डायनोसॉर गेले आणि पृथ्वी माणसांना राहायला सुरक्षित झाली. पृथ्वीवर पहिला माणूस बनून येण्याचे भाग्य प्राप्त झालेली व्यक्ती म्हणजे अॅडम. आज जगात असणार्या बर्याच गोष्टींचा (माणसांसकट!) आद्य जनक म्हणून अॅडम ओळखला जातो. पृथ्वीवर आल्यानंतरच्या त्याच्या अनुभवांबद्दल त्याने विपुल लिखाण करून ठेवले आहे. रिसायकल करता येण्याजोग्या (अॅडम हा जागरूक पर्यावरणवादी होता) भूर्जपत्रांवर सदर दस्तऐवजीकरण त्याने करून ठेवले आहे. त्याची पत्नी इव्ह. अॅडमाची साजेशीच त्याची ही अर्धांगिनी होती. तिच्याही नावावर अनेक शोध नमूद केलेले आहेत. जगातील अनेक गोष्टींच्या उगमाबद्दल कुतुहल वाटून मी ही भूर्जपत्रे चाळून संशोधन केले असता शेवटी अॅडमाकडेच त्या त्या गोष्टीचे पालकत्व गेल्याची नवलाईची गोष्ट आढळून आली. तेच हे संशोधन मी तुमच्यापुढे सहर्ष, सानंद, इ. प्रकारे सादर करीत आहे.
तरुणांचा लाडका उद्गार: "च्यायला, आपण एकटेच होतो तेव्हा बरं होतं!"
तेव्हा पृथ्वीवर सर्वत्र हिरवीगार झाडे व त्यांस रंगीबेरंगी फळे, जी चवीस गोड असावी असे वाटायचे, ती लगडलेली असत. तसेच झुळझुळ झरे कायम वाहत असत. पक्षी मधुर गाणी गात असत. प्राणी ठरावीक वेळेला पाणवठ्यावर येऊन पाणी पिऊन जात. शिकारीची सवय असलेले प्राणी अधूनमधून शिकार करत. रवंथ करणारे प्राणी रोज न चुकता रवंथ करीत. तस्मात, सगळ्यांचा टाईमपास यथास्थित चालू होता. तेव्हा जगाची लोकसंख्या एक इतकीच असल्याने देवासही विशेष काम नव्हते आणि तो कंटाळला होता. तेव्हा त्याने अॅडमास कुस्ती करायला पाचारले. ते वेळेला देवाचा एक ठोसा लागून अॅडमाची बरगडी मोडली. अस्थिरोगतज्ज्ञ न मिळाल्याने ती जोडली जाऊ शकत नव्हती. देवाने आपले कौशल्य वापरून त्यापासून एक बाई बनवली. अॅडम बरगडी बरी होत असताना नंदनवनात अॅडमिट होऊन उपचार घेत होता. (अॅडम हा हॉस्पिटलात जाणारा पहिला पेशंट. त्यामुळेच हॉस्पिटलात जाण्याला 'अॅडमि'ट होणे असा शब्द आला.) तेवेळी नवीन निर्माण झालेली बाई त्यास भेटावयास गेली. जाताना तिने एका झाडावरील लाल फळे काढून नेली. तेव्हापासून आपण कुणालाही हॉस्पिटलात भेटायला जाताना सफरचंदे नेतो. तिजला येताना पाहून अॅडमाला आनंद झाला. ती त्यास संध्याकाळी भेटल्याने तिचे नाव त्याने 'इव्हनिंग' ठेवले. आणि त्याचे लघुरुप म्हणून लाडाने तो तीस 'इव्ह' म्हणू लागला. इव्ह आणि अॅडम ह्यांना सफरचंदाचे गुणधर्म माहीत नव्हते. 'अनोळखी पदार्थ खाऊ नयेत' असे सांगायला दोघांनाही पालक नसल्याने आणि देवशयनी एकादशी झाल्याने देव झोपला होता, तेव्हा त्या दोघांच्या मनात धाडस उत्पन्न झाल्याने त्यांनी ते फळ खाऊन बघितले. सफरचंदात अँटिऑक्सिडंट्स, व्हिटामिन अ, ब, क, ड, इ, फ, ग असल्याने अॅडम दोन सेकंदांत खडखडीत बरा झाला. त्यामुळे लगेचच त्याला हॉस्पिटल (जे की नंदनवनच होते) त्यातून डिस्चार्ज देण्यात आला. इव्हेचा नर्सिंगचा वगैरे कसलाच कोर्स झालेला नसल्याने तिचीही नंदनवनातून अॅडमासोबत हकालपट्टी करण्यात आली व ते दोघे पृथ्वीवर येऊन जॉब सर्च करू लागले.
