मागील भागात आपण कर्करोग होण्याच्या संभाव्य धोका ओळखण्यासाठीच्या जनुकीय चाचण्यांबद्दल थोडक्यात चर्चा केली. या भागात, कर्करोग झाला असता सध्याची अत्याधुनिक उपचार पद्धती आणि त्यामागचा विचार याबाबत बोलूया. या लेखाची व्याप्ती allopathy पर्यंत मी मर्यादित ठेवली आहे. आयुर्वेद आणि बाकी उपचारपद्धतीचा समावेश यात नाही
अर्थातच शस्त्रक्रिया हा कर्करोग निवारणाचा महत्वाचा मार्ग आहे पण यात अनेक मर्यादा आहेत. यातील महत्वाची अट अशी आहे की कर्करोगाचा शरीरातील प्रसार आणि त्याच्या कक्षा ठामपणे माहिती असणे अत्यंत गरजेचे असते कारण शस्त्रक्रियेनंतर थोडासा कर्करोग मागे ठेऊन काही उपयोग नाही. मागे उरलेल्या पेशी नवीन जोमाने वाढून कर्करोग परत बळावू शकतो. तसेच कर्करोगाचे निदान उशिरा झाले असेल तर हा धोका फार मोठा होतो आणि बऱ्याच वेळा शस्त्रक्रिया टाळली जाते. बाकीच्याही अनेक गोष्टी जसेकी रोग्याचे वय या निर्णयावर परिणाम करतात. हल्ली अनेकदा औषधे देऊन रोगाचा प्रसार कमी केला जातो आणि मग शस्त्रक्रियेची शक्यता पडताळली जाते. या पद्धतीला neoadjuvant थेरपी असे म्हणतात. अन्यथा माझ्यामते उपचाराबाबतची सध्याची विचारसरणी मूलतः तीन भागात मोडते. १. Chemotherapy २. targeted थेरपी ३. Immunotherapy (किंवा आजून उपचार पद्धती ज्या कर्करोगाच्या नियंत्रण प्रक्रियेवर केंद्रित आहेत). या वर्गीकरणावर मतभेत होऊ शकतात पण मी याचा पाया त्या उपचारपद्धतीमागील तर्क हा ठेवलेला आहे.
१. Chemotherapy - या पद्धतीचा उल्लेख बरेच वेळा होतो त्यामुळे बहुतेक जणांनी हा शब्द निदान ऐकलेला असतो. या पद्धतीमागचा तर्क काय आहे ते बघूया. कर्करोगात सूक्ष्मदर्शकात काय दिसते? पेशींची वेडीवाकडी अनिर्बंध वाढ. ही वाढ अर्थातच अनिर्बंध जनुकीय पुनर्निर्मितीमुळे होते. जर एखादे औषध ही प्रक्रिया थांबवत असेल तर त्यानी तत्वतः प्रत्येक प्रकारचा कर्करोग बरा व्हायला पाहिजे. हा विचार अर्थातच तेव्हाच्या ज्ञानाच्या कक्षेचा विचार केला तर क्रांतिकारक किंवा आमूलाग्र बदल घडवून आणणारा होता. Chemotherapy चा अलीकडचा इतिहास पहिला तर मजेची बाब अशी की पहिले संदर्भ DNA च्या रचनेच्या शोधाच्या आधीचे आहेत म्हणजे १९४० च्या आसपासचे. अर्थातच जनुकांची संकल्पना ही DNA च्या रचनेच्या शोधाच्या अनेक दशके आधी मांडली गेली होती. १९५० नंतर या उपचार पद्धतीचे उपयोग रक्ताच्या तसेच इतर अवयवांच्या कर्करोगासाठी दिसून आला. नंतरची अनेक वर्षे या पद्धतीने कर्करोगाचा उपचार केला गेला. कालांतराने या पद्धतीच्या अनेक मर्यादा लक्षात यायला लागल्या. एक म्हणजे पेशींची वाढ रोखण्यासाठी या पद्धतीत जनुकीय पुनर्निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये ज्या प्रकारे अडथळे निर्माण केले जातात ते कर्करोगाशीच फक्त संलग्न ना राहता अन्यथा निरोगी पेशींना पण त्रासदायक ठरतात आणि त्या पण मारल्या जातात. त्यामुळे रोग्यांना अनेक दुष्परिणामांना सामोरे जावे लागते उदा. अंगाची लाही होणे, केस गळणे इ. हे दुष्परिणाम कधी कधी रोगाइतके त्रासदायक ठरू शकतात. दुसरा मोठा धोका असतो तो रोगाचे उलटणें. काही उदाहरणे अशीही आहेत ज्यात एक प्रकारचा कर्करोग बरा करण्यासाठी वापरलेल्या chemotherapy मुळे त्या रोग्यामध्ये वेगळ्या प्रकारचा कर्करोग निर्माण झाला. या दुष्परिणामांचा molecular पाया अतिशय गुंतागुंतीचा आहे. एक लक्षात घेणे अतिशय महत्वाचं आहे की हे दुष्परिणाम कमी करण्यासाठी आज उपाय उपलब्ध आहेत. अनेक प्रसंगी अजूनही chemotherapy हीच उपचार पद्धती उपयोगी आहे आणि वापरातही आहे. Radiation therapy पण बऱ्याच वेळा वापरली जाणारी उपचार पद्धती आहे पण इथे त्यावर विस्ताराने लिहिणे मी जाणीवपूर्वक टाळले आहे.
