अशाच एका सतत बडबड करणार्या पोरींच्या ग्रुपवर नवीन खुळं आलं - चला गर्ल्स ट्रिप काढु! मग प्रत्येकजण आपापली लिस्ट खोदुन ठिकाणं सुचवायला लागले .. किमान सतराशे सत्तर मेसेज नंतर 'हंपी' ठरलं .. मग तारखा जमेनात - एकीला सासरी दुसरीला माहेरी तर तिसरीच अजुन काय वेगळचं! तेव्हा द क्रश बॉय ललित प्रभाकरचा 'हंपी' पिक्चर रिलीज झाला! पोरी डोळ्यात बदाम आणुन टायपत होत्या की किमान पिक्चर तरी एकत्र बघु.. पण सोकुचा आवाज ट्रेलरमधे सहन होईना तर ३ तास कसं व्हायचं म्हणुन हाही प्लॅन राहिलाच ..
मग माहित नाही कधी कोण कवा म्हटलं की चला जाउया जानेवारीचा लॉंग वीकेंड आहे .. हा मुहुर्त धरुयात .. परत एकोणीसशे सदतिस मेसेज आलयावर चांडळ्चौकडी तयार झाली - मी, प्रफे, सन्मि न मृणाल ! माझी अजुन एक मैत्रिण - अलकनंदा- जी इकडे रोमात असते ती हाच पिक्चर बघुन वेडी झाली होती ... ह्यावर उतारा म्हणुन तिने मला फोन केला (माझं पंचिग बॅग झालयं) .. मी म्हटलं अजुन ४ वेड्या आहेत .. तारीख ठरली की फोन करते बॅग भरुन तयार ठेव! :)
२० डिसेंबर २०१८ - ह्या दिवसातली कोणतीतरी वेळ न क्षण (व्हॉ अॅप ते नीट सांगत नाही!) - 'हंपी टूर' - एक नाचणारी मुलगी न स्कूटर स्माईली टाकुन ग्रुप तयार झाला .. हुश्श! आता किमान छोटीशी आशा(मुलगी नव्हे) होती की हंपी बहुत दुर नहीं! आता ह्या ग्रुपवर दिवसाला किमान पन्नास मेसेज टाकुन कसं जायचं, कुठं राहायचं ठरलं! सन्मिने आदितीकडुन टुर गाईडचा नंबर घेतला .. मी मोडक्या तोडक्या ईंग्रजी - हिंदी- कन्नड बोलुन गाईड सोबत तारखा न पैसे फायनल केले! तिकीट बुक केली! (प्रत्येक कन्फर्मेशन नंतर ग्रुपवर सतरा मेसेज न दहा नाचणार्या स्माईली पडत होत्या हे समजुन घ्या! ग्रुप अॅडमिनचं न को ऑर्डिनेशन्च काम करायला मी होते ना .. बिन पगारी फुल्ल अधिकारी! )
मग २५ जानेवारी कधीतरी येणार येणार गं करत काउंटडाऊन ! सन्मितैंनी काय काय सामान हवं ह्याची लिस्ट टाकली ( एवढ्या सामानात किमान आठवडा ट्रिप होउ शकते हे आता लक्षात आलयं ! ) ...