अॅडम रोज इव्हेला भेटण्यासाठी एका विशिष्ट ठिकाणी येताच (तेव्हा घर ही संकल्पना निर्माण व्हायचीच होती) ती त्यास 'आज तरी मिळाला का जॉब?' असे विचारून पिडू लागली तेव्हा त्याने वरील अजरामर उद्गार काढले आहेत.
पत्त्यांचा कॅट, भिकार सावकार, पाच-तीन-दोन, सत्तीलावणी, इ.
अॅडम आणि इव्ह नंदनवनातील सफरचंद खाल्ल्यामुळे पृथ्वीवर पोचले आणि पृथ्वीची लोकसंख्या दोन इतकी झाली. अग्नीचा शोध लागलेला नसल्याने स्वैपाकाची भानगड नव्हती. चाकाचाही शोध लागलेला नसल्याने अॅडम इव्हेला लाँग ड्राईव्हला नेऊ शकत नसे. रोजची जॉब अॅप्लिकेशन्स करून झाल्यावर बसल्याजागी विरंगुळा हवा म्हणून त्यांनी पत्त्यांचा कॅट शोधला. भिकार सावकार हा त्यांनी शोधलेला पहिला खेळ. कारण तेव्हा 'कुठला पत्ता मोठा?' वगैरे प्रतवारी व्हायचीच होती. मग हळूहळू ते सात-आठ खेळू लागले. यथावकाश पृथ्वीची लोकसंख्या केनामुळे तीन इतकी झाली. त्यामुळे लगेचच पाच-तीन-दोन पॉप्युलर होऊन पत्त्यांमध्ये उत्क्रांती झाली. मग एबल आला आणि लॅडीस, बदाम सात वगैरे वैविध्यपूर्ण खेळ सुरू झाले. मग इश्वराच्या 'दूधों नहाओ, फूलो फलो' या आशीर्वादाला अनुसरून अजून बरेच भिडू आले आणि एकापेक्षा जास्ती कॅट घेऊन खेळला जाणारा बदाम सात (उर्फ सत्तीची लावणी) हा खेळ जगभर पसरला. लहान बालकास मातेने, पित्याने वा नातेवाइकाने मांडीवर घेऊन, हातात पत्ता देऊन, योग्य स्थळाकडे अंगुलीनिर्देश करून तो पत्ता टाकावयास लावून या पवित्र पऱंपरेची दीक्षा प्रदान करावी, असा नियम आला. जगात पहिल्यांदाच जेव्हा 'तुझा पत्ता काय?' असा प्रश्न विचारला गेला तेव्हा उत्तर 'इस्पिक अठ्ठी' असे दिल्याचे एका जुन्या भूर्जपत्रावर नमूद करून ठेवले आहे. म्हणजेच आधी लोक एकत्र बसून पत्ते कुटू लागले व ते तिथून हलण्याची लक्षणे न दिसल्याने मग घरांचा शोध लावून, त्यांना 'पत्ता' देऊन मग लोकांना तिकडे हुसकण्यात आले, असे दिसून येते. काही तज्ज्ञांच्या मते या भूर्जपत्राला 'मनात/हातात धरलेला पत्ता ओळखण्याची जादू' बाल्यावस्थेत असताना फेल गेल्याचा संदर्भ आहे.
