ही मूळ संकल्पना माझी नाही. याबद्दलचा लेख एकदा वाचला होता. तो प्रयोग स्वतः करुन पाहिला. त्यानंतर दोन-अडीच वर्षांपूर्वी लेकाच्या शाळेत आयोजित करण्यात आलेल्या विज्ञान प्रदर्शनासाठी मी हा प्रयोग सुचवला होता ज्याचे फार चांगल्या प्रकारे शाळेत स्वागत झाले. प्रदर्शनातही या प्रयोगाची विचारणा अनेकांकडून झाली.
आज सॄजनाच्या वाटा या उपक्रमांतर्गत 'रिसायकल-अप्सायकल' या विभागात मी हा प्रयोग- साहित्य, कॄतीसह इथे देत आहे. याचा उपयोग विशेषकरुन ग्रामीण भागातील लोकांना होऊ शकतो आणि तेही जिथे भारनियमन आहे अशा ठिकाणी. विशेष म्हणजे यासाठी लागणारे साहित्य अत्यल्प दरात मिळू शकते.
साहित्य- खडू - १ -फळ्यावर लिहिण्यासाठी असतो तो, क्रेयॉन नव्हे
थोडेसे मेण - कँडल स्टँडमध्ये मेणबत्तीच्या आजुबाजूने ओघळलेले थोडेसे पुरे
वाटी किंवा ताटली - १
काडेपेटी
कृती - सर्वप्रथम एका वाटीत किंवा ताटलीत थोडेसे मेण घेऊन ते गरम करुन वितळवून घेणे. या वितळलेल्या मेणात एक खडू बुडवून ठेवणे, खडूचा संपूर्ण पॄष्ठभाग मेणात भिजेल हे बघणे. खडू या अवस्थेत ४-५ मिनिटे ठेवणे. खडूतील कॅल्शिअम कार्बोनेट हे मेण शोषून घेते. नंतर हा खडू पेटवणे व ज्या वाटीत/ताटलीत मेण वितळवले होते त्यातच उभा करुन ठेवणे.
जर वारा येत नसेल तर पूर्ण खडू जळून जाईपर्यंत साधारणपणे दोन ते अडीच तास हा दिवा जळत रहातो.