सन्मितैंनी बॅगेत काय भरणार असं विचारल्यावर एकमुखाने चिवित्र उत्तरं आलं (संदर्भ - आमचे हे ट्रंकभर.. ) !! मग तिकडे जाऊन कोणी बघणार नव्हतं तरी फॅशन शो कपडे ज्वेलरी हवीच.. गर्ल्स ट्रिप यु क्नो! सनस्क्रीन पासुन खाऊपर्यंत लिस्ट वाटप केलं.. बॅगपॅक ट्रिपला डबल सामान कशाला! :ड
ह्यात अठराशे एकोणनव्व्द मेसेज झालेत .. ते लिहले तर लेखमाला करावी लागेल .. म्हणुन टाईम लीप! लांब उडी! २५ जानेवारी २०१८!! :P
आमची बस रात्री १०:३० ची होती त्यानुसार सगळे ९:३० ला आपापल्या घरुन - मृणाल , प्रा न सन्मि ह्या तिघींना मृणालकांत सोड्णार होते .. मी आमच्या ह्यांच्यासोबत निघाले .. अलक तिच्या गावी होती .. ती आधी गोव्याला गेली मग तिकडुन हंपीला निघाली होती! रात्री ९ ला मेसेज आला की बस दिड तास उशीरा येईल! पण स्वारगेटचा बस कोऑर्डिनेटर वेळेवर पोहचा म्हणुन ठाम होता! आम्ही सगळे १०:३० ला स्वारगेटला पोचलो तर बस कात्रजहून निघणार होती .. मग मृणालकांत म्हणे मी सगळ्यांना तिकडेच सोडतो .. आमचे हे माझं पार्सल मृणालच्या गाडीत ढकलुन परत घरी गेले ! कात्रजला ११ ला पोचलो तरी बसचा पत्ता नव्ह्ता! तिकडे विचारलं तरी दिड तास उशीर पालुपद! तिथ्ली गर्दी बघुन कॉफी घेतल्यावर मृणाल्कांतांना बाय केलं .. त्यांनीच आठवण केली की तुमचा ग्रुप फोटो घेउ का? मग पोझ दिली! ते गेल्यावर एका कट्ट्यावर जागा पकडुन वलाव्ला बडबड सुरुच! बसचा पत्ता नाहीच्च! नंतर कळालं की बस मुंबईहुन वेळेत सुटलीय पण प्रचंड्ड ट्राफिक! ही बस रात्री १:३० ला पुण्यात आली .. आम्ही वलावला न बसचा वैताग साईड बाय साईड करतच होतो .. पोरींचेच अजुन २ ग्रुप्स होते तिकडे खादाडी , अंताक्षरी सुरु झाली .. ते बघुन आपण बुधाणी चिप्स विसरलो हा साक्षात्कार झाला .. पण आता काहीही उपयोग नव्ह्ता! .. शेवटी २ वाजता बस निघाली .. आम्हीही कसेबसे आपापल्या घरी फोन करुन मग झोपलो ..
२६जानेवारी - सकाळी ६ वाजता अलक हंपीत पोचली होती न आम्ही अर्ध्या वाटेवर होतो! टुर गाईड न रिक्षावाला दर २ तासांनी कुठे आहात विचारत होते .. नुस्ती फोनाफोनी.. बसमधे बसुन प्रचंड कंटाळा आला होता .. जरा टाईमपास जरा डुलकी असं सुरु होत! मग प्रफे जरा जागी झाल्यावर मी तिला म्हटलं बघ आपण पोचलोय बोर्ड दिसतोय ना वाचुयात .. प्रफेने आपलं ज्ञान पाजळुन तो बोर्ड असा वाच्ला -- जिलबी जिलबी जिलबी .. कडबोळी कडबोळी ! मग परत रिक्षावाल्याचा फोन अर्ध ईंग्रजी अर्ध हिंदी! त्यावर 'वाट बघतोय रिक्षावाला' गाणं म्हणुन झालं.. हळूच जाऊन बस ड्रायव्हरचा अॅक्सलेटर वरचा पाय दाबुन यावा वगैरे भन्नाट कल्पना सुचल्या! शेवटी एकदाचे ११ वाजता आम्ही होस्पेटला पोचलो! शेड्युल टाईम होतं ७:३० ! ४ तास उशीर .. सायकल टूर चुकली म्हणुन टेन्शन! लेसन लर्न्ट - मुंबईहुन निघणारी ट्रव्हलर पकडू नये!
