सर्व मैत्रीणींना गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.
लता मंगेशकरांनी गायलेल्या व मला आवडलेल्या गाण्यांचे रसग्रहण करायचा हा आनंददायक उपक्रम पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सुरू करत आहे. ह्या गाण्यांचे आपले असे एक मिथिकल युनिवर्स आहे. मानवी भावनांच्या अनेक नाजूक, हळव्या पदरांना लतेची गाणी तिच्या सुमधुर अप्रतिम आवाजात स्पर्श करतात. गाणे ऐकल्यावर आपल्याला उमगते की खरेच की, मला असंच तर वाटतंय. ही गटणे छाप एक्सेल शीट मधली जंत्री नव्हे किंवा लताचे टॅलेंट कसे वर्ल्ड्क्लास आहे ते ठासून सांगायचा प्लॅट्फॉर्म ! ही फक्त एक सुरांची आनंदयात्रा आहे.
लतेबरोबर कल्पनेची भरारी घेताना आपण प्रथम जाणार आहोत राजस्थानच्या वाळवंटात. जीवनाच्या वाटेवर पुढे पुढे जाताना आपण आपला मायदेश, गाव, गल्ली सोडून जगाच्या पाठीवर कुठेतरी रुजायचा प्रयत्न करत असतो. पाय थोडे स्थिर होतातही आणि आपला आसरा उभा राहतो. दिवसरात्रीचे वेगवान चक्र फिरत राहते. पण कधीतरी रात्री दोन-अडीच-तीनला झोप येत नाही. परगावी, परदेशी किर्र अंधारात मन शोध घेते माहेराचा. तिथल्या सुखी क्षणांचा आठव येउन पापण्या कधी झरायला लागतात ते कळतही नाही आणि अश्या अवस्थेत लताची तान येते सोबत एक भावुक तक्रार घेउन. आणि मग सासूर वाशीण वडिलांकडे मागणी करते..... सुनिओ जी अरज म्हारी, बाबुला हमार.
सुरांच्या स्केल वर ही ओपनिंग तान म्हणजे विराटने येताच पहिल्या बॉलला मारलेली सिक्सर आहे.
बरोबर कोणतेही वाद्य नसताना ही फिरकीची तान गायिकेचे निर्विवाद कौशल्य व सुरांवरची कमांड च
एका फटक्यात समोर आणते. मग पखवाज आहे व गाणे तबल्यावर सुरू होते. संगीतकार बंधूंनी आपल्या बहिणीसाठी मुद्दाम अवघड चाल रचली आहे व लतेने त्याचे झळाळते सोने केले आहे.
सावन आयो
घर लयी जइहो.
बाबुला हमार.
सुनियो जी.
मग माहेरवाशीण; जी सासरच्या भावनीक वाळवंटात एक एक दिवस कामाच्या असह्य ओझ्याखाली दबून, सासूच्या निर्दय कड्क नजरे खाली एक एक दिवस घालवते आहे तिला माहेरच्या आईच्या मायेने भिजलेल्या अंगणाची सय येते. भावाबरोबर केले ल्या खोड्या सुखवून जातात.
ह्या कडव्यातली आवाजाची फिरत ऐका.
भिजे भिजे अंगना की
याद जो आवे,
रुखी रुखी आंखियों में रेती उडाये.
सूनी सूनी कोरी अंखिया भेजिओ फुहार
आलाप
सारेग ग ध ध पग सां सां नी ध. गपसनी ध गनी धप गध पग सारे धसा.
अगदी कलदार चांदीच्या भांड्याव र आघात केल्यासारखे क्लिअर आहेत.
रुक्ष जीवन जगताना डोळ्यातले अश्रू आणि मनातल्या भावना सर्वच सुकून गेले आहे. मायेचा थोडा ओलावा पाठवा बाबा नाहीतर तुमची लाडली बेटी कशी तग धरेल... असा विलाप सासरी दूर दिलेली कन्या करते.
पण तुम्ही सर्व मला विसरला तर नाहीत. एकदा सासरी देउन टाकली ती तिकडचीच झाली. पण माझे मन तुमच्यात अडकले आहे ना. ते काही नाही. डोली घेउन चार कहार पाठवून द्या कसे कितीही मनात आले तरी रीतसर बोलावणे आल्याशिवाय सासू जाउ द्यायची नाही व अहोंना पण आव्डायचे नाही मी माहेरी आलेले . आता श्रावणात तिथे धूम चालू असेल पाणवठ्यावर मैत्रीणी एक मेकींची थट्टा करत साडी धूत असतील, मेळ्यातून काय रंगाच्या बांगड्या घ्यायच्या , नवे बोरले
घ्यायचे त्याचे बेत रचत असतील आणि मी इथे एकटी चुलीसमोर भाकर्या शेकवत बसलेय.
बिसरा दिये हो बाबुल बिदेस भिजायके ( बदल केला गं)
हमका बुलाय रे बाबुल डोलिया लिवायके
भेजो जी डोली उठाये. भेजो जी चारो कहार.
ह्या वाक्याला मला कायम भरून येतो. माहेर अंगावर घेउन अनेक भौतिक जबाबदार्या पेलत मोठी झालेली ही स्त्री. सासर पाहिले नाही आणि सासुर वाशिणीचे सोपस्कार झाले नाहीत. पण ही वाक्ये इतक्या प्रांजल स्री सुलभ पणे म्हणते की अंगावर काटा येतो. तिचे माहेर सप्तकातच लपले आहे.
वडील कधीच वारले लहान पणी. पण त्यांना हे गाताना वडिलांची आठवण येत असेल का? असे
वाटून मी त्यांच्या वाट् चे गहिवरून घेते. कारण गाण्यात हे वैयक्तिक दु:ख कधी ही कुठेही दिसत नाही तिथे फक्त एक चोख, परफेक्ट कलात्मक आविष्कार दिसतो. हे एका कसलेल्या अनुभवी गायिकेचे गोळीबंद आउट पुट आहे. काहीही त्रास का असेना आपल्या कामात फक्त परफेक्षन दिसले पाहिजे हे मला लताबाईंच्या ह्या गाण्यातून शिकायला मिळते. माणूस म्हणून इतके मोठे व्हायला किती सोसावे लागले असेल ह्याचा विचार करून मी येणार्या दिवसाच्या कामाचा विचार करू लागते. आपले माहेर आपल्या मनातच घेउन.
अश्विनी खाडीलकर.
========================================================
गाणे सावन वर किवा युट्यूब वर आहे.