचणाऱ्याला कसे का वाटेनात .. .. अमेरिकेतली माझी अगदी पहिली सकाळ होती आणि माझा तो ताजाताजा अनुभव कागदावर उतरवल्याशिवाय मला अगदी चैनच पडेना ...मग काय ओढलं कागद पेन आणि केलं सुरू.
त्यानंतर मी अजून दोन वेळा अमेरिकेत गेले. त्यात एकदा फ्लाईट चुकली म्हणून
तीन टप्पे घेत इंडिया गाठलं. पण पहिल्या अनुभवाची मजा काही औरच असते. तो अनुभव त्याचवेळी लिहिला म्हणून बरे झाले. नंतर वाचताना तो बाळबोध ....खरं तर जरा बावळटच वाटतो. या लिखाणावर मुक्तपीठीय असा शिक्का मारून ते मी बॅगेच्या अगदी तळाशी टाकलं होतं. ते आज बाहेर काढलं. पहिलटकरणीची नवथरता समजावी म्हणून मी ते लेखन काही न एडिटता तसच ठेवलंय. बघा कसं वाटतंय ...................................
जुलै २००७ मध्ये श्री अमेरिकेत मेम्फिसला कमिन्सच्या असाइनमेंटवर गेला. तेव्हापासूनच मला पण अमेरिकेत जाण्याचे वेध लागले.पासपोर्ट तर कधीचाच तयार होता.७-८ वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियावारी पण घडली होती त्यामुळे एकट्यानी परदेश प्रवासाची भीती नव्हती. पण ऑस्ट्रेलियात गेले तेव्हा मुंबई ते सिडनी व्हाया सिंगापूर थेट प्रवास होता. त्यामुळे सिडनी एअरपोर्टवरवर बॅगेजच्या बेल्ट जवळच श्री जेव्हा भेटला तेव्हा तर परदेश प्रवास अगदीच सोप्पा वाटला मला !
२१ ऑक्टोबर ला दसरा होता. तोपर्यंत रोज कामावर जातच होते. २७ ऑक्टोबरचं रात्रीचं विमान होतं. २१ ते २७ हे दिवस मात्र गडबडीत गेले. रोज कामांची आणि आणायच्या सामानाची लिस्ट करायची आणि जास्तीत जास्त कामं संपवायचा प्रयत्न करायचा असं चाललं होतं.धनश्री आणि अनुपम दोघंच घरी राहणार, धनश्री स्वयंपाक करून कॉलेजला कशी जाईल, अनुपम तिला मदत करेल ना? असं अधूनमधून वाटायचं पण विचार केला की मुलं आता मोठी झाली आहेत. आई बाबा घरी नसताना कसं रहायचं हे पण शिकायला हवंच ना.
असं करताकरता २७ तारीख उजाडली. २२ किलोच्या दोन मोठ्या बॅग्ज, ७ किलोची केबिनबॅगआणि हॅन्ड पर्स असं सामान झालं. दुपारी २ वाजता मी धनश्री आणि अनुपम कॅबनी दादरच्या दिशेनी निघालो. मुलांची मावशी वाटच बघत होती. तिच्याकडे जेवून रात्री ११ वाजता विमानतळावर पोहोचलो. ट्रॉलीवर सामान चढवून गेटवर तिकीट दाखवलं आणि मागे वळून हात हलवून मुलांचा निरोप घेतला. आता तीन महिने मुलांना भेटता येणार नाही याची नव्याने जाणीव झाली.