रॉक संगीत
थंडी पडू लागली तेव्हा अॅडमापुढे इव्हेने सगळ्यांसाठी ब्रँडेड कोट आणणे किंवा घरात फायरप्लेस बसवून घेणे असे दोनच पर्याय ठेवले. ब्रँडेड कोटांच्या किमती ऐकून अॅडमास धक्का बसला आणि त्याने घरात फायरप्लेस बसवून घेतली. त्यामुळे इतके दिवस पुढे ढकललेला आगीचा शोध लावावाच लागला. आग आली म्हटल्यावर स्वैपाकघराचा वापर सुरू होणे अपरिहार्यच होते. 'अगं आपण कच्चंच खाणं खात होतो ते चांगलं पौष्टिक होतं की.. ही शिजवण्याची भानगड उगीच कशाला? पुन्हा रोजच्या रोज सरपण आणणं आलं..' वगैरे अॅडमाने कितीहीवेळा बोलले तरी त्यास इव्हेने शोधलेल्या तंदुरी चिकन, तंदुरी रोटी व नान (पोळ्या नव्हत्या कारण पोळपाट लाटण्याचा शोध अजून लागायचा होता) यांची चव आवडू लागली होती. रोजची चूल पेटवण्यास अॅडमाने आधी लायटर शोधले पण त्यात भरण्यासाठी पेट्रोल कुठून आणायचे हा प्रश्न लवकरच भेडसावू लागला. कारण ते वर्ष एल निन्यो प्रवाहाचे असल्याने परसातली खनिज तेलाची विहीर केव्हाच आटली होती. केनाने आगकाड्या शोधल्या, पण त्यात पांढरा फॉस्फरस वापरल्याने त्या असुरक्षित होत्या. एबल लहान असल्याने अशी धोकादायक साधने घरात वापरू नयेत, असे इव्हेचे मत पडले. त्यामुळे अॅडमास आग निर्माण करावयाची सोपी, सुरक्षित पद्धत शोधण्याचे काम आले. त्याने गारगोटीचे दोन दगड घेऊन ते एकमेकांवर घासून, आपटून ठिणगी निर्माण करायला सुरुवात केली. कधी आग उत्पन्न होई, तर कधीकधी वेळ लागे. अॅडम हा मूळचाच अभ्यासूवृत्तीचा असल्याने त्याने गारगोट्यांची संख्या, त्यांचा आकार, रंग, इत्यादी अनेक फॅक्टर बदलून प्रयोग केले. शेवटी त्याला कळले की, काळ्या पाच गारगोट्या घेऊन एका विशिष्ट तालात वाजवल्याने दहा सेकंदांत अग्नी निर्माण होतो. नाश्ता, एबलाचे दूध गरम करून ठेवणे, केन व एबलासाठी पाणी उकळून ठेवणे, जेवण, दुपारचे खाणे, रात्रीचे जेवण, पुन्हा एबलासाठी दूध गरम करून ठेवणे अशा असंख्य कामांसाठी दिवसभरात अनेक वेळा चूल पेटवावी लागे. ते या काळ्या पाच गारगोट्यांमुळे सुकर झाले. त्या विशिष्ट तालात वाजणार्या गारगोट्या एबलास अत्यंत प्रिय होत्या. ते संगीत ऐकले की, तो आनंदाने हसू लागे. अॅडम आणि इव्ह दोघेही संध्याकाळच्या निवांत वेळी एबलाच्या पाळण्याजवळ त्या गारगोट्या वाजवत असत. मग एकेदिवशी स्फूर्ती येऊन त्यांनी त्यावर शब्द रचले. संदर्भाच्या भूर्जपत्रानुसार 'वी विल, वी विल रॉक यू..' हेच ते पहिले 'रॉक' गाणे! अॅडमाने ते त्याच्यासाठी ध्वनिमुद्रित करून ठेवले व कॅसेटीवर 'रॉक संगीत - काळी पाच' असे लिहून ठेवले. अशाप्रकारे तरुण पिढीस आनंद देणार्या अजरामर रॉक संगीताचा जन्म झाला. (हे मूळचे रॉक! नंतर इलेक्ट्रिक गिटार, ड्रम वगैरे वाद्ये आल्यावर गारगोट्या कालबाह्य झाल्या. पण मूळ रॉक संगीत हे खरोखरीचे दगड वाजवून निर्माण केले जाई. नाहीतर एकही दगड नसताना कोण कशाला त्यास रॉक म्हणेल?)