भर दुपारच्या चांदण्यात हंपीला रुमवर पोचलो .. अलकची झोप काढुन नाष्ता करुन झाला होता ! आम्ही तयार झालो .. गाईड म्हणे सायकल टूर उद्या करु आता रिक्षा टूर करा .. म्हटलं च्ला वाट बघतोय रिक्षावाला ..! मला कन्नड समजत , थोडसं बोलता येत पण २-३ वर्ष फारसं कन्नड न वापरल्याने विसरले होते मग नीट शब्द गोळा करुन त्याच नाव विचारलं .. राघवेंद्र! मग आम्ही पाच जणी , राघवेंद्र न त्याचा सोबती - अंजनी निघालो .. वळणावळणाचा रस्ता, मोठं मोठे दगडं डोंगर बघत किश्किंदाला पोचलो - हेच ते रामायणातलं बालि सुग्रीवांच गावं / किल्ला! पण आम्हाला ही मंदिर बघण्यात जास्त इंटरेस्ट नव्ह्ता .. एकाच मंदिरात नमस्कार केला .. दुसरं दुरुन बघितल .. आमचा रिक्षावाला वैताग मोडवर जाणार होता तेवढ्यात रस्त्यात एक गुहेचा बोर्ड दिसला .. तिकडे चढुन मस्त फोटोसेशन केलं .. सन्मि मॉडेल होतीच्च! आमचा वेडेपणा बघुन ते दोघेही हसायला लागले ! रिक्षा टूर संपल्यावर आम्ही हंपी गावात जरा निवांत करु म्हणुन एका थिलक रेस्तरांमधे गेलो .. टेबलं न गाद्या असा एकुणात उंची बघुन पाय पसरा निवांत मामला होता ! तिथे एक आक्का होत्या पण आमचे कन्न्ड सुर जुळेनात .. मग त्यांनी अजुन एका मुलीला बोलवलं.. जरा झगामगा साडी न अबोलीचा गजरा .. चक्क हिंदी येत होतं .. त्यांच नाव अबोली ठेवण्यात आलं .. वेळ टळुन गेल्याने बेवड्यांची चहाची ऑर्डर गेली .. सोबत फ्रेंच फ्राईज न कांदाभजी! अलकची ओळख परेड न बरीच बडबड केली .. आमच्या टेबलावर कांदाभजी बघुन बाजुच्या २ फिरंग्यांनी नाव विचारुन तिच ऑर्डर दिली..तिकडुन निघालो ते डायरेक्ट टूर गाईडच्या घरी जेवायला गेलो .. बसच्या प्रवासाने दमलो होतोच! घरचं आयतं जेवण केलं .. दुसर्यादिवशी सायकल टूर प्लॅनची चर्चा करुन रुमवर आलो! सगळयाच जणी फ्रेश होऊन थोडीशी बडबड करुन गप झोपलो! नाईट आऊटचा प्लॅन गडबडला!
२७ जानेवारी - सकाळी ७ ला उठुन आवरायला सुरुवात केली .. मग तुला हा ड्रेस ते कानातलं छान दिसतयं वगैरे एकदाची तयारी झाली.. राघवेंद्र राईड तयार होतीच! नाषत्याला गरम गरम आप्पे होते.. अनलिमिटेड! आम्ही सगळेच १० वाजता हंपीला पोचलो .. मृणालला सायकल चालवायची नव्ह्ती म्हणुन ती रिक्षात बसणार होती .. आम्ही चौघी उरलो पण सायकली तीनच! मग शहाण्या मुलींसारखं टर्न बाय टर्न सायकल चालवायचं ठरलं .. ३० जणांचा ग्रुप होता .. विरुपाक्ष मंदिर परिसर .. कृष्ण मंदिर न बजार , लक्ष्मी नरसिंह, रॉयल प्लेस.. क्वीन बाथ ..लोटस मंदिर अशी राईड होती .. प्रत्येकठिकाणी गाईडने मस्त माहिती सांगितली .. कधी नव्हे ते सायकल चालवणारी .. चढ सुरु झाला की सायकलवरुन उतरणारी पब्लिक बघुन योग्य ठिकाणी ब्रेक झाले ! अधेमधे पोरी सायकली ठेवुन मृणालसोबत रिक्षामधे जॉईन झाल्या ! पण मी, अलक न प्रा ने पुर्ण सायकल चालवली .. (रात्री पाय कोकलत होते हे वेगळ्च!).. सायकल टूर संध्याकाळी ५ ला संपली मग मच अवेटेड कोरेकल राईड - तुंगभद्रा नदीतुन गोल गोल बोटीतुन जायचं होत... संध्याकाळ .. ती नदी ..