आता मी एका वेगळ्याच जगात प्रवेश केला.रांगेतून पुढे जात जात प्रथम सामानाचं स्क्रीनिंग झालं. मग टॅग्ज लावून चेकइन लगेज (२२ kg २ बॅग्ज ) काऊंटरवर दिलं .त्यानंतर बोर्डिंग पास घेतला आणि इमिग्रेशन सिक्युरिटी अशा सोपस्कारातून पार पडून लाऊंजमधल्या खुर्चीवर जावून बसले. ही जेट एअरवेजची 9W228 फ्लाईट होती. पहाटे २.१० ला मुंबईहून निघून बेलजिअमची राजधानी ब्रुसेल्स येथे थांबून पुढे अमेरिकेत पूर्व किनाऱ्यावर Newark येथे जाणार होती.10-15 मिनिटातच प्रवाशांनी विमानात बसण्यासाठी अनाउन्समेंट सुरु झाली. सर्व प्रथम छोटी बाळं बरोबर असणारे आईबाबा, मग ज्येष्ठ नागरिक आणि त्यानंतर इतर प्रवासी.रो ३५ ते ५० असा पुकारा झाला आणि मी सामानासह गेट मधून प्रवेश केला. दारातच गुड मॉर्निंग, वेल्कम असं म्हणून हवाई सुंदरींनी स्वागत केलं. ३९ ब आसन शोधत केबिन बॅग ओव्हरहेड कंपार्टमेंटमध्ये टाकली आणि हुश्श करत खुर्चीत बसले.
पहाटे २-१५ (२८.१०.०७) चं फ्लाईट ३.०० वाजता निघालं. विमानानी रनवेवरून वेग घेतला. चाकं पोटात घेतली आणि आकाशात झेप घेतली. थोड्याच वेळात विविध पेयांचे चषक, बाटल्या भरून सुंदरींची लगबग सुरू झाली. समोरच्या स्क्रीनवर मनोरंजनाचे विविध चॅनल्स तपासले जाऊ लागले.कानात हेडफोन लावून प्रवासी स्वतःच्या विश्वात रंगले. जलपानानंतर अल्पोपहाराची फेरी झाली, दिवे मंद झाले आणि मंडळी पेंगू लागली. काही तर ब्लॅंकेट पांघरून चक्क घोरू लागली.कुठे एकाद्या चिमुकल्याचा दबलेला रडण्याचा आवाज तर कुठे सुंदरींचे कमावलेल्या नम्रतेने विनयशील बोलणे या नंतर सगळीकडे शांतता पसरली आणि झोप कधी लागली ते कळलेच नाही.
जाग आली तेंव्हा घड्याळ भारताच्या प्रमाणवेळेनुसार सकाळची ८ वाजताची वेळ दाखवत होते. बाहेर गुडूप अंधार होता. गर्दी होण्याआधीच प्रसाधन कक्षात जावून आले. सुंदरी आता गरम पाण्यात भिजवलेले टर्किश नॅपकिन्स वाटत होती. ते चेहऱ्यावरून फिरवून एकदम ताजीतवानी झाले. ब्रेकफास्ट टी कॉफी मध्ये काही वेळ गेला.यथावकाश विमान ब्रुसेल्सला उतरत असल्याची घोषणा झाली.साधारण ११ तासांचा प्रवास झाला होता. पण ४-५ तास झोपेत गेल्याने फार जाणवला नव्हता.विमानतळावर तसा शुकशुकाटच होता.बाहेर पडताना ट्रान्झिट पास दिला गेला.पुन्हा एकदा सिक्युरिटी सोपस्कार झाले. ब्रुसेल्स ते नेवार्क साठी तेच विमान पण दुसऱ्या गेटवर लागणार होते. सकाळी ७.३० -८ ची वेळ, अजिबात गर्दी नसलेला मोठा, स्वच्छ विमानतळ, युरोपची आल्हाददायक हवा, जाता येता सहजच smile देणारा airport crew, खूप छान वाटत होतं. २ तास वेळ कसा गेला कळलं नाही. पुन्हा एकदा त्याच विमानात प्रवेश केला. विमान कर्मचाऱ्यांनी सगळं विमान आवरून सावरून स्वच्छ, नीटनेटकं केलं होतं. विमान सोडताना असलेला शिळेपणा कुठच्याकुठे पळाला होता, आता पुढचा टप्पा आठ साडेआठ तासांचा होता.सहप्रवाशाला विनंती करून विंडो सीटवर बसले. नुकताच हलका पाऊस पडून गेला असावा. ब्रुसेल्सची छोटी घरे, रस्ते नुकतेच जागे होत होते , खिडकीतून वृक्षवल्ली न्याहाळत असतानाच विमान ढगांच्या प्रदेशात शिरले. आता खाली फक्त ढगांचे राज्य.पांढरा शुभ्र पिंजलेला कापूस नजर पोहोचत नाही तेथपर्यंत. विमानाने अधिक उंची गाठली आणि हे चलतचित्र संपले.
