रण आॅफ कच्छ (प्रवास दैनंदिनी): ३
भूज म्हटलं की मनात येतात त्या भुकंपच्या आठवणी! इतक्या दूर राहणार्या व इतक्या वर्षांनंतरही आपल्या सारख्या लोकांना त्या आठवणी नको वाटतात. इथल्या लोकांची अवस्था त्यावेळेला काय झाली असेल विचार करून मन उदास होतं. 'रण आॅफ कच्छ' सुरू करण्यामागे तोच उद्देश होता. सर्वच गमावून बसल्यामुळे निराश, उदास झालेल्या मनाला उभारी देण्यासाठी काय करता येईल ह्या मंथनातून हा उत्सव सुरू झाला. त्यासाठी लागणारा मूळ घटक आतिथ्यशीलता त्यांच्या रक्तातच असल्याने तो उधार उसनवारीने आणायचा नव्हता व बाकीचे घटक कलासंपन्नता, सृजनशीलता, उत्सवप्रियताही असल्याने त्याला चार चाॅंद लागले. कच्छींनी ही कल्पना उचलून धरली. लोकं उत्साहाने, नव्या उमेदीने कामाला लागले. नव चैतन्य सळालंल आणि आज त्याचं मूर्त रूप आपल्याला पहायला मिळतंय. तुमचा माल उत्तम असला तरी तो लोकांपर्यंत पोचायलाही हवा न. अमिताभ बच्चन! नाम ही काफी है!
कच्छ नही देखा तो कुछ नही देखा
एखादं ठिकाण आपण बघायला जातो, फोटो काढतो, सेल्फी तर काढतोच व आपला प्रवासी धर्म निभावतो, धन्यता मानतो पण त्यापलिकडे आपण कधी डोकवत नाही. रणोत्सवाची कहाणी ऐकल्यावर प्रवासी म्हणून एक नवी दृष्टी मिळाली. कन्याकुमारीच शिला स्मारक पाहिलं ते केंद्राच काम सुरू केल्यानंतरच. त्यामुळे ते एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघितल्याने त्याचा दर्जा एक प्रेक्षणीय स्थळ म्हणून न राहता तो उंचावलाय, ते बनलंय 'तीर्थस्थळ'! एका दुसर्या अर्थाने प्रसिध्द होण्यासाठी कारण ठरलं 'लगान' त्याचा उल्लेख पुढे येईलच.
तर मग आता गुज्जु स्टाईलचा व सर्वसमावेशक नाश्ता करून निघूयात भूज सफरीला. स्वामी नारायण मंदिर, प्राग व आईना महल. त्या महालांच चित्र दर्शन घ्याच पण बस मधून उतरल्या उतरल्या गायींच्या शिंगांनी लक्ष वेधून घेतलं. घेऊयात 'गीर' गाईंचं दर्शन. बाकी गाईडने सांगितलेली रोचक माहिती घरी गेल्यावर लिहीन शेपटीत. लिहीन ना! वांधो नथी! आॅल इज वेल!
घरून निघतेवेळी खरेदी न करण्याचा संकल्प रणोत्सवाची कहाणी ऐकून गळून पडला. ! विनाखंत! दाग अच्छे होते है ! वांधो नथी! आता जाऊयात रणोत्सव मैदानात. वाॅव! रस्त्याच्या दोन्ही बाजूला थोड्या थोड्या अंतरावर सुबक,सुंदर रिसाॅर्टस! काही तंबू, काही भुंगे म्हणजे कुडाच्या झोपड्या लिंपन व नक्षीकाम, रंगकाम केलेल्या!