माता इकडे असली की एरवी ऑप्शनला टाकलेले सगळे किचकट, कंटाळवाणे, निगुतीने करायचे पदार्थ आठवायला लागतात. खाऊन खाऊन वजन वाढू शकणे हा बारिकसा धोका सोडला तर हे पदार्थ आईबरोबर करायला छान मजा येते. मस्त गप्पा मारत, जुन्या आठवणींना उजाळा देत अधून मधून आईचा ओरडा खात (नीट लाट, असा धसमुसळेपणा नको करूस वगैरे) हा हा म्हणता म्हणता काही तरी छान बनवून पण होते आणि ते नेहेमीच खूप खूप छान होते. आईच्या स्पेशल रेसिपीचे हे मुळ्याचे पराठे. एरवी मुळ्याला मनापासून नाक मुरड्णार्या मुलाने ३ पराठे खाऊन आजीला तू आईपेक्षा चांगला स्वयपाक करतेस असे सांगण्याचे सत्कृत्य पण केले.
साहित्य
सारणः
तीन मध्यम आकाराचे मुळे (या वेळी इथले दंडुक्यासारखे जाडजूड दाईकोन रॅडिश न मिळता छोटेखानी मुळे मिळाले होते.) साल काढून, मध्यम भोकांच्या किसणीवर किसून घ्यायचे. थोडे मीठ लावून पाच मिनिटांनी घट्ट पिळून घ्यायचे. पाणी टाकून द्यायचे नाही.त्याने पराठ्याची कणिक भिजवायची आहे.
३-४ (आवडीप्रमाणे, वकुबाप्रमाणे जास्त हिरव्या मिरच्या आणि १.५ टी स्पून जीरे पाणी न घालता मिक्सरला वाटून घ्यायचे.
किसलेल्या मुळ्यात, मीठ, जीरे-मिरचीचे वाटण, भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडी धने-जीरे पूड घालून हलक्या हाताने सारण मिक्स करून ठेवायचे. (इथे धसमुसळेपणा नको :-))
पराठ्याची कणिक
२ वाट्या कणिक, १.५ टेबलस्पून डाळीचे पीठ(बेसन), मीठ, ओवा आणि १ टेबलस्पून कच्चे तेल मिक्स करून घ्यायचे. त्यात मुळ्याचे पिळलेले पाणी आणि लागेल तसे पाणी घालून फार सैल नाही आणि फार घट्ट नाही अशी कणिक भिजवून घ्यायची.
पराठे
नेहेमीच्या पोळीपेक्षा थोडा मोठा उंडा घेऊन त्याचे दोन समान भाग करायचे. दोन्ही भागांचे पातळ चक्क फुलके लाटून घ्यायचे. (भाजायचे नाहीत) एका फुलक्यावर भरपूर सारण घालून त्यावर अलगद दुसरा फुलका ठेवून सगळीकडून नीट बंद करून घ्यायचे आणि २-३ वेळाच हलक्या हाताने लाटणे फिरवून पराठा तयार करायचा. दोन्हीकडून तेल किंवा तूप घालून नीट भाजायचा आणि गरम गरम खायला घ्यायचा.
अधिक टीपा
१) सारण भरून दुसरा फुलाका टाकून जे लाटायचे आहे ते अगदी हलक्या हाताने. इथे धसमुसळेपणा केला की सगळे मूसळ केरात जाते. मूळ्यातले पाणी जीवाच्या आकांताने बाहेर येते. पोळपाट-लाटणे मस्त चिकट होते, सगळा राडा होतो. त्यामुळे चुकूनही इथे शक्तीचे प्रयोग करू नयेत. (कोण ते अनुभवाचे बोल का असे म्हणत आहे?)
२) उंड्यात सारण भरून पुरणपोळीप्रमाणे लाटणे हा ऑप्शन नाही. वाचा अधिक टीपा क्रमांक १
३) सगळे पराठे करून ठेवून नंतर तव्यावर गरम केले तरी तितकेच छान लागतात.
४) सारण भरपूर भरणे ही मेन रिक्वायरमेंट आहे तरच तो मुळ्याचा सुंदर स्वाद येतो.सारणात आले-लसूण घालू नये. सर्व उग्र चवी एकमेकांशी फटकून वागतात.
५) मूळा न आवडणारी मेंब्रं खाऊ शकतील अशी रेसिपी आहे. ट्राय मारा.
हे फोटो. आईने पराठे केले, मी अधिक टीपांसाठी मटेरियल पुरवणे आणि फोटो काढणे अशी कामे केली.
सारण
तयार पराठे
क्रॉस सेक्शन :-)