चार पाच तासांनी अटलांटिक समुद्रावरून विमान जात जात अखेर अमेरिकेची भूमी दिसू लागली. सगळा सपाट प्रदेश, सहा-आठ पदरी लांबच लांब रस्ते. तुरळक दिसणारी सुनियोजित शहर/ गावं, मधूनच काही जलाशय, नदी असावी असं वाटणाऱ्या पाण्याच्या रेघा. सह्याद्रीच्या रांगा जागोजागी बघण्याची सवय असलेल्या माझ्या डोळ्याना तो सगळा प्रदेश फारच एकसुरी वाटला. तेवढ्यात 'एक तासात नेवार्क ला पोहोचत असल्याची घोषणा झाली. विमानाच्या खिडकीतून आता सारा परिसर, रस्ते वाहने, घरं स्पष्ट दिसू लागला. नेवार्कचा भव्य international airport दिसू लागला आणि विमान लँड झालं. मग रिव्हर्स घेऊन ठरलेल्या गेट पाशी लागलं. विमानाच्या वेळापत्रकानुसार मला नेवार्क विमानतळावर साडेतीन पावणेचार तास मिळणार होते. तेवढ्या वेळात मला पहिल्या विमानातले सामान घेऊन मेम्फिसला जाणारे continental airlines चे विमान गाठायचे होते. या सगळ्या कामासाठी अगदी २ तास धरले तरी दीड दोन तास विमानतळावर मिळतील असं वाटलं होत. . पण मुळातच विमान ४५ मिनिटे उशीरा सुटले होते, आणि गाडी लेट सुटूनही राईटटाईम टच करण्याचं एस टी चालकाच कौशल्य पायलटकडे नसल्याने विमान एकूण तासभर उशीराच पोहोचलं. ३५० प्रवाशांना घेउन जाणाऱ्या विमानाने अखेर अमेरिकेच्या भूमीला आपली चाकं लावली आणि आपापलं सामान घेऊन बाहेर पडण्याची एकच लगबग सुरु झाली. बहुतेक बऱ्याच जणांना नवीन विमान गाठायचं असावं . काचेपलीकडे दिसणारा भलामोठा विमानतळ, सरकते रस्ते, सरकते जिने, लगबगीने निघालेले देशी, विदेशी प्रवासी, अनाउन्समेंट या सगळ्याचं अप्रूप अनुभवण्यासाठी घटकाभर वेळ मिळावा असं फार वाटलं पण सेकंदा सेकंदानी पळणाऱ्या घड्याळानी तसं करू दिलं नाही. सरकत्या रस्त्याने जात जात मी इमिग्रेशन एरिआत पोहोचले. बघते तर तिथे सव्वाशे –दिडशे प्रवाशांची भली मोठी गर्दी.
माझ्या समोरच एक पंचविशीतली हिंदी भाषिक तरुणी होती , हातात एक बॅग , खांद्याला एक बॅग आणि कडेवर दीड दोन वर्षांचे गुटगुटीत पण रडणारे मूल, मुलगा न थकता रडत होता आणि तिला खांद्यावरचे सामान आणि मुलगा जड होत होते. मुलाला खाली ठेवले तर तो किंचाळत होता. 'मैं आपकी कुछ मदद कर सकती हूँ ? मी विचारलं तिनी दुर्लक्ष केलं. माझ्या पर्स मध्ये एक चॉकलेट होतं. एक छान कीचेन पण होती. ते घेऊन मुलगा कदाचित जरा वेळ रडायचा थांबला असता. पण अनोळखी व्यक्तीशी बोलू नकोस असे नवऱ्याने सांगितले असावे. सगळेजण तटस्थपणे हे सगळे पहात होते. आपली समस्या आपणच सोडवायची हा U S मधला पहिला धडा ती तरुणी अनुभवत होती.तिने मदत मागितली असती तर कोणी केलीही असती कदाचित.