आजुबाजुचे डोंगर .. मधेच एखादा जुना सभामंडप .. आहा! इतका सुंदर देखावा होता ... बोटीतुन उतरुन गाईडसोबत तंगडतोड करत विठ्ठल मंदिर न तो सुप्रसिद्ध रथ बघायला निघालो .. पाय दुखत होते पण आजुबाजुचे नजारे , फ्रेम्स संपत नव्ह्ते .. प्रत्येक ठिकाणी किती थांबाव , बघावं न किती फोटो काढावेत कळेना! परत यायचं यार असं किमान दहावेळा म्हणुन झालं! :ड
प्रत्येक मंदिराच कोरीव काम , समोरचा मंडप , देवळाबाहेरचा बाजार असं सगळं त्याकाळात किती सुंदर , भव्यदिव्य असेल ह्याचीच कल्पना डोक्यात सतत सुरु होती .. एकदा वाट्लं की बाहेरुन जे मुघ्ल सुलतान/ अल्लाउदीन खिलजी वगैरे आले तेव्हा इथे अशी तोडफोड करताना त्यांना अजिबातच काही वाटलं नाही का? आपली संस्कृती किती जुनी आहे.. किती समजुन उमजुन पुर्वजांनी हे सगळं उभं केलय .. नकळत आताच्या परिस्थितीशी तुलनाही झाली .. चर्चाही! अश्याच आपापल्या विचारात आम्ही दुनियेत परत येत जात होतो ..
आजही टूर संपल्यावर त्याच अबोलीकडे गेलो .. पण ती नव्ह्ती .. तिथे एक वेटर होता - नामकरणं अबोला! मग परत नेमक्या भाषेतले सुर जुळवतं होतो .. तोवर समोरच्या टेबलवरचा एक क्युटेस्ट फिरंग आमच्या खिदळणार्या ग्रुपकडे बघतोय असं लक्षात आलं .. तेवढ्यात त्या अबोला मुलाने सन्मिला आंटी म्हटलं ... आम्ही फुटलोच ! लोळलोच ! मी त्याला म्हटलं डिड यु जस्ट से हर आंटी?! ..परत हसा खिदळा ! एवढ्यात क्युटेस्ट पोरगा पण हसला .. अहाहा. एवढा नाजुक लाजला न लाल झाला काय विचारु नका ! मग त्याची गर्लफ्रेंड आली ..तिला बघुन आम्ही अॅज युज्वल नाक मुरडली - शोभत नै हो! :P
मग आमची परत चहा कॉफ्यांची ऑर्डरी रिपीट झाल्या .. प्रा ने भयं इथले संपत नाही हे गाणं म्हटलं :dhakdhak:
८ च्या आत घरात नियम नव्ह्ता पण पाय कोकलत असल्याने तिथुन निघालो .. परत वाट बघतोय रिक्षावाला .. मग आयतं जेवण करुन रुमवर ! दिवसभराचा वृतांत घरी ऐकवला .. मग आमची मैफिल - मैत्रिण, ग्रुपस, आपापली ओळख .. माबो असे सगळे विषय झाले .. रिक्षा टूर आधीच केल्याने २८ जानेवारीला फक्त पहाटेचा सुर्योदय बघितला की दिवस रिकामा होता .. विरुपाक्ष परिसरात चिल आउट करु असं ठरवुन झोपलो!
२८ जानेवारी - भल्या पहाटे ५:३० ला तयार झालो! :hypno: .. राघवेंद्र आला नव्ह्ता .. दोन दिवसात ही रिक्षा ते आपली गाडी असा प्रवास केला :ड तो आला ५:४५ ला मग कुड्कुडत भन्नाट वार्यात निघालो.. आपल्या दादा लोकांच्या मित्रांवर क्रश हा विषय निघाला (वेळ काळ न बघता काहीही कुठुन्ही सुरुवात !).. दादाचा मित्र छान दिसतो पण असे क्रश असले तरी भितीपोटी त्यांना दादा म्हणावं लागतं .. मग प्रा ने विषयाला साजेस गाणं म्हटलं - आज हमारे दिल में अजबी उलझन है!