ट्रॅव्हल कंपनी, शॉपिंग, लुई वितों
अॅडम आणि इव्ह एका रम्य संध्याकाळी पृथ्वीवर अवतरले. अॅडमाने काखेतली झेंड्याची गुंडाळी उलगडून, झेंडा रोवून, 'लाँग लिव्ह धिस वर्ल्ड!' अशी जोरदार घोषणा करून आनंद व्यक्त केला. तेव्हापासून कुठल्याही नव्या भूभागाला पहिल्यांदा भेट दिल्यावर तिथे आपापल्या देशाचा झेंडा रोवायची प्रथा पडली. मग हळूहळू लोक जन्माला आले. लोकसंख्या वाढली, मग म्युन्सिपाल्टी, विधानसभा आणि संसद अशा क्रमाने गोष्टी आल्या. अॅडम आणि इव्ह हे सगळ्यांत मोठे म्हणून अॅडम पहिला प्रेसिडेंट तर साहजिकच इव्ह फर्स्ट लेडी म्हणून ओळखली जाऊ लागली. अॅडमाने प्रेसिडेंटपदाची सूत्रे हाती घेतली तेवेळी अर्थव्यवस्थेची लक्षणे ठीक नव्हती. फॅक्टर्या नव्हत्या, म्हणून वस्तू विकणारी दुकाने नव्हती, खेरीज वातानुकूलनाचा शोध लागलेला नव्हता म्हणून मॉल उभे झाले नव्हते. यामुळे लोक काहीच पैसा खर्च करत नसत. लोकांनी पैसा खर्चल्याशिवाय अर्थव्यवस्था बाळसे धरणार नाही, हे जाणून अॅडमाने 'पॅरडाईज ट्रॅव्हल कंपनी' सुरू केली. अॅडम नंदनवनातून आल्याने त्याचे तिथे चांगले नेटवर्क तयार झाले होते. त्याचा त्याने उपयोग करून घेतला. प्रत्येकाच्या सोयीनुसार त्यात पॅकेज होते. नवविवाहितांसाठी 'ओरिजिनल सिन' असे आकर्षक नाव असलेल्या टूर, वृद्धांसाठी 'यात्रा नंदनवनाची' पॅकेज तर लहान मुले असलेल्या कुटुंबांसाठी 'चॉकलेट/बनाना/सिताफळ(कंपनीतर्फे दिल्या जाणार्या जेवणात असणार्या आईस्क्रीमाच्या स्वादानुसार हे नाव बदलत असे) हॉलिडेज्' अशा आयडियांनी त्याने ट्रॅव्हल कंपनी लोकप्रिय केली. प्रवासाला जाताना नुसते हात हलवत काय जायचे, म्हणून लोकांनी बॅगा विकत घ्यायला सुरुवात केली. मग बॅगांमध्ये लुई वितों वगैरे ब्रँड आले, तसा लोकांचा खर्च एकदम काही पटीने वाढला. (संदर्भाच्या भूर्जपत्रात 'म्हारी भागवान मारा च्यौपट करे छे' असे एक वाक्य आढळून आले आहे. म्हणजे सदर गृहस्थांचा खर्च ब्रँडेड गोष्टींच्या खरेदीमुळे चार पटीने वाढला होता, असे अनुमान काढता येते.) 'एवढ्या महागाच्या बॅगा रिकाम्याच कशा न्यायच्या, मग जगात (तेव्हा गाव, शहर, देश, खंड अशा कुठल्याच सीमा मानवास बांधायला नव्हत्या. म्हणून एकदम जगाचाच विचार करावा लागे.) आपलं स्टेटस ते काय राहिलं?' अशा विचाराने त्यात भरायला म्हणून कपड्यांचे शॉपिंग सुरू झाले, मग त्यांना साजेशा अॅक्सेसर्या विकत घेणे सुरू झाले, मग सेल लागू लागले, लोकांना क्रेडिटकार्डे वापरता यावीत म्हणून मशिने आली. लोक नेमाने रोज काही ना काही खर्च करू लागले आणि अर्थव्यवस्था गुटगुटीत झाली.
यथावकाश अॅडमाने चाकाचा शोध लावला आणि खनिज तेलाच्या मुबलकतेमुळे लौकरच एफ१ रेसिंग सुरू झाले. शर्यतीत पळायला वेगवेगळ्या कंपन्यांच्या गाड्या हव्यात, म्हणून त्या कंपन्या सुरू झाल्या. पार्ट्या आयोजित होऊ लागल्या आणि पार्टीत घालायला इव्हनिंग गाऊन (हे गाऊन तयार करून परिधान करणारी पहिली स्त्री इव्ह, म्हणून तिच्या नावावरून त्यांना इव्हनिंग गाऊन म्हटले जाऊ लागले), उंची परफ्यूम वगैरे गोष्टी आल्या. फाईव्ह स्टार हॉटेले सुरू झाली. रेस सीझनासाठी घोड्यांनी नावनोंदणी सुरू केली. अवकाश संशोधन संस्था सुरू झाल्या, आयटीतली कामे आऊटसोर्स होऊ लागली. एकदोनवेळा मग जागतिक मंदीही येऊन गेली. रोज नित्यनव्या गोष्टी घडू लागल्या.
जगाचे रुटीन यथास्थित सुरू झाले.