इमिग्रेशन चेक साठी १०-१२ काऊंटर्स उघडले होते. तरीही मला काऊंटरवर पोहोचायला बराच वेळ लागला. निदान मला तरी तसे वाटले.माझे लक्ष सारखे घड्याळाकडे होते. इमिग्रेशन ऑफिसरने संथपणे एकेक डॉक्युमेंट तपासले. २-४ जुजबी प्रश्न विचारले अमेरिकेत प्रथमच आलात का? कशासाठी आला आहात? नवरा कुठे काम करतो इ. मग दोन्ही हाताच्या बोटाचे ठसे घेतले व तो पाच मिनिटे कुठेतरी गायब झाला. आल्यावर शांतपणे ' department of homeland security U.S. customs and border protection चा तारखेसहित admitted असा शिक्का मारला.त्या बाबाला कसलीच घाई नव्हती आणि माझ्याकडे सेकन्दासेकन्दाचा काऊंटडाऊन होता.
आता चेकइन केलेल्या दोन्ही मोठ्या बॅग्ज ताब्यात घ्यायच्या होत्या. त्यासाठी ट्रॉली घ्यायची होती.ट्रॉलीजवळ गणवेशातील विमान कर्मचारी असतात आणि आपल्याला मदत करतात असं ऐकलं होतं पण मला तर आसपास कोणीच दिसेना. मशीन मध्ये ३ dollars टाकले कि ट्रॉली बाहेर येते हे माहिती होते .माझ्याकडे १- १ डॉलरच्या काही व ५ डॉलरच्या काही नोटा होत्या. आता या नोटा एकदम मशीनमध्ये सरकावायाच्या की एकामागून एक? मी जरा गोंधळात पडले. माझ्यां मागेच एक गौर कांती मध्यम वयाची बाई उभी होती. मी तिलाच विचारले' should I put the bills one by one or together ? तिने I don’t know या अर्थाने खांदे उडवले. आणि कुठून एकेक पौडाहून नग येतात अशा अर्थी माझ्याकडे बघितले. मग मी पाच डॉलरची एक नोट आत सरकवली आणि balance डॉलर मिळाले तर मिळाले नाही तर नाही असा विचार केला. नोट आत गेल्यावर ट्रॉली बाहेर आली आणि काही नाणी खुळखुळत वाटीत पडली. ती तशीच पर्स मध्ये टाकली आणि मी ट्रॉली घेउन जवळच असलेल्या बेल्टकडे धावत सुटले. बेल्टवर माझी हिरवी बॅग सरकताना लांबूनच दिसली आणि चुकीच्या बेल्टपाशी तर उभी नाही ना? ही शंका तिथेच विरली. तेवढ्यातल्या तेवढ्यात हुश्श म्हणून घेतले.दुसरी बॅग बराच वेळ येईना. बऱ्याच वेळाने ती एक लेदर पट्टी तुटलेल्या अवस्थेत माझ्यापुढे दाखल झाली. तिला ओढून ट्रॉलीवर बसवली. आणि कस्टम क्लिअरन्स करण्यासाठी निघाले. विमानतळावर सगळीकडे बोर्ड्स असतात, चौकशी खिडक्या असतात पण पुढचे ३-३५ चे विमान गाठायला फक्त ३० मिनिटे शिल्लक असतील ते काही दिसत नाहीत हेच खरे.