(लिहतानाही गाणं डोक्यात चालीत सुरुय! :ड ). सुर्योदय बघायला एका पर्वतावर पोचलो.. जागा पकडली पण सुर्यदेव येईनात.. तिथे शेजारच्या देवळात मंद आवाजात शिव भजन सुरु होतं.. प्रा ने मोबाईलवर तानपुरा लावला होता ..धुकं होतं त्यामुळे सुर्यदेव रंग न उधळताच येणार आहेत असं कळलं! तेवढ्यात मंदिराच्या कळसामागे ऑरेंज पॉपिंन्स्ची गोळी दिसली! थोडे क्लिकक्लिकाट करुन निवांत डोळेभर तो नजारा बघितला .. परत निघालो :) बॅगा पॅक करुन टूर गाईडच्या घरी ठेवल्या, नाष्टा करुन परत हंपीला निघालो .. शनिवारी जिथे गर्दी होती ते आज निवांत होत .. तिकडे अस्चं फिरलो .. एका मंदिराच्या मंडपात निवांत पाय पसरुन बर्याच विषयावर गप्पा झाल्यात .. टोट्ल चिल!
दुपारी एका रेस्तरांमधे जेवायला पिझ्झा,फलाफल,पास्ता न ऑम्लेट अशी ऑर्डर दिली.. इतका ऑथेंटिक न चविष्ट पिझ्झा मी पुण्यात खाल्ला नाही! प्रत्येक डिश वेगळी न स्पेशल! शेवटी सिनॅमन हॉट चॉकलेट!
नंतर तुंगभद्रेच्या काठावर शांतता असावी म्हणुन गेलो तर तिकडे पब्लिक(बहुतेक बिहार) आंघोळी न कपडे धुवत होते! हीच लोक पहिल्यादिवशी दिसली होती .. तेव्हा कळालं गुरु तूळ राशीत गेला होता म्हणुन तुंगभद्रेचा गंगोत्सव!
तासाभराने परतीचा प्रवास सुरु होणार म्हणुन निघालो .. टूर गाईडच्या घरी चहा घेतला .. अलकला बाय केलं .. परत हंपी महोत्सवला येऊ असं प्रॉमिस केलं! नेहमीच परतीचा प्रवास फार लवकर होतो.. होस्पेटला येऊन बसची वाट बघत होतो .. तेव्हा एक निवडणुकीला कसं स्पीकरवर गाणी लावुन नाव सांगतात तशी बसपाची गाडी गेली .. न ते गाणं डोक्यात गेल! :ड
शब्द कळतं नसल्याने ते - टनाना ना टनाना ना बीएसपी बीएसपी - असं झालं .. प्रा ने हा ऑडिओ टाकावा ही णम्र ईनंती!
संध्याकाळी ६:३० ला बस निघुन पहाटे ५:३० ला पुण्यात! बॅक टु रीअल लाईफ!
बट हंपी हँगओव्हर इज स्टिल देअर!
आता थोडसं टूर गाईड बद्दल - शेखर न त्यांचा मुलगा - विरुपाक्ष - इयत्ता दुसरी , ह्या दोघांना कामचलाऊ ईंग्रजी येत होतं .. नंतर कळालं की शेखर फार शाळा शिकलेले नसले तरी इटालिअन, फ्रेंच टुरिस्ट्कडुन ऐकुन ती भाषा शिकले होते!
हा माणुस दिसायला , राहायला साधा असला तरी हुशार न बिझनेस ओरिएंटेड आहे! घरी त्यांची बायको न सासु मिळून स्वयंपाक करतात. आम्ही ३५०० च २ दिवसाचं पॅकेज घेतलं होतं - राहणं, खाणं , टूर सगळं ह्यातच! सगळ्या सोयी उत्तम होत्या..
आता ते वेगवेगळे ग्रुप टूर पॅकेज, वेबसाईट वगैरे तयार करतायत. त्यांचा नंबर - ०९४८०३८७१४५
या आम्ही हंपीच्या हमपांच! :ड