२. Targeted therapy:
Source: http://puhuahospital.com/treatments/cancer/targeted
Chemotherapy च्या पुढे आलेल्या मर्यादांमुळे अनेक शास्त्रज्ञांनी मग जरा वेगळ्या मार्गाचा विचार करायला सुरुवात केली. अर्थात मूलभूत संशोधनाने याचा पाया पडला. दोषयुक्त जनुके असलेल्या पेशींची अनिर्बंध वाढ आणि पुनर्निर्मिती कश्यामुळे होते यावर बरेच संशोधन झाल्यावर काही ठळक गोष्टी समोर आल्या. दोषयुक्त जनुकांमुळे चुकीची प्रथिने निर्माण होतात आणि ही प्रथिने अश्या पेशींच्या वाढीला कारणीभूत ठरतात. या प्रथिनांमधले काही महत्वाचे नियंत्रक असतात. या नियंत्रकांवर आळा घातला तर कर्करोगाचे निवारण करता येते आणि या प्रणालीमुळे निरोगी पेशींना ज्यांमध्ये निरोगी प्रथिने असतात त्यांनाही दुष्परिणाम सहन करावे लागत नाहीत. या उपचार पद्धतीला targeted therapy असे म्हणतात ज्यात औषधांचे लक्ष्य फक्त चुकीची प्रथिने असलेल्या पेशी असतात. Chemotherapy च्या मानाने targeted therapy अनेक पटीत परिणामकारक आहे हे लगेच दिसून आले. त्याबरोबरच Chemotherapy एवढे दुष्परिणाम नव्हते. अर्थातच गुण इतके होतेच पण दोषही होते. एक म्हणजे ही औषधे अतिशय महागडी असतात, भारतातच नाही तर बाहेरही. दुसरं म्हणजे प्रत्येक प्रकाच्या दोषासाठी वेगळे औषध असते. त्यामुळे नेमका दोष कोणता आहे हे ओळखणं अनिवार्य आहे. त्यासाठी केलेल्या जाण्याऱ्या चाचण्याही स्वस्त नाहीत. तिसरं आणि माझ्यामते सर्वात महत्वाचे म्हणजे कर्करोगाच्या पेशींमध्ये एकापेक्षा जास्त प्रकारची दोषी प्रथिने असू शकतात आणि आपण एकासाठीचे औषध घेतले तर ज्यासाठी औषध घेतलेले नाही ते मान वर काढू शकते आणि रोग उलटू शकतो. हे सर्व खरे असले तरी या पद्धतीची स्पष्ट उपयुक्तता नाकारता येणार नाही.
३. Immunotherapy:
Source:https://www.bloomberg.com/quicktake/cancer-coup
मागे मी म्हणाले तसं कर्क रोग शरीरात पसरताना आपली प्रतिकार शक्ती फसवली जाते कारण या पेशींची/प्रथिनांची अनिसर्गिकता कर्करोगात बेमालूमपणे लपवली जाते. अर्थातच शास्त्रज्ञ असा विचार करू लागले की काय असे करता येईल जेणेकरून प्रतिकारशक्ती परत चेतावता येईल. या पद्धतीमध्ये अनेक मार्ग अवलंबले जातात उदा. कर्करोगाच्या पेशी ओळखता येतील अश्या निशाणी ओळखून देणारी प्रतिद्रव्य प्रथिने, प्रतिकारशक्तीला चालना देणारी नैसर्गिक रसायने किंवा इतक्यात सगळ्यात मोठं यश मनाली जाणारी म्हणजे प्रतिकारशक्तीच्या पेशींचे एक प्रकारचे प्रत्यारोपण (CAR - T cell therapy). काही महिन्यांपूर्वीच US FDA ने पहिल्या CAR - T cell therapy ला मान्यता दिली. खाली दिलेले संदर्भ नक्की वाचा ज्यात यावर विस्ताराने लिहिलेले आहे.
Immunotherapy - https://www.cancer.net/navigating-cancer-care/how-cancer-treated/immunot...
CAR-T cell therapy - https://www.cancer.net/blog/2018-01/car-t-cell-immunotherapy-2018-advanc...
ही सर्व प्रगती नक्कीच उत्साहवर्धक आहे.. आशादायी आहे. पण हेही खरे की कुठलीही एक उपचार पद्धती कर्करोगाचे समूळ उच्चाटन करण्यास समर्थ नाही किंवा पहिल्या यशानंतर कर्करोग आपलं रूप असं बदलतो की त्यावर मात करायला नवीन विचार करायला लागतो. मग एकापेक्षा अधिक पद्धतींचे मिश्रण उपयोगी ठरू शकते. अर्थात आपण सतर्क असलो तर कर्करोगाचे निदान अगदी लवकर होऊ शकते आणि तेव्हा १००% यशाची अपेक्षा करू शकतो. सर्व गोष्टी आपल्या हातात नसल्या तरी बऱ्याचश्या असतात आणि त्यांनी परिणाम पूर्णतः बदलू शकतो.
धन्यवाद,
नंदिनी सहस्रबुद्धे, Ph.D.
टीप : हा या लघुमालिकेतील शेवटचा भाग. मला संपूर्ण कल्पना आहे की या विषयाची व्याप्ती प्रचंड आहे आणि एवढ्या छोट्या लेखांतून सर्व गोष्टींचा अंतर्भाव झालेला नाही. हेतू तोंडओळख करून देणे इतकाच होता. आपण काही गोष्टी ऐकलेल्या असतात पण त्यामागची करणं माहिती असतातच असं नाही. ते थोड्याप्रमाणात पुरवण्याचाही प्रयत्न केला आहे. लिखाणात काही चूक झाली असल्यास क्षमस्व.