कस्टम्स एरीआत दोन ऑफिसर्स समोरासमोर टेबल टाकून बसले होते. एकाच्या हातात डिक्लरेशन फॉर्म दिला आणि पुढे सरकले. दोन कृष्णवर्णीय बंधू समोरच होते. त्यांच्या ताब्यात मोठ्या बॅग्ज दिल्या.हे कर्मचारी खरे की डुप्लिकेट अशी शंका आत कुठेतरी आलीच पण ती मनाच्या पृष्ठभागावर येऊ दिली नाही.
आता सिक्युरिटी चेक च्या रांगेत ! ही रांग पण लांबलचक पण भराभर पुढे सरकत होती. चेकिंग झाल्यावर सरकत्या जिन्याने वर गेले आणि दर तीन मिनिटांनी येणारी एअर ट्रेन लगेचच आली. त्यातून terminal c वर उतरले. समोरच्या डिस्प्ले बोर्डवर फ्लाईट नंबर २७९४ continental airlines साठी गेट १०७ ब असे दिसत होते. सरकत्या जिन्याने खाली गेले या टर्मिनल वर एकंदर किती गेट्स होती कोण जाणे. विविध दिशांना बाण करून त्यावर गेट नंबर लिहीले होते. त्यानुसार १०७ ब कडे निघाले. भला मोठा लांबलचक सरकणारा रस्ता, मधूनच ऐकू येणाऱ्या अनाऊन्समेंट्स . पण त्यांचे अमेरिकन उच्चार नीट समजत नव्हते.आता घड्याळात ३-३० झाले होते. विमान ३-३५ ला सुटणार. इतक्या उशीरा विमानात प्रवेश देतील का? अशा संभ्रमातच धापा टाकत गेटजवळ पोहोचले. एक लक्षात आले आपण किती पळत सुटलो, धापा टाकल्या, चेहेरा पाडला तरी कोणीच आपल्या कडे बघत नसते.
१०७ ब गेटच्या बाहेरच्या counter वर एक lady बसली होती. ती त्या गेट ची in charge असावी. तिला बोर्डिंग पास दाखवला. तिने माझ्याकडे दुर्लक्ष केलं आणि पूर्णपणे अनास्था दाखवली. ती नुकत्याच सुटणाऱ्या flight -crew शी बोलण्यात व्यस्त होती.माझी अस्वस्थता वाढत होती.२-३ मिनिटानी 'flight is delayed ' ही सांगण्याचे सौजन्य तिने दाखवलं आणि समोरच्या सोफ्याकडे निर्देश करून मी तिथे बसावे असं सुचवलं. पाचच मिनिटे मी सोफ्यावर बसले. व परत जाऊन विचारलं "at what time is it rescheduled ? ‘don’t know’ तिनी मख्खपणे सांगितलं.
आता मला वाटू लागलं फ्लाईटला उशीर झाल्याचं श्रीला कळवायला हवं. शिवाय भूक पण लागली होती त्यासाठी एखादा स्नॅक्स काउंटर शोधायला हवा . शिवाय रेस्टरूमलाही जायला हवं होतं. पण मी जागेवरून उठले आणि इकडे flight announcement झाली तर? तरी २७९४ flight अजून सुटली नव्हती हे काय कमी होते? गेटवरचा बोर्ड नजरेच्या टप्प्यात राहील असे थोडे इकडेतिकडे फिरायला हरकत नाही असा विचार करून उठले. थोडा पलीकडे coin operated telephone booth होता. त्या दिशेनी जाताना flight arrival departure चा बोर्ड दिसला म्हणून बघितलं तर २७९४ ची flight 5.20 ला गेट नं १३० वरून सुटणार असं लिहिलं होतं.
मी उडालेच ! बापरे ! आता १३० नंबरचं गेट शोधायला हवं... मी जर १०७ बी हेच गेट फायनल असं समजून तिथेच बसले असते तर?
