थंडीमधे मला हे लाडू करायला फार आवडतात. पटकन होतात,पाक वगैरे नसल्याने सोपे आहेत आणि बर्यापैकी गुणी आहेत, काहीही घातले तरी बहुतेक चांगलेच लागतात.
साहित्य
४ वाट्या नेहेमीची कणिक (गव्हाचे पीठ)
१/२ वाटी डाळीचे पीठ (बेसन)
१ वाटी तूप (लागल्यास थोडे जास्त)
१.५-२ वाटी बारीक चिरलेला गूळ
२ टेबल्स्पून पीठीसाखर
बाकी मग मी घातलेले साहित्य खालीलप्रमाणे
२ टे. स्पून काजू
२ टे. स्पून आक्रोड
२ टे. स्पून सालासह बदाम (हे सगळे फूड प्रोसेसर मधून भरड पूड करून घेतले)
१ टेबलस्पून भाजलेल्या तीळाची पूड
७-८ सुके अंजीर अगदी बारीक चिरून
३-४ खजून बी काढून बारीक चिरून
१ टेबलस्पून बेदाणे
कृती
१) कणिक कोरडीच (तूप न घालता) मंद गॅसवर छान गुलाबी रंगावर भाजून घ्यायची
२) दुसर्या पॅनमधे १-२ चमचे तूपावर बेसन पण भरपूर भाजून घ्यायचे (बे. लाडू साठी भाजतो तसेच)
३) कणिक भाजत आली की १-२ मिनिट आधी काजू-बदाम-आक्रोड पूड पण त्यातच घालून जरा परतायचे
४) कणिक आणि बेसन नीट एकत्र करून गॅस बंद करून, गरम असतानाच त्यात चिरलेला गूळ घालून एकत्र करायचे. कणकेमुळे गूळ वतळतो. तरी पण जरा खडे राहिलेत असे वाटले तर या स्टेजला मिश्रण एकदा फूड प्रोसेसर वरून फिरवून नीट एकजीव करून घ्यायचे.
५) नंतर मिश्रणात खजूर,अंजीर, बेदाणे घालायचे. चव बघून गरज असेल तर थोडी पीठीसाखर घालायची.
६) आणि मग पातळ केलेले तूप घालून साधारण लाडू वळता येतील असे झाले की लाडू वळायचे.