आता माझा या सिस्टीमवरचा विश्वासच उडाला. आमचे एस टी महामंडळ बरे ! फलाट नंबर तरी बदलत नाहीत. एस टी च्या आठवणीनी मला अगदी गदगदून आलं! पुनश्च सामान घेऊन १३० च्या शोधात........ते दुसऱ्याच दिशेला कुठेतरी कोपऱ्यात बरेच लांब होते. पुन्हा एकदा सरकते रस्ते, सरकते जिने, पाट्या, चारी दिशाचे बाण असं करत करत १३० नंबरच्या गेट समोर उभी ठाकले तर तिथे २९९४ ची वेळ ४.३० लावलेली आणि काउंटरवर एक बाबाजी शांतपणे बसलेला . म्हणजे १३० गेटवरून विमान ५-२० ला सुटणार आहे तर जरा वेळ इकडे तिकडे विमानतळ बघायला हरकत नाही असं समजून भटकले असते तर flight ४-३० लाच गेली असती! आपल्या जागरूकतेची क्षणाक्षणाला परीक्षा !
“ आता हे १३० नंबरचं गेट २७९४ या फ्लाईट साठी फायनल आहे, का बदलू शकतं?”
मी जरा खोचक प्रश्न विचारला. माझे इंग्लिश उच्चार आणि प्रश्न दोन्ही त्याच्या डोक्यावरून गेले असावेत किंवा indian (asian) बायका जरा जास्तच शंकेखोर असतात असे त्याचे मत झाले असावे. माझा प्रश्न नीट न कळूनही तो अगम्य काहीतरी बोलला आणि स्वच्छ हसला. गोऱ्या लेडयांपेक्षा गोरे पुरुष बायकांशी जरा आपुलकीने वागतात असे आपले माझे मत झाले. असो !
थोड्याच वेळात साडेचार वाजले आणि फ्लाईटचे टायमिंग ५-१० असे दिसू लागले.यावेळी मात्र मला अजिबात आश्चर्य वाटले नाही. अति झाले आणि हसू आले अशी अवस्था !
मी जवळच्याच एका खुर्चीत बसले होते आणि इतर चौकसवीरांना तो जे सांगत होता त्यावरून विमानाचा वाहक आणि चालक अजून आले नसल्याने S.T. I mean विमान सोडता येत नाही व त्याबद्दल तो दिलगीर असल्याचे कळले. चौकशी काउंटरच्या शेजारची खुर्ची बराच वेळ रिकामी होती तिथे एक मोहक ललना येउन बसली आणि मग या जॉनरावाची जरा सुटका झाली आणि बहुतेक एका पाशिंजर बरोबर चाय पिऊन बिडी मारायला तो उठला.
अखेरीस ५-४५ ला हे विमान एकदाचं सुटलं आणि मेम्फिसच्या दिशेनी उडू लागलं. सूर्य अस्ताला गेला होता, आकाश विविधरंगी ढगांनी नटलं होतं. दिवेलागण झाली होती. पक्षी घरट्याकडे परतत होते. मी सुद्धा सात समुद्र पार करून एका घरटयातून दुसऱ्या घरट्याकडे निघाले होते. डोळ्यावर आलेली झोप आणि थकवा apple ज्यूसच्या मदतीने मागे टाकली आणि मी स्वप्ननगरीत प्रवेश केला..........राजकुमारी घोड्यावर बसून वाऱ्याच्या वेगाने ...... .....आणि राजकुमार झाडाखाली वाट बघत उभा............विमान लँड होत असल्याची घोषणा झाली .....विमानानं आपली चाकं जमिनीला लावली मग मीही माझी पावलं हवेतून जमिनीवर टेकवली !
लगबगीने सगळं सामान घेऊन विमानातून बाहेर आले. डोळे त्याला बघण्यासाठी आतुर झाले होते. लांबवर तो दिसला ....smiling ! ..उसके चेहरे से खुशी टपक रही थी. स्वतः गाडी घेऊन मला airport वर घ्यायला यायचं ही माझी अटही त्यानी पूर्ण केलेली. मोठ्या ऐटीत त्याच्या शेजारी कारमध्ये बसले आणि गाडी झुळझुळत घराकडे निघाली !